अभ्यास लेख ६
गीत १८ खंडणीसाठी कृतज्ञ
यहोवाची क्षमा—आपण कदर का करतो?
“देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला.”—योहा. ३:१६.
या लेखात:
यहोवा आपल्या पापांची क्षमा कोणत्या आधारावर करतो हे समजून घेऊन त्याबद्दल आपली कदर कशी वाढवता येईल ते पाहा.
१-२. आपल्या सगळ्यांची परिस्थिती परिच्छेद १ मध्ये सांगितलेल्या तरुणासारखी कशी आहे?
श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या एका तरुणाची कल्पना करा. एक दिवस त्याला कळतं, की त्याच्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. ही वाईट बातमी कळल्यावर तो पूर्णपणे हादरून जातो. पण या तरुणाला आणखी एक धक्कादायक गोष्ट कळते. त्याला कळतं, की त्याच्या आईवडिलांनी आपली सगळी संपत्ती वाया घालवली आहे आणि ते कर्जबाजारी झाले आहेत. आता परिस्थिती अशी आहे, की त्याला वारशाने संपत्ती मिळण्याऐवजी अतिशय मोठं कर्ज मिळालंय. आणि हे कर्ज फेडण्याची वेळ आता त्याच्यावर आली आहे. पण हे कर्ज इतकं मोठं आहे की तो ते कधीच फेडू शकणार नाही.
२ एका अर्थाने आपली परिस्थिती या तरुणासारखीच आहे. आपले सर्वात पहिले पालक आदाम आणि हव्वा परिपूर्ण होते आणि ते एका सुंदर नंदनवनात राहत होते. (उत्प. १:२७; २:७-९) त्यांना एका सुंदर आणि कायमच्या जीवनाचा आनंद घ्यायची आशा होती. पण नंतर सर्वकाही बदललं. त्यांनी त्यांचं नंदनवनासारखं घर तर गमावलंच पण त्यासोबतच कायमच्या जीवनाची आशासुद्धा गमावली. पण मग आता ते त्यांच्या मुलांना कोणता वारसा देणार होते? बायबल म्हणतं: “एका माणसाद्वारे [आदामद्वारे] पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं.” (रोम. ५:१२) आदामने आपल्याला वारशाने पाप दिलं आहे आणि त्याचा परिणाम मृत्यू आहे. हे वारशाने मिळालेलं पाप एका मोठ्या कर्जासारखं आहे आणि आपल्यापैकी कोणीही ते कधीच फेडू शकत नाही.—स्तो. ४९:८.
३. आपल्या पापांची तुलना ‘कर्जाशी’ का करण्यात आली आहे?
३ येशूने पापाची तुलना ‘कर्जासोबत’ केली आहे. (मत्त. ६:१२; लूक ११:४) आपण पाप करतो तेव्हा आपण यहोवाचे कर्जदार बनतो आणि या पापाची भरपाई आपल्याला करावी लागते. हे कर्ज जर आपण फेडलं नाही, तर आपण मेल्यावरच ते रद्द केलं जातं.—रोम. ६:७, २३.
४. (क) जर मदत मिळाली नसती तर सगळ्या पापी लोकांचं काय झालं असतं? (स्तोत्र ४९:७-९) (ख) बायबलमध्ये “पाप” हा शब्द कशाला सूचित करतो? (“ पाप” ही चौकट पाहा.)
४ आदाम आणि हव्वाने जे गमावलं ते सगळं परत मिळवणं आपल्याला शक्य आहे का? हो. पण स्वतःच्या बळावर नाही. (स्तोत्र ४९:७-९ वाचा.) आपल्याला जर मदत मिळाली नसती, तर भविष्यात मिळणाऱ्या जीवनाची किंवा पुनरुत्थानाची आपल्याला आशा मिळाली नसती. आणि आपला मृत्यू हा इतर प्राण्यांसारखाच कोणत्याही आशेविना झाला असता.—उप. ३:१९; २ पेत्र २:१२.
५. वारशाने मिळालेल्या पापाचं कर्ज फेडण्यासाठी आपल्या प्रेमळ पित्याने आपल्याला कशी मदत केली आहे? (चित्र पाहा.)
५ सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्या तरुणाचा विचार करा. जर एखादा श्रीमंत माणूस त्याचं सर्व कर्ज फेडायला पुढे आला असता, तर त्या तरुणाला कसं वाटलं असतं? त्या श्रीमंत माणसाने दाखवलेली उदारता पाहून त्या तरुणाने नक्कीच त्याचे खूप आभार मानले असते आणि ती भेट स्वीकारली असती. त्याचप्रमाणे आपल्या प्रेमळ पित्याने, यहोवाने आपल्याला आदामकडून वारशाने मिळालेल्या पापाचं कर्ज फेडण्यासाठी एक भेट दिली आहे. येशूने याबद्दल बोलताना म्हटलं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहा. ३:१६) शिवाय, या भेटीमुळे आपल्याला यहोवासोबत एक चांगलं नातं जोडायची संधीसुद्धा मिळते.
६. या लेखात आपण बायबलमधल्या कोणत्या शब्दांवर चर्चा करणार आहोत आणि का?
६ या अद्भुत भेटीमुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो आणि आपली पापं किंवा आपली “कर्जं” कशी माफ होऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बायबलमध्ये काही शब्दांचा वापर कसा करण्यात आलाय, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते शब्द म्हणजे: समेट, प्रायश्चित्त, खंडणी, सुटका आणि नीतिमान ठरवलं जाणं. या लेखात आपण या शब्दांवर आणि त्यांच्या अर्थावर चर्चा करणार आहोत. या माहितीवर मनन करत असताना यहोवा ज्या आधारावर आपल्याला क्षमा करतो, त्याबद्दलची आपली कदर आणखी वाढत जाईल.
उद्देश: समेट
७. (क) आदाम आणि हव्वा यांनी आणखी काय गमावलं? (ख) आदाम आणि हव्वाची मुलं या नात्याने आपल्याला कशाची खूप गरज आहे? (रोमकर ५:१०, ११)
७ कायमच्या जीवनाची आशा गमावण्यासोबतच आदाम आणि हव्वाने त्यांचा पिता, यहोवा याच्यासोबत असलेलं त्यांचं मौल्यवान नातंसुद्धा गमावलं. आणि अशा प्रकारे ते एका अर्थाने त्याचे शत्रू बनले. सुरुवातीला आदाम आणि हव्वा देवाच्या कुटुंबाचाच एक भाग होते. (लूक ३:३८) पण जेव्हा त्यांनी यहोवाची आज्ञा मोडली तेव्हा त्यांना त्या कुटुंबातून काढून टाकण्यात आलं. तोपर्यंत त्यांना मुलं झाली नव्हती. (उत्प. ३:२३, २४; ४:१) त्यामुळे त्यांची मुलं या नात्याने आपण यहोवाशी समेट करणं गरजेचं आहे. (रोमकर ५:१०, ११ वाचा.) दुसऱ्या शब्दांत, आपण त्याच्यासोबत चांगलं नातं जोडणं गरजेचं आहे. एका संदर्भ ग्रंथात म्हटल्याप्रमाणे इथे “समेट” यासाठी वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “शत्रूपासून मित्र बनणं” असा होऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे शक्य करण्यासाठी यहोवानेच पुढाकार घेतला. तो कसा?
व्यवस्था: प्रायश्चित्त
८. प्रायश्चित्ताची व्यवस्था म्हणजे काय?
८ यहोवाने त्याच्यामध्ये आणि पापी मानवांमध्ये चांगलं नातं पुन्हा जोडण्याची व्यवस्था केली. ती व्यवस्था म्हणजे प्रायश्चित्ताची व्यवस्था. आदामने एक खूप मोलाची गोष्ट गमावली होती. ती गोष्ट परत मिळवण्यासाठी यहोवाने त्याच किंमतीची दुसरी गोष्ट द्यायची व्यवस्था केली. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्येही प्रायश्चित्ताबद्दल सांगितलंय. मानवांना यहोवासोबत शांतीचं नातं जोडता यावं म्हणून यहोवाने काय केलं हे त्यात सांगितलंय.—रोम. ३:२५.
९. इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून यहोवाने कोणती तात्पुरती व्यवस्था केली होती?
९ यहोवाने इस्राएली लोकांना त्याच्यासोबत चांगला नातेसंबंध जोडता यावा आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून एक तात्पुरती व्यवस्था केली. इस्राएलमध्ये दर वर्षी प्रायश्चित्ताचा दिवस साजरा केला जायचा. त्या दिवशी मुख्य याजक लोकांच्या वतीने प्राण्यांचं अर्पण द्यायचा. खरंतर या प्राण्यांच्या बलिदानांमुळे कोणाच्याही पापांचं पूर्णपणे प्रायश्चित्त होऊ शकत नव्हतं. कारण प्राण्यांचा दर्जा मानवांपेक्षा कमी आहे. पण जोपर्यंत पश्चात्तापी इस्राएली लोक यहोवाने अपेक्षा केल्याप्रमाणे ही अर्पणं त्याला द्यायचे, तोपर्यंत तो त्यांच्या पापांची क्षमा करायला तयार होता. (इब्री १०:१-४) प्रायश्चित्ताच्या दिवशी आणि इतर वेळी दिल्या जाणाऱ्या बलिदानांमुळे इस्राएली लोकांना या गोष्टीची जाणीव होत होती, की ते खूप पापी आहेत आणि त्यांच्या पापांची पूर्णपणे क्षमा करण्यासाठी त्यांना आणखी मोठ्या बलिदानाची गरज आहे.
१०. पापांची क्षमा करायला यहोवाने कोणती कायमची व्यवस्था केली?
१० मानवजातीच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून यहोवाच्या मनात एक कायमची व्यवस्था करायची इच्छा होती. म्हणून त्याने आपल्या प्रिय मुलाला ‘पुष्कळ लोकांच्या पापांचा भार वाहून न्यायला सर्वकाळासाठी एकदाच अर्पण’ द्यायची व्यवस्था केली. (इब्री ९:२८) म्हणून येशूने “बऱ्याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून” दिलं. (मत्त. २०:२८) पण खंडणी म्हणजे काय?
किंमत: खंडणी
११. (क) बायबलनुसार खंडणी म्हणजे काय? (ख) खंडणी देण्यासाठी कशाची गरज होती?
११ बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे खंडणी ही प्रायश्चित्त आणि समेट घडवून आणण्यासाठी दिलेली किंमत आहे. a यहोवाच्या दृष्टिकोनातून, गमावलेली गोष्ट परत मिळवायला त्यामुळे आधार मिळतो. ते कसं? लक्षात घ्या की आदाम आणि हव्वा यांनी त्यांचं परिपूर्ण जीवन तर गमावलंच होतं, पण त्यासोबत कायम जगण्याची आशासुद्धा गमावली होती. त्यामुळे या खंडणीची किंमत ही गमावलेल्या गोष्टीइतकीच असणं गरजेचं होतं. (१ तीम. २:६) ही किंमत एक असा प्रौढ पुरुषच देऊ शकणार होता, (१) जो परिपूर्ण होता, (२) ज्याच्याकडे पृथ्वीवर कायम जगण्याची क्षमता होती आणि (३) जो आपल्यासाठी या जीवनाचा त्याग करायला तयार होता. या अटी पूर्ण केल्यामुळेच त्या पुरुषाच्या जीवनाने गमावलेल्या गोष्टीची भरपाई होणार होती.
१२. येशू खंडणीची किंमत का चुकवू शकला?
१२ येशू खंडणीची किंमत का चुकवू शकला याची तीन कारणं आहेत. (१) तो परिपूर्ण होता. ‘त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं.’ (१ पेत्र २:२२) (२) त्यामुळेच त्याच्याकडे पृथ्वीवर कायम जगण्याची क्षमता होती. आणि (३) हे जीवन देऊन तो आपल्यासाठी मरायला तयार होता. (इब्री १०:९, १०) पाप करण्याआधी आदाम जसा होता तसाच येशू परिपूर्ण होता. (१ करिंथ. १५:४५) म्हणून येशू स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन आदामच्या पापाचं प्रायश्चित्त करू शकला. म्हणजेच आदामने जे गमावलं होतं त्याची भरपाई करू शकला. (रोम. ५:१९) अशा प्रकारे येशू “शेवटला आदाम” बनला. त्यामुळे आदामने जे गमावलं त्याची किंमत चुकवण्यासाठी दुसऱ्या परिपूर्ण व्यक्तीला यायची आणि त्याची भरपाई करायची गरज नव्हती. कारण येशू “सर्वकाळासाठी एकदाच” मरण पावला.—इब्री ७:२७; १०:१२.
१३. प्रायश्चित्ताची व्यवस्था आणि खंडणी यात काय फरक आहे?
१३ तर मग प्रायश्चित्ताची व्यवस्था आणि खंडणी यात काय फरक आहे? आपल्या सगळ्यांचं देवासोबत असलेलं नातं पुन्हा पहिल्यासारखं व्हावं म्हणून देवाने केलेलं कार्य म्हणजे प्रायश्चित्ताची व्यवस्था. आणि पापी माणसांना हे प्रायश्चित्त करणं शक्य व्हावं म्हणून जी किंमत देण्यात आली त्याला खंडणी म्हटलंय. खंडणीची ही किंमत म्हणजे येशूने आपल्या सगळ्यांसाठी ओतलेलं त्याचं मौल्यवान रक्त.—इफिस. १:७; इब्री ९:१४.
फायदे: सुटका आणि नीतिमान ठरवलं जाणं
१४. आपण काय पाहणार आहोत आणि का?
१४ यहोवाने आपल्यासाठी जी प्रायश्चित्ताची व्यवस्था केली त्याचा आपल्याला कसा फायदा होतो? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण बायबलमधल्या दोन गोष्टींचा अर्थ समजून घेऊ या. यामुळे यहोवाच्या माफीचा आपल्याला कसा फायदा होतो ते समजून घ्यायला आपल्याला मदत होईल.
१५-१६. (क) येशूने दिलेल्या खंडणीमुळे आपल्याला काय फायदा झाला आहे? (ख) पाप आणि मृत्यूपासून आपली सुटका होईल हे जाणून तुम्हाला कसं वाटतं?
१५ बायबलमध्ये म्हटलंय, की येशूने दिलेल्या खंडणीमुळे आपल्याला सुटका मिळाली आहे किंवा आपण मुक्त झालो आहोत. प्रेषित पेत्रने ही गोष्ट अशा प्रकारे स्पष्ट केली: “तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ जीवनशैलीतून, सोनं किंवा चांदी यांसारख्या नाशवंत गोष्टींनी तुमची सुटका करण्यात आलेली नाही [शब्दशः “तुम्हाला खंडणी देऊन सोडवण्यात आलेलं नाही”]. तर, एका निष्कलंक आणि निर्दोष कोकऱ्याच्या, म्हणजेच ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुमची सुटका करण्यात आली आहे.”—१ पेत्र १:१८, १९; तळटीप.
१६ खंडणी बलिदानामुळे आपण पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून मुक्त होऊ शकतो. (रोम. ५:२१) खरंच, येशूच्या मौल्यवान रक्ताद्वारे किंवा त्याच्या जीवनामुळे आपल्याला सुटका मिळाली आहे. म्हणूनच आपण यहोवा आणि येशूचे मनापासून आभार मानले पाहिजेत.—१ करिंथ. १५:२२.
१७-१८. (क) नीतिमान ठरवलं जाण्याचा काय अर्थ होतो? (ख) त्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
१७ बायबल म्हणतं की यहोवाच्या सेवकांना नीतिमान ठरवण्यात आलंय. याचा अर्थ आपल्या पापांची आपण त्याला भरपाई द्यावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही. पण, असं करून तो न्यायासाठी असलेले त्याचे स्तर मोडत नाही. तसंच, आपण काहीतरी केलंय म्हणून तो आपल्याला नीतिमान ठरवत नाही. आणि तो आपलं पापही खपवून घेत नाही. उलट प्रायश्चित्ताच्या व्यवस्थेवर आणि खंडणी बलिदानावर आपला विश्वास असल्यामुळे त्याला आपली कर्जं माफ करायचा आधार मिळतो आणि अशा प्रकारे तो आपल्याला नीतिमान ठरवतो.—रोम. ३:२४; गलती. २:१६.
१८ आपल्या सगळ्यांसाठी याचा काय अर्थ होतो? स्वर्गात येशूसोबत राज्य करायला ज्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना देवाची मुलं म्हणून आधीच नीतिमान ठरवण्यात आलंय. (तीत ३:७; १ योहा. ३:१) त्यांच्या पापांची क्षमा करण्यात आली आहे; जणू काय ती त्यांनी कधी केलीच नव्हती. आणि त्यामुळे ते देवाच्या राज्यात जायला पात्र ठरलेत. (रोम. ८:१, २, ३०) ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे त्यांना देवाचे मित्र म्हणून नीतिमान ठरवण्यात आलंय आणि त्यांच्या पापांचीसुद्धा क्षमा करण्यात आली आहे. (याको. २:२१-२३) हर्मगिदोनातून वाचणाऱ्या मोठ्या लोक समुदायाला या पृथ्वीवर कधीही न मरता कायम जीवन जगायची आशा आहे. (योहा. ११:२६) तसंच मृत्यूच्या झोपेत असलेल्या “नीतिमान” आणि “अनीतिमान” लोकांचंसुद्धा लवकरच पुनरुत्थान होईल. (प्रे. कार्यं २४:१५; योहा. ५:२८, २९) त्यानंतर पृथ्वीवर असलेल्या यहोवाच्या सगळ्या आज्ञाधारक सेवकांना “देवाच्या मुलांचं गौरवी स्वातंत्र्य मिळेल.” (रोम. ८:२१) प्रायश्चित्ताच्या व्यवस्थेमुळे आपला पिता, यहोवा याच्याशी आपला पूर्णपणे समेट होईल. हा खरंच किती अद्भुत आशीर्वाद आहे!
१९. आपली परिस्थिती कशी बदलली आहे? (“ आपल्याला कसा फायदा होतो?” ही चौकटसुद्धा पाहा.)
१९ खरंच, आपली परिस्थिती आधी उल्लेख केलेल्या त्या तरुणासारखी होती, ज्याने आपलं सर्वकाही गमावलं. वारशाने त्याला असं कर्ज मिळालं होतं जे तो कधीच फेडू शकत नव्हता. पण आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत. कारण त्याने आपल्याला मदत केली. प्रायश्चित्ताच्या व्यवस्थेमुळे आणि खंडणी दिल्यामुळे आपली परिस्थिती बदलली आहे. येशू ख्रिस्तावर असलेल्या आपल्या विश्वासामुळे पाप आणि मृत्यूपासून मुक्त होणं किंवा सुटका मिळवणं आपल्याला शक्य आहे. यामुळे आपली पापंही जणू आपण ती कधी केलीच नव्हती अशा प्रकारे रद्द केली जाऊ शकतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला प्रेमळ पिता यहोवा याच्यासोबत आता एक चांगलं नातं जोडू शकतो.
२०. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२० यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलंय त्यावर विचार केल्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल खूप कदर वाटते. (२ करिंथ. ५:१५) त्यांच्या मदतीशिवाय आपल्याला काहीच आशा नसती. पण यहोवा जेव्हा आपल्याला माफ करतो तेव्हा त्याचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.
गीत १० यहोवाचा जयजयकार करा!
a काही भाषांमध्ये “खंडणी” हा शब्द अशा प्रकारे भाषांतरित करण्यात आलाय, ज्याचा शब्दशः अर्थ “जीवनाची किंमत” किंवा “दिलेली किंमत” असा होतो.