व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १९

अंताच्या समयी “उत्तरेचा राजा”

अंताच्या समयी “उत्तरेचा राजा”

“अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला [उत्तरेच्या राजाला] टक्कर देईल.”—दानी. ११:४०.

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

सारांश *

१. बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाणीतून आपल्याला काय कळतं?

यहोवाच्या लोकांसोबत लवकरच काय घडणार आहे याचं उत्तर आज आपल्याकडे आहे. कारण भविष्यात लवकरच घडणाऱ्‍या घटनांबद्दल बायबल आपल्याला सांगतं. खासकरून, बायबलमध्ये दिलेल्या एका भविष्यवाणीवरून आपल्याला कळतं की पृथ्वीवरची सर्वात शक्‍तिशाली राष्ट्रं लवकरच काय करणार आहेत. ही भविष्यवाणी दानीएलच्या ११ व्या अध्यायात दिली आहे. त्यात आपसात लढणाऱ्‍या दोन राजांबद्दल सांगितलं आहे. त्यातला एक आहे उत्तरेचा राजा आणि दुसरा आहे दक्षिणेचा राजा. या भविष्यवाणीतला बहुतेक भाग पूर्ण झालेला आहे. त्यामुळे उरलेला भागसुद्धा नक्की पूर्ण होईल हे आपण खातरीने म्हणू शकतो.

२. दानीएलच्या भविष्यवाणीचं परीक्षण करताना उत्पत्ति ३:१५, प्रकटीकरण ११:७ आणि १२:१७ या वचनांत सांगितलेल्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे?

दानीएल पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात दिलेली भविष्यवाणी समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे, देवाच्या लोकांसोबत थेटपणे संबंध असलेल्या राजांचा आणि सरकारांचाच यात उल्लेख करण्यात आला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत देवाच्या लोकांची संख्या फार कमी आहे. तरीसुद्धा ही सरकारं देवाच्या लोकांचा छळ का करतात? कारण सैतान आणि त्यांच्या समर्थकांचा एकच उद्देश आहे. तो म्हणजे यहोवा आणि येशूची सेवा करणाऱ्‍या लोकांचा नाश करणं. (उत्पत्ति ३:१५; प्रकटीकरण ११:७; १२:१७ वाचा.) तसंच, दानीएलने केलेली भविष्यवाणी आणि बायबलमध्ये दिलेल्या इतर भविष्यवाण्यांचा मेळ बसणंही गरजेचं आहे. खरंतर, दानीएलने केलेली भविष्यवाणी अचूक रीत्या समजून घेण्यासाठी बायबलमध्ये दिलेल्या इतर भविष्यवाण्यांसोबत त्याची तुलना करणं गरजेचं आहे.

३. या लेखात आणि पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण दानीएल ११:२५-३९ या वचनांचं परीक्षण करणार आहोत. १८७० ते १९९१ या वर्षांदरम्यान उत्तरेचा राजा कोण होता आणि दक्षिणेचा राजा कोण होता, हे आपण पाहणार आहोत. तसंच, या भविष्यवाणीतल्या एका भागाची आपली समज सुधारण्याची गरज का आहे, हेही आपण पाहू. पुढच्या लेखात आपण दानीएल ११:४०–१२:१ या वचनांवर चर्चा करणार आहोत. या वचनांची एक सुधारित समज आपण पाहणार आहोत. तसंच, १९९१ ते हर्मगिदोनचं युद्ध या काळादरम्यान घडणाऱ्‍या घटनांबद्दलही आपण पाहू या. या दोन लेखांचा अभ्यास करत असताना ‘अंताच्या समयी लढणारे दोन राजे’ या तक्त्याचा वापर करा. पण सर्वात आधी, भविष्यवाणीत उल्लेख केलेले दोन राजे कोण आहेत हे आपण पाहू या.

उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा ओळखणं

४. कोणत्या तीन गोष्टींमुळे आपल्याला उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांना ओळखण्यासाठी मदत होईल?

सुरुवातीला “उत्तरेचा राजा” इस्राएलच्या उत्तर भागांवर राज्य करणाऱ्‍या राजाला सूचित करायचा आणि “दक्षिणेचा राजा” इस्राएलच्या दक्षिण भागांवर राज्य करणाऱ्‍या राजाला सूचित करायचा. असं आपण का म्हणू शकतो? कारण दानीएलला संदेश सांगणाऱ्‍या देवदूताने म्हटलं: “या अंताच्या दिवसांमध्ये तुझ्या लोकांचे  काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे.” (दानी. १०:१४) इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापर्यंत इस्राएलमध्ये राहणारे लोक देवाचे लोक होते. पण त्यानंतर यहोवाने स्पष्ट केलं की येशूचे विश्‍वासू शिष्यच आपले लोक असतील. त्यामुळे दानीएलच्या ११ व्या अध्यायात दिलेली भविष्यवाणी इस्राएल राष्ट्राबद्दल नसून ख्रिस्ताच्या अनुयायांबद्दल आहे. (प्रे. कार्ये २:१-४; रोम. ९:६-८; गलती. ६:१५, १६) तसंच, वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजांनी किंवा सरकारांनी उत्तरेच्या राजाची आणि दक्षिणेच्या राजाची भूमिका घेतली. असं असलं तरीही या राजांमध्ये काही गोष्टी समान होत्या. पहिली गोष्ट, हे राजे अशा देशांवर राज्य करत होते जिथे देवाचे बरेचसे लोक राहत होते किंवा ज्यांचा त्यांनी छळ केला होता. दुसरी गोष्ट, ते देवाच्या लोकांसोबत ज्या पद्धतीने वागले त्यावरून दिसून आलं की ते खरा देव, यहोवा याचा द्वेष करत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्यात सर्वात शक्‍तिशाली कोण हे सिद्ध करण्यासाठी हे दोन राजे एकमेकांशी लढत राहिले.

५. दुसऱ्‍या शतकापासून ते १८७० पर्यंत कोणी उत्तरेचा किंवा दक्षिणेचा राजा होता का? स्पष्ट करा.

दुसऱ्‍या शतकादरम्यान ख्रिस्ती मंडळीत बरेच खोटे ख्रिस्ती येऊ लागले. त्यांनी खोट्या धर्मातल्या शिकवणी शिकवल्या आणि देवाच्या वचनातलं सत्य लपवलं. तेव्हापासून ते १८७० पर्यंत या पृथ्वीवर देवाच्या लोकांचा एक संघटित गट नव्हता. खोटे ख्रिस्ती शेतातल्या जंगली गवताप्रमाणे वाढत चालले होते. त्यामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांना ओळखणं कठीण होतं. (मत्त. १३:३६-४३) दुसऱ्‍या शतकापासून ते १८७० पर्यंत ज्या राजांनी किंवा सरकारांनी राज्य केलं त्यांपैकी कोणीच उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या राजाची जागा घेऊ शकत नव्हतं. असं आपण का म्हणू शकतो? कारण यादरम्यान देवाच्या लोकांचा संघटित असा कोणताच गट नव्हता, ज्यावर ते हल्ला करू शकत होते. * पण १८७० नंतर उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांची ओळख पटली.

६. एक गट या नात्याने देवाचे लोक पुन्हा एकदा कधीपासून संघटित होऊ लागले? स्पष्ट करा.

१८७० पासून देवाचे लोक एक गट म्हणून संघटित होऊ लागले. या वर्षापासून बंधू चार्ल्झ टेज रस्सल आणि त्यांचे सोबती यांनी बायबलचा खोलवर अभ्यास करायला सुरू केला. बंधू रस्सल आणि त्यांचे सोबती अशा निरोप्याप्रमाणे होते ज्यांनी मसीहाचं राज्य स्थापित होण्याआधी त्यासाठी मार्ग तयार केला. (मला. ३:१) देवाचे लोक कोण आहेत यांची ओळख पुन्हा एकदा पटली. मग त्या वेळी अशी कोणती सरकारं होती का ज्यांनी देवाच्या लोकांचा छळ केला? हे आता आपण पाहू या.

दक्षिणेचा राजा कोण आहे?

७. पहिल्या महायुद्धापर्यंत दक्षिणेचा राजा कोण होता?

१८७० नंतर ब्रिटनचं साम्राज्य पृथ्वीवरचं सर्वात मोठं साम्राज्य बनलं. आणि त्याच्याकडे सर्वात जास्त शक्‍तिशाली सैन्य होतं. दानीएलच्या भविष्यवाणीत सांगितलं होतं की एक लहान शिंग तीन लहान शिंगांवर मात करेल. ब्रिटन हे एका लहानशा शिंगाला सूचित करतं. आणि ती तिन शिंगं म्हणजे फ्रान्स, स्पेन आणि नेदरलँड्‌झ. (दानी. ७:७, ८) त्यामुळे पहिल्या महायुद्धापर्यंत ब्रिटन हा दक्षिणेचा राजा होता असं म्हणता येईल. या काळादरम्यान अमेरिका आर्थिक रीत्या जगातलं सर्वात शक्‍तिशाली राष्ट्र बनलं आणि ब्रिटनसोबत त्याचे चांगले संबंध तयार झाले.

८. शेवटच्या काळाची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत दक्षिणेचा राजा कोण आहे?

पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिका आणि ब्रिटन यांनी एकत्र युद्ध लढलं. आणि त्यांचं सैन्य सर्वात शक्‍तिशाली होतं. त्या वेळी या दोन राष्ट्रांनी मिळून अँग्लो-अमेरिका म्हणजे ब्रिटन-अमेरिका ही महासत्ता तयार केली. दानीएलच्या भविष्यवाणीनुसार या महासत्तेने फार मोठी व पराक्रमी फौज तयार केली. (दानी. ११:२५) पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत ब्रिटन-अमेरिका हाच दक्षिणेचा राजा आहे. * मग प्रश्‍न येतो की उत्तरेचा राजा कोण आहे?

उत्तरेचा राजा कोण आहे?

९. उत्तरेचा राजा कधी उदयास आला आणि दानीएल ११:२५ हे वचन कसं पूर्ण झालं?

बंधू रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी बायबल अभ्यासासाठी एक गट तयार केला. त्याच्या एका वर्षानंतर म्हणजेच १८७१ मध्ये उत्तरेचा राजा उदयास आला. त्याच वर्षी युरोपची बरीच राज्यं एकत्र आली. आणि त्यांचं मिळून जर्मन साम्राज्य तयार झालं. पुढच्या काही दशकात जर्मनी एक शक्‍तिशाली राष्ट्र बनलं. आफ्रिकेतल्या आणि पॅसिफिक महासागरातल्या काही क्षेत्रांवर जर्मनीचं साम्राज्य होतं. (दानीएल ११:२५ वाचा.) जर्मनीने ब्रिटनएवढंच शक्‍तिशाली सैन्य बनवण्याचा प्रयत्न केला. आणि पहिल्या महायुद्धात या सैन्याच्या बळावर त्याने युद्ध लढलं.

१०. दानीएल ११:२५ख, २६क यांत दिलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

१० जर्मन साम्राज्याचं आणि त्याच्या सैन्याचं काय झालं याबद्दल दानीएल पुढे सांगतो. भविष्यवाणीत सांगितलं आहे की उत्तरेचा राजा टिकणार नाही. पण का? “कारण लोक  त्याच्याविरुद्ध मसलती करतील. त्याचे अन्‍न खाणारे  त्याचा नाश करतील.” (दानी. ११:२५ख, २६क) दानीएलच्या काळात राजासोबत त्याच्या “मिष्टान्‍नांतून” खाणारे हे राजदरबारात काम करणारे अधिकारी असायचे. (दानी. १:५) ही भविष्यवाणी कोणाला सूचित करते? जर्मन साम्राज्यात उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्‍यांना ही सूचित करते. यात लष्करातले मोठे अधिकारी आणि सैन्याचे सल्लागार यांचा समावेश होतो. या उच्च अधिकाऱ्‍यांमुळे राजाचं राजपद गेलं आणि जर्मनीमध्ये एक नवीन सरकार स्थापित झालं. * त्या भविष्यवाणीत दक्षिणेच्या राजासोबत केलेल्या युद्धाचा परिणाम काय होईल हेदेखील सांगितलं होतं. उत्तरेच्या राजाबद्दल त्या भविष्यवाणीत सांगितलं होतं की त्याच्या सैन्याचा पराभव होईल आणि “पुष्कळ मरून पडतील.” (दानी. ११:२६ख) भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे पहिल्या महायुद्धात जर्मनीचं सैन्य हरलं व बऱ्‍याच जणांचा मृत्यू झाला. इतिहासात याआधी इतक्या जणांचा युद्धात कधीच मृत्यू झाला नव्हता.

११. उत्तरेच्या राजाने आणि दक्षिणेच्या राजाने काय केलं?

११ पहिल्या महायुद्धाच्या आधी कोणत्या घटना घडतील याबद्दल दानीएल ११:२७, २८ या वचनात सांगितलं आहे. त्यात सांगितलं आहे, की उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा हे “एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील.” त्यात असंही म्हटलं आहे, की उत्तरेचा राजा “मोठी लूट” जमा करेल. आणि नेमकी हीच गोष्ट घडली. जर्मनी आणि ब्रिटन यांनी एकमेकांना सांगितलं होतं की त्यांना शांती हवी आहे. पण १९१४ मध्ये त्यांनी एकमेकांशी युद्ध केलं. त्यावरून सिद्ध झालं की ते खोटं बोलत होते. १९१४ येईपर्यंत जर्मनी जगातलं दुसरं सर्वात श्रीमंत राष्ट्र बनलं. त्यानंतर दानीएल ११:२९ आणि ३०क यात दिलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. त्यात सांगितल्यानुसार जर्मनीने दक्षिणेच्या राजासोबत युद्ध केलं, पण त्यात त्याचा पराभव झाला.

राजे देवाच्या लोकांवर हल्ला करतात

१२. पहिल्या महायुद्धात उत्तरेच्या राजाने आणि दक्षिणेच्या राजाने काय केलं?

१२ १९१४ पासून या दोन राजांमध्ये युद्धाचं प्रमाण खूप वाढलं आहे. तसंच, देवाच्या लोकांचा छळ करण्याचंही त्यांनी थांबवलेलं नाही. उदाहरणार्थ, पहिल्या महायुद्धात देवाच्या ज्या सेवकांनी युद्धात भाग घेतला नाही, त्यांचा जर्मन आणि ब्रिटन सरकारने छळ केला. आणि प्रचारात पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांना अमेरिकेच्या सरकारने तुरुंगात टाकलं. प्रकटीकरण ११:७-१० या वचनांत भविष्यवाणी केली होती की देवाच्या लोकांचा छळ होईल. आणि या सगळ्या घटनांवरून कळतं की ही भविष्यवाणी पूर्ण झाली.

१३. १९३३ पासून आणि खासकरून दुसऱ्‍या महायुद्धात उत्तरेच्या राजाने काय केलं?

१३ मग १९३३ पासून आणि खासकरून दुसऱ्‍या महायुद्धात उत्तरेच्या राजाने देवाच्या लोकांचा क्रूरपणे छळ केला. जेव्हा नात्झी लोकांनी जर्मनीवर राज्य करायला सुरू केलं, तेव्हा हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी देवाच्या लोकांच्या कामावर बंदी आणली. उत्तरेच्या राजाने जवळपास १,५०० यहोवाच्या सेवकांना मारून टाकलं आणि हजारो सेवकांना छळछावण्यांमध्ये पाठवलं. या घटनेबद्दल दानीएलने आधीच भविष्यवाणी केली होती. उत्तरेच्या राजाने आपल्या प्रचारकार्यावर बंदी आणली. आणि असं करून त्याने ‘पवित्रस्थान भ्रष्ट’ केलं. तसंच त्याने “नित्याचे बलीहवन” म्हणजेच नियमितपणे केलं जाणारं काम बंद केलं. (दानी. ११:३०ख, ३१क) इतकंच काय तर हिटलरने प्रण घेतला होता की तो जर्मनीतून देवाच्या लोकांचा संपूर्ण नाश करेल.

उत्तरेचा नवीन राजा

१४. दुसऱ्‍या महायुद्धानंतर उत्तरेचा राजा कोण बनला? स्पष्ट करा.

१४ दुसऱ्‍या महायुद्धानंतर, सोव्हियत संघ उत्तरेचा राजा बनला. त्याने जर्मनीच्या अधिकाराखाली असलेल्या मोठ्या क्षेत्रावर ताबा मिळवला. क्रूरपणे छळ करणाऱ्‍या नात्झी सरकाराप्रमाणे सोव्हियत संघानेही खऱ्‍या उपासनेला जीवनात पहिल्या स्थानी ठेवणाऱ्‍या लोकांचा छळ केला.

१५. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर उत्तरेच्या राजाने काय केलं?

१५ दुसऱ्‍या महायुद्धानंतर उत्तरेच्या राजाने म्हणजेच सोव्हियत संघाने आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी देवाच्या लोकांचा छळ करायला सुरुवात केली. प्रकटीकरण १२:१५-१७ यांत देवाच्या लोकांवर होणाऱ्‍या छळाची तुलना नदीशी केली आहे. या भविष्यवाणीनुसार राजाने प्रचारकार्यावर बंदी आणली आणि देवाच्या हजारो लोकांना सायबेरियाला पाठवून दिलं. खरंतर, शेवटचे दिवस सुरू झाल्यापासून उत्तरेच्या राजाने देवाच्या लोकांचा छळ दिवसेंदिवस वाढवला आहे. पण तरी तो त्यांचं काम बंद करू शकलेला नाही. *

१६. दानीएल ११:३७-३९ यात सांगितलेली भविष्यवाणी सोव्हियत संघाने कशी पूर्ण केली?

१६ दानीएल ११:३७-३९ वाचा. भविष्यवाणीत सांगितल्यानुसार “पूर्वजांच्या दैवतांची” पर्वा नसल्याचं उत्तरेच्या राजाने कसं दाखवलं? सोव्हियत संघाने धर्मांचा नाश करायचा, असं ठरवलं. आणि म्हणून त्याने पूर्वीपासून असलेल्या धार्मिक संघटनांचा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न केला. खरंतर १९१८ पासूनच सोव्हियत संघाने शाळेत नास्तिकवादाची शिकवण शिकवण्याचा आदेश दिला होता. उत्तरेच्या राजाने ‘दुर्गदैवताचा’ म्हणजेच किल्ल्याच्या दैवताचा गौरव कसा केला? सोव्हियत संघाने आपलं सैन्य मजबूत करण्यासाठी अमाप पैसा खर्च केला. तसंच, त्याने हजारो आण्विक शस्त्रं बनवून आपली ताकद वाढवली. उत्तरेच्या राजाने आणि दक्षिणेच्या राजाने इतकी शस्त्रं जमवली आहेत की ते करोडो लोकांना मारून टाकू शकतात.

दोन वैरी एकत्र काम करतात

१७. उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट कोणती आहे?

१७ उत्तरेच्या राजाने आणि दक्षिणेच्या राजाने एकत्र मिळून एक महत्त्वाची गोष्ट केली आहे. त्यांनी उद्ध्‌वस्त करणाऱ्‍या “अमंगलाची” म्हणजेच घृणास्पद गोष्टीची स्थापना केली आहे. (दानी. ११:३१) ती घृणास्पद गोष्ट म्हणजे संयुक्‍त राष्ट्र संघ.

१८. संयुक्‍त राष्ट्र संघाला घृणास्पद गोष्ट का म्हणण्यात आलं आहे?

१८ संयुक्‍त राष्ट्र संघाला घृणास्पद गोष्ट का म्हणण्यात आलं आहे? कारण तो संपूर्ण पृथ्वीवर शांती आणण्याचा दावा करतो, पण खरंतर फक्‍त देवाचं राज्यच या पृथ्वीवर शांती आणू शकतं. भविष्यवाणीत सांगितलं आहे, की ती घृणास्पद गोष्ट “विध्वंसमूलक” म्हणजे उद्ध्‌वस्त करणारी आहे. कारण सर्व खोट्या धर्मांचा नाश करण्यात संयुक्‍त राष्ट्र संघाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.—‘अंताच्या समयी लढणारे दोन राजे’ हा तक्‍ता पाहा.

हा इतिहास माहीत करून घेणं का गरजेचं आहे?

१९-२०. (क) आपण हा इतिहास माहीत करून घेणं का गरजेचं आहे? (ख) पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१९ या इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला या गोष्टीची खातरी मिळते, की दानीएलने उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांबद्दल केलेल्या भविष्यवाणीचा काही भाग १८७० ते १९९१ यादरम्यान पूर्ण झाला आहे. म्हणून आपण भरवसा ठेवू शकतो की भविष्यवाणीतला उरलेला भागही नक्कीच पूर्ण होईल.

२० १९९१ मध्ये सोव्हियत संघ कोसळला. मग त्यानंतर उत्तरेचा राजा कोण बनला? पुढच्या लेखात या प्रश्‍नाचं उत्तर दिलं जाईल.

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

^ परि. 5 दानीएलने उत्तरेच्या राजाबद्दल आणि दक्षिणेच्या राजाबद्दल केलेली भविष्यवाणी आजही पूर्ण होत आहे आणि याचे अनेक पुरावे आपल्याजवळ आहेत. ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे असं आपण खातरीने का म्हणू शकतो, आणि ही भविष्यवाणी चांगल्या प्रकारे समजून घेणं का गरजेचं आहे?

^ परि. 5 म्हणूनच रोमचा सम्राट ऑरेलियन (इ.स. २७०-२७५) याला “उत्तरेचा राजा” किंवा झेनोबिया राणी (इ.स. २६७-२७२) हिला “दक्षिणेचा राजा” म्हणता येणार नाही. याचाच अर्थ, दानिय्येल की भविष्यवाणी पर ध्यान दे! या पुस्तकाच्या १३ व्या आणि १४ व्या अध्यायात दिलेल्या माहितीत बदल झाला आहे.

^ परि. 10 बऱ्‍याचशा कारणांमुळे राजाचं राजपद गेलं. उदाहरणार्थ, त्यांनी राजाला मदत करणं थांबवलं, युद्धाबद्दलची गुप्त माहिती इतरांना सांगितली आणि राजाला राजपद सोडण्यासाठी भाग पाडलं.

^ परि. 15 दानीएल ११:३४ मध्ये सांगितल्यानुसार, उत्तरेच्या राजाने अधूनमधून ख्रिश्‍चनांचा छळ करायचं थांबवलं होतं. उदाहरणार्थ, १९९१ मध्ये सोव्हियत संघ कोसळला तेव्हा हे घडलं.