व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४७

गीत १०३ मेंढपाळ—माणसांच्या रूपात भेटी!

भावांनो, तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?

भावांनो, तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?

“जर एखादा माणूस मंडळीत देखरेख करायला पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर तो चांगल्या कामाची इच्छा बाळगतो.”१ तीम. ३:१.

या लेखात

मंडळीत वडील म्हणून सेवा करण्यासाठी एखाद्या भावाने शास्त्रवचनांत दिलेल्या कोणत्या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत ते पाहा.

१-२. मंडळीत वडील कोणकोणती ‘चांगली कामं’ पार पाडतात?

 तुम्ही सध्या सहायक सेवक म्हणून मंडळीत सेवा करत असाल, तर वडील म्हणून सेवा करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी स्वतःमध्ये वाढवण्यासाठी तुम्ही नक्कीच मेहनत घेत असाल. मग या ‘चांगल्या कामाचं’ ध्येय ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?—१ तीम. ३:१.

मंडळीतले वडील कोणकोणत्या जबाबदाऱ्‍या पार पाडत असतात? ते प्रचारात पुढाकार घेतात. तसंच, मेंढपाळ भेटी घेतात आणि आपल्या वागण्या-बोलण्यातून मंडळीतल्या भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत करतात. म्हणूनच बायबलमध्ये या मेहनती वडिलांना, “माणसांच्या रूपात भेटी” असं म्हटलं आहे.—इफिस. ४:८.

३. मंडळीत वडील म्हणून सेवा करायला एखादा भाऊ कसा पात्र ठरू शकतो? (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९)

मंडळीत वडील म्हणून सेवा करायला तुम्ही पात्र कसं ठरू शकता? वडिलांसाठी असलेल्या पात्रता आणि नोकरीसाठी असलेल्या पात्रता यात खूप फरक आहे. बाहेरच्या जगात बऱ्‍याचदा कामावरच्या ठिकाणी लागणारी मूलभूत कौशल्यं तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अगदी सहज नोकरी मिळू शकते. पण तुम्हाला जर मंडळीत वडील म्हणून सेवा करायची असेल, तर तुमच्याकडे फक्‍त प्रचाराची आणि शिकवण्याची कौशल्यं असणं पुरेसं नाही. तुमच्यामध्ये १ तीमथ्य ३:१-७ आणि तीत १:५-९ (वाचा.) मध्ये सांगितलेल्या पात्रता असणं आवश्‍यक आहे. या लेखात तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत वडिलांना काय करणं आवश्‍यक आहे, यावर चर्चा केली आहे. ते म्हणजे मंडळीत आणि बाहेर चांगलं नाव कमवणं, कुटुंबप्रमुख म्हणून चांगलं उदाहरण मांडणं आणि मंडळीची सेवा करण्यासाठी स्वतःहून तयार असणं.

चांगलं नाव कमवणं

४. वडील म्हणून पात्र ठरण्यासाठी एका भावाने कसं असलं पाहिजे?

वडील म्हणून पात्र ठरण्यासाठी ‘ज्याच्याकडे बोट दाखवता येणार नाही’ अशी व्यक्‍ती तुम्ही असलं पाहिजे. म्हणजे मंडळीत तुमचं चांगलं नाव असलं पाहिजे आणि तुमच्यावर कोणताही आरोप लावायचं कारण नसलं पाहिजे. तसंच, ‘बाहेरच्या लोकांमध्येही तुमचं चांगलं नाव असलं पाहिजे.’ विश्‍वासात नसलेले लोक तुमच्या ख्रिस्ती विश्‍वासावर टीका करू शकतात. पण तुमच्या प्रामाणिकपणावर आणि वागण्या-बोलण्यावर कोणताही आरोप लावण्याचं कारण त्यांच्याकडे नसलं पाहिजे. (दानी. ६:४, ५) म्हणून स्वतःला विचारा: ‘मंडळीत आणि बाहेर माझं चांगलं नाव आहे का?’

५. तुम्हाला “चांगुलपणाची आवड” आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

तुम्हाला जर ‘चांगुलपणाची आवड असेल,’ तर इतरांमधले चांगले गुण तुम्हाला दिसतील आणि त्यासाठी तुम्ही त्यांची प्रशंसा कराल. तसंच, चांगुलपणाची आवड असल्यामुळे तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन, इतरांसाठी चांगलं करायलाही तयार असाल. (१ थेस्सलनी. २:८) वडिलांसाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण मंडळीची देखभाल करण्यासाठी आणि आपल्या इतर जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी ते आपला मौल्यवान वेळ खर्च करत असतात. (१ पेत्र ५:१-३) त्यांना एवढी मेहनत घ्यावी लागत असली तरी इतरांची सेवा केल्यामुळे मिळणारा आनंद त्यांनी केलेल्या कोणत्याही त्यागापेक्षा जास्त असतो.—प्रे. कार्यं २०:३५.

६. आपण कोणकोणत्या मार्गांनी ‘पाहुणचार’ दाखवू शकतो? (इब्री लोकांना १३:२, १६; चित्रसुद्धा पाहा.)

तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबतच इतरांसाठीसुद्धा चांगल्या गोष्टी करता, तेव्हा तुम्ही ‘पाहुणचाराची आवड असलेली’ व्यक्‍ती आहात हे दाखवत असता. (१ पेत्र ४:९) पाहुणचार करणारी व्यक्‍ती कशी असते याबद्दल एका पुस्तकात असं वर्णन केलंय: “त्याच्या घराचं आणि त्याच्या हृदयाचं दार इतरांसाठी नेहमी उघडं असतं.” म्हणून स्वतःला विचारा: ‘पाहुणचार दाखवण्याच्या बाबतीत माझं नाव कसं आहे?’ (इब्री लोकांना १३:२, १६ वाचा.) पाहुणचार करणारी व्यक्‍ती इतरांसाठी जे काही करता येईल ते करायला तयार असते. मग ती व्यक्‍ती यहोवाच्या सेवेत मेहनत घेणारे विभागीय पर्यवेक्षक असो किंवा पाहुणा वक्‍ता असो.—उत्प. १८:२-८; नीति. ३:२७; लूक १४:१३, १४; प्रे. कार्यं १६:१५; रोम. १२:१३.

पाहुणचार दाखवण्यात चांगलं उदाहरण असलेलं एक ख्रिस्ती जोडपं विभागीय पर्यवेक्षकांचं आणि त्यांच्या पत्नीचं आपल्या घरी स्वागत करत आहे (परिच्छेद ६ पाहा)


७. वडील ‘पैशाचे लोभी नाहीत’ हे कसं दाखवू शकतात?

“पैशाचा लोभी नसावा.” म्हणजे तुम्ही तुमचं लक्ष पैसाअडका आणि साधनसंपत्तीकडे जास्त देत नाही. तुम्ही श्रीमंत असो किंवा गरीब तुमच्या जीवनात यहोवाच्या उपासनेला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. (मत्त. ६:३३) तुम्ही तुमचा वेळ, शक्‍ती आणि इतर साधनसंपत्ती यहोवाची उपासना करण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी वापरता. (मत्त. ६:२४; १ योहा. २:१५-१७) म्हणून स्वतःला विचारा: ‘पैशाबद्दल माझा दृष्टिकोन कसा आहे? माझ्याकडे नुसत्या गरजेच्या गोष्टी जरी असल्या, तरी त्यांत मी समाधानी असतो का, की माझं लक्ष जास्त पैसे कमवण्याकडे किंवा जास्त साधनसंपत्ती मिळवण्याकडे असतं?’—१ तीम. ६:६, १७-१९.

८. तुम्ही “संयमी” आहात हे कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकता?

तुम्ही जर “संयमी” असाल तर तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन राखायचा प्रयत्न कराल. त्यामध्ये खाणंपिणं, पेहराव, वेशभूषा आणि मनोरंजन या गोष्टींचा अतिरेक टाळणं सामील आहे. आपण जगातल्या असभ्य फॅशनचे गुलामही असू नये. (लूक २१:३४; याको. ४:४) तसंच, कोणी जर तुमच्याशी वाईट वागलं तरी तुम्ही शांत राहायचा प्रयत्न कराल. याशिवाय तुम्ही ‘दारूडे’ नसावे, म्हणजे खूप पिणारे म्हणून तुमची ओळख नसावी. म्हणून स्वतःला विचारा, ‘मी ज्या पद्धतीने जगतो त्यावरून मी संयमी आहे हे दिसून येतं का?’

९. “समंजस” आणि “सुव्यवस्थित” असण्यामध्ये कोणत्या गोष्टी सामील आहेत?

तुम्ही जर “समंजस” असाल तर जीवनातल्या वेगवेगळ्या परिस्थितींबद्दल बायबल काय म्हणतं याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार कराल आणि बायबलचा सल्ला त्या परिस्थितीला कसा लागू होतो हेही तुम्ही पाहाल. त्यामुळे तुम्हाला त्या परिस्थितीबद्दल चांगली समज मिळेल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील. तसंच तुम्ही विचार न करता फक्‍त थोड्याफार माहितीच्या आधावर निर्णय घेणार नाही. त्याऐवजी एखादा निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे आवश्‍यक ती सगळी माहिती आहे का याची तुम्ही खातरी कराल. (नीति. १८:१३) त्यामुळे तुम्हाला यहोवाला आवडतील असे चांगले निर्णय घेता येतील. तुम्ही जर “सुव्यवस्थित” असाल तर तुम्ही चांगलं नियोजन करणारे आणि वेळेचं पालन करणारे असाल. तसंच तुम्ही भरवशालायक असाल आणि दिलेल्या सूचनांचं पालन करणारे असाल. त्यामुळे लोकांमध्ये तुमचं चांगलं नाव असेल. आता आपण कुटुंबप्रमुख या नात्याने चांगलं उदाहरण मांडण्यासाठी शास्त्रवचनांमध्ये कोणत्या पात्रता दिल्या आहेत यावर चर्चा करू या.

कुटुंबप्रमुख म्हणून चांगलं उदाहरण मांडणं

१०. एक भाऊ “आपल्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व” कसं करू शकतो?

१० जर तुम्ही पती असाल आणि तुम्हाला मंडळीत वडील म्हणून सेवा करायची इच्छा असेल तर तुमच्या कुटुंबाचंसुद्धा इतरांसमोर एक चांगलं उदाहरण असलं पाहिजे. ‘तुम्ही तुमच्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारे’ असलं पाहिजे. एक प्रेमळ आणि जबाबदार कुटुंबप्रमुख म्हणून तुमचं इतरांसमोर एक चांगलं उदाहरण असलं पाहिजे. यामध्ये उपासनेशी संबंधित सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेणं सामील आहे. हे इतकं महत्त्वाचं का आहे? याबद्दल प्रेषित पौलने असा तर्क केला: “जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाचं नेतृत्व करता येत नसेल, तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?”—१ तीम. ३:५.

११-१२. एखादा भाऊ वडील म्हणून सेवा करत असेल तर त्याच्या मुलांची वागणूक चांगली असणं का महत्त्वाचं आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

११ तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही “आपल्या मुलांना पूर्ण गांभीर्याने अधीनतेत ठेवणारे” असलं पाहिजे. तुम्ही त्यांना प्रेमाने शिकवलं पाहिजे आणि प्रशिक्षण दिलं पाहिजे. हे खरंय की सर्वच मुलांना खेळायला, बागडायला आवडतं. पण तुमच्या चांगल्या प्रशिक्षणामुळे ते आज्ञा पाळायला, इतरांना आदर द्यायला आणि चांगलं वागायला शिकतील. तुमच्या मुलांना यहोवासोबत चांगलं नातं जोडण्यासाठी, बायबलच्या तत्त्वांनुसार जगण्यासाठी आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी तुम्ही होता होईल तितकी मदत केली पाहिजे.

१२ मंडळीत नियुक्‍त असलेल्या भावाची मुलं विश्‍वासात असून त्यांच्यावर नीच वागणुकीचा किंवा बंडखोरपणाचा आरोप”  नसला पाहिजे. घरातल्या एखाद्या बाप्तिस्मा झालेल्या किंवा बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करत असलेल्या मुलावर गंभीर पाप केल्याचा दोष असेल, तर याचा त्याच्या वडिलांवर कसा परिणाम होईल? जर त्यांनी आपल्या मुलाला प्रशिक्षण देण्यात आणि शिस्त लावण्यात निष्काळजीपणा दाखवला असेल तर तो भाऊ शक्यतो वडील म्हणून सेवा करू शकणार नाही.—१५ ऑक्टोबर १९९६ च्या टेहळणी बुरूज अंकातलं पान २१ वरचे परिच्छेद ६-७ पाहा.

कुटुंबप्रमुख आपल्या मुलांना उपासनेच्या वेगवेगळ्या कामांत सहभाग घ्यायला शिकवत आहेत (परिच्छेद ११ पाहा)


मंडळीची सेवा करणं

१३. तुम्ही ‘अडेल वृत्तीचे नाहीत,’ तर “समजूतदार” आहात हे कसं दाखवू शकता?

१३ चांगले ख्रिस्ती गुण असलेले भाऊ खरंतर मंडळीसाठी आशीर्वादच असतात. एक “समजूतदार” व्यक्‍ती नेहमी शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करते. मग लोकांनी तुम्हाला समजूदार म्हणून ओळखावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही इतरांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. वडिलांच्या सभेत घेतला जाणारा एखादा निर्णय बायबलमधल्या नियमांच्या किंवा तत्त्वांच्या विरोधात नसेल, आणि बहुतेक वडील त्याला सहमत असतील तर तुम्हीही त्याच्याशी सहमत असता का? बायबल असंही सांगतं, की ज्या भावाला मंडळीत वडील म्हणून सेवा करायची इच्छा आहे ‘तो अडेल वृत्तीचा असू नये.’ म्हणजे तुम्ही स्वतःच्या मतावर अडून राहू नये; तर इतरांनी दिलेल्या सल्ल्याची तुम्हाला कदर आहे हे तुम्ही दाखवलं पाहिजे. (उत्प. १३:८, ९; नीति. १५:२२) तसंच, तुम्ही “भांडखोर” किंवा “तापट स्वभावाचे” असू नयेत. इतरांशी कठोरपणे वागण्याऐवजी किंवा वाद घालत बसण्याऐवजी, तुम्ही त्यांच्याशी सौम्यतेने आणि समंजसपणे वागलं पाहिजे. एक शांतिप्रिय व्यक्‍ती असल्यामुळे तुम्ही तणावाच्या परिस्थितींतही शांती टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. (याको. ३:१७, १८) तुमच्या प्रेमळ शब्दांमुळे विरोध करणाऱ्‍यांचंही मन शांत होऊ शकतं.—शास्ते ८:१-३; नीति. २०:३; २५:१५; मत्त. ५:२३, २४.

१४. वडील म्हणून सेवा करण्यासाठी पात्र असलेला भाऊ “विश्‍वासात नवीन नसावा” आणि तो “एकनिष्ठ” असावा याचा काय अर्थ होतो?

१४ मंडळीत वडील म्हणून सेवा करण्यासाठी पात्र ठरणारा भाऊ “विश्‍वासात नवीन नसावा.” याचा अर्थ त्याला बाप्तिस्मा घेऊन बरीच वर्षं झाली पाहिजेत असं नाही. पण तरी एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी त्याने थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे. वडील म्हणून तुमची नियुक्‍ती होण्याआधी तुम्ही हे दाखवून दिलं पाहिजे, की तुम्ही येशूप्रमाणे नम्र आहात. आणि कोणतीही नेमणूक मिळेपर्यंत तुम्ही यहोवाच्या वेळेची वाट पाहायला तयार आहात. (मत्त. २०:२३; फिलिप्पै. २:५-८) तुम्ही यहोवाला आणि त्याच्या नीतिमान स्तरांना जडून राहिलं पाहिजे. आणि त्याच्या संघटनेद्वारे मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन करून तुम्ही त्याला “एकनिष्ठ” आहात हे सिद्ध केलं पाहिजे.—१ तीम. ४:१५.

१५. वडील म्हणून सेवा करणारा भाऊ जबरदस्त भाषण देणारा असला पाहिजे का? स्पष्ट करा.

१५ शास्त्रवचनं स्पष्टपणे सांगतात, की मंडळीत देखरेख करणाऱ्‍यांकडे ‘शिकवण्याची योग्यता असली पाहिजे.’ पण याचा अर्थ असा होतो का, की तुम्ही जबरदस्त भाषण देणारे असलं पाहिजे? नाही! कारण बरेच वडील जरी चांगले वक्‍ते नसले, तरी सेवाकार्यात आणि मेंढपाळ भेटी घेण्यात खूप चांगले असू शकतात. (१ करिंथकर १२:२८, २९ आणि इफिसकर ४:११ सोबत तुलना करा.) असं असलं, तरी एक शिक्षक म्हणून तुम्ही आपली कौशल्यं सुधारण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. मग तुम्ही हे कसं करू शकता?

१६. तुम्ही एक चांगले शिक्षक कसे बनू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ मंडळीत वडील म्हणून सेवा करायची इच्छा असलेल्या भावाची “शिकवण्याची पद्धत देवाच्या विश्‍वसनीय वचनाला धरून असावी.” वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या भावाला चांगला शिक्षक बनायचं असेल, तर तो जे काही शिकवतो आणि जो काही सल्ला देतो, तो देवाच्या वचनावर आधारलेला असला पाहिजे. म्हणून बायबल आणि आपल्या प्रकाशनांचा चांगला अभ्यास करा. (नीति. १५:२८; १६:२३) तुम्ही अभ्यास करत असताना आपली प्रकाशनं बायबलमधली वचनं कशी स्पष्ट करतात याकडे नीट लक्ष द्या. म्हणजे ती कशी लागू होतात हे तुम्हाला समजेल. तसंच, शिकवताना भाऊबहिणींच्या हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर चांगला शिक्षक व्हायचं असेल, तर मंडळीतल्या अनुभवी वडिलांकडून सल्ला घ्या आणि तो लागू करा. (१ तीम. ५:१७) वडिलांनी नेहमी ‘इतरांना प्रोत्साहन देणारे’ असलं पाहिजे. पण कधीकधी त्यांना भाऊबहिणींना सल्ला आणि “ताडनही” देण्याची गरज पडू शकते. म्हणून या दोन्ही गोष्टी करताना वडिलांनी नेहमी सौम्य असलं पाहिजे. तुम्ही जर नम्र आणि प्रेमळ असाल, आणि तुमची शिकवण ही देवाच्या वचनावर आधारित असेल, तर तुम्ही एक चांगले शिक्षक बनाल. कारण असं केल्यामुळे तुम्ही चांगला शिक्षक असलेल्या येशूचं अनुकरण करत असाल.—मत्त. ११:२८-३०; २ तीम. २:२४.

एक सहायक सेवक एका अनुभवी वडिलांकडून शिकण्याच्या संधीचा फायदा घेत आहे आणि बायबलचा उपयोग कसा करायचा ते शिकत आहे. तसंच, हा सहायक सेवक आरशात पाहून भाषणाचा सराव करत आहे (परिच्छेद १६ पाहा)


पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करत राहा

१७. (क) मंडळीत वडील म्हणून पात्र ठरायला कोणती गोष्ट सहायक सेवकांना मदत करू शकते? (ख) एखादा भाऊ पात्र आहे की नाही हे ठरवताना वडिलांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे? (“ एखादा भाऊ पात्र आहे की नाही हे ठरवताना समजूदार आणि नम्र असा,” ही चौकट पाहा.)

१७ वडील म्हणून पात्र ठरण्यासाठी ज्या गोष्टी आता आपण पाहिल्या त्यांवर विचार केल्यानंतर काही सहायक सेवकांना असं वाटू शकतं, की ते यासाठी कधीच पात्र होऊ शकणार नाहीत. पण नेहमी लक्षात ठेवा, की यहोवा किंवा त्याची संघटना तुमच्याकडून या गोष्टींच्या बाबतीत कधीच परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. (१ पेत्र २:२१) आणि यहोवाची जबरदस्त पवित्र शक्‍तीच तुम्हाला या पात्रता पूर्ण करण्यासाठी मदत करत असते. (फिलिप्पै. २:१३) तुम्हाला स्वतःमध्ये काही गुण वाढवण्याची गरज आहे असं वाटतं का? तर त्याबद्दल यहोवाला प्रार्थना करा. तसंच, त्या विषयावर संशोधन करा. आणि तुम्हाला त्यात कशी सुधारणा करता येईल हे एखाद्या वडिलाला विचारा.

१८. सहायक सेवकांना कोणत्या गोष्टीचं प्रोत्साहन देण्यात आलंय?

१८ तर मग भावांनो आपण सगळेच, खासकरून जे वडील म्हणून पात्र ठरायचा प्रयत्न करत आहेत आणि जे आधीच वडील म्हणून सेवा करत आहेत, या पात्रता स्वतःमध्ये वाढवत राहायचा प्रयत्न करू या. (फिलिप्पै. ३:१६) तुम्ही एक सहायक सेवक आहात का? तर मग, वडील म्हणून सेवा करण्यासाठी पात्र ठरायचा प्रयत्न करत राहा! यहोवाची आणि मंडळीतल्या भाऊबहिणींची जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून यहोवाकडून प्रशिक्षण घ्या आणि त्याला तुम्हाला घडवू द्या. (यश. ६४:८) यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेत आहात त्यावर यहोवा भरपूर आशीर्वाद देवो!

गीत १०१ एकता जपू या