व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४४

गीत ३३ आपला भार यहोवावर टाक

अन्यायाचा सामना कसा करायचा?

अन्यायाचा सामना कसा करायचा?

“वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्‍याने वाइटाला जिंकत राहा.”रोम. १२:२१.

या लेखात

तुमच्यासोबत अन्याय होतो तेव्हा परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून तुम्ही काय करू शकता ते पाहू या.

१-२. आपल्यासोबत कशा प्रकारे अन्याय होऊ शकतो?

 येशूने आपल्या शिष्यांना एका विधवेचं उदाहरण दिलं. न्याय मिळण्यासाठी ती एका न्यायाधीशाला सारखी विनंती करत होती. तिचं दुःख शिष्यांना नक्कीच कळलं असेल कारण त्या काळात सहसा सामान्य लोकांवर अन्याय व्हायचा. (लूक १८:१-५) आज आपणही तिचं दुःख समजू शकतो कारण आपल्यासोबतही कधी न कधी अन्याय झालाच असेल.

आज जगात एखाद्याबद्दल आधीच मत बनवणं, भेदभाव करणं, एखाद्यावर जुलूम करणं हे खूप सर्वसामान्य झालंय. म्हणून जेव्हा कोणी आपल्याशी असं वागतं तेव्हा आपल्याला त्याचं आश्‍चर्य वाटत नाही. (उप. ५:८) पण जर एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याशी वाईट वागते तर याचं आपल्याला खूप दुःख होऊ शकतं. पण आपले भाऊबहीण काही आपले विरोधक नाहीत. ते फक्‍त अपरिपूर्ण आहेत. येशू पृथ्वीवर होता तेव्हा दुष्ट लोक त्याच्याशी खूप वाईट वागले. पण तो त्यांच्याशी कसा वागला यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळू शकतं. आपल्यावर अन्याय करणाऱ्‍या विरोधकांशी जर आपण सहनशीलतनेते वागतो, तर आपल्या भाऊबहिणींशी आपण किती जास्त सहनशीलतेने वागलं पाहिजे? पण एखादी बाहेरची किंवा मंडळीतली व्यक्‍ती आपल्यावर अन्याय करते तेव्हा यहोवाला कसं वाटतं? त्याला काही फरक पडतो का?

३. आपल्यावर अन्याय होतो तेव्हा यहोवाला फरक पडतो हे आपण कशावरून म्हणू शकतो?

लोक आपल्याशी कसं वागतात याचा यहोवाला नक्कीच फरक पडतो. कारण “यहोवा न्यायप्रिय आहे.” (स्तो. ३७:२८) येशूने अशी खातरी दिली, की योग्य वेळ येईल तेव्हा यहोवा ‘लवकरात लवकर न्याय मिळवून देईल.’ (लूक १८:७, ८) ज्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात त्या गोष्टी यहोवा लवकरच काढून टाकेल आणि पुन्हा कधी आपल्याला अन्याय सहन करावा लागणार नाही.—स्तो. ७२:१, २.

४. आज यहोवा आपल्याला कोणती मदत पुरवतोय?

आपण अशा जगाची वाट पाहत आहोत जेव्हा न्यायनीती कायमची टिकून राहील. पण तोपर्यंत अन्याय सहन करण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करतो. (२ पेत्र ३:१३) आपल्यासोबत अन्याय होतो तेव्हा आपण अविचारीपणे वागू शकतो. पण हे टाळण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करतो. त्यासाठी त्याने आपल्या मुलाचं, येशूचं एक खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर मांडलं. यासोबतच आपल्यावर अन्याय होतो तेव्हा त्याचा सामना कसा करायचा यासाठी त्याने बायबलमध्ये काही व्यावहारिक सल्लेही दिले आहेत.

अन्यायाला तुम्ही कशी प्रतिक्रीया देता याकडे लक्ष द्या

५. अन्याय होतो तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष का दिलं पाहिजे?

अन्यायामुळे आपलं मन खूप दुखावलं जाऊ शकतं. (उप. ७:७) ईयोब आणि हबक्कूक यांसारख्या देवाच्या विश्‍वासू सेवकांनाही असंच वाटलं होतं. (ईयो. ६:२, ३; हब. १:१-३) असं वाटणं साहजिक आहे. पण अशा वेळी आपण कशी प्रतिक्रिया देतो याबद्दल काळजी घेणं खूप महत्त्वाचंय, नाहीतर आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडू शकतं.

६. अबशालोमच्या उदाहरणातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (चित्रसुद्धा पाहा.)

आपल्यासोबत अन्याय होतो तेव्हा चुकीच्या पद्धतीने आपण गोष्टी आपल्या हातात घेऊ शकतो. आणि यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडू शकते. दावीदचा मुलगा अबशालोम याचंच उदाहरण घ्या. त्याचा सावत्र भाऊ अम्नोन याने जेव्हा त्याच्या बहिणीवर बलात्कार केला, तेव्हा अबशालोम रागाने पेटून उठला. मोशेच्या नियमशास्त्रानुसार अम्नोनने जे केलं त्यासाठी मृत्युदंडाची शिक्षा होती. (लेवी. २०:१७) अबशालोमला राग येणं स्वाभाविक होतं. पण तरी त्याने हे प्रकरण स्वतःच्या हातात घ्यायला नको होतं.—२ शमु. १३:२०-२३, २८, २९.

अबशालोम आपली बहीण तामार हिच्यावर झालेल्या अन्यायामुळे रागाने पेटून उठला (परिच्छेद ६ पाहा)


७. अन्याय पाहून स्तोत्रकर्त्याला कसं वाटलं?

इतरांवर अन्याय करणाऱ्‍यांना जेव्हा काहीच शिक्षा होत नाही, तेव्हा आपल्याला प्रश्‍न पडू शकतो, की ‘चांगलं वागण्यात काही अर्थ आहे का?’ स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की दुष्ट लोक चांगल्या लोकांवर अन्याय करतात, पण तरीही असं वाटतं, की त्यांची भरभराट होत आहे. त्याने म्हटलं: “दुष्ट हे असे असतात; त्यांचं सगळं सुरळीत चालतं.” (स्तो. ७३:१२) अन्याय पाहून तो खूप निराश झाला आणि यहोवाची सेवा करण्यात काहीच अर्थ नाही असं त्याला वाटलं. त्याने म्हटलं: “मी या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला मनःस्ताप झाला.” (स्तो. ७३:१४, १६) त्याने तर असंही म्हटलं: “माझी पावलं तर जवळजवळ भरकटलीच होती; मी पडण्याच्या बेतात होतो.” (स्तो. ७३:२) असंच काहीसं अल्बर्टो या भावाच्या बाबतीत घडलं.

८. अन्यायाचा एक भावावर कसा परिणाम झाला?

अल्बर्टोवर मंडळीच्या निधीतून पैसे चोरण्याचा चुकीचा आरोप लावण्यात आला होता. यामुळे त्याने त्याच्या जबाबदाऱ्‍या गमावल्या. आणि मंडळीतल्या ज्या लोकांना याबद्दल कळलं, त्यांच्या नजरेत तो उतरला. ती गोष्ट आठवून तो म्हणतो: “मला भयंकर राग आला होता आणि माझी खूप चीडचीड होत होती.” त्याच्या या भावनांचा त्याच्या आध्यात्मिकतेवरही परिणाम झाला. जवळजवळ पाच वर्षांसाठी तो मंडळीच्या सभांनासुद्धा येत नव्हता. या उदाहरणातून कळतं, की आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे राग येणं साहजिक आहे. पण आपण जर त्यावर ताबा ठेवला नाही, तर त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

अन्यायाचा सामना करण्यासाठी येशूचं अनुकरण करा

९. येशूला काय काय सहन करावं लागलं? (चित्रसुद्धा पाहा.)

अन्यायाचा सामना कसा करायचा या बाबतीत येशूने सगळ्यात चांगलं उदाहरण मांडलं. त्याला घरच्यांकडून आणि बाहेरच्यांकडून अन्यायाचा किती सामना करावा लागला याचा विचार करा. त्याच्या अविश्‍वासू नातेवाइकांनी त्याच्यावर आरोप लावला, की तो वेडा झालाय. धार्मिक नेत्यांनीही म्हटलं, की तो दुष्ट स्वर्गदूतांच्या मदतीने चमत्कार करतो. तसंच, रोमी सैनिकांनी त्याची थट्टा केली, त्याला यातना दिल्या आणि शेवटी त्याला मारून टाकलं. (मार्क ३:२१, २२; १४:५५; १५:१६-२०, ३५-३७) येशूने हा सगळा अन्याय सहन केला. पण त्याच्या मनात कधीच बदल्याची भावना आली नाही. त्याच्या या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

अन्यायाचा सामना करायच्या बाबतीत येशूने सगळ्यात चांगलं उदाहरण मांडलं आहे (परिच्छेद ९-१० पाहा)


१०. येशूने अन्यायाचा सामना कसा केला? (१ पेत्र २:२१-२३)

१० १ पेत्र २:२१-२३ वाचा. a अन्यायाचा सामना करण्याच्या बाबतीत येशूचं आपल्यासमोर सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. त्याला माहीत होतं, की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. (मत्त. २६:६२-६४) त्याच्यावर लावलेल्या प्रत्येक आरोपाचं त्याने उत्तर दिलं नाही. (मत्त. ११:१९) तो जेव्हा बोलला तेव्हा त्याने त्याचा छळ करणाऱ्‍यांचा अपमान केला नाही किंवा त्यांना धमकावलं नाही. येशूने नेहमी संयम बाळगला, कारण त्याने “नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती स्वतःला सोपवून दिलं.” आपल्यावर अन्याय होतो, तेव्हा यहोवाला त्याबद्दल कसं वाटतं हे येशूसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. त्याच्यावर जो अन्याय झालाय त्याचं यहोवा योग्य वेळी उत्तर देईल, असा भरवसा त्याला होता.

११. आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण काय करू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

११ आपल्यावर जेव्हा आन्याय होतो तेव्हा आपण विचार करून बोललं पाहिजे. असं करून आपण येशूचं अनुकरण करत असतो. काही गोष्टी क्षुल्लक असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. किंवा गोष्टी आणखी बिघडू नयेत म्हणून आपण शांत राहू शकतो. (उप. ३:७; याको. १:१९, २०) पण इतर वेळी जेव्हा कोणावर अन्याय होतो किंवा आपल्याला सत्याची बाजू मांडायची असते, तेव्हा आपल्याला बोलायची गरज पडू शकते. (प्रे. कार्यं ६:१, २) अशा वेळी आपण बोलायचं ठरवलं, तर आपण शांतपणे आणि आदराने बोललं पाहिजे.—१ पेत्र ३:१५. b

आपल्याला अन्यायाचा सामना करावा लागतो तेव्हा काय आणि कसं बोलायचं या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो (परिच्छेद ११-१२ पाहा)


१२. “नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती” आपण स्वतःला कसं सोपवून देऊ शकतो?

१२ येशूचं अनुकरण करायचा आणखी एक मार्ग म्हणजे आपण “नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती” स्वतःला सोपवून दिलं पाहिजे. जेव्हा इतर जण आपल्याबद्दल चुकीचं मत बनवतात किंवा आपल्याशी वाईट वागतात तेव्हा खरं काय आहे ते यहोवाला माहीत आहे, असा भरवसा आपण ठेवू शकतो. या भरवशामुळे आपल्याला ती गोष्ट सहन करायला मदत होते. कारण यहोवा योग्य वेळी सगळ्या गोष्टी ठीक करेल हे आपल्याला माहीत असतं. सगळ्या गोष्टी यहोवाच्या हाती सोपवून दिल्यामुळे आपण मनात राग धरून बसत नाही किंवा कोणाबद्दल द्वेष बाळगत नाही. कारण यामुळे आपल्या हातून काहीतरी वाईट होऊ शकतं, आपला आनंद नाहीसा होऊ शकतो आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो.—स्तो. ३७:८.

१३. अन्यायाचा धीराने सामना करायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

१३ हे खरंय की आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण पूर्णपणे कधीच करू शकत नाही. कधीकधी आपण असं काहीतरी बोलतो किंवा करतो, ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. (याको. ३:२) आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आपल्याला भावनिक किंवा शारीरिक त्रास होऊ शकतो आणि आपल्याला त्याचे परिणाम आयुष्यभर सहन करावे लागू शकतात. तुमच्यासोबत असं झालं असेल तर याची खातरी असू द्या, की तुम्ही कशातून जात आहात, हे यहोवाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. येशूलासुद्धा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते. (इब्री ४:१५, १६) यहोवाने येशूचं परिपूर्ण उदाहरण आपल्यासमोर मांडलं आहे. पण त्यासोबतच अन्यायाचा सामना करण्यासाठी त्याने आपल्याला काही व्यावहारिक सल्लेही दिले आहेत. आता आपण अन्यायाचा सामना करायला मदत करतील अशा रोमकर पुस्तकातल्या दोन वचनांवर चर्चा करू या.

“देवाला त्याचा क्रोध व्यक्‍त करू द्या”

१४. ‘देवाला त्याचा क्रोध व्यक्‍त करू देणं’ म्हणजे काय? (रोमकर १२:१९)

१४ रोमकर १२:१९ वाचा. प्रेषित पौलने ख्रिश्‍चनांना म्हटलं: “देवाला त्याचा क्रोध व्यक्‍त करू द्या.” याचा काय अर्थ होतो? आपण यहोवाला, त्याला हव्या असलेल्या वेळी आणि त्याला हव्या असलेल्या पद्धतीने न्याय करू देतो, तेव्हा आपण त्याला त्याचा क्रोध व्यक्‍त करू देत असतो. जॉन नावाच्या भावासोबतही अन्याय झाला होता. तो म्हणतो: “जे काही चुकीचं घडत होतं, त्याला माझ्या पद्धतीने बरोबर करायचा मला खूप मोह होत होता. पण रोमकर १२:१९ मुळे मला धीर धरायला आणि यहोवावर भरवसा ठेवायला मदत झाली.”

१५. आपल्यावर अन्याय होतो तेव्हा यहोवावर विसंबून राहणंच सगळ्यात चांगलं आहे असं का म्हणता येईल?

१५ आपल्यावर अन्याय होतो तेव्हा यहोवावर विसंबून राहिल्यामुळे आपल्याला फायदाच होतो. असं केल्यामुळे समस्या कशी सोडवायची याबद्दल आपण चिंता करत बसत नाही. कारण आपल्याला माहीत आहे की यहोवा आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो. तो जणू म्हणतो: ‘तुमच्यावर जो अन्याय झालाय त्याला कसं उत्तर द्यायचं ते माझ्यावर सोपवून द्या. मी ते पाहून घेईन.’ यहोवाने आपल्याला, “मी परतफेड करीन” असं वचन दिलंय. या अभिवचनावर आपण भरवसा ठेवला, तर आपण आपल्यावर झालेल्या अन्यायावर विचार करत बसणार नाही आणि यहोवा सगळ्यात चांगल्या पद्धतीने ती गोष्ट हाताळेल असा भरवसा आपल्याला असेल. आधी उल्लेख केलेल्या जॉनच्या बाबतीतही असंच घडलं. तो म्हणतो: “मी जर यहोवावर भरवसा ठेवला तर तो माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने समस्या सोडवू शकतो.”

“बऱ्‍याने वाइटाला जिंकत राहा”

१६-१७. “बऱ्‍याने वाइटाला जिंकत” राहण्यासाठी प्रार्थनेमुळे कशी मदत होऊ शकते? (रोमकर १२:२१)

१६ रोमकर १२:२१ वाचा. पौलने ख्रिश्‍चनांना सल्ला दिला, की त्यांनी “बऱ्‍याने वाइटाला जिंकत” राहावं. डोंगरावरच्या प्रवचनात येशूने म्हटलं: “आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा.” (मत्त. ५:४४) येशूने अगदी हेच केलं. रोमी सैनिकांनी त्याला वधस्तंभावर खिळलं तेव्हा त्याला किती वेदना झाल्या असतील याचा आपण नक्कीच विचार केला असेल. पण येशूला जो अपमान आणि अन्याय सहन करावा लागला याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

१७ येशूला इतका अन्याय सहन करावा लागला तरीसुद्धा तो इतरांशी प्रेमाने वागला आणि यहोवाला विश्‍वासू राहिला. त्याचा छळ करणाऱ्‍या रोमी सैनिकांना शाप देण्याऐवजी त्याने त्यांच्यासाठी अशी प्रार्थना केली: “बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.” (लूक २३:३४) आपणसुद्धा जेव्हा आपल्यावर अन्याय करणाऱ्‍यांसाठी प्रार्थना करतो, तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग किंवा द्वेषाची भावना कमी होते. आणि त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनसुद्धा बदलतो.

१८. छळाचा सामना करायला अल्बर्टो आणि जॉन यांना कशी मदत झाली?

१८ या लेखात आधी उल्लेख केलेल्या दोन भावांना अन्यायाचा सामना करण्यासाठी प्रार्थनेमुळे खूप मदत झाली. अल्बर्टो म्हणतो: “जे बांधव माझ्याशी अन्यायीपणे वागले त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात राग असू नये म्हणून मी बऱ्‍याचदा यहोवाला विनंती केली.” आनंदाची गोष्ट म्हणजे अल्बर्टो आता पुन्हा एकदा यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहे. जॉन म्हणतो: “ज्या बांधवाने माझं मन दुःखावलं होतं, त्याच्यासाठी मी बऱ्‍याचदा प्रार्थना केली. अशा प्रार्थनेमुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात असलेला राग आणि द्वेष काढून टाकायला मला मदत झाली. तसंच मला मनाची शांतीही मिळाली.”

१९. या दुष्ट व्यवस्थेचा अंत होत नाही तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे? (१ पेत्र ३:८, ९)

१९ या दुष्ट व्यवस्थेचा अंत होत नाही तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला अन्याय सहन करावा लागेल. आपल्या वाटेला काहीही आलं, तरी आपण यहोवाला प्रार्थना करायचं कधीही सोडू नये. येशूवर अन्याय झाला तेव्हा तो ज्या प्रकारे वागला त्याचं आपण अनुकरण करू शकतो. आणि बायबलची तत्त्वं लागू करत राहू शकतो. आपण जर असं केलं, तर यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल याची आपण खातरी बाळगू शकतो.—१ पेत्र ३:८, ९ वाचा.

गीत ३८ तो तुला बळ देईल

a पहिले पेत्र अध्याय २ आणि ३ मध्ये प्रेषित पेत्र अशा परिस्थितींबद्दल बोलत होता, जेव्हा पहिल्या शतकातल्या बऱ्‍याच ख्रिश्‍चनांना त्यांच्या कठोर मालकांकडून आणि विश्‍वासात नसलेल्या पतींकडून खूप अन्याय सहन करावा लागला.—१ पेत्र २:१८-२०; ३:१-६, ८, ९.

b jw.org वर असलेला प्रेम केल्यामुळे खरी शांती कशी मिळते? हा व्हिडिओ पाहा.