व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ८

गीत १२४ कायम एकनिष्ठ राहू या!

यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहा

यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहा

“मी यहोवा तुझा देव आहे. . . . ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.”​—यश. ४८:१७.

या लेखात:

यहोवा आज त्याच्या लोकांचं मार्गदर्शन कसं करत आहे आणि त्याचं पालन केल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात ते पाहा.

१. आपण यहोवाचं मार्गदर्शन का स्वीकारलं पाहिजे ते स्पष्ट करा.

 कल्पना करा, की तुम्ही एका जंगलात हरवला आहात आणि त्या भयानक जंगलात तुम्हाला जंगली प्राण्यांचा, रोग पसरवणाऱ्‍या किड्यांचा, विषारी वनस्पतींचा आणि जागोजागी असलेल्या खडकाळ खड्ड्यांमध्ये पडण्याचा धोका आहे. पण त्या भयानक जंगलात तुमच्यासोबत एक अनुभवी गाईड असेल तर तुम्हाला किती बरं वाटेल! कारण त्याला धोके कुठे आहेत हे माहीत आहे आणि तो तुम्हाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. हे जगसुद्धा त्या जंगलासारखंच आहे. त्यामुळे खासकरून तुमच्या आध्यात्मिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पण, आपल्याकडे योग्य असा एक गाईड आहे. तो आहे यहोवा. तो आपल्याला धोक्यांपासून दूर नेतो आणि जिथे कायमचं जीवन आहे त्या नवीन जगाच्या मार्गावर घेऊन जातो.

२. यहोवा आपलं मार्गदर्शन कसं करतो?

यहोवा आपलं मार्गदर्शन कसं करतो? त्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्याचं वचन बायबल. त्यासोबतच तो काही मानवांचा वापर करूनही आपलं मार्गदर्शन करतो. उदाहरणार्थ, ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाचा’ वापर करून तो आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो आणि त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतात. (मत्त. २४:४५) त्यासोबतच यहोवा योग्य अशा भावांचा वापर करूनसुद्धा आपलं मार्गदर्शन करतो. जसं की, विभागीय पर्यवेक्षक आणि मंडळीतले वडील. ते आपल्याला प्रोत्साहन आणि सूचना देतात. त्यामुळे आपल्याला कठीण काळात टिकून राहता येतं. शेवटल्या काळात मिळणाऱ्‍या या भरवशालायक मार्गदर्शनासाठी आपण किती आभारी आहोत! त्यामुळे आपल्याला यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवता येते आणि जीवनाच्या मार्गावर चालत राहता येतं.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पण कधीकधी यहोवाचं मार्गदर्शन पाळणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. खासकरून जेव्हा ते अपरिपूर्ण मानवांकडून आपल्याला मिळतं तेव्हा. का? कदाचित ते आपल्या आवडीनिवडींशी जुळणारं नसेल. किंवा कदाचित आपल्याला असं वाटेल की ते मार्गदर्शन विचार करून दिलेलं नाही आणि त्यामुळे ते यहोवाकडून नाही. अशा वेळी यहोवाच आपल्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे आणि त्याचं मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतील या गोष्टीवर खासकरून आपला विश्‍वास असणं गरजेचं आहे. म्हणून यावरचा आपला भरवसा मजबूत करण्यासाठी आपण तीन मुद्द्‌यांवर चर्चा करणार आहोत: (१) प्राचीन काळात यहोवाने त्याच्या लोकांचं मार्गदर्शन कसं केलं? (२) यहोवा आज आपलं मार्गदर्शन कसं करत आहे? आणि (३) या मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत यहोवाने त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी माणसांचा वापर केला आहे (परिच्छेद ३ पाहा)


यहोवाने इस्राएल राष्ट्राचं मार्गदर्शन कसं केलं?

४-५. यहोवा मोशेद्वारे इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करत होता, हे त्याने कसं दाखवून दिलं? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर काढण्यासाठी यहोवाने मोशेला निवडलं. आणि तोच मोशेचा वापर करून त्यांचं मार्गदर्शन करतोय याचे पुरावेसुद्धा त्याने दिले. उदाहरणार्थ, त्याने त्यांच्या मार्गदर्शनासाठी दिवसा ढगाचा खांब आणि रात्री आगीचा खांब दिला. (निर्ग. १३:२१) मोशे या खांबाच्या मागोमाग गेला आणि त्यामुळे तो आणि इस्राएली लोक तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचले. पण जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिलं की पुढे तांबडा समुद्र आहे आणि मागून इजिप्तचं सैन्य आपला पाठलाग करतंय, तेव्हा ते खूप घाबरले आणि त्यांना असं वाटलं की आता आपण अडकलोय. मोशेने त्यांना तांबड्या समुद्राकडे आणून चूक केली आहे असं त्यांना वाटलं. पण ही काही चूक नव्हती. यहोवाने जाणूनबुजून मोशेचा वापर करून त्यांना इथे आणलं होतं. (निर्ग. १४:२) त्यानंतर देवाने आश्‍चर्यकारक रितीने त्यांची सुटका केली.​—निर्ग. १४:२६-२८.

ओसाड रानात देवाच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी मोशे ढगाच्या खांबावर अवलंबून राहिला (परिच्छेद ४-५ पाहा)


पुढे ४० वर्षं देवाच्या लोकांचं ओसाड रानात मार्गदर्शन करण्यासाठी मोशे या ढगाच्या खांबावर अवलंबून होता. a यहोवाने काही काळासाठी मोशेच्या तंबूवर हा खांब ठेवला होता आणि इस्राएली लोक हे पाहू शकत होते. (निर्ग. ३३:७, ९, १०) या खांबातूनच यहोवा मोशेसोबत बोलायचा आणि नंतर मोशे यहोवाने दिलेल्या सूचना लोकांना कळवायचा. (स्तो. ९९:७) अशा प्रकारे, यहोवाच मोशेद्वारे इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करतोय याचे बरेच पुरावे इस्राएली लोकांकडे होते.

मोशे आणि त्याच्यानंतर नेतृत्व करणारा यहोशवा (परिच्छेद ५, ७ पाहा)


६. यहोवाच्या मार्गदर्शनाबद्दल इस्राएली लोकांनी कशी मनोवृत्ती दाखवली? (गणना १४:२, १०, ११)

दुःखाची गोष्ट म्हणजे, यहोवा मोशेला आपला प्रतिनिधी म्हणून वापरत आहे याचे स्पष्ट पुरावे असूनही बऱ्‍याच इस्राएली लोकांनी त्याला नाकारलं. (गणना १४:२, १०, ११ वाचा.) यहोवा मोशेद्वारे आपलं मार्गदर्शन करतोय ही गोष्ट ओळखायला ते वारंवार चुकले. याचा परिणाम असा झाला, की यहोवाने त्या पिढीला वचन दिलेल्या देशात जाऊ दिलं नाही.​—गण. १४:३०.

७. यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारणाऱ्‍या काही लोकांची उदाहरणं द्या. (गणना १४:२४) (चित्रसुद्धा पाहा.)

असं असलं तरी काही इस्राएली लोकांनी यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केलं. उदाहरणार्थ, यहोवाने म्हटलं, की “[कालेबने] मनापासून माझ्या आज्ञा पाळल्या.” (गणना १४:२४ वाचा.) त्यामुळे देवाने कालेबला आशीर्वाद दिला आणि कनान देशात त्याला हवी ती जागा निवडायची संधी दिली. (यहो. १४:१२-१४) इस्राएली लोकांच्या पुढच्या पिढीनेसुद्धा यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. जेव्हा यहोवाने मोशेऐवजी यहोशवाला त्यांचं नेतृत्व करण्यासाठी निवडलं तेव्हा त्यांनी “तो जिवंत असेपर्यंत [त्याचा] आदर केला.” (यहो. ४:१४) त्यामुळे यहोवाने त्यांना वचन दिलेल्या देशात नेऊन आशीर्वाद दिला.​—यहो. २१:४३, ४४.

८. राजांच्या काळात यहोवाने त्याच्या लोकांचं मार्गदर्शन कसं केलं, ते समजावून सांगा. (चित्रसुद्धा पाहा.)

बऱ्‍याच वर्षांनंतर यहोवाने त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी न्यायाधीशांचा (शास्त्यांचा) वापर केला. त्यानंतर राजांच्या काळात त्याने लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी संदेष्ट्यांना निवडलं. विश्‍वासू राजांनी संदेष्ट्यांकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचं पालन केलं. उदाहरणार्थ, नाथान संदेष्ट्याने दावीद राजाची जी सुधारणूक केली होती, ती त्याने नम्रपणे स्वीकारली. (२ शमु. १२:७, १३; १ इति. १७:३, ४) यहोशाफाट राजासुद्धा मार्गदर्शनासाठी यहजिएल संदेष्ट्यावर अवलंबून राहिला. आणि त्याने यहूदामधल्या लोकांनासुद्धा “[देवाच्या] संदेष्ट्यांवर विश्‍वास” ठेवायचं प्रोत्साहन दिलं. (२ इति. २०:१४, १५, २०) हिज्कीया राजासुद्धा समस्येत होता तेव्हा त्याने यशया संदेष्ट्याची मदत घेतली. (यश. ३७:१-६) जेव्हा-जेव्हा राजांनी यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केलं, तेव्हा-तेव्हा त्यांना आशीर्वाद मिळाला आणि राष्ट्राचं संरक्षण झालं. (२ इति. २०:२९, ३०; ३२:२२) यावरून सगळ्यांनी हे ओळखायला पाहिजे होतं, की यहोवा संदेष्ट्यांचा वापर करून त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करतोय. पण तरीसुद्धा बऱ्‍याच राजांनी आणि लोकांनीसुद्धा संदेष्ट्यांचं ऐकलं नाही.​—यिर्म. ३५:१२-१५.

हिज्कीया राजा आणि यशया संदेष्टा (परिच्छेद ८ पाहा)


यहोवाने सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांचं मार्गदर्शन कसं केलं?

९. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचं मार्गदर्शन करण्यासाठी यहोवाने कोणाचा वापर केला? (चित्रसुद्धा पाहा.)

पहिल्या शतकात, यहोवाने ख्रिस्ती मंडळीची सुरुवात केली. मग त्याने त्या सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांचं मार्गदर्शन कसं केलं? त्याने येशूला मंडळीचं मस्तक म्हणून नेमलं. (इफिस. ५:२३) पण येशूने प्रत्येक शिष्याकडे जाऊन त्याचं मार्गदर्शन केलं नाही. तर त्याने यरुशलेममधल्या प्रेषितांचा आणि वडिलांचा वापर करून त्यांचं मार्गदर्शन केलं. (प्रे. कार्यं १५:१, २) तसंच, मंडळीचं मार्गदर्शन करण्यासाठी त्याने वडिलांचा वापर केला.​—१ थेस्सलनी. ५:१२; तीत १:५.

यरुशलेममधले प्रेषित आणि वडील (परिच्छेद ९ पाहा)


१०. (क) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांपैकी बऱ्‍याच जणांनी त्यांना मिळालेलं मार्गदर्शन कसं स्वीकारलं? (प्रेषितांची कार्यं १५:३०, ३१) (ख) बायबल काळातल्या काही लोकांनी यहोवाने निवडलेल्या लोकांना का नाकारलं? (“ स्पष्ट पुरावा असतानाही काही जणांनी तो का नाकारला?” ही चौकट पाहा.)

१० मग पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी त्यांना मिळालेलं मार्गदर्शन स्वीकारलं का? बऱ्‍याच जणांनी त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनाचं आनंदाने पालन केलं. खरंतर त्यांना मिळालेल्या ‘प्रोत्साहनामुळे त्यांना खूप आनंद झाला.’ (प्रे. कार्यं १५:३०, ३१ वाचा.) मग यहोवा अलीकडच्या काळात त्याच्या लोकांचं मार्गदर्शन कसं करतोय?

आज यहोवा आपलं मार्गदर्शन कसं करतोय?

११. अलीकडच्या काळात यहोवाने पुढाकार घेणाऱ्‍यांचं मार्गदर्शन कसं केलंय, याचं एक उदाहरण सांगा.

११ यहोवा आजही त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करतोय. यासाठी तो त्याच्या वचनाचा आणि मंडळीचं मस्तक असलेल्या त्याच्या मुलाचा वापर करतोय. यहोवा त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी आजही माणसांचा वापर करतोय, याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का? हो आहेत. १८७० नंतर कोणत्या घटना घडल्या याचा विचार करा. चार्ल्झ टेझ रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांना समजलं की देवाच्या राज्यासाठी १९१४ हे वर्ष खूप महत्त्वाचं वर्ष असणार आहे. (दानी. ४:२५, २६) बायबलच्या भविष्यवाणीचा अभ्यास केल्यामुळे ते या निष्कर्षावर पोहोचले होते. मग यहोवा त्यांच्या संशोधनासाठी त्यांचं मार्गदर्शन करत होता का? हो नक्कीच. १९१४ मध्ये जगभरात ज्या घडामोडी घडल्या त्यांवरून हे स्पष्ट झालं की देवाच्या राज्याचं शासन सुरू झालंय. जसं की पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. त्यानंतर एकापाठोपाठ एक रोगांच्या साथी, भूकंप आणि दुष्काळ यांसारख्या गोष्टी दिसू लागल्या. (लूक २१:१०, ११) यात काहीच शंका नाही की यहोवा या विश्‍वासू बायबल विद्यार्थ्यांचा वापर करून त्याच्या लोकांची मदत करत होता.

१२-१३. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम वाढावं म्हणून कोणत्या योजना करण्यात आल्या?

१२ दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी काय झालं याचाही विचार करा. प्रकटीकरण १७:८ या वचनाचा अभ्यास केल्यानंतर जागतिक मुख्यालयातल्या जबाबदार बांधवांना समजलं, की या युद्धानंतर हर्मगिदोनचं युद्ध सुरू होणार नाही, तर एक शांतीचा काळ सुरू होईल आणि बऱ्‍याच लोकांना प्रचार करणं शक्य होईल. त्यामुळे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करायला मिशनऱ्‍यांना प्रशिक्षण देण्यात आलं. त्यासाठी यहोवाच्या संघटनेने वॉचटावर बायबल कॉलेज (स्कूल) ऑफ गिलियड या प्रशालेची व्यवस्था केली. त्या वेळी असं पाऊल उचलणं व्यावहारिक वाटत नव्हतं. इतकंच काय तर युद्ध सुरू असतानासुद्धा मिशनऱ्‍यांना क्षेत्रात पाठवलं जात होतं. त्यासोबतच मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामांत प्रशिक्षण मिळावं म्हणून विश्‍वासू दासाने थिओक्रेटिक मिनिस्ट्री (ईश्‍वरशासित सेवा) b नावाचा अभ्यासक्रमसुद्धा सुरू केला. अशा प्रकारे, देवाच्या लोकांना पुढे येणाऱ्‍या कामासाठी तयार केलं जात होतं.

१३ मागे वळून पाहिलं तर आपल्याला हे स्पष्टपणे समजतं, की यहोवाने त्या कठीण काळात त्याच्या लोकांचं मार्गदर्शन केलं होतं. दुसऱ्‍या महायुद्धापासून बऱ्‍याच देशांमध्ये यहोवाचे लोक शांतीने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रचार करू शकले. आणि आज तर हे काम आणखीनच वाढलंय.

१४. यहोवाच्या संघटनेकडून आणि नियुक्‍त वडिलांकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतं त्यावर आपण भरवसा का ठेवू शकतो? (प्रकटीकरण २:१) (चित्रसुद्धा पाहा.)

१४ आजही नियमन मंडळाचे सदस्य मार्गदर्शनासाठी येशूवर अवलंबून राहतात. त्यांची अशी इच्छा आहे, की ते जे मार्गदर्शन देत आहेत त्यातून यहोवा आणि येशूचा दृष्टिकोन दिसून यावा. यानंतर विभागीय पर्यवेक्षक आणि मंडळीतले वडील हे मार्गदर्शन मंडळ्यांना पुरवतात. c अभिषिक्‍त वडील आणि एका अर्थाने मंडळीतले सगळेच वडील ख्रिस्ताच्या “उजव्या हातात” आहेत. (प्रकटीकरण २:१ वाचा.) हे खरं आहे, की हे वडील अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात. मोशे, यहोशवा आणि प्रेषितांकडूनही काही वेळा चुका झाल्या. (गण. २०:१२; यहो. ९:१४, १५; रोम. ३:२३) असं असलं तरी येशू ख्रिस्त विश्‍वासू दासाचं आणि या वडिलांचं काळजीपूर्वक मार्गदर्शन करत आहे. आणि तो हे “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत” करत राहील. (मत्त. २८:२०) त्यामुळे पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांकडून येशू आपल्याला जे मार्गदर्शन देतोय, त्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो.

आजचं नियमन मंडळ (परिच्छेद १४ पाहा)


यहोवाचं मार्गदर्शन पाळत राहिल्यामुळे आपल्याला फायदा होतो

१५-१६. यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केलेल्या भाऊबहिणींच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१५ यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहिल्यामुळे आपल्याला आजही फायदा होऊ शकतो. ब्रदर अँडी आणि सिस्टर रॉबन यांच्या उदाहरणाचा विचार करा. आपलं जीवन साधं ठेवण्याच्या सल्ल्याचं त्यांनी पालन केलं. (मत्तय ६:२२ या वचनासाठी असलेली हिंदी ‘अध्ययन नोट’ पाहा.) याचा परिणाम म्हणजे संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात त्यांना काम करता आलं. रॉबन म्हणते: “कधीकधी आम्ही खूप छोट्या जागेत राहायचो. तिथे साधं किचनही नसायचं. मला फोटोग्राफीचा छंद होता. त्यासाठी लागणारं बरंच सामान माझ्याकडे होतं. पण तेही मला विकावं लागलं. मला याचं इतकं वाईट वाटायचं की कधीकधी मी रडलेसुद्धा. पण अब्राहामची पत्नी सारासारखं मागे सोडलेल्या गोष्टींकडे नाही तर पुढे असलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचा मी निश्‍चय केला.” (इब्री ११:१५) असे निर्णय घेतल्यामुळे अँडी आणि रॉबनला काही फायदा झाला का? रॉबन म्हणते: “आमच्याकडे असलेलं सगळं काही आम्ही यहोवाला देत आहोत, या जाणीवेमुळे आम्हाला खूप समाधान वाटतं. यहोवाच्या सेवेत काम करत असताना नवीन जगात जीवन कसं असेल याची एक झलक आम्हाला मिळते.” अँडीलाही असंच वाटतं. ते म्हणतात: “यहोवाच्या सेवेत आम्ही स्वतःला वाहून घेतलंय, या गोष्टीचं आम्हाला खरंच खूप समाधान आहे.”

१६ यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळे आपल्याला आणखी कोणते फायदे होऊ शकतात? शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्सियाला यहोवाच्या सेवेत करिअर करायचं जे प्रोत्साहन मिळालं होतं, त्याप्रमाणे करायची तिची इच्छा होती. (मत्त. ६:३३; रोम. १२:११) ती म्हणते: “मला युनिव्हर्सिटीत चार वर्षांची स्कॉलरशीप मिळणार होती. पण यहोवाची सेवा करायचं माझं ध्येय होतं. म्हणून मी एक टेक्निकल कोर्स करून असं एक काम शिकून घ्यायचा निर्णय घेतला, ज्यामुळे यहोवाची सेवा करताना स्वतःच्या पायावर उभं राहायला मला मदत होईल. आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांमध्ये हा माझा सर्वात चांगला निर्णय होता. आता मी पायनियर सेवेचा आनंद घेत आहे. आणि कामासाठी काही निश्‍चित वेळ द्यायची गरज नसल्यामुळे मला बेथेलमध्ये काही वेळ काम करायला आणि इतर खास मार्गांनी यहोवाची सेवा करायला शक्य झालंय.”

१७. यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहिल्यामुळे आपल्याला आणखी कोणते आशीर्वाद मिळतात? (यशया ४८:१७, १८)

१७ काही वेळा संघटनेकडून आपल्याला अशा सूचना मिळू शकतात ज्यांमुळे आपलं संरक्षण होतं. जसं की, जास्त पैसा कमवण्याच्या मोहापासून आणि यहोवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी करण्यापासून आपल्याला नेहमी सावध केलं जातं. या मार्गदर्शनाचं पालन करूनसुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळू शकतात. आपल्याला आपला विवेक शुद्ध ठेवता येतो आणि चिंतांपासून दूर राहता येतं. (१ तीम. ६:९, १०) यामुळे आपल्याला पूर्ण मनाने यहोवाची सेवा करता येते आणि आनंद, शांती आणि समाधानसुद्धा अनुभवता येतं.​—यशया ४८:१७, १८ वाचा.

१८. तुम्ही यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करायचा निश्‍चय का केला आहे?

१८ यात काहीच शंका नाही, की यहोवा मोठ्या संकटादरम्यान आणि येशूच्या हजार वर्षांच्या राज्यातही मानवांचा वापर करून आपल्याला मार्गदर्शन पुरवत राहील. (स्तो. ४५:१६) मग त्या वेळी मिळालेलं मार्गदर्शन आपल्या आवडीनिवडींशी जुळणारं नसलं तरी आपण त्याचं पालन करत राहू का? आपण जर आत्ताच  स्वतःला यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करायची सवय लावली तर त्या वेळी आपल्याला हे करणं सोपं जाईल. तर मग आपण नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहू या, मग ते आपलं रक्षण करणाऱ्‍या मानवांकडून देण्यात आलं तरी! (यश. ३२:१, २; इब्री १३:१७) असं करत असताना आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो की आपला गाईड यहोवा आपल्याला त्याच्यासोबतचं नातं धोक्यात येईल अशा गोष्टींपासून दूर ठेवेल आणि कायमचं जीवन असलेल्या नवीन जगाच्या मार्गावर चालत राहायला मदत करेल.

तुमचं उत्तर काय असेल?

  • यहोवाने इस्राएल राष्ट्राचं मार्गदर्शन कसं केलं?

  • यहोवाने सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांचं मार्गदर्शन कसं केलं?

  • यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळे आपल्याला आज कसा फायदा होतो?

गीत ४८ याहासोबत रोज चालू या

a वचन दिलेल्या देशात जाण्यासाठी इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करायला यहोवाने एका स्वर्गदूतालाही नेमलं होतं. आणि तो त्यांच्या ‘पुढे चालून’ त्यांचं नेतृत्व करत होता. असं दिसतं, की तो स्वर्गदूत मीखाएल म्हणजे मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधीचा येशू होता.​—निर्ग. १४:१९; ३२:३४.

b या अभ्यासक्रमाला नंतर ईश्‍वरशासित सेवा प्रशाला असं म्हटलं जायचं. आज हे प्रशिक्षण आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेचा एक भाग आहे.

c फेब्रुवारी २०२१ च्या टेहळणी बुरूज  अंकात, पान १८ वर असलेली “नियमन मंडळाची जबाबदारी” ही चौकट पाहा.