व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४६

गीत ४९ यहोवाचं मन आनंदित करा

भावांनो, तुम्ही मंडळीत सहायक सेवक म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?

भावांनो, तुम्ही मंडळीत सहायक सेवक म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?

“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”प्रे. कार्यं २०:३५.

या लेखात

सहायक सेवक बनायचं ध्येय ठेवायला आणि त्यासाठी पात्र ठरायला बाप्तिस्मा घेतलेल्या भावांना प्रोत्साहन दिलं आहे.

१. प्रेषित पौलला सहायक सेवकांबद्दल कसं वाटत होतं?

 मंडळीत सहायक सेवक खूप महत्त्वाचं काम करतात. प्रेषित पौलने या विश्‍वासू भावांची मनापासून कदर केली. उदाहरणार्थ, फिलिप्पैमधल्या ख्रिश्‍चनांना पत्र लिहिताना त्याने वडिलांसोबतच सहायक सेवकांचा विशेष उल्लेख केला.—फिलिप्पै. १:१.

२. लुईस नावाच्या भावाला सहायक सेवक म्हणून काम करण्याबद्दल कसं वाटतं?

तरुण असो किंवा वृद्ध, बाप्तिस्मा घेतलेल्या बऱ्‍याच भावांना मंडळीत सहायक सेवक म्हणून काम करण्यात खूप आनंद मिळतो. उदाहरणार्थ, डेवेनला सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं तेव्हा तो फक्‍त १८ वर्षांचा होता. दुसरीकडे पाहता, लुईस नावाच्या भावाला, वयाची पन्‍नाशी गाठल्यावर सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं. याबद्दल त्यांना कसं वाटतं? ते म्हणतात: “मंडळीत सहायक सेवक म्हणून काम करणं खरंच खूप मोठा बहुमान आहे. भाऊबहीण माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मला असं वाटतं, की सहायक सेवक म्हणून सेवा करणं हा त्यांना प्रेम दाखवायचा खरंच खूप चांगला मार्ग आहे.” बऱ्‍याच सहायक सेवकांना या भावासारखंच वाटतं.

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणार आहोत?

जर तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, पण तुम्ही अजून सहायक सेवक नसाल तर तुम्ही हे ध्येय ठेवू शकता का? यामागचा तुमचा हेतू काय असला पाहिजे? आणि त्यासाठी तुम्हाला बायबलमधल्या कोणत्या पात्रता पूर्ण करायची गरज आहे? या प्रश्‍नांची उत्तरं या लेखात आपल्याला मिळतील. पण त्याआधी मंडळीत सहायक सेवकांचं काम नेमकं काय असतं ते पाहू या.

सहायक सेवकाचं काम नेमकं काय असतं?

४. सहायक सेवकांचं काम नेमकं काय असतं? (चित्रसुद्धा पाहा.)

सहायक सेवक एक बाप्तिस्मा घेतलेला भाऊ असतो. त्याला पवित्र शक्‍तीच्या मदतीने नेमलेलं असतं. आणि मंडळीतली बरीचशी महत्त्वाची कामं करण्यासाठी तो वडिलांना मदत करत असतो. जसं की, काही सहायक सेवक प्रचारकांना सेवेसाठी पुरेसं क्षेत्र आणि साहित्य आहे का, याची खातरी करतात. इतर काही जण राज्य सभागृह स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी मदत करतात. याशिवाय, सहायक सेवक मंडळीच्या सभांमध्ये अटेन्डंट म्हणून काम करतात. तसंच ते व्हिडिओ आणि साऊंड सिस्टम हाताळतात. अशी बरीचशी व्यावहारिक कामं सहायक सेवक करत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवावर त्यांचं प्रेम असतं आणि त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे ते जीवन जगायचा प्रयत्न करतात. यासोबतच, मंडळीतल्या भाऊबहिणींवर ते मनापासून प्रेम करतात. (मत्त. २२:३७-३९) मग प्रश्‍न हा आहे, की एक बाप्तिस्मा घेतलेला भाऊ सहायक सेवक बनायचं ध्येय कसं ठेवू शकतो?

सहायक सेवक येशूचं अनुकरण करून इतरांची सेवा करायला नेहमी तयार असतात (परिच्छेद ४ पाहा)


५. एखादा भाऊ सहायक सेवक बनण्याचं ध्येय कसं पूर्ण करू शकतो?

सहायक सेवक बनण्यासाठी एखाद्या भावाला कोणत्या पात्रता पूर्ण करायची गरज आहे हे बायबलमध्ये सांगितलंय. (१ तीम. ३:८-१०, १२, १३) तुम्ही जर या पात्रता चांगल्या प्रकारे समजून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली, तर सहायक सेवक बनण्याचं तुमचं ध्येय तुम्हाला गाठता येईल. पण त्याआधी सहायक सेवक बनण्यामागचा तुमचा हेतू काय आहे याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

तुमच्या ध्येयामागचा हेतू काय आहे?

६. भाऊबहिणींसाठी कोणतंही काम करण्यामागचा तुमचा हेतू काय असला पाहिजे? (मत्तय २०:२८; चित्रसुद्धा पाहा.)

या बाबतीत आपल्यासमोर येशू ख्रिस्ताचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. येशूने जे काही केलं ते पित्यावरच्या आणि लोकांवरच्या प्रेमापोटी केलं. या प्रेमामुळेच तो इतरांसाठी भरपूर मेहनत घ्यायला आणि इतरांच्या दृष्टीने हलकी समजली जाणारी कामं करायलाही तयार होता. (मत्तय २०:२८ वाचा; योहा. १३:५, १४, १५) सहायक सेवक बनण्यामागे तुमचाही हेतू भाऊबहिणींवरचं प्रेम असेल, तर यहोवा तुम्हाला आशीर्वाद देईल आणि सहायक सेवक बनायचं तुमचं ध्येय गाठायला तुम्हाला मदत करेल.—१ करिंथ. १६:१४; १ पेत्र ५:५.

लोकांमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवण्यापेक्षा इतरांची नम्रपणे सेवा कशी करायची हे येशूने स्वतःच्या उदाहरणातून शिष्यांना शिकवलं (परिच्छेद ६ पाहा)


७. फक्‍त इतरांची प्रशंसा मिळवण्यासाठी एखाद्याला सहायक सेवक बनायचं असेल तर ते चुकीचं का आहे?

आपण कोणीतरी खूप महत्त्वाचे आहोत असं जे लोक भासवायचा प्रयत्न करतात त्यांची जगामध्ये खूप प्रशंसा केली जाते. पण यहोवाच्या संघटनेत असं होत नाही. जो भाऊ येशूसारखं इतरांवर प्रेम करतो त्याला कधीही सत्तेची, इतरांवर अधिकार गाजवायची किंवा प्रतिष्ठेची हाव नसते. पण जर स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणाऱ्‍या व्यक्‍तीला मंडळीत सहायक सेवक म्हणून नेमलं गेलं, तर यहोवाच्या मौल्यवान मेंढरांची काळजी घेण्यासाठी जी छोटी-छोटी कामं करावी लागतात, ती करायला तो कदाचित तयार होणार नाही. कारण ही कामं आपल्या प्रतिष्ठेला शोभणारी नाहीत असं त्याला वाटेल. (योहा. १०:१२) शिवाय, एक व्यक्‍ती गर्विष्ठ असेल किंवा स्वतःला इतरांपेक्षा खूप मोठं समजत असेल, तर यहोवा तिच्या प्रयत्नांवर कधीच आशीर्वाद देणार नाही.—१ करिंथ. १०:२४, ३३; १३:४, ५.

८. येशूने आपल्या शिष्यांना कोणता सल्ला दिला?

येशूच्या काही जवळच्या शिष्यांनीसुद्धा काही वेळा चुकीच्या हेतूने खास जबाबदाऱ्‍या मिळवायचा प्रयत्न केला. याकोब आणि योहान या दोन शिष्यांसोबत घडलेल्या घटनेचाच विचार करा. त्यांनी येशूला म्हटलं, की त्याने त्याच्या राज्यामध्ये त्यांना एक खास पद द्यावं. पण याबद्दल येशूने त्यांची प्रशंसा केली नाही. उलट त्याने सगळ्या १२ शिष्यांना म्हटलं: “ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे, आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने सर्वांचा दास झालं पाहिजे.” (मार्क १०:३५-३७, ४३, ४४) जे भाऊ योग्य हेतूने, म्हणजे इतरांची सेवा करायच्या हेतूने पुढे यायचा प्रयत्न करतात ते मंडळीसाठी एक आशीर्वादच असतात.—१ थेस्सलनी. २:८.

ध्येय पूर्ण करण्याची इच्छा कशामुळे वाढेल?

९. आपल्या ध्येयापर्यंत पोचण्याची इच्छा तुम्ही कशी वाढवू शकता?

हे खरंय की यहोवावर तुमचं प्रेम आहे आणि इतरांची सेवा करायची तुमची मनापासून इच्छा आहे. पण सहायक सेवक म्हणून करावी लागणारी इतर कामं करायची इच्छा कदाचित तुमच्यामध्ये नसेल. मग ही इच्छा तुम्ही कशी वाढवू शकता? आपल्या भाऊबहिणींची सेवा केल्यामुळे किती आनंद मिळतो, याचा तुम्ही विचार करू शकता. येशूने म्हटलं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्यं २०:३५) स्वतः येशू या तत्त्वानुसार जगला. इतरांची सेवा केल्यामुळे त्याला खरा आनंद मिळाला आणि तो आनंद तुम्हालाही मिळू शकतो.

१०. इतरांची सेवा केल्यामुळे आनंद मिळतो हे येशूने कसं दाखवलं? (मार्क ६:३१-३४)

१० इतरांची सेवा करण्यात आनंद मिळतो, हे येशूने कसं दाखवलं याचं एक उदाहरण लक्षात घ्या. (मार्क ६:३१-३४ वाचा.) एकदा येशू आणि त्याचे शिष्य खूप थकले होते. विश्रांती घेण्यासाठी ते एका एकांत ठिकाणी जायला निघाले. पण येशूकडून काहीतरी शिकायला मिळेल या आशेने लोकांचा एक मोठा जमाव त्यांच्या आधी तिथे जाऊन पोचला. येशू त्यांना नाही म्हणू शकला असता, कारण त्याला आणि त्याच्या शिष्यांना “जेवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता.” किंवा मग येशू फक्‍त एक-दोन गोष्टी शिकवून त्यांना पाठवून देऊ शकला असता. पण लोकांवर त्याचं प्रेम असल्यामुळे “तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.” इतकंच नाही, तर ‘दिवस मावळेपर्यंत’ तो त्यांना शिकवत राहिला. (मार्क ६:३५) त्याने हे फक्‍त एक कर्तव्य म्हणून नाही, तर त्याला “त्यांचा कळवळा आला” म्हणून त्याने हे केलं. त्याला त्यांना शिकवायची इच्छा होती. कारण त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं. खरंच, इतरांची सेवा केल्यामुळे येशूला नेहमीच खूप आनंद मिळायचा.

११. लोकांना शिकवण्यासोबतच येशूने आणखी कोणत्या मार्गाने त्यांची मदत केली? (चित्रसुद्धा पाहा.)

११ येशूने लोकांना फक्‍त शिकवलंच नाही, तर इतर मार्गांनीही त्याने त्यांची मदत केली. त्याने चमत्काराने अन्‍न पुरवलं. आणि आपल्या शिष्यांना ते लोकांना वाटायला सांगितलं. (मार्क ६:४१) अशा प्रकारे इतरांची सेवा करणं किती महत्त्वाचं आहे हे त्याने त्यांना दाखवून दिलं. आज सहायक सेवकसुद्धा अशाच प्रकारे इतरांची सेवा करतात. येशूने चमत्कार करून जे अन्‍न पुरवलं होतं ते शिष्यांनी लोकांना वाटलं. आणि ‘सगळे लोक पोटभर जेवले.’ येशूसोबत मिळून लोकांना मदत केल्यामुळे शिष्यांना खरंच किती आनंद झाला असेल! (मार्क ६:४२) येशूने स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांचा विचार केला आणि असं करायची ही त्याची पहिलीच वेळ नव्हती. त्याने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी दिलं. (मत्त. ४:२३; ८:१६) इतरांना शिकवल्यामुळे आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्यामुळे येशूला खरंच खूप आनंद मिळायचा. तुम्हीसुद्धा जर कोणताही स्वार्थ न बाळगता सहायक सेवक बनण्यासाठी मेहनत घेतली, तर तुम्हालाही येशूसारखाच आनंद मिळेल.

यहोवावर आणि भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे तुम्ही मंडळीतल्या भाऊबहिणींची सेवा करण्यासाठी जमेल ते करायला तयार असाल (परिच्छेद ११ पाहा) a


१२. ‘मंडळीला उपयोगी पडतील अशा क्षमता माझ्यात नाहीत,’ असा आपल्यापैकी कोणीही विचार का करू नये?

१२ तुमच्यामध्ये काही खास क्षमता नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर निराश होऊ नका. तुमच्यामध्ये नक्कीच असे काही गुण असतील ज्यांमुळे मंडळीला फायदा होऊ शकतो. १ करिंथकर १२:१२-३० मध्ये पौलने जे म्हटलं त्यावर विचार करा आणि त्या गोष्टी कशा लागू करायच्या हे समजण्यासाठी यहोवाला प्रार्थनेत मदत मागा. पौलच्या शब्दांवरून स्पष्ट होतं, की यहोवाच्या प्रत्येक सेवकाप्रमाणे मंडळीला तुमची गरज आहे आणि मंडळीत तुम्हाला मोलाचं स्थान आहे. सहायक सेवक म्हणून सेवा करण्यासाठी तुम्हाला कदाचित आणखी काही गोष्टींवर काम करायची गरज असेल तर निराश होऊ नका. त्याऐवजी भाऊबहिणींना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते करा. तुम्हाला कोणतंही काम नेमून देताना मंडळीतले वडील तुमच्या क्षमता लक्षात घेऊनच तुम्हाला ते काम देतील याची खातरी बाळगा.—रोम. १२:४-८.

१३. सहायक सेवकांसाठी असलेल्या बहुतेक पात्रतांच्या बाबतीत काय म्हणता येईल?

१३ आणखी एका गोष्टीचाही विचार करा: सहायक सेवक बनण्यासाठी भावांना ज्या पात्रता पूर्ण कराव्या लागतात त्या खरंतर सगळ्याच ख्रिश्‍चनांना लागू होतात. जसं की, सगळ्याच ख्रिश्‍चनांनी यहोवासोबत जवळचं नातं जोडलं पाहिजे, इतरांना आनंदाने मदत केली पाहिजे आणि यहोवाला आवडेल अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. त्यामुळे सहायक सेवक बनण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बहुतेक गोष्टी तुम्ही आधीपासूनच करत आला असाल. पण याशिवाय तुम्हाला आणखी काय करायची गरज आहे?

ध्येय पूर्ण कसं करायचं?

१४. ‘गंभीर असण्याचा’ काय अर्थ होतो? (१ तीमथ्य ३:८-१०, १२)

१४ आता १ तीमथ्य ३:८-१०, १२. (वाचा.) यात दिलेल्या काही पात्रतांवर आपण विचार करू या. तिथे म्हटलंय, की सहायक सेवक ‘गंभीर असावेत.’ याचं भाषांतर “जबाबदार” किंवा “आदरणीय” असंसुद्धा केलं जाऊ शकतं. पण याचा अर्थ असा होत नाही, की त्याने कधीच हसू नये किंवा मौजमजा करू नये. (उप. ३:१,) तर दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्‍या त्याने गंभीरपणे पूर्ण कराव्यात असा याचा अर्थ होतो. तो जर जबाबदार असेल, भरवशालायक असेल तर मंडळीतले लोक साहजिकच त्याचा आदर करतील.

१५. ‘कपटीपणे न बोलणारे’ आणि ‘बेइमानीच्या कमाईचा लोभ न धरणारे’ याचा काय अर्थ होतो?

१५ ते “कपटीपणे बोलणारे” नसावेत. म्हणजे त्यांनी नेहमी प्रामाणिक आणि भरवशालायक असलं पाहिजे. दिलेला शब्द त्यांनी पाळला पाहिजे आणि त्यांनी कोणाचीही फसवणूक करू नये. (नीति. ३:३२) तसंच, ते “बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारे असू नयेत,” म्हणजे नोकरी-व्यवसायात व्यवहार करताना किंवा पैसे हाताळताना त्यांनी नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे. आणि भाऊबहिणींसोबत असलेल्या चांगल्या नात्याचा त्यांनी पैसे कमवण्यासाठी फायदा घेऊ नये.

१६. (क) “खूप जास्त पिणारे” असं जे बायबलमध्ये म्हटलंय त्याचा काय अर्थ होतो? (ख) “शुद्ध विवेक” असणं म्हणजे काय?

१६ ते “खूप जास्त पिणारे” नसावेत. म्हणजे, ते प्रमाणाबाहेर दारू पिणारे किंवा लोकांमध्ये तशी ओळख असणारे असू नयेत. यासोबतच त्यांचा ‘विवेक शुद्ध’ असला पाहिजे. म्हणजे त्यांनी यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगलं पाहिजे. अपरिपूर्ण असल्यामुळे काही वेळा ते चुकतील. पण यहोवासोबत चांगलं नातं असल्यामुळे त्यांना मनाची शांती मिळते.

१७. एका भावाच्या “योग्यतेची पारख” केली जात असताना तो भरवशालायक आहे हे तो कसं दाखवू शकतो? (१ तीमथ्य ३:१०; चित्रसुद्धा पाहा.)

१७ “त्यांच्या योग्यतेची पारख” केलेली असावी. म्हणजे त्यांनी हे आधीच दाखवून दिलेलं असतं, की एखादी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली तर ती ते प्रामाणिकपणे पूर्ण करतील. त्यामुळे मंडळीतले वडील त्यांना जेव्हा एखादी नेमणूक देतात तेव्हा दिलेल्या सूचना आणि संघटनेकडून मिळालेलं मार्गदर्शन त्यांनी काळजीपूर्वक पाळलं पाहिजे. नेमणूक पूर्ण करण्यासाठी नेमकं काय करायची गरज आहे आणि ती नेमणूक केव्हापर्यंत पूर्ण करायची हे तुम्हाला चांगलं समजलंय याची खातरी करा. त्यांनी जर मन लावून प्रत्येक नेमणूक पूर्ण केली तर मंडळीतले इतर जण त्यांची प्रगती पाहतील आणि त्याची कदर करतील. वडिलांनो, मंडळीतल्या बाप्तिस्मा घेतलेल्या भावांना प्रशिक्षण द्यायला नेहमी तयार असा. (१ तीमथ्य ३:१० वाचा.) तुमच्या मंडळीत बाप्तिस्मा घेतलेले असे भाऊ आहेत का ज्यांचं वय १०-१४ किंवा त्याहून कमी आहे? त्यांच्या वैयक्‍तिक अभ्यासाच्या सवयी चांगल्या आहेत का? मंडळीत ते नेहमी उत्तरं देतात का आणि सेवाकार्यात नेहमी सहभाग घेतात का? तसं असेल तर त्यांचं वय आणि परिस्थिती विचारात घेऊन त्यांना नेमणुका द्या. अशा प्रकारे मंडळीतल्या तरुण भावांच्या योग्यतेची ‘पारख केली जाऊ शकते.’ मग ते जेव्हा १६-२० वर्षांचे होतील तेव्हा ते मंडळीत सहायक सेवक म्हणून काम करायला तयार असतील.

मंडळीतले वडील बाप्तिस्मा झालेल्या भावांना जबाबदाऱ्‍या देऊन “त्यांच्या योग्यतेची पारख” करू शकतात (परिच्छेद १७ पाहा)


१८. “निर्दोष” असणं म्हणजे काय?

१८ त्यांनी “निर्दोष” असावं. म्हणजे त्यांच्यावर सिद्ध झालेला कोणताही गंभीर आरोप असू नये. हे खरंय की ख्रिश्‍चनांवर खोटे आरोप लावले जाऊ शकतात. येशूवरसुद्धा बरेच खोटे आरोप लावण्यात आले होते. शिवाय, त्याने आधीच सांगितलं होतं की त्याच्या शिष्यांच्या बाबतीतही असंच घडेल. (योहा. १५:२०) पण येशूसारखंच तुम्ही जर तुमचं वागणं शुद्ध ठेवलं तर मंडळीमध्ये तुमचं एक चांगलं नाव असेल.—मत्त. ११:१९.

१९. “एकाच स्त्रीचा पती” असणं म्हणजे काय?

१९ तो “एकाच स्त्रीचा पती” असावा. त्याचं जर लग्न झालं असेल, तर लग्नाच्या बाबतीत यहोवाने सुरुवातीला जो स्तर घालून दिला होता तो त्याने पाळला पाहिजे. म्हणजे, तो एकाच स्त्रीचा पती असला पाहिजे. (मत्त. १९:३-९) एका ख्रिस्ती भावाने कधीच अनैतिक लैंगिक कृत्य करू नये. (इब्री १३:४) पण यामध्ये आणखीनही काही गोष्टी गोवलेल्या आहेत. त्याने नेहमी आपल्या पत्नीला एकनिष्ठ राहिलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्‍या कोणत्याही स्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहू नये.—ईयो. ३१:१.

२०. एक भाऊ आपल्या कुटुंबाचं “चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा” कसा होऊ शकतो?

२० तो “आपल्या मुलांचं आणि कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा असावा.”  तो जर कुटुंबप्रमुख असतील तर त्याने आपल्या जबाबदाऱ्‍या गंभीरपणे घेतल्या पाहिजे. त्याने कौटुंबिक उपासना नियमितपणे चालवावी. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्‍तीसोबत शक्य तितक्या वेळा सेवाकार्यात सहभाग घ्यावा. आणि आपल्या मुलांना यहोवासोबत एक वैयक्‍तिक नातं जोडायला मदत करावी. (इफिस. ६:४) जो माणूस आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेतो तो मंडळीची चांगली काळजी घेईल हे दाखवत असतो.—१ तीमथ्य ३:५ सोबत तुलना करा.

२१. तुम्ही जर अजून सहायक सेवक नसाल तर तुम्ही काय करू शकता?

२१ भावांनो, तुम्ही जर अजून सहायक सेवक बनला नसाल तर हा लेख काळजीपूर्वक वाचा आणि या बाबतीत यहोवाला प्रार्थना करा. सहायक सेवकांसाठी ज्या पात्रता दिल्या आहेत त्यांचा अभ्यास करा आणि त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. यहोवावर आणि भाऊबहिणींवर तुमचं किती प्रेम आहे हे तपासून पाहा. आणि त्यांची सेवा करायची तुमची इच्छा वाढवा. (१ पेत्र ४:८, १०) तुमच्या आध्यात्मिक कुटुंबाची सेवा केल्यामुळे जो आनंद मिळतो त्याचा अनुभव घ्या. सहायक सेवक म्हणून आपलं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घ्याल त्यावर यहोवा नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल!—फिलिप्पै. २:१३.

गीत १७ निःस्वार्थ प्रेम दाखवू या

a चित्रांचं वर्णन: डावीकडे, येशू नम्रपणे इतरांची सेवा करत आहे; उजवीकडे, एक सहायक सेवक मंडळीतल्या एका वयस्कर भावाला मदत करत आहे.