जीवन कथा
“मी कधीच एकटा नव्हतो”
जीवनातल्या बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला एकटं वाटू शकतं; जसं की प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा, आपण नवीन ठिकाणी जातो तेव्हा आणि आपण एकटे असतो तेव्हा. माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. पण तरी मागे वळून पाहताना मला जाणवतं, की मी कधीच एकटा नव्हतो. चला याचं कारण मी तुम्हाला सांगतो.
माझ्या आईवडिलांचं उदाहरण
माझे आईवडील कट्टर कॅथोलिक होते. पण जेव्हा त्यांना बायबलमधून कळलं की देवाचं नाव यहोवा आहे तेव्हा ते आवेशी साक्षीदार बनले. माझे बाबा लाकडापासून येशूच्या मूर्ती बनवायचे. पण नंतर त्यांनी त्यांच्या सुतारकामाच्या कलेचा वापर करून आमच्या घराच्या तळमजल्याला राज्य सभागृह बनवलं. सॅन व्हॉन डेल मॉन्टमधलं हे पहिलं सभागृह होतं. हे फिलिपीन्झची राजधानी मनिलामधलं शहर होतं.
माझा जन्म १९५२ चा. मला चार मोठे भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी आहेत. आमच्या आईवडिलांनी आम्हा सगळ्या भावंडांना यहोवाबद्दल शिकवलं. मला आठवतंय, लहानपणी माझे बाबा मला रोज बायबलचा एक अध्याय वाचायला सांगायचे. तसंच, ते आपल्या वेगवेगळ्या प्रकाशनांचा वापर करून माझ्यासोबत अभ्यास करायचे. कधीकधी माझे आईवडील प्रवासी पर्यवेक्षकांना आणि शाखा कार्यालयातल्या भावांना आमच्या घरी राहायला बोलवायचे. जेव्हा हे भाऊ आम्हाला त्यांचे अनुभव सांगायचे तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा आणि खूप प्रोत्साहन मिळायचं. यामुळेच आम्हाला यहोवाच्या सेवेला आमच्या जीवनात पहिली जागा देता आली.
माझे आईवडील विश्वासाचा वारसा आमच्यासाठी सोडून गेले. माझी आई आजारपणातच वारली. त्यानंतर मी आणि बाबांनी १९७१ ला सोबत मिळून पायनियर सेवा सुरू केली. पण १९७३ ला जेव्हा मी २० वर्षांचा झालो तेव्हा माझे वडीलही वारले. आई आणि बाबा दोघांनाही गमावल्यामुळे मला खूप एकटं पडल्यासारखं वाटायचं. पण बायबलमधल्या ‘खातरीलायक आणि पक्क्या आशेमुळे’ मला भावनिक रित्या आणि आध्यात्मिक रित्या स्थिर राहायला मदत झाली. (इब्री ६:१९) माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर, मी खास पायनियर म्हणून नेमणूक स्वीकारली. ही नेमणूक पालावानमधल्या कोरॉन नावाच्या दुर्गम बेटावर होती.
कठीण नेमणुकांमध्ये एकटेपणा
मी कोरॉनला गेलो तेव्हा २१ वर्षांचा होतो. मी लहानपणापासून शहरातच राहिलो होतो. त्यामुळे, त्या बेटावर गेल्यावर तिथली परिस्थिती पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. तिथे वीज-पाण्याची इतकी काही चांगली सोय नव्हती आणि येण्या-जाण्याची साधनंही कमी होती. तिथे आपले थोडेफार भाऊबहीण असले तरी माझ्यासोबत पायनियर सेवा करायला
कोणीच नव्हतं. म्हणून मी कधीकधी एकटाच प्रचाराला जायचो. पहिल्या महिन्यात तर मला माझ्या कुटुंबाची आणि मित्रांची खूप आठवण आली. रात्रीच्या वेळी मी ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे एकटक पाहायचो आणि रडायचो. असं वाटायचं की सगळं सोडून परत घरी जावं.मला आठवतंय, त्या वेळी मी यहोवासमोर माझं मन मोकळं करायचो. मला काय वाटतं, काय नाही वाटत ते सगळं मी त्याला सांगायचो. तसंच, मी बायबलमध्ये आणि आपल्या प्रकाशनांमध्ये वाचलेल्या प्रोत्साहनदायक गोष्टी आठवायचा प्रयत्न करायचो. माझ्या मनात सहसा स्तोत्र १९:१४ यायचं. मला जाणवलं की जर मला यहोवाला “माझा खडक आणि माझा सोडवणारा” बनवायचं असेल, तर मी त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर मनन केलं पाहिजे. जसं की, मी त्याच्या कार्यांवर आणि गुणांवर मनन केलं पाहिजे. इंग्रजी टेहळणी बुरूज मधल्या “तुम्ही कधीच एकटे नाहीत” a या लेखामुळे मला खूप मदत झाली. मी ते सारखंसारखं वाचायचो. एका अर्थी त्या काळात मी यहोवासोबत एकटा होतो. आणि त्यामुळे मला प्रार्थना करायच्या, अभ्यास करायच्या आणि मनन करायच्या बऱ्याच संधी मिळाल्या.
कोरॉनमध्ये आल्याच्या काही काळातच मला वडील म्हणून नेमण्यात आलं. मी तिथे एकटाच वडील होतो. म्हणून मला ईश्वरशासित सेवा प्रशाला, सेवा सभा, मंडळीचा पुस्तक अभ्यास आणि टेहळणी बुरूज अभ्यास चालवावा लागायचा. तसंच, मी दर आठवडी जाहीर भाषणही द्यायचो. एक गोष्ट पक्की होती की एकटं वाटायला आता माझ्याकडे वेळच नव्हता.
मला कोरॉनमध्ये प्रचार करायला खूप मजा यायची. खूप चांगले चांगले लोक भेटायचे तिथे. माझ्या काही बायबल विद्यार्थ्यांनी नंतर बाप्तिस्माही घेतला. पण समस्याही तितक्याच होत्या. कधीकधी मला क्षेत्रात पोहोचण्यासाठी अर्धा दिवस चालावं लागायचं आणि तिथे गेल्यावर मी कुठे राहणार हेही मला माहीत नसायचं. आमच्या मंडळीच्या क्षेत्रात बरीच छोटीछोटी बेटंसुद्धा होती. तिथे जाण्यासाठी मी सहसा मोटरबोटने प्रवास करायचो. कधीकधी समुद्रात वादळ उठायचं आणि मला पोहता यायचं नाही. या सगळ्या समस्या असतानाही यहोवाने मला सुरक्षित ठेवलं. नंतर माझ्या लक्षात आलं, की यहोवा खरंतर मला माझ्या पुढच्या नेमणुकीसाठी आणि आणखी मोठ्या समस्यांसाठी तयार करत होता.
पापुआ न्यू गिनी
१९७८ मध्ये मला पापुआ न्यू गिनीमध्ये नेमण्यात आलं. हा देश ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडे आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये बरेच डोंगर आहेत. आणि हा देश जवळजवळ स्पेन इतका मोठा असावा. इथले जवळपास ३० लाख लोक, ८०० पेक्षा जास्त भाषा बोलतात. हे जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. पण चांगली गोष्ट म्हणजे बरेच लोक मेलनेशियन पिजिन भाषा बोलायचे. या भाषेला टॉक पिसिन म्हणतात.
मला काही काळासाठी टॉक पिसिनच्या राजधानी शहरात, पोर्ट मोरेस्बीमधल्या इंग्रजी भाषेच्या मंडळीत पाठवण्यात आलं. पण नंतर, मी टॉक पिसिन मंडळीत गेलो आणि त्या भाषेचा क्लास केला. क्लासमध्ये शिकलेल्या गोष्टी मी प्रचारात वापरू लागलो. त्यामुळे मला ही भाषा पटकन शिकता आली. थोड्या काळातच मला टॉक पिसिनमध्ये भाषणही देता आलं. आश्चर्य म्हणजे पापुआ न्यू गिनीमध्ये येऊन मला एक वर्षही झालं नव्हतं आणि मला तिथल्या टॉक पिसिन मंडळ्यांसाठी विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. या मंडळ्या वेगवेगळ्या प्रांतात होत्या.
तिथल्या या मंडळ्या खूप लांबलांब होत्या, म्हणून मला बरीच विभागीय संमेलनं आयोजित करावी लागायची आणि बराच प्रवास करावा लागायचा. सुरुवातीला माझ्यासाठी सगळंच नवीन होतं—नवीन देश, नवीन भाषा, नवीन संस्कृती.
म्हणून मला कधीकधी खूप एकटं वाटायचं. तसंच, तो प्रदेश डोंगराळ असल्यामुळे आणि रस्तेपण ओबडधोबड असल्यामुळे एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत जाण्यासाठी मी रस्त्याने प्रवास करू शकत नव्हतो. त्यामुळे मला जवळपास दर आठवडीच विमानाने प्रवास करावा लागायचा. कधीकधी तर खराब अवस्थेत असलेल्या विमानात मी एकटाच प्रवासी असायचो. बोटीने प्रवास करताना मला जितकी भीती वाटायची तितकीच भीती मला विमानाने प्रवास करताना वाटायची.त्या काळात खूप कमी लोकांकडे फोन होते, म्हणून मंडळ्यांना संपर्क करण्यासाठी मला पत्रं लिहावी लागायची. बऱ्याचदा माझ्या पत्रांच्या आधी मीच तिथे पोहोचायचो. आणि तिथे गेल्यागेल्या मला तिथल्या स्थानिक लोकांना विचारावं लागायचं की साक्षीदार कुठे राहतात. जेव्हाजेव्हा मी भावांना भेटायचो तेव्हातेव्हा ते माझं खूप प्रेमाने स्वागत करायचे. त्यांचं हे प्रेम पाहून मला माझ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटायचं. मी बऱ्याच मार्गांनी यहोवाची मदत अनुभवली आहे. आणि त्यामुळे त्याच्यासोबतचं माझं नातं मजबूत होत गेलं.
मी पहिल्यांदा बोगनवेल बेटावर गेल्यावर मला एक जोडपं भेटायला आलं. मला पाहून ते खूप खूश झालं आणि त्यांनी मला विचारलं: “ओळखलं का आम्हाला?” मला आठवलं की मी जेव्हा पहिल्यांदा पोर्ट मोरेस्बीला आलो होतो तेव्हा मी या जोडप्याला प्रचार केला होता. मी त्यांच्यासोबत बायबल अभ्यासही सुरू केला होता आणि नंतर तो एका भावाला चालवायला दिला होता. आता त्या दोघांचाही बाप्तिस्मा झाला होता. पापुआ न्यू गिनीमध्ये मला बरेच आशीर्वाद मिळाले आणि हा त्यांपैकी एक होता.
यहोवाच्या सेवेत असलेलं आमचं छोटंसं कुटुंब
१९७८ ला पापुआ न्यू गिनीला जायच्या आधी माझी ॲडल नावाच्या एका बहिणीशी भेट झाली होती. ती खूप प्रेमळ होती आणि तिने बरेच त्याग केले होते. तिला दोन मुलं होती. सॅम्युएल आणि शर्ली. ती एकटीच त्यांचा सांभाळ करायची आणि त्यांचा सांभाळ करताकरता पायनियर सेवाही करायची. तसंच, तिच्या वयस्कर आईचीही काळजी घ्यायची. मे १९८१ ला मी फिलिपीन्झला परत आलो आणि ॲडलशी लग्न केलं. आमच्या लग्नानंतर आम्ही दोघंही पायनियर सेवा करू लागलो आणि कुटुंबाची काळजी घेऊ लागलो.
माझं कुटुंब असूनही १९८३ मध्ये मला खास पायनियर म्हणून पुन्हा सेवा करायची संधी मिळाली. आणि माझी नेमणूक पालावान प्रांतातल्या लिनापकान बेटावर होती. त्यामुळे आमचं पूर्ण कुटुंब या दुर्गम भागात राहायला गेलं. तिथे कोणीच साक्षीदार नव्हते. याच्या एका वर्षानंतर ॲडलची आई वारली. पण प्रचारात व्यस्त असल्यामुळे आम्हाला आमच्या या दुःखातून सावरायला मदत झाली. त्या बेटावर आम्ही बरेच चांगले बायबल अभ्यास चालवले. त्या लोकांना सभांना हजर राहायची इच्छा असल्यामुळे आम्हाला एक छोटंसं राज्य सभागृह लागणार होतं. म्हणून आम्ही स्वतःच ते बांधलं. त्या बेटावर यायच्या तीन वर्षांतच ११० लोक स्मारकविधीला उपस्थित राहिले. आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही गेल्यावर त्यांतल्या बऱ्याच जणांनी बाप्तिस्मा घेतला.
१९८६ मध्ये मला क्युलियन नावाच्या बेटावर नेमण्यात आलं. तिथे कुष्ठरोगी लोक राहायचे. त्यानंतर ॲडललाही खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. सुरुवातीला आम्हाला त्या लोकांना प्रचार करायला खूप भीती वाटायची. पण तिथल्या स्थानिक प्रचारकांनी आम्हाला सांगितलं की त्यांना उपचार मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला संसर्ग होण्याची खूप कमी शक्यता आहे. त्यांच्यातले काही कुष्ठरोगी एका बहिणीच्या घरी सभेला यायचे. लवकरच आमच्या मनातून त्यांना प्रचार करायची भीती निघून गेली. त्यांना लूक ५:१२, १३.
वाटायचं की देवाने आणि समाजाने त्यांना झिडकारलंय. त्यामुळे अशा लोकांना बायबलच्या आशेबद्दल सांगून खूप छान वाटायचं. भविष्यात आपलं आरोग्य चांगलं असेल हे जेव्हा त्यांना कळायचं तेव्हा त्यांना खूप आनंद व्हायचा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप आनंद व्हायचा.—आमच्या मुलांनाही क्युलियन बेटावर खूप मज्जा आली. त्यांना एक चांगली संगत मिळावी म्हणून मी आणि ॲडलने कोरॉनवरून दोन तरुण बहिणींना आमच्यासोबत राहायला बोलवलं होतं. सॅम्युएल, शर्ली आणि या दोन बहिणींना प्रचार करायला खूप मज्जा यायची. ते चौघं बऱ्याच लहान मुलांसोबत बायबल अभ्यास करायचे. आणि त्या मुलांच्या आईवडिलांसोबत मी आणि ॲडल अभ्यास करायचो. एक वेळ अशी आली, की आम्ही ११ कुटुंबांसोबत बायबल अभ्यास करत होतो. बघताबघता आम्ही इतके चांगले बायबल अभ्यास चालवू लागलो की तिथे आम्हाला एक नवीन मंडळी सुरू करता आली.
सुरुवातीला त्या क्षेत्रात मी एकटाच वडील होतो. त्यामुळे शाखा कार्यालयाने मला क्युलियनमधल्या आठ प्रचारकांसाठी आठवड्याच्या सभा चालवायला सांगितलं. तसंच, मरिली गावातल्या नऊ प्रचारकांसाठीही मला आठवड्याच्या सभा चालवायच्या होत्या. क्युलियनमधून मरिलीला जायला बोटीने तीन तास लागायचे. मरिलीमध्ये सभा झाल्यानंतर आम्ही पूर्ण कुटुंब हॉलसी गावात बायबल अभ्यास घ्यायला बरेच तास डोंगरांमधून चालत जायचो.
काही काळाने मरिली आणि हॉलसीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. त्यामुळे आम्हाला दोन्ही ठिकाणी राज्य सभागृहं बांधावी लागली. लिनापकानसारखंच इथल्या भावांनी आणि आवड दाखवणाऱ्या लोकांनी बांधकामाचं बरंच सामान पुरवलं. तसंच त्यांनी बांधकामाला हातभारसुद्धा लावला. मरिलीमधल्या सभागृहात २०० लोक बसू शकत होते. आणि ते सभागृह मोठंही करता येऊ शकत होतं. त्यामुळे तिथे संमेलनंही भरवता येत होती.
दुःख, एकटेपणा पण आनंदी
१९९३ पर्यंत आमची मुलं बरीच मोठी झाली होती. त्यामुळे ॲडल आणि मी फिलिपीन्झमध्ये विभागीय कार्याची सुरुवात केली. मग २००० साली मी सेवा प्रशिक्षण प्रशालेला हजर राहिलो. तिथे मला त्या प्रशालेसाठी प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात आलं. मला हे काम जमणार नाही असं वाटत होतं, पण ॲडलने मला नेहमी प्रोत्साहन दिलं. तिने मला याची आठवण करून दिली की या नवीन नेमणुकीसाठी लागणारं बळ यहोवा मला देईल. (फिलिप्पै. ४:१३) ॲडल तिच्या अनुभवाने बोलत होती. कारण यहोवा तिलासुद्धा आजारपणात आपली नेमणूक पूर्ण करायचं बळ देत होता.
२००६ साली प्रशिक्षकाचं काम करत असताना आम्हाला समजलं, की ॲडलला पार्किन्सन नावाचा आजार झालाय. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला! मी ॲडलला म्हटलं की आपण पुन्हा घरी जाऊ या. पण ती म्हणाली, “तुम्ही माझ्यासाठी एक चांगला डॉक्टर शोधा. बाकी यहोवा बघून घेईल.” पुढची सहा वर्षं ॲडल कोणतीही तक्रार न करता यहोवाची सेवा करत राहिली. जेव्हा तिला चालणं अशक्य झालं तेव्हा ती व्हिलचेअरवरून प्रचार करायची. जेव्हा तिला बोलायला अवघड जात होतं, तेव्हाही ती एकदोन शब्दांत सभांमध्ये उत्तरं द्यायची. ॲडलला भाऊबहिणींकडून प्रोत्साहन देणारे खूप मॅसेज मिळायचे. ते तिला सांगायचे की त्यांच्यासमोर तिचं खूप चांगलं उदाहरण आहे. नंतर २०१३ मध्ये ती आम्हाला सोडून गेली. एका विश्वासू आणि प्रेमळ जोडीदारासोबत ३० पेक्षा जास्त वर्षांचा माझा सुखी संसार संपला होता. त्यामुळे मला परत दुःख आणि एकटेपणा सतावू लागला.
ॲडलची इच्छा होती की मी सेवा करत राहावी. त्यामुळे मी तसंच केलं. मी स्वतःला व्यस्त ठेवलं. आणि यामुळे मला माझ्या एकटेपणावर मात करता आली. २०१४ पासून ते २०१७ पर्यंत, ज्या देशांत आपल्या कामावर बंदी होती त्या देशांतल्या टॅगलॉग भाषेतल्या मंडळ्यांना भेट देण्यासाठी मला नेमण्यात आलं. त्यानंतर मी ताइवान, अमेरिका आणि कॅनडामधल्या टॅगलॉग मंडळ्यांना भेटी दिल्या. २०१९ मध्ये मला भारतात आणि थायलँडमध्ये इंग्रजी भाषेत सुवार्तिकांची प्रशाला चालवायची संधी मिळाली. या सगळ्या नेमणुकांमधून मला खूप आनंद मिळाला. जेव्हा मी यहोवाच्या सेवेत व्यस्त असतो, तेव्हा मी जगातला सर्वात आनंदी माणूस असतो.
नेहमी उपलब्ध असणारी मदत
प्रत्येक नेमणूक पार पाडत असताना, भाऊबहिणींसोबत माझं जवळचं नातं निर्माण होतं. त्यामुळे त्यांना सोडून जाताना खूप वाईट वाटतं. अशा वेळी मी पूर्णपणे यहोवावर भरवसा ठेवायला शिकलोय. तसंच मी नेहमी त्याचा पाठिंबाही अनुभवलाय. यामुळे मला कुठलाही बदल मनापासून स्वीकारायला मदत झाली आहे. आज मी फिलिपीन्झमध्ये खास पायनियर म्हणून सेवा करतोय. मी माझ्या नवीन मंडळीत खूप खूश आहे. ही मंडळी मला कुटुंबासारखी माया लावते, माझी काळजी घेते. माझी लेकरं सॅम्युएल आणि शर्ली त्यांच्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवून विश्वासूपणे सेवा करत आहेत. आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे.—३ योहा. ४.
हो, मी माझ्या आयुष्यात बऱ्याच समस्यांचा सामना केलाय. मी माझ्या बायकोला एका गंभीर आजाराचा सामना करताना आणि शेवटचा श्वास घेताना पाहिलंय. तसंच मला बऱ्याच नवीन परिस्थितींशी जुळवून घ्यावं लागलंय. तरी मी पाहिलंय की यहोवा “आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कार्यं १७:२७) यहोवाचा “हात इतका तोकडा नाही” की तो त्याच्या सेवकांना आधार आणि बळ देणार नाही. आणि ही गोष्ट मी दुर्गम भागांतल्या क्षेत्रातही अनुभवली आहे. (यश. ५९:१) यहोवा, माझा खडक, आयुष्यभर माझ्या पाठीशी होता आणि त्यासाठी मी त्याचे खूप आभार मानतो. खरंच, मी कधीच एकटा नव्हतो.
a इंग्रजीतल्या १ सप्टेंबर, १९७२ च्या टेहळणी बुरूज अंकातली पानं ५२१-५२७ पाहा.