व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ११

समस्यांचा सामना करायला बायबल मदत करू शकतं

समस्यांचा सामना करायला बायबल मदत करू शकतं

“धीर आणि सांत्वन देणारा देव तुम्हा सगळयांना . . . मदत करो.”—रोम. १५:५.

गीत ३७ देवप्रेरित शास्त्रवचने

सारांश *

१. यहोवाच्या लोकांना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो?

तुम्ही सध्या एखाद्या समस्येचा सामना करत आहात का? कदाचित मंडळीत एखाद्याने तुमचं मन दुखावलं असेल. (याको. ३:२) साक्षीदार असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी किंवा शाळेत तुमची थट्टा केली जात असेल. (१ पेत्र ४:३, ४) किंवा कुटुंबातले लोक तुम्हाला सभांना किंवा प्रचाराला जाऊ देत नसतील. (मत्त. १०:३५, ३६) आणि एखादी समस्या खूपच कठीण असेल तर यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं, असंही तुम्हाला कदाचित वाटेल. पण हार मानू नका. कारण समस्या कोणतीही असली, तरी यहोवा तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला बुद्धी देईल आणि त्या समस्येचा धीराने सामना करायला बळ देईल.

२. रोमकर १५:४ या वचनात सांगितल्याप्रमाणे बायबलचं वाचन केल्यामुळे आपल्याला कशी मदत मिळू शकते?

यहोवाच्या अनेक सेवकांनी बऱ्‍याच मोठमोठ्या समस्यांचा धीराने सामना केला. ते त्यांचा सामना कसा करू शकले याची सविस्तर माहिती यहोवाने आपल्यासाठी बायबलमध्ये दिली आहे. आणि तीच गोष्ट लिहायची प्रेरणा त्याने प्रेषित पौलला दिली. (रोमकर १५:४ वाचा.) त्यांचे हे अहवाल वाचून आपल्याला खूप धीर आणि बळ मिळू शकतं. पण त्यासाठी बायबलचं फक्‍त वाचन करणं पुरेसं नाही; तर आपण जे काही वाचतो ते आपल्या मनाला भिडलं पाहिजे आणि आपली विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. समजा एखादी समस्या सोडवण्यासाठी मदत हवी असेल तर आपण काय करू शकतो? त्यासाठी पुढे चार गोष्टी सुचवल्या आहेत: (१ प्रार्थना करा,  (२ कल्पना करा,  (३ मनन करा,  आणि (४ लागू करा.  ही प्रत्येक गोष्ट कशी करायची याची चर्चा आता आपण करू या. * मग, अभ्यास करायची ही पद्धत वापरून आपल्याला दावीद राजाच्या आणि प्रेषित पौलच्या जीवनात घडलेल्या घटनांवरून काय शिकता येईल ते पाहू या.

१. प्रार्थना करा

बायबल वाचण्याआधी यहोवाला प्रार्थना करा. आणि तुम्हाला मदत करतील असे मुद्दे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी त्याला विनंती करा (परिच्छेद ३ पाहा)

३. बायबल वाचण्याआधी तुम्ही काय केलं पाहिजे, आणि का?

(१ प्रार्थना करा.  बायबल वाचण्याआधी यहोवाला प्रार्थना करा. आणि तुम्ही जे काही वाचणार आहात त्यातून तुम्हाला कसा फायदा होईल हे समजून घ्यायला त्याला मदत मागा. उदाहरणार्थ, एखाद्या समस्येचा सामना कसा करायचा याबद्दल बायबलमध्ये दिलेली तत्त्वं शोधायला यहोवाने तुम्हाला मदत करावी अशी विनंती त्याच्याकडे करा.—फिलिप्पै. ४:६, ७; याको. १:५.

२. कल्पना करा

तुम्ही ज्या व्यक्‍तीबद्दल वाचत आहात तिच्या जागी स्वतःला ठेवा (परिच्छेद ४ पाहा)

४. बायबलमधल्या एखाद्या अहवालातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा होऊ शकतो?

(२ कल्पना करा.  यहोवाने आपल्याला कल्पना करायची एक अद्‌भुत क्षमता दिली आहे. तुम्ही जर बायबलमधून एखाद्या व्यक्‍तीचा अहवाल वाचत असाल तर तुम्हीच ती व्यक्‍ती आहात अशी कल्पना करा. ती काय पाहते, तिला कसं वाटतं आणि तिच्या आसपास काय घडत आहे, हे सगळं डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे त्या अहवालातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल.

३. मनन करा

तुम्ही जे काही वाचता त्याचा आणि वाचलेली माहिती तुम्हाला कशी लागू होते याचा खोलवर विचार करा (परिच्छेद ५ पाहा)

५. मनन करणं म्हणजे काय, आणि तुम्ही ते कसं करू शकता?

(३ मनन करा.  मनन करणं म्हणजे तुम्ही जे काही वाचता त्याचा खोलवर विचार करणं आणि ती माहिती कशी लागू करता येईल हे समजून घेणं. त्यामुळे, एखाद्या विषयाबद्दल तुम्ही आधी जे वाचलं होतं आणि त्याच विषयाबद्दल आता जे वाचलं आहे, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते तुम्हाला कळेल. आणि त्यामुळे त्या विषयाबद्दलची तुमची समज आणखी वाढेल. मनन करणं, हे एखादं जिगसॉ कोडं सोडवण्यासारखं आहे. नेमकं चित्र काय आहे हे समजण्यासाठी त्या चित्राचे वेगवेगळे तुकडे एकमेकांना जोडण्याची गरज असते. त्याचप्रमाणे एखादा विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्या विषयाबद्दल तुम्ही जी माहिती वाचली आहे ती एकमेकांशी जोडण्याची गरज आहे. यालाच मनन करणं म्हणतात. अशा प्रकारे मनन करण्यासाठी स्वतःला विचारा: ‘अहवालात सांगितलेल्या व्यक्‍तीने आपली समस्या सोडवण्यासाठी काय केलं? यहोवाने तिला कशी मदत केली? समस्यांचा धीराने सामना करण्यासाठी मी तिच्याकडून काय शिकू शकतो?’

४. लागू करा

जीवनात चांगले निर्णय घेण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी आणि आपला विश्‍वास आणखी मजबूत करण्यासाठी शिकलेल्या गोष्टी लागू करा (परिच्छेद ६ पाहा)

६. शिकलेल्या गोष्टी लागू करणं का महत्त्वाचं आहे?

(४ लागू करा.  येशूने म्हटलं होतं, की आपण जर शिकलेल्या गोष्टी लागू केल्या नाहीत तर आपण अशा माणसासारखे आहोत जो वाळूवर आपलं घर बांधतो. घर बांधण्यासाठी तो खूप मेहनत घेतो. पण तिचा काहीच उपयोग होत नाही. कारण जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस येतो तेव्हा त्याचं घर वाहून जातं. (मत्त. ७:२४-२७) त्याचप्रमाणे आपण जर प्रार्थना करण्यासाठी, कल्पना करण्यासाठी आणि मनन करण्यासाठी खूप मेहनत घेतली; पण शिकलेल्या गोष्टी लागूच केल्या नाहीत, तर आपली सगळी मेहनत वाया जाईल. कारण जेव्हा आपल्यासमोर परीक्षा येतील, आपला छळ होईल तेव्हा त्यांचा सामना करण्याइतपत आपला विश्‍वास मजबूत नसेल. पण तेच जर आपण शिकलेल्या गोष्टी लागू केल्या तर आपल्याला जीवनात योग्य निर्णय घेता येतील, मनाची शांती मिळेल आणि आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल. (यश. ४८:१७, १८) तर चला, आपण नुक्त्याच ज्या चार गोष्टी पाहिल्या त्यांचा उपयोग करू या आणि दावीद राजाच्या जीवनात घडलेल्या एका घटनेवरून काय शिकता येईल ते पाहू या.

दावीद राजाकडून तुम्ही काय शिकू शकता?

७. आता आपण कुणाचं उदाहरण पाहणार आहोत?

तुमच्या एखाद्या मित्राने किंवा कुटुंबातल्या सदस्याने तुमचा विश्‍वासघात केला आहे का? असेल, तर दावीद राजाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्याचा मुलगा अबशालोम यानेसुद्धा त्याचा विश्‍वासघात केला होता आणि त्याचं राज्यपद बळकावण्याचा प्रयत्न केला होता.—२ शमु. १५:५-१४, ३१; १८:६-१४.

८. यहोवाकडून मदत मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

(१ प्रार्थना करा.  दावीदचा हा अहवाल लक्षात ठेवून यहोवाला प्रार्थना करा. आणि तुमच्यासोबत जे घडलं त्याबद्दल तुम्हाला नेमकं कसं वाटतं ते यहोवाला स्पष्टपणे सांगा. (स्तो. ६:६-९) मग, या समस्येचा सामना करायला मदत करतील अशी तत्त्वं तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी यहोवाला विनंती करा.

९. दावीद आणि अबशालोम यांच्यात काय झालं हे थोडक्यात सांगा.

(२ कल्पना करा.  या अहवालातल्या घटनांचा विचार करा आणि दावीद राजाला कसं वाटलं असेल याची कल्पना करा. लोकांची मनं जिंकण्यासाठी अबशालोम अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. (२ शमु. १५:७) मग योग्य वेळ आल्यावर अबशालोम संपूर्ण इस्राएलमध्ये जासूद पाठवतो. लोकांनी आपल्याला राजा म्हणून स्वीकारावं यासाठी त्यांच्या मनाची तयारी करण्यासाठी तो या माणसांना पाठवतो. इतकंच नाही, तर दावीदचा मित्र आणि त्याचा सगळ्यात विश्‍वासू सल्लागार अहिथोफेल यालासुद्धा तो आपल्यात सामील करून घेतो. मग अबशालोम स्वतःला राजा म्हणून घोषित करतो आणि दावीदला मारून टाकण्याचा कट रचतो. त्या वेळी दावीद खूप आजारी असावा. (स्तो. ४१:१-९) अबशालोमने केलेला कट दावीदला कळतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो यरुशलेमधून पळून जातो. नंतर अबशालोमच्या सैनिकांमध्ये आणि दावीदच्या सैनिकांमध्ये लढाई होते. त्यात अबशालोमचं सैन्य हरतं आणि त्याचा मृत्यू होतो.

१०. दावीद राजा काय करू शकला असता?

१० या सगळ्या गोष्टींमुळे दावीदला कसं वाटत असेल याची कल्पना करा. त्याचं अबशालोमवर जिवापाड प्रेम होतं आणि अहिथोफेलवर खूप विश्‍वास होता. पण या दोघांनी त्याचा विश्‍वासघात केला आणि त्याचं मन दुखावलं. इतकंच नाही, तर त्यांनी त्याला मारून टाकायचाही प्रयत्नही केला. आपले बाकीचे मित्रंही त्याला मिळाले असतील असा विचार करून दावीदचा त्यांच्यावरचा विश्‍वास उडाला असता. आणि त्याला हवं असतं तर तो फक्‍त स्वतःचा विचार करून एकटाच देशातून पळून जाऊ शकला असता. किंवा तो पूर्णपणे निराश होऊ शकला असता. पण असं काहीच त्याने केलं नाही. उलट, त्याने या परीक्षेचा धीराने सामना केला. कशामुळे तो हे करू शकला?

११. दावीदने त्याच्यासमोर आलेल्या संकटाचा कसा सामना केला?

११ (३ मनन करा.  दावीदच्या या अहवालातून कोणती तत्त्वं तुम्ही शिकू शकता? त्यासाठी पुढे दिलेल्या प्रश्‍नाचा विचार करा: “दावीदने त्याच्यासमोर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी काय केलं?” तो घाबरून गेला नाही किंवा त्याने विचार न करता तडकाफडकी निर्णय घेतले नाहीत. किंवा मग तो चिंतेत इतकाही बुडून गेला नाही की त्याला निर्णयच घेता येईना. उलट, त्याने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि आपल्या मित्रांची मदत घेतली. शिवाय, घेतलेल्या निर्णयांप्रमाणे त्याने लगेच काम केलं. दावीदसोबत जे काही घडलं होतं त्यामुळे तो खूप दु:खी झाला होता. पण म्हणून बाकीचे सगळेच आपल्या विरोधात आहेत असा त्याने विचार केला नाही, किंवा मनात द्वेषाची भावना बाळगली नाही. तर त्याने यहोवावर आणि आपल्या मित्रांवर भरवसा ठेवला.

१२. यहोवाने दावीदला कशी मदत केली?

१२ यहोवाने दावीदला कशी मदत केली? याबद्दल संशोधन केल्यावर तुमच्या लक्षात येईल, की या परीक्षेचा धीराने सामना करण्यासाठी यहोवाने दावीदला बळ दिलं. (स्तो. ३:१-८; उपरीलेखन) तसंच, दावीदने घेतलेल्या निर्णयांना यहोवाने यश दिलं. शिवाय, दावीदचं रक्षण करण्यासाठी त्याचं सैन्य अबशालोमशी लढत होतं, तेव्हा यहोवाने दावीदच्या सैनिकांना मदत केली.

१३. कोणी जर तुमचं मन दुखावलं तर तुम्ही दावीदचं अनुकरण कसं करू शकता? (मत्तय १८:१५-१७)

१३ (४ लागू करा.  स्वतःला विचारा: ‘कोणी माझं मन दुखावलं तर मला दावीदचं अनुकरण कसं करता येईल?’ ती समस्या सोडवण्यासाठी लगेच पाऊल उचला. गरजेप्रमाणे मत्तय १८ व्या अध्यायात येशूने दिलेला सल्ला पाळा किंवा त्यातलं तत्त्वं लागू करा. (मत्तय १८:१५-१७ वाचा.) पण भावनेच्या आहारी जाऊन तडकाफडकी निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. आणि आपली समस्या सोडवण्यासाठी त्याला मदत मागा. तसंच, आपल्या मित्रांवर भरवसा ठेवा आणि ते देत असलेली मदत स्वीकारा. (नीति. १७:१७) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायबलमध्ये दिलेला यहोवाचा सल्ला पाळा.—नीति. ३:५, ६.

प्रेषित पौलकडून तुम्ही काय शिकू शकता?

१४. कोणत्या परिस्थितींमध्ये असताना २ तीमथ्य १:१२-१६; ४:६-११, १७-२२ या वचानांतून तुम्हाला धीर मिळू शकतो?

१४ यहोवाची सेवा करत असल्यामुळे तुमच्या कुटुंबातले लोक तुमचा विरोध करत आहेत का? किंवा तुम्ही अशा देशात राहत आहात का जिथे आपल्या कामावर काही प्रमाणात किंवा पूर्णपणे बंदी आहे? तसं असेल, तर २ तीमथ्य १:१२-१६ आणि ४:६-११, १७-२२ * या वचनांतून तुम्हाला खूप धीर मिळू शकतो. पौल तुरुंगात होता तेव्हा त्याने ही वचनं लिहिली होती.

१५. तुम्ही यहोवाकडे काय विनंती करू शकता?

१५ (१ प्रार्थना करा.  बायबलमधील ही वचनं वाचण्याआधी यहोवाकडे प्रार्थना करा आणि तुमच्या समस्येबद्दल तुम्हाला कसं वाटतं हे स्पष्टपणे त्याला सांगा. मग तिचा सामना करण्यासाठी मदत करतील अशी तत्त्वं लक्षात आणून देण्यासाठी यहोवाकडे विनंती करा.

१६. पौलसोबत काय घडलं ते थोडक्यात सांगा.

१६ (२ कल्पना करा.  तुम्ही पौलच्या जागी आहात अशी कल्पना करा. पौल रोममधल्या एका तुरुंगात आहे. आणि त्याला साखळ्यांनी बांधलेलं आहे. यापूर्वीही तो तुरुंगात होता. पण या वेळी आपल्याला मृत्युदंड दिला जाईल हे त्याला पक्कं माहीत आहे. शिवाय, त्याचे काही सोबती त्याला सोडून गेले आहेत. आणि तो खूप थकून गेला आहे.—२ तीम. १:१५.

१७. पौल काय करू शकला असता?

१७ पौल असा विचार करू शकला असता, की आपण ख्रिस्ती बनलो नसतो, तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. आशिया प्रांतातले जे भाऊ त्याला सोडून गेले, त्यांच्याबद्दल तो मनात राग बाळगू शकला असता. आणि आपल्या इतर मित्रांवरचा त्याचा भरवसा उडू शकला असता. पण त्याने असं काहीच केलं नाही. उलट, त्याने आपल्या मित्रांवर भरवसा ठेवला आणि यहोवा आपल्याला नक्की प्रतिफळ देईल असा विश्‍वास बाळगला. कशामुळे तो असं करू शकला?

१८. पौलने त्याच्यासमोर आलेल्या परीक्षेचा कसा सामना केला?

१८ (३ मनन करा.  पुढे दिलेल्या प्रश्‍नाचा विचार करा: “आपली समस्या सोडवण्यासाठी पौलने काय केलं?” मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही आपण यहोवाच्या नावाचा महिमा कसा करू शकतो आणि इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो याचाच तो विचार करत होता. तसंच, नेहमी प्रार्थना करून तो यहोवावर विसंबून राहिला. (२ तीम. १:३) याशिवाय, जे भाऊ त्याला सोडून गेले होते त्यांचा विचार करून तो निराश झाला नाही. उलट, ज्या भावांनी त्याला आधार दिला आणि वेगवेगळ्या मार्गांनी मदत केली त्यांचे त्याने मनापासून आभार मानले. आणि तुरुंगात असतानाही तो देवाच्या वचनाचा अभ्यास करत राहिला. (२ तीम. ३:१६, १७; ४:१३) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा आणि येशूचं आपल्यावर प्रेम आहे, त्यांनी आपल्याला सोडून दिलेलं नाही, आणि आपण केलेल्या सेवेचं ते आपल्याला प्रतिफळ देतील याची त्याला खातरी होती.

१९. यहोवाने पौलला कशी मदत केली?

१९ ख्रिस्ती बनल्यामुळे पौलचा छळ होईल हे यहोवाने त्याला आधीच सांगितलं होतं. (प्रे. कार्यं २१:११-१३) पण यहोवाने त्याला मदतही केली. ती कशी? त्याने त्याच्या प्रार्थनांची उत्तरं दिली आणि त्याला शक्‍ती दिली. (२ तीम. ४:१७) तसंच, जे प्रतिफळ मिळवण्यासाठी पौलने इतकी मेहनत केली होती, ते त्याला नक्की मिळेल अशी शाश्‍वतीही यहोवाने त्याला दिली. आणि पौलच्या विश्‍वासू मित्रांद्वारे यहोवाने त्याला वेगवेगळ्या मार्गांनी मदत केली.

२०. रोमकर ८:३८, ३९ या वचनांत सांगितल्याप्रमाणे पौलसारखाच आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?

२० (४ लागू करा.  स्वतःला विचारा: ‘मला पौलचं अनुकरण कसं करता येईल?’ आपल्या विश्‍वासामुळे आपला छळ होईल याची पौलप्रमाणेच आपणही अपेक्षा करू शकतो. (मार्क १०:२९, ३०) परीक्षेत शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावर विसंबून राहिलं पाहिजे. आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या वचनाचा अभ्यास करत राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाचा महिमा कसा करता येईल याचा आपण सतत विचार केला पाहिजे. मग, पौलसारखाच आपण हा भरवसा ठेवू शकतो, की यहोवा कधीच आपल्याला सोडून देणार नाही आणि आपल्यावरचं त्याचं प्रेम कोणत्याही गोष्टीमुळे नाहीसं होणार नाही.—रोमकर ८:३८, ३९ वाचा; इब्री १३:५, ६.

बायबलमधल्या इतर लोकांकडून शिका

२१. आयोको आणि हेक्टर यांना आपल्या समस्यांवर मात करायला कशामुळे मदत झाली?

२१ आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी तिचा सामना करण्यासाठी बायबलमधली उदाहरणं आपल्याला बळ देतील. उदाहरणार्थ, जपानमध्ये राहणारी आयोको * नावाची एक पायनियर बहीण म्हणते: ‘पूर्वी मला सार्वजनिक साक्षकार्य करायला फार भीती वाटायची. पण योनाच्या अहवालामुळे माझ्या भीतीवर मात करायला मला मदत मिळाली.’ तसंच, इंडोनेशियामध्ये राहाणाऱ्‍या हेक्टर नावाच्या तरुणाचाही विचार करा. त्याचे आईवडील सत्यात नाहीत. पण रूथच्या उदाहरणामुळे त्याला यहोवाबद्दल शिकत राहण्याचं आणि त्याची सेवा करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं.

२२. बायबलमधल्या लोकांबद्दल जास्त माहिती तुम्हाला कुठे मिळेल? आणि तुम्ही त्यांचा अभ्यास कसा करू शकता?

२२ बायबलमधल्या वेगवेगळ्या लोकांबद्दलची माहिती तुम्हाला कुठे मिळेल? त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ पाहू शकता, बायबल उताऱ्‍यांचे नाट्यवाचन ऐकू शकता आणि “त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा” हे पुस्तक वाचू शकता. पण त्याआधी यहोवाला प्रार्थना करा. आणि तुम्हाला लागू करता येतील असे मुद्दे शोधायला त्याने मदत करावी अशी विनंती त्याला करा. ज्या व्यक्‍तीबद्दल तुम्ही वाचत आहात तिच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करा. यहोवाच्या या विश्‍वासू सेवकाने आपली समस्या सोडवण्यासाठी काय केलं, आणि यहोवाने त्याला कशी मदत केली, यावर मनन करा. मग त्या अहवालातून तुम्ही जे काही शिकलात ते लागू करा. तसंच, यहोवाने आतापर्यंत तुमच्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. आणि इतरांना प्रोत्साहन आणि आधार देऊन त्याबद्दल कदर असल्याचं दाखवा.

२३. यशया ४१:१०, १३ या वचनांत सांगितल्याप्रमाणे यहोवाने आपल्याला कोणतं वचन दिलं आहे?

२३ सैतानाच्या या जगात जीवन जगणं खूप कठीण आहे. आणि काही वेळा तर काय करावं तेही आपल्याला कळत नाही. (२ तीम. ३:१) पण आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण आपल्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे यहोवाला माहीत आहे. आणि गरज असेल तेव्हा तो त्याच्या शक्‍तिशाली “उजव्या हाताने” आपल्याला आधार देईल असं वचन देतो. (यशया ४१:१०, १३ वाचा.) त्यामुळे आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो, की यहोवा आपल्याला नक्की मदत करेल, आणि कोणत्याही समस्येचा सामना करायचं बळ त्याच्या वचनातून आपल्याला देईल.

गीत ४८ प्रतिदिनी यहोवासोबत चालू या

^ परि. 5 बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांवरून दिसून येतं, की यहोवा आपल्या सेवकांवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या जीवनात आलेल्या समस्यांचा सामना करायला त्यांना मदत करतो. या उदाहरणांतून शिकण्यासाठी आपण बायबलचा चांगला अभ्यास केला पाहिजे. तो कसा करायचा ते या लेखात आपण पाहणार आहोत.

^ परि. 2 या लेखात अभ्यास करायची फक्‍त एक पद्धत सुचवली आहे. पण, यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  या पुस्तकात अभ्यास करण्याच्या आणखीनही काही पद्धती सुचवल्या आहेत. त्या तुम्हाला “बायबल” या विषयाखाली, “बायबलचं वाचन आणि आकलन” या उपशीर्षकाखाली सापडतील.

^ परि. 14 ही वचनं मंडळीच्या टेहळणी बुरूज  अभ्यासात वाचू नयेत.

^ परि. 21 नाव बदलण्यात आलं आहे.