व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ७

“बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक”

“बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक”

“माझ्या ज्ञानाकडे आपलं मन लाव आणि बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक.”—नीति. २२:१७.

गीत ४३ अविचल सावध व बलशाली!

सारांश *

१. आपल्याला सल्ल्याची गरज केव्हा पडू शकते, आणि आपण तो का स्वीकारला पाहिजे?

 आपल्या सर्वांनाच स्वतःमध्ये सुधारणा कराव्या लागतात. आणि त्यासाठी वेळोवेळी आपल्याला सल्ल्याची गरज असते. कधीकधी आपण स्वतःहून एखाद्याकडे सल्ला मागतो. तर काही वेळा आपण “चुकीचं पाऊल” उचलण्याआधी एखादा भाऊ काळजीपोटी आपल्याला सावध करतो. त्यामुळे पुढे आपल्यावर पस्तावा करायची वेळ येत नाही. (गलती. ६:१) आणि कधीकधी आपल्याकडून एखादी गंभीर चूक झाली, तर ती सुधारण्यासाठी आपल्याला कडक शब्दांत सल्ला दिला जातो. सल्ला कोणत्याही कारणासाठी असो, आपण तो ऐकला पाहिजे. कारण त्यामुळे आपलं भलं होतं आणि आपला जीवही वाचू शकतो!—नीति. ६:२३.

२. नीतिवचनं १२:१५ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सल्ल्याकडे का लक्ष दिलं पाहिजे?

या लेखाच्या मुख्य वचनात आपल्याला ‘बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐकण्याचं’ प्रोत्साहन दिलं आहे. (नीति. २२:१७) आपल्यापैकी असं कोणीही नाही, ज्याला सगळं काही माहीत आहे आणि ज्याला सल्ल्याची गरज पडत नाही. असा कोणी ना कोणी असतोच ज्याला आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आणि अनुभव असतो. (नीतिवचनं १२:१५ वाचा.) त्यामुळे आपण सल्ला स्वीकारतो तेव्हा त्यावरून दिसून येतं, की आपण नम्र आहोत आणि आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव आहे. तसंच, एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला मदतीची गरज आहे हे आपण ओळखतो, हेसुद्धा त्यावरून दिसून येतं. बुद्धिमान राजा शलमोनने देवाच्या प्रेरणेने असं लिहिलं: “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.”—नीति. १५:२२.

यांपैकी कोणत्या मार्गाने मिळालेला सल्ला स्वीकारणं तुम्हाला कठीण जातं? (परिच्छेद ३-४ पाहा)

३. आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने सल्ला मिळू शकतो?

सल्ला आपल्याला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मिळू शकतो. प्रत्यक्षपणे मिळालेला सल्ला म्हणजे काय? कधीकधी असं होऊ शकतं, की मंडळीतला एखादा वडील किंवा एखादा अनुभवी भाऊ आपल्याला अशी एखादी गोष्ट दाखवून देईल ज्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. याला आपण प्रत्यक्षपणे किंवा थेटपणे  मिळालेला सल्ला म्हणू शकतो. कोणी जर काळजीपोटी आणि प्रेमापोटी आपल्याला बायबलमधून सल्ला देत असेल, तर त्या गोष्टीची कदर करून आपण तो ऐकला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. पण मग अप्रत्यक्षपणे मिळालेला सल्ला म्हणजे काय? बायबल वाचताना किंवा आपलं एखादं प्रकाशन वाचताना आपण असं काहीतरी वाचतो ज्यामुळे आपल्या लक्षात येतं, की आपल्याला कुठेतरी बदल करायची गरज आहे. मग आपण थांबून विचार करतो आणि स्वतःमध्ये बदल करतो. (इब्री ४:१२) यालाच अप्रत्यक्षपणे  मिळालेला सल्ला म्हणता येईल.

४. उपदेशक ७:९ प्रमाणे आपल्याला सल्ला मिळतो तेव्हा कोणती गोष्ट आपण करू नये?

हे खरं आहे, की थेटपणे दिलेला किंवा प्रत्यक्षपणे दिलेला सल्ला स्वीकारणं आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं. आणि अशा वेळी आपल्याला रागसुद्धा येऊ शकतो. असं का होतं? आपण अपरिपूर्ण आहोत हे आपल्याला माहीत असलं, तरी कोणी आपली विशिष्ट चूक दाखवून देतो तेव्हा मात्र आपल्याला त्याचं ऐकणं कठीण जाऊ शकतं. (उपदेशक ७:९ वाचा.) अशा वेळी, आपण कदाचित सफाई देण्याचा प्रयत्न करू किंवा सल्ला देणाऱ्‍याच्या हेतूंवर शंका घेऊ. किंवा मग, त्याने आपल्याला ज्या पद्धतीने सल्ला दिला त्याचा कदाचित आपल्याला राग येईल. किंवा जो आपल्याला सल्ला देतोय त्याच्याच चुका दाखवायचा आपण प्रयत्न करू. आपण कदाचित असा विचार करू, ‘तो स्वतःच इतक्या चुका करतोय, त्याला काय अधिकार आहे मला सल्ला द्यायचा?’ शेवटी, त्याचा सल्ला पटत नसल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू आणि अशा व्यक्‍तीकडून सल्ला घ्यायचा प्रयत्न करू ज्याचा सल्ला आपल्याला आवडेल.

५. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या लेखात आपण अशा काही लोकांची उदाहरणं पाहू ज्यांनी सल्ला स्वीकारला नाही. तसंच, अशाही काही लोकांची उदाहरणं पाहू, ज्यांनी सल्ला स्वीकारला. शिवाय, सल्ला मिळतो तेव्हा तो स्वीकारण्यासाठी आणि त्यापासून फायदा करून घेण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल, हेसुद्धा आपण पाहू या.

ज्यांनी सल्ला स्वीकारला नाही

६. रहबाम राज्याच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

रहबामच्या  उदाहरणाचा विचार करा. जेव्हा तो इस्राएलचा राजा बनला तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका गोष्टीची विनंती केली. त्याच्या वडिलांनी, म्हणजे शलमोन राजाने लोकांवर कामाचा जो भार लादला होता तो कमी करायची विनंती केली. हे ऐकून, रहबामने सुरुवातीला एक चांगली गोष्ट केली. त्याने वडीलधाऱ्‍या माणसांचा सल्ला घेतला. तेव्हा ते त्याला म्हणाले, की ‘तू या लोकांची विनंती मान्य करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलंस, तर ते आयुष्यभर तुझे सेवक होऊन राहतील.’ (१ राजे १२:३-७) पण असं दिसतं, की रहबामला त्यांचा सल्ला पटला नाही. म्हणून ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला होता, त्यांचा सल्ला त्याने घेतला. हे लोक जवळपास चाळीस-एक वर्षांचे होते. त्यामुळे त्यांना नक्कीच थोडाफार अनुभव असेल. (२ इति. १२:१३) पण या वेळी त्यांनी रहबामला दिलेला सल्ला बरोबर नव्हता. त्यांनी त्याला लोकांवरचा कामाचा भार आणखी वाढवायचा सल्ला दिला. (१ राजे १२:८-११) अशा प्रकारे दोन वेगवेगळे सल्ले मिळाल्यानंतर रहबामने खरंतर यहोवाला प्रार्थना करायला हवी होती. आणि मी कोणत्या सल्ल्याप्रमाणे काम करू असं विचारायला हवं होतं. पण त्याने तसं काहीही केलं नाही. उलट, ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला त्यांचा सल्ला त्याला आवडल्यामुळे त्याने त्याप्रमाणे काम करायचं ठरवलं. पण रहबामला आणि इस्राएली लोकांना त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागले. आपल्या बाबतीत काय? आपल्यालाही नेहमीच आपल्याला आवडतील असे सल्ले मिळणार नाहीत. पण ते जर देवाच्या वचनावर आधारित असतील तर आपण ते स्वीकारले पाहिजेत.

७. उज्जीया राज्याच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

उज्जीया राजानेही  सल्ला स्वीकारला नाही. यहोवाच्या मंदिरातल्या ज्या भागात फक्‍त याजकांना जायची परवानगी होती, तिथे तो गेला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळायचा प्रयत्न केला. तेव्हा याजकांनी त्याला अडवून असं म्हटलं: “उज्जीया, यहोवासाठी धूप जाळणं हे तुझं काम नाही! फक्‍त याजकांनीच धूप जाळला पाहिजे.” मग उज्जीयाने काय केलं? त्याने जर नम्रपणे त्यांचा सल्ला ऐकला असता आणि लगेच मंदिरातून बाहेर आला असता, तर यहोवाने कदाचित त्याला माफ केलं असतं. पण उज्जीयाने त्यांचं ऐकलं नाही, उलट “उज्जीयाचा राग त्यांच्यावर खूप भडकला.” पण त्याने याजकांचा सल्ला का स्वीकारला नाही? त्याला बहुतेक असं वाटलं असावं, की आपण राजा असल्यामुळे काय वाटेल ते करू शकतो. त्याच्या अशा गर्विष्ठ वागण्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला आणि तो “मरेपर्यंत कुष्ठरोगीच राहिला.” (२ इति. २६:१६-२१) उज्जीयाच्या उदाहरणावरून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपल्याकडे कितीही मोठी जबाबदारी असली, तरी बायबलमधून दिलेला सल्ला आपण स्वीकारला पाहिजे; नाहीतर आपण यहोवाची मर्जी गमावून बसू.

ज्यांनी सल्ला स्वीकारला

८. ईयोबची चूक सुधारण्यात आली आणि त्याला सल्ला देण्यात आला तेव्हा त्याने काय केलं?

बायबलमध्ये अशाही काही लोकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी सल्ला स्वीकारला आणि त्यामुळे देवाने त्यांना आशीर्वाद दिला. ईयोबचंच  उदाहरण घ्या. तो देवाचा विश्‍वासू सेवक असला, तरी तो काही परिपूर्ण नव्हता. तो कठीण परिस्थितीतून जात असताना त्याच्या तोंडून काही चुकीच्या गोष्टी निघाल्या. त्यामुळे अलीहू आणि यहोवाने कडक शब्दांत त्याची चूक सुधारली. मग ईयोबने काय केलं? त्याने नम्रपणे आपली चूक मान्य केली. तो म्हणाला, ‘मी अशा गोष्टींबद्दल बोललो ज्यांबद्दल मला काहीच कळत नाही. म्हणून मी आपले शब्द मागे घेतो आणि धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करतो.’ ईयोबने आपली चूक नम्रपणे मान्य केल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला.—ईयो. ४२:३-६, १२-१७.

९. सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत मोशेने कशा प्रकारे चांगलं उदाहरण मांडलं?

मोशेचंसुद्धा  आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे. त्याच्या हातून एकदा एक गंभीर चूक झाली. त्याने रागाच्या भरात इस्राएली लोकांसमोर देवाचा गौरव केला नाही. त्यामुळे तो वचन दिलेल्या देशात जाऊ शकला नाही. (गण. २०:१-१३) याबद्दल त्याने देवासमोर आपली नाराजी व्यक्‍त केली, तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “या विषयावर माझ्याशी पुन्हा कधी बोलू नकोस.” (अनु. ३:२३-२७) पण त्यामुळे मोशे रागावला का? नाही. उलट, यहोवाचा निर्णय त्याने मान्य केला, आणि म्हणून त्यानंतरही यहोवाने इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. (अनु. ४:१) खरंच, सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत ईयोब आणि मोशे या दोघांचंही आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण आहे. ईयोबने आपला चुकीचा दृष्टिकोन बदलला. त्याने कोणतीही सफाई दिली नाही. आणि मोशेच्या बाबतीत पाहिलं, तर वचन दिलेल्या देशात जाण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही, तरीसुद्धा तो यहोवाला विश्‍वासू राहिला. त्यावरून दिसून आलं, की यहोवाने त्याला कडक शब्दांत जो सल्ला दिला होता तो त्याने स्वीकारला.

१०. (क) नीतिवचनं ४:१०-१३ मध्ये सांगितल्याप्रमाणे सल्ला स्वीकारल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात? (ख) सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत काही भाऊबहिणींनी चांगलं उदाहरण कसं मांडलं?

१० आपण जेव्हा ईयोब आणि मोशे यांच्यासारख्या विश्‍वासू सेवकांच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करतो तेव्हा आपल्याला फायदाच होतो. (नीतिवचनं ४:१०-१३ वाचा.) आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींनी हे अनुभवलं आहे. काँगोमध्ये राहणाऱ्‍या ईमॅन्युएल नावाच्या एका भावाचंच उदाहरण घ्या. तो म्हणतो: “माझ्या मंडळीतल्या काही अनुभवी भावांच्या लक्षात आलं, की मी अशा एका मार्गावर होतो ज्यामुळे पुढे माझं यहोवासोबतचं नातं, धोक्यात आलं असतं. पण त्यांनी वेळीच माझी मदत केली. त्यांचा सल्ला ऐकल्यामुळे मी बऱ्‍याच प्रॉब्लेममधून वाचलो.” * सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत कॅनडामध्ये राहणारी मेगन नावाची एक पायनियर बहीण म्हणते: “मला नेहमीच आवडेल असा सल्ला मला मिळाला नाही. पण खरं पाहिलं तर त्या सल्ल्यामुळेच मला फायदा झाला.” तसंच, क्रोएशियामध्ये राहणारा मार्को म्हणतो: “हे खरंय, की काही कारणामुळे मंडळीतली माझी जबाबदारी काढून घेण्यात आली. पण त्या वेळेचा मी विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं, की सुधारण्यासाठी मला जो सल्ला देण्यात आला त्यामुळेच मला यहोवाच्या सेवेत पुन्हा सावरता आलं.”

११. सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत ब्रदर कार्ल क्लाईनने काय म्हटलं?

११ सल्ला स्वीकारल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो, हे ब्रदर कार्ल क्लाईन यांच्या उदाहरणावरून दिसून येतं. ब्रदर क्लाईन हे नियमन मंडळाचे सदस्य होते. आपल्या जीवनकथेत ते सांगतात, की एकदा ब्रदर रदरफर्डकडून त्यांना कडक शब्दांत सल्ला मिळाला होता. खरंतर ते दोघं चांगले मित्र होते. पण तरीही ब्रदर रदरफर्डनी त्यांना सल्ला दिला तेव्हा सुरुवातीला त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हणतात: “त्यानंतर ब्रदर रदरफर्ड मला भेटले तेव्हा ते स्माईल करून मला म्हणाले, ‘हॅलो, कार्ल!’ पण त्या गोष्टीचं मला अजूनही वाईट वाटत असल्यामुळे मी तोंडातल्या तोंडातच त्यांना ‘हॅलो’ म्हटलं. तेव्हा ते मला म्हणाले: ‘कार्ल, सांभाळ! सैतान तुझ्यावर टपलेला आहे.’ पण स्वतःचीच लाज वाटून मी म्हणालो: ‘नाई, नाई, तसं काय नाही ब्रदर!’ पण मला वाईट वाटलंय हे त्यांना दिसत होतं. आणि म्हणून ते पुन्हा मला म्हणाले: ‘ठीकए, तरी पण सांभाळ! सैतान तुझ्यावर टपलेला आहे.’ आणि ते किती खरं होतं! एखाद्या भावाने आपल्याला सल्ला दिला, आणि खासकरून तो द्यायचा त्याला अधिकार असेल, तर आपण त्याबद्दल कधीच वाईट वाटून घेऊ नये. कारण आपण जर मनात राग बाळगला तर सैतान सहज आपल्याला त्याच्या जाळ्यात अडकवू शकतो.” * (इफिस. ४:२५-२७) ब्रदर रदरफर्डने दिलेला सल्ला ब्रदर क्लाईनने स्वीकारला आणि त्यांच्यातली मैत्रीसुद्धा टिकून राहिली.

सल्ला स्वीकारण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल?

१२. नम्र राहिल्यामुळे आपल्याला सल्ला स्वीकारायला कशी मदत होऊ शकते? (स्तोत्र १४१:५)

१२ कोणती गोष्ट आपल्याला सल्ला स्वीकारायला मदत करेल? नम्रता  आपल्याला सल्ला स्वीकारायला मदत करेल. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण अपरिपूर्ण असल्यामुळे कधीकधी मूर्खासारखं वागू शकतो. आधी चर्चा केल्याप्रमाणे ईयोबचा दृष्टिकोन सुरुवातीला चुकीचा होता. पण नंतर त्याने आपला दृष्टिकोन सुधारला आणि त्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वादही दिला. ईयोबने आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या अलीहूचा सल्ला स्वीकारला आणि नम्र असल्याचं दाखवून दिलं. (ईयो. ३२:६, ७) कधीकधी आपल्याला सल्ला दिला जातो, तेव्हा आपल्याला असं वाटू शकतं, की ‘मला याची गरज नाही.’ किंवा सल्ला देणारा आपल्यापेक्षा लहान असल्यामुळे सल्ला स्वीकारणं आपल्याला कठीण वाटू शकतं. पण अशा वेळीही आपण ईयोबसारखं नम्र असलो, तर आपल्याला सल्ला स्वीकारायला मदत होईल. कॅनडामध्ये राहणारे एक वडील म्हणतात: “इतरजण आपल्यामध्ये जे पाहू शकतात ते आपण पाहू शकत नाही. त्यामुळे जर कोणी आपल्याला सल्लाच दिला नाही, तर आपल्याला प्रगती कशी करता येईल?” खरंच, आपल्या सगळ्यांनाच पवित्र शक्‍तीचे गुण वाढवायची आणि सेवाकार्यात प्रगती करत राहायची गरज आहे.—स्तोत्र १४१:५ वाचा.

१३. आपल्याला मिळणाऱ्‍या सल्ल्याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे?

१३ सल्ला देवाच्या प्रेमाचाच एक पुरावा आहे.  आपलं नेहमी भलं व्हावं असं यहोवाला वाटतं. (नीति. ४:२०-२२) त्यामुळे जेव्हा तो त्याच्या वचनातून, बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनांतून किंवा एखाद्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तीकडून आपल्याला सल्ला देतो, तेव्हा तो त्याच्या प्रेमाचाच एक पुरावा असतो. आणि म्हणूनच इब्री लोकांना १२:९, १० मध्ये म्हटलं आहे, तो जे काही करतो ते ‘आपल्या भल्यासाठीच’ असतं.

१४. सल्ला मिळतो तेव्हा आपण कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे?

१४ सल्ला कसा दिला आहे त्यापेक्षा काय दिला आहे याकडे लक्ष द्या.  काही वेळा आपल्याला असं वाटेल, की आपल्याला ज्या पद्धतीने सल्ला देण्यात आला ती पद्धत योग्य नव्हती. हे खरं आहे, की जो कोणी सल्ला देतो त्याने तो अशा पद्धतीने दिला पाहिजे, की समोरच्याला तो सहज स्वीकारता येईल. * (गलती. ६:१) आपल्याला जर कोणी सल्ला दिला तर तो आणखी चांगल्या प्रकारे देता आला असता असं म्हणण्याऐवजी, सल्ला काय आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण स्वत:ला विचारू शकतो: ‘सल्ला देण्याची पद्धत जरी मला बरोबर वाटत नसली, तरी त्यात काहीतरी तथ्य असू शकतं का? सल्ला देणाऱ्‍याच्या चुकांकडे लक्ष देण्याऐवजी मी त्याच्या सल्ल्याचा फायदा करून घेऊ शकतो का?’ आपल्याला मिळणाऱ्‍या सल्ल्यातून कसा फायदा करून घेता येईल ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे.—नीति. १५:३१.

सल्ला मागा आणि त्याचा फायदा करून घ्या

१५. आपण इतरांकडे सल्ला का मागितला पाहिजे?

१५ बायबल आपल्याला इतरांकडून सल्ला घेण्याचं प्रोत्साहन देतं. नीतिवचनं १३:१० मध्ये म्हटलं आहे: “जे सल्ला घेतात, ते बुद्धिमान असतात.” या वचनात जे म्हटलं आहे ते किती खरं आहे! कोणीतरी सल्ला देईपर्यंत वाट पाहत राहण्याऐवजी, जे स्वत:हून सल्ला मागतात ते चांगली आध्यात्मिक प्रगती करतात. म्हणून स्वत:हून इतरांकडे सल्ला मागा.

एक तरुण बहीण एका अनुभवी बहिणीचा सल्ला का घेत आहे? (परिच्छेद १६ पाहा)

१६. आपण कोणकोणत्या परिस्थितींत इतरांचा सल्ला घेऊ शकतो?

१६ अशा बऱ्‍याच परिस्थिती आहेत ज्यांमध्ये आपण इतरांकडे सल्ला मागू शकतो. जसं की, (१) समजा एखाद्या बहिणीने एका अनुभवी बहिणीला आपल्या बायबल अभ्यासाला बोलवलं असेल, तर ती आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत कुठे सुधारणा करता येईल याबद्दल तिला नंतर विचारू शकते. (२) एक तरुण बहीण जर एखादा ड्रेस खरेदी करत असेल, तर तो खरेदी करण्याआधी ती एखाद्या प्रौढ बहिणीला तिचं मत विचारू शकते. (३) एखादा भाऊ जर पहिल्यांदाच जाहीर भाषण देणार असेल, तर तो एका अनुभवी बांधवाला आधीच सांगू शकतो, की त्याने त्याचं भाषण ऐकल्यानंतर कुठे सुधारणा करायची ते त्याला सांगावं. अनेक वर्षांपासून भाषण देणारा भाऊसुद्धा अशा प्रकारे अनुभवी बांधवांकडून सल्ला घेऊ शकतो.

१७. मिळालेल्या सल्ल्याचा आपण कशा प्रकारे फायदा करून घेऊ शकतो?

१७ येणाऱ्‍या काही आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्ये आपल्या सर्वांनाच प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सल्ला मिळेल. जेव्हा असं होईल तेव्हा या लेखात शिकलेले मुद्दे लक्षात ठेवा. नम्र राहा. सल्ला कसा दिला जातो याकडे नाही, तर सल्ल्याकडे लक्ष द्या. तसंच, जो सल्ला दिला जाईल त्याप्रमाणे काम करा. आपल्यापैकी कोणीच जन्मापासून बुद्धिमान नाही. त्यामुळे आपण जर सल्ला ऐकला आणि शिक्षण स्वीकारलं तर आपण बुद्धिमान होऊ असं बायबल आपल्याला वचन देतं.—नीति. १९:२०.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

^ परि. 5 बायबलमधला सल्ला ऐकणं आणि त्याप्रमाणे चालणं किती महत्त्वाचं आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण तरीसुद्धा सल्ला स्वीकारणं कधीकधी आपल्याला कठीण जातं. असं का बरं? आणि मिळालेल्या सल्ल्यापासून आपल्याला फायदा व्हावा, म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

^ परि. 10 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 14 पुढच्या लेखात, समोरच्याला सहज स्वीकारता येईल अशा पद्धतीने आपण सल्ला कसा देऊ शकतो यावर चर्चा केली जाईल.