वाचकांचे प्रश्न
२ शमुवेल २१:७-९ मध्ये म्हटलं आहे की दावीदने मफीबोशेथवर दया केली. पण मग पुढे याच अहवालात त्याने मफीबोशेथला ठार मारण्यासाठी गिबोनी लोकांच्या हवाली केलं, असं का म्हटलं आहे?
हा अहवाल घाईघाईत वाचला तर आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो. पण खरं पाहिलं, तर या अहवालात मफीबोशेथ नावाच्या दोन व्यक्तींबद्दल सांगितलं आहे. आणि त्यांच्यासोबत जे घडलं, त्यावरून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते.
इस्राएलच्या शौल राजाला सात मुलं आणि दोन मुली होत्या. त्याच्या पहिल्या मुलाचं नाव योनाथान होतं. नंतर शौलला रिस्पा नावाच्या उपपत्नीपासून आणखी एक मुलगा झाला. त्याचं नाव मफीबोशेथ होतं. विशेष म्हणजे, शौलचा मुलगा योनाथान यालासुद्धा मफीबोशेथ नावाचा एक मुलगा होता. तर अशा प्रकारे शौल राजाला मफीबोशेथ नावाचा एक मुलगाही होता आणि त्याच नावाचा एक नातूसुद्धा होता.
पुढे काही काळाने, शौल राजा गिबोनी लोकांचा द्वेष करू लागला. आणि इस्राएलमधून त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकायचा त्याने प्रयत्न केला. आणि यामुळे बरेच गिबोनी लोक मारले गेले. शौलने जे केलं ते अगदीच चुकीचं होतं. कारण यहोशवाच्या काळात इस्राएलच्या प्रधानांनी गिबोनी लोकांसोबत शांतीचा करार केला होता.—यहो. ९:३-२७.
शौल राज्याच्या काळातसुद्धा इस्राएली लोक त्या कराराला बांधलेले होते. पण शौलने हा करार मोडला आणि सगळ्या गिबोनी लोकांना संपवून टाकायचा प्रयत्न केला. त्यामुळे तो आणि त्याचं घराणं “रक्तदोषी” बनलं. (२ शमु. २१:१) पुढे जेव्हा दावीद राजा सत्तेवर आला, तेव्हा संहारातून वाचलेल्या गिबोनी लोकांनी त्यांच्यावर झालेल्या या घोर अन्यायाबद्दल त्याला सांगितलं. तेव्हा दावीदने त्यांना विचारलं, की ‘शौलच्या भयंकर चुकीची भरपाई कशी करता येईल? आणि इस्राएल राष्ट्रावर देवाचा आशीर्वाद पुन्हा यावा म्हणून काय करता येईल?’ यावर भरपाई म्हणून सोनं-चांदी मागण्याऐवजी गिबोनी लोक दावीदला म्हणाले, की ‘ज्या माणसाने आमचा समूळ नाश करायचा प्रयत्न केला, त्याच्या सात मुलांना आमच्या हवाली करा. म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू.’ (गण. ३५:३०, ३१) दावीदने त्यांची मागणी मान्य केली.—२ शमु. २१:२-६.
हे घडलं तेव्हा शौल आणि योनाथान लढाईत मारले गेले होते. पण योनाथानचा मुलगा मफीबोशेथ अजून जिवंत होता. तो लहानपणीच एका अपघातामुळे अपंग झाला होता. त्याच्या आजोबांनी गिबोनी लोकांवर केलेल्या हल्ल्यात तो सहभागी नव्हता. दावीदने त्याच्या वडिलांसोबत म्हणजे योनाथानसोबत एक मैत्रीचा करार केला होता. या कराराचा योनाथानच्या वंशजांना म्हणजे मफीबोशेथलाही फायदा होणार होता. (१ शमु. १८:१; २०:४२) म्हणूनच अहवालात म्हटलंय: “शौलचा नातू, म्हणजे योनाथानचा मुलगा मफीबोशेथ याच्यावर राजाने दया केली. कारण, दावीद आणि शौलचा मुलगा योनाथान यांनी यहोवासमोर शपथ घेतली होती.”—२ शमु. २१:७.
असं असलं तरी, दावीदने गिबोनी लोकांच्या विनंतीला मान देऊन शौलच्या दोन मुलांना आणि पाच नातवांना त्यांच्या हवाली केलं. शौलच्या या दोन मुलांपैकी एकाचं नाव मफीबोशेथ होतं. (२ शमु. २१:८, ९) दावीदने हे पाऊल उचलल्यामुळे इस्राएल राष्ट्रावरचा रक्तदोष दूर झाला.
ही फक्त इतिहासातली एक घटना नाही. तर, या घटनेवरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकतो. तुम्हाला आठवत असेल, देवाच्या नियमशास्त्रात असं म्हटलं होतं: “वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये.” (अनु. २४:१६) शौलची ती दोन मुलं आणि पाच नातवं जर निर्दोष असती, तर त्यांच्यासोबत जे घडलं त्याला यहोवाने संमती दिली नसती. नियमशास्त्रात पुढे म्हटलं होतं, “प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.” यावरून असं दिसतं, की शौलच्या वंशातल्या ज्या सात जणांना ठार मारण्यात आलं, त्यांनी गिबोनी लोकांच्या कत्तलीत सहभाग घेतला होता. आणि म्हणूनच त्या सात जणांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली.
या अहवालावरून हे स्पष्ट होतं, की एक व्यक्ती जे काही करते त्यासाठी ती स्वतः जबाबदार असते. ‘मी फक्त दिलेल्या सूचना पाळत होतो,’ असं म्हणून ती व्यक्ती स्वतःला निर्दोष ठरवू शकत नाही. एका नीतिवचनात हा सुज्ञ सल्ला दिला आहे: “आपला मार्ग सपाट कर, म्हणजे तुझी पावलं कधीही डळमळणार नाहीत. डावीकडे किंवा उजवीकडे वळू नकोस, वाईट मार्गापासून दूर राहा.”—नीति. ४:२४-२७; इफिस. ५:१५.