अभ्यास लेख १३
गीत १०८ देवाचं एकनिष्ठ प्रेम
यहोवा आपल्यावर खूश आहे, हे माहीत असल्यामुळे आनंदी राहा!
“तू माझं मन आनंदित केलं आहेस.”—लूक ३:२२.
या लेखात:
यहोवा आपल्यावर खूश आहे या गोष्टीची तुम्ही खातरी कशी बाळगू शकता ते पाहा.
१. यहोवाच्या काही विश्वासू सेवकांना कदाचित कोणत्या गोष्टीची शंका वाटू शकते?
यहोवाची त्याच्या लोकांना एक गट या नात्याने स्वीकृती आहे या गोष्टीमुळे आपल्याला किती उत्तेजन मिळतं! बायबल म्हणतं: “यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.” (स्तो. १४९:४) पण कधीकधी काही लोक इतके निराश होऊ शकतात की ‘यहोवा माझ्यावर खूश आहे का?’ अशी शंका त्यांना वाटू शकते. बायबल काळातल्या यहोवाच्या काही विश्वासू सेवकांनासुद्धा असंच वाटलं होतं.—१ शमु. १:६-१०; ईयो. २९:२, ४; स्तो. ५१:११.
२. यहोवा कोणावर खूश असतो?
२ बायबल स्पष्टपणे दाखवतं, की आपण अपरिपूर्ण असलो तरी आपण यहोवाचं मन आनंदी करू शकतो आणि त्याच्या नजरेत एक चांगलं नाव कमावू शकतो. कसं? त्यासाठी आपण येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (योहा. ३:१६) अशा प्रकारे सर्वांसमोर बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपण हे दाखवत असतो, की आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केलाय आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी त्याला वचन दिलंय. (प्रे. कार्यं २:३८; ३:१९) आपण जेव्हा त्याच्यासोबत नातं जोडण्यासाठी अशा प्रकारे पाऊल उचलतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो. आणि आपण जर आपल्या समर्पणाच्या वचनाप्रमाणे जगत राहिलो तर यहोवा आपल्यावर खूश होईल आणि आपल्याला त्याचे जवळचे मित्र समजेल.—स्तो. २५:१४.
३. आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ पण काही जणांना कधीकधी यहोवा त्यांच्यावर खूश नाही असं का वाटतं? यहोवा त्याच्या सेवकांवर खूश आहे हे तो कसं दाखवतो? आणि यहोवा आपल्यावर खूश आहे या गोष्टीवरचा भरवसा आपण कसा वाढवू शकतो?
यहोवा आपल्यावर खूश नाही असं काही जणांना का वाटू शकतं?
४-५. आपल्याला स्वतःबद्दल कमीपणा वाटत असला तरी आपण कशाची खातरी बाळगू शकतो?
४ बऱ्याच जणांना लहानपणापासून असं वाटत आलंय की ते काहीच कामाचे नाहीत. (स्तो. ८८:१५) ॲड्रियन नावाचा एक भाऊ म्हणतो: “मला नेहमी माझ्याबद्दल कमीपणा वाटायचा. लहान असताना मी अशी प्रार्थना करायचो की माझ्या घरच्यांना नंदनवनात जायला मिळावं. पण मनातल्या मनात मला हे माहीत होतं की मी त्या लायकीचा नाही.” टोनी नावाचा एक भाऊ सत्यात नसलेल्या कुटुंबात वाढला. तो म्हणतो: “माझ्या आईबाबांनी मला कधीच त्यांचं माझ्यावर प्रेम असल्याचं किंवा त्यांना माझा अभिमान असल्याचं बोलून दाखवलं नाही. त्यामुळे मला असं वाटायचं की मी त्यांना कधीच खूश करू शकणार नाही.”
५ आपल्याला जर अशीच कमीपणाची भावना सतावत असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की स्वतः यहोवाने आपल्याला त्याच्याकडे आकर्षित केलंय. (योहा. ६:४४) तो आपल्यात अशा काही चांगल्या गोष्टी पाहू शकतो ज्या आपण स्वतःसुद्धा पाहू शकणार नाही. आणि आपल्या मनात काय चाललंय हेसुद्धा तो ओळखू शकतो. (१ शमु. १६:७; २ इति. ६:३०) त्यामुळे जेव्हा यहोवा आपल्याला मौल्यवान समजतो तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो.—१ योहा. ३:१९, २०.
६. प्रेषित पौलने आधी ज्या चुका केल्या होत्या त्यांबद्दल त्याला कसं वाटत होतं?
६ सत्यात येण्याआधी आपल्यापैकी काही जणांनी अशा काही गोष्टी केल्या असतील ज्यांमुळे आपल्या मनात आताही दोषीपणाची भावना असेल. (१ पेत्र ४:३) यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेल्या ख्रिश्चनांना आजही आपल्या पापी प्रवृत्तीशी लढावं लागतं. तुम्हालाही दोषीपणाची भावना सतावते का? जर असेल तर यहोवाच्या विश्वासू सेवकांनाही असंच वाटलं होतं, ही गोष्ट माहीत झाल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. उदाहरणार्थ, जेव्हा प्रेषित पौलने स्वतःच्या कमतरतांवर विचार केला तेव्हा ‘आपली अवस्था किती वाईट आहे,’ असं त्याला वाटलं. (रोम. ७:२४) हे खरंय की पौलने त्याच्या पापांसाठी पश्चात्ताप केला आणि बाप्तिस्मा घेतला. पण तरी त्याने “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी” आहे असं म्हटलं. आणि “मी सर्वात मोठा पापी आहे” असंही म्हटलं.—१ करिंथ. १५:९; १ तीम. १:१५.
७. आधी केलेल्या पापांबद्दल आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?
७ जर आपण पश्चात्ताप केला तर यहोवा आपल्याला क्षमा करायचं वचन देतो. (स्तो. ८६:५) त्यामुळे आपल्याला आपल्या पापांबद्दल मनापासून वाईट वाटत असेल तर आपण भरवसा ठेवू शकतो, की यहोवाने जे वचन दिलंय त्याप्रमाणे तो नक्की करेल.—कलस्सै. २:१३.
८-९. यहोवाला खूश करण्यासाठी आपण कधीच हवं तितकं करू शकणार नाही, या भावनेवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो?
८ आपल्याला अगदी मनापासून यहोवाची सेवा करायची इच्छा आहे. पण बऱ्याच जणांना वाटतं, की ते यहोवाला खूश करण्यासाठी हवं तितकं कधीच करू शकणार नाहीत. अमँडा नावाची बहीण म्हणते, “मला नेहमी असं वाटायचं की यहोवाला सगळ्यात चांगलं ते देणं म्हणजे त्याच्या सेवेत नेहमी जास्तीत जास्त करत राहणं. त्यामुळे मी नेहमी स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा करायचे. आणि त्यात जेव्हा मी ‘कमी पडायचे,’ तेव्हा मी स्वतः तर निराश व्हायचेच पण यहोवासुद्धा माझ्यावर निराश असेल, असं मला वाटायचं.”
९ ‘यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी मला कधीच हवं तितकं करता येणार नाही’ या भावनेवर जर आपल्याला मात करायची असेल तर आपण काय करू शकतो? आपण हे नेहमी लक्षात ठेवू शकतो, की यहोवा कधीच आपल्याशी कठोरपणे वागत नाही किंवा तो कधीच आपल्याकडून जास्त गोष्टींची अपेक्षा करत नाही. उलट, आपल्याला जितकं शक्य आहे, तितकीच तो आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण मनापासून त्याची सेवा करण्यासाठी जे काही करतो त्याची तो कदर करतो. बायबलमध्ये बऱ्याच जणांची उदाहरणं आहेत, ज्यांनी अगदी मनापासून त्याची सेवा केली. पौलचाच विचार करा. त्याने अनेक वर्षं यहोवाची आवेशाने सेवा केली, हजारो मैल प्रवास केला आणि बऱ्याच मंडळ्या सुरू केल्या. पण जेव्हा परिस्थितीमुळे त्याला जास्त करता येत नव्हतं, तेव्हा त्याने देवाची स्वीकृती गमावली का? नाही. तेव्हासुद्धा पौल यहोवाच्या सेवेत त्याला जितकं शक्य आहे, तितकं करत राहिला आणि यहोवाने त्याला आशीर्वाद दिला. (प्रे. कार्यं ) त्याचप्रमाणे आपण यहोवाची कितपत सेवा करू शकतो, हे कदाचित परिस्थितीप्रमाणे बदलेल. पण आपण त्याची सेवा कोणत्या उद्देशाने करतो, हे यहोवासाठी जास्त महत्त्वाचं आहे. चला आता आपण पाहू या, की यहोवा आपल्यावर खूश असल्याचं कोणत्या काही मार्गांनी दाखवतो. २८:३०, ३१
यहोवा आपल्यावर खूश असल्याचं कसं दाखवतो?
१०. यहोवा आपल्यावर खूश आहे, हे आपण कसं ‘ऐकू’ शकतो? (योहान १६:२७)
१० बायबलमधून. यहोवाचं त्याच्या लोकांवर किती प्रेम आहे आणि तो त्यांच्यावर किती खूश आहे, हे दाखवण्याची नेहमी संधी शोधत असतो. बायबलमध्ये आपल्याला अशा दोन घटनांबद्दल वाचायला मिळतं, जेव्हा यहोवाने येशूला हे सांगितलं, की त्याचं त्याच्यावर किती प्रेम आहे आणि तो त्याच्यावर किती खूश आहे. (मत्त. ३:१७; १७:५) तुमच्यावरही यहोवा किती खूश आहे, हे तुम्हाला ऐकायचं आहे का? आज तो आपल्याशी थेट बोलत नाही तर त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो. आपण जेव्हा शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये येशूचे शब्द वाचतो, तेव्हा यहोवा आपल्यावर किती खूश आहे हे आपल्याला “ऐकायला” मिळतं. (योहान १६:२७ वाचा.) येशूने आपल्या पित्याचं व्यक्तिमत्त्व अगदी हुबेहूबपणे दाखवून दिलं. तो आपल्या अपरिपूर्ण पण विश्वासू शिष्यांवर किती खूश आहे आणि त्याचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्याने बोलून दाखवलं. आपण जेव्हा त्याचे शब्द बायबलमधून वाचतो तेव्हा आपण अशी कल्पना करू शकतो, की यहोवा हेच शब्द आपल्यासाठी वापरतोय.—योहा. १५:९, १५.
११. आपल्यावर जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण यहोवाची स्वीकृती गमावली आहे, असा त्याचा अर्थ का होत नाही? (याकोब १:१२)
११ कामांमधून. यहोवा आपल्याला मदत करायला उत्सुक असतो. तो आपल्याला आपल्या गरजेच्या वस्तू पुरवून मदत करतो. कधीकधी ईयोबप्रमाणे यहोवा आपल्यावर संकटं येऊ देतो. (ईयो. १:८-११) पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण देवाची स्वीकृती गमावली आहे. उलट, अशा वेळी आपल्याला यहोवावरचं प्रेम आणि त्याच्यावरचा आपला भरवसा किती मजबूत आहे, हे दाखवण्याची संधी मिळते. (याकोब १:१२ वाचा.) जेव्हा तो आपल्याला धीराने समस्यांचा सामना करायला मदत करतो, तेव्हा आपण त्याचं प्रेम आणि काळजी अनुभवत असतो.
१२. दिमित्री यांच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो?
१२ आशिया खंडातल्या एका देशात राहणाऱ्या दिमित्री नावाच्या एका भावाचाच विचार करा. त्यांना आपली नोकरी गमवावी लागली. आणि बरेच महिने त्यांना दुसरी नोकरीच मिळाली नाही. म्हणून त्यांनी प्रचारात जास्तीत जास्त वेळ घालवायचा विचार केला. आणि अशा प्रकारे त्यांनी यहोवावर भरवसा असल्याचं दाखवलं. नंतर बरेच महिने गेले पण तरीसुद्धा त्यांना दुसरी नोकरी मिळाली नाही. अशातच त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. ते इतके आजारी पडले की ते बिछान्यातच पडून होते. त्यांना असं वाटू लागलं, की एक पती आणि पिता म्हणून ते काहीच कामाचे नाहीत आणि यहोवा त्यांच्यावर खूश नाही. मग एक दिवस संध्याकाळी त्यांच्या मुलीने एका कागदावर यशया ३०:१५ मधले शब्द लिहून आणले. तिथे म्हटलं आहे: “तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्तिशाली व्हाल.” मग तिने तो कागद त्यांच्याकडे आणला आणि ती म्हणाली: “पप्पा तुम्हाला जेव्हा निराश झाल्यासारखं वाटेल, तेव्हा हे वचन तुम्ही पाहू शकता.” ते वचन पाहिल्यावर दिमित्री यांना जाणवलं, की खरंतर त्यांनी यहोवाचे आभार मानले पाहिजेत. कारण अशा परिस्थितीतही त्याने त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत गोष्टी पुरवल्या होत्या. ते म्हणतात: “मला फक्त एवढंच करायचं होतं, की शांत राहून यहोवावर भरवसा ठेवायचा होता.” तुम्हीही जर अशाच परिस्थितीचा सामना करत असाल, तर तुम्ही असा भरवसा ठेवू शकता, की यहोवा तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला त्या परिस्थितीचा सामना करायला मदत करेल.
१३. यहोवा आपल्यावर खूश असल्याचं दाखवण्यासाठी कधीकधी कोणाचा वापर करतो आणि कसा?
१३ आपल्या भाऊबहिणींकडून. कधीकधी यहोवा आपल्यावर खूश आहे हे दाखवण्यासाठी भाऊबहिणींचा वापर करतो. उदाहरणार्थ, योग्य वेळी आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी तो आपल्या भाऊबहिणींना प्रवृत्त करतो. आशियामधल्या एका देशात राहणाऱ्या बहिणीने अतिशय तणावाच्या परिस्थितीत हेच अनुभवलं. तिने आपली नोकरी गमावली होती आणि ती खूप आजारी पडली होती. आणि त्यानंतर तिच्या पतीने एक गंभीर पाप केलं होतं, त्यामुळे वडील म्हणून सेवा करायची त्यांची जबाबदारी काढून घेण्यात आली. ती म्हणते: “हे सगळं माझ्यासोबतच का होतंय हे मला समजत नव्हतं. मला असं वाटलं की माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली आहे म्हणून यहोवा माझ्यावर नाराज आहे.” मग आपल्या या बहिणीने कळकळून यहोवाला अशी प्रार्थना केली, की त्याने हे दाखवून द्यावं की तो तिच्यावर नाराज नाही. मग यहोवाने हे कसं केलं? ती म्हणते: “मंडळीतले वडील येऊन माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला याची खातरी करून दिली की यहोवा माझ्यावर खूश आहे.” नंतर तिने पुन्हा एकदा यहोवाकडे मदत मागितली आणि ती म्हणते: “त्याच दिवशी मंडळीतल्या भाऊबहिणींकडून मला एक पत्र मिळालं. त्यात खूप दिलासा देणारे शब्द होते आणि ते वाचून मला असं वाटलं, की यहोवाने माझी प्रार्थना ऐकली होती.” खरंच, यहोवा बऱ्याचदा आपल्या भाऊबहिणींच्या प्रेमळ शब्दांमधून आपल्यावर खूश असल्याचं दाखवतो.—स्तो. १०:१७.
१४. यहोवा आपल्यावर खूश आहे, हे तो कोणत्या मार्गाने दाखवतो?
१४ आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा भाऊबहिणींकडून आपली सुधारणा करूनसुद्धा यहोवा दाखवतो की त्याचं आपल्यावर प्रेम आहे. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात पौलला आपल्या भाऊबहिणींना १४ पत्रं लिहिण्यासाठी यहोवाने प्रेरित केलं. या पत्रांत पौलने स्पष्टच पण प्रेमळपणे सल्ला दिला होता. यहोवाने प्रेषित पौलला ही पत्रं लिहिण्यासाठी का प्रेरित केलं असावं? कारण यहोवा एक चांगला पिता आहे आणि त्याचं त्याच्या मुलांवर ‘प्रेम असल्यामुळे’ तो त्यांना सुधारतो. (नीति. ३:११, १२) म्हणून तुम्हाला कधी बायबलमधून सल्ला देण्यात आला तर असं समजू नका की यहोवा तुमच्यावर नाराज आहे. तर असं समजा, की हा त्याच्या प्रेमाचाच एक पुरावा आहे. (इब्री १२:६) मग यहोवा आणखी कोणत्या मार्गाने आपल्यावर खूश असल्याचं दाखवतो?
यहोवा आपल्यावर खूश असल्याचे आणखी काही पुरावे
१५. यहोवा त्याची पवित्र शक्ती कोणाला देतो आणि आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?
१५ ज्यांना यहोवाची स्वीकृती असते त्यांना तो आपली पवित्र शक्ती देतो. (मत्त. १२:१८) त्यामुळे आपण स्वतःला विचारू शकतो, ‘मी माझ्या जीवनात देवाच्या पवित्र शक्तीने निर्माण होणारे गुण दाखवतो का?’ तुम्ही सत्य शिकण्याआधी लोकांशी जसं वागत होता त्यापेक्षा आता जास्त धीराने वागता का? खरंतर, देवाच्या पवित्र शक्तीने निर्माण होणारे गुण तुम्ही जितके जास्त दाखवायला शिकाल, तितकंच यहोवाची तुम्हाला स्वीकृती आहे या गोष्टीचे पुरावे तुम्हाला मिळत जातील.—“ पवित्र शक्तीचं फळ म्हणजे . . .” ही चौकट पाहा.
१६. आनंदाचा संदेश सांगण्यासाठी यहोवा कोणाला वापरतो आणि त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं? (१ थेस्सलनीकाकर २:४)
१६ यहोवा ज्यांच्यावर खूश असतो त्यांच्यावर आनंदाची बातमी सांगायची जबाबदारी सोपवतो. (१ थेस्सलनीकाकर २:४ वाचा.) आनंदाची बातमी सांगितल्यामुळे जोस्लीन नावाच्या एका बहिणीला कसा फायदा झाला याचा विचार करा. एकदा तिला खूप हताश झाल्यासारखं वाटत होतं. ती म्हणते: “असं वाटत होतं, की जणू माझ्याकडे यहोवाला देण्यासाठी काहीच नाही. पण मी पायनियर होते आणि त्या दिवशी मला प्रचाराला जायचं होतं. म्हणून मी यहोवाला प्रार्थना केली आणि मी प्रचाराला गेले.” त्या दिवशी सकाळी जोस्लीनची मेरी नावाच्या एका चांगल्या स्त्रीशी भेट झाली आणि तिने बायबल अभ्यास करायची तयारी दाखवली. काही महिन्यांनंतर मेरीने तिला असं सांगितलं, की त्या दिवशी ती देवाला प्रार्थनाच करत होती, की त्याने तिला मदत करावी आणि त्याच वेळी जोस्लीनने तिचं दार वाजवलं. या गोष्टीचा विचार करत जोस्लीन म्हणते, “ही गोष्ट मला अशी वाटली की जणू यहोवा मला म्हणतोय, ‘मी तुझ्यावर खूश आहे!’” हे खरं आहे की प्रचारात प्रत्येक जण आपल्याला चांगला प्रतिसाद देईलच असं नाही. पण, आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आपण जी काही मेहनत घेतो त्यामुळे यहोवा आपल्यावर खूश आहे याची आपण खातरी बाळगू शकतो.
१७. खंडणी बलिदानाबद्दल विकीने जे म्हटलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं? (स्तोत्र ५:१२)
१७ यहोवा ज्यांच्यावर खूश असतो त्यांना तो खंडणी बलिदानाचे फायदे घेण्याची संधी देतो. (१ तीम. २:५, ६) पण, खंडणी बलिदानावर आपला विश्वास असला आणि आपण बाप्तिस्मा घेतलेला असला, तरी यहोवा आपल्यावर खूश आहे हे आपलं मन मानायला तयार नसेल तर काय? अशा वेळी लक्षात ठेवा की आपण नेहमीच आपल्या मनावर नाही तर यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. ज्यांचा खंडणी बलिदानावर विश्वास आहे त्यांना यहोवा नीतिमान समजतो आणि त्यांना आशीर्वाद द्यायचं वचन देतो. (स्तोत्र ५:१२ वाचा; रोम. ३:२६) खंडणी बलिदानावर विचार केल्यामुळे विकी नावाच्या एका बहिणीला हीच गोष्ट जाणवली. ती म्हणते: “बऱ्याच काळापासून यहोवा माझ्याशी खूप धीराने वागला. पण तरीसुद्धा मी त्याला जणू असं म्हणत होते, की ‘तुझ्या प्रेमात इतकी ताकद नाही की ते माझ्यापर्यंत पोचू शकेल. तुझ्या मुलाचं बलिदान माझी पापं झाकू शकत नाही.’” पण, खंडणीच्या भेटीवर बराच वेळ विचार केल्यानंतर तिला यहोवाचं प्रेम जाणवू लागलं. आपणसुद्धा खंडणी बलिदानावर जितकं जास्त मनन करू तितकं जास्त यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे हे आपल्याला जाणवेल आणि तो आपल्यावर खूश आहे हे आपल्याला समजेल.
१८. आपण जर यहोवावर प्रेम करत राहिलो तर आपण कोणती खातरी ठेवू शकतो?
१८ आपण वर दिलेल्या गोष्टी लागू करायचा कितीही प्रयत्न केला, तरी कदाचित काही वेळा आपण निराश होऊन जाऊ. आणि ‘यहोवा खरंच माझ्यावर खूश आहे का?’ असं कदाचित आपल्याला वाटेल. तसं झालं, तर हे नेहमी लक्षात ठेवा की यहोवा त्याच्यावर ‘प्रेम करत राहणाऱ्यांवर’ प्रेम करतो. (याको. १:१२) म्हणून नेहमी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करा आणि तो आपल्यावर खूश आहे हे तो कसं दाखवतो हे पाहायचा प्रयत्न करत राहा. हे कधीही विसरू नका की “देव आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.”—प्रे. कार्यं १७:२७.
तुमचं उत्तर काय असेल?
-
यहोवा आपल्यावर खूश नाही असं काही लोकांना का वाटू शकतं?
-
यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्यावर खूश असल्याचं दाखवतो?
-
आपल्याला देवाची स्वीकृती आहे याची आपण खातरी का बाळगू शकतो?
गीत ८८ तुझे मार्ग मला शिकव