व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ६

“प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे”

“प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे”

“प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे.”—१ करिंथ. ११:३.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

सारांश *

१. लग्नाचा विचार करणाऱ्‍या बहिणीने स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

आपण सगळे येशू ख्रिस्ताच्या अधीन आहोत. तो एक परिपूर्ण मस्तक आहे. एका ख्रिस्ती बहिणीचं लग्न होतं, तेव्हा तिचा पती तिचं मस्तक बनतो. तो अपरिपूर्ण असल्यामुळे त्याला अधीन राहणं तिला कधीकधी कठीण जाऊ शकतं. जेव्हा ती एखाद्याशी लग्न करायचा विचार करते तेव्हा तिने स्वतःला असे काही प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘मी ज्या भावाशी लग्न करायचा विचार करते तो एक चांगला कुटुंबप्रमुख होईल असं का म्हणता येईल? तो त्याच्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतो का? नसेल, तर लग्नानंतर माझी आध्यात्मिकता टिकवून ठेवायला मला तो मदत करेल हे मी कशावरून म्हणू शकते?’ पण यासोबतच एका बहिणीने स्वतःला हेही प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘माझ्यामध्ये असे कोणते गुण आहेत ज्यांमुळे लग्नानंतर आम्हा दोघांनाही फायदा होईल? मी सहनशील आणि मोठ्या मनाची आहे का? यहोवासोबत माझी घनिष्ठ मैत्री आहे का?’ (उप. ४:९, १२) एका बहिणीने जर लग्नआधी चांगले निर्णय घेतले, तर लग्नानंतर तिचं वैवाहिक जीवन सुखी आणि यशस्वी होईल.

२. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आपल्या पतीच्या अधीन राहण्याच्या बाबतीत आज आपल्या बऱ्‍याच बहिणींनी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्यासाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे. अशा विश्‍वासू बहिणींसोबत मिळून यहोवाची सेवा करणं एक आनंदाची गोष्ट आहे. या लेखात आपण तीन प्रश्‍नांवर चर्चा करू या: (१) पत्नींना कोणत्या काही समस्यांचा सामना करावा लागतो? (२) पत्नी आपल्या पतीच्या अधीन का राहते? (३) पती-पत्नी अधीनता दाखवण्याच्या बाबतीत येशू, अबीगईल आणि येशूची आई मरीया यांचं अनुकरण कसं करू शकतात?

पत्नींना कोणत्या काही समस्यांचा सामना करावा लागतो?

३. विवाहात समस्या का येतात?

विवाहाची व्यवस्था ही यहोवाकडून असलेली एक परिपूर्ण व्यवस्था आहे. पण आज मानव अपरिपूर्ण आहेत. (१ योहा. १:८) म्हणून विवाहित जोडप्यांना त्यांच्या जीवनात बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, बायबलमध्ये म्हटलं आहे, की “त्यांना शारीरिक दुःखं सहन करावी लागतील.” (१ करिंथ. ७:२८) पत्नींना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यांतल्या काही समस्यांवर आता आपण चर्चा करूयात?

४. एका पत्नीला आपल्या पतीच्या अधीन राहणं कमीपणाचं का वाटू शकतं?

एक पत्नी ज्या संस्कृतीत वाढली आहे त्यामुळे तिला पतीच्या अधीन राहणं कमीपणाचं वाटू शकतं. याबद्दल अमेरिकेत राहणारी मॅरीसोल नावाची बहीण म्हणते: “लहानपणापासून आम्हाला असं शिकवलं जायचं, की प्रत्येक कामात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीचं असलं पाहिजे. मला माहीतय, की यहोवाने पुरुषाला कुटुंबाचं मस्तक बनवलंय. आणि पत्नीने त्याच्या अधीन राहावं अशी तो तिच्याकडून अपेक्षा करतो. पण कुटुंबात तिला आदर मिळावा असंही त्याला वाटतं. पण लहानपणापासून मी जे काही शिकत आले, त्यामुळे मला माझ्या पतीच्या अधीन राहणं अवघड जातं.”

५. काही पती आपल्या पत्नीबद्दल कसा विचार करतात?

याच्या अगदी उलट, पुरुषांना असं वाटू शकतं, की स्त्रिया या त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या आहेत. याबद्दल दक्षिण अमेरिकेत राहणारी इविऑन नावाची बहीण असं म्हणते: “आमच्या इथे आधी पुरुष जेवतात आणि मग स्त्रिया जेवतात. मुलींना लहानपणापासूनच स्वयंपाक आणि घरातली कामं शिकवली जातात. आणि मुलं ‘हुकूमशाही’ करतात. इतकंच नाही, तर आई आणि बहिणी त्यांच्या फरमाइशी पूर्ण करतात.” स्त्रियांच्या दर्जाबद्दल आशियामध्ये राहणारी इंगलिंग नावाची बहीण अशी म्हणते: “आमच्या चीनी भाषेत अशी एक म्हण आहे जिचा अर्थ असा होतो, की स्त्रियांनी फक्‍त चूल आणि मूल पाहावं. इतर कामात त्यांनी जास्त डोकं लावू नये. त्यांना आपल्या पतीसमोर आपली मतं व्यक्‍त करायची परवानगी नसते.” पण अशी मनोवृत्ती बायबलच्या तत्त्वांनुसार नाही. अशा वागणुकीमुळे एक पती आपल्या पत्नीचं जगणं मुश्‍कील करतो, यहोवाचं मन दुखावतो आणि येशूचं अनुकरण करत नाही.—इफिस. ५:२८, २९; १ पेत्र ३:७.

६. यहोवासोबत आपलं नातं घनिष्ठ करण्यासाठी पत्नीने काय करण्याची गरज आहे?

आधीच्या लेखात आपण पाहिलं, की पतीने आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक, भावनिक आणि रोजच्या गरजा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा यहोवा त्याच्याकडून करतो. (१ तीम. ५:८) पण पत्नीनेसुद्धा आपली आध्यात्मिकता टिकून ठेवण्यासाठी आपल्या कामातून वेळ काढला पाहिजे. तिने दररोज बायबलचं वाचन केलं पाहिजे, त्यावर मनन केलं पाहिजे आणि यहोवाला मनापासून प्रार्थना केली पाहिजे. या गोष्टी करणं तिला कठीण वाटू शकतं. पत्नींना घरातली भरपूर कामं असतात, त्यामुळे त्यांना असं वाटू शकतं, की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे शक्‍ती आणि वेळ उरत नाही. असं असलं, तरी त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी वेळातून वेळ काढणं महत्त्वाचं आहे. कारण यहोवाची अशी इच्छा आहे, की आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यासोबत असलेलं आपलं नातं घट्ट करावं.—प्रे. कार्यं १७:२७.

७. आपल्या पतीच्या अधीन राहायला एका पत्नीला कोणती गोष्ट मदत करेल?

एका पत्नीला आपल्या पतीच्या अधीन राहणं कठीण का जाऊ शकतं, याची बरीच कारणं आपण पाहिली. पण बायबल पतीचा आदर करायला का सांगतं याची कारणं तिने समजून घेतली, तर त्याच्या अधीन राहायला तिला सोपं जाईल.

एक पत्नी आपल्या पतीच्या अधीन का राहते?

८. इफिसकर ५:२२-२४ या वचनांत सांगितल्याप्रमाणे एक पत्नी आपल्या पतीच्या अधीन का राहते?

एक पत्नी आपल्या पतीच्या अधीन राहते, कारण यहोवाची तशीच इच्छा आहे.  (इफिसकर ५:२२-२४ वाचा.) आणि तिला त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. कारण तिला माहीत आहे की यहोवाचं तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि ज्या गोष्टी तिच्या भल्यासाठी आहेत त्याच गोष्टी तो तिला करायला सांगतो.—अनु. ६:२४; १ योहा. ५:३.

९. पत्नी आपल्या पतीच्या अधीन राहते तेव्हा तिच्या कुटुंबात कोणते चांगले परिणाम पाहायला मिळतात?  

आज जग स्त्रियांना पुरुषांची बरोबरी करायचं प्रोत्साहन देतं आणि पतीच्या अधीन राहणं ही कमीपणाची गोष्ट समजली पाहिजे असं विचार करायला लावतं. पण अशा विचारांना खतपाणी घालणारे लोक यहोवाला ओळखत नाहीत. यहोवा स्त्रियांना मौल्यवान समजतो आणि त्यामुळे त्यांना तो अशी कोणतीच आज्ञा देणार नाही, ज्यामुळे त्यांचा अपमान होईल किंवा त्यांना कमीपणा वाटेल. उलट, पतीच्या अधीन राहण्याच्या बाबतीत यहोवाने दिलेल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी ती मेहनत घेते तेव्हा तिच्या कुटुंबात शांती राहते. (स्तो. ११९:१६५) यामुळे घरातली प्रत्येक व्यक्‍ती म्हणजे, पती, पत्नी आणि मुलं सगळे आनंदी राहतात.

१०. कॅरलने जे म्हटलं त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१० पती अपरिपूर्ण असल्यामुळे त्याच्या हातून चुका होत असल्या तरीसुद्धा पत्नी त्याच्या अधीन राहते. कारण ती यहोवावर प्रेम करते आणि त्याचा आदर करते. दक्षिण अमेरिकेत राहणारी कॅरल नावाची बहीण म्हणते: “माझ्या पतीच्या हातून चुका होतील हे मला माहीत आहे. पण त्या वेळी मी कशी वागते यावरून दिसून येईल, की माझं यहोवासोबतचं नातं किती घनिष्ठ आहे. म्हणून मी माझ्या पतीच्या अधीन राहण्याचा खूप प्रयत्न करते. कारण यामुळे यहोवाचं मन आनंदी होतं.”

११. आपल्या पतीला माफ करण्यासाठी कोणती गोष्ट ॲनिसला मदत करते?

११ जेव्हा एखादा पती आपल्या पत्नीच्या भावनांची कदर करत नाही, तेव्हा पत्नीला आपल्या पतीचा आदर करणं आणि त्याच्या अधीन राहणं कठीण जाऊ शकतं. ॲनिस नावाच्या बहिणीसोबत असं होतं, तेव्हा ती काय करते याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “त्या वेळी मी माझ्या रागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते. मी हे नेहमी लक्षात ठेवते, की आपल्या सगळ्यांकडून चुका होतात. त्यामुळे मी यहोवासारखंच मोठ्या मनाने माझ्या पतीला क्षमा करते. असं केल्यामुळे मला मनाची शांती मिळते.” (स्तो. ८६:५) खरंच, एक पत्नी आपल्या पतीला मोठ्या मनाने माफ करते, तेव्हा तिला त्याच्या अधीन राहणं सोपं जातं.

बायबलमध्ये दिलेल्या उदाहरणांतून आपण काय शिकू शकतो?

१२. बायबलमध्ये कशा प्रकारच्या लोकांची उदाहरणं आहेत?

१२ काहींना असं वाटतं, की दुसऱ्‍यांच्या अधीन राहणारी व्यक्‍ती ही कमजोर असते. पण हे खरं नाही. कारण बायबलमध्ये अशा बऱ्‍याच लोकांची उदाहरणं आहेत जे इतरांच्या अधीन होते, पण त्याच वेळी ते धैर्यवानही होते. आता आपण त्यांतली काही उदाहरणं पाहू; जसं की येशू, अबीगईल आणि मरीया.

१३. येशू यहोवाच्या अधीन का राहतो? स्पष्ट करा.

१३ येशू नेहमी यहोवाच्या अधीन राहतो. पण याचा अर्थ असा नाही, की तो बुद्धिमान नाही किंवा त्याच्याकडे काही कौशल्यं नाहीत. पृथ्वीवर असताना येशूची शिकवण्याची पद्धत सोपी आणि स्पष्ट होती. यावरून दिसून येतं, की तो खूप बुद्धिमान आहे. (योहा. ७:४५, ४६) यहोवाला माहीत होतं, की येशू आपल्या कामात खूप कुशल आहे. म्हणूनच या संपूर्ण विश्‍वाची सृष्टी करताना यहोवाने येशूला आपल्यासोबत घेतलं. (नीति. ८:३०; इब्री १:२-४) आणि इतकंच नाही, तर येशूचं पुनरुत्थान झाल्यापासून यहोवाने “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार” त्याला दिला आहे. (मत्त. २८:१८) पण येशू आपल्या कामात इतका कुशल असला, तरी मार्गदर्शनासाठी तो यहोवावर विसंबून राहतो. कारण त्याचं आपल्या पित्यावर प्रेम आहे.—योहा. १४:३१.

१४. (क) पती यहोवाकडून काय शिकू शकतो? (ख) नीतिवचनं ३१ मध्ये दिलेल्या माहितीवरून एक पती काय शिकू शकतो?

१४ पती काय शिकू शकतो?  हे खरं आहे, की यहोवाने पत्नीला आपल्या पतीच्या अधीन राहायला सांगितलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की यहोवा स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी महत्त्व देतो. कारण येशूसोबत राज्य करण्यासाठी स्वतः यहोवाने पुरुषांसोबत स्त्रियांचीही निवड केली आहे. (गलती. ३:२६-२९) यहोवाने येशूला अधिकार देऊन दाखवून दिलं, की त्याला त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. त्याच प्रकारे एक समंजस पती आपल्या पत्नीला काही अधिकार देईल. बायबल म्हणतं, की एक चांगली आणि कुशल पत्नी बरीच कामं करते. उदाहरणार्थ, ती घरातली कामं पाहते, जमिनीची खरेदी-विक्री करते आणि कुटुंबाच्या फायद्यासाठी व्यवसायही करते. (नीतिवचनं ३१:१५, १६, १८ वाचा.) एक चांगला पती आपल्या पत्नीला मोलकरीण समजत नाही. किंवा तिला आपलं मत मांडण्याचा हक्क नाही असाही तो विचार करत नाही. उलट तो तिच्यावर भरवसा ठेवतो आणि तिचं म्हणणं ऐकूनही घेतो. (नीतिवचनं ३१:११, २६, २७ वाचा.) जर पती अशा प्रकारे आपल्या पत्नीशी वागला, तर त्याची पत्नी आनंदाने त्याच्या अधीन राहील.

येशू यहोवाच्या अधीन होता. त्याच्या उदाहरणातून एक पत्नी काय शिकू शकते? (परिच्छेद १५ पाहा)

१५. एक पत्नी येशूच्या उदाहरणातून काय शिकू शकते?

१५ पत्नी काय शिकू शकते?  येशूने बरीच मोठमोठी कामं केली. तरी त्याला यहोवाच्या अधीन राहणं कमीपणाचं वाटलं नाही. (१ करिंथ. १५:२८; फिलिप्पै. २:५, ६) त्याचप्रमाणे एक कुशल पत्नी आपल्या पतीच्या अधीन राहण्याला कमीपणाचं समजणार नाही. आपल्या पतीवर प्रेम असल्यामुळे ती नेहमी त्याला साथ देते. पण आपल्या पतीला साथ देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिचं यहोवावर प्रेम आहे आणि ती त्याचा आदर करते.

दावीद आणि त्याच्या माणसांसाठी अन्‍नसामग्री पाठवल्यावर अबीगईल स्वतः दावीदकडे जाते. मग त्याला नमन करत ती अशी विनंती करते, की त्याने बदला घेऊन स्वतःवर रक्‍तदोष ओढवून घेऊ नये. (परिच्छेद १६ पाहा)

१६. १ शमुवेल २५:३, २३-२८ या वचनांनुसार अबीगईलला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१६ आता आपण अबीगईलचं  उदाहरण पाहू या. तिच्या पतीचं नाव नाबाल होतं. तो स्वार्थी आणि गर्विष्ठ होता. आणि त्याला उपकारांची जाण नव्हती. एकदा दावीद आणि त्याची माणसं नाबालचा जीव घ्यायला येत होती. अशा वेळी अबीगईल गप्प राहू शकली असती आणि विवाहाच्या बंधनातून मुक्‍त होऊ शकली असती. पण तिने तसं केलं नाही. उलट आपल्या पतीचं आणि आपल्या संपूर्ण घराण्याचं रक्षण करण्यासाठी तिने काही व्यावहारिक पावलं उचलली. ती दावीदला भेटायला गेली. आणि ४०० सैनिकांसमोर तिने दावीदला विनंती केली, की त्याने नाबालचा जीव घेऊ नये. तसंच, आपल्या पतीच्या वतीने तिने त्याच्याकडे माफी मागतली. हे सगळं करण्यासाठी तिला किती धैर्य लागलं असेल याचा विचार करा. (१ शमुवेल २५:३, २३-२८ वाचा.) दावीदने मान्य केलं, की आपल्या हातून गंभीर पाप घडू नये म्हणून आपल्याला सल्ला देण्यासाठी यहोवाने या धैर्यवान स्त्रीचा वापर केला.

१७. दावीद आणि अबीगईलच्या अहवालातून एक पती काय शिकू शकतो?

१७ पती काय शिकू शकतो?  अबीगईल एक समजूतदार स्त्री होती. आणि तिचा सल्ला ऐकून दावीदनेही समंजसपणा दाखवला. त्यामुळे तो रक्‍ताच्या दोषापासून वाचला. त्याच प्रकारे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा पतीने आपल्या पत्नीचा सल्ला विचारात घेतला पाहिजे. असं केल्यामुळे तो चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचू शकतो.

१८. अबीगईलच्या उदाहरणातून एक पत्नी काय शिकू शकते?

१८ पत्नी काय शिकू शकते?  एका पत्नीचं यहोवावर प्रेम असेल आणि त्याच्याबद्दल तिला आदर असेल, तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होऊ शकतो; मग तिचा पती सत्यात नसला किंवा देवाच्या स्तरांनुसार जगत नसला तरीही. अबीगईलप्रमाणे ती आपल्या विवाहाचं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. या बंधनापासून मुक्‍त होण्यासाठी ती मार्ग शोधणार नाही. उलट ती आपल्या पतीच्या अधीन राहील आणि त्याचा आदर करेल. तिच्या अशा वागण्यामुळे कदाचित तिचा पती यहोवाबद्दल शिकू लागेल. (१ पेत्र ३:१, २) तिचा पती जरी सत्यात आला नाही, तरी ती आपल्या पतीच्या अधीन राहिली आणि त्याला विश्‍वासू राहिली हे पाहून यहोवाला नक्कीच आनंद होईल.

१९. अशा कोणत्या परिस्थिती आहेत जेव्हा एक पत्नी आपल्या पतीचं ऐकणार नाही?

१९ पण जर एखादा पती आपल्या पत्नीला बायबलच्या नियमांविरुद्ध किंवा तत्त्वांविरुद्ध काही करायला सांगत असेल तर काय? जसं की, सत्यात नसलेला तिचा पती जर तिला खोटं बोलायला, चोरी करायला किंवा यहोवाच्या दृष्टीने चुकीचं असलेलं काम करायला सांगत असेल तर काय? अशा वेळी एक ख्रिस्ती बहीण आपल्या पतीचं ऐकणार नाही. कारण तिने सगळ्यात आधी आपल्या देवाची, यहोवाची आज्ञा पाळली पाहिजे. आणि सगळ्याच ख्रिश्‍चनांकडून हीच अपेक्षा केली जाते. त्यामुळे एखाद्या बहिणीसमोर अशी परिस्थिती येते, तेव्हा तिने प्रेमाने, पण स्पष्टपणे आपल्या पतीला हे समजावून सांगितलं पाहिजे, की ती ही गोष्ट का करू शकत नाही.—प्रे. कार्यं ५:२९.

परिच्छेद २० पाहा *

२०. मरीयाची यहोवासोबत जवळची मैत्री होती असं आपण का म्हणू शकतो?

२० आता आपण मरीयाचं  उदाहरण पाहू या. यहोवासोबत तिची खूप जवळची मैत्री होती. आणि शास्त्रवचनांचंही तिला खूप चांगलं ज्ञान होतं. हे कशावरून म्हणता येईल? कारण ती जेव्हा अलीशिबाशी, म्हणजे बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या आईशी बोलत होती, तेव्हा तिने हिब्रू शास्त्रवचनांतल्या २० पेक्षा जास्त वचनांचा उल्लेख केला. (लूक १:४६-५५) याशिवाय आणखी एका गोष्टीचा विचार करा. मरीयाचं योसेफसोबत लग्न ठरलं होतं. पण तरीसुद्धा यहोवाचा स्वर्गदूत सगळ्यात आधी त्याच्याशी नाही, तर मरीयाशी बोलला आणि ती देवाच्या मुलाला जन्म देईल असं तिला सांगितलं. (लूक १:२६-३३) कारण यहोवा मरीयाला जवळून ओळखत होता आणि ती आपल्या मुलाची खूप चांगली काळजी घेईल याबद्दल त्याला पूर्ण भरवसा होता. मरीयाची यहोवासोबत जी जवळची मैत्री होती ती पुढेही तशीच टिकून राहिली; अगदी येशूचा मृत्यू झाला आणि त्याचं पुनरुत्थान होऊन तो स्वर्गात गेला त्यानंतरही.—प्रे. कार्यं १:१४.

२१. बायबलमध्ये मरीयाबद्दल जे सांगितलं आहे त्यावरून एक पती काय शिकू शकतो?

२१ पती काय शिकू शकतो?  आपल्या पत्नीला शास्त्रवचनांचं चांगलं ज्ञान आहे या गोष्टीचा एका पतीला आनंदच होतो. त्याला तिचा मुळीच हेवा वाटत नाही किंवा ती कुटुंबाचं मस्तक बनायचा प्रयत्न करत आहे असाही तो कधी विचार करत नाही. कारण आपल्या पत्नीला जर बायबलचं आणि बायबलच्या तत्त्वांचं चांगलं ज्ञान असेल, तर त्याचा कुटुंबाला फायदाच होईल याची त्याला जाणीव असते. पण पत्नीला जरी बायबलचं चांगलं ज्ञान असलं आणि ती आपल्या पतीपेक्षा जास्त शिकलेली असली, तरी कौटुंबिक उपासनेत आणि कुटुंबाच्या इतर आध्यात्मिक गोष्टींत पुढाकार घ्यायची जबाबदारी ही पतीचीच आहे.—इफिस. ६:४.

अभ्यास आणि मनन करण्याच्या बाबतीत एक पत्नी मरीयाकडून काय शिकू शकते? (परिच्छेद २२ पाहा) *

२२. मरीयाच्या उदाहरणातून एक पत्नी काय शिकू शकते?

२२ पत्नी काय शिकू शकते?  कुटुंबाची आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यात पती जरी पुढाकार घेत असला, तरी आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःसुद्धा मेहनत घेतली पाहिजे या गोष्टीची एका पत्नीला जाणीव असते. (गलती. ६:५) आणि त्यासाठी वैयक्‍तिक अभ्यास करण्याकरता आणि मनन करण्याकरता तिने वेळ काढला पाहिजे. त्यामुळे तिच्या मनात यहोवाबद्दलचं प्रेम आणि आदर टिकून राहील. आणि आनंदाने आपल्या पतीच्या अधीन राहायला तिला मदत होईल.

२३. स्त्रिया आपल्या पतीच्या अधीन राहतात तेव्हा त्यांना स्वतःला, त्यांच्या कुटुंबाला आणि मंडळीला कसा फायदा होतो?

२३ आपल्या पतीच्या अधीन राहून स्त्रिया दाखवून देतात, की यहोवावर त्यांचं खूप प्रेम आहे. ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या अधीन राहत नाहीत, त्यांच्या तुलनेत या स्त्रिया जास्त सुखी आणि समाधानी असतात. याशिवाय, तरुण मुला-मुलींसाठी त्या एक चांगलं उदाहरण मांडतात. आणि फक्‍त कुटुंबातच नाही, तर मंडळीतसुद्धा त्या प्रेमाचं आणि शांतीचं वातावरण टिकवून ठेवतात. (तीत २:३-५) आज यहोवाच्या विश्‍वासू सेवकांमध्ये स्त्रियांची संख्या सगळ्यात जास्त आहे. (स्तो. ६८:११) असं असलं, तरी आपण सगळेच मंडळीतला आनंद वाढवण्यासाठी हातभार लावू शकतो. तो कसा, ते आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ३६ “देवाने जे जोडले”

^ परि. 5 पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहावं अशी यहोवाने व्यवस्था केली आहे. पती-पत्नी दोघंही या व्यवस्थेचा आदर कसा करू शकतात? अधीनता दाखवण्याच्या बाबतीत येशूने आणि बायबल काळातल्या काही स्त्रियांनी खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्यांच्यापासून आज पती-पत्नी काय शिकू शकतात, ते आता आपण पाहू या.

^ परि. 68 चित्रांचं वर्णन: बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानची आई अलीशिबा हिच्याशी बोलताना मरीयाने हिब्रू शास्त्रवचनांतल्या कितीतरी उताऱ्‍यांचा उल्लेख केला. तिला ते उतारे तोंडपाठ होते.

^ परि. 70 चित्रांचं वर्णन: आपला विश्‍वास मजबूत ठेवण्याकरता एक ख्रिस्ती पत्नी बायबलचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढते.