व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?

आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?

“जे तुमचे नेतृत्व करत आहेत . . . त्यांची आठवण ठेवा.”—इब्री १३:७, NW.

गीत क्रमांक: ४३, 

१, २. येशूला स्वर्गात घेण्यात आलं त्यानंतर प्रेषितांच्या मनात कदाचित कोणता प्रश्न आला असावा?

जैतूनाच्या डोंगरावर उभ्या असलेल्या प्रेषितांनी, आपला शिक्षक आणि मित्र असलेल्या येशूला स्वर्गात वर घेतले जात असताना पाहिलं. येशूला स्वर्गात घेतलं जात असताना मेघांनी त्याला घेरलं आणि मग तो त्यांच्या दृष्टिआड झाला. (प्रे. कृत्ये १:९, १०) सुमारे दोन वर्षं येशूने त्यांना शिकवलं होतं, प्रोत्साहन दिलं होतं आणि त्यांचं नेतृत्व केलं होतं. पण, आता मात्र तो त्यांच्यासोबत नव्हता. मग यानंतर ते काय करणार होते?

स्वर्गात जाण्यापूर्वी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं: “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) हे कार्य करणं त्यांना कसं शक्य होणार होतं? येशूने त्यांना अभिवचन दिलं होतं की हे कार्य साध्य करण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा त्यांना मदत करेल. (प्रे. कृत्ये १:५) पण, संपूर्ण जगभरात होणार असलेल्या या प्रचारकार्याचं मार्गदर्शन आणि नियोजन कोण करणार होतं? प्रेषितांना हे माहीत होतं की प्राचीन काळात इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्यासाठी देवाने काही पुरुषांचा उपयोग केला होता. यामुळे कदाचित त्यांच्या मनात असा प्रश्न आला असावा, की ‘आपलं नेतृत्व करण्यासाठी आता यहोवा दुसऱ्या कोणाची निवड करेल का?’

३. (क) येशू स्वर्गात गेल्यानंतर त्याच्या विश्वासू प्रेषितांनी कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

येशू स्वर्गात गेला त्याच्या दोन आठवड्यांच्या आतच शिष्यांनी शास्त्रवचनांचं परीक्षण केलं आणि यहूदा इस्कर्योतच्या जागी १२ वा प्रेषित निवडावा म्हणून देवाला मदतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी मत्थिया याची बारावा प्रेषित म्हणून निवड केली. (प्रे. कृत्ये १:१५-२६) ही निवड त्यांच्यासाठी आणि यहोवासाठी इतकी महत्त्वाची का होती? शिष्यांना या गोष्टीची जाणीव झाली होती की प्रेषितांची संख्या १२ असणं गरजेचं आहे. * येशूने प्रेषितांची निवड केली होती आणि देवाच्या लोकांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केलं होतं. ती जबाबदारी काय होती? आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी यहोवा व येशू त्यांना मदत कशी पुरवणार होते? आज आपल्या काळातही यहोवाने त्याच प्रकारची कोणती तरतूद केली आहे? तसंच, जे “नेतृत्व करत आहेत,” खासकरून विश्वासू व बुद्धिमान दास, त्यांची आपण आठवण कशी ठेवू शकतो?—इब्री १३:७; मत्त. २४:४५.

येशू नियमन मंडळाचं नेतृत्व करतो

४. यरुशलेमेतील वडिलांवर आणि प्रेषितांवर कोणती जबाबदारी होती?

प्रेषितांनी ३३ सालच्या पेन्टेकॉस्टपासून ख्रिस्ती मंडळीचं नेतृत्व करण्यास सुरवात केली. बायबल म्हणतं की “पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून” मोठ्या लोकसमुदायाला जीवनदायी सत्यं शिकवू लागला. (प्रे. कृत्ये २:१४, १५) त्या लोकसमुदायातील अनेक जण ख्रिस्ती बनले. नवीनच ख्रिस्ती बनलेले हे लोक ‘प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर राहिले.’ (प्रे. कृत्ये २:४२) मंडळीतील पैशांची व्यवस्था व व्यवहार पाहण्याची जबाबदारी प्रेषितांवर होती. (प्रे. कृत्ये ४:३४, ३५) प्रेषितांनी देवाच्या लोकांना शिकवलं आणि त्यांच्यासाठी प्रार्थनादेखील केली. ते म्हणाले: “आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.” (प्रे. कृत्ये ६:४) नवीन क्षेत्रांत प्रचार करण्यासाठी अनुभवी ख्रिश्चनांना पाठवण्याचं कामही त्यांनी केलं. (प्रे. कृत्ये ८:१४, १५) नंतर, इतर अभिषिक्त वडिलांनीदेखील प्रेषितांसोबत मिळून मंडळीचं नेतृत्व करण्याचं काम केलं. नियमन मंडळ या नात्यानं त्यांनी सर्व मंडळ्यांना मार्गदर्शित केलं.—प्रे. कृत्ये १५:२.

५, ६. (क) पवित्र आत्म्याने नियमन मंडळाला कसं साहाय्य केलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) देवदूतांनी नियमन मंडळाला कशी मदत केली? (ग) देवाच्या वचनाने नियमन मंडळाचं मार्गदर्शन कसं केलं?

पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना माहीत होतं, की यहोवा देव हा येशूद्वारे नियमन मंडळाला मार्गदर्शित करत आहे. त्यांना या गोष्टीची खात्री का होती? याचं पहिलं कारण म्हणजे, देवाचा पवित्र आत्मा नियमन मंडळाला साहाय्य करत होता. (योहा. १६:१३) सर्व अभिषिक्त ख्रिश्चनांना देवाचा पवित्र आत्मा मिळाला होता हे खरं आहे. पण, त्याने खासकरून यरुशलेमेतील वडिलांना आणि प्रेषितांना नेतृत्व करण्याच्या त्यांच्या जबाबदारीला योग्य रीतीनं हाताळण्यासाठी मदत पुरवली. उदाहरणार्थ, ४९ साली पवित्र आत्म्याने नियमन मंडळाला सुंतेविषयी असलेला निर्णय घेण्यास मार्गदर्शन दिलं. नियमन मंडळाकडून मिळालेल्या या नवीन सल्ल्याचं मंडळ्यांनी पालन केलं. याचा परिणाम म्हणजे, “मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत” गेली. (प्रे. कृत्ये १६:४, ५) सुंतेविषयी मंडळ्यांना पाठवलेल्या पत्रावरून हे दिसून येतं, की नियमन मंडळावर देवाचा पवित्र आत्मा होता. तसंच, त्यावरून त्यांच्यात असलेले प्रेम आणि विश्वास यांसारखे गुणदेखील दिसून आले.—प्रे. कृत्ये १५:११, २५-२९; गलती. ५:२२, २३.

दुसरं कारण म्हणजे, देवदूतांनी नियमन मंडळाला मदत केली. उदाहरणार्थ, एका देवदूताने कर्नेल्याला प्रेषित पेत्राचा शोध करण्यास सांगितलं. पेत्राने कर्नेल्याला आणि त्याच्या नातेवाइकांना प्रचार केला त्यानंतर त्यांना पवित्र आत्मा मिळाला. त्या पुरुषांची सुंता झाली नव्हती, तरी त्यांना पवित्र आत्मा मिळाला. कर्नेल्य हा पहिला असा ख्रिस्ती होता, जो यहुदी नव्हता आणि ज्याची सुंतादेखील झाली नव्हती. जेव्हा प्रेषितांनी आणि इतर बांधवांनी याबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांनी देवाच्या इच्छेचा स्वीकार केला आणि सुंता न झालेल्या व यहुदी नसलेल्या लोकांचं मंडळीत स्वागत केलं. (प्रे. कृत्ये ११:१३-१८) नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या प्रचारकार्यात देवदूतांनी सक्रिय सहभाग घेतला. (प्रे. कृत्ये ५:१९, २०) तिसरं कारण म्हणजे, देवाच्या वचनाने नियमन मंडळाला मार्गदर्शित केलं. ख्रिस्ती विश्वासांबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि मंडळ्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या पुरुषांनी देवाच्या वचनांचा वापर केला.—प्रे. कृत्ये १:२०-२२; १५:१४-२०.

७. येशूनेच सुरवातीच्या ख्रिश्चनांचं नेतृत्व केलं हे आपण कशावरून म्हणू शकतो?

नियमन मंडळाला मंडळीत अधिकार असला, तरी येशू ख्रिस्त हाच त्यांचं नेतृत्व करणारा आहे याची त्यातील सदस्यांना पूर्ण जाणीव होती. हे आपण कशावरून म्हणू शकतो? प्रेषित पौलाने सांगितलं की ख्रिस्तानेच काहींना प्रेषित म्हणून निवडलं आहे. त्याने हेदेखील सांगितलं, की ख्रिस्त हा मंडळीचा “मस्तक” म्हणजेच नेतृत्व करणारा आहे. (इफिस. ४:११, १५) तसंच, शिष्यांना प्रेषितांच्या नावाने ओळखले जाण्याऐवजी देवाच्या मार्गदर्शनाने ख्रिस्ती असे म्हणण्यात आले. (प्रे. कृत्ये ११:२६) प्रेषित आणि नेतृत्व करणारे इतर पुरुष हे बायबलच्या आधारावर जे शिकवत आहेत त्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे, याची पौलाला जाणीव होती. पण तरी त्याने असं म्हटलं: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे . . . हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” यात नियमन मंडळातील प्रत्येक सदस्याचाही समावेश होता. तसंच, पौलाने असंही सांगितलं की “ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” (१ करिंथ. ११:२, ३) यावरून हे स्पष्ट होतं की यहोवाने त्याच्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला मंडळीचं नेतृत्व करण्यासाठी निवडलं आहे.

“हे कोणा माणसाचे काम नाही”

८, ९. बंधू रस्सल यांनी कोणती महत्त्वपूर्ण जबाबादारी हाताळली?

सन १८७० च्या सुरवातीच्या काळात चार्ल्झ टेझ रस्सल आणि त्यांच्या काही मित्रांची, बायबलमध्ये सांगितल्यानुसार देवाची उपासना करण्याची इच्छा होती. इतरांनाही देवाची खरी उपासना करता यावी म्हणून त्यांना मदत करण्याचीही त्यांची इच्छा होती. यात दुसरी भाषा बोलणाऱ्यांना मदत करणंही समाविष्ट होतं. म्हणून मग १८८४ साली झायन्स वॉच टॉवर ट्रॅक्ट सोसायटीची कायदेशीर रीत्या स्थापना करण्यात आली. * या सोसायटीचे अध्यक्ष बंधू रस्सल होते. ते बायबलचं अगदी काळजीपूर्वक रीत्या परीक्षण करायचे. तसंच, चर्चमध्ये दिली जाणारी त्रैक्याची आणि अमरत्वाची शिकवण ही बायबलवर आधारित नाही हे इतरांना सांगायला ते घाबरायचे नाहीत. बायबलचं परीक्षण केल्यानंतर त्यांना हे समजलं, की ख्रिस्ताचं येणं हे अदृश्य स्वरूपात असेल आणि १९१४ साली “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल.” (लूक २१:२४) बंधू रस्सल यांनी आपला वेळ, ताकद आणि पैसा इतरांना बायबलमधील सत्यं शिकवण्यासाठी खर्च केला. यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं, की यहोवा आणि येशू यांनी इतिहासातील त्या अगदी महत्त्वपूर्ण काळादरम्यान नेतृत्व करण्यासाठी बंधू रस्सल यांचा उपयोग केला होता.

लोकांनी आपल्याला खास वागणूक द्यावी अशी बंधू रस्सल यांची इच्छा नव्हती. १८९६ साली त्यांनी लिहिलं, की त्यांना आणि इतर जबाबदार पुरुषांना लोकांनी गौरव द्यावा अशी त्यांची मुळीच इच्छा नाही. त्यांना काही खास पदवी दिली जावी किंवा कोणताही गट त्यांच्या नावाने ओळखला जावा अशी त्यांची इच्छा नव्हती. ते नंतर एकदा असं म्हणाले: “हे कोणा माणसाचे काम नाही.”

१०. (क) येशूने “विश्वासू व बुद्धिमान दासाला” केव्हा नियुक्त केलं? (ख) नियमन मंडळ हे वॉच टॉवर सोसायटीपेक्षा वेगळं आहे, हे कशा प्रकारे स्पष्ट झालं ते समजावून सांगा.

१० बंधू रस्सल यांचा १९१६ साली मृत्यू झाला. याच्या तीन वर्षांनंतर म्हणजे १९१९ साली येशूने त्याच्या अनुयायांना “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न पुरवण्यासाठी “विश्वासू व बुद्धिमान दासाला” नियुक्त केलं. (मत्त. २४:४५) त्या काळादरम्यान न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन इथल्या मुख्यालयात काम करणारा अभिषिक्त बांधवांचा एक लहान गट, येशूच्या अनुयायांना आध्यात्मिक अन्न पुरवण्याचं काम करायचा. १९४० पासून आपल्या प्रकाशनांत आध्यात्मिक अन्न पुरवणाऱ्या गटाला “नियमन मंडळ” असं म्हटलं जाऊ लागलं. एक वेळ अशीही होती जेव्हा असं समजलं जात होतं, की नियमन मंडळ हे वॉच टॉवर बायबल अॅन्ड ट्रॅक्ट सोसायटीचाच एक भाग आहे. पण, १९७१ मध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की नियमन मंडळ आणि वॉच टॉवर सोसायटी हे वेगळे आहेत. कारण, वॉट टॉवर सोसायटीचं काम हे फक्त कायदेशीर बाबी हाताळणं हे होतं. म्हणून तेव्हापासून अभिषिक्त बांधव हे जरी संस्थेचे संचालक नसले, तरी ते नियमन मंडळाचा भाग बनू शकत होते. अलीकडच्या काळात ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ असलेल्या जबाबदार बांधवांनीही वॉच टॉवर सोसायटीचे आणि तिच्याशी जुडलेल्या इतर संस्थांचे, संचालक या नात्यानं काम पाहिलं आहे. यामुळे नियमन मंडळाला बायबलवर आधारित सल्ले आणि मार्गदर्शन पुरवण्याकडे पूर्णपणे लक्ष देण्यास मदत झाली आहे. (योहा. १०:१६; प्रे. कृत्ये ६:४) १५ जुलै २०१३ च्या टेहळणी बुरूज अंकात हे समजावण्यात आलं होतं, की नियमन मंडळ हे अभिषिक्त बांधवांनी बनलेला एक लहान गट आहे, ज्याला ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास’ असं म्हटलं जातं.

नियमन मंडळ, १९५० च्या दशकात

११. नियमन मंडळ कशा प्रकारे निर्णय घेतं?

११ नियमन मंडळाचे सदस्य प्रत्येक आठवडी एकत्र जमून एक गट या नात्यानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतात. अशा प्रकारे एकत्र येऊन सभा घेतल्यामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधण्यास आणि त्यांच्यातील एकता टिकवून ठेवण्यासही मदत होते. (नीति. २०:१८) नियमन मंडळाचा एक सदस्य दुसऱ्या सदस्यापेक्षा महत्त्वाचा आहे असं नाही. प्रत्येक वर्षी त्यांच्यातील वेगवेगळे बांधव त्यांच्या सभेचं नेतृत्व करतात. (१ पेत्र ५:१) हीच गोष्ट नियमन मंडळाच्या सहा समित्यांच्या बाबतीतही खरी आहे. नियमन मंडळातील कोणताही सदस्य असा विचार करत नाही, की तो त्यांच्या बांधवांचा नेता किंवा पुढारी आहे. त्यांच्यापैकी प्रत्येक सदस्य हा ‘परिवाराचा’ भाग आहे. विश्वासू व बुद्धिमान दासाकडून मिळणाऱ्या आध्यात्मिक अन्नावर आणि मार्गदर्शनावर हे सदस्यदेखील निर्भर राहतात.

१९१९ साली विश्वासू दासाला नियुक्त करण्यात आलं तेव्हापासून त्यांनी देवाच्या लोकांना आध्यात्मिक अन्न पुरवलं आहे (परिच्छेद १०, ११ पाहा)

विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे?

१२. आता आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत?

१२ नियमन मंडळाला पवित्र आत्म्याकडून प्रकटीकरण होतं असं नाही. तसंच ते परिपूर्णही नाहीत. बायबलचं स्पष्टीकरण देताना किंवा संघटनेचं मार्गदर्शन करताना तेही चुकू शकतात. उदाहरणार्थ, वॉच टॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स यात बायबल विषयांबद्दल असलेल्या आपल्या समजुतींमध्ये ज्या सुधारणा होतात त्याबद्दल सांगण्यात येतं. * १८७० पासून बायबल विषयांबद्दल आपल्या समजुतींमध्ये ज्या सुधारणा होत गेल्या आहेत त्यांबद्दलची यादी त्यात देण्यात आली आहे. विश्वासू दास पुरवत असलेलं आध्यात्मिक अन्न नेहमीच अगदी अचूक असेल असं येशूने सांगितलं नव्हतं. तर मग येशूने, ‘विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे?’ असा जो प्रश्न केला त्याचं उत्तर काय असेल? (मत्त. २४:४५) नियमन मंडळाला आपण विश्वासू व बुद्धिमान दास कशावरून म्हणू शकतो? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रेषितांच्या काळात ज्या तीन गोष्टींनी नियमन मंडळाला मदत केली त्यांबद्दल आता आपण थोडी चर्चा करू या.

१३. पवित्र आत्म्याने नियमन मंडळाला कशा प्रकारे साहाय्य केलं आहे?

१३ पवित्र आत्मा नियमन मंडळाला साहाय्य करतो. पवित्र आत्म्याने नियमन मंडळाला बायबलमधील अशी सत्यं समजण्यास मदत केली आहे जी आधी समजली नव्हती. उदाहरणार्थ, याआधी सांगण्यात आलं त्याप्रमाणे आपल्या समजुतींमध्ये झालेल्या सुधारणांचाच विचार करा. कोणत्याही मानवाला “देवाच्या गहन” गोष्टींचा अर्थ स्वतःच्या क्षमतेवर समजणं शक्य नाही. (१ करिंथकर २:१० वाचा.) नियमन मंडळालाही प्रेषित पौलाप्रमाणे वाटतं. त्याने लिहिलं की या गोष्टी “आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.” (१ करिंथ. २:१३) शेकडो वर्षांपर्यंत खोट्या शिकवणींचा प्रभाव असताना आणि कोणतंही मार्गदर्शन उपलब्ध नसताना, १९१९ सालापासूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर बायबल सत्यांची समज का मिळू लागली असावी? याचं कारण एकच असू शकतं. ते म्हणजे देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने नियमन मंडळाला मदत करत आला आहे.

१४. प्रकटीकरण १४:६, ७ नुसार देवदूत आज नियमन मंडळाला आणि देवाच्या इतर सेवकांना कशा प्रकारे मदत करत आहेत?

१४ देवदूत नियमन मंडळाला साहाय्य करतात. जगभरात चाललेल्या प्रचारकार्यात सहभाग घेणाऱ्या ८० लाखांहून जास्त प्रचारकांचं मार्गदर्शन करण्याची खूप मोठी जबाबदारी नियमन मंडळावर आहे. या कार्यात आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर यश का मिळालं आहे? यामागचं एक कारण म्हणजे, या कार्याला देवदूतांचा पाठिंबा आहे. (प्रकटीकरण १४:६, ७ वाचा.) बऱ्याच वेळा असं दिसून आलं आहे, की एखादी व्यक्ती देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करत असतानाच देवदूतांनी प्रचारकांना अशा व्यक्तीपर्यंत पोचण्यास मदत केली आहे. * ज्या ठिकाणी आपल्या कार्याला तीव्र विरोध केला जातो, अगदी अशा ठिकाणीही प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम वाढत चाललं आहे. हेदेखील देवदूतांच्या मदतीमुळेच शक्य होत आहे.

१५. नियमन मंडळ हे ख्रिस्ती धर्मजगतातील पुढाऱ्यांपेक्षा वेगळं कसं आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१५ देवाचं वचन नियमन मंडळाचं मार्गदर्शन करतं. (योहान १७:१७ वाचा.) १९७३ साली काय घडलं याचा विचार करा. त्या सालातील १ जूनच्या टेहळणी बुरूज अंकात असा प्रश्न विचारला होता की, “ज्या व्यक्तीने तंबाखूचं सेवन करण्याचं थांबवलं नाही ती बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरते का?” आणि मग त्या अंकात या प्रश्‍नाचं बायबल तत्त्वांवर आधारित उत्तर देण्यात आलं. साहजिकच ते उत्तर नाही असं होतं. तसंच, टेहळणी बुरूजमध्ये अनेक शास्त्रवचनांचा वापर करून हेदेखील समजावण्यात आलं होतं की, जी व्यक्ती धूम्रपान करण्याचं थांबवत नाही तिला मंडळीतून बहिष्कृत करणं का योग्य आहे. (१ करिंथ. ५:७; २ करिंथ. ७:१) त्यात म्हटलं होतं की हे कडक नियम कोणा मानवाकडून नाहीत, तर “देवाकडून आहेत, जो त्याच्या लिखित वचनांतून तो कशाची अपेक्षा करतो हे कळवतो.” जगात यहोवाच्या साक्षीदारांशिवाय दुसरी कुठलीच अशी संघटना नाही जी देवाच्या वचनांवर पूर्णपणे अवलंबून राहिलेली आहे. मग, जरी तिच्या सदस्यांना असं करणं कितीही कठीण जात असलं तरीही. धर्मांबद्दल सांगणाऱ्या अमेरिकेतील एका पुस्तकात असं म्हणण्यात आलं: “ख्रिस्ती धर्मपुढाऱ्यांनी त्यांच्या शिकवणींत नेहमी बदल केला आहे. खासकरून, त्यांच्या धर्मातील सदस्यांच्या आणि समाजाच्या विश्वासांशी आणि मतांशी मेळ खातील असे बदल त्यांनी केले आहेत.” पण, नियमन मंडळ पूर्णपणे देवाच्या वचनांच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहतं; लोकांना जे आवडतं त्यावर नाही. यावरून हेच सिद्ध होतं की यहोवा देवच खरंतर त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे.

जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांची आठवण ठेवा

१६. नियमन मंडळाची आठवण ठेवण्याचा एक मार्ग कोणता आहे?

१६ इब्री लोकांस १३:७ वाचा. * बायबल आपल्याला आपलं नेतृत्व करणाऱ्यांची आठवण ठेवण्यास आर्जवतं. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, नियमन मंडळातील सदस्यांसाठी प्रार्थना करणं. (इफिस. ६:१८) त्यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. यांत आध्यात्मिक अन्न उपलब्ध करून देणं, जगभरातील प्रचारकार्याचं काम पाहणं आणि अनुदानाद्वारे संस्थेला मिळणाऱ्या पैशांची व्यवस्था पाहणं यांचाही समावेश होतो. त्यांच्यावर यांसारख्या बऱ्याच जबाबदाऱ्या असल्यामुळे, त्यांना आपल्या प्रार्थनांची खरोखरच खूप गरज आहे.

१७, १८. (क) आपण नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाचं पालन कसं करतो? (ख) प्रचारकार्य करण्याद्वारे आपण नियमन मंडळाला आणि येशूला कशा प्रकारे साहाय्य करतो?

१७ नियमन मंडळाकडून येणाऱ्या मार्गदर्शनांचं आणि सल्ल्यांचं पालन करण्याद्वारेही आपण हे दाखवू शकतो, की आपण त्यांची आठवण ठेवतो. नियमन मंडळ आपल्याला प्रकाशनांद्वारे, सभांद्वारे, अधिवेशनांद्वारे आणि संमेलनांद्वारे मार्गदर्शन पुरवतं. तसंच, नियमन मंडळ विभागीय पर्यवेक्षकांची नेमणूक करतं आणि मग विभागीय पर्यवेक्षक मंडळीत वडिलांची नेमणूक करतात. विभागीय पर्यवेक्षक आणि मंडळीतील वडील त्यांना मिळत असलेल्या मार्गदर्शनाचं जेव्हा काळजीपूर्वकपणे पालन करतात तेव्हा तेदेखील नियमन मंडळाची आठवण ठेवत असल्याचं दाखवून देतात. शिवाय, आपलं नेतृत्व करणाऱ्या येशूने ज्या पुरुषांची निवड केली आहे त्यांच्या आज्ञेत राहण्याद्वारे, आपण सर्व जण येशूप्रती आदर असल्याचं दाखवतो.—इब्री १३:१७.

१८ नियमन मंडळाची आठवण ठेवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे प्रचारकार्यात आपलं सर्वोत्तम देणं. इब्री लोकांस १३:७ या वचनात पुढाकार घेणाऱ्यांचं अनुकरण करण्याचं उत्तेजन ख्रिश्चनांना देण्यात आलं आहे. नियमन मंडळाने अगदी आवेशानं प्रचारकार्य करण्याद्वारे आणि सुवार्ता घोषित करण्याद्वारे अप्रतिम विश्वास असल्याचं दाखवलं आहे. या महत्त्वपूर्ण कार्यात तुम्हीही सहभाग घेत आहात का? जर तुम्ही सहभाग घेत असाल तर येशूचे पुढील शब्द ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. येशू तुम्हाला म्हणेल: “ज्याअर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.”—मत्त. २५:३४-४०.

१९. आपलं नेतृत्व करणाऱ्या येशूच्या मार्गदर्शनाचं पालन करण्याचा तुमचा निर्धार का आहे?

१९ स्वर्गात गेल्यानंतरही येशूने आपल्या अनुयायांना सोडून दिलं नाही. (मत्त. २८:२०) त्याला माहीत होतं की पवित्र आत्मा, देवदूत आणि देवाच्या वचनाने त्याला पृथ्वीवर असताना त्यांचं नेतृत्व करण्यास मदत केली होती. आणि त्याने आज आपल्या विश्वासू दासालाही तीच मदत पुरवली आहे. नियमन मंडळ “जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे” जातं. (प्रकटी. १४:४) त्यामुळे जेव्हा आपण नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाचं पालन करतो, तेव्हा खरंतर आपण आपलं नेतृत्व करणाऱ्या येशूच्या मार्गदर्शनाचं पालन करत असतो. लवकरच तो आपल्याला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाईल. (प्रकटी. ७:१४-१७) कोणताही मानवी पुढारी आपल्याला असं अभिवचन देऊ शकतो का? नक्कीच नाही.

^ परि. 3 असं दिसतं की, प्रेषितांची संख्या बारा असावी अशी यहोवाची इच्छा होती. कारण, भविष्यातील नवीन यरुशलेम ही “बारा पाये” यांनी मिळून बनणार होती. (प्रकटी. २१:१४) त्यामुळे, त्यानंतर एखाद्या विश्वासू प्रेषिताचा जरी मृत्यू झाला तरी त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला निवडण्याची गरज नव्हती.

^ परि. 8 १९५५ सालापासून ही संस्था वॉच टॉवर बायबल अॅन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वेनिया या नावाने ओळखली जाऊ लागली.

^ परि. 12 तसंच यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक यात, “यहोवाचे साक्षीदार” या शिर्षकाखाली असलेलं “विश्वासांचे स्पष्टीकरण” हे उपशीर्षक पाहा.

^ परि. 14 १५ जुलै २०१४ टेहळणी बुरूज पृष्ठ ३ आणि परमेश्वर के राज के बारे में अच्छी तरह गवाही दो पृष्ठे ५८-५९ पाहा.

^ परि. 16 इब्री लोकांस १३:७ (NW): “जे तुमचे नेतृत्व करत आहेत व ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले आहे, त्यांची आठवण ठेवा आणि त्यांच्या वर्तनाचे चांगले परिणाम पाहून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.”