व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १९

वाढत्या दुष्टाईतही यहोवा प्रेम आणि न्याय कसा दाखवतो

वाढत्या दुष्टाईतही यहोवा प्रेम आणि न्याय कसा दाखवतो

“तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस; दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही.”—स्तो. ५:४.

गीत ५४ खरा विश्‍वास बाळगू या!

सारांश *

१-३. (क) स्तोत्र ५:४-६ या वचनांनुसार दुष्टपणाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे? (ख) मुलांचं लैंगिक शोषण हे “ख्रिस्ताचा नियम” याच्या विरुद्ध आहे असं का म्हणता येईल?

यहोवा देव सर्व प्रकारच्या दुष्टाईचा द्वेष करतो. (स्तोत्र ५:४-६ वाचा.) त्यामुळे त्याला लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल किती तिरस्कार असेल याची आपण कल्पना करू शकतो. मुलांचं शोषण हे खूप घृणित आणि किळसवाणं पाप आहे. यहोवाचं अनुकरण करून आपणही मुलांच्या लैंगिक शोषणाचा द्वेष करतो आणि ख्रिस्ती मंडळीत अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याला कधीच खपवून घेत नाही.—रोम. १२:९; इब्री १२:१५, १६.

मुलांचं कोणत्याही प्रकारे केलं जाणारं शोषण हे “ख्रिस्ताचा नियम” याच्या अगदी विरुद्ध आहे! (गलती. ६:२) आपण असं का म्हणू शकतो? मागच्या लेखात आपण पाहिलं की ख्रिस्ताचा नियम म्हणजे, येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टी आणि आपल्यासाठी मांडलेलं उदाहरण. हा नियम प्रेमावर आधारलेला आहे आणि तो न्यायाला प्रोत्साहन देतो. खरे ख्रिस्ती या नियमाचं पालन करत असल्यामुळे ते मुलांशी प्रेमाने आणि त्यांना सुरक्षित वाटेल अशा प्रकारे व्यवहार करतात. पण याच्या अगदी उलट, मुलांचं शोषण हे एक स्वार्थी आणि चुकीचं कृत्य आहे. यामुळे मुलांना वाटू शकतं की ते असुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर कोणीच प्रेम करत नाही.

दुःखाची गोष्ट म्हणजे आज जगात मोठ्या प्रमाणावर मुलांचं लैंगिक शोषण होत आहे. आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांवरही याचा परिणाम झाला आहे. यामागचं कारण काय आहे? “दुष्ट व फसवी माणसे” आज सर्व ठिकाणी आहेत आणि यातील काही लोक मंडळीत येण्याचाही प्रयत्न करू शकतात. (२ तीम. ३:१३) यासोबतच, मंडळीचा भाग असल्याचा दावा करणाऱ्‍या काहींनी, त्यांच्या अनैसर्गिक शारीरिक इच्छांना बळी पडून लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं आहे. आता आपण पाहू या की मुलांचं लैंगिक शोषण हे इतकं गंभीर पाप का आहे. यानंतर आपण पाहू की गंभीर पाप घडल्यावर वडील ती परिस्थिती कशा प्रकारे हाताळतात, यात मुलांचं शोषणदेखील सामील आहे. मग आपण पाहू की आईवडील आपल्या मुलांचं संरक्षण कसं करू शकतात. *

एक गंभीर पाप

४-५. लैंगिक शोषण कोणत्या अर्थाने पीडित मुलांविरुद्ध एक पाप आहे?

लैंगिक शोषणाचा परिणाम दीर्घकाळापर्यंत असतो. ज्यांच्यासोबत हे वाईट कृत्य घडतं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर याचा परिणाम होतो. तसंच, अशा कुटुंबाला जवळून ओळखणाऱ्‍या बंधुभगिनींवरही याचा परिणाम होतो. मुलांचं लैंगिक शोषण हे खूप गंभीर पाप आहे.

पीडित मुलांविरुद्ध पाप. हे एक असं पाप आहे ज्यामुळे इतरांना अन्यायीपणे खूप दुःख दिलं जातं. मुलांचं शोषण करणारी व्यक्‍ती त्यांचं जीवन पूर्णपणे उद्ध्‌वस्त करून टाकते. पुढच्या लेखात आपण याबद्दल आणखी पाहणार आहोत. मुलं सहसा अशा व्यक्‍तीवर विश्‍वास ठेवतात, पण ती व्यक्‍ती याचा फायदा उचलून त्यांचं शोषण करते. ती त्या मुलांचा विश्‍वासघात करते. यामुळे त्यांना असुरक्षित वाटू लागतं. अशा प्रकारच्या घृणित पापापासून मुलांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तसंच, ज्यांच्यावर असा अन्याय झाला आहे त्यांना सांत्वन आणि मदत पुरवणंही खूप गरजेचं आहे.—१ थेस्सलनी. ५:१४.

६-७. लैंगिक शोषण हे कोणत्या अर्थाने मंडळीविरुद्ध आणि सरकारी अधिकाऱ्‍यांविरुद्ध पाप आहे?

मंडळीविरुद्ध पाप. मंडळीतील एखादी व्यक्‍ती जेव्हा मुलांचं लैंगिक शोषण करते, तेव्हा ती मंडळीवर कलंक आणते. (मत्त. ५:१६; १ पेत्र २:१२) अशा एका व्यक्‍तीमुळे “विश्‍वासाचे रक्षण” करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्‍या लाखो विश्‍वासू ख्रिश्‍चनांवरही कलंक लागतो. हा खरंतर त्यांच्यावर झालेला अन्यायच आहे. (यहू. ३) जे लोक पश्‍चात्ताप न करता गंभीर पाप करत राहतात आणि मंडळीच्या नावावर कलंक लावतात अशांना आपण मंडळीत कधीच राहू देत नाही.

सरकारी अधिकाऱ्‍यांविरुद्ध पाप. ख्रिश्‍चनांना सांगण्यात आलं आहे की त्यांनी “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे.” (रोम. १३:१) देशाचे कायदे पाळण्याद्वारे आपण अधिकाऱ्‍यांच्या अधीन असल्याचं दाखवत असतो. मंडळीतल्या एखाद्याने जर कायद्याचं उल्लंघन केलं, जसं की मुलांचं लैंगिक शोषण, तर मग तो सरकारी अधिकाऱ्‍यांविरुद्ध पाप करत आहे असा त्याचा अर्थ होईल. (प्रेषितांची कार्ये २५:८ पडताळून पाहा.) हे खरं आहे की मंडळीतल्या वडिलांना देशाच्या कायद्यानुसार इतरांना शिक्षा देण्याचा हक्क नाही. पण वडील कधीच मुलांचं शोषण करणाऱ्‍या व्यक्‍तीला कायद्यानुसार होणाऱ्‍या शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. (रोम. १३:४) त्याने केलेल्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागणार.—गलती. ६:७.

८. मानवांविरुद्ध होणाऱ्‍या पापांबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे?

सर्वात गंभीर म्हणजे, लैंगिक शोषण हे देवाविरुद्ध पाप आहे. (उत्प. ३९:९) जेव्हा एक व्यक्‍ती दुसऱ्‍याविरुद्ध पाप करते तेव्हा ती यहोवाविरुद्धही पाप करत असते. यहोवाने इस्राएल राष्ट्राला जे नियम दिले होते त्यातल्या एका नियमाचा विचार करा. नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं की जर एका व्यक्‍तीने आपल्या शेजाऱ्‍याकडे चोरी केली किंवा त्याला फसवलं तर तो “परमेश्‍वराविरूद्ध विश्‍वासघात” करत आहे. (लेवी. ६:२-४) यावरून आपल्याला कळतं, की मुलांचं लैंगिक शोषण करणारी मंडळीतली व्यक्‍ती देवाचा विश्‍वासघात करत आहे. कारण तिने त्या मुलाला फसवलं आहे. त्या लहान मुलाच्या भरवशाचा फायदा उचलून या व्यक्‍तीने त्याचं शोषण केलं आहे. यामुळे त्या मुलाच्या मनात असुरक्षिततेची भावना येते. मुलांचं शोषण करणारी व्यक्‍ती यहोवाच्या नावावर कलंक लावते. यामुळेच आपण अशा कृत्याचा तिरस्कार केला पाहिजे, कारण ते देवाविरुद्ध गंभीर पाप आहे.

९. यहोवाच्या संघटनेने बायबलवर आधारित कोणती माहिती पुरवली आहे आणि का?

गतकाळात यहोवाच्या संघटनेने मुलांचं शोषण या विषयावर बायबल आधारित बरीच माहिती प्रकाशित केली आहे. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांमधील लेखांमध्ये सांगण्यात आलं आहे की पीडित लोक भावनिक रीत्या कसं सावरू शकतात आणि इतर जण अशांना मदत व प्रोत्साहन कसं देऊ शकतात. शिवाय पालक मुलांचं संरक्षण कसं करू शकतात हे सांगणारेदेखील काही लेख आहेत. मुलांचं लैंगिक शोषण यासारखं गंभीर पाप जर मंडळीत घडलं तर ते कशा प्रकारे हाताळावं याबद्दल वडिलांना शास्त्रवचनीय प्रशिक्षण आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मंडळी अशा गंभीर पापाला ज्या प्रकारे हाताळते त्या प्रक्रियेची संघटना वेळोवेळी उजळणीदेखील करत असते. संघटना असं का करते? अशी परिस्थिती हाताळण्याची आपली पद्धत ख्रिस्ताच्या नियमावर आधारलेली आहे की नाही या गोष्टीची खातरी करणं हे यामागचं कारण आहे.

एखाद्याने गंभीर पाप केल्यावर वडिलांची भूमिका

१०-१२. (क) गंभीर पापाच्या बाबतीत वडील कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवतात आणि त्यांना कोणत्या गोष्टींची काळजी असते? (ख) याकोब ५:१४, १५ या वचनांनुसार वडील काय करण्याचा प्रयत्न करतात?

१० मंडळीत एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडलं तर त्याला मदत करताना वडील नेहमी हे लक्षात ठेवतात की ख्रिस्ताच्या नियमानुसार त्यांनी मंडळीतील सर्वांशी प्रेमाने वागणं गरजेचं आहे. तसंच, त्यांनी देवाच्या नजरेत जे योग्य ते करणंही गरजेचं आहे. यामुळेच, वडिलांना जेव्हा कळतं की एखाद्याने गंभीर पाप केलं आहे तेव्हा त्यांना काळजीपूर्वक विचार करावा लागतो. देवाच्या नावावर कोणत्याही प्रकारचा कलंक लागू नये ही वडिलांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते. (लेवी. २२:३१, ३२; मत्त. ६:९) यासोबतच बंधुभगिनींच्या आध्यात्मिकतेचीही त्यांना खूप काळजी असते. ज्या बंधुभगिनींवर अत्याचार झाला आहे अशांना मदत करायची त्यांची मनापासून इच्छा असते.

११ यासोबतच गंभीर पाप करणारा मंडळीतला असेल, तर यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध पुन्हा जोडण्यासाठीही वडील त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात यासाठी त्या व्यक्‍तीने आधी मनापासून पश्‍चात्ताप दाखवणं खूप गरजेचं आहे. (याकोब ५:१४, १५ वाचा.) आपल्या चुकीच्या इच्छांना बळी पडून गंभीर पाप करणारा ख्रिस्ती आध्यात्मिक रीत्या आजारी असतो. म्हणजेच यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध आता कमकुवत झालेला असतो. * वडिलांची तुलना आपण एका डॉक्टरसोबत करू शकतो. वडील “आजारी” व्यक्‍तीला म्हणजेच ज्या व्यक्‍तीने पाप केलं आहे तिला आध्यात्मिक रीत्या बरं करण्याचा प्रयत्न करतात. बायबलमधून दिलेल्या ताडनेमुळे तिला यहोवासोबतचा तिचा नातेसंबंध पुन्हा सुधारण्यास मदत मिळते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती घडलेल्या पापाबद्दल मनापासून पश्‍चात्ताप दाखवते.—प्रे. कार्ये ३:१९; २ करिंथ. २:५-१०.

१२ वडिलांवर खूप मोठी जबाबदारी असते. यहोवाने त्यांना मंडळीची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे, यामुळे ते मनापासून सर्वांची काळजी करतात. (१ पेत्र ५:१-३) बंधुभगिनींना मंडळीत सुरक्षित वाटावं अशी त्यांची इच्छा असते. यामुळेच, त्यांना जेव्हा एखाद्या गंभीर पापाबद्दल, जसं की मुलांचं लैंगिक शोषण याबद्दल कळतं तेव्हा ते लगेच पाऊल उचलतात. वडिलांच्या जबाबदारीबद्दल परिच्छेद  १३,  १५ आणि  १७ यांच्या सुरुवातीला दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा.

१३-१४. देशाच्या कायद्याचं पालन करून वडील मुलांच्या शोषणाच्या आरोपांबद्दल सरकारी अधिकाऱ्‍यांना कळवतात का? स्पष्ट करा.

 १३ देशाच्या कायद्याचं पालन करून वडील मुलांच्या शोषणाच्या आरोपांबद्दल सरकारी अधिकाऱ्‍यांना कळवतात का? हो. ज्या देशांमध्ये असे नियम आहेत, त्या ठिकाणी वडील त्यांचं पालन करून मुलांच्या शोषणाबद्दल लावलेल्या कोणत्याही आरोपांविषयी अधिकाऱ्‍यांना कळवतात. (रोम. १३:१) अशा प्रकारचे नियम देवाच्या नियमांच्या विरोधात नाहीत. (प्रे. कार्ये ५:२८, २९) यामुळे वडिलांना अशा एखाद्या आरोपाबद्दल समजल्यावर ते लगेच शाखा कार्यालयाकडून मदत घेतात आणि मग कायद्यानुसार जे गरजेचं आहे ते करतात.

१४ शोषणाला बळी पडलेली मुलं, त्यांचे आईवडील आणि या घटनेबद्दल ज्यांना माहिती आहे त्या सर्वांना वडील स्पष्टपणे सांगतात की या आरोपांबद्दल सरकारी अधिकाऱ्‍यांना सांगण्याचा अधिकार त्या सर्वांकडे आहे. पण मुलांचं शोषण करणारा मंडळीतला असला आणि याबद्दल समाजात इतरांना समजलं तर? ज्या बांधवाने याबद्दल सरकारी अधिकाऱ्‍यांना कळवलं तो असं करण्याद्वारे देवाच्या नावावर कलंक लावत आहे का? मुळीच नाही. उलट जो मुलांच्या शोषणासारखं गंभीर पाप करतो खरंतर तोच देवाच्या नावावर कलंक लावत असतो.

१५-१६. (क) १ तीमथ्य ५:१९ नुसार न्यायिक समितीने निर्णय घेण्याआधी दोन साक्षीदारांचं असणं गरजेचं का आहे? (ख) मंडळीतल्या एखाद्यावर मुलांचं शोषण करण्याचे आरोप लावण्यात आले तर वडील काय करतात?

 १५ न्यायिक समितीने मंडळीमध्ये एखाद्याविरुद्ध निर्णय घेण्याआधी, घडलेल्या प्रकाराचे कमीतकमी दोन साक्षीदार असणं का गरजेचं आहे? ही पात्रता खरंतर न्यायाच्या बाबतीत असलेल्या बायबलच्या उच्च स्तरांवर आधारलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्‍ती आपलं पाप कबूल करत नाही, तेव्हा तिला दोषी ठरवून तिच्यावर न्यायिक कार्यवाही करण्यासाठी दोन साक्षीदारांची गरज असते. (अनु. १९:१५; मत्त. १८:१६; १ तीमथ्य ५:१९ वाचा.) मग याचा अर्थ असा होतो का की लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल अधिकाऱ्‍यांना सांगण्याआधी घडलेल्या प्रकाराचे दोन साक्षीदार असणं गरजेचं आहे? नाही. ही पात्रता देशाच्या कायद्यानुसार घडलेल्या एखाद्या गुन्ह्याला लागू होत नाही. एखाद्या व्यक्‍तीने देशाचा कायदा मोडून गुन्हा केला तर त्या आरोपांबद्दल वडील किंवा इतर कोणीही सरकारी अधिकाऱ्‍यांना कळवू शकतो.

१६ मंडळीतल्या एखाद्याने मुलांचं लैंगिक शोषण केल्याचं वडिलांना कळलं, तर ते अशा आरोपांबद्दल अधिकाऱ्‍यांना कळवण्याच्या बाबतीत देशाचे जे काही नियम असतील त्यांचं पालन करतात. यानंतर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा वडील प्रयत्न करतात आणि मग बायबल तत्त्वांच्या आधारावर न्यायिक समिती नेमायची की नाही हे ठरवतात. जर त्या व्यक्‍तीने लावण्यात आलेले आरोप नाकारले, तर मग वडील घडलेल्या प्रकाराबद्दल साक्षीदारांचं ऐकून घेतात. जर दोन लोकांनी, म्हणजे जी व्यक्‍ती आरोप लावते ती आणि दुसरं कोणीतरी जिने घडलेला प्रकार किंवा त्या व्यक्‍तीने केलेली यांसारखी इतर कृत्यं पाहिली आहेत, या दोघांनी तिच्याविरुध्द साक्ष दिली तर तो आरोप सिद्ध होतो. मग वडील ही परिस्थिती हाताळण्यासाठी न्यायिक समिती नेमतात. * जर आरोप लावणाऱ्‍याशिवाय कोणीच दुसरा साक्षीदार नसला, तर याचा अर्थ असा होत नाही की ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत. दोन साक्षीदार नसल्यामुळे गंभीर पापाचे आरोप सिद्ध झाले नसले, तरी वडिलांना या गोष्टीची जाणीव असते की कदाचित गंभीर पाप घडलं असेल आणि यामुळे इतरांना खूप मानसिक त्रास झाला असेल. अशा सर्व बंधुभगिनींना वडील नियमितपणे सांत्वन आणि मदत पुरवत राहतात. यासोबतच, ज्या माणसावर लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत त्याच्यापासून मंडळीला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी वडील सावधगिरीही बाळगतात.—प्रे. कार्ये २०:२८.

१७-१८. न्यायिक समितीची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा.

 १७ न्यायिक समितीची जबाबदारी काय आहे? “न्यायिक” या शब्दाचा असा अर्थ होत नाही की अधिकाऱ्‍यांनी आरोपीला शिक्षा द्यायची की नाही हे वडील ठरवतील. कायद्याच्या प्रक्रियेत वडील कधीच हस्तक्षेप करत नाहीत. अशा प्रकारचे गुन्हे हाताळण्याची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्‍यांची आहे या गोष्टीची जाणीव त्यांना असते. (रोम. १३:२-४; तीत ३:१) याउलट, वडील फक्‍त हे ठरवतात की त्या व्यक्‍तीला मंडळीत ठेवायचं की तिला बहिष्कृत करायचं.

१८ न्यायिक समितीचे सदस्य या नात्याने वडील फक्‍त आध्यात्मिक गोष्टी हाताळतात. शोषण करणारी व्यक्‍ती पश्‍चात्ताप दाखवत आहे की नाही हे ते वचनांच्या आधारावर ठरवतात. जर त्या व्यक्‍तीने पश्‍चात्ताप दाखवला नाही तर तिला बहिष्कृत करण्यात येतं आणि मंडळीत याबद्दल घोषणा करण्यात येते. (१ करिंथ. ५:११-१३) पण जर तिने पस्तावा दाखवला तर कदाचित वडील तिला बहिष्कृत न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. असं असलं तरी त्या व्यक्‍तीला मंडळीत बरीच वर्षं किंवा कदाचित आयुष्यभर कोणत्याही प्रकारच्या जबाबदाऱ्‍या किंवा नेमणुकी मिळणार नाहीत हे वडील तिला सांगतील. मुलांच्या संरक्षणाचा विषय लक्षात घेता वडील कदाचित मंडळीतील इतर पालकांना त्या व्यक्‍तीबद्दल खासगीत सावध करतील. यामुळे दोषी व्यक्‍ती मंडळीत मुलांसोबत असताना पालक दक्षता बाळगू शकतात. पण त्यांना सावध करताना वडील पीडित मुलाची ओळख गोपनीय ठेवतील.

आपल्या मुलांचं संरक्षण कसं करायचं?

मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावं म्हणून पालक त्यांना लैंगिक संबंधाबद्दल योग्य माहिती देतात. असं करण्यासाठी पालक देवाच्या संघटनेने प्रकाशित केलेल्या माहितीचा उपयोग करतात (परिच्छेद १९-२२ पाहा)

१९-२२. मुलांचं संरक्षण करण्यासाठी पालक काय करू शकतात? (मुखपृष्ठावर दिलेलं चित्र पाहा.)

१९ मुलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कोणाची आहे? पालकांची. * तुमची मुलं यहोवाने तुम्हाला “दिलेले धन आहे.” (स्तो. १२७:३) यामुळे त्यांना सुरक्षित ठेवणं ही प्रामुख्याने तुमची जबाबदारी आहे. मुलांचं शोषण होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता?

२० पहिलं म्हणजे, शोषण का आणि कशा प्रकारचे लोक करतात याबद्दल माहिती घ्या. सहसा कशा प्रकारचे लोक मुलांचं शोषण करतात आणि मुलांना भुलवण्यासाठी ते काय करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. संभाव्य धोक्यांबद्दल सतर्क राहा. (नीति. २२:३; २४:३) सहसा असं पाहण्यात आलं आहे की मुलांचा ज्या लोकांवर भरवसा असतो असे ओळखीचे लोकच त्यांचं शोषण करतात.

२१ दुसरं म्हणजे, मुलांसोबत चांगला संवाद ठेवा. (अनु. ६:६, ७) यात त्यांचं लक्ष देऊन ऐकणं सामील आहे. (याको. १:१९) नेहमी लक्षात असू द्या की सहसा मुलं शोषणाबद्दल सांगायला कचरतात. आपल्यावर कोणी विश्‍वास ठेवणार नाही अशी भीती त्यांच्या मनात असू शकते. किंवा शोषण करणाऱ्‍या व्यक्‍तीने कदाचित मुलाला, ‘कोणाला सांगू नको’ असं धमकावलंही असेल. तुम्हाला जर जाणवलं की मुलं जरा वेगळी वागत आहेत, तर प्रेमळपणे प्रश्‍न विचारून त्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच, मुलं आपलं मन मोकळं करताना त्यांचं धीराने ऐका.

२२ तिसरं म्हणजे, मुलांना शिकवा. त्यांचं वय व समज यांनुसार त्यांना लैंगिक संबंधांबद्दल माहिती द्या. कोणी जर त्यांना चुकीच्या उद्देशाने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय बोलावं व करावं हे त्यांना शिकवा. मुलांचं संरक्षण कसं करावं याबद्दल आपल्या संघटनेने प्रकाशित केलेल्या माहितीचा उपयोग करा.—“ स्वतःला आणि मुलांना शिकवा” ही चौकट पाहा.

२३. मुलांचं शोषण याबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२३ यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण मुलांच्या शोषणाला एक गंभीर आणि घृणित पाप समजतो. ख्रिस्ताच्या नियमाचं पालन करत असल्यामुळे आपली मंडळी असं गंभीर पाप करणाऱ्‍याला त्याचे परिणाम भोगण्यापासून कधीच वाचवत नाही. पण ज्या बंधुभगिनींना या दुःखद अनुभवातून जावं लागलं आहे त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो? पुढच्या लेखात या प्रश्‍नाचं उत्तर देण्यात येईल.

गीत ४२ “दुर्बळांना साहाय्य करावे”

^ परि. 5 आपण मुलांना लैंगिक शोषणापासून सुरक्षित कसं ठेवू शकतो याबद्दल या लेखात चर्चा करण्यात येईल. मंडळीला सुरक्षित ठेवण्यासाठी वडील कसं पाऊल उचलतात याबद्दल आपण शिकणार आहोत. तसंच, आईवडील आपल्या मुलांचं संरक्षण कसं करू शकतात हेदेखील आपण शिकणार आहोत.

^ परि. 3 वाक्यांशांचं स्पष्टीकरण: एक प्रौढ व्यक्‍ती जेव्हा तिच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी लहान मुलाचा किंवा मुलीचा उपयोग करते तेव्हा त्या कृत्याला मुलांचं लैंगिक शोषण असं म्हटलं जातं. यात मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवणं, त्यांच्याबरोबर मुख किंवा गुद मैथुन करणं, त्यांच्या जननेंद्रियांना, स्तनांना किंवा ढुंगणाला कुरवाळणं किंवा इतर अनैसर्गिक कृत्यं करणं सामील आहेत. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा एका लहान मुलावर किंवा मुलीवर अत्याचार केला जातो, तेव्हा तिचा फायदा उचलला जातो आणि तिला इजा पोचवली जाते. पण यात त्या लहान मुलांचा काहीच दोष नसतो. ज्यांचं शोषण होतं त्यात मुलींची संख्या जास्त असली, तरी मुलांचंही शोषण केलं जातं. तसंच, शोषण करणारे सहसा पुरुष असले तरी काही स्त्रियाही मुलांचं लैंगिक शोषण करतात.

^ परि. 11 आध्यात्मिक रीत्या कमजोर असल्यामुळे एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडलं तरी त्याला त्याच्या कृत्याच्या परिणामांना सामोरं जावंच लागेल. त्याने केलेल्या चुकीच्या निवडींसाठी तोच पूर्णपणे जबाबदार आहे आणि त्यासाठी यहोवा त्याच्याकडूनच “हिशोब” घेईल.—रोम. १४:१२.

^ परि. 16 वडील जेव्हा लैंगिक शोषणाच्या आरोपीशी बोलतात तेव्हा ज्या मुलासोबत ते घडलं त्याला तिथे उपस्थित राहण्याची कधीच गरज नसते. त्या मुलाचे आईवडील किंवा त्या मुलाच्या जवळचं इतर कोणी वडिलांना त्या आरोपांबद्दल सांगू शकतो. असं करण्याद्वारे त्या मुलाच्या भावनिक स्थितीचा विचार केला जातो आणि यामुळे त्याला होणाऱ्‍या मानसिक त्रासापासून सुरक्षित ठेवलं जातं.

^ परि. 19 पालकांना जे सांगण्यात आलं आहे तेच इतरांच्या मुलांना वाढवणाऱ्‍या लोकांनाही लागू होतं.