व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाचे दोन नवीन सदस्य

नियमन मंडळाचे दोन नवीन सदस्य

बुधवार, १८ जानेवारी २०२३ ला jw.org वर एक खास घोषणा करण्यात आली. त्यात सांगण्यात आलं की ब्रदर गेज फ्लिगल आणि जेफ्री विंडर यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात आलंय. या दोन्ही भावांनी अनेक वर्षं यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली आहे.

गेज फ्लिगल आणि त्यांच्या पत्नी नादीया

ब्रदर फ्लिगल अमेरिकेतल्या पश्‍चिम पेन्सिल्वेनिया इथे एका साक्षीदार कुटुंबात लहानाचे मोठे झाले. ते शाळेत असताना त्यांचं कुटुंब प्रचारकांची गरज असलेल्या एका छोट्याशा गावात राहायला गेले. त्यानंतर काही काळातच, म्हणजे २० नोव्हेंबर १९८८ मध्ये त्यांनी बाप्तिस्मा घेतला.

ब्रदर फ्लिगलचे आईवडील त्यांना नेहमी पूर्ण वेळच्या सेवेत जायचं प्रोत्साहन द्यायचे. ते नेहमी विभागीय पर्यवेक्षकांना आणि बेथेल सेवा करणाऱ्‍या भाऊबहिणींना आपल्या घरी राहायला बोलवायचे. ब्रदर फ्लिगल पाहायचे, की हे भाऊबहीण यहोवाच्या सेवेत किती आनंदी आहेत. त्यामुळे बाप्तिस्मा झाल्याच्या काही दिवसांमध्येच, म्हणजे १ सप्टेंबर १९८९ मध्ये त्यांनी पायनियर सेवा करायला सुरुवात केली. आणि दोन वर्षांनंतर म्हणजे ऑक्टोबर १९९१ मध्ये ते ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करायला गेले. १२ वर्षांचे असताना त्यांनी हे ध्येय ठेवलं होतं.

बेथेलमध्ये ब्रदर फ्लिगलने आठ वर्षं बाईंडरीमध्ये सेवा केली. त्यानंतर त्यांना सेवा विभागात नेमण्यात आलं. या काळात त्यांनी रशियन भाषेच्या एका मंडळीत काही वर्षं सेवा केली. २००६ मध्ये त्यांचं लग्न झालं आणि तेव्हापासून ते आणि सिस्टर नादीया बेथेलमध्ये सेवा करू लागले. त्यांनी सोबत मिळून पोर्तुगिज मंडळीत सेवा केली. आणि मग त्यांनी स्पॅनिश भाषेच्या एका मंडळीत १० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली. बरीच वर्षं सेवा विभागात काम केल्यानंतर ब्रदर फ्लिगलना आधी शिक्षण समितीच्या ऑफिसमध्ये आणि त्यानंतर सेवा समितीच्या ऑफिसमध्ये नेमण्यात आलं. मग, मार्च २०२२ मध्ये त्यांना नियमन मंडळाच्या सेवा समितीचे सहायक म्हणून नेमण्यात आलं.

जेफ्री विंडर आणि त्यांच्या पत्नी अँजेला

ब्रदर विंडर अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधल्या मुरिएटा इथे लहानाचे मोठे झाले. ते लहानपणापासूनच सत्यात वाढले आणि २९ मार्च १९८६ मध्ये त्यांनी बाप्तिस्मा घेतला. आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात त्यांनी सहायक पायनियर सेवा सुरू केली. ती त्यांना इतकी आवडली, की त्यांनी ती पुढेही चालू ठेवली. बरेच महिने सहायक पायनियर सेवा केल्यानंतर १ ऑक्टोबर १९८६ मध्ये त्यांनी पायनियर सेवा सुरू केली.

ते शाळेत होते तेव्हा त्यांचे दोन मोठे भाऊ बेथेलमध्ये सेवा करत होते. त्यांना ते भेटायला गेले आणि त्यामुळे ‘मोठं झाल्यावर आपणही बेथेलमध्ये जायचं,’ अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि मग मे १९९० मध्ये त्यांना वॉलकीलमध्ये बेथेल सेवेसाठी बोलवण्यात आलं.

बेथेलमध्ये ब्रदर विंडर यांनी क्लिनिंग विभाग, फार्म विभाग, आणि बेथेल ऑफिस यांसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. १९९७ मध्ये त्यांचं लग्न झालं. आणि तेव्हापासून ते आणि सिस्टर अँजेला बेथेलमध्ये सेवा करत आहेत. २०१४ मध्ये ते वॉरविकला गेले आणि तिथे त्यांनी जागतिक मुख्यालयाच्या बांधकाम प्रकल्पात मदत केली. मग २०१६ मध्ये ते पॅटरसनमध्ये असलेल्या वॉचटावर एज्युकेशनल सेंटरमध्ये गेले. तिथे ब्रदर विंडरने ऑडिओ-व्हिडिओ विभागात सेवा केली. त्यानंतर चार वर्षांनी ते पुन्हा वॉरविकला आले आणि तिथे ब्रदर विंडरना सभासद समितीच्या ऑफिसमध्ये नेमण्यात आलं. मग मार्च २०२२ मध्ये त्यांना नियमन मंडळाच्या सभासद समितीचे सहायक म्हणून नेमण्यात आलं.

राज्याच्या कामात मेहनत घेत असलेले हे भाऊ ‘माणसांच्या रूपात भेटीच’ आहेत. यहोवाने त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा हीच आपली प्रार्थना आहे.​—इफिस. ४:८.