व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही कशा प्रकारे व्यक्तिगत निर्णय घेता?

तुम्ही कशा प्रकारे व्यक्तिगत निर्णय घेता?

“प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.”—इफिस. ५:१७.

गीत क्रमांक: ११, २२

१. बायबलमध्ये देण्यात आलेल्या काही आज्ञा कोणत्या आहेत, आणि या आज्ञांचं पालन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

यहोवानं बायबलमध्ये आपल्याला अगदी स्पष्टपणे आज्ञा दिल्या आहेत. या आज्ञांद्वारे तो आपल्याकडून काय अपेक्षा करतो ते आपण ओळखू शकतो. उदाहरणार्थ, आपण उपासनेत मूर्तींचा वापर करू नये, चोरी करू नये, मद्यपी असू नये आणि लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहावं, अशा स्पष्ट आज्ञा त्यानं आपल्याला दिल्या आहेत. (१ करिंथ. ६:९, १०) शिवाय, त्याच्या पुत्रानं, येशूनंही आपल्या अनुयायांना अशी स्पष्ट आज्ञा दिली, की “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:१९, २०) यहोवा आणि येशूनं सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या भल्यासाठीच आहेत. यहोवाच्या आज्ञांमुळेच आज आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित राहणं शक्य झालं आहे. शिवाय, चांगलं आरोग्य प्राप्त करून आनंदी कसं राहता येईल, हेदेखील समजून घेणं आपल्याला शक्य झालं आहे. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे, सुवार्ता सांगण्याच्या कामासोबतच जेव्हा आपण यहोवाच्या इतर आज्ञादेखील पाळतो, तेव्हा आपण त्याचं मन आनंदित करत असतो आणि त्यामुळे तो आपल्याला आशीर्वादही देतो.

२, ३. (क) बायबलमध्ये प्रत्येक बारीकसारीक गोष्टींसाठी नियम का देण्यात आलेले नाहीत? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

पण, बायबलमध्ये जीवनातल्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींबद्दल नियम देण्यात आलेले नाहीत. यातून खरंतर यहोवाची बुद्धीच दिसून येते. एक उदाहरण घ्या: आपण कशा प्रकारचे कपडे घालावेत, याविषयी बायबलमध्ये विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. कारण विचार करा, जर तशा सूचना बायबलमध्ये खरंच असत्या तर बायबल केव्हाच कालबाह्य झालं असतं. कारण वेगवेगळ्या देशांतील लोकांची पेहराव करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि कपड्यांची फॅशनदेखील काळानुसार बदलत जाते. यासोबतच, आपण कोणत्या प्रकारचं काम करावं, कोणत्या प्रकारचं मनोरंजन निवडावं आणि आरोग्यासाठी काय करावं आणि काय करू नये यांविषयी बायबलमध्ये नियमांची यादी देण्यात आलेली नाही. उलट यहोवानं प्रत्येक व्यक्तीला आणि कुटुंबप्रमुखाला निर्णय घेण्याची अनुमती दिली आहे.

मग याचा अर्थ असा होता का, की आपल्याला एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला आणि त्याचा आपल्या जीवनावर अगदी खोलवर परिणाम होणार असला, तरी यहोवाला त्याचं काहीच घेणं-देणं नसतं? किंवा बायबलमधील आज्ञांचं उल्लंघन होत नाही तोपर्यंत आपण कोणतेही निर्णय घेतले तरी चालतील? जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी स्पष्ट नियम दिलेला नसतो तेव्हादेखील यहोवाला आनंद होईल असे निर्णय आपण कसे घेऊ शकतो?

आपल्या निर्णयांचा आपल्यावर आणि इतरांवर परिणाम होतो

४, ५. आपल्या निर्णयांचा आपल्यावर व इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो?

काही लोकांना वाटतं, की ते हवं ते करू शकतात. पण आपला दृष्टिकोन तसा नाही. आपल्याला यहोवाचं मन आनंदित करायचं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी, बायबल त्याविषयी काय म्हणतं ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, रक्ताविषयी देवाचा दृष्टिकोन काय आहे, ते बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. म्हणून आपणही तसाच दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करतो. (उत्प. ९:४; प्रे. कृत्ये १५:२८, २९) यहोवाला आनंद होईल असाच निर्णय घेता यावा म्हणून आपण त्याच्याकडे विनंती करू शकतो.

यासोबतच, आपण घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांचा आपल्यावरही परिणाम होत असतो. चांगल्या निर्णयांमुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ शकतो, तर चुकीच्या निर्णयांमुळे त्याच्यासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधाला तडा जाऊ शकतो. तसंच, आपण घेतलेल्या निर्णयांचा इतरांवरही परिणाम होत असतो. आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आपल्या बांधवांना कदाचित वाईट वाटेल, त्यांचा विश्वास कमकुवत होईल किंवा मंडळीच्या ऐक्यालाही धोका निर्माण होईल. म्हणून योग्य निर्णय घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.—रोमकर १४:१९; गलतीकर ६:७ वाचा.

६. निर्णय घेताना आपण कोणती गोष्ट केली पाहिजे?

एखाद्या परिस्थितीत आपण नेमकं काय केलं पाहिजे हे जेव्हा बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नसतं, तेव्हादेखील आपल्याला योग्य निर्णय कसा घेता येईल? अशा वेळी आपल्याला जे योग्य वाटेल ते करण्याऐवजी, आपल्या परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करून यहोवाला आवडेल असाच निर्णय आपण घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्या निर्णयांचा परिणाम चांगलाच असेल अशी खात्री आपण बाळगू शकतो.—स्तोत्र ३७:५ वाचा.

यहोवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या

७. एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा बायबलमध्ये स्पष्ट नियम नसतो, तेव्हा यहोवाची इच्छा काय आहे हे आपण कसं ओळखू शकतो?

यहोवाला आवडतील असे निर्णय घेण्यासाठी इफिसकर ५:१७ मध्ये दिलेला सल्ला आपण लागू करू शकतो. त्यात म्हटलं आहे: “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.” बायबलमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्ट नियम नसतो, तेव्हा यहोवाची इच्छा काय आहे हे आपण कसं जाणून घेऊ शकतो? अशा वेळी आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि तो पवित्र आत्म्याद्वारे जे मार्गदर्शन आपल्याला देतो ते आपण स्वीकारलं पाहिजे.

८. यहोवाची इच्छा समजून घेण्याविषयी येशूनं कशा प्रकारे चांगलं उदाहरण मांडलं?

येशूनंही यहोवाला काय वाटतं ते समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न केला. उदाहरणार्थ, त्यानं यहोवाला प्रार्थना केली आणि चमत्कार करून दोन वेळा जमावाला अन्न पुरवलं. (मत्त. १४:१७-२०; १५:३४-३७) पण तेच, अरण्यात भूकेनं व्याकूळ असताना जेव्हा सैतानानं त्याला दगडांच्या भाकरी करण्यास सांगितलं तेव्हा त्यानं लगेच नकार दिला. (मत्तय ४:२-४ वाचा.) कारण आपल्या पित्याची इच्छा काय आहे ते येशूला चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी त्यानं पवित्र आत्म्याचा वापर करावा अशी यहोवाची इच्छा नाही, याची त्याला जाणीव होती. शिवाय, आपला पिता आपल्या गरजा नक्की पूर्ण करेल आणि आपलं मार्गदर्शन करेल याची त्याला पूर्ण खात्री होती.

९, १०. योग्य निर्णय घेण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? स्पष्ट करा.

येशूप्रमाणेच आपणही जर मार्गदर्शनासाठी यहोवावर विसंबून राहिलो, तर आपल्यालाही योग्य निर्णय घेता येतील. बायबलमध्ये म्हटलं आहे, की “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.” (नीति. ३:५-७) या वचनात सांगितल्यानुसार, एखाद्या गोष्टीबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे ते ओळखण्यासाठी आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे विशिष्ट परिस्थितीत आपण काय करावं असं त्याला वाटतं, ते समजून घेण्यास आपल्याला मदत होईल. शिवाय यहोवाच्या विचारसरणीला समजून घेण्याचा आपण जितका जास्त प्रयत्न करू, तितकंच त्याचं मन आनंदित करतील असे निर्णय घेणं आपल्याला सोपं जाईल. अशा प्रकारे आपलं अंतःकरण ‘पाषाणहृदयी’ नव्हे तर ‘मांसमय’ म्हणजे यहोवाच्या मार्गदर्शनाकरता आणखी ‘संवेदनशील’ बनेल.—यहे. ११:१९.

१० ही गोष्ट समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. असा विचार करा, की एक लग्न झालेली स्त्री काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली आहे. बाजारात तिला एक सुंदर साडी दिसते. पण ती साडी खूपच महाग आहे. या स्त्रीचा पती जरी तिच्यासोबत नसला तरी त्या साडीसाठी तिनं इतके जास्त पैसे खर्च केले तर त्याला काय वाटेल हे तिला माहीत आहे. का बरं? कारण त्यांच्या लग्नाला बराच काळ झाला आहे, आणि या काळादरम्यान पैसे खर्च करण्याविषयी आपल्या पतीचे विचार काय आहेत हे तिला चांगल्या प्रकारे माहीत झालं आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण यहोवाच्या विचारसरणीबद्दल जाणून घेतो आणि गतकाळात त्यानं जे काही केलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा वेगवेगळ्या परिस्थितींत आपण कोणता निर्णय घेतल्यास त्याला आनंद होईल, ते आपल्याला समजतं.

यहोवाची विचारसरणी समजून घ्या

११. बायबलचं वाचन आणि अभ्यास करताना आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो? (“ बायबलचा अभ्यास करताना स्वतःला विचारा” असं शीर्षक असलेली चौकट पाहा.)

११ एखाद्या गोष्टीबद्दल यहोवाला काय वाटतं, ते आपल्याला कसं माहीत करून घेता येईल? यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नियमितपणे बायबलचं वाचन आणि अभ्यास केला पाहिजे. आणि असं करत असताना ‘यातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळालं? तो अशा प्रकारे का वागला असावा?’ असे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. तसंच, यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेता यावं म्हणून दाविदाप्रमाणे तुम्हीही त्याला प्रार्थना करू शकता. दाविदानं लिहिलं: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो.” (स्तो. २५:४, ५) यहोवाविषयी एखादी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते तेव्हा त्या माहितीचा आपल्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, शाळेमध्ये किंवा प्रचारकार्यात कसा उपयोग करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. अशा प्रकारे कोणत्या परिस्थितीला ही माहिती लागू होते हे समजल्यानंतर, ती कशी लागू करायची हेदेखील समजून घेणं आपल्याला सोपं जाईल.

१२. आपल्या साहित्यांमुळे आणि सभांमुळे यहोवाच्या विचारसरणीला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेणं आपल्याला कशा प्रकारे शक्य होतं?

१२ यहोवाची विचारसरणी समजून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, त्याची संघटना बायबलद्वारे आपल्याला जे शिकवते त्याकडे बारकाईनं लक्ष देणं. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा यहोवा त्याबद्दल कसा विचार करतो हे समजून घेण्यासाठी वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स आणि यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक या साहित्यांची आपल्याला मदत होऊ शकते. यासोबतच, जेव्हा आपण आपल्या ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकतो, त्यांत सहभाग घेतो आणि तिथं शिकलेल्या गोष्टींवर मनन करतो तेव्हादेखील आपल्याला खूप फायदा होतो. यामुळे यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला मदत होते. याचा परिणाम म्हणजे, त्याचं मन आनंदित होईल असे निर्णय घेणं आपल्याला शक्य होतं आणि त्यामुळे आपल्याला आशीर्वादही मिळतात.

निर्णय घेण्याआधी यहोवाचा दृष्टिकोन विचारात घ्या

१३. यहोवाचा दृष्टिकोन समजून घेतल्यामुळे सुज्ञ निर्णय घेणं कसं शक्य आहे, ते उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१३ यहोवाचा दृष्टिकोन समजून घेतल्यामुळे सुज्ञ निर्णय घेणं कसं शक्य आहे, ते पाहण्याकरता आपण एक उदाहरण घेऊ या: समजा तुम्हाला पायनियर म्हणून सेवा करण्याची इच्छा आहे. प्रचारकार्यात जास्त वेळ देता यावा म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात काही बदलदेखील केले आहेत. पण कमी पैशात किंवा साध्या जीवनशैलीत मला खरंच आनंदी राहता येईल का, अशी शंका तुमच्या मनात आहे. अशा वेळी तुम्हाला योग्य निर्णय कसा घेता येईल? हे खरं आहे, की यहोवाची सेवा करण्याकरता आपण पायनियर असलंच पाहिजे असं बायबल सांगत नाही. उलट एक प्रचारक म्हणूनदेखील आपण विश्वासूपणे यहोवाची सेवा करू शकतो. पण दुसरीकडे पाहता येशूनं असंही सांगितलं होतं, की देवाच्या राज्यासाठी जे त्यागाची मनोवृत्ती दाखवतात त्यांना यहोवा आशीर्वादित करतो. (लूक १८:२९, ३० वाचा.) बायबल असंही सांगतं, की यहोवाची स्तुती करण्याकरता आपण होता होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यहोवाचं मन आनंदित होतं. आणि आपण त्याची सेवा आनंदानं करावी असं त्याला वाटतं. (स्तो. ११९:१०८; २ करिंथ. ९:७) या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जेव्हा आपण त्याविषयी प्रार्थना करतो आणि त्यावर मनन करतो, तेव्हा परिस्थितीनुसार सुज्ञ निर्णय घेण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते. शिवाय, अशा प्रकारे घेतलेल्या निर्णयांवर यहोवाचा आशीर्वादही असतो.

१४. एखादा विशिष्ट प्रकारचा पेहराव यहोवाला मान्य आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखू शकता?

१४ आणखी एक उदाहरण घ्या: समजा तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या फॅशनचे कपडे घालायला आवडत असतील. पण मंडळीतील काही लोकांना कदाचित ते आवडणार नाही हेदेखील तुम्हाला माहीत आहे. शिवाय, अशा कपड्यांबद्दल बायबलमध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही. मग त्याविषयी यहोवाचे विचार काय आहेत, हे तुम्हाला कसं कळेल? बायबलमध्ये सांगितलं आहे, की “स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे.” (१ तीम. २:९, १०) या वचनात दिलेलं तत्त्व यहोवाच्या सर्वच सेवकांना, म्हणजे पुरुषांनाही लागू होतो. त्यामुळे, जर आपण भिडस्तपणे किंवा मर्यादेने वागणारे असू, तर आपल्या पेहरावामुळे इतरांना काय वाटेल याचा विचार आपण नक्कीच करू. शिवाय बांधवांवर आपलं प्रेम असल्यामुळे त्यांना अडखळण होईल किंवा संकोच वाटेल असे कपडे घालण्याचं आपण नक्कीच टाळू. (१ करिंथ. १०:२३, २४; फिलिप्पै. ३:१७) अशा प्रकारे बायबल काय म्हणतं आणि एखाद्या गोष्टीबद्दल यहोवा काय विचार करतो, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर त्याला आवडतील असे निर्णय घेणं आपल्याला सहज शक्य होईल.

१५, १६. (क) आपण जर अनैतिक गोष्टींबद्दल विचार करत राहिलो तर यहोवाला कसं वाटतं? (ख) यहोवाला आनंद होईल अशा मनोरंजनाची आपण निवड कशी करू शकतो? (ग) आपण महत्त्वाचे निर्णय कसे घेतले पाहिजे?

१५ बायबल सांगतं, की मानवांमध्ये वाढलेला दुष्टपणा पाहून आणि त्यांच्या मनातील विचार एकसारखे वाईट आहेत, हे पाहून यहोवाला अतिशय दुःख होतं. (उत्पत्ति ६:५, ६ वाचा.) यावरून लैंगिक अनैतिकतेविषयी आपण स्वप्न रंगवत राहावं अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही, हे आपण समजू शकतो. कारण अशा गोष्टींवर विचार करत राहिल्यामुळे त्या गोष्टी आपल्या हातून वास्तविकतेत घडण्याचा धोका असतो. याउलट, आपण चांगल्या आणि नैतिक रीत्या शुद्ध असणाऱ्या गोष्टींवर विचार करावा असं यहोवाला वाटतं. येशूचा शिष्य याकोब यानं म्हटलं की, यहोवाचे ज्ञान हे “मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.” (याको. ३:१७) त्यामुळे अशुद्ध आणि वाईट गोष्टींवर विचार करण्यास किंवा अशा गोष्टींची इच्छा बाळगण्यास प्रवृत्त करेल असं मनोरंजन आपण टाळलं पाहिजे. शिवाय यहोवाला काय आवडतं आणि त्याला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे जर आपल्याला चांगल्या प्रकारे समजलं, तर मनोरंजनाकरता कोणते चित्रपट, खेळ किंवा पुस्तक आपण निवडले पाहिजे हे ठरवणं आपल्याला सोपं जाईल. त्यासाठी दुसऱ्याला विचारण्याची गरज पडणार नाही.

१६ निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा यहोवाला आवडेल असा निर्णय घेण्यासाठी बरेच पर्याय कदाचित आपल्याजवळ असतील. पण जेव्हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा मंडळीतील वडिलांचा, एखाद्या अनुभवी बांधवाचा किंवा बहिणीचा सल्ला घेणं योग्य राहील. (तीत २:३-५; याको. ५:१३-१५) पण अशा वेळी आपण स्वतःकरता त्यांना निर्णय घेण्यास सांगणार नाही. उलट, बायबलमधून आपल्याला जे समजलं आहे, त्यावर काळजीपूर्वक विचार करून आपण स्वतः निर्णय घेऊ. (इब्री ५:१४) हीच गोष्ट प्रेषित पौलानंदेखील सांगितली. त्यानं म्हटलं, “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”—गलती. ६:५.

१७. देवाला मान्य असतील असे निर्णय घेतल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात?

१७ यहोवाला आवडतील असे निर्णय घेतल्यामुळे, आपण त्याच्या आणखी जवळ जातो आणि आपल्याला त्याची संमती आणि त्याचे आशीर्वाददेखील मिळतात. (याको. ४:८) शिवाय, यामुळे यहोवावरील आपला विश्वासही आणखी बळकट होतो. म्हणून बायबलमध्ये आपण जे काही वाचतो त्यावर नेहमी मनन करू या, म्हणजे यहोवाची विचारसरणी आपल्याला समजून घेता येईल. यहोवाबद्दल आपल्याला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील यात शंका नाही. (ईयो. २६:१४) पण आपण आत्ताच त्याच्याबद्दल शिकण्याकरता परिश्रम घेतले, तर सुज्ञता प्राप्त करून योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत होईल. (नीति. २:१-५) मानवाचे विचार आणि त्याच्या योजना नेहमी बदलतात, पण यहोवा कधीही न बदलणारा देव आहे. म्हणूनच स्तोत्रकर्त्यानं म्हटलं: “परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्या न्‌ पिढ्या कायम राहतात.” (स्तो. ३३:११) तर मग हे अगदी स्पष्टच आहे, की जेव्हा आपले विचार आणि कृती यहोवाच्या विचारसरणीला अनुसरून असतात तेव्हाच योग्य निर्णय घेणं आपल्याला शक्य होतं.