व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ८

परीक्षांचा सामना करतानाही आनंदी कसं राहायचं?

परीक्षांचा सामना करतानाही आनंदी कसं राहायचं?

“माझ्या बांधवांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा आनंदच माना.”—याको. १:२.

गीत २८ नवे गीत

सारांश *

१-२. मत्तय ५:११ या वचनाप्रमाणे आपला छळ होतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे?

येशूने म्हटलं होतं, की जे त्याचे शिष्य बनतील ते खऱ्‍या अर्थाने आनंदी असतील. पण त्याच वेळी, त्यांना परीक्षांचा सामना करावा लागेल हेसुद्धा त्याने त्यांना सांगितलं होतं. (मत्त. १०:२२, २३; लूक ६:२०-२३) आपण येशूचे शिष्य आहोत याचा आपल्याला आनंद आहे. पण जर आपल्या घरातल्या लोकांनी आपला विरोध केला, सरकारने छळ केला आणि कामावर किंवा शाळेत इतरांनी आपल्यावर चुकीच्या गोष्टी करायचा दबाव आणला तर काय? त्या विचारांनी आपल्याला कदाचित भीती वाटू शकते.

छळ किंवा विरोध होतो तेव्हा लोकांना सहसा आनंद होत नाही. पण बायबल आपल्याला सांगतं, की आपला छळ होतो तेव्हा आपण आनंदी असलं पाहिजे. उदाहरणार्थ, याकोबने आपल्या पुस्तकात असं लिहिलं, की संकटांचा सामना करत असताना आपण निराश होऊ नये, तर आनंदी असावं. (याको. १:२, १२) येशूनेही म्हटलं, की आपला छळ होतो तेव्हा आपण आनंदी असलं पाहिजे. (मत्तय ५:११ वाचा.) पण अशा वेळी आपण आनंदी कसं राहू शकतो? याकोबने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात आपल्याला याचं उत्तर मिळतं. त्या ख्रिश्‍चनांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला ते आधी आपण पाहू.

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला?

३. याकोब येशूचा शिष्य बनला त्याच्या काही काळानंतरच काय झालं?

येशूचा भाऊ याकोब त्याचा शिष्य बनला, त्याच्या काही काळानंतरच यरुशलेममध्ये ख्रिश्‍चनांचा छळ होऊ लागला. (प्रे. कार्यं १:१४; ५:१७, १८) आणि स्तेफनची हत्या झाली तेव्हा अनेक ख्रिस्ती यरुशलेम सोडून “यहूदीया आणि शोमरोनच्या प्रदेशांत विखुरले गेले.” आणि काही जण तर कुप्र आणि अंत्युखियाला पळून गेले. (प्रे. कार्यं ७:५८–८:१; ११:१९) त्या ख्रिश्‍चनांना किती समस्यांचा सामना करावा लागला असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण तरी, ते जिथे कुठे गेले तिथे त्यांनी आवेशाने आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला. आणि त्यामुळे संपूर्ण रोमी साम्राज्यात अनेक मंडळ्या तयार झाल्या. (१ पेत्र १:१) पण एवढ्यावरच त्यांच्या समस्या संपल्या नाहीत. पुढे त्यांना आणखी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.

४. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना कोणकोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला?

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करावा लागला. जसं की, इ. स. ५० च्या आसपास रोमी सम्राट क्लौद्य याने सगळ्या यहुद्यांना रोम सोडून जायचा हुकूम दिला. त्यामुळे, जे ख्रिस्ती यहुदी बनले होते त्यांना आपली घरंदारं सोडून दुसरीकडे राहायला जावं लागलं. (प्रे. कार्यं १८:१-३) पुढे इ. स. ६१ च्या जवळपास प्रेषित पौलने असं लिहिलं, की अनेक भाऊबहिणींचा चारचौघांत अपमान करण्यात आला, त्यांना तुरूंगात टाकण्यात आलं आणि त्यांची मालमत्ता लुटण्यात आली. (इब्री १०:३२-३४) याशिवाय, इतर लोकांप्रमाणेच ख्रिश्‍चनांनाही गरिबीचा आणि आजारपणाचा सामना करावा लागला.—रोम. १५:२६; फिलिप्पै. २:२५-२७.

५. आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

याकोबने आपलं पत्र इ. स. ६२ च्या आधी लिहिलं. त्या वेळी त्याला माहीत होतं, की आपल्या भाऊबहिणींना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याकोबने यहोवाच्या प्रेरणेने आपल्या पत्रात त्या ख्रिश्‍चनांना काही व्यावहारिक सल्ले दिले. त्या सल्ल्यांमुळे परीक्षांचा सामना करत असतानाही त्यांना आनंदी राहायला मदत होणार होती. तर आता आपण याकोबने लिहिलेल्या पत्रावर थोडी चर्चा करू या. आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळवू या. याकोबने कशातून मिळणाऱ्‍या आनंदाबद्दल लिहिलं? कोणत्या गोष्टींमुळे एका ख्रिश्‍चनाचा आनंद हरवू शकतो? आणि कोणत्याही समस्या आल्या तरी बुद्धी, विश्‍वास आणि धैर्य या गोष्टी आपल्याला आनंदी राहायला कशा मदत करू शकतात?

एका ख्रिस्ती व्यक्‍तीला खरा आनंद कशातून मिळतो?

ज्याप्रमाणे वारा किंवा पाऊस कंदिलातली ज्योत विझवू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणतीही परीक्षा यहोवाकडून मिळणारा आपला आनंद नाहीसा करू शकत नाही (परिच्छेद ६ पाहा)

६. लूक ६:२२, २३ या वचनांप्रमाणे संकटांचा सामना करत असताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीला आनंद का होतो?

लोकांना वाटतं, की आपलं आरोग्य चांगलं असेल, आपल्याकडे भरपूर पैसा असेल आणि आपलं कुटुंब सुखी असेल तरच आपण आनंदी राहू शकतो. पण याकोबने आपल्या पत्रात एका वेगळ्या प्रकारच्या आनंदाबद्दल लिहिलं. त्याने ज्या आनंदाबद्दल लिहिलं तो खरंतर देवाच्या पवित्र शक्‍तीचा एक पैलू आहे. तो आनंद जीवनातल्या परिस्थितींवर अवलंबून नाही. (गलती. ५:२२) आपण यहोवाचं मन आनंदी करत आहोत आणि येशूप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहोत, या जाणिवेमुळे एक ख्रिस्ती व्यक्‍ती खऱ्‍या अर्थाने आनंदी होते. (लूक ६:२२, २३ वाचा; कलस्सै. १:१०, ११) आपला आनंद कंदीलातल्या ज्योतीसारखा आहे. कंदीलाच्या आत असल्यामुळे वारा किंवा पाऊस आला तरी ती विझत नाही, तर ती जळत राहते. अगदी तसंच, आपल्या जीवनात कोणतीही समस्या आली तरी आपला आनंद टिकून राहतो. मग ती समस्या आरोग्याची असो किंवा पैशाची. कुटुंबातल्या लोकांनी किंवा इतरांनी आपली थट्टा केली किंवा आपला विरोध केला, तरीही आपण आनंदी राहतो. आणि प्रत्येक वेळी आपल्या आनंदाची ज्योत आणखी प्रखर होते. आपल्या विश्‍वासामुळे आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा हेच सिद्ध होतं, की आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत. (मत्त. १०:२२; २४:९; योहा. १५:२०) आणि म्हणूनच याकोब म्हणाला, “माझ्या बांधवांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा आनंदच माना.”—याको. १:२.

जीवनात येणाऱ्‍या परीक्षा या धातू मजबूत करण्याच्या प्रक्रियेसारख्या कशा आहेत? (परिच्छेद ७ पाहा) *

७-८. आपण परीक्षांचा धीराने सामना करतो तेव्हा काय फायदा होतो?

एक ख्रिस्ती व्यक्‍ती कठीण परीक्षांचा सामना करायला का तयार असते, याचं आणखी एक कारण याकोब सांगतो. तो म्हणतो: “तुमच्या विश्‍वासाची अशी पारख झाल्यामुळे धीर उत्पन्‍न होतो.” (याको. १:३) परीक्षांची तुलना एखादा धातू मजबूत करण्याच्या प्रक्रियेशी केली जाऊ शकते. धातू धगधगत्या आगीत तापवून नंतर थंड केला जातो तेव्हा तो आणखी मजबूत होतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा परीक्षांचा धीराने सामना करतो, तेव्हा आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. म्हणूनच याकोबने असं म्हटलं: “धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या म्हणजे तुम्ही सर्व बाबतींत परिपूर्ण ठराल.” (याको. १:४) परीक्षांमुळे आपला विश्‍वास मजबूत होताना आपण पाहतो तेव्हा आपण आनंदाने त्या सहन करतो.

पण आपला हा आनंद कोणत्या काही गोष्टींमुळे हरवू शकतो, हेसुद्धा याकोबने आपल्या पत्रात सांगितलं. त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्यावर कोणते उपाय आहेत, ते आता आपण पाहू या.

आपला आनंद हरवू नये म्हणून आपण काय करू शकतो?

९. आपल्याला बुद्धीची गरज का असते?

कशामुळे आपला आनंद नाहीसा होऊ शकतो? काय करावं कळत नाही तेव्हा.  परीक्षांचा सामना करत असताना आपण नेहमी असेच निर्णय घेतले पाहिजेत ज्यांमुळे यहोवाचं मन आनंदी होईल, आपल्या भाऊबहिणींच भलं होईल आणि आपल्याला यहोवाला विश्‍वासू राहायला मदत होईल. (यिर्म. १०:२३) असे योग्य निर्णय घेण्यासाठी आणि विरोधकांना काय उत्तर द्यायचं ते सुचण्यासाठी आपल्याला बुद्धीची गरज असते. कारण अशा वेळी काय करायचं हे जर आपल्याला समजलं नाही, तर आपण लगेच निराश होऊ आणि आपला आनंद गमावून बसू.

१०. याकोब १:५ या वचनात सांगितल्याप्रमाणे बुद्धी मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१० आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करा.  संकटांचा सामना करत असताना आपल्याला जर आपला आनंद टिकवून ठेवायचा असेल तर सगळ्यात आधी आपण यहोवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतील. (याकोब १:५ वाचा.) पण यहोवा आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर देत नाही असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण काय करावं? याकोबने म्हटलं त्याप्रमाणे आपण देवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना करत राहिलं पाहिजे. आपण सारखंसारखं त्याच्याकडे बुद्धी मागितली तरी तो आपल्यावर चिडत नाही किंवा आपल्याला रागवत नाही. परीक्षांचा सामना करण्यासाठी आपण देवाकडे बुद्धी मागतो तेव्हा तो ती “उदारपणे” आपल्याला देतो. (स्तो. २५:१२, १३) आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा यहोवाला खूप वाईट वाटतं. म्हणून आपल्याला मदत करायला तो नेहमी तयार असतो. आणि या जाणिवेमुळे आपल्याला खूप आनंद होतो. पण यहोवा आपल्याला बुद्धी कशी देतो?

११. बुद्धी मिळवण्यासाठी आपण आणखी काय केलं पाहिजे?

११ यहोवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला बुद्धी देतो. (नीति. २:६) ती बुद्धी मिळवण्यासाठी आपण बायबलचा आणि बायबलवर आधारित प्रकाशनांचा अभ्यास केला पाहिजे. पण आपण फक्‍त अभ्यास करू नये, तर त्याप्रमाणे आपण वागलंही पाहिजे. योकोबने म्हटलं: “फक्‍त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.” (याको. १:२२) बायबलमध्ये दिलेला सल्ला आपण जीवनात लागू करतो तेव्हा आपण शांती राखण्याचा आणि इतरांशी समजूतदारपणे वागण्याचा प्रयत्न करतो. तसंच, आपण आणखी दयाळू बनतो. (याको. ३:१७) या गुणांमुळे आपल्याला कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी आणि आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल.

१२. बायबलचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे?

१२ देवाचं वचन एका आरशासारखं आहे. आपण कुठे कमी पडतो हे पाहायला आणि त्यात सुधारणा करायला ते आपल्याला मदत करतं. (याको. १:२३-२५) उदाहरणार्थ, आपल्याला कदाचित पटकन राग येत असेल. पण देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की आपल्याला त्यात सुधारणा करायची गरज आहे. यहोवाच्या मदतीने आपण शांत राहायला आणि आपल्या रागावर ताबा मिळवायला शिकू. त्यामुळे इतरांच्या वागण्यामुळे किंवा समस्यांमुळे आपल्याला कितीही राग आला तरी आपल्याला ती परिस्थिती शांतपणे हाताळता येईल. शिवाय, शांत राहिल्यामुळे आपल्याला स्पष्टपणे विचार करता येईल आणि योग्य निर्णय घेता येतील. (याको. ३:१३) खरंच, बायबलचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे!

१३. बायबलमध्ये दिलेल्या यहोवाच्या सेवकांच्या उदाहरणांचा आपण अभ्यास का केला पाहिजे?

१३ काही वेळा आपल्या हातून चूक होते तेव्हाच आपण धडा शिकतो. पण तोपर्यंत आपलं बरंच नुकसान झालेलं असतं. त्यामुळे बुद्धी मिळवण्याचा चांगला मार्ग म्हणजे इतरांनी केलेल्या चांगल्या कामातून आणि त्यांनी केलेल्या चुकांतून शिकणं. म्हणूनच याकोब आपल्याला अब्राहाम, राहाब, ईयोब आणि एलिया यांसारख्या लोकांच्या उदाहरणांतून शिकायचं प्रोत्साहन देतो. (याको. २:२१-२६; ५:१०, ११, १७, १८) यहोवाच्या या विश्‍वासू सेवकांनी अशा काही परीक्षांचा सामना केला ज्यांमुळे त्यांच्या जीवनातला आनंद नाहीसा होऊ शकला असता. पण यहोवाच्या मदतीने ते धीराने या परीक्षांचा सामना करू शकले. आपणसुद्धा यहोवाच्या मदतीने तेच करू शकतो.

१४-१५. मनात येणाऱ्‍या शंकांकडे आपण दुर्लक्ष का करू नये?

१४ कशामुळे आपला आनंद नाहीसा होऊ शकतो? मनात शंका निर्माण होतात तेव्हा.  काही वेळा बायबलमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत, किंवा आपण विचार केला होता त्याप्रमाणे कदाचित यहोवाने आपल्या प्रार्थनांचं उत्तर दिलं नसेल. त्यामुळे आपल्या मनात शंका निर्माण होऊ शकतात. या शंकांकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपला विश्‍वास कमजोर होऊ शकतो आणि यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येऊ शकतं. (याको. १:७, ८) इतकंच नाही, तर भविष्याबद्दलची आपली आशाही अंधूक होऊ शकते.

१५ प्रेषित पौलने आपल्या विश्‍वासाची तुलना जहाजाच्या नांगरासोबत केली. (इब्री ६:१९) समुद्रात वादळ येतं तेव्हा नांगरामुळे जहाज एका ठिकाणी स्थिर राहतं. ते भरकटत जाऊन खडकांवर आदळत नाही. पण जहाजाला जोडणारी नांगराची साखळी मजबूत असेल तरच फायदा आहे. त्या साखळीला जर गंज लागला तर ती कमजोर होऊन तुटू शकते. त्याचप्रमाणे आपल्या मनात शंका असतील तर देवाच्या अभिवचनांवरचा आपला विश्‍वास कमजोर होऊन नाहीसा होऊ शकतो. आणि विश्‍वास जर नाहीसा झाला तर आशाही उरणार नाही. याकोबने म्हटलं होतं: “शंका घेणारा वाऱ्‍याने इकडेतिकडे हेलकावणाऱ्‍या समुद्रातल्या लाटेसारखा आहे.” (याको. १:६) आणि मनात शंका घेणारा कधीही आनंदी राहू शकत नाही.

१६. आपल्या मनात जर शंका निर्माण झाल्या तर आपण काय केलं पाहिजे?

१६ आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? मनातल्या शंका लगेच दूर करा आणि आपला विश्‍वास मजबूत करा.  मनात शंका निर्माण झाल्या, तर त्या दूर करण्यासाठी लगेच पाऊल उचला. एलीया संदेष्ट्याच्या काळात यहोवाच्या लोकांच्या मनात आपल्या विश्‍वासांविषयी शंका होत्या. पण त्या दूर करण्यासाठी त्यांनी लगेच पाऊल उचललं नाही. त्यामुळे एलीया त्यांना म्हणाला: “तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार? जर यहोवा खरा देव असेल, तर त्याची उपासना करा; पण जर बआल खरा देव असेल, तर त्याच्यामागे जा!” (१ राजे १८:२१) यावरून दिसून येतं, की जर आपल्या मनात शंका निर्माण झाली, तर ती दूर करण्यासाठी आपण लगेच पाऊल उचललं पाहिजे. यहोवा हाच खरा देवा आहे, बायबल हे त्याचं वचन आहे आणि यहोवाचे साक्षीदार त्याचे लोक आहेत याची स्वतःला खातरी पटवून देण्यासाठी आपण संशोधन केलं पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:२१) असं केल्यामुळे आपल्या मनातल्या शंका दूर होतील आणि आपला विश्‍वास मजबूत होईल. याशिवाय, आपण मंडळीतल्या वडिलांचीही मदत घेऊ शकतो. यहोवाच्या सेवेतला आनंद जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, तर मनात येणाऱ्‍या शंका दूर करण्यासाठी आपण लगेच पाऊल उचललं पाहिजे.

१७. आपलं धैर्य खचलं तर काय होऊ शकतं?

१७ कशामुळे आपला आनंद नाहीसा होऊ शकतो? आपण निराश होतो तेव्हा.  बायबल म्हणतं: “दुःखाच्या प्रसंगी तू निराश झालास, तर तुझी शक्‍ती कमी पडेल.” (नीति. २४:१०) ‘निराश होणं’ यासाठी हिब्रू भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ ‘धैर्य खचणं’ असाही होतो. आणि आपलं धैर्य खचलं, तर आपला आनंदही लगेच नाहीसा होऊ शकतो.

१८. धीर धरणं म्हणजे काय?

१८ आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? धैर्यासाठी यहोवावर विसंबून राहा.  परीक्षांचा धीराने सामना करण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज असते. (याको. ५:११) ‘धीर धरणं’ यासाठी मूळ भाषेत याकोबने जो शब्द वापरला आहे त्यावरून आपल्या मनात अशा एका व्यक्‍तीचं चित्र निर्माण होतं जी ठामपणे आपल्या जागी उभी असते. जसा एक सैनिक युद्धभूमीवर ठामपणे उभा असतो. शत्रू हल्ला करतो तेव्हा तो धैर्याने त्याचा सामना करतो. शत्रूला पाठ दाखवून तो पळून जात नाही.

१९. प्रेषित पौलच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१९ धैर्य आणि धीर दाखवण्याच्या बाबतीत प्रेषित पौलने खूप चांगलं उदाहरण मांडलं. काही वेळी आपल्या परीक्षांमुळे त्याला खूप कमजोर असल्यासारखं वाटलं. पण यहोवावर विसंबून राहिल्यामुळे त्या परीक्षांचा धीराने सामना करायची ताकद त्याला मिळाली. (२ करिंथ. १२:८-१०; फिलिप्पै. ४:१३) आपणसुद्धा नम्रपणे यहोवाकडे मदत मागितली, तर तो आपल्याही ताकद आणि धैर्य देईल.—याको. ४:१०.

यहोवासोबतची मैत्री घट्ट करा आणि आपला आनंद टिकवून ठेवा

२०-२१. आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

२० आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा यहोवा आपल्याला शिक्षा देत आहे असा आपण कधीही विचार करू नये. याबद्दल याकोब म्हणतो: “संकट येतं, तेव्हा ‘देव माझी परीक्षा घेतोय,’ असं कोणी म्हणू नये. कारण कोणीही वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा घेऊ शकत नाही आणि तोसुद्धा वाईट गोष्टींनी कोणाची परीक्षा घेत नाही.” (याको. १:१३) या गोष्टीवर जर आपला पक्का विश्‍वास असेल, तर यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होईल.—याको. ४:८.

२१ यहोवाने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना परीक्षांचा सामना करायला मदत केली. आणि बायबल म्हणतं, की यहोवा “कधीही बदलत नाही.” (याको. १:१७) त्यामुळे तो आज आपल्यालाही नक्कीच मदत करेल. म्हणून बुद्धी मिळवण्यासाठी आणि आपला विश्‍वास आणि धैर्य वाढवण्यासाठी यहोवाकडे कळकळून विनंती करा. तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्की देईल. आणि त्यामुळे तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की परीक्षांचा सामना करत असतानाही आनंदी राहायला तो तुम्हाला मदत करेल.

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

^ परि. 5 परीक्षांचा सामना कसा करायचा याबद्दल याकोबच्या पुस्तकात बरेच व्यावहारिक सल्ले दिले आहेत. त्यांपैकी काहींची चर्चा या लेखात आपण करू या. संकटांचा सामना करतानाही आनंदाने यहोवाची सेवा करायला हे सल्ले आपल्याला मदत करतील.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: पोलीस एका भावाला त्याच्या घरातून अटक करून नेत आहेत. ते जात असताना त्याची बायको आणि मुलगी त्यांच्याकडे पाहत आहेत. पती तुरुंगात असताना मंडळीतले भाऊबहीण त्या दोघींसोबत मिळून यहोवाची उपासना करत आहेत. या परीक्षेचा धीराने सामना करण्यासाठी आई आणि मुलगी वारंवार यहोवाला प्रार्थना करून शक्‍ती मागत आहेत. यहोवा त्यांना मनाची शांती आणि धैर्य देतो. यामुळे त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होतो. आणि या परीक्षेचा त्या आनंदाने सामना करू शकतात.