अभ्यास लेख १२
प्रेम आपल्याला द्वेष सहन करायला मदत करतं
“तुम्ही एकमेकांवर प्रेम करावं, म्हणून मी या गोष्टींबद्दल तुम्हाला आज्ञा देतो. जगाने तुमचा द्वेष केला, तरी तुमचा द्वेष करण्याआधी त्याने माझा द्वेष केलाय, हे विसरू नका.”—योहा. १५:१७, १८.
गीत ५१ यहोवाला जडून राहू!
सारांश *
१. मत्तय २४:९ या वचनात सांगितल्याप्रमाणे जग आपला द्वेष करतं याचं आपल्याला आश्चर्य का वाटू नये?
यहोवाने आपल्याला अशा प्रकारे बनवलं आहे, की आपण इतरांवर प्रेम करू शकतो. त्याच वेळी इतरांनी आपल्यावर प्रेम करावं अशी इच्छाही त्याने आपल्याला दिली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आपला द्वेष करते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि काही वेळा भीतीही वाटते. उदाहरणार्थ, युरोपमध्ये राहणारी जॉर्जिना म्हणते: “मी १४ वर्षांची असताना यहोवाची सेवा करू लागले. ही गोष्ट माझ्या आईला बिलकूल आवडली नाही. आणि ती माझा विरोध करू लागली. त्यामुळे मी एकटी पडले. आणि मी चांगली मुलगी नाही असं मला वाटू लागलं.” * डॅनिलोसुद्धा असंच काहीसं म्हणतो: “साक्षीदार असल्यामुळे सैनिक मला मारायचे, माझा अपमान करायचे आणि मला धमकवायचे. तेव्हा मला खूप भीती वाटायची आणि अपमानित झाल्यासारखं वाटायचं.” खरंच, लोक आपला द्वेष करतात तेव्हा खूप वाईट वाटतं. पण ते आपल्याशी असं वागतील हे येशूने आधीच सांगितलं होतं. म्हणून आपल्याला आश्चर्य वाटत नाही.—मत्तय २४:९ वाचा.
२-३. हे जग आपला द्वेष का करतं?
२ हे जग आपला द्वेष करतं, कारण येशूसारखंच आपणसुद्धा या जगाचा भाग नाही. (योहा. १५:१७-१९) आणि त्यामुळे, आपण जरी मानवी सरकारांचा आदर करत असलो, तरी आपण त्यांची उपासना करत नाही. तसंच, आपण राजकारणात भाग घेत नाही, झेंडावंदन करत नाही किंवा राष्ट्रगीत गात नाही. आपण फक्त आणि फक्त यहोवाची उपासना करतो. तसंच, मानवांवर राज्य करायचा अधिकार फक्त त्यालाच आहे, हे आपण मानतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा देतो. पण सैतान आणि त्याची “संतती” मात्र या गोष्टीचा विरोध करते. (उत्प. ३:१-५, १५) याशिवाय, देवाचं राज्यच मानवांच्या सगळ्या समस्यांचा अंत करेल आणि या राज्याचा विरोध करणाऱ्यांचा ते नाश करेल, हे आपण लोकांना सांगतो. (दानी. २:४४; प्रकटी. १९:१९-२१) नम्र मनाच्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण दुष्टांसाठी मात्र ही वाईट बातमी आहे.—स्तो. ३७:१०, ११.
३ आपण देवाच्या नैतिक स्तरांनुसार जगतो आणि त्यामुळेसुद्धा हे जग आपला द्वेष करतं. देवाच्या स्तरांमध्ये आणि जगाच्या स्तरांमध्ये जमीनआसमानाचा फरक आहे. उदाहरणार्थ, ज्या अनैतिक कामांमुळे देवाने सदोम आणि गमोराचा नाश केला होता, त्या कामांना आज जग उघडपणे मान्यता देतं. (यहू. ७) पण या बाबतींत आपण बायबलच्या स्तरांप्रमाणे जीवन जगतो. म्हणून अनेक जण आपली थट्टा करतात आणि आपल्याला जुन्या विचारांचे समजतात.—१ पेत्र ४:३, ४.
४. द्वेषाचा सामना करण्यासाठी कोणते गुण आपल्याला मदत करू शकतात?
४ द्वेष होत असतानाही यहोवाची सेवा करत राहायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? यहोवावरचा मजबूत विश्वास. आपला हा विश्वास एका ढालीसारखं काम करतो. तो ‘त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवून टाकू शकतो.’ (इफिस. ६:१६) पण विश्वासासोबतच आपल्याला आणखी एका गुणाची गरज आहे. तो म्हणजे, प्रेम. कारण प्रेम “लगेच चिडत नाही.” प्रेम सगळं काही सहन करतं. (१ करिंथ. १३:४-७, १३) तर यहोवावरचं, आपल्या भाऊबहिणींवरचं आणि शत्रूंवरचं प्रेम द्वेष होत असतानाही यहोवाची सेवा करायला कशी मदत करू शकतं, ते आता आपण पाहू या.
यहोवावरचं प्रेम द्वेष सहन करायला मदत करतं
५. पित्यावर प्रेम असल्यामुळे येशू काय करू शकला?
५ आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री येशूने शिष्यांना म्हटलं: “माझं पित्यावर प्रेम आहे, . . . म्हणून पित्याने मला जशी आज्ञा दिली आहे, तसंच मी करतोय.” (योहा. १४:३१) यहोवावर प्रेम असल्यामुळेच पुढे येणाऱ्या कठीण परीक्षांचा येशू सामना करू शकला. यहोवावर आपलं प्रेम असेल, तर आपणसुद्धा कोणत्याही परीक्षेचा सामना करू शकू.
६. रोमकर ५:३-५ या वचनांप्रमाणे द्वेष होत असतानाही देवाच्या सेवकांना कसं वाटतं?
६ यहोवावरच्या प्रेमामुळे त्याच्या सेवकांना छळाचा सामना करायला नेहमीच मदत झाली आहे. उदाहरणार्थ, यहुदी उच्च न्यायालयाने प्रेषितांना प्रचारकार्य थांबवायची आज्ञा दिली, तेव्हा यहोवावरच्या प्रेमामुळेच ते ‘माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळू शकले.’ (प्रे. कार्यं ५:२९; १ योहा. ५:३) अशा अतूट प्रेमामुळे आजसुद्धा अनेक भाऊबहिणींना क्रूर आणि शक्तिशाली सरकारांकडून छळ होत असतानाही यहोवाला विश्वासू राहायचं बळ मिळतं. आणि द्वेष होत असतानाही ते निराश होत नाहीत, उलट आनंदी होतात.—प्रे. कार्यं ५:४१; रोमकर ५:३-५ वाचा.
७. कुटुंबातल्या सदस्यांनी आपला विरोध केला तर आपण काय केलं पाहिजे?
७ कुटुंबातलेच लोक आपला विरोध करतात तेव्हा आपल्या विश्वासाची सगळ्यात मोठी परीक्षा होऊ शकते. आपण सत्य शिकू लागतो, तेव्हा कुटुंबातल्या काही लोकांना कदाचित असं वाटेल, की आपली फसवणूक केली जात आहे. तर काहींना असं वाटेल, की आपल्याला वेड लागलं आहे. (मार्क ३:२१ पडताळून पाहा.) आपल्याला रोखण्यासाठी ते काहीपण करू शकतात. पण त्यांच्या या अशा वागण्याचं आपल्याला मुळीच आश्चर्य वाटू नये. कारण येशूने सांगितलंच होतं, की “माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू होतील.” (मत्त. १०:३६) त्यामुळे आपले नातेवाईक आपल्याशी कसंही वागले तरी आपण त्यांचा मुळीच द्वेष करू नये. उलट, जसजसं यहोवावरचं आपलं प्रेम वाढेल तसतसं लोकांवरचंही आपलं प्रेम वाढेल. (मत्त. २२:३७-३९) पण लोकांना खूश करण्यासाठी आपण कधीही बायबलमधल्या तत्त्वांचं आणि स्तरांचं पालन करायचं सोडून देणार नाही.
८-९. तीव्र विरोधाचा सामना करायला जॉर्जिनाला कशामुळे मदत झाली?
८ सुरुवातीला आपण जॉर्जिना नावाच्या ज्या बहिणीबद्दल पाहिलं होतं, तिला आपल्या आईकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. पण तरीसुद्धा ती विश्वासात ठाम उभी राहिली. जॉर्जिना म्हणते: “सुरुवातीला मी आणि माझी आई, आम्ही दोघीही बायबलचा अभ्यास करत होतो. आणि सहा महिन्यांनंतर मला सभांना जायची इच्छा होती. पण माझ्या
आईचा स्वभाव अचानक बदलला. ती माझा विरोध करू लागली. नंतर मला समजलं, की धर्मत्यागी लोकांच्या संपर्कात आहे. आणि म्हणून त्यांच्यासारखेच खोटे तर्क करून ती माझ्याशी वाद घालायची. इतकंच नाही, तर ती माझा अपमान करायची, माझे केस ओढायची, माझा गळा दाबायची आणि माझी प्रकाशनं फेकून द्यायची. असं असलं, तरी वयाच्या १५ व्या वर्षी मी बाप्तिस्मा घेतला. मी यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं म्हणून तिने सर्व प्रयत्न केले. तिने मला अशा ठिकाणी ठेवलं जिथे सहसा बंडखोर मुलींना ठेवलं जायचं. त्यांच्यापैकी काही मुली ड्रग्ज घ्यायच्या आणि असे इतर अपराध करायच्या. खरंच, ज्यांनी तुमच्यावर जिवापाड प्रेम केलं पाहिजे, तुम्हाला जपलं पाहिजे, तेच जेव्हा तुमचा विरोध करतात तेव्हा फार वाईट वाटतं.”९ इतका विरोध असतानाही यहोवाची सेवा करत राहायला जॉर्जिनाला कसं शक्य झालं? ती म्हणते: “ज्या दिवशी आई माझा विरोध करू लागली, त्याच दिवशी माझं संपूर्ण बायबल वाचून झालं होतं. त्यामुळे हेच सत्य आहे याची मला पक्की खातरी पटली. आणि मला यहोवाच्या आणखी जवळ असल्यासारखं वाटलं. मी अनेकदा यहोवाला प्रार्थना करायचे आणि तो माझ् प्रार्थनांची उत्तरं द्यायचा. माझ्या आईने मला जिथे ठेवलं होतं, तिथे राहत असताना एका बहिणीने मला तिच्या घरी बोलवलं. आणि आम्ही दोघींनी मिळून बायबलचा खूप छान अभ्यास केला. त्या संपूर्ण काळात भाऊबहिणींनी मला खूप धीर दिला. मी त्यांच्या कुटुंबातलीच एक आहे असं त्यांनी मला वागवलं. खरंच, आपला विरोध करणारे कोणीही असोत, पण यहोवा त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे मी स्वतः पाहिलंय.”
१०. आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?
१० प्रेषित पौलने लिहिलं, की ‘कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही, जे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केलं आहे.’ (रोम. ८:३८, ३९) काही काळासाठी कदाचित आपल्याला त्रास सहन करावा लागेल. पण, आपण हा भरवसा ठेवू शकतो, की आपल्याला धीर देण्यासाठी आणि आपलं सांत्वन करण्यासाठी यहोवा नेहमी आपल्या जवळ असेल. तसंच, जॉर्जिनासारखंच तो मंडळीतल्या भाऊबहिणींद्वारेही आपल्याला मदत करेल.
भाऊबहिणींवरचं प्रेम द्वेष सहन करायला मदत करतं
११. योहान १५:१२, १३ मध्ये येशूने ज्या प्रेमाबद्दल सांगितलं त्याचा शिष्यांना कसा फायदा होणार होता? याचं एक उदाहरण द्या.
११ आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री येशूने शिष्यांना पुन्हा याची आठवण करून दिली, की त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं. (योहान १५:१२, १३ वाचा.) कारण त्याला माहीत होतं, की असं निःस्वार्थ प्रेमच त्यांना एकत्र राहायला आणि जगाचा द्वेष सहन करायला मदत करेल. थेस्सलनीका मंडळीचाच विचार करा. ती मंडळी तयार झाली तेव्हापासूनच त्यातल्या भाऊबहिणींचा छळ होत होता. पण तरीसुद्धा ते विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिले आणि एकमेकांवर प्रेम करत राहिले. (१ थेस्सलनी. १:३, ६, ७) त्यांनी पुढेही असंच प्रेम करत राहावं, उलट ते “जास्तीत जास्त” करावं असं प्रोत्साहन पौलने त्यांना दिलं. (१ थेस्सलनी. ४:९, १०) कारण हे प्रेमच त्यांना निराश झालेल्यांचं सांत्वन करायची आणि दुर्बळांना आधार द्यायची प्रेरणा देणार होतं. (१ थेस्सलनी. ५:१४) पौलने दिलेला हा सल्ला त्यांनी नक्कीच पाळला असं म्हणता येईल. कारण जवळपास एका वर्षानंतर पौलने त्यांना जे दुसरं पत्र लिहिलं त्यात त्याने असं म्हटलं: ‘तुमच्यापैकी प्रत्येकाचं एकमेकांवरचं प्रेम वाढत आहे.’ (२ थेस्सलनी. १:३-५) त्यांच्यातल्या या प्रेमामुळेच ते संकटांचा आणि छळाचा धीराने सामना करू शकले.
१२. युद्धाच्या काळात, एका देशातल्या भाऊबहिणींनी एकमेकांवर प्रेम असल्याचं कसं दाखवलं?
१२ आता आधी उल्लेख केलेल्या डॅनिलोच्या अनुभवाचा विचार करा. तो आणि त्याची पत्नी ज्या देशात राहत होते तिथे युद्ध सुरू होतं. आणि हळूहळू युद्धाची झळ त्यांच्या शहरापर्यंत पोचली. पण तशा परिस्थितीतसुद्धा ते सभांना जात होते, शक्य तितका प्रचार करत होते आणि त्यांच्याकडे असलेल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू इतर भाऊबहिणींनाही देत होते. एक दिवस काही सैनिक डॅनिलोच्या घरी आले. डॅनिलो म्हणतो: “मी यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं असा दबाव त्यांनी माझ्यावर टाकला. मी नकार दिला तेव्हा त्यांनी मला खूप मारलं आणि मला घाबरवण्यासाठी माझ्या डोक्यावरून गोळ्या झाडल्या. इतकंच नाही, तर त्यांनी मला अशी धमकीही दिली, की ‘पुढच्या वेळी आम्ही परत येऊ तेव्हा तुझ्या बायकोवर बलात्कार करू.’ पण मंडळीतल्या भाऊबहिणींना हे कळलं, तेव्हा त्यांनी लगेच आम्हाला ट्रेननी दुसऱ्या शहरात पाठवून दिलं. त्यांचं ते प्रेम मी कधीच विसरणार नाही. आम्ही नवीन शहरात पोचलो तेव्हा तिथल्या भाऊबहिणींनी आम्हाला राहायला घर दिलं, खाण्या-पिण्याच्या वस्तू दिल्या आणि नोकरी शोधायला मदत केली. त्यामुळे आम्ही अशा भाऊबहिणींना आमच्या घरात आसरा देऊ शकलो जे युद्धामुळे बेघर झाले होते.” अशा अनुभवांवरून दिसून येतं, की एकमेकांवरचं प्रेम द्वेषाचा सामना करायला आपल्याला मदत करतं.
शत्रूंवर प्रेम असेल, तर द्वेष सहन करायला मदत होईल
१३. लोक आपला द्वेष करत असले, तरी यहोवाची सेवा करत राहायला पवित्र शक्ती कशी मदत करते?
१३ येशूने आपल्याला शत्रूंवर प्रेम करायला सांगितलं. (मत्त. ५:४४, ४५) पण ते इतकं सोपं नाही. मग कोणती गोष्ट आपल्याला शत्रूंवर प्रेम करायला मदत करू शकते? देवाची पवित्र शक्ती! पवित्र शक्तीच्या मदतीने आपण स्वतःमध्ये प्रेम, सहनशीलता, दयाळूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम हे गुण विकसित करू शकतो. (गलती. ५:२२, २३) ते आपल्याला द्वेष होत असतानाही यहोवाची सेवा करत राहायला मदत करू शकतात. सत्यात असलेल्या पतीने, पत्नीने, मुलाने किंवा शेजाऱ्याने हे गुण दाखवल्यामुळे त्यांचा विरोध करणाऱ्यांची मनं बदलली आहेत; आणि त्यांनी विरोध करायचं थांबवलं आहे. त्यांच्यापैकी अनेक जण तर सत्यातसुद्धा आले आहेत. म्हणून जर तुमचा द्वेष करणाऱ्यांवर प्रेम करणं तुम्हाला कठीण जात असेल, तर पवित्र शक्तीच्या मदतीसाठी प्रार्थना करा. (लूक ११:१३) आणि आपण यहोवाचं ऐकलं तर आपलं नेहमीच भलं होईल असा भरवसा बाळगा.—नीति. ३:५-७.
१४-१५. रोमकर १२:१७-२१ यातला सल्ला पाळल्यामुळे यास्मीनला कशी मदत झाली?
१४ आता यास्मीनच्या अनुभवाकडे लक्ष द्या. ती यहोवाची साक्षीदार बनली तेव्हा तिच्या पतीला वाटलं, की तिची फसवणूक करण्यात आली आहे. तिने यहोवाची सेवा करायचं थांबवावं म्हणून त्याने खूप प्रयत्न केले. तो तिचा अपमान करायचा. तिला थांबवण्यासाठी नातेवाइकांना बोलवायचा आणि ते तिच्यावर कुटुंबात फूट पाडायचा आरोप लावायचे. इतकंच नाही, तर तिला घाबरवण्यासाठी तो धर्मगुरूला आणि तंत्रमंत्र करणाऱ्याला बोलवायचा. एकदा तर मंडळीची सभा चालू असताना तो तिथे येऊन बांधवांना फार वाईटसाईट बोलला. अशी वाईट वागणूक मिळाल्यामुळे यास्मीन खूप रडायची.
१५ पण त्या काळात मंडळीतल्या भाऊबहिणींनी तिचं सांत्वन केलं, तिला धीर दिला. आणि वडिलांनी तिला रोमकर १२:१७-२१ (वाचा.) यातला सल्ला पाळायचं प्रोत्साहन दिलं. यास्मीन म्हणते: “तो सल्ला पाळणं खूप कठीण होतं. पण मी यहोवाकडे मदत मागितली. आणि माझ्याने होईल तितका तो सल्ला पाळायचा मी प्रयत्न केला. त्यामुळे मला खूप मदत झाली. माझे पती जेव्हा किचनमध्ये मुद्दाम कचरा टाकायचे तेव्हा मी ते निमूटपणे साफ करायचे. ते माझा अपमान करायचे तेव्हाही मी त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे, आणि ते कधी आजारी पडले तर मी त्यांची चांगली काळजी घ्यायचे.”
१६-१७. यास्मीनच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१६ आपल्या पतीशी प्रेमाने वागल्यामुळे यास्मीनला चांगले परिणाम पाहायला मिळाले. ती म्हणते: “माझे पती माझ्यावर जास्त भरवसा ठेवू लागले आहेत. कारण मी नेहमी खरं बोलेन हे त्यांना माहीत आहे. धर्माविषयी आमच्यामध्ये चर्चा होते तेव्हा ते शांतपणे माझं ऐकतात. ते आता स्वतः मला सभांना जायला सांगतात. आमचं नातं पहिल्यापेक्षा खूप चांगलं झालं आहे. आणि आमच्या कुटुंबात शांती आहे. मी आशा करते, की तेसुद्धा एक दिवस सत्य शिकतील आणि माझ्यासोबत यहोवाची सेवा करतील.”
१७ यास्मीनच्या अनुभवातून दिसून येतं, की ‘प्रेम सगळं सहन करतं. सगळ्या गोष्टींची आशा धरतं, सगळ्या बाबतींत धीर धरतं.’ (१ करिंथ. १३: ७) लोक आपला द्वेष करतात तेव्हा खूप त्रास होतो, खूप दुःख होतं. पण प्रेमामध्ये त्यांची मनं जिंकण्यायची जबरदस्त ताकद आहे. आणि आपला विरोध करणाऱ्यांवर आपण प्रेम करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. पण जर विरोध करणारे आपला द्वेष करतच राहिले तर काय? अगदी तेव्हासुद्धा आपण आनंदी राहू शकतो. ते कसं, हे पुढे पाहू या.
द्वेष होत असतानाही आनंदी राहणं शक्य!
१८. द्वेष होत असतानाही आनंदी राहण्याची कोणती तीन कारणं आपल्याजवळ आहेत?
१८ येशूने म्हटलं: ‘लोक तुमचा द्वेष करतात तेव्हा तुम्ही सुखी आहात.’ (लूक ६:२२) लोकांनी आपला द्वेष करावा अशी आपली मुळीच इच्छा नसते. तसंच, आपल्या विश्वासामुळे लोकांनी आपला छळ करावा अशीसुद्धा आपली इच्छा नसते. मग येशूने असं का म्हटलं, की लोक आपला द्वेष करतात तेव्हा आपण सुखी किंवा आनंदी राहू शकतो? याची तीन कारणं आहेत. पहिलं, द्वेष होत असतानाही आपण यहोवाची सेवा करतो, तेव्हा त्याला आनंद होतो. (१ पेत्र ४:१३, १४) दुसरं, आपल्या विश्वासाची पारख होऊन तो आणखी मजबूत होतो. (१ पेत्र १:७) आणि तिसरं, भविष्यात आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाचं मौल्यवान बक्षीस मिळेल.—रोम. २:६, ७.
१९. प्रेषितांचा छळ करण्यात आला तरीसुद्धा ते आनंदी का होते?
१९ येशूचं पुनरूत्थान झालं त्यानंतर लगेचच प्रेषितांनी येशूने सांगितलेला आनंद अनुभवला. त्यांना फटके मारण्यात आले आणि त्यांनी प्रचार करू नये अशी ताकीद देण्यात आली, तरीसुद्धा ते आनंदी होते. कारण त्यांना “येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं” होतं. (प्रे. कार्यं ५:४०-४२) येशूवर त्यांचं इतकं प्रेम होतं, की शत्रूंच्या द्वेषाला ते जरासुद्धा घाबरले नाहीत. आणि या प्रेमामुळेच “आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.” आजसुद्धा बरेच भाऊबहीण समस्या असतानाही, विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. कारण आपण केलेलं काम आणि देवाच्या नावाबद्दल दाखवलेलं प्रेम तो कधीच विसरणार नाही, हे त्यांना माहीत आहे.—इब्री ६:१०.
२०. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२० या दुष्ट जगाचा नाश होत नाही तोपर्यंत लोक आपला द्वेष करत राहतील. (योहा. १५:१९) पण आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण यहोवा आपल्याला ‘बळ देईल आणि आपलं संरक्षण करेल.’ हे तो कसं करेल याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या. (२ थेस्सलनी. ३:३) तर मग आपण यहोवावर, भाऊबहिणींवर आणि आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहू या. यामुळे आपल्यातली एकता टिकवून राहील, आपला विश्वास मजबूत होईल, यहोवाच्या नावाचा गौरव होईल आणि द्वेषापेक्षा प्रेम कितीतरी जास्त शक्तिशाली आहे हे दिसून येईल.
गीत ३ देव प्रीती आहे
^ परि. 5 जगाने आपला कितीही द्वेष केला तरी यहोवावरचं, आपल्या भाऊबहिणींवरचं आणि शत्रूंवरचं प्रेम आपल्याला यहोवाची सेवा करत राहायला कशी मदत करू शकतं? तसंच, द्वेष होत असतानाही आपण आनंदी राहू शकतो असं येशूने का म्हटलं? या प्रश्नांची उत्तरं या लेखात आपण पाहू.
^ परि. 1 नावं बदलण्यात आली आहेत.
^ परि. 58 चित्रांचं वर्णन: सैनिकांनी डॅनिलोला धमकावलं तेव्हा भाऊबहिणींनी त्याला आणि त्याच्या पत्नीला दुसऱ्या शहरात पाठवून दिलं. तिथल्या भाऊबहिणींनीही त्यांचं प्रेमाने स्वागत केलं आणि त्यांना मदत केली.
^ परि. 60 चित्रांचं वर्णन: यास्मीनचा पती तिचा विरोध करायचा तेव्हा मंडळीतल्या वडिलांनी तिला चांगला सल्ला दिला. त्यामुळे ती एक चांगली पत्नी बनू शकली.