वाचकांचे प्रश्न
मी जर रूथशी लग्न केलं तर माझ्याच वारशाचं “नुकसान” होईल, असं “त्या” माणसाने का म्हटलं? (रूथ ४:१, ६)
बायबल काळात एखादा माणूस मरण पावला आणि त्याला जर मूल नसलं, तर काही प्रश्न उपस्थित व्हायचे. जसं की, त्याच्या मालकीच्या जमिनीचं काय होईल? त्याच्या घराण्याचं नाव कायमचंच मिटेल का? अशा प्रश्नांची उत्तरं मोशेच्या नियमशास्त्रात देण्यात आली होती.
एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या भावाला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाइकाला ती जमीन वारशाने मिळायची. किंवा एखादा माणूस गरीब असल्यामुळे त्याला त्याची जमीन विकावी लागली तर त्याचा भाऊ किंवा त्याचा जवळचा नातेवाईक ती जमीन सोडवू शकत होता किंवा परत विकत घेऊ शकत होता.—लेवी. २५:२३-२८; गण. २७:८-११.
पण यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या घराण्याचं नाव कसं टिकून राहणार होतं? अशा वेळी मरण पावलेल्या व्यक्तीची पत्नी आपल्या दिराशी लग्न करून आपल्या पतीच्या घराण्याचं नाव टिकवून ठेवू शकत होती. हीच गोष्ट रूथच्या बाबतीतही होती. अशा प्रकारे एक व्यक्ती आपल्या भावाच्या विधवा पत्नीसोबत लग्न करून वारस देऊ शकत होता. आणि अशा प्रकारे मरण पावलेल्या व्यक्तीच्या घराण्याचं नाव पुढे चालायचं आणि त्याच्या जमिनीलाही वारस मिळायचा. या प्रेमळ तरतुदीमुळे विधवा स्त्रियांचंही भलं व्हायचं.—अनु. २५:५-७; मत्त. २२:२३-२८.
नामीचं उदाहरण घ्या. तिचं लग्न अलीमलेख नावाच्या एका व्यक्तीशी झालं होतं. जेव्हा त्याचा आणि त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा तिची काळजी घ्यायला कोणीच उरलं नव्हतं. (रूथ १:१-५) पण नामी जेव्हा रूथसोबत म्हणजे आपल्या सुनेसोबत यहूदाला आली, तेव्हा तिने रूथला बवाजकडे जाऊन, त्याने आपली जमीन सोडवावी अशी विनंती करायला सांगितली. बवाज हा अलीमलेखचा जवळचा नातेवाईक होता. (रूथ २:१, १९, २०; ३:१-४) पण बवाजच्या असं लक्षात आलं, की त्याच्यापेक्षाही एक जवळचा नातेवाईक आहे ज्याला नामीची जमीन सोडवण्याचा हक्क आहे. बायबलमध्ये त्या माणसाला ‘तो माणूस’ असं म्हटलं आहे.—रूथ ३:९, १२, १३.
सुरवातीला, “तो” माणूस या बाबतीत मदत करायला तयार होता. (रूथ ४:१-४) जमीन सोडवण्यासाठी त्याला जरी स्वतःचे काही पैसे घालावे लागणार होते, तरी त्याच्या असं लक्षात आलं, की नामी म्हातारी असल्यामुळे अलीमलेखच्या जमिनीला वारस मिळावा म्हणून ती मुलाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे नामीशी लग्न केलं तर तिची जमीनही “त्या” माणसाच्या मालमत्तेमध्येच समाविष्ट होणार होती. आणि त्याच्यासाठी ही गोष्ट चांगलीच असणार होती.
पण जेव्हा त्या माणसाच्या लक्षात आलं, की त्याला नामीशी नाही तर रूथशी लग्न करावं लागेल तेव्हा तो म्हणाला: “मी ती जमीन सोडवू शकत नाही. कारण, मी जर तसं केलं तर कदाचित माझंच [माझ्या वारशाचं] नुकसान होईल.” (रूथ ४:५, ६) त्या माणसाने आपला विचार का बदलला?
जर त्या माणसाने किंवा दुसऱ्या कोणत्या माणसाने रूथशी लग्न केलं असतं आणि तिला जर मुलगा झाला असता तर त्या मुलाला अलीमलेखची जमीन वारशाने मिळाली असती. पण यामुळे “त्या” माणसाच्या “वारशाचं” कसं काय “नुकसान” झालं असतं? याबद्दल बायबलमध्ये काहीच सांगितलेलं नाही, पण पुढे दिलेल्या काही मार्गांनी त्याचं नुकसान होऊ शकलं असतं.
पहिलं, नामीची जमीन विकत घेण्यासाठी त्याला जो खर्च करावा लागणार होता तो वाया गेला असता, कारण अलीमलेखची जमीन शेवटी त्याला नाही, तर रूथला झालेल्या मुलाला मिळाली असती.
दुसरं, नामी आणि रूथला सांभाळण्याची, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारीही त्याच्यावर पडली असती.
तिसरं, जर रूथला “त्या” माणसापासून आणखी मुलं झाली असती, तर त्याच्या आधीच्या मुलांसोबत रूथच्या मुलांनाही जमिनीचा वाटा द्यावा लागला असता.
चौथं, त्या माणसाला त्याची स्वतःची मुलं नसती, तर त्याच्या आणि अलीमलेखच्या जमिनीवर रूथच्या मुलाचा हक्क असता. आणि यामुळे त्याचं नाही, तर अलीमलेखचं नाव पुढे चालवणाऱ्या मुलाला त्या माणसाची सगळी जमीन मिळाली असती. म्हणून, ‘तो’ माणूस नामीला मदत करून आपला वारसा धोक्यात घालायला तयार नव्हता. त्याऐवजी, त्याच्यानंतर सोडवण्याचा हक्क ज्याला होता, त्या बवाजला त्याने ही जबाबदारी घेऊ दिली. आणि बवाजनेही ती जबाबदारी घेतली, कारण त्याला “मृत माणसाच्या वारशाच्या जमिनीवर त्याचं नाव कायम” ठेवायचं होतं.—रूथ ४:१०.
बायबलमध्ये सांगितलेला ‘तो’ माणूस खूप स्वार्थी होता. त्याला स्वतःच्या नावाची आणि आपल्या वारशाच्या जमिनीचीच जास्त काळजी होती. पण झालं उलटंच, त्याचं नाव कायम टिकण्याऐवजी ते इतिहासातून कायमचं नाहीसं झालं. शिवाय, मसीहाचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा पूर्वज बनायचा जो खास बहुमान बवाजला मिळाला, तोही त्याने गमावला. खरंच, स्वतःच्या स्वार्थापायी गरजू व्यक्तीला मदत करायची संधी नाकारून, “त्या” माणसाने स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलं!—मत्त. १:५; लूक ३:२३, ३२.