व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ९

तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?

तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?

“तुझे तरुण पहाटेच्या दवासारखे आहेत.”—स्तो. ११०:३.

गीत ४ देवाच्या लेखी चांगले नाव मिळवणे

सारांश *

१. मंडळीतल्या तरुण भावांबद्दल काय म्हणता येईल?

तरुण भावांनो तुमच्याकडे शक्‍ती आहे, स्फूर्ती आहे. (नीति. २०:२९) त्यामुळे तुम्ही मंडळीसाठी खूप काही करू शकता. तुम्ही कदाचित विचार कराल, की ‘सहायक सेवक बनून मी भाऊबहिणींना मदत करू शकतो.’ पण ही जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही अजून लहान आहात, तुमच्याकडे अनुभव नाही असं कदाचित काहींना वाटत असेल. असं असलं, तरी तुम्ही मंडळीत इतरांचा भरवसा आणि आदर मिळवण्यासाठी आत्ताही बरंच काही करू शकता.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण दावीद राजाच्या जीवनात घडलेल्या काही घटनांबद्दल पाहणार आहोत. तसंच, यहूदाचे दोन राजे, म्हणजे राजा आसा आणि राजा यहोशाफाट यांच्या जीवनात घडलेल्या काही घटनांबद्दलही पाहणार आहोत. याशिवाय, त्या तिघांसमोर कोणत्या समस्या आल्या, त्यांचा त्यांनी कसा सामना केला आणि त्यांच्या उदाहरणांतून आज तरुण भाऊ काय शिकू शकतात हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत.

दावीद राजाकडून काय शिकता येईल?

३. तरुण भाऊ कोणत्या एका मार्गाने मंडळीतल्या वयस्कर भाऊबहिणींना मदत करू शकता?

तरुण असताना दावीद अशी काही कौशल्यं शिकला ज्यांमुळे इतरांना त्याचा फायदा झाला. यहोवासोबत त्याची चांगली मैत्री तर होतीच, पण एक चांगला संगीतकार बनण्यासाठीसुद्धा त्याने खूप मेहनत घेतली. आणि नंतर त्याने या कौशल्याचा वापर देवाचा नियुक्‍त राजा शौल याचं मन शांत करण्यासाठी केला. (१ शमु. १६:१६, २३) तरुण भावांनो तुमच्याकडेही असं काही कौशल्य आहे का, ज्याचा मंडळीतल्या भाऊबहिणींना उपयोग होऊ शकतो? आम्हाला माहीत आहे, तुमच्यापैकी अनेकांकडे अशी कौशल्यं आहेत. जसं की, मोबाईल आणि कंप्यूटर कसा वापरायचा याचं तुम्हाला चांगलं ज्ञान आहे. या कौशल्यांचा वापर तुम्ही मंडळीतल्या काही वयस्कर भाऊबहिणींना मदत करण्यासाठी करू शकता. वैयक्‍तिक अभ्यास किंवा सभांची तयारी करण्यासाठी ते मोबाईल किंवा टॅबचा चांगल्या प्रकारे वापर कसा करू शकतात हे तुम्ही त्यांना शिकवू शकता.

दावीदने आपल्या वडिलांच्या मेंढरांची खूप जबाबदारीने राखण केली. एकदा तर त्याने एका अस्वलापासून त्यांना वाचवलं (परिच्छेद ४ पाहा)

४. दावीदप्रमाणे तरुण भाऊ स्वतःमध्ये कोणते गुण विकसित करू शकतात? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

दावीदने आपल्या कामातून दाखवलं, की तो एक जबाबदार आणि भरवशालायक व्यक्‍ती आहे. उदाहरणार्थ, तरुण असताना आपल्या वडिलांच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी तो खूप मेहनत घ्यायचा. हे काम सोपं नव्हतं. त्यात धोकेसुद्धा होते. याबद्दल शौल राजाला त्याने एकदा असं सांगतिलं: “तुमचा हा सेवक आपल्या वडिलांची मेंढरं चारायचा, तेव्हा एकदा एक सिंह कळपातलं मेंढरू घेऊन गेला; आणि आणखी एकदा एक अस्वल कळपातलं मेंढरू घेऊन गेलं. तेव्हा मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना मारलं आणि त्यांच्या तोंडातून मेंढरांना सोडवलं.” (१ शमु. १७:३४, ३५) दावीदला माहीत होतं, की मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी तो खूप धैर्याने लढला. दावीदप्रमाणेच तरुण भाऊसुद्धा दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊ शकतात.

५. स्तोत्र २५:१४ यात सांगितल्याप्रमाणे तरुण भावांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असली पाहिजे?

दावीदने तरुणपणापासूनच यहोवासोबत जवळची मैत्री केली होती. दावीदसाठी देवासोबतची ही मैत्री त्याच्या धैर्यापेक्षा आणि वीणा वाजवण्याच्या कौशल्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाची होती. त्याच्यासाठी यहोवा फक्‍त एक देव नव्हता, तर सगळ्यात जवळचा मित्रही होता. (स्तोत्र २५:१४ वाचा.) तरुण भावांनो, तुम्हीसुद्धा यहोवासोबत आपली मैत्री घट्ट करू शकता. आणि ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. यामुळे मंडळीत तुम्हाला आणखी जबाबदाऱ्‍या मिळू शकतात.

६. काही लोक दावीदबद्दल कसा विचार करत होते?

दावीदबद्दल काही लोकांना असं वाटत होतं, की तो लहान आहे आणि खूप बेजबाबदार आहे. उदाहरणार्थ, दावीद गल्याथशी लढायला स्वतःहून पुढे आला तेव्हा शौल राजाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. आणि असं म्हटलं: “तू अजून लहान आहेस.” (१ शमु. १७:३१-३३) याआधी दावीदच्या स्वतःच्या भावानेसुद्धा त्याच्यावर बेजबाबदारपणे वागण्याचा आरोप लावला होता. (१ शमु. १७:२६-३०) पण यहोवाला माहीत होतं, की दावीद पोरकट किंवा बेजबाबदार नाही. आणि दावीद यहोवाच्या मदतीनेच गल्याथला ठार मारू शकला.—१ शमु. १७:४५, ४८-५१.

७. दावीदच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता?

तरुण भावांनो दावीदच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता? तुम्ही धीर दाखवायला शिकू शकता. कारण ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून पाहिलं आहे त्यांना कदाचित ही गोष्ट स्वीकारायला थोडा वेळ लागू शकतो, की तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही याची खातरी बाळगू शकता की यहोवा तुमचं फक्‍त बाहेरचं रूप पाहत नाही तर आतून तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती आहात आणि तुम्ही काय करू शकता हे तो पाहतो. (१ शमु. १६:७) दावीदच्या उदाहरणातून तुम्ही आणखी एक गोष्ट शिकू शकता. ती म्हणजे, यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. दावीदने यहोवासोबतची आपली मैत्री घट्ट करण्यासाठी त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचं जवळून निरीक्षण केलं. सृष्टीतून निर्माणकर्त्याबद्दल काय शिकायला मिळतं यावर त्याने मनन केलं. (स्तो. ८:३, ४; १३९:१४; रोम. १:२०) याशिवाय दावीदप्रमाणेच तुम्ही मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे शाळेत कुणी तुमची थट्टा करत असेल तर तुम्ही काय करू शकता? या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रार्थनेत तुम्ही यहोवाला मदत मागू शकता. तसंच बायबलमध्ये, आपल्या प्रकाशमनांध्ये आणि वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये याबद्दल जे व्यावहारिक सल्ले दिले आहेत ते तुम्ही लागू करू शकता. समोर येणारी प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी यहोवा तुम्हाला कशी मदत करतो हे जेव्हा तुम्ही स्वतः पाहाल तेव्हा त्याच्यावरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. इतकंच नाही, तर तुम्ही यहोवावर भरवसा ठेवता हे जेव्हा इतर लोक पाहतील तेव्हा तेही तुमच्यावर भरवसा ठेवतील.

तरुण भाऊ अनेक मार्गांनी इतरांना मदत करू शकतात (परिच्छेद ८-९ पाहा)

८-९. कोणत्या गोष्टीने दावीदला धीर धरायला मदत केली? आणि त्याच्या या उदाहरणातून तरुण भाऊ काय शिकू शकतात?

दावीदला आणखी एका समस्येचा सामना करावा लागला. यहूदाचा राजा म्हणून त्याचा अभिषेक करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात राज्य करायला सुरुवात करण्यासाठी त्याला बरीच वर्षं थांबावं लागलं. (१ शमु. १६:१३; २ शमु. २:३, ४) या काळादरम्यान त्याला धीर धरायला कोणत्या गोष्टीने मदत केली? अशा वेळी निराश होण्याऐवजी दावीदला जे काही करणं शक्य होतं ते त्याने केलं. उदाहरणार्थ, शौल राजापासून आपला जीव वाचवण्यासाठी दावीद पलिष्ट्यांच्या प्रदेशात राहत होता, तेव्हा त्याने त्या वेळेचा खूप चांगला उपयोग केला. इस्राएलच्या शत्रूंशी लढण्यासाठी त्याने त्या वेळेचा उपयोग केला. असं करून त्याने यहूदाच्या सीमांचं रक्षण केलं.—१ शमु. २७:१-१२.

तरुण भावांनो, दावीदप्रमाणे तुम्ही काय करू शकता? यहोवाची सेवा करण्यासाठी आणि भाऊबहिणींना मदत करण्यासाठी मिळेल त्या संधीचा उपयोग करा. रिकार्डो नावाच्या एका भावाने हेच केलं. * तो दहा-बारा वर्षांचा होता तेव्हापासूनच नियमित पायनियर बनण्याचं स्वप्न पाहत होता. पण त्याने थोडं थांबावं असं मंडळीतल्या वडिलांनी म्हटलं. पण त्यामुळे तो निराश झाला नाही किंवा चिडला नाही. उलट त्याने आपलं सेवाकार्य वाढवलं. तो म्हणतो: “आज मी त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा मला जाणवतं, की मला खरंच प्रगती करायची गरज होती आणि मी ती करू शकत होतो. संदेशात आवड दाखवणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीची मी परत भेट घ्यायचो आणि त्यासाठी मी चांगली तयारी करून जायचो. त्यामुळे पहिल्यांदाच मला एक बायबल अभ्यास मिळाला. सेवाकार्यात जास्तीत जास्त सहभाग घेतल्यामुळे मी आणखी धैर्याने प्रचार करू लागलो.” आज रिकार्डो मंडळीत एक चांगला पायनियर आणि सहायक सेवक म्हणून काम करत आहे.

१०. एकदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी दावीदने काय केलं?

१० दावीदच्या जीवनातल्या आणखी एका घटनेचा विचार करा. शौलपासून आपला जीव वाचवण्यासाठी दावीद आणि त्याची माणसं पलिष्ट्यांच्या प्रदेशात राहत होती. त्या वेळी ते आपल्या बायका-मुलांना मागे सोडून एका युद्धावर गेले होते. तेव्हा काही शत्रूंनी त्यांची घरंदारं लुटली आणि त्यांच्या बायका-मुलांना बंदी बनवून नेलं. दावीदला हे समजलं तेव्हा तो असा विचार करू शकला असता, की ‘मी अनेक युद्धं लढली आहेत आणि मी एक शूर योद्धा आहे. त्यामुळे मी सहज त्यांना शत्रूंच्या हातून सोडवू शकतो.’ पण दावीदने तसं केलं नाही. त्याने यहोवाकडे मदत मागितली. अब्याथार नावाच्या याजकाच्या मदतीने त्याने यहोवाला विचारलं, की “मी लुटारूंच्या टोळीचा पाठलाग करू का?” यहोवाने त्याला तसं करायची परवानगी दिली आणि आपल्या लोकांना सोडवून आणण्यात तो यशस्वी होईल अशी शाश्‍वतीही दिली. (१ शमु. ३०:७-१०) तरुण भावांनो, या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता?

तरुण भावांनी मंडळीतल्या वडिलांचा सल्ला घेतला पाहिजे (परिच्छेद ११ पाहा)

११. निर्णय घेण्याआधी तुम्ही काय करू शकता?

११ निर्णय घेण्याआधी इतरांचा सल्ला घ्या. आपल्या आईवडिलांशी बोला. तुम्ही मंडळीतल्या वडिलांचाही सल्ला घेऊ शकता. यहोवाला या वडिलांवर भरवसा आहे. त्यामुळे तुम्हीही त्यांच्यावर भरवसा ठेवू शकता. यहोवाच्या नजरेत ते मंडळीसाठी “भेटी” आहेत. (इफिस. ४:८) त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण केल्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचं पालन केल्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. आता आपण आणखी एका राजाबद्दल पाहू या. तो म्हणजे राजा आसा.

आसा राजाकडून काय शिकता येईल?

१२. आसा राजाने राज्य करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यात कोणते गुण होते?

१२ तरुण असताना आसा राजा नम्र आणि धाडसी होता. उदाहरणार्थ, आपल्या वडिलांनंतर तो राजा बनला तेव्हा त्याने देशातून सगळ्या मूर्ती काढून टाकायला सुरुवात केली. त्यासोबतच “त्याने यहूदाच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या देवाची, यहोवाची उपासना करायला आणि त्याच्या आज्ञा व नियमशास्त्र पाळायला सांगितलं.” (२ इति. १४:१-७) एकदा इथियोपियाचा जेरह दहा लाख सैनिक घेऊन यहूदावर हल्ला करायला आला तेव्हा आसाने यहोवाकडे मदत मागितली. त्याने अशी प्रार्थना केली: “हे यहोवा! तू कोणालाही मदत करू शकतोस, मग ते शक्‍तिशाली असोत किंवा कमजोर असोत. हे आमच्या देवा यहोवा! आम्हाला मदत कर, कारण आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवलाय.” आसाच्या या सुंदर शब्दांवरून दिसून येतं, की आपल्याला आणि आपल्या लोकांना वाचवण्याची शक्‍ती यहोवाकडे आहे यावर त्याला पूर्ण भरवसा होता. आणि म्हणूनच यहोवानेही “इथोपियाच्या सैन्याचा पराभव केला.”—२ इति. १४:८-१२.

१३. आसा राजाने नंतर काय केलं, आणि त्याचे काय परिणाम झाले?

१३ दहा लाख सैनिकांचा सामना करणं काही सोपं नव्हतं. पण यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आसा त्यांच्यावर विजय मिळवू शकला. पण नंतर इस्राएलचा दुष्ट राजा बाशा यहूदावर हल्ला करायला आला तेव्हा मात्र आसाने यहोवावर भरवसा ठेवला नाही. उलट, त्याने सीरियाच्या राजाकडून मदत मागितली. त्याच्या या चुकीच्या निर्णयामुळे त्याला वाईट परिणाम भोगावे लागले. यहोवाने हनानी संदेष्ट्याद्वारे आसा राजाला असा संदेश पाठवला: “तू तुझा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवण्याऐवजी सीरियाच्या राजावर भरवसा ठेवलास, म्हणून सीरियाचा राजा तुझ्या हातून निसटून गेला.” आणि तेव्हापासून बाशा राजासोबत आसाचं सतत युद्ध होत राहिलं. (२ इति. १६:७, ९; १ राजे १५:३२) या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता?

१४. तुम्हाला यहोवावर भरवसा आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता, आणि १ तीमथ्य ४:१२ यात सांगितल्याप्रमाणे याचा कोणता चांगला परिणाम होईल?

१४ नम्र राहा आणि नेहमी यहोवावर भरवसा ठेवा. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा हेच दिसून आलं, की यहोवावर तुमचा पूर्ण भरवसा आहे. आणि यहोवालाही तुमच्या या निर्णयामुळे आनंद झाला. पण पुढेही यहोवावर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचं. आयुष्यात मोठमोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा तुम्ही नक्कीच यहोवावर भरवसा ठेवत असाल. पण इतर निर्णयांबद्दल काय? जसं की, मनोरंजनाची किंवा नोकरीची निवड करताना, किंवा जीवनात कोणती ध्येयं ठेवायची हे ठरवताना. या गोष्टींच्या बाबतीतही निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता यहोवावर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी बायबलची तत्त्वं विचारात घ्या आणि त्यांप्रमाणे काम करा. (नीति. ३:५, ६) असं केल्यामुळे यहोवाला आनंद होईल आणि मंडळीतले भाऊबहीणही तुमचा आदर करतील.—१ तीमथ्य ४:१२ वाचा.

यहोशाफाट राजाकडून काय शिकता येईल?

१५. २ इतिहास १८:१-३; १९:२ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे यहोशाफाट राजाने कोणत्या चुका केल्या?

१५ तरुण भावांनो, आमच्यासारखेच तुम्हीसुद्धा अपरिपूर्ण आहात. त्यामुळे काही वेळा तुमच्याकडूनही चुका होऊ शकतात. पण त्यामुळे यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ नका. तुमच्याने होईल तितकी सेवा करा. या बाबतीत यहोशाफाट राजाच्या उदाहरणाचा विचार करा. त्याच्यात अनेक चांगले गुण होते. आणि त्याने राज्य करायला सुरुवात केली तेव्हा तो मदतीसाठी “आपल्या वडिलांच्या देवाकडे वळला. त्याने देवाच्या आज्ञा पाळल्या.” इतकंच नाही, तर यहूदाच्या शहरांमध्ये यहोवाबद्दलचं शिक्षण देण्यासाठी त्याने आपल्या अधिकाऱ्‍यांना पाठवलं. (२ इति. १७:४, ७) पण त्यानेसुद्धा काही वेळा चुकीचे निर्णय घेतले. अशाच एका चुकीच्या निर्णयामुळे यहोवाने आपल्या एका सेवकाला त्याच्याकडे पाठवून त्याला कडक शब्दांत सल्ला दिला. (२ इतिहास १८:१-३; १९:२ वाचा.) यावरून तुम्ही कोणता धडा शिकू शकता?

मेहनती आणि भरवशालायक असल्यामुळे तरुण भाऊ एक चांगलं नाव कमवतात (परिच्छेद १६ पाहा)

१६. राजीवच्या अनुभवातून तुम्ही काय शिकू शकता?

१६ दिलेला सल्ला स्वीकारा आणि त्याप्रमाणे काम करा. इतर तरुणांप्रमाणे तुम्हालासुद्धा यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान देणं कठीण जात असेल. पण अशा वेळी निराश होऊ नका. राजीव नावाच्या एका तरुण भावाच्या अनुभवाचा आपण विचार करू या. तो किशोरवयात होता त्या काळाबद्दल तो म्हणतो: “माझ्या जीवनात मला काय करायचंय हे त्या वेळी मला समजतच नव्हतं. इतर मुलांप्रमाणेच मलाही खेळायला आणि मौजमजा करायला खूप आवडायचं. पण तेच सभांना आणि प्रचारकार्याला जायला मला इतकं आवडत नव्हतं.” मग कोणत्या गोष्टीमुळे राजीवला मदत झाली? एका वडिलांनी प्रेमळपणे दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला मदत झाली. राजीव म्हणतो: “त्यांनी मला १ तीमथ्य ४:८ मध्ये दिलेल्या तत्त्वावर विचार करायला मदत केली.” राजीवने तो सल्ला नम्रपणे स्वीकारला. आणि आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतो याचं त्याने परीक्षण केलं. तो म्हणतो: “मी आध्यात्मिक ध्येयांना जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं ठरवलं.” याचा काय परिणाम झाला? राजीव म्हणतो: “मी तो सल्ला स्वीकारला त्याच्या काही वर्षांनीच मी सहायक सेवक बनलो.”

यहोवाचं मन आनंदी करा

१७. वयस्कर भाऊबहिणींना यहोवाची सेवा करणाऱ्‍या तरुण भावांबद्दल कसं वाटतं?

१७ तुम्हा तरुण भावांची वयस्कर भाऊबहीण मनापासून कदर करतात. कारण तुम्ही त्यांच्यासोबत “खांद्याला खांदा” लावून यहोवाची सेवा करता. (सफ. ३:९) तुम्ही ज्या आवेशाने आणि उत्साहाने दिलेलं काम करता ते पाहून त्यांना खूप आनंद होतो. त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात.—१ योहा. २:१४.

१८. नीतिवचनं २७:११ या वचनात सांगितल्याप्रमाणे यहोवाला तरुणांबद्दल कसं वाटतं?

१८ तरुण भावांनो, यहोवा तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यावर भरवसा ठेवतो हे कधीही विसरू नका. शेवटच्या काळात तरुणांची एक मोठी सेना त्याची सेवा करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येईल, हे त्याने आधीच सांगितलं होतं. (स्तो. ११०:१-३) त्याला माहीत आहे, की तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि होता होईल तितकी त्याची सेवा करायची तुमची इच्छा आहे. त्यामुळे इतरांशी धीराने वागा आणि हिंमत सोडू नका. तुमच्याकडून चूक होते, तेव्हा जो सल्ला दिला जातो तो यहोवाकडून आहे असा विचार करा, आणि तो स्वीकारा. (इब्री १२:६) तुम्हाला जी काही जबाबदारी मिळते ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही करता त्यातून यहोवाचं मन आनंदी करा.—नीतिवचनं २७:११ वाचा.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

^ परि. 5 बाप्तिस्मा घेतलेल्या तरुण भावांना यहोवाची सेवा आणखी जास्त प्रमाणात करायची इच्छा असते. जसं की, त्यांना मंडळीत सहायक सेवक म्हणून काम करायची इच्छा असते. पण त्यासाठी मंडळीतल्या लोकांचा आदर मिळवणं आणि तो टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. तरुण भावांना हे कसं करता येईल याची चर्चा या लेखात केली आहे.

^ परि. 9 काही नावं बदलण्यात आली आहेत.