व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”

“जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”

“जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्त. २८:१९, २०.

गीत क्रमांक: ४७, १७

१, २. मत्तय २४:१४ मध्ये येशूनं जे म्हटलं त्यामुळे कोणते प्रश्न उपस्थित होतात?

शेवटल्या काळात राज्याची सुवार्ता सर्व लोकांपर्यंत पोचवली जाईल अशी भविष्यवाणी येशूनं केली होती. (मत्त. २४:१४) यहोवाचे साक्षीदार या नात्यानं आपल्याला, आपण करत असलेल्या प्रचारकार्यासाठी ओळखलं जातं. काही लोकांना आपला संदेश आवडतो तर काहींना आवडत नाही. पण तरी, आपण जे कार्य करतो त्यासाठी ते आपला आदर करतात. येशूनं जी भविष्यवाणी केली अगदी त्यानुसार आज यहोवाचे साक्षीदार कार्य करत आहेत, असा आपला दावा आहे. पण आपण कोणत्या आधारावर असा दावा करू शकतो? आणि, येशूनं सांगितलेल्या पद्धतीनुसार आज आपणच प्रचारकार्य करत आहोत ही खात्री आपण कशी बाळगू शकतो?

येशूनं सांगितलेलाच संदेश आम्ही घोषित करत आहोत, असा दावा आज बरेच धार्मिक गट करतात. पण, खरं पाहायला गेलं तर त्यांचं प्रचारकार्य फक्त चर्चमध्ये उपदेश देण्यापुरतं, टिव्हीवर आणि इंटरनेटवर कार्यक्रम सादर करण्यापुरतं किंवा येशूविषयी त्यांना कसं शिकायला मिळालं याविषयी सांगण्यापुरतंच मर्यादित आहे. इतर काही जण असेही आहेत ज्यांना वाटतं की प्रचार करण्याची एक पद्धत म्हणजे गरजू लोकांना मदत करणं किंवा डॉक्टर, नर्स आणि शिक्षक या नात्यानं स्वयंसेवक म्हणून इतरांची सेवा करणं. पण, असं करण्याद्वारे ते येशूनं सांगितलेलंच प्रचारकार्य करत आहेत असं म्हणता येईल का?

३. मत्तय २८:१९, २० यात दिलेल्या आज्ञेनुसार येशूच्या अनुयायांनी कोणत्या चार गोष्टी करण्याची गरज आहे?

लोकांनी आपल्याकडे यावं आणि मग आपण त्यांना प्रचार करावा, असं येशूला आपल्या शिष्यांना सांगायचं होतं का? मुळीच नाही. कारण, पुनरुत्थान झाल्यानंतर त्यानं आपल्या शेकडो शिष्यांना सांगितलं: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्त. २८:१९, २०) म्हणून येशूचे अनुयायी या नात्यानं, आपण चार गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण शिष्य बनवले पाहिजेत, त्यांना बाप्तिस्मा दिला पाहिजे आणि त्यांना शिकवलं पाहिजे. पण, सर्वात आधी आपण काय केलं पाहिजे असं येशूनं म्हटलं? त्यानं म्हटलं की “तुम्ही जाऊन” सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. यावरून कळतं की सर्वात आधी आपण लोकांकडे गेलं पाहिजे. एका बायबल तज्ञानं म्हटलं की, “इतरांपर्यंत ‘जाणं’ ही प्रत्येक सेवकाची जबाबदारी आहे, मग ते जवळच्या ठिकाणी जाणं असो किंवा सातासमुद्रापलीकडे जाणं असो.”—मत्त. १०:७; लूक १०:३.

४. “माणसे धरणारे” असं येशूनं जे म्हटलं, त्यात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो?

येशूची आपल्या शिष्यांकडून काय अपेक्षा होती? प्रत्येकानं व्यक्तिगत रीत्या प्रचार करावा अशी त्याची इच्छा होती, की एक गट या नात्यानं संघटित होऊन त्यांनी प्रचार करावा अशी त्याची इच्छा होती? केवळ एका व्यक्तीनं “सर्व राष्ट्रांतील” लोकांपर्यंत जाऊन प्रचार करणं अशक्य असल्यामुळे, येशूच्या शिष्यांनी एक गट या नात्यानं संघटितपणे प्रचार करावा अशी त्याची इच्छा होती. आणि येशूनं जेव्हा त्याच्या शिष्यांना “माणसे धरणारे” होण्यासाठी बोलावलं तेव्हा त्याला हीच गोष्ट सांगायची होती. (मत्तय ४:१८-२२ वाचा.) या ठिकाणी येशूला असं म्हणायचं नव्हतं, की केवळ एका व्यक्तीनं गळ वापरून मासा गळाला लागण्याची वाट पाहत बसावी. तर, जाळ्याचा वापर करून मासे पकडण्याबद्दल येशू बोलत होता. अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या मासेमारीत पुष्कळ श्रम घेण्याची गरज पडते. शिवाय, यासाठी अनेक लोकांना एकत्र मिळून संघटित रीत्या काम करावं लागतं.—लूक ५:१-११.

५. आपल्याला कोणत्या चार प्रश्नांची उत्तरं माहीत असणं गरजेचं आहे, आणि का?

आज सुवार्तेचा प्रचार कोण करत आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला चार प्रश्नांची उत्तरं माहीत असणं गरजेचं आहे:

  • येशूच्या अनुयायांनी कोणता संदेश सांगितला पाहिजे?

  • यामागचा त्यांचा हेतू काय असला पाहिजे?

  • त्यांनी कोणती पद्धत वापरली पाहिजे?

  • या कार्याची व्याप्ती आणि कालावधी काय असला पाहिजे?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतल्यामुळे, जीवन वाचवणारं हे काम आज कोणते लोक करत आहेत हे ओळखण्यास आपल्याला मदत होईल. तसंच, प्रचारकार्य करत राहण्याची आपली इच्छा आणखी बळकट होईल.—१ तीम. ४:१६.

प्रचारकार्याचा संदेश काय असला पाहिजे?

६. यहोवाचे साक्षीदारच येशूनं सांगितलेला संदेश घोषित करत आहेत हे आपण खात्रीनं का म्हणू शकतो?

लूक ४:४३ वाचा. येशूनं “राज्याची सुवार्ता” घोषित केली आणि त्याच्या शिष्यांनीही तेच करावं अशी त्याची इच्छा आहे. तर मग, आज असा कोणता गट आहे जो सर्वांना हा संदेश सांगत आहे? आज फक्त यहोवाचे साक्षीदारच हा संदेश लोकांना सांगत आहेत. अगदी विरोध करणारे लोकदेखील हे कबूल करतात. उदाहरणार्थ, मिशनरी म्हणून अनेक देशांत काम केलेल्या पाळकानं एका यहोवाच्या साक्षीदाराला काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. तो ज्या कुठल्या देशात गेला तिथल्या यहोवाच्या साक्षीदारांना त्यानं विचारलं की ते इतरांना कोणता संदेश सांगतात. त्या पाळकानं म्हटलं, की “मूर्खासारखं त्या सर्वांनी मला एकच उत्तर दिलं, ‘राज्याची सुवार्ता.’” पण, खरंतर पाळकाच्या या बोलण्यातून आपल्यातला मूर्खपणा नव्हे, तर खरे ख्रिस्ती या नात्यानं आपल्यात असलेलं ऐक्य दिसून येतं. (१ करिंथ. १:१०) टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक या आपल्या मासिकाचा मुख्य संदेशही देवाचं राज्यच आहे. हे मासिक आज २५४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि प्रत्येक महिन्याला त्याच्या सरासरी ५ कोटी ९० लाख प्रती छापल्या जातात. यामुळे, आज हे जगातील सर्वात जास्त वितरण होत असलेलं मासिक ठरलं आहे!

७. ख्रिस्ती धर्मजगतातील पुढारी येशूनं सांगितलेला संदेश घोषित करत नाहीत हे कशावरून दिसून येतं?

ख्रिस्ती धर्मजगतातील पुढारी देवाच्या राज्याचा प्रचार करत नाहीत. आणि समजा ते राज्याबद्दल बोलत जरी असले, तरी त्यांच्यापैकी अनेक जण असं म्हणतात की हे राज्य आपल्या मनातील केवळ एक भावना आहे. (लूक १७:२१) देवाचं राज्य स्वर्गात असलेलं एक वास्तविक सरकार आहे आणि येशू त्याचा शासक आहे असं ते लोकांना शिकवत नाहीत. याउलट, ते सहसा नाताळ आणि ईस्टरच्या दिवशीच येशूविषयी बोलतात. देवाचं राज्य मानवजातीच्या सर्व समस्यांचा अंत करेल आणि या पृथ्वीवरून दुष्टता पूर्णपणे काढून टाकेल असं ते सांगत नाहीत. (प्रकटी. १९:११-२१) यावरून स्पष्ट होतं, की देवाच्या राज्याचा राजा या नात्यानं येशू काय करणार आहे हे ख्रिस्ती धर्मजगतातील पुढाऱ्यांना माहीत नाही. येशूचा संदेशच मुळात कळत नसल्यामुळे प्रचारकार्य करण्यामागं काय हेतू असला पाहिजे हेदेखील त्यांना समजत नाही.

प्रचारकार्यामागचा आपला हेतू काय असला पाहिजे?

८. आज बहुतेक लोक कोणत्या चुकीच्या हेतूनं प्रचारकार्य करतात?

येशूच्या शिष्यांनी पैसे कमवण्याच्या किंवा मोठमोठ्या इमारती बांधण्याच्या उद्देशानं प्रचारकार्य करू नये. कारण येशूनं अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, की “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्त. १०:८) म्हणून, प्रचारकार्याला व्यावसायिक रूप देणं चुकीचं आहे. (२ करिंथ. २:१७) प्रचारकार्य करण्यासाठी आपल्याला पैसे दिले जावेत, अशी अपेक्षा येशूच्या शिष्यांनी करू नये. (प्रेषितांची कृत्ये २०:३३-३५ वाचा.) पण येशूनं अगदी स्पष्ट सूचना देऊनही पाळकांना व इतर कर्मचाऱ्यांना पगार देता यावा आणि इतर खर्च भागवता यावा म्हणून चर्च पैसा गोळा करण्यामागे लागले आहेत. पण याचा परिणाम म्हणजे, ख्रिस्ती धर्मजगतातील बहुतेक पुढाऱ्यांनी आपले खिसे भरून घेतले आहेत.—प्रकटी. १७:४, ५.

९. प्रचारकार्य करण्यामागं यहोवाच्या साक्षीदारांचा हेतू योग्य आहे हे कशावरून दिसून येतं?

पण, यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काय? त्यांच्या साभांमध्ये किंवा अधिवेशनांमध्ये कोणत्याही प्रकारे दान गोळा केलं जात नाही. उलट, त्यांचं कार्य स्वेच्छेनं दिल्या जाणाऱ्या अनुदानावर चालवलं जातं. (२ करिंथ. ९:७) असं असूनही, यहोवाच्या साक्षीदारांनी अलिकडील वर्षात १९३ कोटी तास सुवार्ता घोषित करण्यासाठी खर्च केले आहेत. आणि प्रत्येक महिन्यात त्यांनी ९० लाखांपेक्षा जास्त बायबल अभ्यास चालवले आहेत. या कार्यासाठी त्यांना पैसे दिले जात नाहीत. उलट, ते स्वतःचे पैसे खर्च करून आनंदानं हे कार्य करतात. त्यांच्या कार्याबद्दल एका संशोधकानं असं म्हटलं: “त्यांचं मुख्य ध्येय प्रचार करणं आणि शिकवणं हेच आहे.” त्यानं असंही सांगितलं की यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पाळक नाहीत. त्यामुळे त्यांना पाळकांसाठी पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. मग, प्रश्न हा आहे की जर पैसे गोळा करणं हा आपल्या प्रचारकार्यामागचा उद्देश नाही तर मग काय आहे? आपलं यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम असल्यामुळे आपण स्वेच्छेनं हे कार्य करतो. शिवाय, यामुळे स्तोत्र ११०:३ (वाचा.) या वचनातील भविष्यवाणीदेखील आपल्याबाबतीत पूर्ण होते.

प्रचारकार्याकरता कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत?

जिथं-जिथं लोक भेटतात तिथं-तिथं जाऊन आपण प्रचारकार्य करतो (परिच्छेद १० पाहा)

१०. येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रचारकार्य करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला?

१० येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रचार करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला? जिथं-जिथं लोक भेटतील तिथं-तिथं ते जायचे. उदाहरणार्थ, त्यांनी रस्त्यांवर आणि बाजारात प्रचारकार्य केलं. तसंच, त्यांनी घरोघरी जाऊनदेखील प्रचारकार्य केलं. (मत्त. १०:११; लूक ८:१; प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०) सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी घरोघरचं प्रचारकार्य ही एक सुसंघटित पद्धत होती.

११, १२. प्रचारकार्याच्या बाबतीत ख्रिस्ती धर्मजगतात आणि यहोवाच्या साक्षीदारांमध्ये कोणता फरक दिसून येतो?

११ आज चर्चमधील लोक येशूप्रमाणेच प्रचारकार्य करतात असं म्हणता येईल का? नाही. कारण त्यांचे पाळक सहसा त्यांच्या सदस्यांनाच उपदेश देताना पाहायला मिळतात. नवीन शिष्य बनवण्याऐवजी ते केवळ आपल्या सदस्यांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा, त्यांनी आपल्या लोकांना प्रचार करण्याचं उत्तेजन दिलं होतं. उदाहरणार्थ, २००१ साली पोप जॉन पॉल दुसरे यांनी एका पत्रात असं सांगितलं, की चर्चमधील सदस्यांनी शुभवर्तमानाचा प्रचार केला पाहिजे. “मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” असं म्हणणाऱ्या प्रेषित पौलाप्रमाणेच त्यांनी आवेश दाखवला पाहिजे. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की प्रचारकार्य फक्त काही प्रशिक्षित लोकांनीच नाही, तर चर्चमधील सर्वच सदस्यांनी केलं पाहिजे. पण, पाहायला गेलं तर केवळ थोड्याच लोकांनी त्यांच्या म्हणण्यानुसार केलं.

१२ यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काय? १९१४ पासून येशू राजा या नात्यानं राज्य करत आहे, याबद्दल केवळ यहोवाचे साक्षीदारच प्रचार करतात. ते येशूच्या आज्ञेचं पालन करतात आणि प्रचारकार्याला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवण्याचा प्रयत्न करतात. (मार्क १३:१०) पिलर्स ऑफ फेथ—अमेरिकन काँग्रीगेशन्स अॅन्ड देअर पार्टनर्स या पुस्तकात असं सांगण्यात आलं आहे, की यहोवाच्या साक्षीदारांसाठी प्रचारकार्य हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. त्यात असंही म्हटलं आहे की जेव्हा भुकेले, एकटे पडलेले आणि आजारी असलेले लोक त्यांना भेटतात तेव्हा ते त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण, जगाच्या अंताविषयी आणि त्यातून बचावण्याविषयी इतरांना सांगणं हे आपलं मुख्य ध्येयं आहे, हे ते कधीही विसरत नाहीत. हा संदेश घोषित करण्याद्वारे आपण, येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रचारकार्यात जी पद्धत वापरली तिचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो.

प्रचारकार्याची व्याप्ती आणि कालावधी काय असला पाहिजे?

१३. प्रचारकार्य किती व्यापक प्रमाणात असलं पाहिजे?

१३ येशूनं सांगितलं होतं की त्याचे अनुयायी “सर्व जगात” सुवार्तेचा प्रचार करण्याचं आणि लोकांना शिकवण्याचं काम करतील. शिवाय, “सर्व राष्ट्रांतील लोकांस” शिष्य बनवण्याची आज्ञाही त्यांना देण्यात आली होती. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) यावरून हे स्पष्ट होतं, की येशूच्या अनुयायांना राज्याची सुवार्ता संपूर्ण जगभरात घोषित करायची होती.

१४, १५. यहोवाच्या साक्षीदारांच्या व्यापक प्रमाणात होत असलेल्या कार्यावरून, ते येशूनं केलेली भविष्यवाणी पूर्ण करत आहेत हे कसं दिसून येतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१४ संपूर्ण जगात सुवार्ता घोषित केली जाईल अशी येशूनं भविष्यवाणी केली होती. आणि आज फक्त यहोवाचे साक्षीदारच त्यानुसार कार्य करत आहेत. आपण असं का म्हणू शकतो? अमेरिकेत जवळजवळ ६ लाख पाळक आहेत, तर त्याच देशात सुवार्ता घोषित करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांची संख्या जवळजवळ १२ लाख आहे. जगभरात, जवळजवळ ४ लाख कॅथलिक पाळक आहेत, पण त्यांच्या तुलनेत सुवार्ता घोषित करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांची संख्या मात्र २४० देशांमध्ये ८० लाखांहून जास्त आहे. यावरून, हे स्पष्ट होतं की यहोवाचे साक्षीदारच संपूर्ण जगभरात सुवार्ता घोषित करत आहेत आणि त्याद्वारे यहोवाच्या नावाचा गौरव आणि सन्मान करत आहेत.—स्तो. ३४:१; ५१:१५.

१५ यहोवाचे साक्षीदार या नात्यानं, जगाचा अंत होण्यापूर्वी जास्तीतजास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोचवणं हे आपलं ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण लाखो पुस्तकं, मासिकं, पत्रिका आणि अधिवेशन व स्मारकविधीच्या निमंत्रण पत्रिका ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित करून छापल्या आहेत. आणि ही प्रकाशनं आपण लोकांना अगदी विनामूल्य देतो. मागच्या वर्षी आपण बायबलवर आधारित जवळजवळ ४५० कोटी प्रकाशनं छापली आहेत. तसंच, १३० पेक्षा जास्त भाषांमध्ये न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्सच्या २० कोटी पेक्षा जास्त प्रती आपण छापल्या आहेत. यासोबतच, आपली वेबसाईट ७५० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. फक्त, यहोवाचे साक्षीदारच हे अद्‌भुत काम साध्य करत आहेत.

१६. यहोवाच्या साक्षीदारांना देवाच्या पवित्र आत्म्याचं साहाय्य आहे असं का म्हणता येईल?

१६ भविष्यवाणीत सांगितलेल्या प्रचारकार्याचा कालावधी किती असेल? येशूनं सांगितलं होतं की जगाचा अंत होईपर्यंत प्रचारकार्य केलं जाईल. मग असा कोणता धार्मिक गट आहे, जो या शेवटल्या आणि अगदी महत्त्वाच्या काळात सुवार्ता घोषित करत आहे? प्रचारकार्यात भेटणारे काही ख्रिस्ती लोक कदाचित म्हणतील, की “पवित्र आत्मा आमच्याजवळ आहे, पण प्रचाराचं कार्य तुम्ही लोक करत आहात.” पण, ज्या प्रकारे प्रचाराच्या कामात आपण तग धरून आहोत त्यावरून हेच स्पष्ट होत नाही का, की केवळ यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळेच आपण हे कार्य करत आहोत? (प्रे. कृत्ये १:८; १ पेत्र ४:१४) काही धार्मिक गटांनी यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणे प्रचारकार्य करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे, पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. काही जण मिशनरी सेवेत असल्याचं दाखवतात पण काही काळानंतर पुन्हा आपलं पूर्वीचं जीवन जगू लागतात. काही लोक तर घरोघरी जाऊन प्रचार करण्याचादेखील प्रयत्न करतात. पण, येशूनं सांगितलेला संदेश ते घोषित करत नाहीत. यावरून हेच स्पष्ट होतं, की येशूनं ज्या कार्याची सुरवात केली होती ते कार्य हे लोक करत नाहीत.

आज सुवार्तेचा प्रचार कोणते लोक करत आहेत?

१७, १८. (क) आज केवळ यहोवाचे साक्षीदारच राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत हे आपण खात्रीनं का म्हणू शकतो? (ख) प्रचारकार्य करत राहणं आपल्याला कशामुळे शक्य झालं आहे?

१७ तर मग, आज कोणते लोक राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत? निश्‍चित्तच, यहोवाचे साक्षीदार! असं आपण खात्रीनं का म्हणू शकतो? याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे आपण राज्याची सुवार्ता सांगतो, अर्थात योग्य संदेश घोषित करतो. दुसरं कारण, आपण स्वतः लोकांपर्यंत जातो, म्हणजे योग्य पद्धतींचा वापर करतो. तिसरं कारण, यहोवावर आणि इतरांवर प्रेम असल्यामुळे आपण प्रचार करतो, यावरून प्रचारकार्य करण्यामागचा आपला उद्देश योग्य असल्याचं दिसून येतं. आणि चौथं कारण म्हणजे आपण सर्व राष्ट्रांतील आणि सर्व भाषेतील लोकांपर्यंत सुवार्ता पोचवतो, यावरून आपल्या कार्याची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसून येतं. शिवाय, अंत येईपर्यंत धीरानं प्रचारकार्य करत राहण्याचा आपला निश्चय आहे!

१८ या शेवटल्या दिवसांत यहोवाचे साक्षीदार ज्या प्रकारे कार्य करत आहेत ती खरंच खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. पण, संपूर्ण जगभरात सुवार्ता घोषित करणं आपल्याला कशामुळे शक्य झालं आहे? प्रेषित पौलानं सांगितलं: “कारण देव तुम्हामध्ये कार्य करत आहे; तोच त्याची इच्छा तुम्हास कळवतो; ती पूर्ण करण्यास तोच तुम्हाला समर्थ करतो.” (फिलिप्पै. २:१३, सुबोधभाषांतर) तेव्हा यहोवाजवळ आपली हीच प्रार्थना आहे, की येशूनं दिलेल्या आज्ञेनुसार सुवार्तेचा प्रचार करत राहण्यासाठी लागणारी शक्ती आपल्याला नेहमी मिळत राहो!—२ तीम. ४:५.