अभ्यास लेख १४
“यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात”
“तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”—योहा. १३:३५.
गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श
सारांश a
१. एखादी व्यक्ती पहिल्यांदाच आपल्या सभेला येते तेव्हा सहसा कोणती गोष्ट तिला खूप विशेष वाटते? (चित्रसुद्धा पाहा.)
कल्पना करा, की एक विवाहित जोडपं पहिल्यांदाच आपल्या सभेला आलंय. सभेत सगळे लोक खूप आनंदाने त्यांना भेटतात, आपुलकीने त्यांच्याशी बोलतात. आपल्यातलं हे प्रेम पाहून त्यांना खूप विशेष वाटतं. मग सभेनंतर घरी जाताना पत्नी आपल्या पतीला म्हणते, ‘हे लोक खरंच खूप वेगळे आहेत.’
२. काही लोकांनी यहोवाची सेवा करायचं का सोडून दिलंय?
२ यहोवाच्या लोकांमध्ये असलेलं प्रेम खरंच खूप विशेष आहे. पण यहोवाचे साक्षीदार काही परिपूर्ण नाहीत. (१ योहा. १:८) त्यामुळे मंडळीतल्या लोकांना आपण जितकं जास्त ओळखायला लागतो तितकं जास्त त्यांच्यातल्या कमतरता आपल्याला दिसू लागतात. (रोम. ३:२३) आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, अशा कमतरता पाहूनच काहींनी यहोवाची सेवा करायचं सोडून दिलंय.
३. येशूच्या खऱ्या शिष्यांचं ओळखचिन्ह काय आहे? (योहान १३:३४, ३५)
३ या लेखाच्या मुख्य वचनाकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. (योहान १३:३४, ३५ वाचा.) या वचनात काय सांगितलंय? ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्यांचं ओळखचिन्ह काय असेल? परिपूर्णता नाही, तर त्यांचं एकमेकांवर असलेलं खरं प्रेम. लक्ष द्या, इथे येशूने असं म्हटलं नाही: ‘यावरूनच तुम्ही ओळखाल की तुम्ही माझे शिष्य आहात.’ याउलट त्याने असं म्हटलं. “यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” असं म्हणून येशूने दाखवून दिलं, की फक्त त्याचे शिष्यच नाहीत तर बाहेरचे लोकसुद्धा आपलं एकमेकांवरचं निःस्वार्थ प्रेम पाहून ओळखतील की आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत.
४. साक्षीदार नसलेल्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल कोणते प्रश्न येऊ शकतात?
४ पण यहोवाचे साक्षीदार नसलेले काही जण कदाचित विचार करतील, की ‘जे येशूचे खरे शिष्य आहेत त्यांची ओळख प्रेमावरून कशी काय होऊ शकते?’ किंवा काही जण विचार करतील, ‘येशूने आपल्या प्रेषितांवर प्रेम असल्याचं कसं दाखवलं? आणि आज आपण येशूच्या या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?’ या प्रश्नांवर आपणसुद्धा विचार केला पाहिजे. कारण असं केल्यामुळे एकमेकांचे दोष दिसत असतानाही त्यांच्यावर प्रेम करायला आपल्याला मदत होईल.—इफिस. ५:२.
येशूच्या खऱ्या शिष्यांची ओळख प्रेमावरून कशी होते?
५. योहान १५:१२, १३ मधल्या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो?
५ येशूने म्हटलं होतं, की त्याच्या शिष्यांमध्ये एक खास प्रकारचं प्रेम असेल. (योहान १५:१२, १३ वाचा.) येशूने काय आज्ञा दिली होती याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “जसं मी तुमच्यावर प्रेम केलंय, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.” याचा काय अर्थ होतो? येशूने समजावून सांगितलं, की हे आत्मत्यागी प्रेम आहे. म्हणजेच, वेळ पडली तर एक ख्रिस्ती आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी स्वतःचा जीव द्यायलाही तयार असेल. b
६. प्रेम किती महत्त्वाचं आहे हे बायबलमधून कसं कळतं?
६ प्रेम किती महत्त्वाचं आहे हे बायबलमध्ये वारंवार सांगण्यात आलंय. बऱ्याच लोकांची आवडती वचनंसुद्धा प्रेमाबद्दलच आहेत. जसं की, “देव प्रेम आहे.” (१ योहा. ४:८) “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” (मत्त. २२:३९) “प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.” (१ पेत्र ४:८) “प्रेम कधीही नाहीसं होत नाही.” (१ करिंथ. १३:८) बायबलमधली ही आणि अशी इतर वचनं वाचल्यावर लक्षात येतं, की प्रेमाचा हा सुंदर गुण विकसित करणं आणि तो दाखवणं किती महत्त्वाचं आहे.
७. सैतान लोकांना एकत्र आणून त्यांच्यात प्रेम आणि एकी का निर्माण करू शकत नाही?
७ बरेच लोक म्हणतात: ‘आजकाल सगळेच धर्म खरं शिकवण्याचा दावा करतात. पण मुळात प्रत्येक धर्म देवाबद्दल काहीतरी वेगळंच शिकवतो. मग खरा धर्म ओळखायचा तरी कसा?’ खरंच, सैतानाने इतके खोटे धर्म तयार केले आहेत, की त्यांतला खरा धर्म कोणता आहे हे ओळखणं लोकांना कठीण झालं आहे. पण एक गोष्ट सैतान करू शकत नाही. ती म्हणजे, तो कधीच असा एक बंधुसमाज तयार करू शकत नाही जो जगभरात पसरलेला असूनही त्यातल्या लोकांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. ही गोष्ट फक्त यहोवाच करू शकतो. आणि हे बरोबरही आहे. कारण खऱ्या प्रेमाचा उगम तोच आहे. आणि ज्यांच्यावर यहोवाची पवित्र शक्ती आणि त्याचा आशीर्वाद आहे त्यांच्यामध्येच खरं प्रेम असू शकतं. (१ योहा. ४:७) म्हणूनच निःस्वार्थ प्रेम हे आपल्या खऱ्या शिष्यांचं ओळखचिन्ह असेल असं जे येशूने म्हटलं त्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही.
८-९. आपल्यातलं खरं प्रेम पाहून अनेकांच्या मनावर कसा प्रभाव पडला आहे?
८ येशूने सांगितलं होतं त्याप्रमाणे आपल्यातलं खरं प्रेम पाहूनच अनेक जण हे ओळखतात की आपण येशूचे खरे शिष्य आहोत. उदाहरणार्थ, ईअन नावाचा एक भाऊ आठवून सांगतो, त्याच्या घराशेजारीच असलेल्या एका मैदानावर यहोवाच्या साक्षीदारांचं एक अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनाला तो पहिल्यांदाच उपस्थित राहिला होता. काही महिन्यांपूर्वी तो याच स्टेडियमवर मॅच बघण्यासाठी गेला होता. तो म्हणतो: “मॅचसाठी आलेल्या लोकांमध्ये आणि अधिवेशनातल्या लोकांमध्ये खूप मोठा फरक होता. अधिवेशनाला आलेले लोक खूप प्रेमाने आणि आदराने एकमेकांशी बोलत होते, वागत होते. शिवाय त्यांचा पेहराव नीटनेटका आणि चांगला होता. आणि त्यांच्या मुलांचं वागणंही खूप चांगलं होतं.” तो पुढे म्हणतो: “ते सगळे खूप समाधानी वाटत होते आणि त्यांच्यात खूप शांती होती. आणि हेच तर मला हवं होतं. त्या दिवशी अधिवेशनात जी भाषणं दिली होती, त्यांतलं काहीच मला आठवत नाही. पण साक्षीदारांचं वागणं-बोलणं मात्र माझ्या मनावर कायमची छाप पाडून गेलं.” असं वागणं खरंतर एकमेकांवर असेलल्या खऱ्या प्रेमामुळेच शक्य आहे. खरंच, भाऊबहिणींवर आपलं प्रेम असल्यामुळे आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतो.
९ जॉन नावाच्या एका भावाने आपल्या सभांना यायला सुरुवात केली तेव्हा त्यालासुद्धा काहीसा असाच अनुभव आला. तो म्हणतो: “तिथे असलेले सगळे लोक एकमेकांशी खूप प्रेमाने आणि मिळूनमिसळून वागत होते. असं वाटत होतं, ते सगळे स्वर्गदूतच आहेत. त्यांच्यातलं ते खरं प्रेम पाहून मला खातरी पटली की हाच खरा धर्म आहे.” खरंच, असे कितीतरी अनुभव दाखवून देतात की यहोवाचे लोकच येशूचे खरे शिष्य आहेत.
१०. खरं प्रेम दाखवायची संधी खासकरून केव्हा आपल्याकडे असते? (तळटीपसुद्धा पाहा.)
१० आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे काही वेळा आपले भाऊबहीण असं काहीतरी बोलतात किंवा करतात ज्यामुळे आपल्याला वाईट वाटतं. c (याको. ३:२) पण खरंतर अशा वेळीच आपल्याला त्यांना खरं प्रेम दाखवायची संधी मिळते. आणि ते आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवू शकतो. या बाबतीत येशूच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?—योहा. १३:१५.
येशूने आपल्या प्रेषितांना प्रेम कसं दाखवलं?
११. याकोब आणि योहान यांच्यात कोणती चुकीची मनोवृत्ती होती? (चित्रसुद्धा पाहा.)
११ आपल्या शिष्यांनी कधीच चुका करू नयेत अशी अपेक्षा येशूने केली नाही. उलट त्यांना यहोवाचं मन आनंदित करता यावं म्हणून त्याने खूप प्रेमाने त्यांच्या कमतरता सुधारण्यासाठी त्यांना मदत केली. एकदा असं झालं, की याकोब आणि योहान या येशूच्या दोन शिष्यांनी आपल्या आईला पुढे करून येशूकडे अशी विनंती करायला लावली, की देवाच्या राज्यात त्याने त्यांना मानाचं स्थान द्यावं. (मत्त. २०:२०, २१) यावरून दिसून आलं, की याकोब आणि योहान गर्विष्ठ होते आणि त्यांना इतरांपेक्षा मोठं स्थान हवं होतं.—नीति. १६:१८.
१२. याकोब आणि योहाननीच फक्त चुकीची मनोवृत्ती दाखवली का? समजावून सांगा.
१२ पण त्या प्रसंगी फक्त याकोब आणि योहान यांनीच चुकीची मनोवृत्ती दाखवली असं नाही. त्या वेळी इतर प्रेषित कसं वागले याकडेही लक्ष द्या. बायबल म्हणतं: “ही गोष्ट बाकीच्या दहा जणांनी ऐकली तेव्हा त्यांना त्या दोघा भावांचा खूप राग आला.” (मत्त. २०:२४) आपण कल्पना करू शकतो, की त्या वेळी याकोब, योहान आणि इतर प्रेषितांमध्ये किती वाद झाला असेल. बाकीचे प्रेषित कदाचित त्या दोघांना असं म्हटले असतील: ‘तुम्ही दोघं स्वतःला काय समजता? तुम्ही काय आमच्यापेक्षा जास्त मोठे आहात का? येशूसोबत आम्हीपण तितकंच काम केलंय जेवढं तुम्ही केलंय. मग तुम्हालाच का म्हणून मोठं पद पाहिजे?’ त्या प्रसंगी ते एकमेकांना काय म्हटले हे आपल्याला माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी, ती म्हणजे काही काळासाठी का होईना, ते एकमेकांना प्रेम दाखवण्यात कमी पडले.
१३. प्रेषितांमध्ये कमतरता होत्या तरीसुद्धा येशू त्यांच्याशी कसा वागला? (मत्तय २०:२५-२८)
१३ मग येशूने ही परिस्थिती कशी हाताळली? तो आपल्या प्रेषितांवर भडकला नाही. त्याने असं म्हटलं नाही, की ‘मी आता यांच्या जागी दुसरे प्रेषित निवडतो; असे प्रेषित ज्यांच्यामध्ये जास्त नम्रता असेल आणि जे एकमेकांशी नेहमी प्रेमाने वागतील.’ उलट येशू त्यांच्याशी खूप धीराने वागला. कारण ते मनाने चांगले आहेत हे त्याला माहीत होतं. (मत्तय २०:२५-२८ वाचा.) आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण यावरून प्रेषितांमध्ये पहिल्यांदाच वाद झाला होता असं नाही. पण तरीसुद्धा येशू त्यांच्याशी खूप प्रेमाने वागला.—मार्क ९:३४; लूक २२:२४.
१४. येशूचे प्रेषित कशा वातावरणात वाढले होते?
१४ प्रेषित कोणत्या संस्कृतीत वाढले होते हे येशूने विचारात घेतलं. (योहा. २:२४, २५) ते अशा वातावरणात वाढले होते जिथे धर्मगुरू पद, प्रतिष्ठा अशा गोष्टींना खूप जास्त महत्त्व द्यायचे. (मत्त. २३:६; या वचनासाठी हिंदी अध्ययन बायबलमधल्या अध्ययन नोटमध्ये सभा-घर में सबसे आगे की जगह हा व्हिडिओ पाहा.) शिवाय यहुदी धर्मगुरू स्वतःला इतरांपेक्षा खूप जास्त नीतिमान समजायचे. d (लूक १८:९-१२) आणि अशाच वातावरणाचा शिष्यांच्या दृष्टिकोनावर परिणाम झाला असेल हे येशूने ओळखलं. (नीति. १९:११) आपल्या शिष्यांकडून कधीच चुका होणार नाहीत अशी अपेक्षा येशूने केली नाही. आणि त्यांच्याकडून चुका झाल्या तेव्हा तो त्यांच्यावर भडकलाही नाही. ते मनाने किती चांगले आहेत हे ओळखून येशू त्यांच्याशी धीराने वागला. त्याने त्यांना पदाच्या किंवा प्रतिष्ठेच्या मागे लागण्याऐवजी नेहमी नम्र राहायला आणि एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं.
आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?
१५. याकोब, योहान आणि इतर प्रेषितांच्या बाबतीत जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१५ याकोब आणि योहान यांच्या बाबतीत जे घडलं त्यावरून आज आपण बरंच काही शिकू शकतो. देवाच्या राज्यात त्यांना महत्त्वाचं स्थान मिळावं अशी त्यांनी विनंती करणं मुळातच चुकीचं होतं. पण इतर प्रेषित त्यांच्याशी ज्या प्रकारे वागले तेही चुकीचंच होतं. कारण त्यांच्या तशा वागण्यामुळे त्यांच्यातले शांतीचे संबंध काही काळासाठी का होईना बिघडले. पण येशू आपल्या सगळ्याच शिष्यांशी खूप प्रेमाने आणि धीराने वागला. यावरून आपण काय शिकतो? हेच की, इतर जण कसं वागतात हे महत्त्वाचं असलं, तरी त्यांच्या चुका आणि कमतरता पाहून आपण त्यांच्याशी कसं वागतो हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या भावामुळे किंवा बहिणीमुळे आपलं मन दुखावलं असेल तर आपण स्वतःला विचारू शकतो: ‘तो ज्या प्रकारे वागला त्याचा मी स्वतःला इतका त्रास का करून घेतो? माझ्यातच काहीतरी कमी आहे का, आणि मला स्वतःला त्यावर काम करायची गरज आहे का? ज्या भावाने किंवा बहिणीने माझं मन दुखावलंय ती एखाद्या वाईट परिस्थितीतून चालली आहे का? रागवण्याचं योग्य कारण असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून मला निःस्वार्थ प्रेम कसं दाखवता येईल?’ आपण जितकं जास्त इतरांशी प्रेमाने वागू तितकं जास्त दिसून येईल की आपण येशूचे खरे शिष्य आहोत.
१६. येशूच्या उदाहरणातून आपण आणखी काय शिकतो?
१६ येशूच्या उदाहरणातून आपण हेही शिकतो, की आपण आपल्या भाऊबहिणींना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २०:५) हे खरंय की आपण येशूसारखं इतरांची मनं ओळखू शकत नाही. पण आपले भाऊबहीण आपल्याला दुखावतात तेव्हा आपण त्यांच्याशी धीराने वागू शकतो. (इफिस. ४:१, २; १ पेत्र ३:८) आपण जर त्यांना जवळून ओळखायचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी धीराने वागायला आपल्याला सोपं जाईल. याचं एक उदाहरण आता आपण पाहू.
१७. एका विभागीय पर्यवेक्षकांनी एका भावाला चांगल्या प्रकारे ओळखल्यामुळे काय झालं?
१७ पूर्व आफ्रिकेत सेवा करणारे एक विभागीय पर्यवेक्षक मंडळीतल्या एका भावाला भेटले. सुरुवातीला त्यांना तो जरासा कठोर स्वभावाचा वाटला. मग या विभागीय पर्यवेक्षकांनी काय केलं? ते म्हणतात: “त्याला टाळण्याऐवजी मी त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून घ्यायचं ठरवलं.” यामुळे असं झालं, की त्यांना त्या भावाबद्दल अशा बऱ्याच गोष्टी समजल्या ज्यांमुळे त्याचा स्वभाव तसा झाला होता. ते विभागीय पर्यवेक्षक पुढे म्हणतात: “स्वतःमध्ये बदल करण्यासाठी त्याने किती संघर्ष केला आणि आपल्या स्वभावात किती बदल केला हे जेव्हा मला समजलं, तेव्हा त्याच्याबद्दल मला कौतुकच वाटलं. आणि आम्ही चांगले मित्र बनलो.” खरंच, आपल्या भाऊबहिणींना आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्याशी प्रेमाने वागणं आपल्याला सोपं जातं.
१८. कोणी आपलं मन दुखावलं असेल तर आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? (नीतिवचनं २६:२०)
१८ पण ज्या भावाने किंवा बहिणीने आपलं मन दुखावलंय त्यांच्याशी आपल्याला बोलायची गरज आहे असं काही वेळा आपल्याला वाटेल. पण त्यांच्याशी बोलण्याआधी आपण या प्रश्नांवर विचार केला पाहिजे: ‘जे काही घडलं त्याबद्दल मला सगळं काही माहीत आहे का?’ (नीति. १८:१३) ‘तो नकळत माझ्याशी असा वागला असेल का?’ (उप. ७:२०) ‘माझ्याकडूनही कधी अशी चूक झाली आहे का?’ (उप. ७:२१, २२) ‘मी जर त्याच्याशी जाऊन बोललो तर विषय मिटण्याऐवजी आणखीनच जास्त वाढेल का?’ (नीतिवचनं २६:२० वाचा.) या प्रश्नांवर विचार केल्यामुळे त्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल आपलं प्रेम वाढेल आणि त्याने केलेल्या चुकीकडे दुर्लक्ष करून त्याला माफ करायला आपण प्रवृत्त होऊ.
१९. तुम्ही काय करायचा निर्धार केला आहे?
१९ जगभरातले यहोवाचे साक्षीदार एकमेकांवर प्रेम करून दाखवून देत आहेत, की ते येशूचे खरे शिष्य आहेत. आणि आपल्यापैकी प्रत्येक जण भाऊबहिणींच्या कमतरता दिसत असूनही त्यांच्यावर निःस्वार्थ प्रेम करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने येशूचे शिष्य आहोत हे दाखवत असतो. आपण असं निःस्वार्थ प्रेम दाखवतो तेव्हा आपण इतरांना खरा धर्म ओळखायला आणि आपल्यासोबत प्रेमाचा देव यहोवा याची उपासना करायला मदत करत असतो. तेव्हा, येशूच्या शिष्यांचं ओळखचिन्ह असलेलं ‘खरं प्रेम’ दाखवायचा आपण प्रत्येक जण निर्धार करू या.
गीत १७ निःस्वार्थ प्रेम दाखवू या
a आपल्यातलं खरं प्रेम पाहून बरेच लोक सत्याकडे आकर्षित होतात. पण आपण काही परिपूर्ण नाही. त्यामुळे एखाद्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर प्रेमाने वागणं आपल्याला कधीकधी कठीण जाऊ शकतं. आपल्यातलं प्रेम इतकं महत्त्वाचं का आहे आणि इतरांच्या चुका आपल्याला दिसतात तेव्हा आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो हे या लेखात आपण पाहणार आहोत.
c वडिलांनी हाताळल्या पाहिजेत अशा गंभीर पापांबद्दल, जसं की १ करिंथकर ६:९, १० यांत उल्लेख केलेल्या गंभीर पापांबद्दल या लेखात सांगण्यात आलेलं नाही.
d एका पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, या घटनेच्या बऱ्याच काळानंतर एका रब्बीने असं म्हटलं: “आज जगात अब्राहामसारखे नीतिमान असणारे निदान ३० लोक तरी असतीलच. तसं असेल तर त्या ३० पैकी मी आणि माझा मुलगा तर असेलच असेल. जर दहा असतील तर त्यांच्यापैकी मी आणि माझा मुलगा तर असणारच. आणि जर पाच असतील तरीही त्यात मी आणि माझा मुलगा आहोतच. जर नुसते दोन असतील तर ते मी आणि माझा मुलगाच आहोत. आणि जर फक्त एकच असेल तर तो दुसरा कोणी नसून मीच आहे.”