व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगुलपणा​—तुम्ही कसा विकसित करू शकता?

चांगुलपणा​—तुम्ही कसा विकसित करू शकता?

इतरांनी आपल्याला एक चांगली व्यक्‍ती म्हणून ओळखावं असं आपल्या सर्वांनाच वाटतं. पण आजच्या जगात चांगुलपणा दाखवणं खूपच कठीण आहे. याचं कारण म्हणजे बहुतेक लोकांना “चांगल्याबद्दल प्रेम” नाही. (२ तीम. ३:३) ते यहोवाच्या स्तरांना नाकारतात आणि ज्या गोष्टींना यहोवा चांगलं म्हणतो त्यांना ते “वाईट” म्हणतात. तसंच, ज्या गोष्टींना यहोवा वाईट म्हणतो त्याला ते “बरे” म्हणतात. (यश. ५:२०) पण कधीकधी जीवनात घडलेल्या वाईट अनुभवांमुळे आणि अपरिपूर्णतेमुळे आपल्याला चांगुलपणा दाखवणं कठीण जाऊ शकतं. आपल्यालाही ॲन * हिच्यासारखं वाटू शकतं. तिने बरीच वर्षं यहोवाची सेवा केली तरीही ती म्हणते, “मी कधी एक चांगली व्यक्‍ती बनू शकेल असं मला वाटत नाही.”

पण आनंदाची गोष्ट म्हणजे आपण सर्व जण चांगुलपणा विकसित करू शकतो. चांगुलपणा हा गुण यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळे उत्पन्‍न होतो. जगातल्या गोष्टी आणि आपली अपरिपूर्णता यामुळे आपल्याला चांगुलपणा दाखवणं कठीण जाऊ शकत. पण देवाचा पवित्र आत्मा या गोष्टींपेक्षा शक्‍तिशाली आहे. चांगुलपणा म्हणजे काय आणि तो आणखी चांगल्या प्रकारे कसा दाखवता येईल यावर आता आपण चर्चा करू या.

चांगुलपणा म्हणजे काय?

चांगुलपणा म्हणजे नैतिक रीत्या शुद्ध असणं आणि नेहमी योग्य तेच करणं. एक चांगली व्यक्‍ती नेहमी इतरांना मदत करण्याचे मार्ग शोधत असते आणि त्यांचं भलं करण्यासाठी तयार असते. हा गुण कार्यांतून दाखवल्यामुळे इतरांना फायदा होतो.

काही लोक आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी चांगल्या गोष्टी करत असतात हे तुम्ही पाहिलं असेल. पण एवढंच करणं पुरेसं आहे का? हे खरं आहे की आपण परिपूर्ण रीतीने चांगुलपणा दाखवू शकत नाही, कारण बायबल म्हणतं: “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.” (उप. ७:२०) प्रेषित पौलने प्रामाणिकपणे हे कबूल केलं: “मला माहीत आहे, की माझ्यात, म्हणजेच माझ्या शरीरात काहीही चांगले नाही.” (रोम. ७:१८) यावरून हे स्पष्टच आहे की चांगुलपणा दाखवण्यासाठी आपण यहोवाकडून शिकलं पाहिजे कारण तो चांगुलपणाचा स्रोत आहे.

“यहोवा चांगला आहे”

चांगलं काय आहे, याचे स्तर यहोवा ठरवतो. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं: “तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव.” (स्तो. ११९:६८) या वचनात सांगितल्याप्रमाणे आता आपण यहोवाच्या चांगुलपणाच्या दोन पैलूंवर चर्चा करू या.

यहोवा चांगला आहे. चांगुलपणा हा गुण यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचा एक भाग आहे. यहोवाने मोशेला काय सांगितलं त्याकडे लक्ष द्या: “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन.” यहोवाने मोशेला त्याचं वैभव दाखवलं, तेव्हा त्यात त्याचा चांगुलपणाही दिसून आला. मोशेने यहोवाचे हे शब्द ऐकले: “परमेश्‍वर, परमेश्‍वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा.” (निर्ग. ३३:१९; ३४:६, ७) यावरून आपल्याला कळतं की चांगुलपणा हा गुण त्याच्या प्रत्येक कार्यांतून परिपूर्ण रीतीने दिसून येतो. चांगुलपणा दाखवण्याच्या बाबतीत येशू मानवांमध्ये सर्वात चांगलं उदाहरण होता. तरीही तो म्हणाला: “देवाशिवाय कोणीही उत्तम नाही.”​—लूक १८:१९.

यहोवाच्या सृष्टीतून आपल्याला त्याचा चांगुलपणा दिसून येतो

यहोवाची कार्यं चांगली आहेत. यहोवाच्या सर्व कार्यांतून त्याचा चांगुलपणा स्पष्टपणे दिसून येतो. “परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.” (स्तो. १४५:९) यहोवा चांगला आहे आणि तो भेदभाव करत नाही, म्हणूनच तो सर्व मानवांना जीवन देतो आणि त्यांच्या गरजाही पूर्ण करतो. (प्रे. कार्ये १४:१७) क्षमा करूनही तो त्याचा चांगुलपणा दाखवतो. स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस.” (स्तो. ८६:५) म्हणून, आपण ही खात्री बाळगू शकतो की “जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.”​—स्तो. ८४:११.

“चांगले करण्यास शिका”

यहोवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवल्यामुळे एक व्यक्‍ती चांगली बनू शकते आणि चांगली कामंही करू शकते. (उत्प. १:२७) असं असलं तरीही यहोवाचं वचन त्याच्या सेवकांना “चांगले करण्यास शिका” असं आर्जवतं. (यश. १:१७) पण चांगुलपणा दाखवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी आता आपण तीन मार्ग पाहू या.

पहिला मार्ग म्हणजे, आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करू शकतो. पवित्र आत्मा ख्रिश्‍चनांना देवाच्या नजरेत चांगलं करण्यासाठी मदत करू शकतो. (गलती. ५:२२) खरंच, पवित्र आत्म्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टींवर प्रेम करायला आणि वाइटाचा द्वेष करायला मदत होते. (रोम. १२:९) बायबल असंदेखील म्हणतं की यहोवाने आपल्याला “स्थिर करावे, म्हणजे तुमचे वागणे व बोलणे नेहमी चांगले असेल.”​—२ थेस्सलनी. २:१६, १७.

दुसरा मार्ग म्हणजे, आपण देवाचं प्रेरित वचन वाचलं पाहिजे. आपण बायबल वाचतो तेव्हा यहोवा आपल्याला त्याच्या ‘सर्व सन्मार्गाद्वारे’ शिकवतो आणि आपल्याला “प्रत्येक चांगले काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज” करतो. (नीति. २:९; २ तीम. ३:१७) बायबल वाचून त्यावर मनन केल्याने आपण देव आणि त्याची इच्छा यांविषयी असलेल्या चांगल्या गोष्टींनी आपलं मन भरत असतो. आपल्या मनाच्या भांडारात जेव्हा चांगल्या गोष्टींची भर पडत राहते तेव्हा त्यांचा उपयोग आपल्याला नंतर होऊ शकतो.​—लूक ६:४५; इफिस. ५:९.

तिसरा मार्ग म्हणजे, “चांगल्याचे अनुकरण” करण्याचा आपण प्रयत्न करतो. (३ योहा. ११) हे करण्यासाठी बायबलमध्ये बरीच उदाहरणं आहेत, यांपैकी सर्वोत्तम म्हणजे यहोवा आणि येशू. पण आता आपण अशा इतर जणांच्या उदाहरणांवर विचार करू ज्यांनी चांगुलपणा दाखवला. त्यांपैकी दोन व्यक्‍ती म्हणजे तबीथा आणि बर्णबा. (प्रे. कार्ये ९:३६; ११:२२-२४) बायबलमधून त्यांच्याबद्दल शिकल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. अभ्यास करत असताना तुम्ही यावर लक्ष देऊ शकता की त्यांनी कशा प्रकारे इतरांना व्यावहारिक रीतीने मदत केली. तुम्ही तुमच्या कुटुंबात किंवा मंडळीत एखाद्याला मदत करण्यासाठी कशा प्रकारे पुढाकार घेऊ शकता यावर विचार करा. तसंच तबीथा आणि बर्णबा हे इतरांशी चांगल्या प्रकारे वागल्यामुळे त्यांना कसा फायदा झाला यावरही विचार करा. तुम्हालाही अशाच प्रकारे फायदा होऊ शकतो.

आपण आपल्या काळातल्या चांगुलपणा दाखवणाऱ्‍या बंधुभगिनींच्या उदाहरणाचाही विचार करू शकतो. उदाहरणार्थ, ‘चांगुलपणाची आवड’ असणाऱ्‍या मंडळीतल्या मेहनती वडिलांचा विचार करा. तसंच, विश्‍वासू बहिणींचाही विचार करा. त्या आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून “चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्‍या” असतात. (तीत १:८; २:३) रोजलीन नावाची बहीण म्हणते: “माझी मैत्रीण मंडळीतल्या इतरांना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी खूप मेहनत घेते. ती त्यांच्या परिस्थितीबद्दल विचार करते आणि त्यानुसार त्यांना काही भेटवस्तू देते किंवा इतर व्यावहारिक मार्गांनी मदत करते. माझ्या मते ती खरंच एक चांगली व्यक्‍ती आहे.”

यहोवा त्याच्या लोकांना “बऱ्‍याच्या मागे लागा” असं आर्जवतो. (आमो. ५:१४) असं केल्याने यहोवाचे स्तर आपल्याला प्रिय तर वाटतीलच पण चांगलं करण्याची आपली इच्छादेखील तीव्र होईल.

आपण चांगली व्यक्‍ती बनण्याचा आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो

चांगलं करण्यात नेहमी इतरांसाठी काही वेगळं करणं किंवा महागड्या भेटवस्तू देणं गरजेचं नाही. कल्पना करा: एक चित्रकार चित्र काढण्यासाठी ब्रशचे फक्‍त एक किंवा दोनच फटकारे ओढत नाही, तर तो अनेक छोटे-छोटे फटकारे देऊन चित्र काढतो. त्याच प्रकारे आपण छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे इतरांना मदत करून चांगुलपणा दाखवू शकतो.

बायबल आपल्याला चांगुलपणा दाखवण्याच्या बाबतीत नेहमी “तयार” राहण्यासाठी आर्जवतं. (२ तीम. २:२१; तीत ३:१) आपण इतरांच्या परिस्थितीचा विचार केला तर आपण आपल्या शेजाऱ्‍याचे “भले करून त्याच्या सुखाचा” विचार करू शकतो. (रोम. १५:२) यात इतरांना आपल्याजवळच्या गोष्टी देणंही सामील आहे. (नीति. ३:२७) आपण इतरांना जेवायला बोलवू शकतो किंवा त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. आजारी असलेल्या व्यक्‍तीला आपण भेटायला जाऊ शकतो, किंवा फोनवर तिच्याशी बोलू शकतो. आपण संधी शोधून पुढील सल्ल्याचं पालन करू शकतो: “गरजेप्रमाणे इतरांना प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी तुम्ही बोलाव्यात, जेणेकरून ऐकणाऱ्‍यांना त्यांपासून फायदा होईल.”​—इफिस. ४:२९

यहोवाप्रमाणे आपल्यालाही इतरांसाठी चांगलं करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण इतरांशी वागताना भेदभाव करत नाही. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आनंदाचा संदेश सर्व लोकांना सांगणं. येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे आपला द्वेष करणाऱ्‍या लोकांच्या भल्याचाही आपण विचार करतो. (लूक ६:२७) इतरांशी दयाळूपणे वागणं आणि त्यांच्यासाठी चांगलं करणं हे कधीच चुकीचं ठरू शकत नाही, कारण “अशा गोष्टींविरुद्ध कोणताही नियम नाही.” (गलती. ५:२२, २३) चांगलं वागल्यामुळे आपला छळ झाला किंवा आपल्यावर परीक्षा व समस्या आल्या, तरीही आपण इतरांना सत्याकडे आकर्षित करून देवाचा गौरव करू शकतो.​—१ पेत्र ३:१६, १७.

चांगुलपणा दाखवल्यामुळे होणारे फायदे

“चांगला माणूस आपल्यानेच तृप्त होईल.” (नीति. १४:१४, पं.र.भा.) याचे कोणते काही फायदे आहेत? जेव्हा आपण इतरांसाठी चांगलं करतो तेव्हा तेही आपल्याला चांगुलपणा दाखवतील. (नीति. १४:२२) इतर जण आपल्याला चांगली वागणूक देत नाहीत, तरीही आपण त्यांच्यासाठी चांगलं करत राहिलं पाहिजे. यामुळे त्यांच्या मनोवृत्तीत बदल होऊ शकतो आणि ते आपल्याशी चांगल्या प्रकारे वागतील.​—रोम. १२:२०.

आपण वाईट गोष्टींपासून दूर राहतो आणि चांगल्या गोष्टी करतो तेव्हा आपल्यालाच फायदा होतो. असा अनुभव बऱ्‍याच बंधुभगिनींना आला आहे. नॅन्सीचा अनुभव लक्षात घ्या. ती म्हणते: “मी मोठी होत असताना खूपच निष्काळजीपणे वागायचे, अनैतिक जीवन जगायचे आणि इतरांचा अनादर करायचे. पण मी यहोवाच्या चांगुलपणाच्या स्तरांबद्दल शिकले आणि त्यानुसार वागू लागले. त्यामुळे आज मी खूप आनंदी आहे आणि सन्मानाचं जीवन जगत आहे.”

चांगुलपणा विकसित करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, हा गुण विकसित केल्याने यहोवाचं मन आनंदित होतं. आपण अनेक गोष्टी करतो ज्या इतरांच्या लक्षात येत नाही, पण त्यांकडे यहोवाचं लक्ष असतं. आपण करत असलेली प्रत्येक चांगली गोष्ट आणि विचार यहोवा जाणतो. (इफिस. ६:७, ८) आपल्याला तो कशा प्रकारे प्रतिफळ देतो? “चांगला मनुष्य यहोवाजवळून अनुग्रह पावतो.” (नीति. १२:२, पं.र.भा.) तर मग आपण नेहमी चांगुलपणा विकसित करण्याचा प्रयत्न करू या. यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे “जो चांगले ते करतो त्या प्रत्येकाला, गौरव, सन्मान आणि शांती मिळेल.”​—रोम. २:१०.

^ परि. 2 काही नावं बदलण्यात आली आहेत.