व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

मेसेज पाठवणाऱ्‍या ॲप्सचा आपण विचारपूर्वक वापर का केला पाहिजे?

काही ख्रिस्ती आपल्या नातेवाइकांच्या किंवा मंडळीतल्या भाऊबहिणींच्या संपर्कात राहण्यासाठी वॉट्‌सॲपसारख्या मेसेजिंग ॲप्सचा वापर करतात. पण यांचा उपयोग करताना एका प्रौढ ख्रिस्तीने बायबलमधला सल्ला नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. तो सल्ला असा आहे: “शहाणा माणूस धोका पाहून लपतो, पण भोळा पुढे जातो आणि परिणाम भोगतो.”—नीति. २७:१२.

आपण सुरक्षित असावं अशी यहोवाची इच्छा आहे. त्यामुळे आपण अशा लोकांसोबत संगती करणार नाही जे मंडळीत फूट पाडतात, जे बहिष्कृत झाले आहेत किंवा जे लोकांची दिशाभूल करणारं शिक्षण देतात. (रोम. १६:१७; १ करिंथ. ५:११; २ योहा. १०, ११) मंडळीत असेही लोक असू शकतात जे देवाच्या नियमांनुसार वागत नाहीत. (२ तीम. २:२०, २१) त्यामुळे मित्र जोडताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. खासकरून मेसेजिंग ॲप्सचा वापर करून आपण इतरांशी मैत्री करतो तेव्हा. कारण असे ॲप्स वापरून कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी नाही हे ठरवणं कठीण असू शकतं.

एखाद्या ग्रुपमध्ये शंभरएक किंवा हजार लोक असतील तर त्या ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं की नाही, खासकरून याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मोठ्या ग्रुपमध्ये असल्यामुळे काही ख्रिश्‍चनांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. तर मग, अशा मोठ्या ग्रुपमध्ये जॉइन करताना एक भाऊ किंवा बहीण सावधगिरी कशी बाळगू शकते? इतक्या मोठ्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला वैयक्‍तिक रितीने ओळखणं आणि ते सत्यात कशी प्रगती करत आहेत हे जाणून घेणं खूप कठीण आहे. म्हणून स्तोत्र २६:४ मध्ये जे म्हटलं आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यात म्हटलं आहे: “फसवणूक करणाऱ्‍यांसोबत मी राहत नाही, ढोंगी लोकांपासून मी दूर राहतो.” यावरून हेच दिसून येत नाही का, की आपण अशा लोकांसोबतच मेसेजद्वारे संपर्कात असलं पाहिजे ज्यांना आपण वैयक्‍तिक रितीने ओळखतो?

पण जेव्हा ग्रुप छोटा असतो तेव्हासुद्धा आपण सावध असणं गरजेचं आहे. कारण मेसेज वाचण्यात किंवा तो पाठवण्यात आपला बराच वेळ जाऊ शकतो. तसंच, ग्रुपमध्ये आपण कोणत्या विषयावर चर्चा करतो यावरदेखील लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक मेसेजला उत्तर देणं किंवा त्यात भरपूर वेळ घालवणं, हे सुज्ञपणाचं नाही. पौलने तीमथ्यला इतरांबद्दल ‘गप्पा मारणाऱ्‍या आणि दुसऱ्‍यांच्या कामांत लुडबुड’ करणाऱ्‍या लोकांपासून सावध राहायला सांगितलं होतं. (१ तीम. ५:१३) आज काही लोक अशाच गोष्टी मेसेज पाठवून करतात.

एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती इतर साक्षीदारांची टीका करणार नाही किंवा इतर लोक करत असलेल्या टीकेला ती प्रतिसाद देणार नाही. तसंच, ती त्यांच्या खासगी गोष्टीही इतरांना सांगणार नाही. (स्तो. १५:३; नीति. २०:१९) असं कधीकधी होऊ शकतं, की वाढवून-चढवून सांगितलेली एखादी धक्कादायक बातमी आपल्याकडे मेसेजद्वारे येते. अशा वेळी एक प्रौढ ख्रिस्ती ती बातमी खातरीलायक असल्याशिवाय पुढे पाठवणार नाही. (इफिस. ४:२५) पण आपल्याला नियमितपणे jw.org वर आणि दर महिन्याला JW ब्रॉडकास्टिंग कार्यक्रमातून बायबलवर आधारित माहिती मिळते. ती माहिती आणि त्यात सांगितलेले अहवाल खरे असतात आणि त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो.

काही साक्षीदार आपला व्यवसाय करण्यासाठी मेसेजिंग ॲप्सचा वापर करतात. ते भाऊबहिणींना आपल्या वस्तूंची जाहिरात पाठवतात आणि नोकरीच्या संधींबद्दल त्यांना सांगतात. पण या सगळ्या गोष्टींचा यहोवाच्या उपासनेशी काहीही संबंध नाही. ‘पैशाच्या लोभापासून’ दूर राहणारे ख्रिस्ती आपल्या फायद्यासाठी कधीच आपल्या भाऊबहिणींचा उपयोग करणार नाही.—इब्री १३:५.

पण, विपत्तीचा सामना करणाऱ्‍या किंवा गरजू भाऊबहिणींना मदत करण्यासाठी मेसेजिंग ॲप्सद्वारे इतर भाऊबहिणींकडून पैसे गोळा करणं योग्य ठरेल का? आपलं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम आहे. त्यामुळे अशा मार्गाने त्यांना मदत करायचा आपण विचार करू. (याको. २:१५, १६) पण असं करून आपण खरंतर शाखा कार्यालयाने आणि मंडळीने मदतकार्यासाठी जी व्यवस्था केली आहे त्यात अडथळे निर्माण करत असू. (१ तीम. ५:३, ४, ९, १०, १६) आणि भाऊबहिणींना मदत करण्यासाठी आपल्याला खास जबाबदारी देण्यात आली आहे असं दाखवत असू. पण लोकांना असं वाटावं अशी आपल्यापैकी कुणाचीच इच्छा नाही.

आपण जे काही करतो ते देवाच्या गौरवासाठी असावं अशी आपली इच्छा आहे. (१ करिंथ. १०:३१) तेव्हा, मेसेजिंग ॲप्सचा किंवा इतर टॅकनोलॉजिचा वापर करत असताना त्यातले धोके ओळखा आणि विचारपूर्वक त्यांचा उपयोग करा.