व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाच्या प्रवासात यहोवा आपल्या लोकांचं मार्गदर्शन करतो

जीवनाच्या प्रवासात यहोवा आपल्या लोकांचं मार्गदर्शन करतो

“हाच मार्ग आहे; याने चला.”—यश. ३०:२१.

गीत क्रमांक: ३२, ४८

१, २. (क) कोणत्या गोष्टीमुळे अनेकांचा जीव वाचला आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) देवाच्या लोकांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी कोणती गोष्ट मदत करत आहे?

“थांबा, पाहा, ऐका!” असा धोक्याचा इशारा असणारे अनेक फलक तुम्हाला उत्तर अमेरिकेच्या लोहमार्गांवर पाहायला मिळतील. १०० पेक्षा जास्त वर्षांपासून वापरात असणाऱ्या या फलकांमुळे काही फायदा झाला आहे का? नक्कीच! रेल्वे फाटक ओलांडताना भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रेनशी धडक होऊन, अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांना यामुळे खूप मदत झाली आहे. धोक्याचा इशारा देणाऱ्या अशा फलकांमुळे कित्येकांचा जीव वाचला आहे.

पण यहोवा त्याच्या लोकांकरता फक्त असा धोक्याचा इशारा देणारे फलक लावत नाही. उलट सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या मार्गाकडे बोट दाखवत तो जणू त्याच्या लोकांसमोर प्रत्यक्ष उभा राहतो. ज्यामुळे धोक्यांपासून दूर राहणं आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करणं त्यांना शक्य होतं. यहोवा याबाबतीत एका अशा प्रेमळ मेंढपाळासारखा आहे, जो आपल्या मेंढरांना धोकादायक मार्गांवर जाण्यापासून आडवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन करतो आणि त्यांना इशारा देतो.—यशया ३०:२०, २१ वाचा.

यहोवानं नेहमीच त्याच्या लोकांचं मार्गदर्शन केलं आहे

३. संपूर्ण मानवजातीला कशा प्रकारे मृत्यूकडे नेणाऱ्या मार्गावर लोटण्यात आलं?

मानवी इतिहासाच्या अगदी सुरवातीपासूनच, यहोवानं मानवांना विशिष्ट सूचना किंवा मार्गदर्शन दिलं आहे. उदाहरणार्थ, एदेन बागेत यहोवानं, पहिल्या मानवी कुटुंबाला सार्वकालिक जीवन आणि आनंद प्राप्त करता यावा म्हणून स्पष्ट सूचना दिल्या होत्या. (उत्प. २:१५-१७) पण आदाम आणि हव्वेनं त्यांच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचं मार्गदर्शन स्वीकारलं नाही. उलट, हव्वेनं एका साध्या प्राण्याकडून, सापाकडून मिळणारा सल्ला ऐकला आणि आदामानंही नंतर त्याच्या पत्नीचं ऐकलं. याचा काय परिणाम झाला? त्या दोघांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि शेवटी त्यांना आशाहीन मृत्यूला तोंड द्यावं लागलं. यासोबतच, यहोवाचं मार्गदर्शन झीडकारल्यामुळे त्यांनी संपूर्ण मानवजातीलाच एका अशा मार्गावर लोटलं, ज्याच्या शेवटी फक्त मृत्यू होता.

४. (क) जलप्रलयानंतर देवानं मानवांना नवीन सूचना देण्याचं काय कारण होतं? (ख) बदललेल्या परिस्थितीमुळे देवाचा दृष्टिकोन कसा दिसून आला?

देवानं नोहालादेखील मार्गदर्शन दिलं आणि त्यामुळे बऱ्याच जणांचा जीव वाचला. जलप्रलयानंतर, यहोवानं मानवांना कोणत्याही प्रकारे रक्ताचं सेवन न करण्याची आज्ञा दिली. का? कारण तिथून पुढे, यहोवा मानवांना मांसाहार करण्याची अनुमती देणार होता. परिस्थितीत झालेल्या या बदलांमुळे, त्यांना आता नवीन सूचनांची गरज होती. म्हणून देवानं त्यांना सांगितलं: “मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका.” (उत्प. ९:१-४) या सूचनेवरून जीवनाचा उगम असणाऱ्या देवाचा, जीवनाविषयी कसा दृष्टिकोन आहे ते आपल्याला शिकायला मिळतं. तो आपला निर्माणकर्ता आहे आणि त्यानंच आपल्याला जीवन दिलं आहे. यामुळे जीवनासाठी आवश्यक नियम घालून देण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे. उदाहरणार्थ, मानवांनी एकमेकांची हत्या करू नये अशी आज्ञा यहोवानं दिली. यावरून कळतं, की यहोवाच्या दृष्टिकोनात जीवन आणि रक्त पवित्र आहे. आणि जो कोणी त्यांचा गैरवापर करेल त्यांची यहोवा कधीच गय करणार नाही, तर त्यांना शिक्षा देईल.—उत्प. ९:५, ६.

५. या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत, आणि का?

नोहाच्या काळानंतरही, देव मानवांना मार्गदर्शन देत राहिला. या लेखात, आपण अशा काही उदाहरणांचा विचार करू या, ज्यांवरून देवानं त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शन दिलं ते आपल्याला पाहायला मिळेल. अशा उदाहरणांवर चर्चा केल्यामुळे, नवीन जगात जाण्यासाठी यहोवा पुरवत असलेलं मार्गदर्शन स्वीकारण्याचा आपला निर्णय आणखी पक्का होईल.

नवीन राष्ट्र, नवीन सूचना

६. देवानं मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्राचं पालन करणं त्याच्या लोकांकरता गरजेचं का होतं, आणि त्याप्रती कोणती मनोवृत्ती राखणं त्यांच्याकरता आवश्यक होतं?

मोशेच्या काळात, देवानं त्याच्या लोकांना त्यांच्या आचरणाविषयी आणि उपासनेविषयी स्पष्ट सूचना दिल्या. या सूचना देण्याचं काय कारण होतं? याचं कारण पुन्हा एकदा बदललेली परिस्थितीच होती. दोनशेहून जास्त वर्षं, इस्राएली लोक इजिप्तच्या दास्यात होते. तिथं असताना ते अशा लोकांमध्ये होते, जे मृत लोकांची आणि मूर्तींची भक्ती करायचे. त्यासोबतच देवाचा अपमान होईल अशा इतर गोष्टीही ते करायचे. पण जेव्हा देवानं त्यांना इजिप्तच्या दास्यातून मुक्त केलं तेव्हा त्यांना नवीन मार्गदर्शनाची गरज होती. आता ते केवळ यहोवाच्या नियमशास्त्रानुसार चालणाऱ्या राष्ट्राचे भाग बनणार होते. काही संदर्भग्रंथांनुसार, “नियमशास्त्र” यासाठी असणारा मूळ इब्री शब्द ज्या शब्दाशी संबंधित आहे, त्याचा अर्थ “मार्गदर्शक, वाटाड्या किंवा सूचना देणारा” असा होतो. नियमशास्त्रामुळे इस्राएली लोकांचं त्यांच्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांच्या अनैतिक जीवनशैलीपासून आणि खोट्या धर्मांपासून संरक्षण झालं. जेव्हा इस्राएली लोकांनी देवाच्या सूचनांचं पालन केलं, तेव्हा त्यांना पुष्कळ आशीर्वाद मिळाले. पण जेव्हा त्यांनी या सूचनांकडे डोळेझाक केली, तेव्हा त्याच्या वाईट परिणामांना त्यांना तोंड द्यावं लागलं.—अनुवाद २८:१, २, १५ वाचा.

७. (क) देवानं इस्राएलांना मार्गदर्शन का दिलं, ते स्पष्ट करा. (ख) नियमशास्त्र इस्राएलांकरता एक ‘बालरक्षक’ होतं असं का म्हणता येईल?

आणखी एका कारणासाठी इस्राएली लोकांना नवीन मार्गदर्शनाची गरज होती. यहोवाच्या उद्देशात असणाऱ्या एका महत्त्वाच्या घटनेसाठीदेखील नियमशास्त्रानं इस्राएलांना तयार केलं. मसीहा म्हणून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची ती घटना होती. नियमशास्त्र इस्राएलांना पापी असल्याची जाणीव करून देत होतं. त्यामुळे आपल्या पापांची क्षमा होईल अशा परिपूर्ण खंडणी बलिदानाची आपल्याला गरज आहे, हे समजून घेण्यास त्यांना मदत झाली. (गलती. ३:१९; इब्री १०:१-१०) यासोबतच, मसीहा ज्या कुळातून येणार होता त्या कुळाचं संरक्षणदेखील नियमशास्त्रामुळे झालं. शिवाय मसीहा प्रकट झाल्यावर, त्याला ओळखण्यासाठी नियमशास्त्रामुळेच इस्राएलांना मदत झाली. यावरून नियमशास्त्रानं जणू एका तात्पुरत्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली, किंवा ते ख्रिस्ताकडे नेणारं एक “बालरक्षक” ठरलं.—गलती. ३:२३, २४.

८. मोशेच्या नियमशास्त्रातील सिद्धांतांनुसार चालण्याचा आपण प्रयत्न का केला पाहिजे?

यहोवानं नियमशास्त्रात जे मार्गदर्शन दिलं आहे, त्यामुळे एक ख्रिस्ती या नात्यानं आपल्यालाही फायदा होऊ शकतो. नियमशास्त्रातील सूचनांचं परीक्षण करताना आपणही थोडं थांबून, त्यात असणाऱ्या नियमांमागील तत्त्वांना पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण या नियमांच्या अधीन नसलो, तरी यहोवाच्या उपासनेकरता आवश्यक असणारी आणि रोजच्या जीवनात लागू होतील अशी मार्गदर्शक तत्त्वं आपल्याला त्यात मिळू शकतात. यहोवानं हे नियमशास्त्र आज बायबलचा एक भाग म्हणून आपल्याला दिलं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. शिवाय त्यातील तत्त्वांनुसार चालायला आणि या नियमशास्त्राच्या पुढे जाऊन येशूनं जे शिकवलं, त्याबद्दल कदर बाळगायला आपल्याला मदत होते. उदाहरणार्थ, नियमशास्त्रातील एका आज्ञेबद्दल येशूनं काय म्हटलं ते लक्षपूर्वक ऐका. त्यानं म्हटलं: “‘व्यभिचार करू नको’ म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” यावरून हे कळतं, की आपण केवळ व्यभिचारच नव्हे तर व्यभिचाराला प्रवृत्त करणाऱ्या अनैतिक विचारांना आणि इच्छांनादेखील आपल्या मनातून उपटून टाकलं पाहिजे.—मत्त. ५:२७, २८.

९. कोणत्या परिस्थितीमुळे देवाला नवीन मार्गदर्शन देण्याची गरज पडली?

येशू जेव्हा मसीहा म्हणून प्रकट झाला, तेव्हा यहोवानं पुन्हा एकदा आपल्या लोकांना नवीन मार्गदर्शन पुरवलं आणि त्याच्या उद्देशाबद्दल आणखी सविस्तर माहिती त्यांना दिली. या नवीन मार्गदर्शनाची का गरज होती? कारण इ.स. ३३ मध्ये, देवानं इस्राएल राष्ट्राचा त्याग केला आणि ख्रिस्ती मंडळीला आपले लोक म्हणून निवडलं. त्यामुळे देवाच्या लोकांच्या परिस्थितीत पुन्हा एकदा बदल झाला होता.

नव्या आध्यात्मिक राष्ट्रासाठी मार्गदर्शन

१०. ख्रिस्ती मंडळीला नवीन मार्गदर्शनाची का गरज होती, आणि इस्राएली लोकांना दिलेल्या मार्गदर्शनापेक्षा हे मार्गदर्शन वेगळं का होतं?

१० आपलं जीवन आणि उपासना कशी असावी हे शिकवण्यासाठी यहोवानं इस्राएलांना मोशेचं नियमशास्त्र दिलं होतं. पण पहिल्या शतकाच्या सुरवातीपासून देवाचे लोक कोणत्याही एका राष्ट्राचा भाग नव्हते, तर अनेक राष्ट्रांतून आणि संस्कृतीतून आलेलं ते एक आध्यात्मिक इस्राएल राष्ट्र होतं. ते नवीन कराराच्या अधीन असलेल्या एका मंडळीचे सदस्य होते. यहोवानं त्यांना त्यांच्या ख्रिस्ती जीवनासाठी आणि उपासनेसाठी नवीन किंवा आणखी विस्तारित सूचना दिल्या. खरंच, “देव पक्षपाती नाही” तर “प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) पहिल्या शतकातील या ख्रिश्चनांनी दगडी पाट्यांवर लिहिलेल्या नियमांवर आधारलेला नव्हे, तर त्यांच्या अंतःकरणात लिहिलेल्या तत्त्वांवर आधारलेला “ख्रिस्ताचा नियम” पाळला. हे ख्रिस्ती कुठंही राहात असले तरी या मार्गदर्शनाचा त्यांना फायदाच होणार होता.—गलती. ६:२.

११. ‘ख्रिस्ताच्या नियमामुळे’ ख्रिस्ती जीवनाच्या कोणत्या दोन पैलूंवर परिणाम होतो?

११ यहोवा येशूद्वारे जे काही मार्गदर्शन पुरवत होता, त्याचा या आध्यात्मिक इस्राएलांना खूप फायदा झाला. त्यांच्यासोबत नवीन करार करण्याआधी, येशूनं त्यांना दोन महत्त्वपूर्ण आज्ञा दिल्या. एक प्रचारकार्याशी संबंधित होती. तर दुसरी, ख्रिश्चनांनी एकमेकांशी कसं वागलं पाहिजे, याबद्दल होती. या आज्ञा सर्व ख्रिश्चनांकरता देण्यात आल्या आहेत, मग त्यांना स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील जीवनाची.

१२. प्रचारकार्याच्या बाबतीत कोणती गोष्ट नवीन होती?

१२ गतकाळात, देवाची उपासना करण्याकरता लोकांना वेगवेगळया देशांमधून, इस्राएल राष्ट्रात यावं लागायचं. (१ राजे ८:४१-४३) पण मग, येशूनं त्याच्या शिष्यांना मत्तय २८:१९, २० (वाचा.) या वचनांतील आज्ञा दिली. त्यानं आपल्या शिष्यांना सर्व राष्ट्रांतील लोकांकडे जाण्याची आज्ञा दिली. शिवाय, पेन्टेकॉस्ट ३३ मध्ये यहोवानं हे दाखवून दिलं, की संपूर्ण जगभरात राज्याची सुवार्ता घोषित केली जावी अशी त्याची इच्छा आहे. नव्यानंच स्थापित झालेल्या मंडळीत, त्या दिवशी १२० सदस्यांवर देवाचा पवित्र आत्मा उतरला आणि ते यहूदी व यहूदी मतानुसारी लोकांशी वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. (प्रे. कृत्ये २:४-११) यानंतर, शोमरोनी लोकांसाठीही सुवार्ता ऐकण्याचं द्वार उघडण्यात आलं. पुढे इ.स. ३६ मध्ये सुंता न झालेल्या विदेश्यांनाही ही संधी देण्यात आली. यावरून कळतं, की ख्रिश्चनांना आता सर्व जगातील लोकांना जाऊन राज्याचा प्रचार करायचा होता.

१३, १४. (क) येशूच्या ‘नवीन आज्ञेत’ कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? (ख) येशूनं मांडलेल्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१३ यासोबतच आपण आपल्या बंधुभगिनींना कसं वागवलं पाहिजे याबद्दल येशूनं एक “नवी आज्ञा” दिली. (योहान १३:३४, ३५ वाचा.) आपण नेहमीच आपल्या बंधुभगिनींना प्रेम दाखवण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे; पण याही पुढे जाऊन आपण त्यांच्यासाठी आपला जीव देण्यासही तयार असलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट होती, ज्याविषयी नियमशास्त्रात सांगण्यात आलं नव्हतं.—मत्त. २२:३९; १ योहा. ३:१६.

१४ अशा प्रकारचं निःस्वार्थ प्रेम दाखवण्यात, येशू एक सर्वोत्तम उदाहरण आहे. त्याचं आपल्या शिष्यांवर इतकं प्रेम होतं, की त्यानं स्वखुशीनं त्यांच्यासाठी मृत्यू सहन केला. आणि त्याच्या अनुयायांनी असंच प्रेम दाखवावं अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे आपणही आपल्या बंधुभगिनींसाठी वाईट परिस्थितीला तोंड देण्यास, इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी आपला जीव देण्यासही तयार असलं पाहिजे.—१ थेस्सलनी. २:८.

आजच्या काळासाठी आणि भविष्यासाठी मार्गदर्शन

१५, १६. आज आपल्या परिस्थितीत कोणता बदल झाला आहे, आणि देव आपल्याला कसं मार्गदर्शन पुरवत आहे?

१५ येशूनं आपल्या अनुयायांना “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न मिळावं म्हणून “विश्वासू व बुद्धिमान दासाला” नियुक्त केलं आहे. (मत्त. २४:४५-४७) या आध्यात्मिक अन्नामुळे, आज बदललेल्या परिस्थितीतही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्राप्त करणं देवाच्या लोकांना शक्य झालं आहे. पण आज आपल्या परिस्थितीत कोणता बदल झाला आहे?

१६ आज आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत आणि आजपर्यंत कधीही आलं नाही अशा मोठ्या संकटाला आपण लवकरच तोंड देणार आहोत. (२ तीम. ३:१; मार्क १३:१९) शिवाय सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकण्यात आलं आहे. त्यामुळे मानवजातीला आज आणखी समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. (प्रकटी. १२:९, १२) यासोबतच, येशूच्या आज्ञेनुसार आज संपूर्ण जगभरात पूर्वी कधी नव्हे इतक्या लोकांना आपण जास्तीतजास्त भाषांमध्ये राज्याची सुवार्ता घोषित करत आहोत.

१७, १८. आपल्याला मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?

१७ प्रचारकार्यात आपल्याला मदत व्हावी म्हणून देवाच्या संघटनेनं आज आपल्याला बरीच साधनं दिली आहेत. तुम्ही त्यांचा वापर करत आहात का? या साधनांचा आपण अगदी चांगल्या रीतीनं कसा वापर करू शकतो याबद्दल आपल्या सभांमध्ये आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं. या सर्व सूचना व मार्गदर्शन देवाकडून आहेत, असं तुम्ही समजता का?

१८ आपल्याला देवाकडून मिळणारे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील, तर ख्रिस्ती मंडळीतून तो देत असलेल्या मार्गदर्शनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर आज आपण त्यांचं पालन केलं, तर ‘मोठ्या संकटादरम्यान’ जेव्हा सैतानाच्या वाईट जगाचा अंत करण्यात येईल, तेव्हा देवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं पालन करणं आपल्याला सोपं जाईल. (मत्त. २४:२१) शिवाय, त्यानंतर सैतानाच्या प्रभावापासून पूर्णतः मुक्त असलेल्या नीतिमान नवीन जगात आपल्याला देवाच्या नवीन मार्गदर्शनाची गरज असेल.

नवीन जगात, नंदनवनातील जीवनाकरता आपल्यासाठी नवीन मार्गदर्शन असलेली पुस्तकं उघडली जातील (परिच्छेद १९, २० पाहा)

१९, २०. कोणती नवीन पुस्तकं उघडली जातील, आणि त्यामुळे आपल्याला काय फायदा होईल?

१९ मोशेच्या काळात जेव्हा इस्राएल राष्ट्राला नवीन मार्गदर्शनाची गरज होती, तेव्हा देवानं त्यांना नियमशास्त्र दिलं. त्यानंतर, ख्रिस्ती मंडळीला ‘ख्रिस्ताच्या नियमाचं’ पालन करावं लागलं. त्याचप्रमाणे, बायबल सांगतं की नवीन जगातही आपल्यासाठी नवीन मार्गदर्शन असलेली पुस्तकं उघडली जातील. (प्रकटीकरण २०:१२ वाचा.) मानवजातीकडून त्या वेळी देवाच्या काय अपेक्षा असतील, याबद्दलची माहिती कदाचित त्या पुस्तकांमध्ये असेल. या पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे सर्वांनाच, ज्यामध्ये पुनरुत्थान झालेल्यांचाही समावेश होतो, देवाच्या काय अपेक्षा आहेत ते समजेल. यासोबतच यहोवाच्या विचारसरणीला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तसंच, बायबलबद्दलची आपली समजही आणखी वाढेल. आणि नंदनवनात आपण इतरांसोबत प्रेमानं आणि आदरानं वागू. (यश. २६:९) शिवाय, येशूच्या मार्गदर्शनाखाली त्या नवीन जगात आपल्याला किती नवीन गोष्टी शिकायला मिळतील, त्याचा विचार करा. यासोबतच इतरांना अनेक गोष्टी शिकवण्याची संधीसुद्धा आपल्याजवळ असेल.

२० जर आपण या ‘नवीन पुस्तकांमधील’ मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या परीक्षेत यहोवाला विश्वासू राहिलो, तर तो आपलंही नाव जीवनाच्या पुस्तकात कायमचं लिहील. खरंच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल! तेव्हा, आपण थोडं थांबून बायबल काय म्हणतं ते वाचू या, त्याचा काय अर्थ होतो ते पाहण्याचा प्रयत्न करू या आणि देव आपल्याला जे मार्गदर्शन देत आहे त्याचं पालन करण्याद्वारे ऐकण्याचा प्रयत्न करू या. या गोष्टी जर आपण केल्या, तर मोठ्या संकटातून आपला जीव वाचेल आणि आपल्या बुद्धिमान आणि प्रेमळ पित्याबद्दल, यहोवाबद्दल शिकत राहण्यास आपल्याला आनंद होईल.—उप. ३:११; रोम. ११:३३.