व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ११

तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का?

तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का?

“हा बाप्तिस्मा आता आपले तारण करत आहे.”—१ पेत्र ३:२१, मराठी कॉमन लँग्वेज.

गीत २७ यहोवाला इमानी राहा!

सारांश *

१. घर बांधण्याआधी एका व्यक्‍तीने काय करणं गरजेचं आहे?

कल्पना करा की एका व्यक्‍तीला घर बांधायचं आहे. तिचं घर कसं असावं हे तिला माहीत आहे. म्हणून, लागणारं सामान लगेच विकत आणून ती घर बांधायला सुरुवात करते का? नाही! त्याआधी तिला एक महत्त्वपूर्ण गोष्ट करण्याची गरज आहे. ती म्हणजे, घर बांधायला किती खर्च लागेल याचा हिशोब तिला करावा लागेल. असं का? कारण घर बांधण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही हे तिला माहीत करून घ्यावं लागेल. जर तिने आधीच बसून व्यवस्थितपणे हिशोब जोडला तर तिला घर बांधता येईल.

२. लूक १४:२७-३० या वचनांत सांगितल्याप्रमाणे बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही कोणता विचार केला पाहिजे?

यहोवाबद्दल प्रेम आणि कदर असल्यामुळे तुम्ही बाप्तिस्मा घ्यायचा विचार केला आहे का? असेल, तर तुमची परिस्थितीसुद्धा त्या घर बांधणाऱ्‍या व्यक्‍तीसारखीच आहे. असं आपण का म्हणू शकतो? हे समजण्यासाठी लूक १४:२७-३० या वचनांत दिलेल्या येशूच्या शब्दांचा विचार करा. (वाचा.) त्याचा शिष्य बनण्याचा काय अर्थ होतो हे त्याने सांगितलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला “खर्चाचा हिशोब” लावणं गरजेचं आहे, म्हणजेच तुम्ही काही आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी तयार असलं पाहिजे. (लूक ९:२३-२६; १२:५१-५३) येशूचे शिष्य बनण्यात कोणकोणत्या गोष्टी सामील आहेत याचा तुम्ही बाप्तिस्म्याआधीच काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. असं केल्यामुळे बाप्तिस्म्यानंतर देवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे तयार असाल.

३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

येशूचे शिष्य बनणं हे त्याग करण्याइतपत आणि आव्हानं स्वीकारण्याइतपत महत्त्वाचं आहे का? हो, नक्कीच! कारण बाप्तिस्म्यामुळे आपल्याला आता आणि भविष्यातही अनेक आशीर्वाद मिळतात. म्हणून आता आपण बाप्तिस्म्याबद्दल काही महत्त्वपूर्ण प्रश्‍नांवर चर्चा करू या. असं केल्यामुळे ‘मी बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहे का?’ या प्रश्‍नाचं उत्तर द्यायला तुम्हाला मदत होईल.

समर्पण आणि बाप्तिस्मा यांबद्दल तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

४. (क) समर्पण म्हणजे काय? (ख) मत्तय १६:२४ या वचनानुसार स्वतःला ‘नाकारणं’ याचा काय अर्थ होतो?

समर्पण म्हणजे काय?  बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही समर्पण करणं गरजेचं आहे. तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पण करता तेव्हा तुम्ही त्याला मनापासून प्रार्थना करून म्हणता, की ‘मी आजपासून संपूर्ण आयुष्य तुझी सेवा करेन.’ यहोवाला तुमचं जीवन समर्पित करण्याद्वारे खरंतर तुम्ही स्वतःला ‘नाकारता.’ (मत्तय १६:२४ वाचा.) त्यानंतर तुम्ही यहोवाचे होता आणि यहोवाचा तुमच्यावर अधिकार असणं हा एक खूप मोठा बहुमान आहे. (रोम. १४:८) तुम्ही त्याला म्हणता की, ‘मी आजपासून स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी जगेन.’ समर्पण हे तुम्ही देवाला दिलेलं वचन आहे आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. हे वचन देण्यासाठी यहोवा आपल्यावर दबाव आणत नाही. पण जेव्हा आपण त्याला वचन देतो तेव्हा आपण ते पूर्णही करावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.—स्तो. ११६:१२, १४.

५. समर्पण बाप्तिस्म्याशी कसं संबंधित आहे?

समर्पण बाप्तिस्म्याशी कसं संबंधित आहे?  तुम्ही जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करता तेव्हा ही गोष्ट फक्‍त तुम्हाला आणि यहोवाला माहीत असते. पण बाप्तिस्मा हा सहसा संमेलनात किंवा अधिवेशनात इतरांसमोर घेतला जातो. तुम्ही बाप्तिस्मा घेण्याद्वारे दाखवून देता की तुम्ही आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे. * बाप्तिस्मा घेतल्यामुळे इतरांना दिसून येतं की तुम्ही यहोवा देवावर पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्‍तीने प्रेम करता. तसंच, त्यांना हेही कळतं की तुम्ही संपूर्ण आयुष्य त्याची सेवा करण्याचा पक्का निर्धार केला आहे.—मार्क १२:३०.

६-७. बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे हे १ पेत्र ३:१८-२२ या वचनांत सांगितलेल्या कोणत्या दोन कारणांवरून दिसून येतं?

बाप्तिस्मा घेणं खरंच गरजेचं आहे का?  १ पेत्र ३:१८-२२ यांत काय सांगितलं आहे याकडे लक्ष द्या. (वाचा.) नोहाने जहाज बांधलं त्यावरून त्याचा देवावर विश्‍वास आहे हे लोकांना दिसून आलं. त्याच प्रकारे तुम्ही बाप्तिस्मा घेता तेव्हा लोकांना दिसून येतं की तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे. पण बाप्तिस्मा घेणं खरंच गरजेचं आहे का? हो आहे. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी पेत्रने दोन गोष्टींचा उल्लेख केला. पहिली म्हणजे, बाप्तिस्मा ‘तुम्हाला वाचवतो’ असं त्याने म्हटलं. ते कसं? आपला येशूवर, त्याच्या बलिदानावर, स्वर्गाच्या जीवनासाठी त्याचं पुनरुत्थान करण्यात आलं आणि आता तो “देवाच्या उजव्या हाताला” आहे या गोष्टींवर विश्‍वास असला पाहिजे. हा विश्‍वास जेव्हा आपण आपल्या कार्यांद्वारे दाखवतो तेव्हा बाप्तिस्मा आपल्याला वाचवू शकतो.

दुसरी गोष्ट, बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपला ‘विवेक शुद्ध’ होतो. आपण देवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपलं त्याच्यासोबत एक खास नातं तयार होतं. आपण मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे आणि खंडणी बलिदानावर आपला विश्‍वास असल्यामुळे देव आपली पापं माफ करतो. अशा प्रकारे आपला विवेक शुद्ध राहतो.

८. तुम्ही कोणत्या कारणामुळे बाप्तिस्मा घेतला पाहिजे?

तुम्ही कोणत्या कारणामुळे बाप्तिस्मा घेतला पाहिजे?  बायबलचा मनापासून अभ्यास केल्यामुळे तुम्हाला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल बरंच काही शिकायला मिळालं आहे. शिकलेल्या गोष्टी तुम्हाला आवडू लागल्या आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्रेम करू लागला. तेव्हा यहोवावरचं प्रेम हे तुम्ही बाप्तिस्मा घेण्याचं मुख्य कारण असलं पाहिजे.

९. मत्तय २८:१९, २० या वचनांत उल्लेख केल्याप्रमाणे पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

बाप्तिस्मा घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे तुम्ही बायबलमधली सत्यं स्वीकारली आहेत. येशूने शिष्य बनवण्याची आज्ञा दिली तेव्हा त्याने काय म्हटलं याबद्दल विचार करा. (मत्तय २८:१९, २० वाचा.) येशूने म्हटलं की ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांनी “पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा” घेतला पाहिजे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की बायबलमध्ये यहोवाबद्दल, त्याचा पुत्र येशू याच्याबद्दल आणि पवित्र आत्म्याबद्दल दिलेली सत्यं आपण मनापासून स्वीकारली पाहिजेत. ही सत्यं प्रभावशाली आहेत आणि त्यांचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. (इब्री ४:१२) त्यांपैकी काही सत्यांवर आता आपण चर्चा करू या.

१०-११. तुम्ही पित्याबद्दलची कोणती सत्यं शिकून ती स्वीकारली आहेत?

१० आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल शिकलेल्या सत्यांविषयी जरा विचार करा. जसं की, त्याचं नाव “यहोवा” आहे, तो सर्व “पृथ्वीवर परात्पर” आहे आणि तो एकच “सत्य देव” आहे. (स्तो. ८३:१८, पं.र.भा.; यिर्म. १०:१०) तसंच तो आपला निर्माणकर्ता आहे आणि “तारण” त्याच्यामुळेच मिळतं. (स्तो. ३:८; ३६:९) त्याने आपल्याला पाप आणि मृत्यू यांपासून सोडवण्यासाठी योजना केली आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा दिली. (योहा. १७:३) समर्पण आणि बाप्तिस्मा यांमुळे सर्वांना कळून येईल की तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात. (यश. ४३:१०-१२) तुम्ही एका अशा उपासकांच्या कुटुंबाचा भाग बनाल जे जगभरात पसरलेलं आहे. त्यांना देवाच्या नावाने ओळखलं जाण्याचा आणि त्याबद्दल इतरांना सांगण्याचा अभिमान आहे.—स्तो. ८६:१२.

११ आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल बायबलमधून शिकण्याचा खूप मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! तुम्ही जेव्हा ही मौल्यवान सत्यं स्वीकारता तेव्हा तुमचं मन तुम्हाला यहोवाला आपलं जीवन समर्पित करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित करतं.

१२-१३. तुम्ही पुत्राबद्दलची कोणती सत्यं शिकून ती स्वीकारली आहेत?

१२ देवाच्या पुत्राबद्दल पुढे दिलेली सत्यं शिकल्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? संपूर्ण विश्‍वात यहोवानंतर कोणी श्रेष्ठ असेल तर तो येशू आहे. त्याने स्वखुशीने त्याचं जीवन आपल्यासाठी खंडणी म्हणून दिलं. आपण आपल्या कार्यांद्वारे खंडणीवर विश्‍वास असल्याचं दाखवतो तेव्हा आपल्याला पापांची क्षमा मिळू शकते, आपली देवासोबत मैत्री होऊ शकते आणि आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं. (योहा. ३:१६) येशू हा आपला महायाजक आहे. त्याची इच्छा आहे की खंडणीमुळे आपल्याला फायदा व्हावा आणि देवासोबत आपलं घनिष्ठ नातं असावं. (इब्री ४:१५; ७:२४, २५) यहोवाने येशूला आपल्या राज्याचा राजा म्हणून नेमलं आहे. यहोवा आपलं नाव पवित्र करण्यासाठी, दुष्टाईचा अंत करण्यासाठी आणि येणाऱ्‍या नंदनवनात मानवांना कायम टिकणारे आशीर्वाद देण्यासाठी येशूचा उपयोग करेल. (मत्त. ६:९, १०; प्रकटी. ११:१५) येशू आपला आदर्श आहे आणि आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. (१ पेत्र २:२१) त्याने त्याचं संपूर्ण जीवन देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिलं आणि असं करून त्याने आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं.—योहा. ४:३४.

१३ बायबलमध्ये येशूबद्दल दिलेलं सत्य तुम्ही स्वीकारता तेव्हा तुम्ही देवाच्या पुत्रावर प्रेम करू लागता. ते प्रेम तुम्हाला तुमचं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी प्रेरित करतं; येशूनेही तेच केलं होतं. आणि या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला तुमचं जीवन यहोवाला समर्पण करायची आणि बाप्तिस्मा घ्यायची इच्छा होते.

१४-१५. तुम्ही पवित्र आत्म्याबद्दलची कोणती सत्यं शिकून ती स्वीकारली आहेत?

१४ पवित्र आत्म्याबद्दल पुढे दिलेली सत्यं शिकल्यावर तुम्हाला काय समजलं? हेच की पवित्र आत्मा एक व्यक्‍ती नसून देवाची कार्यकारी शक्‍ती आहे. यहोवाने बायबल लिहिण्यासाठी काही मानवांना आपला पवित्र आत्मा दिला. आणि हाच पवित्र आत्मा आपल्याला बायबल समजण्यासाठी आणि त्यात दिलेली तत्त्वं लागू करण्यासाठी मदत करतो. (योहा. १४:२६; २ पेत्र १:२१) पवित्र आत्म्याद्वारे यहोवा आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देतो. (२ करिंथ. ४:७) तो आपल्याला आनंदाचा संदेश सांगण्यासाठी, मोहांचा प्रतिकार करण्यासाठी, नैराश्‍याचा सामना करण्यासाठी आणि परीक्षेत टिकून राहण्यासाठी मदत करतो. तसंच, तो आपल्याला सुंदर गुण विकसित करण्यासाठीही मदत करतो. हे गुण ‘आत्म्याच्या फळाचे’ पैलू आहेत. (गलती. ५:२२) देव अशा लोकांना भरभरून त्याचा पवित्र आत्मा देतो जे त्याच्यावर भरवसा ठेवतात आणि मनापासून त्याच्याकडे पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतात.—लूक ११:१३.

१५ यहोवाची उपासना करण्यासाठी पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना मदत करतो. आपण पवित्र आत्म्यावर विसंबून राहू शकतो हे माहीत असल्यामुळे आपल्याला धीर मिळतो. पवित्र आत्म्याबद्दल शिकलेल्या गोष्टी तुम्ही स्वीकारता तेव्हा तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित होता.

१६. आतापर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा केली?

१६ तुम्ही जेव्हा देवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात एक महत्त्वाचं पाऊल उचलत असता. आधी चर्चा केल्याप्रमाणे आपण एका अर्थाने ‘खर्च उचलण्यासाठी’ तयार असलं पाहिजे, म्हणजेच आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी तयार असलं पाहिजे. पण लक्षात असू द्या की यामुळे मिळणारे आशीर्वाद तुम्ही केलेल्या त्यागांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. बाप्तिस्मा तुम्हाला वाचवू शकतो आणि तुम्ही देवासमोर शुद्ध विवेक बाळगू शकता. यहोवा देवावरचं तुमचं प्रेम हे तुम्ही बाप्तिस्मा घेण्याचं मुख्य कारण असलं पाहिजे. तसंच पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांबद्दल शिकलेल्या सत्यांवर तुमचा मनापासून विश्‍वास असला पाहिजे. आतापर्यंत ज्या गोष्टींवर आपण चर्चा केली त्यावर विचार केल्यावर ‘मी बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहे का?’ या प्रश्‍नाचं तुम्ही काय उत्तर द्याल?

बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला काय करण्याची गरज आहे?

१७. बाप्तिस्मा घेण्याआधी कोणती काही पावलं उचलणं गरजेचं आहे?

१७ तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यहोवासोबत * घनिष्ठ नातं जोडण्यासाठी आतापर्यंत बरीच पावलं उचलली आहेत. ती म्हणजे, नियमित बायबल अभ्यास केल्यामुळे तुम्हाला यहोवाबद्दल आणि येशूबद्दल बरंच काही शिकायला मिळालं आहे. आणि यामुळे तुमचा त्यांच्यावरचा विश्‍वास वाढला आहे. (इब्री ११:६) तसंच, बायबलमध्ये दिलेल्या यहोवाच्या अभिवचनांवर तुम्ही पूर्णपणे भरवसा करू लागला आणि तुम्हाला पक्की खातरी पटली की येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे पाप आणि मृत्यू यांपासून तुमची सुटका होऊ शकते. मग तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला, म्हणजेच तुमच्या चुकांबद्दल तुम्हाला मनापासून वाईट वाटलं आणि तुम्ही यहोवाकडे क्षमा मागितली. तसंच, तुम्ही तुमच्या जीवनात मोठे बदल केले, म्हणजेच तुम्ही आधीची चुकीची जीवनशैली सोडून यहोवाच्या इच्छेनुसार जगू लागला. (प्रे. कार्ये ३:१९) मग तुम्हाला तुमच्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगण्याची उत्सुकता वाटू लागली. यामुळे तुम्ही बाप्तिस्मारहित प्रचारक बनला आणि मंडळीसोबत प्रचार करू लागला. (मत्त. २४:१४) तुम्ही आतापर्यंत ही महत्त्वाची पावलं उचलल्याबद्दल यहोवाला तुमचा अभिमान वाटत असेल. तुम्ही खरंच त्याचं मन आनंदित केलं आहे.—नीति. २७:११.

१८. बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला आणखी काय करण्याची गरज आहे?

१८ बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला इतरही काही गोष्टी करण्याची गरज आहे. आधी चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. असं करण्यासाठी तुम्ही त्याला वैयक्‍तिक रीत्या प्रार्थना केली पाहिजे आणि ती मनापासून असली पाहिजे. त्या प्रार्थनेत त्याला वचन द्या की तुम्ही संपूर्ण आयुष्य त्याच्या इच्छेप्रमाणे जगाल. (१ पेत्र ४:२) मग वडील वर्गाच्या संयोजकाला सांगा की तुमची बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे. ते काही वडिलांना तुम्हाला भेटायला सांगतील. पण ते तुम्हाला भेटायला येणार म्हणून चिंतित होऊ नका. कारण हे बांधव तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि त्यांना तुमची काळजी आहे. तुम्ही शिकलेल्या बायबलच्या मूलभूत शिकवणींची ते उजळणी करतील. असं यासाठी कारण त्यांना खातरी करायची असते की तुम्हाला या शिकवणी समजल्या आहेत आणि समर्पण व बाप्तिस्मा यांचं महत्त्व पटलं आहे. तुमच्यात बाप्तिस्मा घेण्याची योग्यता आहे असं जर त्यांना वाटलं तर येणाऱ्‍या संमेलनात किंवा अधिवेशनात तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता असं ते तुम्हाला कळवतील.

बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्हाला काय करण्याची गरज आहे?

१९-२०. बाप्तिस्म्यानंतर तुम्ही काय करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही कसं करू शकता?

१९ बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्हाला काय करण्याची गरज आहे? * नेहमी लक्षात ठेवा की समर्पण हे तुम्ही यहोवाला दिलेलं वचन आहे आणि ते तुम्ही नेहमी पाळावं अशी तो अपेक्षा करतो. बाप्तिस्म्यानंतर तुम्ही यहोवाला दिलेल्या वचनानुसार जीवन जगलं पाहिजे. हे तुम्ही कसं करू शकता?

२० मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत घनिष्ठ नातं जोडा. बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती बनल्यानंतर तुम्ही ‘संपूर्ण बंधुसमाजाचे’ भाग बनता. (१ पेत्र २:१७) मंडळीतले भाऊबहीण आता तुमच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत. सभांना नियमितपणे उपस्थित राहिल्यामुळे तुमचं त्यांच्यासोबत असलेलं नातं मजबूत होईल. दररोज बायबल वाचा आणि त्यावर मनन करा. (स्तो. १:१, २) बायबलचा काही भाग वाचल्यावर मनन करण्यासाठी वेळ काढा. असं केल्यामुळे वाचलेल्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचतील. तसंच, “प्रार्थना करत राहा.” (मत्त. २६:४१) मनापासून केलेल्या प्रार्थनांमुळे तुमचं यहोवासोबत घनिष्ठ नातं तयार होईल. त्यासोबतच “आधी देवाचं राज्य” मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा. (मत्त. ६:३३) प्रचारकार्याला तुमच्या जीवनात पहिलं स्थान देण्याद्वारे तुम्ही असं करू शकता. नियमितपणे प्रचार केल्यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल आणि इतरांना सर्वकाळाच्या जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही मदत करत असाल.—१ तीम. ४:१६.

२१. बाप्तिस्म्यामुळे काय शक्य होईल?

२१ आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेणं हा तुम्ही घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल. हे खरं आहे की आपल्याला काही आव्हानांचा सामना करावा लागेल आणि त्याग करावे लागतील. पण याचा काही फायदा आहे का? नक्कीच आहे! या जुन्या व्यवस्थेत तुम्हाला सहन करावी लागणारी कोणतीही समस्या ही “तात्पुरती व हलकी” आहे. (२ करिंथ. ४:१७) याच्या उलट बाप्तिस्म्यामुळे तुम्हाला आता समाधानी जीवन जगता येईल तसंच भविष्यात “खरे जीवन” मिळेल. (१ तीम. ६:१९) तेव्हा ‘मी बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहे का?’ या प्रश्‍नाचं उत्तर देण्याआधी काळजीपूर्वक विचार करा आणि प्रार्थना करा.

गीत ४८ प्रतिदिनी यहोवासोबत चालू या

^ परि. 5 तुम्ही बाप्तिस्मा घेण्याचा विचार करत आहात का? असं असेल तर, हा लेख खासकरून तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या विषयाबद्दल असलेल्या काही खास प्रश्‍नांवर आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या उत्तरांवरून कळेल की तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात की नाही.

^ परि. 19 बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?  आणि देवाच्या प्रेमात टिकून राहा  या पुस्तकांतून तुमचा अभ्यास पूर्ण झाला नसेल तर तुम्ही तो पूर्ण केला पाहिजे.