व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ११

बाप्तिस्म्यासाठी कशी तयारी कराल?

बाप्तिस्म्यासाठी कशी तयारी कराल?

“मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?”​—प्रे. कार्यं ८:३६.

गीत ५० समर्पणाची प्रार्थना

सारांश a

जगभरातले तरुण आणि वृद्ध भाऊबहीण प्रगती करून बाप्तिस्मा घेत आहेत (परिच्छेद १-२ पाहा)

१-२. तुम्ही जर बाप्तिस्म्यासाठी अजून तयार नसाल, तर तुम्ही निराश का नाही झालं पाहिजे? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

 जर तुमची बाप्तिस्मा घ्यायची इच्छा असेल, तर तुम्ही खूप चांगलं ध्येय ठेवलंय. मग तुम्ही त्यासाठी आता तयार आहात का? जर असाल आणि वडिलांचीही त्याला मान्यता असेल, तर येणारी संधी सो़डू नका. यहोवाच्या सेवेतलं एक सुंदर आयुष्य तुमची वाट बघत आहे.

पण बाप्तिस्म्यासाठी तुम्हाला थोडं थांबायला सांगितलंय का? प्रगती करण्यासाठी आणखी काही पावलं उचलायला सांगितली आहेत का? किंवा तुम्हाला स्वतःला ते जाणवलंय का? जर असं असेल, तर निराश होऊ नका. तुम्ही तरुण असोत किंवा वयस्कर, बाप्तिस्म्याचं हे महत्त्वाचं पाऊल उचलण्याआधी तुम्ही नक्कीच प्रगती करू शकता.

“काय हरकत आहे?”

३. (क) इथियोपियाच्या दरबारातल्या अधिकाऱ्‍याने फिलिप्पला काय विचारलं? (ख) पण मग कोणता प्रश्‍न निर्माण होतो? (प्रेषितांची कार्यं ८:३६, ३८)

प्रेषितांची कार्यं ८:३६, ३८ वाचा. इथियोपियाच्या दरबारातल्या अधिकाऱ्‍याने प्रचारक फिलिप्पला विचारलं: “मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?” इथियोपियाच्या माणसाला बाप्तिस्मा घ्यायची इच्छा होती. पण तो खरंच त्यासाठी तयार होता का?

इथियोपियाच्या अधिकाऱ्‍याने यहोवाबद्दलचं ज्ञान घेत राहण्याचा निश्‍चय केला होता (परिच्छेद ४ पाहा)

४. इथियोपियाचा माणसाने कसं दाखवलं की त्याला आणखी शिकत राहायची इच्छा होती?

इथियोपियाचा माणूस “यरुशलेमला उपासना करायला गेला होता.” (प्रे. कार्यं ८:२७) यावरून कळतं की त्याने यहुदी धर्म स्वीकारलेला असावा. तो नक्कीच हिब्रू शास्त्रवचनांच्या पवित्र लिखाणांमधून यहोवाबद्दल शिकला असेल. तरी त्याला आणखी जास्त शिकायचं होतं. जेव्हा फिलिप्प त्याला रस्त्यात भेटला तेव्हा तो काय करत होता? तो यशयाच्या गुंडाळीतून वाचत होता. (प्रे. कार्यं ८:२८) आणि ते जड आध्यात्मिक अन्‍न होतं. म्हणजेच तो अधिकारी फक्‍त काही मूलभूत शिकवणींवरच खूश राहिला नाही, तर त्याला आणखीन शिकत राहायची इच्छा होती.

५. इथियोपियाचा माणूस जे शिकला होता, त्याप्रमाणे त्याने काय केलं?

हा माणूस इथियोपियातल्या कांदके राणीच्या दरबारातला एक मोठा अधिकारी होता. तो ‘तिच्या खजिन्याची देखरेख करायचा.’ (प्रे. कार्यं ८:२७) त्यामुळे या जबाबदाऱ्‍यांमागे त्याचा भरपूर वेळ जात असेल. पण तरी यहोवाची उपासना करण्यासाठी त्याने वेळ काढला. त्याने फक्‍त सत्य शिकण्यातच  समाधान मानलं नाही; तर तो त्याप्रमाणे वागलासुद्धा.  म्हणूनच तो इथियोपियावरून इतक्या लांब यरुशलेमच्या मंदिरात यहोवाची उपासना करण्यासाठी गेला. यासाठी त्याला खरंच खूप पैसा आणि वेळही लागला असेल. पण त्याने यहोवाची उपासना करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

६-७. इथियोपियाच्या माणसाने यहोवावरचं प्रेम कसं वाढवलं?

इथियोपियाच्या त्या माणसाने फिलिप्पकडून काही महत्त्वाची नवीन सत्यं शिकून घेतली; जसं की येशू ख्रिस्तच मसीहा आहे. (प्रे. कार्यं ८:३४, ३५) येशूने आपल्यासाठी कायकाय केलं हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा तो नक्कीच खूप भारावून गेला असेल. मग त्यानंतर त्याने काय केलं? तो असं म्हणू शकला असता, ‘मी आता यहुदी धर्म स्वीकारलाय, तर मग पुरे झालं. आणखी काही करायची गरज नाही.’ पण त्याने तसं काहीही केलं नाही. उलट, फिलिप्पने जे सांगितलं त्यामुळे यहोवावरचं आणि त्याच्या मुलावरचं त्याचं प्रेम वा़ढलं. म्हणून त्याला येशूचा शिष्य या नात्याने बाप्तिस्मा घ्यायचा एक मोठा निर्णय घेता आला. फिलिप्पने पाहिलं की हा माणूस आता बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहे, म्हणून त्याने त्याला बाप्तिस्मा दिला.

तुम्ही जर या माणसाच्या उदाहरणाप्रमाणे वागलात, तर तुम्हीही बाप्तिस्म्यासाठी तयार होऊ शकता. आणि तुम्हाला पूर्ण आत्मविश्‍वासाने म्हणता येईल, की “मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?” चला, आता आपण त्या माणसाने केलेल्या तीन गोष्टींवर लक्ष देऊ या. त्या म्हणजे: तो शिकत राहिला, शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागला, आणि देवावरचं त्याचं प्रेम वाढवत राहिला.

शिकत राहा

८. योहान १७:३ आपल्याला काय करायला सांगतं?

योहान १७:३ वाचा. येशूच्या या शब्दांमुळे तुम्हाला बायबल अभ्यास करायची प्रेरणा मिळाली होती का? बऱ्‍याच जणांना यामुळेच प्रेरणा मिळाली. पण या शब्दांमुळे आपल्याला आणखी शिकत राहायचंही प्रोत्साहन मिळतं का? हो नक्कीच. कारण ‘एकाच खऱ्‍या देवाबद्दल’ शिकत राहण्याला अंत नाही. (उप. ३:११) आपण नेहमी त्याच्याबद्दल शिकत राहू. जितकं जास्त आपण यहोवाबद्दल शिकू तितकंच त्याच्यासोबतचं आपलं नातंही मजबूत होत जाईल.​—स्तो. ७३:२८.

९. बायबलचं मूलभूत ज्ञान घेतल्यानंतरही काय करणं गरजेचं आहे?

जेव्हा आपण यहोवाबद्दल शिकायला सुरुवात करतो, तेव्हा आपण बायबलच्या फक्‍त मूलभूत गोष्टी शिकतो. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलने या मूलभूत गोष्टींना “प्राथमिक गोष्टी” असं म्हटलं. पण असं म्हणून, तो या तत्त्वांना क्षुल्लक समजत नव्हता. उलट, त्याने त्यांची तुलना लहान बाळाला पोषण देणाऱ्‍या दुधाशी केली. (इब्री ५:१२; ६:१) पण त्याने सर्व ख्रिश्‍चनांना एवढ्यावरच न थांबता, देवाच्या वचनातली गहन सत्यं शिकण्याचंही प्रोत्साहन दिलं. तुम्ही बायबलची गहन सत्यं जाणून घ्यायची आपली भूक वाढवली आहे का? तुमच्या मनात आध्यात्मिक प्रगती करत राहायची इच्छा आहे का? तुम्हाला यहोवा आणि त्याच्या उद्देशांबद्दल शिकत राहायला आवडेल का?

१०. काही जणांना अभ्यास करायला कठीण का वाटतं?

१० आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना अभ्यास करायला कठीण जातं. तुमच्याबद्दल काय? शाळेत तुम्ही चांगलं लिहायला, वाचायला शिकला का? तुम्हाला अभ्यास करायला आवडायचं का? की आपल्याला अभ्यास कधीच जमणार नाही असं तुम्हाला वाटायचं? बऱ्‍याच लोकांनाही असंच वाटतं. पण यहोवा एक परिपूर्ण आणि सगळ्यात चांगला शिक्षक आहे. त्यामुळे तो तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो.

११. यहोवा “महान शिक्षक” आहे हे कसं दिसून येतं?

११ बायबलमध्ये यहोवाला आपला “महान शिक्षक” म्हटलंय. (यश. ३०:२०, २१) तो धीराने वागणारा, दयाळू आणि समजून घेणारा शिक्षक आहे. तो त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलं ते पाहतो. (स्तो. १३०:३) तो कधीच आपल्याकडून जास्त अपेक्षा करत नाही. त्याला आपल्या क्षमता माहीत आहेत. कारण त्याने आपल्या मेंदूची रचना केली आहे. आणि आपला मेंदू ही त्याने आपल्याला दिलेली एक अद्‌भुत भेट आहे. (स्तो. १३९:१४) आपल्यामध्ये जन्मापासूनच शिकण्याची आवड असते. आणि आपल्या निर्माणकर्त्याचीसुद्धा हीच इच्छा आहे, की आपण कायम शिकत राहावं आणि शिकण्याचा आनंद घेत राहावा. म्हणूनच बायबलची सत्यं शिकून घेण्यासाठी आपण आत्तापासूनच “तीव्र इच्छा उत्पन्‍न” केली पाहिजे. (१ पेत्र २:२) यासाठी तुम्ही गाठता येतील अशी काही ध्येयं ठेवू शकता. आणि नियमितपणे बायबल वाचन आणि त्याचा अभ्यास करू शकता. (यहो. १:८) यहोवाच्या आशीर्वादाने तुम्हाला वाचनाची गोडी लागेल आणि तुम्ही त्याच्याबद्दल जास्त शिकाल.

१२. आपण येशूच्या जीवनाचा आणि त्याच्या सेवाकार्याचा अभ्यास का केला पाहिजे?

१२ येशूच्या जीवनावर आणि सेवाकार्यावर मनन करण्यासाठी नियमितपणे वेळ काढा. आपल्याला या कठीण काळातही जर यहोवाची सेवा करायची असेल, तर आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. (१ पेत्र २:२१) आपल्या शिष्यांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल, हे येशूने स्पष्टपणे सांगितलं होतं. (लूक १४:२७, २८) पण त्याला हीसुद्धा खातरी होती, की आपल्यासारखंच तेसुद्धा समस्यांवर मात करू शकतील. (योहा. १६:३३) म्हणून त्याच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास करा. आणि दररोजच्या जीवनात त्याच्यासारखं वागण्यासाठी वेगवेगळी ध्येयं ठेवा.

१३. तुम्ही यहोवाला कशासाठी प्रार्थना करत राहिलं पाहिजे, आणि का?

१३ पण फक्‍त ज्ञान घेणंच पुरेसं नाही; तर आपल्याला यहोवाबद्दल जास्तीत जास्त शिकूनही घेता आलं पाहिजे. तसंच, या ज्ञानामुळे त्याच्यावरचं आपलं प्रेम आणि विश्‍वास यांसारखे गुणही वाढवता आले पाहिजे. तरच या ज्ञानाचा आपल्याला फायदा होईल. (१ करिंथ. ८:१-३) म्हणून जसजसं तुम्ही यहोवाबद्दल शिकत जाल, तसतसा तुमचा विश्‍वास आणखी वाढावा अशी त्याला विनंती करा. (लूक १७:५) अशा प्रार्थनेचं तो नक्की उत्तर देतो. अचूक ज्ञानामुळे मिळवलेला खरा विश्‍वास तुम्हाला पुढे प्रगती करत राहायला मदत करेल.​—याको. २:२६.

शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागायचा प्रयत्न करत राहा

जलप्रलय येण्याआधी नोहा आणि त्याच्या कुटुंबातले लोक देवाकडून शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागले (परिच्छेद १४ पाहा)

१४. शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागण्याचं महत्त्व प्रेषित पेत्रने कसं पटवून दिलं? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ येशूचे शिष्य जे शिकतात त्याप्रमाणे त्यांनी वागत राहणं किती गरजेचं आहे, याचं महत्त्व प्रेषित पेत्रने सांगितलं. त्याने यासाठी नोहाचं उदाहरण दिलं. यहोवाने नोहाला सांगितलं, की एक दिवशी तो जलप्रलय आणून दुष्ट लोकांचा नाश करणार आहे. पण जलप्रलयातून वाचण्यासाठी नोहा आणि त्याच्या कुटुंबाला फक्‍त ही माहिती असणं पुरेसं नव्हतं. जलप्रलय आला त्याआधीच्या काळाबद्दल पेत्रने काय म्हटलं याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “जहाजाचं बांधकाम सुरू होतं.”  (१ पेत्र ३:२०) म्हणजे नोहा आणि त्याच्या कुटुंबातले लोक ही माहिती घेऊन फक्‍त शांत बसले नाहीत, तर त्यांनी एक मोठं जहाजही बांधलं. (इब्री ११:७) मग पेत्रने जहाज बांधण्याची तुलना बाप्तिस्म्याशी केली. त्याने म्हटलं: “ही घटना . . . तुम्हाला वाचवणाऱ्‍या बाप्तिस्म्याचं चिन्ह आहे.” (१ पेत्र ३:२१) एका अर्थाने, आता तुम्ही बाप्तिस्म्याची जी तयारी करत आहात, त्याची तुलना आपण नोहा आणि त्याच्या कुटुंबाने इतकी वर्षं जहाजाच्या बांधकामासाठी केलेल्या मेहनतीसोबत करू शकतो. मग बाप्तिस्मा घ्यायला तयार होण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१५. आपण खरा पश्‍चात्ताप कसा दाखवू शकतो?

१५ सगळ्यात आधी आपण आपल्या पापांसाठी मनापासून पश्‍चात्ताप केला पाहिजे. (प्रे. कार्यं २:३७, ३८) कारण जर आपण मनापासून पश्‍चात्ताप केला, तरच आपल्याला स्वतःमध्ये प्रामाणिकपणे बदल करता येतील. यहोवाला न आवडणाऱ्‍या सगळ्या वाईट सवयी, जसं की अनैतिक जीवन, तंबाखूचं व्यसन, घाणेरडी भाषा किंवा शिवीगाळ यांसारख्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या आहेत का? (१ करिंथ. ६:९, १०; २ करिंथ. ७:१; इफिस. ४:२९) तुम्ही अजूनही असं केलं नसेल, तर प्रयत्न करायचं सोडू नका. ज्यांच्यासोबत तुम्ही अभ्यास करत आहात त्यांच्याशी बोला किंवा मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. जर तुम्ही लहान असाल, तर तुमच्या आईवडिलांची मदत घ्या. ते तुम्हाला अशा वाईट सवयी सोडायला मदत करतील.

१६. देवाच्या सेवेत केल्या जाणाऱ्‍या कामांमध्ये कोणत्या गोष्टी येतात?

१६ यहोवाच्या सेवेतली कामं नियमितपणे करणंही तितकंच महत्त्वाचंय. यामध्ये ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणं आणि त्यांत भाग घेणंही येतं. या गोष्टींची स्वतःला सवय लावून घ्या. (इब्री १०:२४, २५) आणि प्रचारकार्यासाठी पात्र ठरल्यावर ते नियमितपणे करत राहा. या जीवन वाचवणाऱ्‍या कामात तुम्ही जितका जास्त भाग घ्याल, तितका तुम्हाला आनंद होईल. (२ तीम. ४:५) जर तुम्ही लहान असाल, तर स्वतःला विचारा: ‘माझ्या आईवडिलांना नेहमी मला प्रचाराला जायची किंवा सभांना उपस्थित राहायची आठवण करून द्यावी लागते का, की मी स्वतःहून या गोष्टी करायला तयार असतो?’ तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही तुमचा विश्‍वास कार्यांतून दाखवून देता. तसंच, यहोवा देवावर तुमचं प्रेम आहे आणि तो आपल्यासाठी जे काही करतो, त्याची तुम्हाला कदर आहे हेसुद्धा त्यातून दिसून येतं. ही “भक्‍तीची कार्यं” एका अर्थाने तुम्ही यहोवा देवाला देत असलेल्या भेटीच आहेत. (२ पेत्र ३:११; इब्री १३:१५) जेव्हा आपण मनापासून या भेटी देतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो. (२ करिंथकर ९:७ सोबत तुलना करा.) आपण हे सगळं यासाठी करतो, कारण यहोवाला चांगलं ते दिल्यामुळे आपल्याला आनंद होतो.

यहोवावरचं प्रेम वाढवत राहा

१७-१८. बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होईल, आणि का? (नीतिवचनं ३:३-६)

१७ बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करत असताना तुम्हाला समस्यांचाही सामना करावा लागेल. काही लोक कदाचित तुम्ही जे मानता त्यामुळे तुमची थट्टा करतील, तुमचा विरोध करतील किंवा तुम्हाला छळतीलसुद्धा. (२ तीम. ३:१२) किंवा कदाचित तुम्ही एखादी वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करत असाल, पण कधीकधी तीच गोष्ट तुमच्याकडून पुन्हा होत असेल. किंवा मग, तुम्हाला तुमचं ध्येय अजूनही गाठता आलेलं नाही म्हणून तुम्ही निराश होत असाल, तुमची चीडचीडही होत असेल. मग अशा वेळी धीर धरायला तुम्हाला कशामुळे मदत होईल? यहोवावरचं प्रेम तुम्हाला मदत करेल.

१८ यहोवावरचं प्रेम ही तुमच्याकडे असलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. (नीतिवचनं ३:३-६ वाचा.) हे प्रेम तुम्हाला जीवनातल्या कोणत्याही समस्येचा यशस्वीपणे सामना करायचं बळ देऊ शकतं. बायबलमध्ये यहोवाने त्याच्या सेवकांना दाखवलेल्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल आपल्याला बऱ्‍याचदा वाचायला मिळतं. यहोवा जेव्हा त्याच्या सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतो, तेव्हा तो त्यांना कधीच सोडत नाही; तो कायम त्यांच्यासोबत असतो. (स्तो. १००:५) त्याने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपात बनवलंय, त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारचं प्रेम दाखवू शकता. (उत्प. १:२६) मग तुम्हाला ते कसं दाखवता येईल?

तुम्ही दररोज यहोवाचे आभार मानू शकता (परिच्छेद १९ पाहा) b

१९. यहोवाने तुमच्यासाठी जे केलंय, त्यासाठी तुम्ही आणखी कदर कशी वाढवू शकता? (गलतीकर २:२०)

१९ सगळ्यात आधी यहोवाचे आभार माना. (१ थेस्सलनी. ५:१८) ‘यहोवाने मला प्रेम कसं दाखवलंय,’ याचा दररोज विचार करा. मग त्याने तुमच्यासाठी केलेल्या काही विशिष्ट गोष्टींसाठी त्याचे आभार मानायला विसरू नका. यहोवाने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत, त्या खास तुमच्यासाठी केल्या आहेत हे ओळखा. प्रेषित पौलनेसुद्धा असंच केलं होतं. (गलतीकर २:२० वाचा.) असं केल्यामुळे यहोवाने जे केलंय त्याबद्दल तुमची कदर आणखी वाढेल. स्वतःला विचारा, ‘यहोवाने दाखवलेल्या प्रेमाच्या बदल्यात मलाही माझं प्रेम त्याला दाखवता येईल का?’ यहोवावरचं प्रेमच तुम्हाला मोहांचा आणि समस्यांचा यशस्वीपणे सामना करायला मदत करेल. यासोबतच तुम्हाला यहोवाची सेवा करत राहायचं प्रोत्साहनही मिळेल. अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर असलेलं प्रेम दररोज दाखवू शकता.

२०. यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? आणि हा निर्णय इतका महत्त्वाचा का आहे?

२० एक वेळ अशी येईल, जेव्हा यहोवावरचं प्रेम तुम्हाला एक खास प्रार्थना करायचं प्रोत्साहन देईल. आणि तुम्ही आपलं जीवन त्याला समर्पित कराल. जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा तुमच्याकडे एक सुंदर आशा असेल. यहोवासोबत तुमचं एक कायमचं नातं जोडलं जाईल. तुम्ही यहोवाला समर्पण करता, तेव्हा तुम्ही चांगल्या-वाईट दोन्ही काळात त्याची सेवा करायचं वचन त्याला देता. आणि हे तुम्हाला पुन्हापुन्हा करायची गरज नाही. तुम्हाला कदाचित वाटेल की यहोवाला समर्पण करणं हे खूप मोठं पाऊल आहे. पण लक्षात असू द्या की तुम्ही जीवनात जे काही निर्णय घ्याल, त्यांतला हा सगळ्यात चांगला निर्णय असेल. (स्तो. ५०:१४) यहोवावर असलेलं तुमचं प्रेम सैतान कमी करायचा प्रयत्न करेल. तुमची एकनिष्ठा मोडण्याचा प्रयत्न करेल. पण त्याला कधीच जिंकू देऊ नका! (ईयो. २७:५) यहोवावरचं प्रेम तुम्हाला समर्पणाच्या वचनाला जागायला आणि त्याच्यासोबतचं नातं मजबूत करायला मदत करेल.

२१. बाप्तिस्मा शेवट नाही, तर सुरुवात आहे असं आपण का म्हणू शकतो?

२१ यहोवाला समर्पण केल्यानंतर, पुढचं महत्त्वाचं पाऊल उचलण्यासाठी तुम्ही तुमच्या मंडळीतल्या वडिलांशी बोलू शकता. नेहमी लक्षात असू द्या, की बाप्तिस्मा ही एक सुरुवात आहे, शेवट नाही. कारण यामुळे यहोवाची कायम सेवा करत राहायचं एक दार तुमच्यासाठी उघडलं जाईल. तर, यहोवावरचं प्रेम आत्ताच वाढवा. त्यासाठी तुम्ही काही ध्येयं ठेवू शकता. यामुळे तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायला मदत होईल. खरंच, किती सुंदर दिवस असेल तो! पण लक्षात घ्या, ही फक्‍त सुरुवात आहे. यहोवावरचं आणि त्याच्या मुलावरचं तुमचं प्रेम असंच कायम वाढत राहो!

गीत १३५ यहोवाची विनंती: “माझ्या मुला सुज्ञपणे वाग”

a बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करत राहण्यामागचा आपला हेतू चांगला असला पाहिजे. पण त्याबरोबरच आपण योग्य ते पाऊलही उचललं पाहिजे. या लेखात आपण इथियोपियाच्या दरबारातल्या अधिकाऱ्‍याचं उदाहरण पाहू या. आणि त्यातून आपण शिकू या की बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करत राहण्यासाठी बायबल विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे.

b चित्राचं वर्णन: एक तरुण बहीण प्रार्थनेत यहोवाला त्याने दिलेल्या गोष्टींसाठी त्याचे आभार मानते.