व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २२

वैयक्‍तिक अभ्यासात सुधार करा

वैयक्‍तिक अभ्यासात सुधार करा

“कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.”—फिलिप्पै. १:१०.

गीत ४२ “दुर्बळांना साहाय्य करावे”

सारांश *

१. काहींना अभ्यास करण्याची इच्छा का नसते?

या शेवटल्या दिवसांत आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. फक्‍त आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अनेक बांधवांना तास न्‌ तास काम करावं लागतं. तर इतर जणांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बराच वेळ प्रवास करावा लागतो. आणि इतर काहींना आपल्या कुटुंबाला आर्थिक रीत्या मदत करण्यासाठी भरपूर अंगमेहनतीचं काम करावं लागतं. यामुळे मेहनत करणारे आपले बंधुभगिनी संध्याकाळपर्यंत पार थकून गेलेले असतात! मग अशा वेळी त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी शक्‍ती उरलेली नसते.

२. अभ्यास करण्यासाठी तुम्ही कोणती वेळ ठरवली आहे?

परिस्थिती कशीही असो, आपण बायबलचा आणि बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढलाच पाहिजे. कारण यावर यहोवासोबतचं आपलं नातं आणि सर्वकाळाचं जीवन अवलंबून आहे. (१ तीम. ४:१५) त्यासाठी काही जण दररोज सकाळी लवकर उठून घरात सर्वकाही शांत असताना अभ्यास करतात. पुरेशी झोप झाल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे विचार करणं शक्य होतं. तर इतर काही जण दिवसभराच्या कामानंतर काही वेळ बाजूला काढून अभ्यास आणि मनन करतात.

३-४. आपण किती माहिती वाचली आणि पाहिली पाहिजे याबद्दल कोणते फेरबदल करण्यात आले आहेत आणि का?

तुम्हीही मान्य कराल की अभ्यासासाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे. पण आपण अभ्यासासाठी कोणता विषय निवडावा? असा प्रश्‍न तुमच्या मनात येईल. तुम्ही कदाचित म्हणाल ‘वाचण्यासाठी भरपूर काही आहे आणि सगळंच वाचून काढणं सोपं नाही.’ काही जण सर्व प्रकाशनं वाचतात आणि बायबल आधारित व्हिडिओ पाहतात. पण बऱ्‍याच बांधवांना या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ काढणं कठीण जातं. नियमन मंडळाला या परिस्थितीची जाणीव आहे. म्हणूनच अलीकडे नियमन मंडळाने असा निर्णय घेतला की छापील आणि आपल्या वेबसाईटवर असलेले साहित्यं कमी करावीत.

उदाहरणार्थ, आता आपण इयरबुक ऑफ जेहोवाज विटनेसेस हे पुस्तक प्रकाशित करत नाही. कारण आपल्याला बरेचसे प्रोत्साहनदायक अनुभव jw.org® या वेबसाईटवर आणि दर महिन्याच्या ब्रॉडकास्टिंगच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतात. तसंच, टेहळणी बुरूजची सार्वजनिक आवृत्ती आणि सावध राहा! ही नियतकालिकं आता वर्षातून फक्‍त तीन वेळा प्रकाशित केली जातात. उपासनेचा भाग नसलेल्या गोष्टींना आपण जास्त वेळ द्यावा म्हणून हे फेरबदल केले नाहीत, तर “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत” यावर लक्ष केंद्रित करणं हा फेरबदल करण्याचा मुख्य हेतू होता. (फिलिप्पै. १:१०) अभ्यासात कोणत्या गोष्टी आपण आधी घेऊ शकतो आणि कोणत्या नंतर यावर आता आपण चर्चा करू या. तसंच, आपण बायबलच्या वैयक्‍तिक अभ्यासातून कशा प्रकारे पूर्णपणे फायदा घेऊ शकतो यावरही चर्चा करू या.

अभ्यासासाठी साहित्यं ठरवणं

५-६. आपण कोणत्या प्रकाशनांचा लक्षपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे?

सर्वात आधी आपण कोणतं साहित्य वाचलं पाहिजे? ते म्हणजे देवाचं वचन, बायबल. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आपण दररोज एक निश्‍चित वेळ देणं गरजेचं आहे. आता मंडळीच्या आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या बायबल वाचनाचे अध्याय कमी करण्यात आले आहेत. यामागचं कारण म्हणजे आपल्याला वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी जास्त वेळ मिळावा. आठवड्यासाठी दिलेले अध्याय फक्‍त वाचून काढणं हा आपला उद्देश नसला पाहिजे तर बायबलचा संदेश आपल्या हृदयापर्यंत पोहोचावा आणि आपलं यहोवासोबतचं नातं आणखी घनिष्ठ व्हावं हा असला पाहिजे.—स्तो. १९:१४.

आपण आणखी कोणत्या साहित्यांचा लक्षपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे? टेहळणी बुरूज अभ्यासासाठी असलेला लेख, आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या मंडळीच्या बायबल अभ्यासाचा भाग आणि त्या सभेतले इतर भाग यांची आपण चांगली तयारी करणं गरजेचं आहे. पण त्यासोबतच आपण टेहळणी बुरूजची सार्वजनिक आवृत्ती आणि सावध राहा! यांचे प्रत्येक अंक वाचणंदेखील गरजेचं आहे.

७. आपण वेबसाईटवर आलेले सर्व लेख आणि JW ब्रॉडकास्टिंगवर आलेले सर्व व्हिडिओ पाहू शकत नसलो तर आपल्याला निराश होण्याची गरज आहे का?

तुम्ही म्हणाल ‘हे सर्व तर ठीक आहे, पण jw.org आणि JW ब्रॉडकास्टिंग यांबद्दल काय? यांत इतकी माहिती आहे की आपण ती सर्व पाहतोच असं नाही, काही राहूनही जाते!’ एका उदाहरणावर विचार करा. रेस्टॉरंटमध्ये बुफे पद्धतीच्या जेवणात निरनिराळ्या प्रकारचे भरपूर चविष्ट पदार्थ असतात. जेवायला येणाऱ्‍यांना त्यांतले सगळेच पदार्थ चाखणं शक्य नसतं. त्यामुळे ते काही मोजकेच पदार्थ निवडतात. त्याच प्रकारे वेबसाईटवर आलेले सर्वच लेख आपण वाचू शकत नसलो किंवा व्हिडिओ पाहू शकत नसलो तर निराश होऊ नका. तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं वाचा आणि पाहा. आता आपण पाहू या की अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय आणि त्यातून जास्तीत जास्त आपण फायदा कसा मिळवू शकतो.

अभ्यासासाठी मेहनत घ्यावी लागते

८. टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो आणि त्या गोष्टी केल्याने आपल्याला कोणते फायदे होतील?

अभ्यास करताना लक्षपूर्वक वाचन केल्याने महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील. अभ्यास करणं म्हणजे फक्‍त भरभर वाचन करून उत्तरं अधोरेखित करणं असं नाही. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करताना सर्वात आधी लेखाचा सारांश वाचा. त्यानंतर शीर्षक, उपशीर्षकं आणि उजळणीचे प्रश्‍न वाचा व त्यावर विचार करा. त्यानंतर तो लेख सावकाश आणि लक्ष देऊन वाचा. प्रत्येक परिच्छेद वाचताना एका गोष्टीकडे लक्ष द्या. ती म्हणजे त्यात एक असं वाक्य असतं जे संपूर्ण परिच्छेदाबद्दल माहिती देतं आणि ते सहसा प्रत्येक परिच्छेदाच्या सुरुवातीला असतं. बऱ्‍याचदा या वाक्यामुळे परिच्छेदात कोणता मुद्दा समजवण्यात आला आहे हे स्पष्ट होतं. लेख वाचताना प्रत्येक परिच्छेद हा उपशीर्षकं आणि मुख्य शीर्षक यांच्याशी कसा संबंधित आहे ते पाहा. तयारी करताना आधी माहीत नसलेले शब्द आणि मुद्दे आढळल्यास त्याची नोंद करा म्हणजे त्यावर तुम्हाला नंतर संशोधन करता येईल.

९. (क) आपण टेहळणी बुरूजच्या अभ्यासादरम्यान खासकरून वचनांकडे का लक्ष दिलं पाहिजे आणि हे कसं करता येईल? (ख) यहोशवा १:८ यानुसार आपण वचनं वाचण्यासोबत आणखी काय केलं पाहिजे?

मंडळीत टेहळणी बुरूजचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला बायबल समजायला मदत होते. म्हणून मंडळीत अभ्यासादरम्यान लेखात दिलेल्या वचनांकडे लक्ष द्या; खासकरून अशा वचनांकडे जी वाचली जातील. वचनांत दिलेले मुख्य शब्द किंवा वाक्यांश, परिच्छेदात दिलेल्या मुख्य मुद्द्‌याला कसं स्पष्ट करतात त्याकडे लक्ष द्या. त्यासोबतच, वचनं वाचताना त्यावर मनन करण्यासाठी वेळ द्या आणि ती आपल्या जीवनात कशा प्रकारे लागू करू शकतो याचा विचार करा.—यहोशवा १:८ वाचा.

पालकांनो, अभ्यास कसा करायचा हे आपल्या मुलांना शिकवा (परिच्छेद १० पाहा) *

१०. इब्री लोकांना ५:१४ या वचनानुसार कौटुंबिक उपासनेदरम्यान पालकांनी आपल्या मुलांना अभ्यास आणि संशोधन कसं करावं हे का शिकवलं पाहिजे?

१० दर आठवडी होणाऱ्‍या कौटुंबिक उपासनेत मुलांना आनंद व्हावा अशी पालकांची इच्छा असते. हे खरं आहे की कौटुंबिक उपासनेसाठी पालकांनी विषय आधीच ठरवला पाहिजे. पण प्रत्येक वेळी काहीतरी खास किंवा लक्षवेधक प्रोजेक्ट केलेच पाहिजेत हे गरजेचं नाही. तुम्ही कौटुंबिक उपासनेदरम्यान JW ब्रॉडकास्टिंगवर दर महिन्याला येणारा कार्यक्रम पाहत असाल किंवा कधी-कधी खास प्रोजेक्ट हाती घेत असाल जसं की, नोहाच्या जहाजाचा नमुना बनवणं. पण यासोबतच, अभ्यास कसा करावा याबद्दलही मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, सभांची तयारी कशी करावी किंवा शाळेत एखादी समस्या उद्‌भवली तर त्यावर संशोधन कसं करावं हे त्यांना शिकवण्याची गरज आहे. (इब्री लोकांना ५:१४ वाचा.) मुलांनी घरी बायबल विषयांवर अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर त्यांना सभेत, संमेलनात आणि अधिवेशनात लक्ष देणं सोपं जाईल. कारण प्रत्येक वेळी अशा सभांमध्ये व्हिडिओ दाखवलाच जाईल असं नाही. मुलांसोबत अभ्यास किती वेळ करावा हे ठरवताना पालक त्यांचं वय आणि व्यक्‍तिमत्त्व विचारात घेऊ शकतात.

११. सखोल अभ्यास कसा करावा हे आपल्या बायबल विद्यार्थ्यांना शिकवणं का महत्त्वाचं आहे?

११ अभ्यास कसा करावा हे आपल्या बायबल विद्यार्थ्यांनीही शिकणं गरजेचं आहे. विद्यार्थी सुरुवातीला बायबल अभ्यासासाठी किंवा सभांसाठी तयारी करताना उत्तरं अधोरेखित करतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण आपण तेवढ्यावरच थांबू नये, आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी स्वतः संशोधन आणि सखोलपणे अभ्यास करायला शिकलं पाहिजे. मग असं केल्यामुळे, त्यांच्या जीवनात समस्या आल्या की ते लगेच मंडळीतल्या इतर जणांकडे मदतीसाठी धाव घेणार नाहीत तर स्वतः समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. कारण प्रकाशनांत संशोधन करून व्यावहारिक सल्ले कसे मिळवावेत हे त्यांना माहीत झालं असेल.

उद्देश लक्षात ठेऊन अभ्यास करा

१२. आपण अभ्यास करताना कोणते उद्देश ठेवू शकतो?

१२ तुम्ही एक अभ्यासू व्यक्‍ती नसाल तर अभ्यासाप्रती आवड निर्माण करणं अशक्य आहे असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण हे खरं नाही, तुम्हाला ते जमेल. तुम्ही सुरुवातीला थोड्या वेळासाठी अभ्यास करू शकता आणि मग हळूहळू आपल्या अभ्यासाचा वेळ वाढवू शकता. अभ्यासादरम्यान तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात हे नेहमी लक्षात असू द्या. खरंतर, देवासोबत नातं घनिष्ठ करणं हा जरी शेवटी आपल्या अभ्यासाचा मुख्य उद्देश असला तरी आपण इतर काही उद्देश लगेच साध्य करू शकतो. जसं की, विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देणं किंवा समस्येचा उपाय शोधण्यासाठी संशोधन करणं.

१३. (क) शाळेत जाणारी व्यक्‍ती आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगण्यासाठी कोणती पावलं उचलू शकते? स्पष्ट करा. (ख) कलस्सैकर ४:६ मध्ये दिलेला सल्ला तुम्ही कसा लागू करू शकता?

१३ उदाहरणार्थ, तुम्ही शाळेत शिकणारी एक व्यक्‍ती आहात आणि तुमचे सर्व वर्गसोबती वाढदिवस साजरा करत असतील. तुम्ही त्यात का भाग घेत नाही हे तुम्हाला त्यांना बायबलमधून समजावून सांगावंसं वाटेल. पण तसं करणं तुम्हाला जमेल की नाही असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं. मग अशा परिस्थितीत तुमच्याजवळ अभ्यास करण्याची एक चांगली संधी आहे. अभ्यासादरम्यान तुम्ही दोन उद्देश लक्षात ठेवू शकता: (१) वाढदिवस साजरा करणं देवाला नापसंत आहे याची स्वतःला आणखी खातरी पटवून देणं आणि (२) सत्य समजून सांगण्याच्या कौशल्यात आणखी निपुण होणं. (मत्त. १४:६-११; १ पेत्र ३:१५) तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘माझे वर्गसोबती वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणती कारणं देतात?’ मग आपल्या प्रकाशनांमधून लक्षपूर्वक संशोधन करा. मग तुम्हाला जाणवेल की तुमच्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगणं तुम्हाला वाटत होतं तितकं कठीण नाही. बरेच लोक फक्‍त यासाठी वाढदिवस साजरा करतात कारण त्यांना वाटतं की इतर सर्व जण वाढदिवस साजरा करतात. तुम्हाला संशोधन करताना फक्‍त एक किंवा दोन मुद्दे जरी सापडले, तरी एका प्रामाणिक मनाने प्रश्‍न विचारणाऱ्‍याला तुम्ही समाधानकारक उत्तर देऊ शकाल.कलस्सैकर ४:६ वाचा.

अभ्यासाची आवड वाढवा

१४-१६. (क) तुम्हाला बायबलच्या एखाद्या पुस्तकाबद्दल कमी माहिती असल्यास तुम्ही त्याबद्दल जास्त माहिती कशी मिळवू शकता? (ख) उल्लेख केलेली वचनं तुम्हाला आमोसचं पुस्तक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी कशी मदत करू शकतात? (“ बायबलमधली व्यक्‍तिरेखा जिवंत करा” ही चौकट पाहा.)

१४ समजा सभेत आपण बायबलमधल्या पुस्तकांपैकी एका लहान भविष्यवाणीच्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला कदाचित या पुस्तकाच्या लेखकाविषयी जास्त माहीत नसेल. मग अशा वेळी जास्त माहिती करून घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी कोणतं पाऊल उचलाल? तुम्ही त्या लेखकाने काय लिहिलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही हे कसं करू शकता?

१५ सर्वात आधी स्वतःला प्रश्‍न विचारा: ‘पुस्तक लिहिणाऱ्‍या लेखकाबद्दल मला काय माहीत आहे? तो कोण होता, कुठे राहायचा आणि त्याचा व्यवसाय काय होता?’ त्या लेखकाबद्दल जास्त माहिती मिळवल्याने त्याने काही विशिष्ट शब्द किंवा उदाहरणं का वापरली हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल. बायबल वाचत असताना अशा वाक्यांकडे विशेष लक्ष द्या ज्यांवरून तुम्हाला त्या लेखकाचं व्यक्‍तिमत्त्व समजायला मदत होईल.

१६ दुसरं म्हणजे, बायबलचं पुस्तक कधी लिहिण्यात आलं हे माहीत करून घेतल्यानेही तुम्हाला मदत होईल. याबद्दलची माहिती तुम्हाला पवित्र शास्त्र का नयी दुनिया अनुवाद यामध्ये “बायबल किताबों की सूची” यात सहज मिळेल. तसंच, तुम्ही अभ्यास मार्गदर्शिका या पुस्तिकेच्या भाग ३ मध्ये ‘यहूदाचे आणि इस्राएलचे संदेष्टे व राजे’ हा तक्‍ता पाहू शकता. तुम्ही जर बायबलमधल्या एका भविष्यवाणीच्या पुस्तकाचा अभ्यास करत असाल तर ते लिहिलं जात असताना आजूबाजूची परिस्थिती कशी होती हे माहीत करून घेणंही फायद्याचं ठरेल. जसं की, त्या वेळी संदेष्ट्याला लोकांची कोणती वाईट मनोवृत्ती किंवा कार्य सुधारण्यासाठी पाठवलं होतं? त्याच काळात आणखी बायबल लेखक होते का? त्यासोबतच तेव्हाची परिस्थिती आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्हाला कदाचित इतर बायबल पुस्तकांमध्येही संशोधन करावं लागेल. हे समजण्यासाठी आपण आमोसचं उदाहरण घेऊ या. आमोस ज्या काळात जगला त्या काळाची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आमोस १:१ या वचनासाठी समासात दिलेली २ राजे आणि २ इतिहास या पुस्तकांतली वचनं वाचा. त्यासोबतच, तुम्ही होशेयचं पुस्तकही वाचू शकता. कारण तो आमोसच्या काळातला होता. या सर्व माहितीवरून तुम्हाला आमोसच्या काळात कशी परिस्थिती होती हे समजून घ्यायला मदत होईल.—२ राजे १४:२५-२८; २ इति. २६:१-१५; होशे. १:१-११; आमो. १:१.

बारीकसारीक माहितीकडे लक्ष द्या

१७-१८. आपल्याला बायबलमधल्या कमी महत्त्वाच्या वाटत असलेल्या माहितीकडे लक्ष दिल्याने वैयक्‍तिक अभ्यास आनंददायी कसा होऊ शकतो, यासाठी परिच्छेदातलं किंवा तुम्ही स्वतः संशोधन केलेलं एखादं उदाहरण द्या.

१७ बायबल वाचताना त्यातून आणखी जास्त शिकण्याची उत्सुकता असणं ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. कल्पना करा, तुम्ही जखऱ्‍या पुस्तकाचा १२वा अध्याय वाचत आहात. त्यात मसीहाच्या मृत्यूबद्दलची भविष्यवाणी करण्यात आली आहे. (जख. १२:१०) मग तुम्हाला १२व्या वचनात “नाथानाचे घराणे” मसीहाच्या मृत्यूमुळे खूप दुःखी होतील आणि शोक करतील ही माहिती मिळते. त्या वचनातले शब्द पटकन वाचून पुढे जाण्याऐवजी थोडं थांबून स्वतःला प्रश्‍न विचारा: “नाथानचं घराणं आणि मसीहा यांच्यात काय संबंध आहे? याबद्दल आणखी माहिती कुठून मिळू शकते?” आता तुम्हाला गुप्तहेर ज्या प्रकारे खऱ्‍या माहितीचा शोध घेतो त्या प्रकारे काम करावं लागेल. यासाठी तुम्ही पवित्र शास्त्र का नयी दुनिया अनुवाद यात जखऱ्‍या १२:१२ हे वचन पाहू शकता. या वचनासाठी समासातल्या संदर्भात २ शमुवेल ५:१३, १४ आणि लूक ३:२३, ३१ ही वचनं दिली आहेत. २ शमुवेल ५:१३, १४ या वचनांत सांगितलं आहे की नाथान हा दावीदचाच एक मुलगा होता. तसंच, लूक ३:२३, ३१ यातून कळतं की येशू हा मरीयाद्वारे नाथानच्या वंशातून आला आहे. (टेहळणी बुरूज ऑगस्ट २०१७, पृ. ३२ परि. ४ पाहा.) या माहितीमुळे तुमची उत्सुकता आणखी वाढते! येशू दावीदच्या वंशातून येणार होता हे तर तुम्हाला माहीत होतं. (मत्त. २२:४२) पण दावीदला तर २० पेक्षा जास्त मुलं होती. तेव्हा जखऱ्‍याने येशूच्या मृत्यूबद्दल शोक करण्यासंबंधी दिलेल्या माहितीत नाथानच्या घराण्याचा खास उल्लेख केला ही गोष्ट खरंच खूप लक्षवेधक नाही का!

१८ आणखी एका उदाहरणाकडे लक्ष द्या. लूक पुस्तकाच्या पहिल्या अध्यायातून आपल्याला कळतं की गब्रीएल देवदूत मरीयाला भेटला आणि ती जन्म देणार असलेल्या मुलाबद्दल त्याने तिला म्हटलं: “तो महान होईल आणि त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील आणि यहोवा त्याला त्याच्या पित्याचे अर्थात दावीदचे सिंहासन देईल, आणि राजा या नात्याने तो याकोबच्या घराण्यावर सदासर्वकाळ राज्य करेल.” (लूक १:३२, ३३) हे वचन वाचताना आपलं लक्ष कदाचित गब्रीएल देवदूताने येशूला “सर्वोच्च देवाचा पुत्र” म्हटलं या शब्दांकडे जाईल. पण गब्रीएल देवदूताने पुढे येशू हा ‘राजा या नात्याने म्हणून राज्य करेल’ असंही म्हटलं. गब्रीएलच्या शब्दांबद्दल मरीया काय विचार करत असेल असा प्रश्‍न आपण स्वतःला विचारू शकतो. येशू हा हेरोद राजाची जागा घेईल किंवा हेरोदचं राजपद पुढे चालवेल असा विचार मरीयाने कदाचित केला असेल का? येशू जर हेरोद राजाच्या जागी राजा बनला तर मरीया ही राजमाता म्हणून ओळखली जाईल आणि तिचं कुटुंब राजमहालात राहील असा तिने विचार केला का? पण मरीयाने गब्रीएलला असं काही विचारल्याचं बायबलमध्ये आढळत नाही. तसंच, येशूच्या दोन शिष्यांनी येशूला त्याच्या राज्यात त्यांना खास जागा मिळावी म्हणून विचारलं होतं. पण मरीयाने येशूला त्याच्या राज्यात एखादी खास पदवी मिळावी म्हणून विनंती केल्याचं आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही. (मत्त. २०:२०-२३) या लहानशा माहितीवरून मरीया किती नम्र होती याची आपल्याला आणखी जास्त खातरी पटते.

१९-२०. याकोब १:२२-२५; ४:८ या वचनांत सांगितल्याप्रमाणे अभ्यास करताना आपला उद्देश काय असला पाहिजे?

१९ बायबल आणि आपले ख्रिस्ती प्रकाशनं वाचण्याचा मुख्य उद्देश देवासोबत एक चांगलं नातं जोडणं आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच, “आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत” आणि देवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्याला कोणते बदल केले पाहिजेत हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचीही आपली इच्छा आहे. (याकोब १:२२-२५; ४:८ वाचा.) प्रत्येक वेळी अभ्यास सुरू करण्याआधी आपण देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करायला हवी. आपल्याला वाचलेल्या माहितीचा फायदा व्हावा आणि कोणकोणते बदल करण्याची गरज आहे हे स्पष्टपणे समजावं यासाठी आपण कळकळून विनंती केली पाहिजे.

२० स्तोत्रकर्त्याने उल्लेख केलेल्या देवाच्या विश्‍वासू सेवकासारखं बनण्याची आपलीही इच्छा आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटलं की तो: “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. . . .आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”—स्तो. १:२, ३.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

^ परि. 5 यहोवा आपल्याला उदारतेने भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. त्याने आपल्याला पाहण्यासाठी व्हिडिओ, वाचण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी साहित्यं दिली आहेत. आपण कोणत्या विषयावर अभ्यास करावा आणि आपल्या वैयक्‍तिक अभ्यासातून पूर्णपणे फायदा कसा मिळवावा यासाठी या लेखात काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत.

^ परि. 61 चित्रांचं वर्णन: पालक आपल्या मुलांना टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी कशी करावी हे शिकवत आहेत.

^ परि. 63 चित्रांचं वर्णन: एक बांधव आमोस पुस्तकाच्या लेखकाबद्दल संशोधन करत आहे. बांधवाच्या मागे असलेल्या चित्रांवरून कळतं, की तो बायबल वाचताना आणि त्यावर मनन करताना आपल्या कल्पनाशक्‍तीचा वापर करून अहवाल आपल्या डोळ्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न करत आहे.