व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कसे बनाल खरे मित्र?

कसे बनाल खरे मित्र?

समस्यांचा सामना करताना तुम्हाला कधी एकटं पडल्यासारखं वाटलंय का? खरंतर, आपण ‘खूप कठीण काळात’ जगतोय. त्यामुळे आपण निराश होऊ शकतो आणि आपल्याला एकटं वाटू शकतं. (२ तीम. ३:१) पण आपल्याला एकट्यानेच जीवनातल्या समस्यांचा सामना करायची गरज नाही. बायबल सांगतं की खरे मित्र आपल्याला मदत करू शकतात. ते “दुःखाच्या प्रसंगी” भावासारखे असतात.—नीति. १७:१७.

खरे मित्र मदत कशी करू शकतात?

प्रेषित पौलला त्याच्या एकनिष्ठ मित्रांच्या मदतीमुळे घरात कैद असतानाही सेवाकार्य करता आलं

प्रेषित पौल त्याच्या मिशनरी दौऱ्‍यात त्याच्या काही मित्रांनाही घेऊन गेला. त्यांनी त्याला खूप मदत केली. (कलस्सै. ४:७-११) पौल जेव्हा रोममध्ये कैदेत होता तेव्हा तो जी कामं करू शकत नव्हता, ती करायला त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली. उदाहरणार्थ, फिलिप्पैमधल्या भाऊबहिणींनी पाठवलेल्या गरजेच्या गोष्टी एपफ्रदीतने पौलकडे पोहोचवल्या. (फिलिप्पै. ४:१८) पौलने लिहिलेली पत्रं तुखिकने वेगवेगळ्या मंडळ्यांपर्यंत पोहोचवली. (कलस्सै. ४:७) पौलला काही काळ घरात कैद करून ठेवण्यात आलं होतं. तसंच काही काळ तो तुरुंगातही होता. पण त्याच्या मित्रांच्या मदतीमुळे तो आपली सेवा करत राहू शकला. मग आज आपणही खरे मित्र कसे बनू शकतो?

खरे मित्र किती मौल्यवान असतात हे आजच्या काळातल्या उदाहरणांतूनही कळतं. स्पेनमध्ये पायनियर सेवा करणाऱ्‍या एलिसाबेत नावाच्या बहिणीचा विचार करा. तिच्यावर जेव्हा समस्या आली तेव्हा एका बहिणीने तिला खूप मदत केली. जेव्हा त्या बहिणीला कळलं की एलिसाबेतच्या आईला कॅन्सर झालाय तेव्हा ती बहीण तिला प्रोत्साहन देणारे मॅसेज पाठवायची आणि त्या मॅसेजमध्ये ती बायबलच्या वचनांचाही उल्लेख करायची. एलिसाबेत म्हणते: “हे मॅसेज पाहून मला खूप आनंद व्हायचा. मला वाटायचं की माझा विचार करणारं कोणीतरी आहे. मी एकटी नाहीए. यामुळे मला माझ्या समस्यांचा सामना करायला मदत मिळायची.”—नीति. १८:२४.

भाऊबहिणींना प्रचाराला आणि सभेला यायला मदत करूनसुद्धा आपण त्यांच्यासोबतची मैत्री घट्ट करू शकतो. जसं की, तुम्ही एखाद्या वयस्कर भावाला किंवा बहिणीला तुमच्या गाडीतून प्रचाराला किंवा सभेला घेऊन जाऊ शकता. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला एकमेकांमुळे खूप प्रोत्साहान मिळेल. (रोम. १:१२) पण असेही काही भाऊबहीण आहेत, ज्यांना घराबाहेर पडणं अशक्य आहे. मग आपण त्यांचे खरे मित्र कसे बनू शकतो?

जे घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांचे खरे मित्र व्हा

काही भाऊबहिणींना आरोग्याच्या समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे सभांना प्रत्यक्ष हजर राहता येत नाही. डेविड नावाच्या भावाचा विचार करा. त्याला एक प्रकारचा कॅन्सर झाला होता. आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ त्याने किमोथॅरपी घेतली. संपूर्ण उपचारादरम्यान तो आणि त्याची बायको लिडीया घरातूनच ऑनलाईन सभेला हजर राहायचे.

मग मंडळीतल्या भाऊबहिणींनी त्यांना कशी मदत केली? काही भाऊबहीण प्रत्येक सभेनंतर लिडीया आणि डेविड यांना व्हिडिओ कॉल करायचे. त्यासोबतच, जेव्हा लिडीया आणि डेविड उत्तरं द्यायचे तेव्हा ते त्यांना प्रोत्साहन देणारे मेसेज पाठवायचे. आणि यामुळे डेविड आणि लिडीयाला एकटं वाटायचं नाही.

घराबाहेर पडू न शकणाऱ्‍या भाऊबहिणींसोबत प्रचार करा

जे घराबाहेर पडू शकत नाहीत अशा भाऊबहिणींसोबत आपण प्रचाराची योजना करू शकतो का? काही छोटेछोटे फेरबदल करून आपण त्यांना विसरलेलो नाही हे आपण त्यांना दाखवू शकतो. (नीति. ३:२७) कदाचित आपण त्यांच्यासोबत पत्रं लिहून किंवा फोनवरचं साक्षकार्य करू शकतो. वडील अशा भाऊबहिणींसाठी प्रचाराची सभा व्हिडिओ कॉलवरही ठेवू शकतात. डेविड आणि लिडीयाला अशा व्यवस्थेमुळे खूप मदत झाली. डेविड म्हणतात, “आम्ही फक्‍त छोट्याशा चर्चेसाठी आणि प्रार्थनेसाठी आमच्या प्रचाराच्या गटासोबत एकत्र आलो तरी आम्हाला खूप बरं वाटायचं.” याशिवाय, घराबाहेर पडू न शकणाऱ्‍या भाऊबहिणींना तुम्ही वेळोवेळी विचारू शकता, की त्यांच्या घरी बायबल विद्यार्थ्याला अभ्यास करायला आणलं तर चालेल का.

घराबाहेर पडू न शकणाऱ्‍या भाऊबहिणींसोबत काम केल्यामुळे आणि त्यांचे चांगले गुण जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होते. उदाहरणार्थ, आपण जेव्हा अशा भाऊबहिणींसोबत प्रचार करतो आणि ते किती कुशलपणे देवाच्या वचनाचा वापर करून लोकांच्या मनापर्यंत पोहोचतात हे पाहतो, तेव्हा आपण त्यांच्या आणखी जवळ जातो. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टींसाठी भाऊबहिणींना मदत करता, तेव्हा तुम्ही आणखी नवीन मित्र बनवू शकता.—२ करिंथ. ६:१३.

पौल जेव्हा कठीण समस्येत होता, तेव्हा त्याचा मित्र तीत त्याला भेटायला आला आणि यामुळे पौलला खूप बरं वाटलं. (२ करिंथ. ७:५-७) तीतच्या उदाहरणातून आपण शिकतो की भाऊबहिणींना फक्‍त प्रोत्साहन देणारे शब्द बोलूनच नाही, तर त्यांच्यासोबत वेळ घालवून आणि त्यांना मदत करूनसुद्धा आपण त्यांना सांत्वन देऊ शकतो.—१ योहा. ३:१८.

छळाच्या वेळी खरे मित्र बना

एकमेकांना साथ देण्याच्या बाबतीत रशियामधल्या भाऊबहिणींनी खूप चांगलं उदाहरण मांडलंय. सरगेई आणि त्यांची पत्नी तातियाना यांच्या उदाहरणाचा विचार करा. एकदा पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली आणि त्यानंतर त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले. सगळ्यात आधी तातियानाला सोडण्यात आलं आणि त्या घरी आल्या. सरगेई म्हणतात: “तातियाना जशी घरी आली तशी एक बहीण धाडस दाखवून तिला भेटायला आली. त्यानंतर आणखी भाऊबहीण तिला भेटायला आले आणि त्यांनी अस्तव्यस्त झालेलं घर साफ करायला तिला मदत केली.”

सरगेई पुढे म्हणतात: “मला नीतिवचनं १७:१७ हे वचन पहिल्यापासूनच खूप आवडतं. तिथे म्हटलंय, ‘खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.’ पण या छळाच्या काळात हे शब्द मला आणखी खरे वाटले. या काळात मला भाऊबहिणींची सगळ्यात जास्त गरज होती. आणि यहोवाने मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मित्र दिलेत.”

या कठीण काळात आपल्याला आपल्या मित्रांची खूप गरज आहे. आणि मोठ्या संकटाच्या काळात तर आपल्याला त्यांची आणखी गरज लागेल. त्यामुळे आपण सगळे आतापासूनच खरे मित्र व्हायचा प्रयत्न करत राहू या!—१ पेत्र ४:७, ८.