व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १०

बाप्तिस्मा का घेतला पाहिजे?

बाप्तिस्मा का घेतला पाहिजे?

“तुमच्यापैकी प्रत्येकाने . . . बाप्तिस्मा घ्या.”​—प्रे. कार्य २:३८.

गीत ३४ खरेपणाने चालू या

सारांश a

१-२. बाप्तिस्म्याच्या दिवशी आपल्याला सहसा कोणतं चित्र पाहायला मिळतं, आणि या लेखात आपण पुढे काय पाहणार आहोत?

 तुम्ही बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांना पाहिलंच असेल. तो दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यांना जेव्हा बाप्तिस्म्याचे दोन प्रश्‍न विचारले जातात, तेव्हा ते पूर्ण खातरीने त्या प्रश्‍नांची होकारार्थी उत्तरं देतात. त्यांच्या कुटुंबातले सदस्य, त्यांचे मित्र अभिमानाने त्यांच्याकडे पाहत असतात. आणि जेव्हा ते बाप्तिस्मा झाल्यावर पाण्याच्या बाहेर येतात, तेव्हा टाळ्यांचा आवाज, त्यांच्या चेहऱ्‍यावरचा आनंद वेगळाच असतो. दर आठवड्याला सरासरी असे हजारो लोक समर्पण करून बाप्तिस्मा घेतात.

मग तुमच्याबद्दल काय? जर तुम्हीही बाप्तिस्मा घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्ही या अंधाऱ्‍या जगात चमकणाऱ्‍या दिव्यासारखे आहात. कारण तुम्ही ‘यहोवाला शोधत’ आहात. (स्तो. १४:१, २) हा लेख तुमच्यापैकी प्रत्येकासाठी आहे; मग तुम्ही तरुण असोत किंवा वयस्कर. पण ज्यांचा आधीच बाप्तिस्मा झालाय त्यांच्याबद्दल काय? या लेखामुळे त्यांनाही शेवटपर्यंत यहोवाची सेवा करत राहायचा त्यांचा निश्‍चय मजबूत करता येईल. तर मग चला, आपण अशी तीन प्रमुख कारणं पाहू या, ज्यांमुळे आपण यहोवाची सेवा करतो.

सत्यावरचं आणि नीतिमत्त्वावरचं प्रेम

सैतान हजारो वर्षांपासून यहोवाचं पवित्र नाव बदनाम करत आलाय आणि आत्ताही करतच आहे (परिच्छेद ३-४ पाहा)

३. यहोवाचे सेवक खरेपणाने आणि नीतीने का चालतात? (स्तोत्र ११९:१२८, १६३)

यहोवाने त्याच्या लोकांना ‘खरेपणाची आवड धरायला’ सांगितलं आहे. (जख. ८:१९) येशूनेसुद्धा त्याच्या शिष्यांना नीतीने चालायला सांगितलं. (मत्त. ५:६) यासाठी एखाद्याकडे योग्य, चांगलं आणि देवाच्या नजरेत शुद्ध ते करण्याची जबरदस्त इच्छा असली पाहिजे. तुम्हालासुद्धा नीतीने आणि खरेपणाने चालायला आवडतं का? नक्कीच आवडत असेल. तसंच, तुम्हाला खोटेपणा आणि दुष्टपणा अजिबात आवडत नसेल. (स्तोत्र ११९:१२८, १६३ वाचा.) जो खोटं बोलतो तो या जगाच्या शासकाप्रमाणे, म्हणजे सैतानाप्रमाणे वागतो. (योहा. ८:४४; १२:३१) कारण एदेन बागेत झालेल्या बंडापासूनच सैतान देवाबद्दल खोटं पसरवत आलाय. खरंतर यहोवाचं पवित्र नाव बदनाम करणं हासुद्धा सैतानाचा एक हेतू आहे. तो लोकांना असं मानायला लावतो, की यहोवा प्रामाणिक नाही, तो एक स्वार्थी शासक आहे आणि लोकांपासून चांगलं ते राखून ठेवतो. (उत्प. ३:१, ४, ५) त्यामुळे लोक देवाबद्दल खूप चुकीचा विचार करतात. म्हणून माणसं जेव्हा ‘खरेपणाची आवड धरत’ नाहीत, तेव्हा सैतान त्यांना सर्व प्रकारच्या अनीतीच्या आणि दुष्टपणाच्या जाळ्यात अडकवतो.​—रोम. १:२५-३१.

४. यहोवा ‘सत्याचा देव’ आहे हे त्याने कसं दाखवून दिलंय? (चित्रसुद्धा पाहा.)

यहोवा ‘सत्याचा देव’ आहे आणि जे त्याच्यावर प्रेम करतात, त्यांना तो उदारपणे सत्य शिकवतो. (स्तो. ३१:५) असं करून तो त्यांना सैतानाच्या खोटेपणाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवतो. तसंच, यहोवा त्याच्या लोकांना प्रामाणिकपणे आणि नीतीने चालायलाही शिकवतो. यामुळे त्यांना मनाची शांती मिळते आणि सन्मानाने जगता येतं. (नीति. १३:५, ६) बायबल अभ्यास करताना तुम्हालासुद्धा ही गोष्ट जाणवलीच असेल. त्या वेळी तुमच्या लक्षात आलं असेल, की यहोवाच्या मार्गाने चालल्यामुळे सगळ्या मानवजातीला आणि व्यक्‍तिशः तुम्हालासुद्धा फायदाच होईल. (स्तो. ७७:१३) म्हणूनच यहोवाच्या बाजूने उभं राहून योग्य ते करायची तुमची नक्कीच इच्छा असेल. (मत्त. ६:३३) तसंच, त्याच्याबद्दलचं सत्य सांगितलं जावं आणि त्याच्या नावावरचा कलंक पुसला जावा असंही तुम्हाला वाटत असेल. पण हे तुम्ही कसं करू शकता?

५. तुम्ही खऱ्‍याच्या आणि नीतीच्या बाजूने आहात हे कसं दाखवून देऊ शकता?

तुम्ही ज्या प्रकारे जीवन जगता, त्यावरून तुम्ही सगळ्यांना हे दाखवून देऊ शकता, की तुम्ही सैतानाचा खोटेपणा धुडकावून लावलाय आणि खऱ्‍याची बाजू घेतली आहे. तसंच तुम्ही हेसुद्धा दाखवू शकता, की यहोवाच तुमचा शासक असावा अशी तुमची इच्छा आहे. शिवाय त्याच्या मार्गाने चालायचीही तुमची इच्छा आहे. पण हे तुम्ही कसं कराल? प्रार्थनेत यहोवाला आयुष्यभर त्याची सेवा करायचं वचन द्या आणि हे समर्पण बाप्तिस्म्याद्वारे सगळ्यांसमोर जाहीर करा. जे योग्य आणि खरं आहे त्यावरच्या प्रेमामुळे आपल्याला बाप्तिस्म्याचं पाऊल उचलायला मदत होऊ शकते.

येशूवरचं प्रेम

६. स्तोत्र ४५:४ मध्ये येशूवर प्रेम करण्याची कोणती कारणं दिली आहेत?

तुम्ही येशू ख्रिस्तावर प्रेम का करता? स्तोत्र ४५:४ (वाचा.) मध्ये आपल्याला याची काही कारणं वाचायला मिळतात. येशूला सत्याने, नम्रतेने आणि नीतीने वागायला आवडायचं. जर तुम्हालाही सत्याने आणि नीतीने चालायला आवडत असेल, तर तुमचंही येशू ख्रिस्तावर प्रेम आहे यात काही शंका नाही. येशू ख्रिस्ताने योग्य आणि खऱ्‍याची बाजू कशी घेतली याची काही उदाहरणं तुम्हाला नक्कीच आठवत असतील. (योहा. १८:३७) पण त्याने नम्रताही कशी दाखवली?

७. येशूच्या नम्रतेबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट आवडते?

येशू ज्या प्रकारे वागला त्यातून त्याची नम्रता दिसून आली. उदाहरणार्थ, त्याने कधीच स्वतःचा गौरव होऊ दिला नाही. उलट त्याने सगळं श्रेय आपल्या पित्याला दिलं. (मार्क १०:१७, १८; योहा. ५:१९) येशू ख्रिस्ताची नम्रता बघून तुम्हालाही त्याच्यावर प्रेम करावंसं आणि त्याच्यासारखं वागावंसं वाटत नाही का? नक्कीच वाटत असेल. पण येशू इतका नम्र का होता? कारण यहोवा स्वतः नम्र आहे आणि येशूचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याला त्याच्यासारखं वागायची इच्छा आहे. (स्तो. १८:३५; इब्री १:३) यामुळे यहोवाच्या गुणांचं जसंच्या तसं अनुकरण करणाऱ्‍या येशू ख्रिस्तावर तुमचं प्रेम आणखी वाढत नाही का?

८. आपला राजा येशू याच्यावर आपण प्रेम का करतो?

येशूवर प्रेम करण्याचं आणखी एक कारण म्हणजे, तो आपला राजा आहे. आणि त्याच्यासारखा दुसरा राजा आपल्याला मिळूच शकला नसता. कारण स्वतः यहोवा देवाने त्याला शिकवलंय आणि त्याला राज्य करायला नेमलंय. (यश. ५०:४, ५) तसंच येशूने नेहमी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्‍यांचा विचार केला. (योहा. १३:१) त्यामुळे आपण सगळ्यांनी येशूवर मनापासून प्रेम केलं पाहिजे. त्याने सांगितलं की ज्यांचं त्याच्यावर प्रेम आहे आणि जे त्याचे मित्र आहेत, ते त्याची आज्ञा पाळून त्याच्यावरचं प्रेम दाखवतात. (योहा. १४:१५; १५:१४, १५) खरंच, यहोवाच्या मुलाचा मित्र असणं किती अभिमानाची गोष्ट आहे!

९. येशूचा आणि त्याच्या शिष्यांचा बाप्तिस्मा कशा प्रकारे सारखा आहे?

येशूने आपल्या शिष्यांना बाप्तिस्मा घेण्याची आज्ञा दिली आहे. (मत्त. २८:१९, २०) या बाबतीत त्याने स्वतः एक चांगलं उदाहरण मांडलं. त्याचा आणि त्याच्या शिष्यांचा बाप्तिस्मा काही बाबतींत वेगळा आहे. (“ येशूचा आणि त्याच्या शिष्यांचा बाप्तिस्मा वेगळा कसा आहे?” ही चौकट पाहा.) पण काही बाबतींत तो सारखा आहे. येशूचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा त्याने पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. (इब्री १०:७) त्याचप्रमाणे, येशूचे शिष्यसुद्धा सगळ्यांसमोर बाप्तिस्मा घेऊन दाखवतात, की त्यांनी यहोवाला त्यांचं जीवन समर्पित केलंय, आणि यापुढे ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागतील. असं करून ते दाखवून देतात की ते आपल्या प्रभूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत आहेत.

१०. येशू ख्रिस्तावरच्या प्रेमामुळे तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचं प्रोत्साहन कसं मिळतं?

१० येशू यहोवाचा एकुलता एक मुलगा आहे आणि देवाने त्याला आपल्यावर राज्य करण्यासाठी राजा म्हणून नेमलंय हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यावर तुमचा विश्‍वासही आहे. तो नम्र आहे आणि अगदी आपल्या पित्यासारखा आहे हेसुद्धा तुम्हाला माहीत आहे. बायबलमधून तुम्ही शिकलात, की त्याने कसं भुकेल्यांना जेवू घातलं, निराश झालेल्यांना दिलासा दिला, एवढंच नाही तर आजाऱ्‍यांना बरंसुद्धा केलं. (मत्त. १४:१४-२१) आणि आज तो मंडळीचं कसं नेतृत्व करतोय, हेही तुम्ही पाहत आहात. (मत्त. २३:१०) तसंच, तुम्हाला हेसुद्धा माहीत आहे, की देवाच्या राज्याचा राजा या नात्याने तो पुढेही आपल्यासाठी यांहून मोठ्या बऱ्‍याच गोष्टी करणार आहे. मग तुम्ही त्याच्यावरचं आपलं प्रेम कसं दाखवू शकता? त्याच्यासारखं वागून! (योहा. १४:२१) आणि त्याच्यासारखं वागण्याचा एक मार्ग म्हणजे, यहोवाला आपलं जीवन समर्पित करणं आणि बाप्तिस्मा घेणं.

यहोवावरचं प्रेम

११. बाप्तिस्मा घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं आहे?

११ बाप्तिस्मा घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं आहे? हे समजून घेण्यासाठी आपण येशूने देवाच्या सगळ्यात मोठ्या आज्ञेबद्दल काय सांगितलं होतं ते पाहू या. तो म्हणाला: “तुम्ही आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‌तीने प्रेम करा.” (मार्क १२:३०) यावरून कळतं, की देवावरचं प्रेमच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे.

आपण आत्ता आणि भविष्यात ज्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेऊ त्या सगळ्या यहोवाने आपल्याला दिल्या आहेत (परिच्छेद १२-१३ पाहा)

१२. आपण यहोवावर प्रेम का करतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ यहोवावर प्रेम करण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे, की त्याच्याकडूनच आपल्याला जीवन मिळालंय. तसंच, “प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान” देणाराही तोच आहे. (स्तो. ३६:९; याको. १:१७) हो, प्रत्येक चांगली गोष्ट, जिचा आनंद आपण घेतो ती आपल्या प्रेमळ आणि उदार देवाने आपल्याला दिली आहे.

१३. खंडणी बलिदान ही एक अनोखी भेट का आहे?

१३ खंडणी बलिदान ही यहोवाने दिलेली सगळ्यात अनोखी भेट आहे, असं आपण का म्हणू शकतो? यहोवा आणि त्याच्या मुलाच्या नात्याचा विचार करा. येशू म्हणाला होता: “पित्याचं माझ्यावर प्रेम आहे” आणि “माझं पित्यावर प्रेम आहे.” (योहा. १०:१७; १४:३१) ते दोघं लाखो वर्षांपासून एकत्र आहेत. साहजिकच त्यांचं नातं खूप घट्ट असेल. (नीति. ८:२२, २३, ३०) त्यामुळे विचार करा देवाने त्याच्या मुलाला दुःख आणि मरण सोसण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं, तेव्हा देवाला किती वेदना झाल्या असतील. खरंच, यहोवाचं संपूर्ण मानवजातीवर, अगदी तुमच्यावरही खूप प्रेम आहे. इतकं, की तुम्हाला आणि इतरांना कायमचं जीवन जगता यावं, म्हणून तो आपल्या काळजाचा तुकडाही द्यायला तयार झाला. (योहा. ३:१६; गलती. २:२०) देवावर प्रेम करण्याचं यापेक्षा आणखी मोठं कारण कोणतं असू शकतं?

१४. तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्यात चांगलं ध्येय कोणतं ठेवू शकता?

१४ यहोवाबद्दल जास्तीत जास्त शिकून घेतल्यामुळे त्याच्यावरचं तुमचं प्रेम नक्कीच वाढलं असेल. आमची खातरी आहे की तुम्हाला आत्ता आणि पुढेही त्याच्यासोबत एक कायमचं नातं जोडायचं आहे आणि तुम्ही ते करू शकता. आपण त्याचं मन आनंदित करावं असं त्याला वाटतं आणि त्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहनही देतो. (नीति. २३:१५, १६) आणि तुम्ही हे फक्‍त बोलूनच नाही, तर तुमच्या वागण्यातूनही दाखवू शकता. ज्या प्रकारे तुम्ही जीवन जगता त्यावरून दिसून येईल, की तुम्ही खरंच यहोवावर प्रेम करता. (१ योहा. ५:३) हे तुमच्या जीवनातलं सगळ्यात चांगलं ध्येय असेल.

१५. तुमचं यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

१५ तुमचं यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता? सगळ्यात आधी त्याला प्रार्थना करून सांगा की तुम्ही तुमचं जीवन त्याला समर्पित केलंय. (स्तो. ४०:८) त्यानंतर, तुम्ही बाप्तिस्मा घेऊन तुमचं हे समर्पण जाहीर करू शकता. आणि जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं, हा क्षण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असेल. बाप्तिस्मा घेऊन तुम्ही तुमच्या एका नव्या आयुष्याची सुरुवात करता; तुम्ही स्वतःसाठी नाही, तर यहोवासाठी जगता. (रोम. १४:८; १ पेत्र ४:१, २) हा कदाचित खूप मोठा निर्णय वाटेल आणि तो आहेसुद्धा! पण यामुळे तुम्हाला सगळ्यात चांगलं जीवन जगणं शक्य होईल. ते कसं?

१६. स्तोत्र ४१:१२ प्रमाणे जे यहोवाची आयुष्यभर उपासना करायला तयार असतात त्यांना तो कोणते आशीर्वाद देईल?

१६ यहोवाइतका मोठ्या मनाचा कोणीच नाही. तुम्ही यहोवाला जे काही देता, त्याच्या शंभर पटीने जास्त तो तुम्हाला देईल. (मार्क १०:२९, ३०) या दुष्ट जगातही तो तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि समाधानी आयुष्य देईल. आणि ही तर फक्‍त सुरुवात आहे. त्यानंतर तुम्ही कायम तुमच्या पित्याची उपासना करत राहू शकता. तुमचं आणि तुमच्या पित्यामधलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल आणि जोपर्यंत तुमचा पिता आहे अगदी तोपर्यंत, म्हणजे अनंतकाळापर्यंत तुम्ही जिवंत राहू शकाल.​—स्तोत्र ४१:१२ वाचा.

१७. तुम्ही यहोवाला काय देऊ शकता?

१७ जेव्हा तुम्ही समर्पण करून बाप्तिस्म्याचं पाऊल उचलता, तेव्हा तुमच्याकडे यहोवासाठी काहीतरी खास करण्याची संधी असते. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आणि तुमच्या जीवनातले आनंदाचे क्षण त्यानेच तुम्हाला दिले आहेत. मग या बदल्यात सबंध विश्‍वाच्या मालकाला तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही त्याला मनापासून आणि एकनिष्ठतेने केलेली उपासना देऊ शकता. (ईयो. १:८; ४१:११; नीति. २७:११) आपण आपल्या आयुष्यात यापेक्षा चांगलं काय करू शकतो? खरंच यहोवाचं प्रेमच आपल्याला बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत करू शकतं.

तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का?

१८. तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकता?

१८ तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का? याचं उत्तर दुसरं कोणीही नाही, तर फक्‍त तुम्हीच देऊ शकता. ‘मी अजून बाप्तिस्मा घ्यायला का थांबलोय?’ हा प्रश्‍न जर तुम्ही स्वतःला विचारला, तर कदाचित तुम्हाला मदत होऊ शकेल. (प्रे. कार्यं ८:३६) तुम्हाला या लेखातली तीन कारणं आठवतात का? पहिलं होतं, जे योग्य आणि खरं आहे त्यावर तुमचं प्रेम आहे. स्वतःला विचारा: ‘मी अशा दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय का, की जेव्हा सगळे लोक खरं बोलतील आणि चांगलं ते करतील?’ दुसरं म्हणजे, तुमचं येशू ख्रिस्तावर प्रेम आहे. स्वतःला विचारा: ‘माझा राजा येशू ख्रिस्तच असावा असं मला वाटतं का?’ आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं यहोवावर प्रेम आहे. स्वतःला विचार: ‘मला यहोवाची सेवा करून त्याला खूश करायची इच्छा आहे का?’ तुम्ही जर या प्रश्‍नांची होकारार्थी उत्तरं देत असाल, तर मग बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?​—प्रे. कार्यं १६:३३.

१९. जर बाप्तिस्मा घेण्याबद्दल तुमच्या मनात शंका असतील, तर येशूने सांगितलेल्या कोणत्या उदाहरणावर तुम्ही विचार करू शकता? (योहान ४:३४)

१९ जर बाप्तिस्मा घेण्याबद्दल तुमच्या मनात अजूनही शंका असतील, तर येशूने दिलेल्या एका उदाहरणावर विचार करा. (योहान ४:३४ वाचा.) येशूने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करायची तुलना जेवणाशी केली. का? अन्‍न आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. येशूला माहीत होतं, की यहोवा आपल्याला जे करायला सांगतो ते आपल्याच फायद्याचं आहे. तो आपल्याला असं काहीच करायला सांगणार नाही, ज्यामुळे आपलं नुकसान होईल. तुम्ही बाप्तिस्मा घ्यावा हीसुद्धा त्याचीच इच्छा आहे. (प्रे. कार्यं २:३८) मग बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला फायदाच होईल या गोष्टीची तुम्ही खातरी बाळगू शकता. कुठलंही चांगलं जेवण घ्यायला आपण नाही म्हणणार नाही, मग बाप्तिस्मा घ्यायला का मागे-पुढे पाहावं?

२०. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२० या सगळ्यानंतरही काही जण म्हणतील, की ‘मी अजून बाप्तिस्म्यासाठी तयार नाहीए.’ हे खरंय, की समर्पण करून बाप्तिस्मा घेणं, आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे हा निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. तसंच, त्याच्या तयारीसाठी वेळ आणि मेहनतही लागते. पण जर तुम्हाला मनापासून बाप्तिस्मा घ्यायची इच्छा असेल, तर तुम्ही स्वतःला आतापासूनच कसं तयार करू शकता? या प्रश्‍नावर आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.

गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र

a प्रत्येक बायबल विद्यार्थ्यासाठी बाप्तिस्मा घेणं हे खूप महत्त्वाचं पाऊल असतं. मग हे पाऊल उचलायला त्याला कशामुळे मदत होऊ शकते? एका शब्दात सांगायचं, तर प्रेमामुळे. पण कोणावरचं आणि कशाबद्दलचं प्रेम? हा लेख आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं शोधायला मदत करेल. तसंच, बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपल्या जीवनावर कोणता प्रभाव पडू शकतो हेही आपल्याला समजून घेता येईल.