तुम्हाला माहीत होतं का?
बायबलमध्ये एकच गोष्ट पुन्हापुन्हा का सांगितलेली आहे?
बायबलच्या लेखकांनी काही वेळा एकच गोष्ट पुन्हापुन्हा सांगितली आहे. कदाचित खाली दिलेल्या तीन कारणांमुळे त्यांनी असं केलं असावं:
ज्या काळात ते लिहिण्यात आलं होतं तो काळ. प्राचीन इस्राएलमध्ये बऱ्याच लोकांकडे नियमशास्त्राच्या वैयक्तिक प्रती नव्हत्या. उपासना मंडपासमोर जेव्हा संपूर्ण राष्ट्र एकत्र यायचं तेव्हा खासकरून नियमशास्त्रातल्या गोष्टी त्यांच्या कानावर पडायच्या. (अनु. ३१:१०-१२) तिथे त्यांना तासनतास उभं रहावं लागायचं. शिवाय, इतका मोठा जमाव असल्यामुळे त्यांना लक्ष द्यायला कठीण जायचं. (नहे. ८:२, ३, ७) अशा वेळी, काही महत्त्वाच्या गोष्टी वारंवार बोलून दाखवल्यामुळे लोकांना ती वचनं लक्षात ठेवायला आणि ती लागू करायला सोपं जायचं. तसंच यामुळे त्यांना देवाच्या नियमांसारख्या किंवा न्याय-निर्णयांसारख्या बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेवायलाही मदत व्हायची.—लेवी. १८:४-२२; अनु. ५:१.
लिहिण्याची पद्धत. बायबलचा जवळपास १० टक्के भाग हा गीतांच्या स्वरूपात लिहिण्यात आला आहे. यात स्तोत्रं, गीतरत्न आणि विलापगीत ही पुस्तकं येतात. कधीकधी या गीतांमध्ये ध्रुपद (कडव्याच्या शेवटी पुन्हापुन्हा म्हटल्या जाणाऱ्या ओळी) असायचं आणि त्यामुळे गीताचा विषय ठळकपणे समजून यायचा. तसंच ऐकणाऱ्यांना यामुळे गीताचे बोल पाठ व्हायचे. याचं एक उदाहरण म्हणजे, स्तोत्र ११५:९-११ मधले शब्द: “हे इस्राएल, यहोवावर भरवसा ठेव. तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे. हे अहरोनच्या घराण्या, यहोवावर भरवसा ठेव. तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे. यहोवाची भीती बाळगणाऱ्या लोकांनो, यहोवावर भरवसा ठेवा. तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.” इथे पुन्हापुन्हा येणाऱ्या शब्दांकडे तुम्ही लक्ष दिलं का? विचार करा, गायक हे गीत गायचे तेव्हा वचनातली अनमोल सत्यं त्यांच्या मनात किती खोलवर आणि कायमची कोरली जात असतील.
महत्त्वाच्या गोष्टींवर जोर देण्याची गरज. बायबलच्या लेखकांनी काही वेळा महत्त्वाच्या गोष्टी पुन्हापुन्हा सांगितल्या. उदाहरणार्थ, जेव्हा यहोवाने इस्राएली लोकांना रक्ताचं सेवन न करण्याची आज्ञा दिली तेव्हा त्याने मोशेला त्याच्या कारणाबद्दल पुन्हापुन्हा लिहायला सांगितलं. कारण रक्तात जीवन आहे म्हणजे रक्त जीवनाला सूचित करतं या गोष्टीवर देवाला जोर द्यायचा होता. (लेवी. १७:११, १४) नंतर, जेव्हा यरुशलेममधल्या वडिलांनी आणि प्रेषितांनी देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याबद्दल ख्रिश्चनांना सांगितलं, तेव्हा त्यांनी रक्तापासून दूर राहण्याच्या आज्ञेवर पुन्हा जोर दिला.—प्रे. कार्यं १५:२०, २९.
बायबलमध्ये काही गोष्टी जरी पुन्हापुन्हा सांगितलेल्या असल्या तरी यहोवाची अशी मुळीच इच्छा नव्हती की आपण एका धार्मिक विधीमध्ये केल्या जाणाऱ्या जपासारखं त्या गोष्टी सारख्या बडबडत राहाव्यात. येशूनेही म्हटलं: “प्रार्थना करताना . . . त्याच गोष्टी पुन्हापुन्हा बोलू नका.” (मत्त. ६:७) आणि त्यानंतर त्याने देवाच्या इच्छेनुसार असलेल्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल आपण त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो याबद्दल सांगितलं. (मत्त. ६:९-१३) म्हणून आपण प्रार्थना करताना तेचतेच शब्द पुन्हापुन्हा बोलणार नाही, पण आपण एकाच विषयावर सारखी-सारखी प्रार्थना करू शकतो.—मत्त. ७:७-११.
तर आपण पाहिलं की बायबलमध्ये काही गोष्टी पुन्हापुन्हा सांगितल्या आहेत याची काही चांगली कारणं होती. खरंतर आपला महान शिक्षक आपल्याला फायदा व्हावा म्हणून ज्या पद्धतींनी शिकवतो त्यांपैकी ही एक पद्धत आहे.—यश. ४८:१७, १८.