व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ११

गीत १२९ शेवटपर्यंत धीर धरू

आपण कितीही निराश झालो तरी टिकून राहू शकतो

आपण कितीही निराश झालो तरी टिकून राहू शकतो

“माझ्या नावासाठी तू टिकून राहिला आहेस.”​—प्रकटी. २:३.

या लेखात:

जीवनात आपण निराश झालो तरी आपण यहोवाच्या सेवेत कसं टिकून राहू शकतो ते पाहा.

१. यहोवाच्या संघटनेचा भाग असल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळतात?

 या शेवटच्या कठीण दिवसांत जगत असताना यहोवाच्या संघटनेचा भाग असणं हा खरंच एक आशीर्वाद आहे. आज जगाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पण यहोवाने आपल्याला भाऊबहिणींचं एक असं कुटुंब दिलंय, जे एकतेने त्याची उपासना करत आहे. (स्तो. १३३:१) तसंच कुटुंबात पती-पत्नी आणि मुलं कसं आनंदी राहू शकतात, याबद्दलही त्याने आपल्याला सांगितलंय. (इफिस. ५:३३–६:१) याशिवाय, खरी शांती अनुभवण्यासाठी तो आपल्याला समज आणि बुद्धी देतो.

२. आपल्याला काय करायची गरज आहे आणि का?

यहोवाच्या संघटनेत असल्यामुळे आपल्याला बरेच आशीर्वाद मिळत असले, तरी त्याला विश्‍वासू राहण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. का बरं? कारण इतरांच्या अपरिपूर्ण स्वभावामुळे ते असं काहीतरी बोलून जातील किंवा असं काहीतरी करतील, ज्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकतं. शिवाय आपल्या स्वतःच्या चुकांमुळेसुद्धा आपण निराश होऊ शकतो; खासकरून त्या चुका आपल्या हातून पुन्हा पुन्हा होत असतील तर. त्यामुळे (१) एखादा भाऊ किंवा बहीण आपलं मन दुःखावते, (२) आपला विवाहसोबती आपल्याला निराश करतो आणि (३) स्वतःच्याच चुकांमुळे आपण निराश होतो, तेव्हा आपण यहोवाच्या सेवेत टिकून राहिलं पाहिजे. या प्रत्येक परिस्थितीबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. त्यासोबतच, बायबल काळातल्या काही विश्‍वासू सेवकांकडून आपण काय शिकू शकतो हेसुद्धा पाहणार आहोत.

एखादा भाऊ किंवा बहीण तुमचं मन दुखावते तेव्हा यहोवाच्या सेवेत टिकून राहा

३. यहोवाच्या लोकांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो?

समस्या.  काही भाऊबहिणींचे स्वभाव आपल्याला खटकत असतील, किंवा काही जण आपल्याशी अविचारीपणे काहीतरी बोलतील. तसंच मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍याकडूनसुद्धा काही चुका होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींमुळे काहींना, ‘ही खरंच देवाची संघटना आहे का?’ अशी शंका वाटेल. म्हणून भाऊबहिणींसोबत “खांद्याला खांदा” लावून देवाची उपासना करण्याऐवजी, ज्यांनी त्यांचं मन दुःखावलंय त्यांच्यासोबत ते बोलायचं बंद करतील. इतकंच काय, तर सभांना जायचंही ते बंद करतील. (सफ. ३:९) पण असं करणं शहाणपणाचं असेल का? अशाच समस्यांमधून गेलेल्या बायबल काळातल्या एका व्यक्‍तीकडून आपण काय शिकू शकतो ते आता पाहू या.

४. प्रेषित पौलला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं?

बायबलमधलं उदाहरण.  प्रेषित पौलला माहीत होतं, की आपले भाऊबहीण अपरिपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, तो जेव्हा मंडळीत येऊ लागला तेव्हा बऱ्‍याच जणांनी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतले होते. (प्रे. कार्यं ९:२६) नंतर, त्याचं नाव खराब करण्यासाठी काही जण त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल वाईट बोलू लागले. (२ करिंथ. १०:१०) तसंच पौलने एका जबाबदार भावाला चुकीचा निर्णय घेताना पाहिलं. त्यामुळे कदाचित इतर जण अडखळले असतील. (गलती. २:११, १२) आणि पौलसोबत काम करणाऱ्‍या मार्कनेसुद्धा त्याला खूप निराश केलं होतं. (प्रे. कार्यं १५:३७, ३८) यांपैकी कोणत्याही एका कारणामुळे पौल या भाऊबहिणींपासून दूर राहू शकला असता. पण त्याने असं काही केलं नाही. उलट त्याने भाऊबहिणींबद्दल चांगला विचार केला आणि यहोवाची सेवा करत राहिला. मग पौलला टिकून राहायला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली?

५. पौलला आपल्या भाऊबहिणींबद्दल चांगला दृष्टिकोन ठेवायला कशामुळे मदत झाली? (कलस्सैकर ३:१३, १४) (चित्रसुद्धा पाहा.)

पौलचं भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. या प्रेमामुळेच अपरिपूर्णतेऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांवर त्याला लक्ष देता आलं. याच प्रेमामुळे कलस्सैकर ३:१३, १४ (वाचा.) मध्ये त्याने स्वतः जे लिहिलं त्याप्रमाणे वागायला त्याला मदत झाली. मार्कच्या बाबतीत त्याने हे वचन कसं लागू केलं त्याचा विचार करा. त्याच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान मार्क त्याला सोडून गेला, तरी पौल त्याच्याबद्दल मनात राग धरून राहिला नाही. नंतर कलस्सैकरांना पौलने जे पत्र लिहिलं त्यात त्याने एक चांगला सहायक म्हणून मार्कची प्रशंसा केली आणि त्याच्याकडून त्याला “खूप सांत्वन” मिळालं असं लिहिलं. (कलस्सै. ४:१०, ११) तसंच, रोममध्ये बंदी असताना पौलने मार्कला त्याच्याकडे आणण्यासाठी खास विनंती केली. (२ तीम. ४:११) यावरून स्पष्टपणे दिसतं, की विश्‍वासातल्या आपल्या भावांबद्दल पौलने आशा सोडली नव्हती. मग पौलकडून आपल्याला काय शिकायला मिळतं?

पौल, बर्णबा आणि मार्क यांच्यात मदभेद होते. पण पौल यामुळे निराश झाला नाही, उलट नंतर त्याने मार्कसोबत आनंदाने सेवा केली (परिच्छेद ५ पाहा)


६-७. आपल्या भाऊबहिणीमध्ये अपरिपूर्णता असली तरी आपण त्यांच्यावर प्रेम कसं करत राहू शकतो? (१ योहान ४:७)

धडा.  यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण आपल्या भाऊबहिणींवर मनापासून प्रेम करत राहावं. (१ योहान ४:७ वाचा.) समजा एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याला वाईट वाटेल असं आपल्याशी वागले असतील, तर ते मुद्दामहून वागले, असा विचार आपण नाही केला पाहिजे. उलट, ते नेहमी यहोवाच्या तत्त्वांप्रमाणेच वागायचा प्रयत्न करतात, पण या वेळी चुकून त्यांच्याकडून असं घडलं असेल असा विचार आपण नेहमी केला पाहिजे. (नीति. १२:१८) आपल्या विश्‍वासू सेवकांमध्ये कमतरता असूनसुद्धा देव त्यांच्यावर प्रेम करतो. ते करत असलेल्या चुकांमुळे तो त्यांच्याशी आपलं नातं तोडत नाही किंवा मनात राग धरून बसत नाही. (स्तो. १०३:९) म्हणूनच नेहमी माफ करणाऱ्‍या आपल्या पित्याचं अनुकरण करणं किती महत्त्वाचं आहे!​—इफिस. ४:३२–५:१.

हे लक्षात घ्या, की अंत जसजसा जवळ येतोय तसतसं आपल्याला आपल्या भाऊबहिणींसोबतचं नातं आणखी मजबूत करावं लागेल. आपला छळ आणखी वाढेल ही अपेक्षा आपण करू शकतो. कदाचित आपल्याला आपल्या विश्‍वासासाठी तुरुंगातसुद्धा टाकलं जाईल. आणि जर असं झालं, तर कधी नव्हे इतकी आपल्याला आपल्या भाऊबहिणींची गरज असेल. (नीति. १७:१७) स्पेनमध्ये वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या जोसेफसोबत a काय झालं याचा विचार करा. त्यांना आणि त्यांच्यासोबत इतर भावांना त्यांच्या निष्पक्षतेमुळे जेलमध्ये टाकण्यात आलं. ते म्हणतात: “जेलमध्ये आम्ही सगळे सोबत होतो आणि त्यामुळे आम्हाला एकांत मिळणं शक्य नव्हतं. आणि यामुळे एखाद्या भावाच्या स्वभावामुळे चिडचिड होण्याची शक्यता जास्त होती. असं असलं तरी आम्ही एकमेकांशी जुळवून घेतलं आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा केली. यामुळे आम्हाला एकतेने राहता आलं आणि यहोवाची उपासना न करणाऱ्‍या जेलमधल्या इतर लोकांपासूनसुद्धा आमचं संरक्षण झालं. एकदा माझ्या हाताला दुखापत झाल्यामुळे प्लास्टर लावलं होत. त्यामुळे मी माझ्या गोष्टी स्वतःहून करू शकत नव्हतो. पण एका भावाने माझे कपडे धुतले आणि माझी काळजी घेतली. ज्या वेळी मला प्रेमाची आणि मदतीची सगळ्यात जास्त गरज होती त्याच वेळी मला ते प्रेम अनुभवता आलं.” खरंच, आपण आत्ताच एकमेकांमधले मतभेद सोडवण्याची ही किती चांगली कारणं आहेत!

तुमचा जोडीदार तुम्हाला निराश करतो तेव्हा टिकून राहा

८. लग्न झालेल्या लोकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?

समस्या.  विवाहात समस्या या असतातच. बायबल स्पष्टपणे सांगतं, की लग्न झालेल्या लोकांना “शारीरिक दुःखं सहन करावी लागतील.” (१ करिंथ. ७:२८) का बरं? कारण लग्न हे वेगवेगळ्या स्वभावाच्या, आवडी-निवडींच्या दोन अपरिपूर्ण लोकांना जवळ आणतं. विवाहसोबती वेगवेगळ्या संस्कृतीतून असतील किंवा वेगवेगळ्या वातावरणात ते लहानाचे मोठे झाले असतील. किंवा कदाचित त्यांच्या काही सवयी ज्या लग्नाच्या आधी दिसत नव्हत्या त्या लग्नानंतर हळूहळू दिसू लागतील. यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे विवाहात वादविवाद निर्माण होऊ शकतात. आपलं कुठे चुकतंय याचा विचार करण्याऐवजी किंवा समस्या एकत्र मिळून सोडवण्याऐवजी विवाहसोबती एकमेकांना दोष देत बसतात. इतकंच काय, तर यावरचा एकमेव तोडगा म्हणजे वेगळं होणं किंवा घटस्फोट घेणं असं त्यांना वाटतं. पण असं केल्यामुळे समस्या सुटेल का? b आता आपण बायबलमधल्या एका स्त्रीबद्दल जाणून घेऊ या. तिच्या पतीमुळे तिचं जगणं कठीण झालं होत. पण तरीसुद्धा ती यहोवाला विश्‍वासू राहिली.

९. अबीगईलपुढे कोणती समस्या होती?

बायबलमधलं उदाहरण.  अबीगईलचं लग्न नाबालशी झालं होतं. बायबल म्हणतं की तो कठोर होता आणि सगळ्यांशी वाईट वागायचा. (१ शमु. २५:३) अशा माणसासोबत आयुष्य काढणं अबीगईलला कठीण गेलं असेल. मग तिच्या नवऱ्‍यापासून वेगळं व्हायची संधी अबीगईलकडे होती का? जेव्हा इस्राएलचा भावी राजा दावीद आपल्या आणि आपल्या माणसांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी नाबालच्या जीवावर उठला होता तेव्हा तिच्याकडे ही संधी होती. (१ शमु. २५:९-१३) दावीदला जे करायचं आहे ते त्याला करू देऊन अबीगईल नाबालच्या हातून सुटली असती. पण तिने असं काहीही केलं नाही. उलट तिने दावीदला अडवलं आणि नाबालचा जीव वाचवण्यासाठी त्याचं मन वळवलं. (१ शमु. २५:२३-२७) कोणत्या गोष्टीमुळे तिने असं केलं असेल?

१०. विवाहात टिकून राहायला कोणत्या गोष्टीमुळे अबीगईलला मदत झाली असेल?

१० अबीगईलचं यहोवावर प्रेम होतं आणि विवाहासाठी असलेल्या त्याच्या स्तरांबद्दल तिच्या मनात आदर होता. यहोवाने जेव्हा पहिल्या विवाहाची सुरुवात केली तेव्हा त्याने आदाम आणि हव्वाला काय म्हटलं हे तिला नक्कीच माहीत असेल. (उत्प. २:२४) अबीगईलला माहीत होतं, की विवाह यहोवाच्या नजरेत पवित्र आहे. तिला देवाला खूश करायचं होतं. आणि यामुळेच तिच्या घराण्याला आणि तिच्या पतीला वाचवण्यासाठी तिला जे शक्य होतं ते सगळं तिने केलं. दावीदने नाबालला मारू नये म्हणून तिने पटकन पाऊल उचललं. इतकंच काय तर ज्या गोष्टी तिने केल्या नाहीत त्याबद्दल माफी मागायलाही ती तयार होती. अबीगईलचा हा धाडसी आणि निःस्वार्थ स्वभाव पाहून यहोवा नक्कीच तिच्यावर खूश झाला असेल! मग पती आणि पत्नी अबीगईलच्या उदाहरणातून काय शिकू शकतात?

११. (क) पती-पत्नीकडून यहोवा काय अपेक्षा करतो? (इफिसकर ५:३३) (ख) कारमेनने आपला विवाह वाचवण्यासाठी जे केलं त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (चित्रसुद्धा पाहा.)

११ धडा.  आपल्या विवाहजोडीदारासोबत राहणं कठीण होत असलं तरी, यहोवाची अशी इच्छा आहे की पती-पत्नीने विवाहाच्या व्यवस्थेचा आदर करावा. जेव्हा पती-पत्नी समस्या सोडवण्यासाठी मेहनत घेतात आणि एकमेकांना निःस्वार्थ प्रेम आणि आदर दाखवतात, तेव्हा यहोवाला किती आनंद होत असेल! (इफिसकर ५:३३ वाचा.) कारमेन नावाच्या बहिणीच्या उदाहरणाचा विचार करा. तिच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर ती यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागली आणि मग तिने बाप्तिस्माही घेतला. आपल्या पतीबद्दल ती सांगते: “माझा हा निर्णय त्यांना अजिबात आवडला नाही. मी यहोवाला वेळ देत आहे या गोष्टीची त्यांना खूप चीड यायची. ते माझा अपमान करायचे आणि मला सोडून जायची धमकी द्यायचे.” असं असलं तरी कारमेनने हार मानली नाही. जवळजवळ ५० वर्षं तिने तिचा विवाह टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेतली आणि तिच्या पतीला प्रेम आणि आदर दाखवत राहिली. ती म्हणते: “जसजशी वर्षं सरत गेली तसतसं ह्‍यांना नेमकं कसं वाटतंय हे समजून घ्यायला आणि त्यांच्याशी आणखी प्रेमाने बोलायला मी शिकले. यहोवाच्या नजरेत विवाह पवित्र आहे हे माहीत असल्यामुळे माझा विवाह टिकवून ठेवण्यासाठी मला जे शक्य होतं ते सगळं मी केलं. माझं यहोवावर प्रेम होतं आणि त्यामुळे मी माझा विवाह टिकवून ठेवू शकले.” c जेव्हा तुमच्या विवाहात समस्या येतात तेव्हा तुम्ही हा भरवसा ठेवू शकता, की विवाह टिकवून ठेवण्यासाठी यहोवा तुम्हाला मदत करेल आणि तो नेहमी तुम्हाला साथ देईल.

अबीगईल आपल्या घराण्याला वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते करायला तयार होती. यावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं? (परिच्छेद ११ पाहा)


तुम्ही स्वतःच्या चुकांमुळे निराश होता तेव्हा टिकून राहा

१२. आपल्या हातून एखादं गंभीर पाप घडतं तेव्हा आपल्यासमोर कोणती समस्या येऊ शकते?

१२ समस्या.  जेव्हा आपल्या हातून एखादं गंभीर पाप होतं, तेव्हा आपण खूप निराश होऊन जातो. बायबल म्हणतं की आपल्या पापांमुळे आपण “दुःखी आणि हताश” होऊन जाऊ शकतो. (स्तो. ५१:१७) मंडळीत सहायक सेवक म्हणून सेवा करण्यासाठी पात्र ठरायला रॉबर्ट नावाच्या एका भावाने बरीच वर्षं मेहनत केली होती. पण तो एक गंभीर पाप करून बसला आणि त्यामुळे त्याला जाणवलं, की त्याने यहोवाचा विश्‍वासघात केलाय. त्याने म्हटलं: “माझा विवेक मला दोष देऊ लागला आणि दोषीपणाचा हा भार मला सहन करता येत नव्हता. त्यानंतर माझंच मन मला खाऊ लागलं. मी रडत, हुंदके देत यहोवाला प्रार्थना केली होती. त्या वेळी मला वाटत होतं, की आता यहोवा माझी प्रार्थना कधीच ऐकणार नाही. आणि तो का म्हणून माझं ऐकेल? मी तर त्याला निराश केलं होतं.” आपल्या हातून एखादं गंभीर पाप होतं, तेव्हा आपणसुद्धा खूप निराश होऊ शकतो. आपलं हताश मन आपल्याला असं पटवून द्यायचा प्रयत्न करेल, की यहोवाने आपल्याला सोडून दिलंय. (स्तो. ३८:४) तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर बायबल काळातल्या अशाच एका विश्‍वासू सेवकाचं उदाहरण लक्षात घ्या ज्याच्या हातून एक गंभीर पाप घडलं होतं आणि तरी तो यहोवाच्या सेवेत टिकून राहिला होता.

१३. प्रेषित पेत्रने कोणत्या चुका केल्या आणि त्यामुळे तो कोणतं गंभीर पाप करून बसला?

१३ बायबलमधलं उदाहरण.  येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री प्रेषित पेत्रने एका पाठोपाठ एक बऱ्‍याच चुका केल्या आणि यामुळे तो एक गंभीर पाप करून बसला. सुरुवातीला, त्याने फाजील आत्मविश्‍वास दाखवला आणि सगळे प्रेषित येशूला सोडून गेले तरी तो त्याला विश्‍वासू राहील अशी स्वतःबद्दल बढाईसुद्धा मारली. (मार्क १४:२७-२९) नंतर, गेथशेमाने बागेत येशूने जागं राहायची आज्ञा देऊनसुद्धा तो पुन्हा-पुन्हा झोपी गेला. (मार्क १४:३२, ३७-४१) नंतर एक मोठा जमाव येशूला पकडून न्यायला आला तेव्हा पेत्र तिथून पळून गेला. (मार्क १४:५०) शेवटी, पेत्रने एक खूप मोठं पाप केलं. त्याने येशूला तीन वेळा नाकारलं. इतकंच काय तर आपण त्याला ओळखत नाही अशी खोटी शपथसुद्धा घेतली. (मार्क १४:६६-७१) नंतर जेव्हा पेत्रला कळलं, की आपण किती गंभीर पाप केलंय तेव्हा त्याने काय केलं? तो ढसाढसा रडला! कदाचित त्याचं मन त्याला खात असल्यामुळे तो आतून तुटून गेला होता. (मार्क १४:७२) काही तासानंतर जेव्हा येशूला मारून टाकण्यात आलं तेव्हा पेत्रला किती यातना झाल्या असतील याची कल्पना करा! आपण कशाच्याच लायकीचे नाही असं पेत्रला वाटलं असेल.

१४. कोणत्या गोष्टीमुळे पेत्रला यहोवाच्या सेवेत टिकून राहायला मदत झाली? (चित्र पाहा.)

१४ पेत्र बऱ्‍याच कारणांमुळे यहोवाच्या सेवेत टिकून राहू शकला. तो इतरांपासून दूर राहिला नाही, तर तो इतर शिष्यांकडे गेला आणि त्यांनी नक्कीच त्याला दिलासा दिला असेल. (लूक २४:३३) यासोबतच पुनरुत्थान झाल्यानंतर येशू पेत्रला भेटला. त्यानेसुद्धा नक्कीच पेत्रला प्रोत्साहन दिलं असेल. (लूक २४:३४; १ करिंथ. १५:५) नंतर पेत्रच्या चुका दाखवत बसण्याऐवजी येशूने आपल्या मित्राला सांगितलं, की त्याला नंतर मोठमोठ्या जबाबदाऱ्‍या मिळणार आहेत. (योहा. २१:१५-१७) पेत्रला माहीत होतं की त्याच्या हातून एक गंभीर पाप झालंय, पण तरी त्याने हार मानली नाही. कारण त्याला या गोष्टीची पक्की खातरी होती, की येशूने त्याच्याबद्दल आशा सोडलेली नाही. त्यासोबतच इतर शिष्यांनीही त्याला साथ द्यायचं सोडलं नाही. मग पेत्रच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

योहान २१:१५-१७ मधून समजतं, की येशूने पेत्रबद्दल आशा सोडली नाही, यामुळे पेत्रला यहोवाच्या सेवेत टिकून राहायला मदत झाली (परिच्छेद १४ पाहा)


१५. आपल्याला कशाची खातरी असावी असं यहोवाला वाटतं? (स्तोत्र ८६:५; रोमकर ८:३८, ३९) (चित्रसुद्धा पाहा.)

१५ धडा.  यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याला क्षमा करायला तयार आहे याची खातरी आपल्याला असावी असं त्याला वाटतं. (स्तोत्र ८६:५; रोमकर ८:३८, ३९ वाचा.) आपण जेव्हा पाप करतो, तेव्हा आपण स्वतःला दोष देतो. आणि असं वाटणं साहजिकच आहे. पण त्यामुळे आपण कोणाच्याही प्रेमाच्या किंवा माफीच्या लायकीचे नाही, असा विचार आपण नाही केला पाहिजे. याउलट, आपण लगेचच मदत घेतली पाहिजे. आधी उल्लेख केलेला रॉबर्ट म्हणतो: “मोहांचा प्रतिकार करण्यासाठी मी स्वतःवरच अवलंबून होतो. म्हणून मी पाप करून बसलो.” त्याच्या लक्षात आलं की त्याने वडिलांशी बोललं पाहिजे. याबद्दल तो म्हणतो: “जेव्हा मी वडिलांशी बोललो तेव्हा मला लगेचच त्यांच्याकडून यहोवाच्या प्रेमाची जाणीव झाली. वडिलांनी माझ्याबद्दल आशा सोडलेली नव्हती. यहोवाने मला सोडून दिलेलं नाही यावर विश्‍वास ठेवण्यासाठी त्यांनी मला मदत केली.” आपणसुद्धा यहोवाच्या अपार प्रेमाची खातरी ठेवू शकतो. तसंच आपण हीसुद्धा खातरी ठेवू शकतो, की जर आपण आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला, मिळालेली मदत स्वीकारली आणि आपण तीच चूक पुन्हा-पुन्हा केली नाही तर यहोवा आपल्याला क्षमा करेल. (१ योहा. १:८, ९) आणि याच खातरीमुळे आपल्या हातून चुका झाल्या तरी आपण यहोवाची सेवा करायचं सोडणार नाही.

तुम्हाला मदत करण्यासाठी वडील किती मेहनत घेत आहेत हे पाहून तुम्हाला कोणत्या गोष्टीची खातरी पटते? (परिच्छेद १५ पाहा)


१६. तुम्ही यहोवाच्या सेवेत टिकून राहायचा निश्‍चय का केला आहे?

१६ आपण या शेवटच्या कठीण दिवसांत यहोवाची सेवा करण्यासाठी जी मेहनत घेतोय त्याची तो मनापासून कदर करतो. निराश करणाऱ्‍या कितीही परिस्थिती आपल्यासमोर आल्या तरी यहोवाच्या मदतीने आपण त्याच्या सेवेत टिकून राहू शकतो.  भाऊबहिणींनी आपलं मन दुखावलं तरी आपण त्यांना क्षमा केली पाहिजे आणि त्यांच्यावरचं प्रेम वाढवत राहिलं पाहिजे. शिवाय, आपण आपल्या विवाहात आलेल्या समस्या सोडवायचा होता होईल तितका प्रयत्न करून आपण दाखवून दिलं पाहिजे की यहोवावर आपलं प्रेम आहे आणि त्याने केलेल्या विवाहाच्या व्यवस्थेचा आपल्याला आदर आहे. आणि जर आपल्या हातून एखादी गंभीर चूक झाली असेल तर आपण यहोवाची मदत घेतली पाहिजे. तसंच त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्याला क्षमा करायला तयार आहे याची खातरी ठेवली पाहिजे आणि पुढेही यहोवाची सेवा करत राहिली पाहिजे. यामुळे आपण याची खातरी ठेवू शकतो की जर आपण ‘चांगलं ते करत राहायचं सोडलं नाही’ तर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतील.​—गलती. ६:९.

आपण यहोवाच्या सेवेत कसं टिकून राहू शकतो?

  • एखादा भाऊ किंवा बहीण आपलं मन दुखावते तेव्हा . . .

  • आपल्या विवाहजोडीदारामुळे आपण निराश होतो तेव्हा . . .

  • स्वतःच्या चुकांमुळे आपण निराश होतो तेव्हा . . .

गीत १३९ नव्या जगी स्वतःला पहा!

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

b बायबल विवाहजोडीदारापासून विभक्‍त होण्याचं प्रोत्साहन देत नाही. आणि ते स्पष्टपणे सांगतं, की विभक्‍त झालेल्या दोन्ही जोडीदारांना पुन्हा लग्न करण्याचा हक्क नाही. पण विशिष्ट परिस्थितींमध्ये काही खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी विभक्‍त होण्याचा निर्णय घेतलाय. कायम जीवनाचा आनंद घ्या!  पुस्तकात काही विषयांवर स्पष्टीकरण यात असलेला “विवाह जोडीदारापासून विभक्‍त (वेगळं) होणं” हा मुद्दा क्र. ४ पाहा.

c याचं आणखी एक उदाहरण पाहण्यासाठी jw.org वर फसव्या शांतीला बळी पडू नका!​—डॅरल आणि डेबोरा फ्रिजींगर  हा व्हिडिओ पाहा.