जीवन कथा
युद्धाच्या आणि शांतीच्या काळात यहोवाने आम्हाला बळ दिलं
पॉल: आम्ही खूप आनंदी होतो! नोव्हेंबर १९८५ मध्ये, आम्ही आमच्या पहिल्या मिशनरी नेमणुकीसाठी पश्चिम आफ्रिकेतल्या लाइबीरियाला प्रवास करत होतो. आमचं विमान सेनेगॉलला थांबलं. ॲन म्हणाली: “आता एका तासातच आपण लाइबीरियाला पोचू.” पण एक घोषणा आमच्या कानावर पडली: “लाइबीरियाला जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांनी विमानातून खाली उतरावं.” लाइबीरियामध्ये काही लोक सरकार पाडायचा प्रयत्न करत असल्यामुळे तिथे प्रवास करणं शक्य नव्हतं. त्यामुळे पुढचे दहा दिवस आम्ही सेनेगॉलमध्ये असलेल्या मिशनऱ्यांसोबतच राहिलो. लाइबीरियामधल्या बातम्या आमच्या कानावर पडत होत्या. ट्रकभरून लोकांचे मृतदेह नेले जात होते. संचारबंदीही लागू होती. संचारबंदीचं पालन न करणाऱ्यांना जागीच गोळ्या घालून मारलं जायचं.
ॲन: आम्ही दोघं खूप धाडसी नव्हतो. खरंतर, लहानपणी मला ‘भितरी ॲनी’ म्हटलं जायचं. आतासुद्धा रस्ता ओलांडताना मी खूप घाबरते. पण तरीही आम्ही लाइबीरियाला जायचा ठाम निश्चिय केला होता!
पॉल: माझा आणि ॲनचा जन्म पश्चिम इंगलंडला झाला. शालेय शिक्षण संपल्यावर आम्ही लगेच पायनियर सेवा सुरू केली. माझ्या आईवडिलांनी आणि ॲनच्या आईने यासाठी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. पूर्णवेळच्या सेवेत करियर करायची आमची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. वयाच्या १९ व्या वर्षी मला बेथेलला जायची संधी मिळाली. १९८२ मध्ये माझं आणि ॲनचं लग्न झाल्यावर आम्ही सोबत मिळून सेवा करू लागलो.
ॲन: आम्हाला बेथेल खूप आवडायचं. पण जिथे गरज आहे तिथे जाऊन सेवा करावी असं आम्हाला नेहमी वाटायचं. बेथेलमध्ये आधीच्या मिशनरींसोबत काम केल्यामुळे ही इच्छा आणखीनच वाढली. तीन वर्षं सतत आम्ही याबद्दल प्रार्थना करत होतो. १९८५ मध्ये आम्हाला गिलियडच्या ७९ व्या वर्गाला उपस्थित राहायचं आमंत्रण मिळालं. नंतर आम्हाला पश्चिम आफ्रिकेतल्या लाइबीरियाला नेमण्यात आलं.
भाऊबहिणींच्या प्रेमामुळे आणखी बळ मिळालं
पॉल: लाइबीरियाला जाणाऱ्या पहिल्या विमानात आम्ही चढलो. तिथली परिस्थिती खूप तणावाची होती आणि अजूनही संचारबंदी लागू होती. एकदा बाजारपेठेत एका कारचा नुसता आवाज झाल्यामुळे लोक आरडाओरडा करत सैरावैरा पळू लागले होते. मन शांत ठेवण्यासाठी आम्ही दररोज रात्री स्तोत्र
पुस्तकातले काही भाग वाचायचो. आम्हाला आमची नेमणूक खूप आवडायची. ॲन दररोज प्रचाराला जायची आणि मी जॉन चॅरेक नावाच्या एका भावासोबत बेथेलमध्ये काम करायचो. त्यांच्या अनुभवामुळे आणि भाऊबहिणींच्या परिस्थितीबद्दल त्यांना जाणीव असल्यामुळे मला त्यांच्याकडून खूप चांगलं प्रशिक्षण मिळालं.ॲन: आम्ही इतक्या पटकन लाइबीरियाच्या प्रेमात का पडलो? तिथल्या भाऊबहिणींमुळे! ते मनमिळाऊ आणि विश्वासू होते. त्यांच्यासोबत आमचं लगेच जमलं. आम्हाला एक नवीन कुटुंब मिळालं. त्यांनी आम्हाला बरेच चांगले सल्ले दिले आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं. तिथे सेवाकार्य करणं जणू एका स्वप्नासारखंच होतं. घरमालकाशी बोलताना आम्ही जर त्याला जास्त वेळ दिला नाही, तर तो चक्क नाराज व्हायचा. इतकंच काय, तर रस्त्यांवरसुद्धा लोक बायबलवर चर्चा करायचे. त्यामुळे आम्ही थेट त्यांच्या चर्चेत सामील होऊ शकत होतो. आमच्याकडे इतके बायबल अभ्यास होते, की ते चालवणं आम्हाला खूप कठीण जायचं. ही जणू एक सुंदर समस्याच होती!
आम्ही घाबरलो, पण यहोवाने बळ दिलं
पॉल: चार वर्षांपर्यंत वातावरण एकदम शांत होतं. पण १९८९ मध्ये अचानक एक मोठी, धक्कादायक गोष्ट घडली—देशांतर्गत युद्ध सुरू झालं. २ जुलै १९९० मध्ये बंडखोरांच्या टोळ्यांनी बेथेलच्या आसपास कबजा केला. तीन महिन्यांपर्यंत बाहेरच्या जगाशी आमचा काहीएक संबंध नव्हता. आमच्या कुटुंबांशी आणि जागतिक मुख्यालयाशीसुद्धा आमचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. सगळीकडे गोंधळ माजला होता. हिंसाचार, अन्नटंचाई आणि स्त्रियांवर बलात्कार होत होते. या समस्या संपूर्ण देशात १४ वर्षं चालू होत्या.
ॲन: काही जमातीतले लोक इतर जमातीतल्या लोकांशी भांडून एकमेकांची कत्तल करत होते. बंडखोरांच्या टोळ्या विचित्र कपडे घालून आणि शस्त्र घेऊन रस्त्यांवर फिरत होत्या. घरोघरी जाऊन लूटमार करत होत्या. माणसांना मारणं त्यांच्यासाठी इतकी किरकोळ गोष्ट बनली होती, की ते माणसांची कत्तल करताना “कोंबड्या मारतोय” असं म्हणायचे. बंडखोरांच्या टोळ्या रस्ते अडवून तिथून जाणाऱ्या लोकांची कत्तल करायच्या. त्यामुळे तिथे मृतदेहांचा खच पडला होता. बेथेलच्या आसपाससुद्धा हे घडत होतं. दुःखाची गोष्ट म्हणजे, यात काही विश्वासू साक्षीदारसुद्धा मारले गेले. त्यात दोन मिशनरीसुद्धा होते.
काही भाऊबहिणींनी जीव धोक्यात घालून इतर काही भाऊबहिणींना स्वतःकडे लपवून ठेवलं. कारण ते अशा जमातीतले होते, ज्यांना शोधून मारलं जात होतं. मिशनरी आणि बेथेलमधले भाऊबहीणसुद्धा अशा प्रकारे इतरांना मदत करत होते. बेथेलमध्ये जे भाऊबहीण शरण घेण्यासाठी आले होते, त्यांना खालच्या मजल्यावर झोपावं लागायचं, तर बाकीचे आमच्यासोबत वरच्या मजल्यावर झोपायचे. आमच्या खोलीत तर सात जणांचं एक कुटुंब राहत होतं.
पॉल: आम्ही कोणाला लपवलं तर नाही ना, हे पाहण्यासाठी हल्लेखोर दररोज बेथेलमध्ये घुसायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे सुरक्षेसाठी आम्ही चार जणांना ठेवलं होतं. दोन खिडकीत आणि दोन बाहेरच्या गेटवर उभे असायचे. जर गेटवर उभ्या असलेल्या दोघांचे हात पुढे असतील तर समजायचं की सगळं काही ठीक आहे. पण जर त्यांचे हात मागे असतील तर हल्लेखोर खूप चिडले
आहेत हे कळायचं. मग खिडकीत उभे असलेले दोघे जण लगेच आपल्या भाऊबहिणींना लपवायचे.ॲन: बऱ्याच आठवड्यांनंतर हल्लेखोरांची एक संतापलेली टोळी जबरदस्तीने आत घुसली. मी आणि एका बहिणीने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतलं होतं. तिथे एक कपाट होतं. त्यात लपण्यासाठी एक छोटासा कप्पा होता. ती बहीण तिथे लपली. हल्लेखोर आमचा पिच्छा करत वर आले होते. त्यांच्याकडे बंदुकी होत्या. रागाच्या भरात ते खूप जोरजोरात दार वाजवत होते. पॉलने म्हटलं, “जरा थांबा, माझी बायको आहे आत.” ती बहीण जिथे लपली होती तो कप्पा बंद करताना थोडासा आवाज झाला. आणि सगळ्या गोष्टी आहे तशा नीट ठेवायला थोडा वेळ लागला. त्यामुळे त्यांना नक्कीच शंका आली असेल. मी भीतीने थरथर कापत होते. अशा परिस्थितीत मी दार कसं उघडणार? मी मनातल्या मनात यहोवाला कळकळून प्रार्थना केली आणि मदत मागितली. नंतर मी दार उघडलं आणि खूप शांतपणे त्यांच्याशी बोलले. पण त्यांतल्या एकाने मला ढकललं. तो सरळ कपाटाकडे गेला. त्याने ते उघडलं आणि सगळ्या गोष्टी विस्कटून टाकल्या. पण तिथे काहीच नाही या गोष्टीवर त्याला विश्वासच बसत नव्हता. नंतर तो आणि त्याच्या टोळीचे लोक इतर खोल्यांमध्ये आणि माळ्यावरसुद्धा शोधाशोध करू लागले. पण तिथेही त्यांना कोणीच सापडलं नाही.
अंधारातही सत्याचा प्रकाश चमकत राहिला
पॉल: बऱ्याचदा आमच्याकडे नाष्ट्यासाठी काहीच नसायचं. पण सकाळची उपासना आमच्यासाठी “नाष्ट्यासारखीच” होती. आम्हाला माहीत होतं, की बायबल वाचून अभ्यास केल्यामुळे आम्हाला प्रत्येक दिवसाचा सामना करायचं बळ मिळेल.
जर आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू घ्यायला बाहेर पडलो असतो, तर आम्हाला लपवून ठेवलेल्या भाऊबहिणींचं संरक्षण करता आलं नसतं. हल्लेखोरांनी त्यांना मारून टाकलं असतं. बऱ्याचदा, यहोवाने योग्य वेळी आणि जणू काही चमत्काराने आमच्या गरजा पुरवल्या. त्याने आमची काळजी घेतली आणि मन शांत ठेवायला आम्हाला मदत केली.
जग जितकं निराशाजनक बनत चाललं होतं तितकंच सत्याच्या प्रकाशामुळे आम्हाला बळ मिळत होतं. भाऊबहिणींना त्यांचा जीव वाचवण्यासाठी बऱ्याचदा पळून जावं लागायचं तरी त्यांचा विश्वास मजबूत होता. या कठीण परिस्थितीतही ते शांत होते. काही म्हणत होते, की हे युद्ध त्यांना “मोठ्या संकटासाठी तयार करतंय.” मंडळीतले वडील आणि काही तरुण भाऊ इतर भाऊबहिणींना मदत करण्यासाठी धैर्याने पुढे आले. जे भाऊबहीण पळून गेले होते ते एकमेकांना मदत करत राहिले. ते जिथे कुठे गेले तिथे त्यांनी प्रचार केला. जंगलात मिळतील त्या गोष्टी वापरून त्यांनी सभागृहं बांधली आणि सभा भरवल्या. निराशेच्या त्या भयंकर काळात सभांमुळे त्यांना खूप दिलासा मिळाला आणि प्रचार केल्यामुळे त्या कठीण परिस्थितीचा सामना करता आला. जेव्हा गरजेचं सामान वाटलं जात होतं तेव्हा भाऊबहिणींनी कपड्यांऐवजी प्रचारासाठी बॅगा मागितल्या. हे पाहून आम्ही खरंच खूप भारावून गेलो. युद्धामुळे मानसिक धक्क्यात असलेले लोक आनंदाचा संदेश ऐकत होते. साक्षीदार किती आनंदी आणि सकारात्मक आहेत हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. त्या काळात साक्षीदार जणू अंधारात प्रकाशासारखे चमकत होते. (मत्त. ५:१४-१६) भाऊबहिणींचा हा आवेश पाहून काही हिंसक हल्लेखोरसुद्धा नंतर आपले भाऊ बनले.
ताटातूट झाली तेव्हा यहोवाने सावरलं
पॉल: बऱ्याचदा आम्हाला लायबीरिया सोडून जावं लागलं. तीनदा काही काळासाठी आणि दोनदा वर्षभरासाठी. त्या वेळी आम्हाला कसं वाटत होतं हे एका मिशनरी बहिणीने खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. तिने म्हटलं: “गिलियडमध्ये सांगितलं होतं, की आम्ही आमची नेमणूक जीव ओतून केली पाहिजे. आम्ही तसंच केलं. पण परिस्थितीमुळे जेव्हा भाऊबहिणींना सोडावं लागायचं तेव्हा जीव तुटायचा.” पण जवळपासच्या देशांत राहून आम्हाला लाइबीरियातल्या भाऊबहिणींना मदत करता आली.
ॲन: १९९६ च्या मे महिन्यात आम्ही दोघं शाखेच्या गाडीतून गावाच्या दुसऱ्या बाजूला, १६ किलोमीटर दूर एका सुरक्षित ठिकाणी जायला निघालो. आमच्यासोबत आणखी दोघं जण होते. आमच्याकडे बरीच महत्त्वाची कागदपत्रं होती. नेमका तेव्हाच आमच्या परिसरात हल्ला झाला. चिडलेल्या हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला, आमची गाडी थांबवली आणि आमच्यापैकी तिघांना गाडीतून बाहेर ओढलं. पॉल गाडीतच होता आणि ते त्याला घेऊन निघून गेले. आम्ही सुन्न होऊन फक्त बघतचं राहिलो. अचानक गर्दीतून पॉल आम्हाला चालत येताना दिसला. त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. आम्ही खूप गोंधळलो होतो. आम्हाला वाटलं की त्याला गोळी लागली आहे. पण नंतर आमच्या लक्षात आलं, की त्याला गोळी लागली असती तर तो चालूच शकला नसता. एका हल्लेखोराने त्याला गाडीतून बाहेर ढकलताना मारलं होतं. पण बरं झालं की त्याला जास्त लागलं नाही.
जवळच एक लष्करी गाडी उभी होती आणि त्यात लोक खचाखच भरले होते. ते खूप घाबरलेले होते. आम्ही गाडीत चढलो. फक्त बोटांनी धरता येईल इतकीच जागा होती. आम्ही त्या गाडीच्या बाहेर लटकत होतो. ड्रायव्हर इतका सुसाट वेगाने गाडी पळवत होता की आम्ही पडणारच होतो. आम्ही त्याला गाडी थांबवायची विनंती करत होतो. पण तो इतका घाबरला होता की त्याने आमचं काहीच ऐकलं नाही. शेवटी कसंबसं आम्ही त्या ठिकाणी पोचलो. पण आम्ही इतके घाबरलो होतो की आमचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं.
पॉल: आमच्या अंगावर मळक्या आणि फाटक्या कपड्यांशिवाय काहीच उरलं नव्हतं. आम्ही एकमेकांकडे बघून याचंच आश्चर्य करत होतो की आम्ही जिवंत कसं राहिलो? आम्ही एका मोकळ्या मैदानात झोपलो. आमच्या बाजूलाच एक मोडकंतोडकं आणि गोळ्यांनी चाळण झालेलं हेलिकॉप्टर होतं. तेच हेलिकॉप्टर दुसऱ्या दिवशी आम्हाला सियेरा लियोनला घेऊन गेलं. आम्हाला जिवंत ठेवल्याबद्दल आम्ही यहोवाचे खूप आभार मानले. पण लायबीरियामधल्या भाऊबहिणींची आम्हाला अजूनही काळजी वाटत होती.
नवीन आणि अनपेक्षित समस्यांचा सामना करायची ताकद मिळाली
ॲन: सियेरा लियोनच्या फ्रीटाऊनमधल्या बेथेलमध्ये आम्ही सुखरूप पोचलो. तिथे आमची चांगली काळजी घेण्यात आली. पण काही काळानंतर लायबीरियामध्ये घडलेल्या घटनांची दृश्यं माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागली. दिवसा मी खूप भांबावून, घाबरून जायचे. आजूबाजूचं सगळं काही भासच आहे असं वाटायचं. काहीतरी भयंकर घडेल या भीतीने रात्री मला दरदरून घाम फुटायचा, खूप थंडी वाजायची आणि मी थरथर कापायचे. मला नीट श्वासही घेता येत नव्हता. मग पॉल मला जवळ घेऊन प्रार्थना करायचा. मला ठीक वाटेपर्यंत आम्ही राज्यगीतं गायचो. कधीकधी वाटायचं, की मी वेडी होणार आहे. मला पुढे मिशनरी म्हणून सेवा करता येणार नाही.
पण त्यानंतर जे घडलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. कारण त्याच आठवडी आम्हाला दोन मासिकं मिळाली. पहिलं होतं, ८ जून १९९६ चं सावध राहा! मासिक. त्यात “भीतीचे झटके येत असतील तर काय कराल?” असा एक लेख होता. लेख वाचल्यानंतर मला नेमकं काय होतंय ते कळलं. दुसरं, १५ मे १९९६ चं टेहळणी बुरूज मासिक होतं. त्या मासिकात “त्यांना त्यांचे सामर्थ्य कोठून प्राप्त होते?” असा लेख होता. त्यात पंखांचा बराच भाग तुटलेल्या एका फुलपाखराचं चित्र होतं. लेखात सांगितलं होतं, की फुलपाखराचं पंख तुटलेलं असलं तरी ते उडायचं थांबत नाही. तसंच आपणसुद्धा मनाने दुःखी असलो तरी यहोवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने इतरांना मदत करत राहू शकतो. मला बळ मिळावं म्हणून यहोवाने अगदी योग्य वेळी मला हे दिलं होतं. (मत्त. २४:४५) मी या विषयावर संशोधन करून मिळालेले बरेच लेख सांभाळून ठेवले. काही काळानंतर माझा हा त्रास खूप कमी झाला.
जुळवून घेण्यासाठी यहोवाने बळ दिलं
पॉल: लाइबीरियाला गेल्यावर आम्हाला घरी गेल्यासारखं वाटायचं. आम्ही खूप खूश असायचो. २००४ शेवटी आमच्या नेमणुकीला जवळजवळ २० वर्षं पूर्ण झाली होती. युद्ध संपलं होतं. शाखा कार्यालयात आता वेगवेगळे बांधकाम प्रकल्प सुरू होणार होते. पण अचानक आम्हाला नवीन नेमणूक मिळाली.
आमच्यासाठी ही खरंच एक मोठी परीक्षा होती. लायबीरियातल्या भाऊबहिणींचा आम्हाला खूप लळा लागला होता. आता त्यांना सोडून कसं जायचं असा आम्ही विचार करत
होतो. आम्ही आमच्या घरच्यांना सोडून गिलियडला गेलो तेव्हा यहोवाने आम्हाला कसे आशीर्वाद दिले, हे आम्ही स्वतः पाहिलं होतं. म्हणून आम्ही ही नवीन नेमणूक स्वीकारली. जवळच असलेल्या घानामध्ये आम्हाला नेमणूक मिळाली.ॲन: लाइबीरिया सोडताना आम्ही खूप रडलो. पण एका वयस्कर भावाने आम्हाला जे सांगितलं त्याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी आम्हाला म्हटलं, की “तुम्ही आम्हाला विसरून गेलं पाहिजे!” ते पुढे म्हणाले: “आम्हाला माहीत आहे, की तुम्ही आम्हाला विसरू शकत नाही. पण तुमचं मन नवीन नेमणुकीत गुंतवा. कारण ती यहोवाकडून आहे. म्हणून तिथल्या भाऊबहिणींची चांगली काळजी घ्या.” त्यांच्या या शब्दांमुळे आम्हाला एका नवीन देशात जाऊन पुन्हा नव्याने सुरुवात करायला आणि नवीन मित्र जोडायला मदत झाली.
पॉल: पण घानामधल्या नवीन नेमणुकीशी जुळवून घ्यायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. तिथे खूप जास्त साक्षीदार होते. त्यांच्या एकनिष्ठेतून आणि विश्वासातून बरंच काही शिकायला मिळालं. घानामध्ये १३ वर्षं सेवा केल्यावर आम्हाला आणखी एक आश्चर्याची गोष्ट कळली. आता आम्हाला पूर्व आफ्रिकेतल्या केनिया शाखेत सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं होतं. आमच्या आधीच्या नेमणुकीतल्या मित्र-मैत्रिणींची आम्हाला खूप आठवण येत होती. पण केनियामधल्या भाऊबहिणींशी आमची लगेच मैत्री झाली. या मोठ्या क्षेत्रात आम्ही अजूनही सेवा करतोय. कारण तिथे प्रचारकांची खूप गरज आहे.
आयुष्यात मागे वळून पाहताना
ॲन: बऱ्याच वर्षांपर्यंत मला अनेक भयानक आणि भीतीदायक परिस्थितींचा सामना करावा लागला. याचा माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता. या सगळ्यातून यहोवा आपल्याला चमत्कार करून वाचवेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. आजसुद्धा गोळीबाराचा आवाज ऐकला की पोटात गोळा येतो आणि हातपाय थंड पडतात. पण ठाम राहण्यासाठी यहोवा आपल्याला जी मदत करतो, त्यावर विसंबून राहायला मी शिकले आहे. तो आपल्याला भाऊबहिणींद्वारे मदत पुरवतो. मला कळलंय की आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवलं तर आपल्या नेमणुकीत टिकून राहायला यहोवा आपल्याला मदत करेल.
पॉल: काही जण आम्हाला विचारतात, की “तुम्हाला तुमची नेमणूक आवडते का?” ज्या देशात आपल्याला नेमणूक मिळते, तो देश सुंदर असू शकतो. पण तिथली परिस्थिती कधीपण अस्थिर आणि भयानक होऊ शकते. म्हणून या गोष्टींमुळे नाही, तर आमच्या भाऊबहिणींमुळे आम्हाला आमची नेमणूक जास्त आवडते. ते आमचं कुटुंबच आहे! आम्ही वेगवेगळ्या संस्कृतीचे असलो तरी आम्ही मनाने एक आहोत. आम्हाला असं वाटलं होतं, की आम्ही तिथे जाऊन त्यांना प्रोत्साहन देऊ. पण त्यांच्यामुळेच आम्हाला प्रोत्साहन आणि बळ मिळालंय.
जेव्हा-जेव्हा आम्ही नवीन ठिकाणी जातो, तेव्हा-तेव्हा आम्हाला एक चमत्कारच बघायला मिळतो, तो म्हणजे जगभरातले आपले भाऊबहीण! असं म्हणता येईल, की जोपर्यंत आपण मंडळीचा भाग आहोत, तोपर्यंत आपल्याला एक कुटुंब आणि एक घर आहे. शिवाय आपण जर यहोवावर भरवसा ठेवायला शिकलो, तर आपल्या गरजेनुसार तो आपल्याला सामर्थ्य देईल अशी खातरी आपण बाळगू शकतो.—फिलिप्पै. ४:१३.