व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमितपणे अभ्यास करायला कशामुळे मदत होईल?

नियमितपणे अभ्यास करायला कशामुळे मदत होईल?

बायबलचा नियमितपणे अभ्यास करणं आणि त्यातून आनंद मिळवणं तुम्हाला कठीण वाटतं का? आपल्या सगळ्यांना कधीकधी असं वाटतं. आपण रोज न चुकता ज्या गोष्टी करतो त्यांचा विचार करा. जसं की, अंघोळ आणि त्यासारख्या इतर गोष्टी. यासाठी वेळ आणि मेहनत लागते. पण त्यानंतर किती छान वाटतं! बायबलचा अभ्याससुद्धा असाच असू शकतो. (इफिस. ५:२६) त्यासाठी काही गोष्टी पुढे सुचवल्या आहेत:

  • वेळापत्रक तयार करा. वैयक्‍तिक अभ्यास हा “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींपैकी एक असल्यामुळे, आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. (फिलिप्पै. १:१०) तुम्ही जर तुमचं वेळापत्रक बोर्डवर किंवा फ्रिजच्या दारावर सहज दिसेल अशा ठिकाणी लावलं, तर अभ्यासाची वेळ तुमच्या लक्षात राहील. किंवा मग, अभ्यासाच्या वेळेची आठवण करून देण्यासाठी तुम्ही आधीच तुमच्या मोबाईलवर आलार्म सेट करू शकता.

  • तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होईल अशी वेळ आणि पद्धत निवडा. तुम्हाला काय सोपं वाटतं? जास्त वेळ लक्ष देऊन अभ्यास करणं, की थोडा-थोडा वेळ घेऊन बऱ्‍याचदा अभ्यास करणं? तुमची परिस्थिती तुम्हालाच सगळ्यात चांगली माहीत आहे. त्यामुळे त्याप्रमाणे अभ्यास करा. अभ्यासची वेळ आल्यावर तुम्हाला कंटाळा आला, तर फक्‍त दहा मिनिटांसाठी अभ्यास का करू नये? अभ्यास न करण्यापेक्षा इतका कमी वेळ जरी अभ्यास केला, तरी तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. आणि एकदा सुरुवात केली, की मग तुम्हाला त्याची गोडी लागेल.—फिलिप्पै. २:१३.

  • आधीच विषय निवडा. अभ्यासाला बसल्यानंतर काय अभ्यास करायचा याचा जर तुम्ही विचार करत बसला, तर तुम्हाला “वेळेचा चांगला उपयोग” करता येणार नाही. (इफिस. ५:१६) त्यामुळे तुम्हाला ज्या लेखांचा किंवा विषयांचा अभ्यास करायचा आहे त्यांची एक लिस्ट आधीच का बनवून ठेवू नये? जेव्हा जेव्हा तुमच्या मनात एखादा प्रश्‍न येतो, तेव्हा तो लगेच लिहून ठेवा. आणि प्रत्येक वेळी अभ्यास झाल्यानंतर त्या लिस्टमध्ये आणखी प्रश्‍न किंवा विषय जोडा.

  • बदल करायला तयार असा. तुमच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी थोडी जागा ठेवा. जसं की तुम्ही किती वेळ अभ्यास करणार किंवा कोणत्या विषयावर अभ्यास करणार त्यात बदल करायला तयार असा. कारण तुम्ही केव्हा, किती वेळ आणि कोणत्या विषयावर अभ्यास करता यापेक्षा तो किती नियमितपणे करता हे जास्त महत्त्वाचं आहे.

बायबलचा नियमित अभ्यास केल्यामुळे खरंच खूप फायदा होतो. त्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होतं, आपण चांगलं वागायला शिकतो आणि आपल्याला छान वाटतं!—यहो. १:८.