अभ्यास लेख ९
देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची कदर करा
“त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे.”—प्रे. कार्यं १७:२८.
गीत १४१ जीवन एक किमया
सारांश a
१. यहोवासाठी आपलं जीवन किती मौल्यवान आहे?
समजा तुमच्या मित्राने तुम्हाला एक सुंदर चित्र भेट म्हणून दिलं. ते चित्र एका प्रसिद्ध कलाकाराने काढलेलं अतिशय जुनं, पण तितकंच मौल्यवान आहे. ती एक अतिशय उत्कृष्ट कलाकृती आहे. पण त्या चित्रातले काही रंग थोडे फिके पडले आहेत, त्याला डाग लागले आहेत आणि त्या चित्राच्या कागदाला सुरकुत्या पडल्या आहेत. असं असलं तरी त्या चित्राची किंमत लाखांच्या घरात आहे. साहजिकच तुम्हाला त्या कलाकृतीची किंमत असल्यामुळे तुम्ही ती जिवापाड जपाल. त्याच प्रकारे, यहोवाने आपल्याला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान भेट दिली आहे. आणि ती भेट आहे जीवन. खरंतर त्याने त्याच्या मुलाचं जीवन आपल्यासाठी खंडणी म्हणून दिलं. आणि त्यावरून आपलं जीवन त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे हे त्याने दाखवून दिलं.—योहा. ३:१६.
२. २ करिंथकर ७:१ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
२ जीवनाचा उगम यहोवा आहे. (स्तो. ३६:९) प्रेषित पौलने ही गोष्ट मान्य केली आणि म्हटलं, की “त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे.” (प्रे. कार्यं १७:२५, २८) त्यामुळे आपण म्हणू शकतो की जीवन यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहे. आणि जिवंत राहण्यासाठी आपल्याला ज्या-ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी तो आपल्याला प्रेमळपणे पुरवतो. (प्रे. कार्यं १४:१५-१७) पण तो चमत्कारिक रितीने आपल्या जिवाचं संरक्षण करत नाही. उलट आपण आपल्या शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याची काळजी घ्यावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (२ करिंथकर ७:१ वाचा.) मग आपण आपल्या आरोग्याचं आणि आपल्या जिवाचं संरक्षण का केलं पाहिजे, आणि आपण ते कसं करू शकतो?
जीवनाला मौल्यवान समजा
३. आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे याचं एक कारण कोणतं आहे?
३ आपलं आरोग्य जपण्याचं एक कारण म्हणजे आपल्याला आपल्या पूर्ण शक्तीने यहोवाची सेवा करायची आहे. (मार्क १२:३०) आपण “आपली शरीरं जिवंत, पवित्र आणि देवाला स्वीकारयोग्य बलिदान म्हणून अर्पण करावीत,” अशी आपली इच्छा आहे. म्हणून आपल्या आरोग्याला हानिकारक असतील अशा गोष्टींपासून आपण दूर राहतो. (रोम. १२:१) हे खरंय की आपण कधी आजारीच पडणार नाही असं होणार नाही. पण आपलं आरोग्य जपण्यासाठी आपण जमेल ते करतो. कारण आपल्या स्वर्गातल्या पित्याने आपल्याला जे जीवन दिलंय, त्याबद्दल आपल्याला मनापासून कदर आहे.
४. दावीदची काय इच्छा होती?
४ दावीदलासुद्धा जीवनाच्या देणगीची कदर होती. त्याचं कारण सांगताना त्याने म्हटलं: “माझा मृत्यू झाला आणि मी कबरेत गेलो, तर काय उपयोग? माती तुझी स्तुती करेल का? ती तुझ्या विश्वासूपणाचं वर्णन करेल का?” (स्तो. ३०:९) दावीदने कदाचित त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात हे शब्द लिहिले असतील. पण तरीसुद्धा त्याला आपलं आरोग्य जपायची आणि आणखी जगायची इच्छा होती. कारण त्याला यहोवाची सेवा करायची होती. आपल्या सगळ्यांचीही तीच इच्छा आहे यात काही शंका नाही.
५. आपलं कितीही वय झालं असलं किंवा आपण कितीही आजारी असलो तरी आपण काय करू शकतो?
५ आजारपण आणि वाढत्या वयामुळे आपल्याला कदाचित आधीसारखी यहोवाची सेवा करणं शक्य नसेल. त्यामुळे कदाचित आपल्याला वाईट वाटेल आणि आपण निराश होऊ. पण म्हणून आपण खचून जाऊन आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. का बरं? कारण आपलं कितीही वय झालं किंवा आपण कितीही आजारी असलो तरी आपण दावीद राजाप्रमाणे यहोवाची स्तुती करू शकतो. खरंच, आपण अपरिपूर्ण असूनसुद्धा यहोवा आपली मनापासून कदर करतो, हा विचार किती दिलासा देणारा आहे! (मत्त. १०:२९-३१) आणि जरी आपला मृत्यू झाला तरी यहोवा आपल्याला पुन्हा उठवण्यासाठी आतुर आहे. (ईयो. १४:१४, १५) त्यामुळे आपल्या जिवात जीव आहे तोपर्यंत आपलं आरोग्य आणि आपलं जीवन जपायचा आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे.
हानिकारक सवयी टाळा
६. खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
६ बायबल हे आरोग्याबद्दलचं किंवा आहाराबद्दलचं पुस्तक नसलं, तरी त्या बाबतींत यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला त्यातून कळतं. उदाहरणार्थ, तो आपल्याला बायबलमधून सांगतो, की “नुकसान करणाऱ्या गोष्टी आपल्या शरीरापासून दूर” ठेवा. (उप. ११:१०) दारूबाजीमुळे आणि अधाशीपणामुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी खूप वाईट आहेत असं बायबलमध्ये म्हटलंय. (नीति. २३:२०) आपण काय आणि किती प्रमाणात खावं-प्यावं हे ठरवताना आपण संयम राखावा अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो.—१ करिंथ. ६:१२; ९:२५.
७. नीतिवचनं २:११ मधला सल्ला आपल्याला आरोग्याच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला कशी मदत करतो?
७ यहोवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची आपल्याला कदर आहे हे दाखवण्यासाठी आपण आपल्या विचारशक्तीचा उपयोग करून चांगले निर्णय घेऊ शकतो. (स्तो. ११९:९९, १००; नीतिवचनं २:११ वाचा.) उदाहरणार्थ, आपण काय खातो, काय पितो या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला आवडत असेल, पण ती खाल्ल्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण ती टाळली पाहिजे. तसंच, जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो, नियमितपणे व्यायाम करतो, स्वच्छ राहतो आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवतो तेव्हा आपण समंजसपणा दाखवत असतो.
आपल्या सुरक्षेची काळजी घ्या
८. जिवाच्या सुरक्षेबद्दल यहोवाला काय वाटतं हे आपल्याला बायबलमधून कसं कळतं?
८ यहोवाने इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र दिलं होतं, त्यात अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या ज्यांमुळे इस्राएली लोक घरामध्ये किंवा बाहेर काम करत असताना गंभीर अपघात टाळू शकत होते आणि आपल्या जिवाचं रक्षण करू शकत होते. (निर्ग. २१:२८, २९; अनु. २२:८) एखाद्याच्या हातून चुकूनसुद्धा दुसऱ्याचा जीव गेला, तर त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागायचे. (अनु. १९:४, ५) नियमशास्त्रात असं सांगितलं होतं, की एखाद्याच्या हातून चुकून जरी न जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला तरी त्याला कठोर शिक्षा दिली जावी. (निर्ग. २१:२२, २३) यावरून कळतं की आपण अपघात टाळण्यासाठी आणि जिवाचं रक्षण करण्यासाठी नेहमी सावध असावं अशी यहोवाची इच्छा होती.
९. अपघात टाळण्यासाठी आपण सावधगिरी कशी बाळगू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
९ घरी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला जीवनाबद्दल कदर आहे हे आपण दाखवत असतो. उदाहरणार्थ, धारदार वस्तू, विषारी रसायनं, औषधं या गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्या असतील तर इतरांना इजा होणार नाही अशा प्रकारे आपण त्या टाकून दिल्या पाहिजेत. शिवाय अशा गोष्टी लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. जसं की, आग पेटवताना, पाणी उकळताना किंवा इलेक्ट्रिक हत्यारं वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्या गोष्टी तशाच सोडून दिल्या नाही पाहिजेत. किंवा मग आपली पुरेशी झोप झाली नसेल, औषधं घेतल्यामुळे आपल्याला गुंगी येत असेल किंवा मद्य घेतलं असेल तर आपण गाडी चालवणार नाही. किंवा मग गाडी चालवत असताना आपण मोबाईलवर बोलणार नाही किंवा आपलं लक्ष विचलित होईल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही.
अचानक विपत्ती येते तेव्हा . . .
१०. धोकादायक परिस्थिती निर्माण होते तेव्हा आणि त्याआधी आपण कशा प्रकारे तयार राहू शकतो?
१० धोकादायक परिस्थिती आपल्याला नेहमीच टाळता येत नाही. खासकरून जेव्हा नैसर्गिक विपत्ती येते, रोगराई पसरते आणि सामाजिक दंगली उसळतात तेव्हा. पण अशा वेळी सरकारने लावलेल्या संचारबंदीच्या नियमांचं जर आपण पालन केलं तर आपल्या जिवाचं रक्षण होऊ शकतं. किंवा मग राहतं ठिकाण लगेच सोडून जाण्याच्या सूचनांचं किंवा सरकारने लावलेल्या इतर नियमांचं जर आपण पालन केलं, तर बऱ्याच प्रमाणात धोका टळू शकतो. (रोम. १३:१, ५-७) काही विपत्ती येणार आहेत याचा सरकारला आधीच अंदाज असल्यामुळे ते आपल्याला काही सूचना किंवा मार्गदर्शन देतं. आपण जर त्यांचं पालन केलं तर आपल्याला या प्रसंगाचा चांगल्या प्रकारे सामना करता येईल. उदाहरणार्थ, सरकार आपल्याला अन्न-पाण्याचा आणि औषधांचा पुरेसा साठा करून ठेवायला सांगतं तेव्हा आपण त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे.
११. साथीचे रोग पसरतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे?
११ आपण राहतो त्या ठिकाणी साथीचा रोग पसरत असेल तर काय? अशा वेळी शासनाने दिलेल्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. जसं की, नियमितपणे हात धुणं, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणं, मास्क घालणं आणि रोगाची लक्षणं दिसत असतील तर वेगळं राहणं. आपण जेव्हा या गोष्टींचं पालन करतो तेव्हा जीवनाच्या देणगीबद्दल आपल्याला किती कदर आहे हे दिसून येतं.
१२. एखादी विपत्ती येते तेव्हा लोकांमध्ये पसरणाऱ्या माहितीवर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवताना नीतिवचनं १४:१५ मधलं तत्त्व आपल्याला कसं मदत करू शकतं?
१२ तातडीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा मित्रपरिवाराकडून, शेजारपाजाऱ्यांकडून किंवा मिडीयाद्वारे चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. अशा वेळी “प्रत्येक शब्दावर” विश्वास ठेवण्यापेक्षा आपण सरकारकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या भरवशालायक माहितीवर विश्वास ठेवला पाहिजे. (नीतिवचनं १४:१५ वाचा.) अशा वेळी मंडळीच्या सभांबद्दल किंवा प्रचार कार्याबद्दल मार्गदर्शन देण्याआधी नियमन मंडळ आणि शाखा कार्यालयं अचूक माहिती मिळवण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात. (इब्री १३:१७) त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं आपण जेव्हा पालन करतो, तेव्हा आपण स्वतःचं आणि इतरांचंही संरक्षण करत असतो. शिवाय, असं केल्यामुळे इतर लोकांसमोर यहोवाच्या साक्षीदारांचं एक चांगलं उदाहरण राहतं.—१ पेत्र २:१२.
रक्तापासून दूर राहण्यासाठी आधीच तयारी करा
१३. रक्ताचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
१३ रक्ताबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचा दृष्टिकोन काय आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत आहे. वैद्यकीय दृष्ट्या तातडीचा प्रसंग उद्भवला तरी रक्ताबद्दल देवाने दिलेल्या नियमांचं आपण पालन करतो आणि रक्त घेत नाही. (प्रे. कार्यं १५:२८, २९) पण याचा अर्थ आपल्याला जगायचंच नाही असं नाही. उलट आपल्याला देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची कदर आहे हे आपण दाखवत असतो. आणि म्हणूनच आपण अशा डॉक्टरांची मदत घेतो जे रक्ताचा वापर न करता आपल्याला चांगल्यातला चांगला उपचार द्यायला तयार असतात.
१४. मोठ्या शस्त्रक्रियेची किंवा उपचाराची शक्यता आपण कशी कमी करू शकतो?
१४ या लेखात आरोग्य जपण्याच्या बाबतीत दिलेल्या सूचना जर आपण पाळल्या तर मोठ्या शस्त्रक्रियेची किंवा उपचार घेण्याची शक्यता आपल्याला कमी करता येईल. आपण आपलं आरोग्य जपलं तर एखादी शस्त्रक्रिया जरी झाली तरी आपण लवकर बरे होऊ. तसंच घर किंवा कामाचं ठिकाण आपण धोकादायक गोष्टींपासून सुरक्षित ठेवलं आणि रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळले तर पुढे होणारा अपघात आपण टाळू शकतो.
१५. (क) डिपीए कार्डवर अलीकडची माहिती भरून ते नेहमी सोबत ठेवणं का महत्त्वाचं आहे? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोणताही उपचार निवडताना आधीच पूर्ण माहिती घेऊन आपण योग्य निर्णय कसे घेऊ शकतो?
१५ आपल्याला जीवनाच्या देणगीची कदर असल्यामुळे आपण डिपीए कार्ड (ड्युरेबल पावर ऑफ ॲटर्नी) भरलं पाहिजे आणि ते नेहमी आपल्यासोबत ठेवलं पाहिजे. b हे कार्ड भरून आपण दाखवतो, की रक्त संक्रमणाबद्दल आणि काही विशिष्ट वैद्यकीय उपचारांबद्दल आपली काय इच्छा आहे. तुमच्या कार्डवर भरलेली सगळी माहिती अलीकडचीच आहे का? तुम्ही हे कार्ड अजून भरलं नसेल किंवा त्यातली माहिती जुनीच असेल तर ती लगेच भरा, उशीर करू नका. आपली काय इच्छा आहे हे लेखी स्वरूपात असल्यामुळे जर उपचाराची गरज पडली तर उपचार घ्यायला वेळ लागणार नाही. शिवाय, असं केल्यामुळे आपल्या मनाविरुद्ध असलेली उपचारपद्धत वापरली जाणार नाही, किंवा तशी औषधंही आपल्याला दिली जाणार नाहीत. c
१६. डिपीए कार्ड कसं भरायचं हे आपल्याला माहीत नसेल तर आपण काय करू शकतो?
१६ आपण तरुण असलो किंवा आपलं आरोग्य कितीही चांगलं असलं तरी कधी ना कधी आपल्याला आजाराला आणि अपघाताला तोंड द्यावं लागू शकतं. (उप. ९:११) म्हणून डिपीए कार्ड भरून स्वतःजवळ ठेवणं खूप गरजेचं आहे. हे कार्ड कसं भरायचं हे माहीत नसेल तर तुमच्या मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. ते तुम्हाला त्या कार्डमधली माहिती समजून घेण्यासाठी आणि ती भरण्यासाठी मदत करतील. पण ते तुमच्यासाठी कुठलाही निर्णय घेणार नाहीत. कारण तो निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. (गलती. ६:४, ५) पण तुमच्यासमोर कोणते पर्यात आहेत ते समजून घ्यायला आणि तुमची इच्छा काय आहे ते लेखी स्वरूपात डिपीए कार्डवर भरायला ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.
समजूतदारपणा दाखवा
१७. आरोग्याच्या बाबतीत आपण समजूतदारपणा कसा दाखवू शकतो?
१७ आपण बायबलमधून जे काही शिकलोय त्याच्या आधारावर आपण सहसा आपल्या आरोग्याबद्दल आणि उपचारांबद्दल निर्णय घेत असतो. (प्रे. कार्यं २४:१६; १ तीम. ३:९) असे निर्णय घेताना आणि त्यांबद्दल इतरांशी बोलताना आपण फिलिप्पैकर ४:५ मध्ये दिलेलं तत्त्व लक्षात ठेवतो. तिथे म्हटलंय: “तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून येऊ द्या.” जेव्हा आपण समंजसपणा दाखवतो तेव्हा आपण आपल्या आरोग्याबद्दल खूप जास्त काळजी करत बसत नाही. किंवा आरोग्याच्या बाबतीत इतरांनी आपल्यासारखाच विचार करावा असा दबाव त्यांच्यावर टाकत नाही. आपल्या भाऊबहिणींनी आपल्यापेक्षा वेगळे निर्णय घेतले तरी आपण त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आदर करतो.—रोम. १४:१०-१२.
१८. जीवनाच्या देणगीबद्दल आपण आपली कदर कशी दाखवू शकतो?
१८ जीवनाचा उगम असलेल्या यहोवा देवाने आपल्याला हे मौल्यवान जीवन दिलंय. त्यामुळे आपल्या जीवनाचं संरक्षण करून आणि पूर्ण मनाने देवाची सेवा करून आपण जीवनाबद्दल कदर असल्याचं दाखवत असतो. (प्रकटी. ४:११) सध्या आपल्याला आजारांना आणि वेगवेगळ्या विपत्तींना तोंड द्यावं लागतं. पण आपण अशा प्रकारचं जीवन जगावं अशी यहोवाची इच्छा नव्हती. म्हणून तो लवकरच आपल्याला कायमचं जीवन देणार आहे. त्या नवीन जगात कोणत्याच प्रकारचं दुःख आणि मृत्यू नसेल. (प्रकटी. २१:४) पण सध्या आपण जिवंत आहोत आणि आपल्या प्रेमळ पित्याची, यहोवाची सेवा करू शकतो ही किती चांगली गोष्ट आहे!
गीत १४० सर्वकाळाचं जीवन!
a देवाने आपल्याला जीवन देऊन एक सुंदर भेट दिली आहे. त्याबद्दल कदर वाढवण्यासाठी हा लेख आपल्याला मदत करेल. विपत्ती येते तेव्हा किंवा एखादं काम करत असताना आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी आपल्या जिवाचं आणि आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी आपण कोणती विशिष्ट पावलं उचलू शकतो हे आपण या लेखात पाहू या. तसंच वैद्यकीय दृष्ट्या तातडीचा प्रसंग उद्भवण्याआधीच तयार राहायला आपण काय करू शकतो तेसुद्धा या लेखात आपण पाहू या.
b याला ॲडवान्स हेल्थ-केयर डिरेक्टिव असंही म्हणतात.
c रक्ताचा वापर करणाऱ्या वैद्यकीय उपचारांसंबंधी निर्णय कसे घ्यावेत? हा व्हिडिओ jw.org/mr वर पाहा.
d चित्राचं वर्णन: एक तरुण भाऊ डिपीए कार्ड भरत आहे आणि तो ते नेहमी आपल्यासोबत ठेवतो.