अभ्यास लेख १३
यहोवाची उपासना केल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल!
“यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यासाठी तूच योग्य आहेस.”—प्रकटी. ४:११.
गीत २६ देवासोबत चालत राहा!
सारांश *
१-२. यहोवा आपली उपासना कधी स्वीकारतो?
‘उपासना’ म्हटलं, की तुमच्या मनात कोणतं चित्र उभं राहतं? तुमच्या डोळ्यांसमोर कदाचित एका भावाचं चित्र येईल, जो हात जोडून नम्रपणे यहोवाला प्रार्थना करत आहे. किंवा बायबलच्या अभ्यासात गढून गेलेल्या एका कुटुंबाचं चित्र तुमच्या डोळ्यांपुढे येईल.
२ प्रार्थना करणारा तो भाऊ आणि अभ्यासात गढून गेलेलं ते कुटुंब खरंतर यहोवाची उपासनाच करत आहेत. पण यहोवा त्यांची उपासना स्वीकारेल का? जर ते आपल्या जीवनात यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न करत असतील आणि जर त्यांच्या मनात यहोवाबद्दल प्रेम आणि आदर असेल, तर तो नक्कीच त्यांची ही उपासना स्वीकारेल. आपलं सगळ्यांचंच यहोवावर खूप प्रेम आहे. आणि तोच आपल्या उपासनेसाठी योग्य आहे, हे आपल्याला माहीत आहे. आणि आपल्याकडून होईल तितक्या चांगल्या प्रकारे आपण त्याची उपासना करावी अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ या लेखात आपण, यहोवाने बायबल काळात कोणत्या प्रकारची उपासना स्वीकारली हे सुरुवातीला पाहू या. आणि त्यानंतर यहोवाच्या उपासनेसाठी आपण करत असलेल्या अशा आठ गोष्टींबद्दल पाहू, ज्या त्याच्या इच्छेप्रमाणे आहेत. यापैकी प्रत्येक गोष्टीचं परिक्षण करताना, आपण आणखी चांगल्या प्रकारे यहोवाची उपासना कशी करू शकतो याबद्दल विचार करू या. तसंच यहोवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना केल्यामुळे आपल्याला आनंद का मिळतो याचीही कारणं आपण पाहू या.
प्राचीन काळात यहोवाने स्वीकारलेली उपासना
४. येशू पृथ्वीवर येण्याआधी यहोवाचे उपासक कशी उपासना करायचे?
४ हाबेल, नोहा, अब्राहाम आणि ईयोब, या विश्वासू पुरूषांच्या मनात देवाबद्दल प्रेम आणि आदर होता. यहोवाची आज्ञा पाळून, त्याच्यावर विश्वास ठेवून आणि त्याला बलिदानं अर्पण करून त्यांनी तो विश्वास आणि आदर दाखवला. त्यांना नेमकी कशा प्रकारे उपासना करायची होती, याबद्दल बायबलमध्ये सगळं काही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण त्यांनी यहोवाचा आदर करण्याचा होताहोईल तितका प्रयत्न केला आणि यहोवाने त्यांची उपासना स्वीकारली. मग अब्राहामच्या वंशजांना यहोवाने मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं. या नियमशास्त्रात यहोवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करण्यासाठी स्पष्ट सूचना होत्या.
५. येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान झाल्यानंतर खऱ्या उपासनेच्या बाबतीत कोणता बदल झाला?
५ येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान झाल्यानंतर यहोवाच्या सेवकांनी मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याची उपासना करावी, अशी यहोवा आता अपेक्षा करत नव्हता. (रोम. १०:४) कारण आता यहोवाच्या उपासकांनी एक नवीन नियम म्हणजे “ख्रिस्ताचा नियम” पाळायचा होता. (गलती. ६:२) यासाठी त्यांना खूपसारे नियम पाठ करून ते पाळायची गरज नव्हती. तर येशूच्या उदाहरणाप्रमाणे आणि शिकवणींप्रमाणे त्यांना वागायचं होतं. आजसुद्धा ख्रिस्ती यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी ख्रिस्ताचं अनुकरण करायचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि यामुळे त्यांना आनंद मिळतो.—मत्त. ११:२९.
६. या लेखातल्या माहितीचा फायदा करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो?
६ यहोवाच्या उपासनेसाठी आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी करतो, त्यांपैकी प्रत्येक गोष्टीचं परिक्षण करताना स्वतःला विचारा: ‘मी या गोष्टीच्या बाबतीत आत्तापर्यंत कितपत प्रगती केली आहे?’ तसंच तुम्ही स्वतःला असं विचारू शकता: ‘आणखी चांगल्या प्रकारे उपासना करण्यासाठी मला काय करता येईल?’ जर तुम्ही प्रगती केली आहे असं तुम्हाला दिसून आलं, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण काही बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे असं तुम्हाला दिसून आलं, तर तुम्ही प्रार्थनेत यहोवाला मदत मागू शकता.
आपण कोणकोणत्या मार्गांनी यहोवाची उपासना करतो?
७. आपण मनापासून केलेल्या प्रार्थनांबद्दल यहोवाला काय वाटतं?
७ आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा आपण त्याची उपासना करत असतो. बायबलमध्ये आपल्या प्रार्थनांची तुलना उपासना मंडपात आणि नंतर मंदिरामध्ये जाळल्या जाणाऱ्या धूपाशी करण्यात आली आहे. हा धूप खूप काळजीपूर्वकपणे तयार केला जायचा. (स्तो. १४१:२) या धूपाच्या सुगंधामुळे यहोवाला आनंद व्हायचा. त्याचप्रमाणे जेव्हा आपण यहोवाला मनापासून प्रार्थना करतो, मग ती साध्या शब्दात जरी असली, तरी “त्याला आनंद होतो.” (नीति. १५:८; अनु. ३३:१०) आपण प्रार्थनेत यहोवाबद्दल असलेलं आपलं प्रेम आणि आपली कदर व्यक्त करतो, तेव्हा त्याला नक्कीच आनंद होत असेल असं आपण म्हणू शकतो. आपण आपल्या चिंता आपल्या आशा-आकांक्षा त्याला सांगाव्यात अशी त्याची इच्छा आहे. म्हणून प्रार्थना करण्याआधी आपण काय बोलणार आहोत, याबद्दल थोडं थांबून तुम्ही विचार करू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला आपल्या स्वर्गीय पित्यासाठी सगळ्यात चांगल्या प्रकारचा ‘धूप’ अर्पण करता येईल.
८. आपण यहोवाची स्तुती कशी करू शकतो?
८ आपण यहोवाची स्तुती करतो तेव्हा आपण त्याची उपासना करत असतो. (स्तो. ३४:१) यहोवाचे गुण आणि त्याने केलेली कार्यं किती महान आहेत, हे जेव्हा आपण इतरांना सांगतो तेव्हा आपण त्याची स्तुती करत असतो. यहोवाने आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल आपल्याला जेव्हा मनापासून कदर वाटते, तेव्हा आपोआपच आपल्याला त्याची स्तुती करावीशी वाटते. म्हणून आपण यहोवाच्या चांगुलपणाबद्दल म्हणजे त्याने आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्याबद्दल मनन करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याकडे यहोवाची स्तुती करण्यासाठी बरीच कारणं असतील. प्रचाराचं काम करताना “देवाला स्तुतीचं बलिदान, म्हणजेच . . . आपल्या ओठांचं फळ अर्पण” करण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळते. (इब्री १३:१५) यहोवाला प्रार्थना करण्याआधी आपण काय बोलणार आहोत याबद्दल आपण जसा विचार केला पाहिजे, तसाच सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांशी आपण काय बोलणार आहोत, याचाही आपण नीट विचार केला पाहिजे. यहोवाला सगळ्यात चांगलं ‘स्तुतीचं बलिदान’ द्यायची आपली इच्छा आहे. म्हणून इतरांना यहोवाबद्दल सांगताना आपण अगदी मनापासून आणि उत्साहाने बोलतो.
९. इस्राएली लोकांसारखंच एकत्र मिळून उपासना केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात? सभांमुळे तुम्हाला कसा फायदा झाला आहे याचं एखादं उदाहरण द्या.
९ आपण सभांना उपस्थित राहतो तेव्हा आपण यहोवाची उपासना करत असतो. प्राचीन काळात इस्राएली लोकांना असं सांगण्यात आलं होतं: “वर्षातून तीन वेळा . . . तुमच्यातल्या सर्व पुरुषांनी, तुमचा देव यहोवा याने निवडलेल्या ठिकाणी त्याच्यासमोर जावं.” (अनु. १६:१६) त्या वेळी त्यांच्या घरांची आणि शेतांची राखण करायला कोणाही नसायचं. पण यहोवाने त्यांना असं वचन दिलं होतं: “तुम्ही वर्षातून तीन वेळा तुमचा देव यहोवा याच्यासमोर हजर व्हायला जाल, तेव्हा कोणीही तुमची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणार नाही.” (निर्ग. ३४:२४) इस्राएली लोकांचा यहोवावर पूर्ण भरवसा होता, म्हणून ते दर वर्षी सन साजरा करायला जायचे. आणि यामुळे त्यांना बरेच आशीर्वाद मिळायचे. जसं की, देवाच्या नियमशास्त्राबद्दल त्यांना बरंच काही शिकायला मिळायचं. तसंच, यहोवाच्या चांगुलपणाबद्दल मनन करण्याची, आपल्या बांधवांसोबत आनंदाने यहोवाची उपासना करण्याची आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्याची संधी त्यांना मिळायची. (अनु. १६:१५) आपणही ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यालाही असेच आशीर्वाद मिळतात. आणि जेव्हा आपण सभेत थोडक्यात, पण अर्थपूर्ण उत्तरं देण्यासाठी चांगली तयारी करून येतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो.
१०. गीत गाणं हा आपल्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे असं का म्हणता येईल?
१० आपण सोबत मिळून गीत गातो तेव्हा आपण यहोवाची उपासना करत असतो. (स्तो. २८:७) गीत गाणं हा इस्राएली लोकांसाठी उपासनेचा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणूनच दावीद राजाने २८८ लेव्यांना मंदिरात गायक म्हणून नेमलं होतं. (१ इति. २५:१, ६-८) आज आपणसुद्धा यहोवाच्या स्तुतीसाठी गीत गाऊन त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम दाखवू शकतो. आणि यासाठी आपला आवाज चांगलाच असला पाहिजे अशी गरज नाही. विचार करा, बोलताना “आपण सगळेच बऱ्याच वेळा चुकतो.” पण म्हणून आपण सभेत आणि सेवाकार्यात यहोवाबद्दल बोलायचं थांबवत नाही. (याको. ३:२) त्याचप्रमाणे, आपण इतकं काही चांगलं गात नाही असं वाटत असलं तरीपण आपण गीत गाऊन यहोवाची स्तुती करायचं थांबवू नये.
११. स्तोत्र ४८:१३, या वचनाप्रमाणे आपण कुटुंब मिळून बायबल अभ्यासासाठी वेळ का काढला पाहिजे?
११ आपण बायबलचा अभ्यास करतो आणि आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवतो तेव्हा आपण उपासना करत असतो. शब्बाथाच्या दिवशी इस्राएली लोक आपली दररोजची कामं बाजूला ठेवून यहोवासोबतचं त्यांचं नातं मजबूत करण्यावर लक्ष द्यायचे. (निर्ग. ३१:१६, १७) तसंच, ते आपल्या मुलांना यहोवाबद्दल आणि त्याच्या महान कामांबद्दलही शिकवायचे. त्याच प्रकारे, आपणसुद्धा देवाचं वचन वाचण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. हा आपल्या उपासनेचाच भाग आहे. आणि यामुळे आपल्याला यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करायला मदत होते. (स्तो. ७३:२८) जेव्हा आपण कुटुंब मिळून अभ्यास करतो तेव्हा आपण पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्या मुलांनासुद्धा यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत करत असतो.—स्तोत्र ४८:१३ वाचा.
१२. उपासना मंडपातलं सामान बनवण्याच्या कामाला यहोवाने कोणत्या दृष्टीने पाहिलं, आणि यावरून आपण काय शिकतो?
१२ आपण उपासनेसाठी असलेल्या इमारतींचं बांधकाम आणि देखभाल करतो तेव्हा आपण यहोवाची उपासना करत असतो. उपासना मंडप आणि त्यातलं सामान तयार करण्याच्या कामाला बायबलमध्ये “पवित्र काम” असं म्हटलं आहे. (निर्ग. ३६:१, ४) आजसुद्धा राज्य सभागृहांच्या आणि उपासनेशी संबंधित असलेल्या इमारतींच्या बांधकामाला यहोवा आपल्या उपासनेचाच भाग समजतो. काही भाऊबहीण या कामासाठी त्यांचा बराच वेळ खर्च करतात. हे भाऊबहीण राज्याच्या कामाला खरंच किती महत्त्वाचा हातभार लावतात! आणि यासोबत ते प्रचाराच्या कामातही उत्साहाने सहभाग घेतात. त्यांच्यापैकी काही जणांना या कामासोबत पायनियर म्हणून सेवा करायचीही इच्छा असते. हे मेहनती भाऊबहीण पायनियर सेवा करण्यासाठी पात्र ठरतात तेव्हा मंडळीतले वडील त्यांना पायनियर म्हणून नेमायला मागे पुढे पाहत नाहीत. असं करून ते देवाच्या राज्याशी संबंधित असलेल्या बांधकामाला आपला पाठिंबा देतात. आपल्याला बांधकामाचा अनुभव असो किंवा नसो आपण सगळेच या इमारती स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी मदत करू शकतो.
१३. राज्याच्या कामासाठी दान देण्याबद्दल आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
१३ राज्याच्या कामासाठी आपण दान देतो तेव्हा आपण यहोवाची उपासना करत असतो. इस्राएली लोकांना असं सांगण्यात आलं होतं, की त्यांनी यहोवासमोर जाताना कधीही रिकाम्या हाती जाऊ नये. (अनु. १६:१६) तर त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहोवासाठी काही भेट आणायची होती. असं करून यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केलं होतं त्याबद्दल ते कदर दाखवू शकत होते. मग, आज यहोवा आपल्यासाठी जे काही करत आहे त्याबद्दल आपण आपली कदर कशी दाखवू शकतो? आपल्या मंडळीला आणि जगभरातल्या कामाला जमेल तसा आर्थिक हातभार लावून आपण हे करू शकतो. याबद्दल प्रेषित पौलने म्हटलं होतं: “एखाद्याला दान देण्याची जर खरंच उत्सुकता असेल, तर त्याचं दान मान्य केलं जाईल. त्याच्याकडे जे नाही त्याची अपेक्षा केली जात नाही. तर त्याच्याकडे जे आहे, त्याप्रमाणे तो जे काही देईल ते मान्य केलं जाईल.” (२ करिंथ. ८:४, १२) आपण यहोवाला जे काही देतो मग ते अगदी थोडंसंच असलं तरीसुद्धा तो त्या दानाची कदर करतो.—मार्क १२:४२-४४; २ करिंथ. ९:७.
१४. नीतिवचनं १९:१७ नुसार आपण आपल्या भाऊबहिणींना मदत करतो, तेव्हा यहोवा याबद्दल कसा विचार करतो?
१४ आपण अडचणीत असलेल्या आपल्या भाऊबहिणींना मदत करतो तेव्हा आपण यहोवाची उपासना करत असतो. यहोवाने इस्राएली लोकांना वचन दिलं होतं, की त्यांनी गरिबांची मदत केली तर तो त्यांना आशीर्वाद देऊन त्याची परतफेड करेल. (अनु. १५:७, १०) खरंतर, जेव्हा-जेव्हा आपण अडचणीत असलेल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला मदत करतो तेव्हा आपण ती मदत जणू यहोवालाच दिली आहे, असं तो समजतो. (नीतिवचनं १९:१७ वाचा.) उदाहरणार्थ, फिलिप्पै मधल्या भाऊबहिणींनी तुरुंगात असलेल्या प्रेषित पौलसाठी भेट पाठवली तेव्हा तो म्हणाला की “ही भेट देवाच्या दृष्टीत एक मोहक सुगंध आणि त्याला आनंद देणारं अर्पण आहे.” (फिलिप्पै. ४:१८) तुमच्या मंडळीतल्या भाऊबहिणींचा विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, मंडळीत असं कुणी आहे का ज्याला मी मदत करू शकतो? जेव्हा आपण इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ, शक्ती, कौशल्य आणि आपली साधन-संपत्ती वापरतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. कारण हासुद्धा आपल्या उपासनेचाच भाग आहे, असं तो समजतो.—याको. १:२७.
यहोवाची उपासना केल्यामुळे आपल्याला आनंद होतो
१५. यहोवाच्या उपासनेसाठी वेळ आणि शक्ती खर्च करावी लागत असली तरी आपल्याला ते त्रासदायक का वाटत नाही?
१५ यहोवाची उपासना करण्यासाठी आपल्याला आपला वेळ आणि आपली शक्ती खर्च करावी लागते. पण आपल्याला ते कधीच त्रासदायक वाटत नाही. (१ योहा. ५:३) कारण आपलं यहोवावर प्रेम आहे. एका लहान मुलाची कल्पना करा ज्याला आपल्या पप्पांना काही तरी द्यायची इच्छा आहे. तो बरेच तास बसून त्यांच्यासाठी एक चित्र काढतो. ते चित्र काढण्यासाठी त्याला इतका वेळ घालवावा लागला याचं त्याला वाईट वाटत नाही कारण त्याचं आपल्या पप्पांवर खूप प्रेम आहे. आणि त्याला ते चित्र त्यांना द्यायला खूप आनंद होतो. तसंच, यहोवावर आपलं प्रेम असल्यामुळे त्याच्या उपासनेसाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करायला आपल्याला आनंदच होतो.
१६. इब्री लोकांना ६:१० प्रमाणे आपण यहोवाच्या सेवेत जे काही करतो त्याबद्दल त्याला कसं वाटतं?
१६ मुलं आपल्या आईवडिलांना भेट देतात तेव्हा प्रत्येक मुलाची भेट सारखीच असावी अशी आईवडील अपेक्षा करत नाहीत. कारण प्रत्येक मूल आणि त्याची क्षमता वेगळी असते हे त्यांना माहीत असतं. त्याच प्रकारे, आपल्या प्रेमळ पित्यालाही आपल्यापैकी प्रत्येकाच्या परिस्थितीची जाणीव आहे. कदाचित तुम्ही तुमच्या भाऊबहिणींपेक्षा यहोवाची जास्त सेवा करू शकत असाल. किंवा तुमच्या वयामुळे, तब्येतीमुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे इतर जण करतात तितकं तुम्ही करू शकत नसाल. पण यामुळे निराश होऊ नका. (गलती. ६:४) कारण यहोवा तुमचं काम कधीच विसरणार नाही. जर तुम्ही योग्य हेतूने यहोवाची सेवा करायचा होता होईल तितका प्रयत्न करत असाल, तर यहोवाला यामुळे नक्कीच आनंद होईल. (इब्री लोकांना ६:१० वाचा.) यहोवाच्या सेवेत तुम्हाला काय करायची इच्छा आहे हे यहोवा पाहू शकतो. आणि तुमच्या परिस्थितीप्रमाणे त्याच्या उपासनेत तुम्ही जे काही करू शकता त्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी असावं, असं त्याला वाटतं.
१७. (क) यहोवाच्या उपासनेसाठी आपण करत असलेल्या काही गोष्टी जर आपल्याला कठीण वाटत असतील तर आपण काय करू शकतो? (ख) “ तुमच्या आनंदात भर घाला” या चौकटीत दिलेली कोणती गोष्ट केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला आहे?
१७ आतापर्यंत ज्या गोष्टींची आपण चर्चा केली त्यांपैकी काही गोष्टी करायला जसं की, वैयक्तिक बायबल अभ्यास किंवा प्रचारकार्य करायला आपल्याला कठीण वाटत असेल तर काय? जितक्या जास्त आपण या गोष्टी करत राहू तितका जास्त आपल्याला या गोष्टींतून आनंद मिळेल आणि त्यातून फायदा होईल. आपण यहोवाच्या उपासनेत जे काही करतो त्याची तुलना आपण व्यायामाशी किंवा संगीत वाद्याच्या सरावाशी करू शकतो. आपण जर कधीतरीच व्यायाम केला किंवा संगीत वाद्याचा सराव केला तर आपल्याला त्यात विशेष प्रगती करता येणार नाही. पण समजा जर आपण दररोज या गोष्टी करायच्या ठरवल्या तर? सुरुवातीला आपण कदाचित त्या खूप कमी वेळासाठी करू आणि नंतर वेळ वाढवत जाऊ. असं केल्यामुळे जेव्हा त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसू लागतील तेव्हा आपोआपच त्या गोष्टींमध्ये आपली आवड वाढू लागेल, आणि त्या आपल्याला आणखी कराव्याशा वाटतील. हीच गोष्ट आपण आपल्या उपासनेच्या बाबतीतही लागू करू शकतो.
१८. आपल्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे आणि ती केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?
१८ पूर्ण मनाने यहोवाची उपासना करणं ही आपल्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण असं करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो, आपलं जीवन समाधानी होतं, आणि यहोवाची कायम उपासना करण्याची आशा आपल्याला मिळते. (नीति. १०:२२) शिवाय यहोवाच्या सेवकांना समस्या येतात तेव्हा तो त्यांना मदत करतो, ही गोष्ट माहीत असल्यामुळेसुद्धा आपल्याला मनाची शांती मिळते. (यश. ४१:९, १०) तर चला आपण नेहमी आनंदाने आपल्या प्रेमळ पित्याची, यहोवाची उपासना करत राहूया, कारण तोच सगळ्या सृष्टीकडून गौरव आणि सन्मान मिळवण्यासाठी योग्य आहे!—प्रकटी. ४:११.
गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!
^ परि. 5 यहोवा सगळ्या गोष्टींचा निर्माणकर्ता असल्यामुळे आपण फक्त त्याचीच उपासना केली पाहिजे. आपण त्याची उपासना वेगवेगळ्या मार्गांनी करतो. पण जर आपण त्याच्या नियमांप्रमाणे आणि तत्त्वांप्रमाणे वागलो, तरच तो आपली उपासना स्वीकारेल. या लेखात आपण यहोवाच्या उपासनेसाठी करत असलेल्या आठ गोष्टींवर चर्चा करू या. या गोष्टी आपण आणखी चांगल्या प्रकारे कशा करू शकतो आणि असं केल्यामुळे आपण आनंदी कसं होऊ शकतो, हेही आपण पाहू या.