व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १३

मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी सृष्टीचा उपयोग करा

मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी सृष्टीचा उपयोग करा

“या सगळ्या ताऱ्‍यांना कोणी बनवलं?”​—यश. ४०:२६.

गीत ११ सृष्टी यहोवाची स्तुती गाते

सारांश a

१. आपल्या मुलांच्या बाबतीत आईवडिलांची काय इच्छा असते?

 आईवडिलांनो, तुमच्या मुलांनी यहोवाला ओळखावं आणि त्याच्यावर प्रेम करावं अशी तुमची इच्छा आहे हे आम्हाला माहीत आहे. पण देव तर दिसत नाही. मग तो एक खरी व्यक्‍ती आहे आणि आपण त्याच्याशी जवळची मैत्री करू शकतो हे समजून घ्यायला तुम्ही आपल्या मुलांना कशी मदत करू शकता?​—याको. ४:८.

२. आईवडील आपल्या मुलांना यहोवाच्या गुणांबद्दल कसं शिकवू शकतात?

आपल्या मुलांना यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत करायचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करणं. (२ तीम. ३:१४-१७) पण मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याचा आणखी एक मार्ग बायबलमध्ये सांगितला आहे. नीतिवचनांच्या पुस्तकात एक वडील आपल्या मुलाला याची आठवण करून देतात, की सृष्टीतून  दिसून येणारे देवाचे गुण त्याने कधीही नजरेआड होऊ देऊ नये. (नीति. ३:१९-२१) यावरून दिसून येतं, की यहोवाने बनवलेल्या गोष्टींमधूनही आईवडील आपल्या मुलांना त्याच्याबद्दल शिकवू शकतात. ते कसं, याचे काही मार्ग आता आपण पाहू या.

सृष्टीचा उपयोग करून मुलांना कसं शिकवता येईल?

३. आईवडील आपल्या मुलांना यहोवाच्या गुणांबद्दल शिकायला कशी मदत करू शकतात?

बायबलमध्ये म्हटलंय, की ‘जगाच्या निर्मितीपासूनच देवाचे अदृश्‍य गुण हे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतात.’ (रोम. १:२०) आईवडिलांनो, तुम्हाला तुमच्या मुलांसोबत बाहेर मोकळ्या वातावरणात वेळ घालवायला नक्कीच आवडत असेल. मग अशा वेळी, आपल्या मुलांना यहोवाने “निर्माण केलेल्या गोष्टींवरून” त्याचे सुंदर गुण कसे दिसून येतात हे समजायला तुम्ही मदत करू शकता का? या बाबतीत आईवडील येशूच्या उदाहरणातून काय शिकू शकतात ते पाहू या.

४. आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी येशूने सृष्टीतल्या गोष्टींचा कसा उपयोग केला? (लूक १२:२४, २७-३०)

लोकांना शिकवण्यासाठी येशूने सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग कसा केला याकडे लक्ष द्या. एका प्रसंगी, त्याने आपल्या शिष्यांना कावळ्यांचं आणि रानफुलांचं निरीक्षण करायला सांगितलं. (लूक १२:२४, २७-३० वाचा.) इथे येशू, दुसऱ्‍या कोणत्याही पक्ष्याचा किंवा फुलाचा उपयोग करू शकला असता. पण त्याने अशा एका पक्ष्याचं आणि फुलाचं उदाहरण वापरलं ज्यांबद्दल त्याच्या शिष्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्यांनी नक्कीच आकाशात कावळ्यांना उडताना आणि रानात उमलणाऱ्‍या फुलांना पाहिलं असेल. येशू शिष्यांशी बोलत होता तेव्हा तो कदाचित या गोष्टींकडे हात करून बोलत असावा. या उदाहरणांचा उल्लेख केल्यानतंर येशूने काय केलं? आपला स्वर्गातला पिता किती उदार आणि प्रेमळ आहे याबद्दल त्याने शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला. तो म्हणजे, यहोवा जर कावळ्यांना खाऊ घालतो आणि रानातल्या फुलांना इतक्या सुंदर कपड्यांनी सजवतो, तर तो आपल्या विश्‍वासू सेवकांचीही नक्कीच काळजी घेईल.

५. मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी आईवडील सृष्टीतल्या कोणत्या गोष्टींचा उपयोग करू शकतात?

आईवडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना येशूसारखंच कसं शिकवू शकता? तुम्ही त्यांना सृष्टीतल्या अशा एखाद्या गोष्टीबद्दल सांगू शकता जी तुम्हाला खूप आवडते. जसं की, तुमच्या आवडत्या प्राण्याबद्दल किंवा झाडाबद्दल. मग त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं हे नक्की सांगा. त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडत्या प्राण्याबद्दल किंवा झाडाबद्दल विचारू शकता. मग त्या आवडत्या गोष्टीचा उपयोग करून तुम्ही जेव्हा यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल बोलाल, तेव्हा मुलं जास्त लक्ष देऊन ऐकण्याची शक्यता असते.

६. क्रिस्टोफरच्या आईच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींतून त्याच्याबद्दल काय शिकायला मिळतं हे मुलांना शिकवण्यासाठी तुम्हाला एखाद्या प्राण्याबद्दल किंवा झाडाबद्दल खूप जास्त संशोधन करायची गरज आहे का? नाही. येशूने कावळ्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल किंवा रानफुलांच्या रचनेबद्दल लांबलचक स्पष्टीकरण दिलं नाही. हे खरंय, की काही वेळा निसर्गातल्या एखाद्या गोष्टीवर खोलवर चर्चा करायला तुमच्या मुलांना आवडेल. पण बऱ्‍याचदा एखादा मुद्दा समजावून सांगण्यासाठी थोडक्यात माहिती देणं किंवा नुसतंच एखादा प्रश्‍न विचारणंसुद्धा पुरेसं आहे. क्रिस्टोफर नावाचा एक भाऊ त्याच्या लहानपणाच्या एका आठवणीबद्दल काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “आजूबाजूला दिसणाऱ्‍या निसर्गातल्या गोष्टी किती सुंदर आहेत याबद्दल आमच्या मनात कदर वाढण्यासाठी आई आम्हाला त्यांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी अगदी थोडक्यातच सांगायची. जसं की, आम्ही डोंगर जवळून पाहताना आई आम्हाला म्हणायची, ‘बापरे! हे डोंगर किती उंच आहेत! खरंच, यहोवा किती शक्‍तिशाली आहे ना?’ किंवा आम्ही जेव्हा समुद्राच्या लाटा उंच उसळताना पाहायचो तेव्हा ती म्हणायची, ‘या लाटांमध्ये किती जबरदस्त ताकद आहे! खरंच यहोवा किती शक्‍तिशाली आहे!’ तिच्या अशा मोजक्याच, पण विचार करायला लावणाऱ्‍या शब्दांमुळे आमच्यावर खूप जबरदस्त प्रभाव पडला.”

७. तुम्ही तुमच्या मुलांना सृष्टीबद्दल विचार करायला कसं शिकवू शकता?

पुढे मुलं जसजशी मोठी होत जातील तसतसं तुम्ही त्यांना सृष्टीबद्दल विचार करायला आणि त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं हे समजायला मदत करू शकता. यहोवाने निर्माण केलेल्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख करून तुम्ही त्यांना विचारू शकता, “यातून तुम्हाला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?” मुलं जे सांगतील ते ऐकून तुम्ही कदाचित चकीत व्हाल.​—मत्त. २१:१६.

सृष्टीचा उपयोग करून तुम्ही मुलांना कधी शिकवू शकता?

८. “रस्त्याने चालताना” इस्राएली पालकांना कोणती संधी मिळायची?

प्राचीन काळात इस्राएली लोकांना सांगण्यात आलं होतं, की त्यांनी आपल्या मुलांना “रस्त्याने चालताना” यहोवाच्या आज्ञांबद्दल शिकवावं. (अनु. ११:१९) प्राचीन इस्राएलमधले रस्ते गावागावांतून जायचे. त्यामुळे प्रवास करताना वेगवेगळ्या प्रकारची फुलं, प्राणी आणि पक्षी पाहायला मिळायचे. अशा रस्त्यांवरून प्रवास करत असताना आईवडील आपल्या मुलांशी यहोवाने निर्माण केलेल्या सृष्टीबद्दल बोलू शकत होते. आईवडिलांनो, तुम्हीसुद्धा आपल्या मुलांसोबत फिरायला जाता तेव्हा सृष्टीचा उपयोग करून अशाच प्रकारे त्यांना शिकवू शकता. काही आईवडिलांनी हे कसं केलं ते पाहू या.

९. अनिता आणि कॅथी यांच्याकडून तुम्ही काय शिकू शकता?

भारतातल्या एका मोठ्या शहरात राहणारी अनिता b नावाची एक बहीण म्हणते: “आम्ही जेव्हा आमच्या नातेवाइकांना भेटायला गावी जातो तेव्हा मुलांना यहोवाच्या अद्‌भुत सृष्टीबद्दल शिकवायची एक चांगली संधी आमच्याकडे असते. शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून आणि ट्रॅफिकपासून दूर असल्यामुळे माझी मुलं यहोवाच्या सृष्टीबद्दल जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.” पालकांनो, अशा सुंदर वातावरणात तुमच्या मुलांसोबत घालवलेला वेळ तुमची मुलं कधीच विसरणार नाहीत. मॉल्डोवामध्ये राहणारी कॅथी नावाची एक बहीण म्हणते: “माझ्या सगळ्यात चांगल्या आठवणी म्हणजे लहानपणी आईवडिलांसोबत गावाकडे घालवलेला वेळ. लहानपणापासूनच आईवडिलांनी मला यहोवाने बनवलेल्या सृष्टीचं निरीक्षण करायला आणि त्यातून त्याच्याबद्दल शिकायला मदत केली, आणि याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे.”

अगदी शहरातसुद्धा तुम्हाला यहोवाने बनवलेल्या सृष्टीतलं असं काहीतरी दिसेल ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मुलांना यहोवाबद्दल शिकवू शकता (परिच्छेद १० पाहा)

१०. शहरापासून दूर गावाकडे जाणं शक्य नसेल तर पालक काय करू शकतात? (“ पालकांसाठी मदत,” ही चौकट पाहा.)

१० पण जर तुम्हाला शहरापासून दूर गावाकडे जाणं शक्य नसेल तर काय? भारतात राहणारा अमोल नावाचा एक भाऊ म्हणतो: “आमच्या इथे आईवडिलांना दिवसभर काम करावं लागतं. शिवाय, गावाकडे जाणंसुद्धा खूप खर्चिक असतं. पण एखाद्या छोट्याशा बागेत किंवा घराच्या गच्चीवर जाऊनसुद्धा तुम्ही यहोवाच्या सृष्टीचं निरीक्षण करू शकता आणि त्याच्या सुंदर गुणांबद्दल बोलू शकता.” तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष दिलं, तर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपासच अशा बऱ्‍याचशा गोष्टी दिसतील ज्यांबद्दल तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता; जसं की पक्षी, किडे, झाडं आणि असं बरंच काही. (स्तो. १०४:२४) तसंच, जर्मनीमध्ये राहणारी करीना नावाची बहीण म्हणते: “माझ्या आईला फुलं फार आवडतात. त्यामुळे मी लहान असताना आम्ही दोघी बाहेर फेरफटका मारायला जायचो तेव्हा ती मला वाटेत दिसणारी सुंदर फुलं दाखवायची.” पालकांनो, आपल्या मुलांना सृष्टीबद्दल शिकवण्यासाठी तुम्ही संघटनेने तयार केलेल्या व्हिडिओंचा आणि प्रकाशनांचासुद्धा वापर करू शकता. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहत असला, तरी देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मदत करू शकता. आता आपण यहोवाच्या अशा काही गुणांबद्दल पाहू या जे तुम्ही तुमच्या मुलांना सृष्टीतून शिकवू शकता.

यहोवाचे ‘अदृश्‍य गुण अगदी स्पष्टपणे दिसून येतात’

११. यहोवा एक प्रेमळ देव आहे हे समजायला पालक आपल्या मुलांना कसं शिकवू शकतात?

११ यहोवा एक प्रेमळ  देव आहे हे समजायला तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता? त्यासाठी वेगवेगळे प्राणी आपल्या पिल्लांची किती प्रेमाने आणि कोमलतेने काळजी घेतात हे तुम्ही त्यांना दाखवू शकता. (मत्त. २३:३७) तसंच, सृष्टीमध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यांपासून आपल्याला किती आनंद मिळतो हेसुद्धा तुम्ही मुलांना सांगू शकता. आधी जिचा उल्लेख केला होता ती करीना म्हणते: “मी आईसोबत बाहेर फेरफटका मारायला जायचे तेव्हा प्रत्येक फूल किती वेगळं आणि सुंदर आहे याचं निरीक्षण करायला ती मला सांगायची. आणि मग त्यातून यहोवाचं प्रेम कसं दिसून येतं यावर विचार करायला लावायची. या गोष्टीला इतकी वर्षं लोटून गेली, पण आजसुद्धा कोणतंही फूल पाहताना ते किती वेगळं आहे, त्याचा रंग आणि रचना किती वेगळी आहे याचं मी बारकाईने निरीक्षण करते. आणि त्यावरून यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो याची मला नेहमी आठवण होते.”

यहोवा किती बुद्धिमान आहे हे मुलांना समजावून सांगण्यासाठी तुम्ही आपल्या शरीराच्या अद्‌भुत रचनेबद्दल त्यांना सांगू शकता (परिच्छेद १२ पाहा)

१२. यहोवा किती बुद्धिमान आहे हे समजायला पालक आपल्या मुलांना कशी मदत करू शकतात? (स्तोत्र १३९:१४) (चित्रसुद्धा पाहा.)

१२ यहोवा मानवांपेक्षा कितीतरी जास्त बुद्धिमान  आहे. (रोम. ११:३३) पण हे समजायला तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता? बऱ्‍याच गोष्टींतून. जसं की, तुम्ही त्यांना सांगू शकता, की पाण्यापासून ढग कसे तयार होतात आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी अगदी सहजासहजी कसे तरंगत जातात. (ईयो. ३८:३६, ३७) तसंच, आपल्या शरीराची रचना किती अद्‌भुत रितीने करण्यात आली आहे हेसुद्धा तुम्ही आपल्या मुलांना सांगू शकता. (स्तोत्र १३९: १४ वाचा.) व्लादिमीर नावाच्या एका भावाने आपल्या मुलाला ही गोष्ट कशी शिकवली याकडे लक्ष द्या. ते म्हणतात: “एकदा माझा मुलगा सायकलवरून पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागलं. पण काही दिवसांतच त्याची जखम भरून आली. तेव्हा मी आणि माझ्या पत्नीने त्याला समजावून सागितलं, की यहोवाने आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे, की आपल्याला जखम जरी झाली, तरी ती आपोआप भरून येते. मग आम्ही त्याला सांगितलं, की मानवांनी बनवलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये हे पाहायला मिळत नाही. जसं की, एखाद्या गाडीचा ॲक्सिडेन्ट झाला तर ती आपोआप दुरुस्त होत नाही. यामुळे यहोवा किती बुद्धिमान आहे हे समजायला आमच्या मुलाला मदत झाली.”

१३. यहोवा किती शक्‍तिशाली आहे हे समजून घ्यायला पालक आपल्या मुलांना कशी मदत करू शकतात? (यशया ४०:२६)

१३ यहोवा आपल्याला आपले डोळे वर करून आकाशाकडे पाहायला सांगतो आणि त्याच्या शक्‍तीमुळे  सगळे तारे आपापल्या जागी कशा प्रकारे स्थिर आहेत यावर विचार करायला सांगतो. (यशया ४०:२६ वाचा.) तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना आकाशाकडे पाहायला आणि त्यात दिसणाऱ्‍या गोष्टींवर विचार करायला सांगू शकता. तायवानमध्ये राहणारी एक बहीण तिच्या लहानपणातली एक आठवण सांगते. ती म्हणते: “एकदा आई मला लांब पिकनिकला घेऊन गेली होती. तिथे आम्ही शहराच्या झगमगाटापासून दूर असलेलं रात्रीचं आकाश पाहू लागलो. तो काळ असा होता जेव्हा माझे मित्रमैत्रिणी माझ्यावर चुकीचं काम करायचा दबाव टाकत होते आणि मी यहोवाला विश्‍वासू राहीन की नाही अशी चिंता मला होती. पण हे सगळे तारे बनवणारा यहोवा देव किती शक्‍तिशाली आहे यावर आईने मला विचार करायला सांगितलं. यहोवा जर इतका शक्‍तिशाली आहे तर तो मला कुठल्याही परीक्षेचा सामना करायला नक्कीच मदत करू शकतो हे कायम लक्षात ठेवायला तिने मला मदत केली. त्या दिवशी रात्री आम्ही सृष्टीचं जे निरीक्षण केलं त्यामुळे यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मला मदत झाली. आणि त्याची सेवा करायचा माझा निश्‍चय आणखी पक्का झाला.”

१४. यहोवा एक आनंदी देव आहे हे समजायला पालक आपल्या मुलांना कशी मदत करू शकतात?

१४ यहोवाने ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्यांवरून आपल्याला कळतं, की तो एक आनंदी देव आहे आणि आपणही आनंदी असावं असं त्याला वाटतं. वैज्ञानिकांना असं दिसून आलंय की बरेच प्राणी, अगदी पक्षी आणि मासेसुद्धा खेळतात. (ईयो. ४०:२०) तुमच्या मुलांनी कधी मांजरीच्या पिल्लाला लोकरीच्या धाग्यासोबत खेळताना पाहिलंय का? किंवा कुत्र्याच्या पिल्लांना एकमेकांसोबत मस्ती करताना पाहिलंय का? त्यांची गंमत पाहून तुमच्या मुलांना कधी हसू फुटलंय का? पुढच्या वेळी जेव्हा तुमची मुलं प्राण्यांच्या अशा गमतीजमती पाहून हसतील तेव्हा त्यांना याची आठवण करून द्या, की आपण एका आनंदी देवाची सेवा करतो.​—१ तीम. १:११.

कुटुंब मिळून यहोवाच्या सृष्टीचा आनंद घ्या

निसर्गात मुलांसोबत वेळ घालवल्यामुळे त्यांना जास्त निवांत वाटेल आणि ते मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलतील (परिच्छेद १५ पाहा)

१५. मुलांच्या मनात काय आहे हे ओळखायला पालकांना कशामुळे मदत होऊ शकते? (नीतिवचनं २०:५) (चित्रसुद्धा पाहा.)

१५ काही मुलं बऱ्‍याच समस्यांचा सामना करत असतात, पण त्यांबद्दल ते आपल्या आईवडिलांशी बोलत नाहीत. आणि त्यामुळे मुलांच्या मनात काय आहे हे ओळखायला पालकांना कठीण जाऊ शकतं. तुमच्या बाबतीतही असंच होत असेल, तर तुम्हाला तुमच्या मुलांना बोलतं करायची गरज आहे. (नीतिवचनं २०:५ वाचा.) काही पालकांना असं दिसून आलंय, की जेव्हा ते आपल्या मुलांसोबत निसर्गात वेळ घालवतात तेव्हा त्यांना बोलतं करणं जास्त सोपं असतं. असं का? एक कारण म्हणजे, त्या निवांत वातावरणात लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी कमी असतात आणि त्यामुळे मुलांना आपल्या पालकांसोबत मनमोकळेपणाने बोलता येतं. तायवानमध्ये राहणारे मसाहिको नावाचे एक भाऊ याचं आणखी एक कारण सांगतात. ते म्हणतात: “जेव्हा आम्ही मुलांसोबत बाहेर फिरायला जातो, डोंगरांवर चढाई करतो किंवा समुद्रकिनाऱ्‍यावर फिरायला जातो तेव्हा मुलं सहसा खूप निवांत असतात. अशा वेळी त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या मनात काय आहे हे समजायला आम्हाला सोपं जातं.” आधी उल्लेख केलेली कॅथी म्हणते: “शाळा सुटल्यावर आई नेहमी मला एका सुंदरशा बागेत घेऊन जायची. तिथल्या निवांत वातावरणात, शाळेत कायकाय घडलं किंवा मला कोणत्या गोष्टींची काळजी वाटते याबद्दल बोलणं मला सोपं जायचं.”

१६. यहोवाच्या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आणि एकमेकांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी कुटुंबं काय करू शकतात?

१६ कुटुंबं जेव्हा एकत्र मिळून यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा आनंद घेतात तेव्हा त्यांना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवता येतो आणि एकमेकांसोबतचं त्यांचं नातंही घट्ट होतं. बायबलसुद्धा म्हणतं, की “हसण्याची वेळ” आणि “आनंदाने उड्या मारण्याची वेळ,” असते. (उप. ३:१, ४, तळटीप) यहोवाने अशा बऱ्‍याचशा गोष्टी बनवल्या आहेत, जसं की डोंगरदऱ्‍या, जंगल, समुद्र. आणि आपण जेव्हा कुटुंब मिळून अशा वातावरणात वेळ घालवतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. काही मुलांना बागिच्यात खेळायला, बागडायला, प्राण्यांना पाहायला किंवा पोहायला आवडतं. खरंच, यहोवाने बनवलेल्या सुंदर निसर्गात वेळ घालवून करमणूक करायच्या कितीतरी संधी आपल्याकडे आहेत.

१७. देवाने बनवलेल्या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना का मदत केली पाहिजे?

१७ नवीन जगात पालकांना आपल्या मुलांसोबत कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा आनंद घेता येईल. त्या वेळी आपल्याला प्राण्यांना घाबरण्याची गरज नसेल आणि तेसुद्धा आपल्याला घाबरणार नाहीत. (यश. ११:६-९) यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ असेल. (स्तो. २२:२६) पण पालकांनो, तोपर्यंत वाट पाहू नका. आत्तापासूनच आपल्या मुलांसोबत सृष्टीचा आनंद घ्या. सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना यहोवाबद्दल शिकवाल तेव्हा त्यांनासुद्धा दावीद राजासारखंच वाटेल. दावीदने म्हटलं: “हे यहोवा, . . . तुझ्यासारखी कार्यं करणारा दुसरा कोणीही नाही.”​—स्तो. ८६:८.

गीत १३३ तारुण्यात यहोवाची सेवा करू

a लहानपणी आईवडिलांसोबत निसर्गातल्या गोष्टींचा आनंद घेतल्याच्या अनेक सुंदर आठवणी आपल्यापैकी बऱ्‍याच जणांकडे असतील. त्या वेळी यहोवाच्या अप्रतिम गुणांबद्दल शिकवण्यासाठी आपल्या आईवडिलांनी त्या संधीचा उपयोग कसा केला, हे नक्कीच आपल्याला आठवत असेल. तुम्हाला जर मुलं असतील, तर सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही त्यांना देवाच्या सुंदर गुणांबद्दल कसं शिकवू शकता? या प्रश्‍नाचं उत्तर या लेखात आपल्याला मिळेल.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.