व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ९

गीत ७५ “मी जाईन! मला पाठव!”

तुम्ही यहोवाला समर्पण करायला तयार आहात का?

तुम्ही यहोवाला समर्पण करायला तयार आहात का?

“यहोवाने माझ्यावर जे उपकार केले आहेत, त्या सर्वांच्या बदल्यात मी त्याला काय देऊ?”​—स्तो. ११६:१२.

या लेखात:

हा लेख तुम्हाला यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत करेल. त्यामुळे तुम्हाला आपलं जीवन समर्पित करावंसं आणि बाप्तिस्मा घ्यावासा वाटेल.

१-२. बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्‍तीने काय केलं पाहिजे?

 गेल्या पाच वर्षांत लाखो लोकांनी यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतलाय. त्यांच्यापैकी बरेच जण पहिल्या शतकातल्या तीमथ्यसारखं अगदी “बालपणापासून” सत्य शिकले होते. (२ तीम. ३:१४, १५) इतर काही जणांना त्यांच्या आयुष्यात खूप नंतर सत्य समजलं, तर काही जणांना अगदी त्यांच्या उतारवयात. अलीकडेच यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करणाऱ्‍या एका स्त्रीने तिच्या वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी बाप्तिस्मा घेतला!

तुम्ही कदाचित एक बायबल विद्यार्थी असाल किंवा एका साक्षीदार कुटुंबात वाढला असाल. पण तुम्ही बाप्तिस्म्याचा विचार केला आहे का? जर केला असेल तर हे एक चांगलं ध्येय आहे. पण बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला तुमचं जीवन यहोवाला समर्पित करावं लागेल. म्हणूनच हा लेख तुम्हाला, यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यात कोणकोणत्या गोष्टी सामील आहेत हे समजून घ्यायला मदत करेल. तसंच समर्पण करायची आणि बाप्तिस्मा घ्यायची तयारी केल्यानंतर, हे पाऊल उचलायला मागे-पुढे का पाहू नये हे समजून घ्यायलाही हा लेख तुम्हाला मदत करेल.

समर्पण म्हणजे काय?

३. बायबलमधून अशा काही लोकांची उदाहरणं द्या, जे यहोवाला समर्पित होते?

बायबलमध्ये यहोवाला समर्पित असण्याचा अर्थ एका खास उद्देशासाठी निवडलेलं असणं असा होतो. इस्राएल राष्ट्र हे यहोवाला समर्पित असलेलं राष्ट्र होतं. पण या राष्ट्रात असेही काही लोक होते जे यहोवाला एका खास मार्गाने समर्पित होते. जसं की, अहरोन एक पगडी घालायचा आणि या पगडीच्या समोरच्या बाजूला सोन्याची एक चकाकती पट्टी होती. ही पट्टी “समर्पणाचं पवित्र चिन्ह” होती. आणि त्यावरून इस्राएलचा महायाजक म्हणून त्याला एका खास मार्गाने सेवा करण्यासाठी निवडण्यात आलंय हे समजून यायचं. (लेवी. ८:९) तसंच, नाझीर म्हणून सेवा करणारे लोकसुद्धा यहोवाला एका खास मार्गाने समर्पित होते. ज्या हिब्रू शब्दाचं भाषांतर “नाझीर” असं करण्यात आलंय त्याचा अर्थ “वेगळा केलेला” किंवा “समर्पित केलेला” असा होतो. नाझीरांना मोशेच्या नियमशास्त्रात घालून दिलेल्या मर्यादांप्रमाणे जीवन जगावं लागायचं.​—गण. ६:२-८.

४. (क) तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित करता तेव्हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? (ख) स्वतःला ‘नाकारणं’ म्हणजे काय? (चित्रसुद्धा पाहा.)

जेव्हा तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित करता, तेव्हा तुम्ही येशूचे शिष्य बनण्याचा आणि आपल्या जीवनात देवाच्या इच्छेला सगळ्यात जास्त महत्त्व देण्याचा निश्‍चय करता. मग तुम्हाला जर समर्पण करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? येशूने म्हटलं: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं.” (मत्त. १६:२४) म्हणजे यहोवाचा समर्पित सेवक या नात्याने तुम्हाला देवाच्या इच्छेविरुद्ध असणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीला नाकारावं लागेल. (२ करिंथ. ५:१४, १५) यात अनैतिक लैंगिक कामांसारख्या ‘शरीराच्या कामांना’ नाकारणंसुद्धा सामील आहे. (गलती. ५:१९-२१; १ करिंथ. ६:१८) पण यामुळे तुम्हाला जीवन जगणं कठीण होईल असं वाटतं का? तुमचं जर यहोवावर प्रेम असेल आणि त्याचे नियम तुमच्या चांगल्यासाठीच आहेत, याची तुम्हाला खातरी असेल तर तुम्हाला नक्कीच असं वाटणार नाही. (स्तो. ११९:९७; यश. ४८:१७, १८) याबद्दल निकोलस नावाचे एक भाऊ म्हणतात: “तुम्ही यहोवाच्या स्तरांना कसं पाहता हे तुमच्यावर आहे. एकतर ते तुमच्यासाठी तुरुंगाच्या गजांसारखे असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हवं ते करता येणार नाही. किंवा ते सिंहाच्या पिंजऱ्‍याला असणाऱ्‍या गजांसारखे असू शकतात, ज्यामुळे सिंहापासून तुमचं संरक्षण होईल.”

तुम्हाला यहोवाचे स्तर जेलच्या गजांसारखे वाटतात का, ज्यांमुळे तुम्हाला हवं ते करता येणार नाही? की ते सिंहाच्या पिंजऱ्‍याला असलेल्या गजांसारखे वाटतात, ज्यांमुळे तुमचं संरक्षण होतं? (परिच्छेद ४ पाहा)


५. (क) तुम्ही यहोवाला समर्पण कसं करू शकता? (ख) समर्पण आणि बाप्तिस्मा यात काय फरक आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

तुम्ही यहोवाला समर्पण कसं करता? तुम्ही त्याला प्रार्थनेमध्ये असं वचन देता, की इथून पुढे तुम्ही फक्‍त त्याचीच उपासना कराल आणि त्याच्या इच्छेला तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्याल. म्हणजे तुम्ही जणू यहोवाला असं वचन देत असता, की तुम्ही त्याच्यावर ‘पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम कराल.’ (मार्क १२:३०) तुम्ही यहोवाला केलेलं हे समर्पण फक्‍त तुमच्यामध्ये आणि यहोवामध्ये असतं. याउलट बाप्तिस्मा हा सगळ्यांसमोर घेतला जातो. आणि त्यावरून लोकांना हे दिसून येतं, की तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित केलंय. तुम्ही यहोवाला दिलेलं समर्पणाचं वचन खूप गंभीर असल्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि यहोवासुद्धा तुमच्याकडून तीच अपेक्षा करतो.​—उप. ५:४, ५.

तुम्ही यहोवाला समर्पण करता, तेव्हा तुम्ही त्याला वचन देता की तुम्ही फक्‍त त्याचीच उपासना कराल आणि त्याच्या इच्छेला सगळ्यात जास्त महत्त्व द्याल (परिच्छेद ५ पाहा)


आपण यहोवाला समर्पण का केलं पाहिजे?

६. एक व्यक्‍ती समर्पणाचा निर्णय का घेते?

तुमच्या समर्पणाचं मुख्य कारण हे यहोवावर असलेलं तुमचं प्रेम आहे. पण हे प्रेम फक्‍त एक भावना नाही, तर “अचूक ज्ञान” आणि ‘पवित्र शक्‍तीद्वारे मिळणारी समज’ यांवर आधारलेलं हे प्रेम आहे. आणि या गोष्टींमुळेच तुमचं यहोवावर असलेलं प्रेम वाढत गेलं. (कलस्सै. १:९) बायबलचा अभ्यास करून तुम्हाला याची खातरी पटली, की (१) यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे, (२) बायबल हे त्याचं प्रेरित वचन आहे, आणि (३) त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या संघटनेचा वापर करतो.

७. यहोवाला समर्पण करण्याआधी आपण काय केलं पाहिजे?

जे यहोवाला समर्पण करतात त्यांना देवाच्या वचनातल्या मूलभूत शिकवणी माहीत असल्या पाहिजेत आणि त्यातल्या स्तरांप्रमाणे ते आपलं जीवन जगत असले पाहिजेत. तसंच ज्यांनी समर्पण केलंय त्यांनी आपल्या परिस्थितीप्रमाणे जमेल तितकं आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगत राहिलं पाहिजे. (मत्त. २८:१९, २०) अशा प्रकारे यहोवाबद्दलचं त्यांचं प्रेम वाढत गेलेलं असतं आणि फक्‍त त्याचीच इच्छा पूर्ण करायची त्यांची मनापासून इच्छा असते. तुमच्या बाबतीतही असंच आहे का? तुमच्या मनात जर अशा प्रकारचं प्रेम असेल, तर तुम्ही फक्‍त तुमच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीला किंवा तुमच्या आईवडिलांना खूश करायला समर्पण आणि बाप्तिस्म्याचं पाऊल उचलणार नाही. किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी समर्पण करत आहेत म्हणून तुम्ही करणार नाही.

८. कोणत्या गोष्टीवर विचार केल्यामुळे तुम्ही तुमचं जीवन यहोवाला समर्पित करता? (स्तोत्र ११६:१२-१४)

यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलंय त्याचा तुम्ही विचार करता, तेव्हा आपोआपच तुम्हाला तुमचं जीवन यहोवाला समर्पित करावसं वाटतं. (स्तोत्र ११६:१२-१४ वाचा.) बायबलमध्ये यहोवाला “प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान” देणारा असं म्हटलंय. (याको. १:१७) त्याने दिलेल्या देणग्यांमध्ये सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्याच्या मुलाचं, येशूचं खंडणी बलिदान. विचार करा, या खंडणीमुळेच आपल्याला त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडता येतं आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. (१ योहा. ४:९, १०, १९) त्याच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा असलेल्या या देणगीबद्दल आणि त्याने तुम्हाला दिलेल्या इतर आशीर्वादांबद्दल कदर दाखवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्याला आपलं जीवन समर्पित करणं. (अनु. १६:१७; २ करिंथ. ५:१५) याबद्दल जास्त माहिती कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातल्या धडा ४६ मुद्दा ४ मध्ये दिली आहे. त्यात तुम्ही देवाला काय द्याल?  या नावाचा तीन मिनिटांचा एक व्हिडिओसुद्धा आहे.

तुम्ही समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी तयार आहात का?

९. एखाद्याने दबावाखाली येऊन समर्पणाचं पाऊल का उचलू नये?

तुम्हाला कदाचित असं वाटेल, की आपण समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी अजून तयार नाही. कदाचित यहोवाच्या स्तरांनुसार तुम्ही तुमच्या जीवनात अजून बदल केले नसतील किंवा तुमचा विश्‍वास अजून मजबूत करायची गरज असेल. (कलस्सै. २:६, ७) प्रत्येक विद्यार्थ्याला प्रगती करायला सारखाच वेळ लागतो असं नाही; तसंच, सगळीच मुलं एकाच वयात समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी तयार होतात असंही नाही. म्हणून तुम्हाला कुठे प्रगती करायची गरज आहे ते ओळखा आणि जितकं करता येईल तितकं करायचा प्रयत्न करा. आणि असं करत असताना दुसऱ्‍यांसोबत स्वतःची तुलना करू नका.​—गलती. ६:४, ५.

१०. समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी तुम्ही तयार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता? (“ सत्यात वाढलेल्यांसाठी” ही चौकटसुद्धा पाहा.)

१० यहोवाला समर्पण करण्यासाठी आपण अजून तयार नाही असं जरी तुम्हाला वाटत असलं, तरी ही गोष्ट एक ध्येय म्हणून तुमच्या समोर नेहमी ठेवा. स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर यहोवाचा आशीर्वाद असावा म्हणून त्याला प्रार्थना करा. (फिलिप्पै. २:१३; ३:१६) तो तुमची प्रार्थना ऐकेल आणि त्याचं उत्तर देईल याची तुम्ही खातरी ठेवू शकता.​—१ योहा. ५:१४.

काही जण का कचरतात?

११. यहोवा आपल्याला विश्‍वासू राहायला कशी मदत करेल?

११ काही जण समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी तयार असतात, पण तरीसुद्धा हे पाऊल उचलायला ते कचरतात. कारण नंतर त्यांच्या हातून एखादी गंभीर चूक झाली आणि त्यांना बहिष्कृत केलं तर काय? असं त्यांना वाटतं. जर तुम्हालाही या गोष्टीची भीती वाटत असेल तर याची खातरी बाळगा, की त्याच्या “सेवकांना शोभेल असं वागून त्याला पूर्णपणे संतुष्ट” करायला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी यहोवा तुम्हाला पुरवेल. (कलस्सै. १:१०) तसंच योग्य ते करण्यासाठी तो तुम्हाला बळही देईल. त्याने बऱ्‍याच जणांना मदत पुरवून ही गोष्ट सिद्ध केली आहे. (१ करिंथ. १०:१३) यहोवा त्याच्या लोकांना त्याला विश्‍वासू राहायला मदत करतो. आणि हेसुद्धा एक कारण आहे ज्यामुळे ख्रिस्ती मंडळीतून खूप कमी लोक बहिष्कृत होतात.

१२. आपल्या हातून एखादी गंभीर चूक होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

१२ प्रत्येक अपरिपूर्ण माणूस मोहात पडू शकतो. (याको. १:१४) पण त्या मोहाला बळी पडायचं  की नाही हे तुमच्या हातात आहे. खरंतर, तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगणार हे पूर्णपणे तुमच्यावर  आहे. आपल्या इच्छांवर ताबा मिळवणं कठीण आहे असं कदाचित काही लोकांना वाटत असेल. पण तुम्ही वाईट इच्छांवर नियंत्रण मिळवायला नक्कीच शिकू शकता  आणि जरी तुमच्या मनात एखादा वाईट विचार आला तरी त्याप्रमाणे वागायचं तुम्ही टाळू शकता. म्हणून दररोज प्रार्थना करा, स्वतःला देवाच्या वचनाचा व्यक्‍तिगत अभ्यास करायची चांगली सवय लावा, सभांना उपस्थित राहा, आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगा. या गोष्टी नियमितपणे करत राहिल्यामुळे तुम्हाला तुमचं समर्पणाचं वचन पूर्ण करायला मदत होईल. आणि असं करायला यहोवा तुम्हाला मदत करेल हे कधीही विसरू नका.​—गलती. ५:१६.

१३. योसेफने आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?

१३ मोहात पडण्यासारखा एखादा प्रसंग आपल्यावर आला तर काय करायचं हे आपण आधीच  ठरवलं तर आपल्याला आपल्या समर्पणाच्या वचनानुसार जगायला सोपं जाईल. बायबलमध्ये अशी कित्येक लोकांची उदाहरणं आहेत जे अपरिपूर्ण असतानाही असं करू शकले. उदाहरणार्थ, पोटीफरची बायको योसेफला मोहात पाडायचा वारंवार प्रयत्न करत होती. पण अशा वेळी काय करायचं याबद्दल योसेफच्या मनात जराही शंका नव्हती. बायबल म्हणतं की त्याने तिला “नकार दिला” आणि म्हटलं: “इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?” (उत्प. ३९:८-१०) यावरून स्पष्ट कळतं की मोहाचा सामना करण्याआधीच  काय करायचं हे योसेफला माहीत होतं. त्यामुळे जेव्हा मोहाचा सामना करायची वेळ आली तेव्हा त्याला ते सोपं गेलं.

१४. आपण मोहाचा प्रतिकार करायला कसं शिकू शकतो?

१४ तुम्ही योसेफसारखाच निर्धार कसा करू शकता? मोहाचा सामना करण्यासारखी परिस्थिती येईल तेव्हा काय करायचं हे तुम्ही आत्ताच  ठरवू शकता. यहोवाला वीट आणणाऱ्‍या गोष्टींना लगेच ‘नाही’ म्हणायला शिका. इतकंच काय तर त्या गोष्टींवर विचार करायचंही टाळा. (स्तो. ९७:१०; ११९:१६५) अशा प्रकारे जेव्हा मोहाचा सामना करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही गोंधळात पडणार नाही. कारण अशा वेळी काय करायचं हे तुम्हाला आधीच माहीत असेल.

१५. एक व्यक्‍ती यहोवाचा “मनापासून शोध” घेत आहे हे कसं दाखवून देऊ शकते? (इब्री लोकांना ११:६)

१५ आपल्याला सत्य मिळालंय हे तुम्हाला माहीत असेल आणि यहोवाची मनापासून सेवा करायची तुमची इच्छा असेल. पण तरीसुद्धा असं काहीतरी असू शकतं जे तुम्हाला समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्यापासून रोखत असेल. अशा वेळी तुम्ही दावीद राजाच्या उदाहरणावर विचार करू शकता. तुम्ही यहोवाला अशी विनंती करू शकता: “हे देवा, मला तपासून पाहा आणि माझं मन ओळख. माझी पारख कर आणि माझ्या चिंता जाणून घे. चुकीच्या मार्गावर नेणारी एखादी गोष्ट तर माझ्यात नाही ना, हे पाहा आणि मला सर्वकाळाच्या मार्गावर चालव.” (स्तो. १३९:२३, २४) यहोवा “त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना” आशीर्वाद देतो. तुम्ही जर समर्पण आणि बाप्तिस्म्याचं पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर यावरून हेच दिसून येईल की तुम्ही यहोवाचा मनापासून शोध घेत आहात.​—इब्री लोकांना ११:६ वाचा.

यहोवाच्या आणखी जवळ जायचा प्रयत्न करत राहा

१६-१७. सत्यात वाढलेल्यांनाही यहोवा स्वतःकडे आकर्षित करतो हे आपण कशावरून म्हणू शकतो? (योहान ६:४४)

१६ येशूने म्हटलं की त्याच्या शिष्यांना यहोवाने स्वतःकडे आणलंय. (योहान ६:४४ वाचा.) ही गोष्ट किती जबरदस्त आहे आणि याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो याचा विचार करा. यहोवा ज्या व्यक्‍तीला स्वतःकडे आकर्षित करतो, तिच्यामध्ये काहीतरी खास पाहतो. तो त्यांना त्याची “खास प्रजा” किंवा “मौल्यवान संपत्ती” समजतो. (अनु. ७:६; तळटीप) तुमच्या बाबतीतही असंच आहे.

१७ कदाचित तुमचे आईवडील सत्यात असतील. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आईवडिलांमुळेच मी सत्यात आहे. असं असलं तरी बायबल म्हणतं: “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.” (याको. ४:८; १ इति. २८:९) जेव्हा तुम्ही  यहोवाच्या जवळ जाण्यासाठी पुढाकार घेता, तेव्हा तोही  तुमच्याजवळ येतो. तुम्ही फक्‍त एका गटाचा भाग आहात या दृष्टिकोनातून यहोवा तुमच्याकडे पाहत नाही, तर तो प्रत्येक व्यक्‍तीला आकर्षित करतो. त्यामुळे तुम्ही सत्यात लहानाचे मोठे झालेला असला, तरी यहोवाने आकर्षित केल्यामुळेच तुम्ही त्याच्याजवळ जाऊ शकता. आणि म्हणून तुम्ही त्याच्याजवळ जाण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला, तर याकोब ४:८ मध्ये सांगितल्याप्रमाणे तोही तुमच्याजवळ येईल.​—२ थेस्सलनीकाकर २:१३ सोबत तुलना करा.

१८. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत? (स्तोत्र ४०:८)

१८ जेव्हा तुम्ही यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेता तेव्हा तुम्ही येशूसारखी मनोवृत्ती दाखवत असता. त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे काहीही करायला तो तयार होता. (स्तोत्र ४०:८ वाचा; इब्री १०:७) तर मग, बाप्तिस्म्यानंतरही तुम्ही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा कशी करत राहू शकता हे आपण पुढच्या लेखात पाहू या.

तुमचं उत्तर काय असेल?

  • यहोवाला समर्पण करण्याचा काय अर्थ होतो?

  • यहोवाने केलेल्या गोष्टींसाठी कदर असल्यामुळे समर्पणाचं पाऊल उचलायला कशी मदत होते?

  • गंभीर पापापासून दूर राहायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?

गीत ३८ तो तुला बळ देईल