व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या बंधुभगिनींना व्यावहारिक मदतीची, मानसिक आधाराची किंवा बायबलमधून प्रोत्साहन देण्याची गरज आहे का, हे ओळखण्याचा प्रयत्न करा

तुम्ही तुमच्या मंडळीत मदत करू शकता का?

तुम्ही तुमच्या मंडळीत मदत करू शकता का?

स्वर्गात जाण्याआधी येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) पण, संपूर्ण पृथ्वीवर राज्याचा प्रचार करणं त्यांना कसं शक्य होणार होतं?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, मार्टिन गुडमन असं म्हणतात, “प्रचारकार्याची जाणीवच ख्रिश्चनांना इतर धार्मिक गटांपेक्षा वेगळं करणारी होती. या धार्मिक गटांमध्ये सुरवातीच्या रोमी साम्राज्यातील यहुद्यांचाही समावेश होतो.” येशू प्रचार करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. त्यामुळे खऱ्या ख्रिश्चनांनीही त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करून “देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे.” त्यांनीही सत्याविषयी आवड असलेल्यांना शोधलं पाहिजे. (लूक ४:४३) म्हणूनच पहिल्या शतकातही “प्रेषित” होते. आणि प्रेषित या शब्दाचा अर्थच एखादी गोष्ट करण्यासाठी पाठवण्यात आलेले, असा होतो. (मार्क ३:१४, सुबोध भाषांतर) शिवाय, येशूनं आपल्या अनुयायांना अशी आज्ञादेखील दिली होती, की “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.”—मत्त. २८:१८-२०.

येशूचे १२ शिष्य आज आपल्यासोबत पृथ्वीवर नसले, तरी यहोवाचे बरेच सेवक प्रचारकार्यात त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना गरज असलेल्या ठिकाणी जाण्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनीही यशयाप्रमाणेच, “हा मी आहे, मला पाठव” असा प्रतिसाद दिला. (यश. ६:८) उदाहरणार्थ, गिलियड प्रशालेतून पदवीधर झालेल्या हजारो बंधुभगिनींनी दूरच्या देशांमध्ये स्थलांतर केलं आहे. तर इतर जण आपल्याच देशातील वेगवेगळ्या भागांत स्थलांतरित झाले आहेत. शिवाय, इतर अनेकांनी एखाद्या मंडळीला किंवा गटाला मदत करण्यासाठी नवीन भाषा शिकून घेतली आहे. हे करणं त्यांच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. पण यहोवाप्रती आणि लोकांप्रती प्रेम असल्यामुळे हे बंधुभगिनी अशा प्रकारचे त्याग करण्यासाठी तयार होते. यासाठी त्यांनी अगदी काळजीपूर्वकपणे योजना केल्या आणि आपल्या वेळेचा, शक्तीचा आणि पैशांचा वापर गरज असलेल्या ठिकाणी जाऊन प्रचार करण्यासाठी केला. (लूक १४:२८-३०) हे बंधुभगिनी घेत असलेली मेहनत खरंच खूप मोलाची आहे.

आपल्यापैकी प्रत्येक जण आज गरज असलेल्या ठिकाणी जाऊन प्रचार करू शकत नाही किंवा नवीन भाषा शिकू शकत नाही. पण तरी आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्याच मंडळीत मिशनऱ्यांप्रमाणे कार्य करू शकतो.

आपल्या स्वतःच्या मंडळीत मिशनऱ्यांप्रमाणे कार्य करा

मोलाची मदत द्या. . .

पहिल्या शतकातील बरेच ख्रिश्चन स्वतःच्याच देशात राहत होते. मिशनरी नसतानाही त्यांनी आवेशानं प्रचारकार्य केलं. पौलानं तीमथ्याला असं म्हटलं, “सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीम. ४:५) पौलाचे हे शब्द पहिल्या शतकातील ख्रिश्चनांसाठी असले, तरी ते आज आपल्यालाही लागू होतात. राज्याचा संदेश सांगण्याच्या आणि शिष्य बनवण्याच्या आज्ञेचं सर्व ख्रिश्चनांनी पालन केलं पाहिजे. खरंतर आपण आपल्या स्वतःच्याच मंडळीत मिशनऱ्यांप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी कार्य करू शकतो.

उदाहरणार्थ, मिशनरी जेव्हा दुसऱ्या देशात स्थलांतरित होतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. तिथल्या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी त्यांना वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. आपल्याला गरज असलेल्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करणं शक्य नसलं, तरी प्रचार करण्याचे वेगवेगळे मार्ग आपण शोधू शकतो का? १९४० मध्ये आपल्या बांधवांना आठवड्यातून एकदा रस्त्यावरचं साक्षकार्य करण्याचं प्रोत्साहन दिलं होतं. तुम्हीदेखील रस्त्यावरचं साक्षकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे का? किंवा, साहित्य प्रदर्शनासाठी ट्रॉलीचा किंवा टेबलचा वापर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? थोडक्यात, प्रचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्याची तुमची स्वतःची इच्छा आहे का?

सुवार्तिकाचं काम करण्याकरता इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे तुम्हाला आवेशानं प्रचारकार्यात सहभाग घेता येईल. बऱ्याचदा गरज असलेल्या ठिकाणी जाणारे आणि नवीन भाषा शिकणारे प्रचारक अनुभवी असतात. त्यांच्यामुळे मंडळीला चांगली मदत होते. जसं की, ते प्रचारकार्याचं नेतृत्व करतात. स्थानिक मंडळीचे बांधव पुढाकार घेण्यासाठी तयार होईपर्यंत, सहसा मिशनरी मंडळीत पुढाकार घेतात. तुम्हीही बाप्तिस्मा प्राप्त बांधव असाल तर जबाबदारी हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करत आहात का? स्वतःच्या मंडळीमध्ये साहाय्यक सेवक किंवा वडील या नात्यानं सेवा करण्याची तुमची तयारी आहे का?—१ तीम. ३:१.

मंडळीसाठी “मोठा आधार”

व्यावहारिक मदत करण्यासाठी

आपण इतर मार्गांनीही आपल्या मंडळीला मदत करू शकतो. आपल्यापैकी सर्वच जण, मग ते लहान असो किंवा मोठे, भाऊ असो किंवा बहीण, गरज असलेल्या सहविश्वासू बंधुभगिनींसाठी “मोठा आधार” ठरू शकतात.—कलस्सै. ४:११, ईझी-टू-रीड व्हर्शन.

आपल्या बंधुभगिनींना मदत करण्यासाठी आधी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखणं गरजेचं आहे. बायबल आपल्याला “एकमेकांकडे लक्ष” देण्याचं उत्तेजन देतं. म्हणजेच मंडळीत आपल्या भाऊ-बहिणींशी भेटताना आपण त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. (इब्री १०:२४) याचा अर्थ, आपण त्यांच्या खासगी जीवनातल्या बारीकसारीक गोष्टीही जाणून घ्याव्यात असा होत नाही. उलट, आपण आपल्या बंधुभगिनींना आणि त्यांच्या गरजांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना कदाचित काही व्यावहारिक मदतीची, मानसिक आधाराची किंवा बायबलमधून प्रोत्साहन देण्याची गरज असेल. हे खरं आहे की काही गोष्टींमध्ये फक्त मंडळीचे वडील आणि साहाय्यक सेवकच त्यांना मदत करू शकतात. (गलती. ६:१) पण तरी, समस्यांचा सामना करणाऱ्या आपल्या वृद्ध बंधुभगिनींची किंवा कुटुंबांची आपण सर्वच मदत करू शकतो.

समस्यांचा सामना करणाऱ्यांना भावनिक मदत देण्यासाठी

साल्वातोरेचं उदाहरण घ्या. त्याला त्याच्या मंडळीच्या बंधुभगिनींकडून मदत मिळाली. काही गंभीर आर्थिक समस्यांमुळे त्याला त्याचा व्यवसाय बंद करावा लागला, स्वतःचं घर आणि इतर अनेक गोष्टी विकाव्या लागल्या. त्याला आपल्या कुटुंबाची खूप चिंता होती. त्याच्याच मंडळीतील एका कुटुंबानं त्यांची गरज ओळखली आणि त्यांना काही आर्थिक मदत केली. तसंच, त्याला व त्याच्या पत्नीला काम शोधण्यासही त्यांनी मदत केली. त्यांचं ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कुटुंबानं त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. यामुळे ते चांगले मित्र बनले. कठीण परिस्थितीत सोबत घालवलेले काही आनंदाचे क्षण हे दोन्ही कुटुंब आजही विसरलेले नाहीत.

आपल्या विश्वासाबद्दल इतरांना सांगण्यासाठी खरे ख्रिस्ती मागंपुढं पाहत नाहीत. तेव्हा, आपणही येशूचं अनुकरण करून देवाच्या सुंदर अभिवचनांविषयी सर्वांना सांगितलं पाहिजे. गरज असलेल्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करणं आपल्याला शक्य असलं किंवा नसलं, तरी स्वतःच्या मंडळीला जमेल तितकी मदत आपण करू शकतो. (गलती. ६:१०) असं केल्यामुळे इतरांना देण्यात मिळणारा आनंद आपल्यालाही अनुभवता येईल आणि “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ” आपल्याला मिळेल अशी खात्रीही आपल्याला बाळगता येईल.—कलस्सै. १:१०; प्रे. कृत्ये २०:३५.