व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २१

देवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींची तुम्ही कदर करता का?

देवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींची तुम्ही कदर करता का?

“हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत.”—स्तो. ४०:५.

गीत १५ सृष्टी यहोवाची स्तुती गाते

सारांश *

१-२. स्तोत्र ४०:५ या वचनांनुसार यहोवाने आपल्याला कोणत्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत आणि त्यावर चर्चा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल?

यहोवा एक उदार देव आहे. त्याने आपल्याला दिलेल्या काही चांगल्या गोष्टींचा विचार करा. जसं की आपली सुंदर आणि अनोखी पृथ्वी, अद्‌भुत रीत्या रचना केलेला आपला मेंदू आणि देवाचं मौल्यवान वचन बायबल. यहोवाने आपल्याला या तीन चांगल्या गोष्टी दिल्यामुळे आपल्याजवळ राहण्यासाठी एक घर आहे. तसंच, विचार करण्याची आणि इतरांसोबत संवाद साधण्याची क्षमताही आहे. शिवाय, आपल्याला जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरंही मिळतात.स्तोत्र ४०:५ वाचा.

या लेखात आपण यहोवाने दिलेल्या या तीन गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. आपण जितकं जास्त या गोष्टींवर मनन करू तितकी जास्त आपली त्यांबद्दल कदर वाढेल. यासोबतच, आपला प्रेमळ निर्माणकर्ता यहोवा याचं मन आनंदित करण्याची आपली इच्छा वाढत जाईल. (प्रकटी. ४:११) शिवाय, उत्क्रांतीच्या खोट्या शिकवणीमुळे ज्यांची दिशाभूल झाली आहे, त्यांच्यासोबत तर्क करायलाही आपल्याला सोपं जाईल.

आपली अनोखी पृथ्वी

३. पृथ्वी इतर ग्रहांपेक्षा कशी वेगळी आहे?

ज्या प्रकारे देवाने पृथ्वी घडवली आहे, त्यावरून आपल्याला कळतं की तो खूप बुद्धिमान आहे. (रोम. १:२०; इब्री ३:४) सूर्याभोवती फिरणारे इतर ग्रहसुद्धा आहेत, पण पृथ्वी खूप खास आहे. कारण मानवांना जगता येईल असं योग्य वातावरण इथे आहे.

४. पृथ्वी ही कोणत्याही मानव निर्मित होडीपेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण का म्हणू शकतो?

अंतराळात असलेल्या पृथ्वीची तुलना आपण महासागरात असलेल्या एका होडीशी करू शकतो. पण लोकांनी भरलेल्या एका होडीमध्ये आणि पृथ्वीमध्ये काही फरक आहेत. कल्पना करा, एका होडीतल्या लोकांना काही सूचना देण्यात येतात. त्यांना सांगितलं जातं की त्यांनी ऑक्सिजन, अन्‍न व पाणी स्वतः उत्पन्‍न करावं आणि कुठलाही केरकचरा होडी बाहेर फेकू नये. मग, तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीत ते किती काळ जगू शकतील? नक्कीच, ते जास्त काळ जगणार नाहीत. याउलट, पृथ्वीमध्ये अशी क्षमता आहे की त्यावर कोट्यवधी लोक जगू शकतात. आपल्याला लागणारं ऑक्सिजन, अन्‍न आणि पाणी पृथ्वीमधून मिळतं. आणि या जीवनावश्‍यक गोष्टींचा साठा कधीच संपत नाही. तसंच, कोट्यवधी लोकांमुळे मोठ्या प्रमाणात केरकचरा उत्पन्‍न होत असला, तरी ही पृथ्वी खूप सुंदर आहे आणि मानवांना राहण्यासारखी आहे. पण हे कसं शक्य आहे? कारण यहोवाने पृथ्वीची रचना करताना अशा काही प्रक्रिया घालून दिल्या आहेत ज्यामुळे केरकचऱ्‍याचं रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये होतं. आता आपण यहोवाने अद्‌भुत रीत्या घडवलेल्या दोन प्रक्रियांबद्दल, म्हणजेच ऑक्सिजन-चक्र आणि जल-चक्र यांबद्दल चर्चा करू या.

५. ऑक्सिजन-चक्र काय आहे आणि यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी पटते?

ऑक्सिजनमुळे  मानवांना आणि प्राण्यांना जगणं शक्य होतं. एका अहवालानुसार आपल्याला व प्राण्यांना दरवर्षी कोट्यवधी टन ऑक्सिजनची गरज पडते आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड बाहेर टाकला जातो. असं असलं तरीही वातावरणातला ऑक्सिजन कधीच संपत नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड असला तरी वातावरणातला समतोल कधीच बिघडत नाही. हे कशामुळे शक्य होतं? कारण यहोवाने लहानमोठी अशी अनेक झाडं बनवली आहेत जे कार्बन-डाय-ऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन-चक्र ज्या प्रकारे काम करतं त्यावर मनन केल्यामुळे प्रेषितांची कार्ये १७:२४, २५ मध्ये दिलेले शब्द खरे असल्याची खातरी पटते. त्यात म्हटलं आहे की “देवाने . . . सर्वांना जीवन, श्‍वास आणि इतर सर्व गोष्टी” दिल्या आहेत.

६. जल-चक्र म्हणजे काय आणि यावरून काय सिद्ध होतं? (“ जल-चक्र यहोवाकडून एक भेट” ही चौकटसुद्धा पाहा.)

पाणी  हे तापमानामूळे घन रूपात, वायू रूपात आणि द्रव्य रूपात बदलू शकतं. पृथ्वी सूर्यापासून योग्य अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवरचं पाणी द्रव्य रूपात आहे. पृथ्वी जर सूर्याच्या आणखी जवळ असती तर इथल्या सर्व पाण्याचं बाष्पीभवन, म्हणजेच त्याचं वाफेत रूपांतर झालं असतं. यामुळे पृथ्वी खूप तापली असती आणि इथे जीवन जगणं कठीण झालं असतं. आणि पृथ्वी जर सूर्यापासून थोडी दूर असती तर इथल्या सर्व पाण्याचा बर्फ झाला असता आणि संपूर्ण पृथ्वी बर्फाने भरून गेली असती. पण यहोवाने पृथ्वीला अगदी योग्य अंतरावर ठेवल्यामुळे पृथ्वीवरचं जल-चक्र योग्य प्रकारे काम करतं आणि मानवांना जीवन जगणं शक्य होतं. सूर्यामुळे पृथ्वीवरच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. यामुळे ढग तयार होतात. दरवर्षी पृथ्वीवरून जवळपास पाच लाख घन किलोमीटर पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झालेलं पाणी हे वातावरणात जवळपास दहा दिवस राहतं आणि त्यानंतर ते पावसाच्या किंवा बर्फाच्या रूपात पृथ्वीवर पडतं. जमिनीवर पडलेलं पाणी झरे किंवा नद्या यांच्याद्वारे समुद्राकडे जातं. आणि हे जल-चक्र पुन्हा एकदा सुरू होतं. पृथ्वीवर पाण्याचा पुरवठा नेहमी होत राहील अशा प्रकारे यहोवाने जल-चक्राची निर्मिती केली आहे. यावरून सिद्ध होतं की यहोवा बुद्धिमान व शक्‍तिशाली देव आहे.—ईयो. ३६:२७, २८; उप. १:७.

७. स्तोत्र ११५:१६ यात उल्लेख केलेल्या भेटीबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकतो?

आपल्या अनोख्या ग्रहाबद्दल आणि त्यावर असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आपली कदर वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? (स्तोत्र ११५:१६ वाचा.) यासाठी आपण यहोवाने बनवलेल्या गोष्टींवर मनन करू शकतो. असं केल्यामुळे यहोवा आपल्याला प्रत्येक दिवशी ज्या चांगल्या गोष्टी देतो त्याबद्दल आपण त्याचे आभार मानण्यासाठी प्रेरित होऊ. तसंच, आपला परिसर शक्य तितका स्वच्छ ठेवण्याद्वारेही आपण दाखवून देऊ शकतो की आपल्याला पृथ्वीबद्दल कदर आहे.

आपला विलक्षण मेंदू

८. आपल्या मेंदूची रचना अगदी अद्‌भुत आहे असं आपण का म्हणू शकतो?

मानवी मेंदूची रचना अगदी अद्‌भुत आहे. बाळ आईच्या गर्भात असतं तेव्हा त्याच्या मेंदूची रचना जशी व्हायला हवी तशी होऊ लागते. प्रत्येक मिनटाला हजारो नवीन पेशी तयार होत असतात. संशोधकांच्या मते एका मेंदूत जवळपास शंभर अब्ज खास पेशी असतात ज्यांना न्यूरॉन्स म्हणतात. आणि यांना व्यवस्थित रीत्या एकत्रित करण्यात आलेलं असतं. मेंदूचं वजन जवळपास दीड किलो असतं. मेंदू किती अद्‌भुत रीत्या काम करतो याची आता आपण काही उदाहरणं पाहू या.

९. बोलण्याची क्षमता ही देवाकडून मिळालेली देणगी आहे हे कशावरून सिद्ध होतं?

आपल्याला मिळालेली बोलण्याची क्षमता  हा एक चमत्कार आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा नेमकं काय घडत असतं याचा जरा विचार करा. आपण बोलतो तेव्हा आपला मेंदू आपल्या जिभेच्या, घशाच्या, ओठांच्या, जबड्याच्या आणि छातीच्या जवळपास शंभर स्नायूंना नियंत्रित करत असतो. एखादा शब्द व्यवस्थित उच्चारण्यासाठी हे स्नायू विशिष्ट क्रमाने कार्य करतात. भाषा बोलण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल संशोधकांनी एक माहिती प्रकाशित केली आहे. त्यात असं सांगितलं आहे की नवीन जन्मलेलं बाळ शब्दांमधला फरक ओळखू शकतं आणि त्यानुसार प्रतिक्रिया देऊ शकतं. हा अभ्यास अनेक संशोधक मानत असलेल्या गोष्टीला दुजोरा देतो. ते मानतात की आपल्यामध्ये भाषा ओळखण्याची आणि शिकण्याची क्षमता आहे. तेव्हा, यात काहीच शंका नाही की बोलण्याची क्षमता ही आपल्याला देवाकडून मिळालेली एक देणगी आहे!—निर्ग. ४:११.

१०. देवाकडून मिळालेल्या बोलण्याच्या देणगीची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१० देवाने आपल्याला बोलण्याची क्षमता दिली आहे या भेटीबद्दल आपण एका मार्गाने कदर दाखवू शकतो. तो मार्ग म्हणजे उत्क्रांतीच्या शिकवणीवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांशी सृष्टिकर्त्याबद्दल बोलणं. (स्तो. ९:१; १ पेत्र ३:१५) उत्क्रांतीवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचं म्हणणं असतं की पृथ्वी आणि जीवन आपोआपच अस्तित्वात आलं. बायबलच्या आणि या लेखात चर्चा केलेल्या काही मुद्यांच्या मदतीने आपण त्यांना स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याबद्दल सांगू शकतो. तसंच, यहोवानेच स्वर्ग आणि पृथ्वी यांची रचना केली आहे याची आपल्याला इतकी खातरी का आहे हेही आपण त्यांना सांगू शकतो.—स्तो. १०२:२५; यश. ४०:२५, २६.

११. आपल्या मेंदूची रचना अगदी अद्‌भुत आहे याचं आणखी एक कारण काय आहे?

११ माहिती लक्षात ठेवण्याची आपली क्षमता.  अद्‌भुत आहे. एका लेखकाच्या अंदाजानुसार दोन कोटी पुस्तकांमध्ये जेवढी माहिती मावेल, तेवढी माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे. पण आजच्या वैज्ञानिकांच्या मते आपल्या मेंदूची क्षमता यापेक्षाही जास्त आहे. या क्षमतेमुळे मानवांना कोणती खास गोष्ट करणं शक्य आहे?

१२. मानवांमध्ये अशी कोणती क्षमता आहे जी इतर सजीवांमध्ये नाही?

१२ पृथ्वीवर असलेल्या सर्व सजीवांपैकी फक्‍त मानवांमध्येच नैतिक धडे शिकण्याची क्षमता  आहे. जीवनात घडलेल्या घटना आणि अनुभव यांवरून मानव खूप काही शिकू शकतात. यामुळे मानवांना त्यांच्या स्तरांमध्ये आणि विचारसरणीमध्ये चांगले बदल करता येतात. (१ करिंथ. ६:९-११; कलस्सै. ३:९, १०) त्यासोबतच ते चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी त्यांच्या विवेकाला प्रशिक्षित करू शकतात. (इब्री ५:१४) आपण प्रेम, करूणा आणि दया दाखवायला शिकू शकतो. तसंच, यहोवासारखं चांगल्या गोष्टींवर प्रेम करायला आणि वाईट गोष्टींचा द्वेष करायलाही आपण शिकू शकतो.

१३. स्तोत्र ७७:११, १२ या वचनांनुसार गोष्टी आठवणीत ठेवण्याच्या आपल्या देणगीचा आपण कसा वापर केला पाहिजे?

१३ यहोवाने आपल्याला गोष्टी आठवणीत ठेवण्याची देणगी दिली आहे. याबद्दल कदर बाळगण्याचा एक मार्ग म्हणजे त्याने आपल्याला केलेली मदत आणि दिलेलं सांत्वन याची नेहमी आठवण ठेवणं. यामुळे तो भविष्यातही आपल्याला मदत करेल यावर आपला भरवसा वाढतो. (स्तोत्र ७७:११, १२ वाचा; ७८:४, ७) देवाने दिलेल्या देणगीबद्दल कदर बाळगण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इतरांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण ठेवणं आणि त्याबद्दल कृतज्ञ असणं. शोधकर्त्यांच्या मते इतरांच्या उपकारांची जाणीव ठेवणारे लोक सहसा जास्त आनंदी असतात. आपण आणखी एका बाबतीत यहोवाचं अनुकरण करू शकतो. तो काही गोष्टी विसरण्याची निवड करतो. उदाहरणार्थ, यहोवा सर्वकाही लक्षात ठेवू शकतो. पण जेव्हा आपण पश्‍चात्ताप करतो तेव्हा तो आपल्याला क्षमा करतो आणि आपल्या चुका विसरण्याची निवड करतो. (स्तो. २५:७; १३०:३, ४) आणि तो आपल्याकडूनसुद्धा हीच अपेक्षा करतो. त्याची इच्छा आहे की इतर जण क्षमा मागतात, तेव्हा आपण त्यांना माफ केलं पाहिजे.—मत्त. ६:१४; लूक १७:३, ४.

यहोवाने दिलेल्या बुद्धीचा वापर आपण त्याचा महिमा करण्यासाठी करतो तेव्हा या देणगीबद्दल कदर असल्याचं आपण दाखवतो (परिच्छेद १४ पाहा) *

१४. देवाने दिलेल्या बुद्धीची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१४ यहोवाने आपल्याला बुद्धी दिली आहे. आणि आपण जेव्हा या देणगीचा वापर त्याचा महिमा करण्यासाठी करतो तेव्हा आपण दाखवून देतो की आपल्याला त्याची कदर आहे. काही लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करतात. त्यांच्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय याचे स्तर ते स्वतः ठरवतात. पण यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय याचे स्तर त्यानेच ठरवणं योग्य राहील. (रोम. १२:१, २) जेव्हा आपण त्याच्या स्तरांनुसार जगतो तेव्हा आपल्या जीवनात शांती असते. (यश. ४८:१७, १८) शिवाय, आपल्या जीवनाला एक उद्देशही लाभतो. तो म्हणजे आपला पिता आणि निर्माणकर्ता, यहोवा याचा महिमा करणं आणि त्याचं मन आनंदित करणं.—नीति. २७:११.

बायबल—देवाकडून मिळालेली एक प्रेमळ भेट

१५. यहोवाने मानवांना बायबल देण्याद्वारे त्यांच्यावर प्रेम असल्याचं कसं दाखवलं?

१५ देवाने बायबल लिहिण्यासाठी काही मानवांना प्रेरित केलं, कारण त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. बायबलद्वारे यहोवा आपल्याला जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं देतो . जसं की, आपण कुठून आलो? आपल्या जीवनाचा काय उद्देश आहे? आणि आपलं भविष्य कसं असेल? यहोवाची इच्छा आहे की त्याच्या मुलांना म्हणजे आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं मिळावीत. म्हणून अनेक शतकांपासून त्याने मानवांना बायबलचं अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी प्रेरित केलं. आज संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग तीन हजारपेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. बायबल हे संपूर्ण इतिहासातलं सर्वात अधिक खप असलेलं आणि भाषांतर झालेलं पुस्तक आहे. लोक कुठेही राहत असले किंवा कोणतीही भाषा बोलत असले तरी त्यांपैकी बहुतेकांना त्यांच्या भाषेत बायबल वाचण्याची संधी आहे.—‘ आफ्रिकेत बोलल्या जाणाऱ्‍या भाषांमध्ये बायबल उपलब्ध करून देणं.’ ही चौकट पाहा.

१६. मत्तय २८:१९, २० या वचनांनुसार आपल्याला बायबलबद्दल कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१६ आपल्याला बायबलबद्दल कदर असल्याचं आपण दाखवलं पाहिजे. हे आपण नियमितपणे त्याचं वाचन करण्याद्वारे, मनन करण्याद्वारे आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याद्वारे दाखवू शकतो. त्यासोबतच, बायबलमधला संदेश जास्तीत जास्त लोकांना सांगण्याद्वारेही आपल्याला देवाबद्दल कदर असल्याचं आपण दाखवू शकतो.—स्तो. १:१-३; मत्त. २४:१४; मत्तय २८:१९, २० वाचा.

१७. या लेखात आपण कोणत्या देणग्यांबद्दल चर्चा केली आहे आणि पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१७ आतापर्यंत आपण देवाने दिलेल्या तीन देणग्यांबद्दल चर्चा केली. त्या म्हणजे आपल्याला राहण्यासाठी दिलेली पृथ्वी, आपला अद्‌भुत रीत्या रचना केलेला मेंदू आणि देवाचं वचन बायबल. या व्यतिरिक्‍त देवाने आपल्याला अशा इतर काही देणग्याही दिल्या आहेत ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. या मौल्यवान देणग्या कोणत्या आहेत त्यांबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत.

गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो

^ परि. 5 या लेखामुळे आपल्याला यहोवाबद्दल आणि त्याने दिलेल्या तीन गोष्टींबद्दल कदर वाढवायला मदत होईल. तसंच, ज्या लोकांना देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे त्यांच्यासोबत तर्क करायलाही आपल्याला या लेखामुळे मदत होईल.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: एक बहीण दुसऱ्‍या देशातून आलेल्या लोकांना सत्य सांगता यावं यासाठी नवीन भाषा शिकत आहे.