व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २२

न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल कदर बाळगा

न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल कदर बाळगा

“आपण . . . न दिसणाऱ्‍या गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दिसत असलेल्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण न दिसणाऱ्‍या गोष्टी सर्वकाळाच्या आहेत.”—२ करिंथ. ४:१८.

गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”

सारांश *

१. स्वर्गातल्या संपत्तीबद्दल येशूने काय म्हटलं?

देवाने दिलेल्या सर्वच देणग्या आपण पाहू शकत नाही. खरंतर सर्वात मौल्यवान देणग्या या न दिसणाऱ्‍या आहेत. डोंगरावरच्या उपदेशात येशूने म्हटलं, की पृथ्वीवरच्या धनापेक्षा स्वर्गात साठवलेली संपत्ती ही कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. मग त्याने म्हटलं: “जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.” (मत्त. ६:१९-२१) आपण ज्या गोष्टी मौल्यवान समजू त्या गोष्टी मिळवण्याचा आपण प्रयत्नही करू. देवासोबत एक चांगलं नातं जोडून आपण स्वर्गात आपल्यासाठी “संपत्ती” साठवतो. येशूने म्हटलं की अशा संपत्तीचा कधीही नाश होत नाही किंवा ती चोरीला जात नाही.

२. (क) २ करिंथकर ४:१७, १८ या वचनांनुसार पौल आपल्याला कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचं प्रोत्साहन देतो? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

प्रेषित पौल आपल्याला “न दिसणाऱ्‍या गोष्टींकडे लक्ष” लावण्याचं प्रोत्साहन देतो. (२ करिंथकर ४:१७, १८ वाचा.) या न दिसणाऱ्‍या गोष्टी संपत्तीप्रमाणे आहेत. यात अशा आशीर्वादांचा समावेश होतो जे आपल्याला देवाच्या राज्यात मिळणार आहेत. या लेखात आपण अशा चार न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल किंवा देणग्यांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या आपण मिळवू शकतो. त्या म्हणजे देवासोबत मैत्री, प्रार्थनेची देणगी, पवित्र आत्म्याची मदत आणि यहोवा, येशू व स्वर्गदूत यांच्याकडून मिळणारी मदत. तसंच, आपण या न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल कदर कशी दाखवू शकतो हेसुद्धा पाहणार आहोत.

देवासोबत मैत्री

३. न दिसणारी सर्वात मौल्यवान संपत्ती कोणती आहे आणि ती मिळवणं कशामुळे शक्य आहे?

न दिसणाऱ्‍या संपत्तीपैकी सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे यहोवासोबत आपली मैत्री.  (स्तो. २५:१४) देव पवित्र आहे मग अपरिपूर्ण मानवांसोबत त्याची मैत्री होणं कसं शक्य आहे? हे शक्य आहे कारण त्यासाठी त्याने एक तरतूद केली आहे. येशूने खंडणी बलिदान देण्याद्वारे “जगाचं पाप दूर” नेलं आहे. (योहा. १:२९) येशूचा मृत्यू होण्याआधी यहोवाला माहीत होतं की येशू मानवजातीला वाचवण्यासाठी आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत विश्‍वासू राहील. त्यामुळे येशू ख्रिस्ताचा मृत्यू होण्याआधी जे मानव जगले ते देवाचे मित्र बनू शकले.—रोम. ३:२५.

४. प्राचीन काळातल्या काही सेवकांची उदाहरणं द्या जे देवाचे मित्र बनले?

आता आपण प्राचीन काळातल्या अशा काही सेवकांबद्दल चर्चा करू या जे देवाचे मित्र बनले. त्यांपैकी एक म्हणजे अब्राहाम . त्याने देवावर मजबूत विश्‍वास असल्याचं दाखवलं. अब्राहामचा मृत्यू झाल्याच्या हजार वर्षांच्या नंतरही यहोवाने त्याला “माझा मित्र” असं म्हटलं. (यश. ४१:८) याचाच अर्थ, एखाद्याचा मृत्यू झाला तरी यहोवा त्याला त्याचा जवळचा मित्र समजतो. यहोवा अब्राहामला आजही विसरलेला नाही. (लूक २०:३७, ३८) ईयोबसुद्धा  यहोवाचा एक विश्‍वासू सेवक होता. स्वर्गात सर्व स्वर्गदूत एकत्र जमले असताना यहोवाने ईयोबबद्दल म्हटलं की तो “सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा” आहे. (ईयो. १:६-८) दानीएलसुद्धा  यहोवाचा एक विश्‍वासू सेवक होता. त्याने जवळपास ८० वर्षं एका मूर्तिपूजक राष्ट्रात यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली. यामुळेच तीन वेळा स्वर्गदूतांनी त्याला म्हटलं की तो देवासाठी “परमप्रिय” आहे. (दानी. ९:२३; १०:११, १९) यहोवा आपल्या प्रिय मित्रांचं पुनरुत्थान करण्यासाठी आतुर आहे याची आपण खातरी बाळगू शकतो.—ईयो. १४:१५.

न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल आपल्याला कदर असल्याचं आपण कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकतो? (परिच्छेद ५ पाहा) *

५. यहोवासोबत जवळची मैत्री करण्यासाठी काय गरजेचं आहे?

अपरिपूर्ण मानवांपैकी असे किती आहेत जे यहोवाचे जवळचे मित्र आहेत? असे लाखो लोक आहेत. कारण जगभरात अनेक पुरुष, स्त्री आणि मुलं आपल्या कामांद्वारे दाखवत आहेत की ते देवाचे खरे मित्र आहेत. बायबल म्हणतं: “जो नितिमान आहे त्याला तो मित्र मानतो.” (नीति. ३:३२, सुबोधभाषांतर) येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे त्यांना देवासोबत मैत्री करणं शक्य होतं. यामुळे यहोवा आपल्याला त्याचे मित्र बनू देतो आणि आपण त्याला आपलं जीवन समर्पित करू शकतो. जेव्हा आपण ही पावलं उचलतो तेव्हा लाखो समर्पित ख्रिश्‍चनांप्रमाणे या विश्‍वातल्या सर्वोच्च अधिकाऱ्‍याचे आपण जवळचे मित्र बनतो!

६. देवासोबत असलेल्या मैत्रीबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

देवासोबतच्या मैत्रीची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? अब्राहाम आणि ईयोब यहोवाला शंभरपेक्षा जास्त वर्षं विश्‍वासू राहिले. या दुष्ट जगात आपणसुद्धा त्यांच्यासारखंच शेवटच्या श्‍वासापर्यंत विश्‍वासू राहिलं पाहिजे. दानीएलप्रमाणे आपणही आपल्या जीवनापेक्षा देवासोबतच्या मैत्रीला जास्त मौल्यवान समजलं पाहिजे. (दानी. ६:७, १०, १६, २२) देवाच्या मदतीने आपण कोणत्याही परीक्षेचा सामना करू शकतो आणि त्याच्यासोबत मैत्रीचं नातं टिकवून ठेवू शकतो.—फिलिप्पै. ४:१३.

प्रार्थनेची देणगी

७. (क) नीतिसूत्रे १५:८ या वचनानुसार यहोवाला आपल्या प्रार्थनांबद्दल काय वाटतं? (ख) यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?

आणखी एक न दिसणारी संपत्ती म्हणजे प्रार्थना. जवळच्या मित्रांना आपले विचार आणि भावना एकमेकांना सांगायला आवडतात. मग यहोवासोबतच्या मैत्रीबाबतीतही हे खरं आहे का? हो. यहोवा बायबलद्वारे आपले विचार आणि भावना आपल्याला सांगतो. आणि आपण त्याला प्रार्थना करून आपले विचार आणि भावना सांगू शकतो. यहोवाला आपल्या प्रार्थना ऐकायला आवडतात. (नीतिसूत्रे १५:८ वाचा.) एका प्रेमळ मित्राप्रमाणे यहोवा आपल्या प्रार्थना फक्‍त ऐकतच नाही तर त्यांचं उत्तरही देतो. कधीकधी त्यांचं उत्तर आपल्याला लगेच मिळतं. तर काही वेळा एका विषयाबद्दल आपल्याला खूप वेळा प्रार्थना करावी लागू शकते. तरी आपण खातरी बाळगू शकतो की तो योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपल्या प्रार्थनांचं उत्तर नक्की देईल. पण हेही खरं आहे की यहोवा आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही तर कदाचित वेगळं उत्तर देईल. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या परीक्षेचा सामना करत असू तर तो त्या परीक्षेतून आपल्याला बाहेर काढण्याऐवजी “ती सहन” करण्यासाठी बुद्धी आणि शक्‍ती देईल.—१ करिंथ. १०:१३.

(परिच्छेद ८ पाहा) *

८. प्रार्थनेच्या देणगीबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

प्रार्थना या अमूल्य देणगीबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? याचा एक मार्ग म्हणजे “प्रार्थना करत राहा” या यहोवाने दिलेल्या सल्ल्याचं पालन करणं. (१ थेस्सलनी. ५:१७) यहोवा आपल्याला प्रार्थना करण्याची सक्‍ती करत नाही, तर याऐवजी त्याची इच्छा आहे की आपण स्वतःहून त्याला प्रार्थना करावी. आणि म्हणून तो आपल्याला “प्रार्थना करत राहा” असं आर्जवतो. (रोम. १२:१२) आपण दिवसभरात अनेक वेळा त्याला प्रार्थना करण्याद्वारे या देणगीबद्दल कदर असल्याचं दाखवू शकतो. प्रार्थनेत आपण यहोवाची स्तुती आणि त्याचे आभार व्यक्‍त करणंही गरजेचं आहे.—स्तो. १४५:२, ३.

९. एका बांधवाच्या प्रार्थनेबद्दल काय भावना आहेत आणि तुम्हाला प्रार्थनेबद्दल काय वाटतं?

आपण कदाचित अनेक वर्षं यहोवाची सेवा करत असू. आणि यादरम्यान त्याने आपल्या प्रार्थनांची कशी उत्तरं दिली हे आपण अनुभवलं असेल. यावर विचार केल्याने प्रार्थनेबद्दल आपली कदर वाढली पाहिजे. उदाहरणार्थ, क्रिस नावाचे बांधव ४७ वर्षांपासून पूर्ण वेळेची सेवा करत आहेत. ते म्हणतात: “मला सकाळी लवकर उठून प्रार्थना करायला खूप आवडतं. एकीकडे सूर्य उगवत असतो, सगळीकडे खूप सुंदर असतं आणि त्या वेळी यहोवासोबत बोलताना खूप ताजंतवानं वाटतं. त्याने दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि प्रार्थना करण्याचा बहुमान मिळाला आहे त्यासाठी मला त्याचे आभार व्यक्‍त करावेसे वाटतात. मग दिवसाच्या शेवटी मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. त्या वेळी यहोवासोबत बोलल्याने माझा विवेक शुद्ध राहतो आणि मला शांत झोप लागते.”

पवित्र आत्म्याची देणगी

१०. पवित्र आत्म्याबद्दल आपल्याला कदर असणं का गरजेचं आहे?

१० न दिसणारी आणखी एक देणगी किंवा संपत्ती म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. आणि त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत राहा असं येशू आपल्याला आर्जवतो. (लूक ११:९, १३) पवित्र आत्म्याद्वारे यहोवा आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देतो. (२ करिंथ. ४:७; प्रे. कार्ये १:८) देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण कोणत्याही परीक्षेत टिकून राहू शकतो.

(परिच्छेद ११ पाहा) *

११. पवित्र आत्मा आपल्याला कोणत्या मार्गाने मदत करू शकतो?

११ देवाच्या सेवेत मिळालेली नेमणूक हाताळायला आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्यामुळे मदत होते. त्यामुळे आपल्यातली कौशल्यं आणि क्षमता वाढू शकतात. पवित्र आत्म्याच्या मदतीमुळे आपण आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. आपल्याला माहीत आहे की पवित्र आत्म्यामुळेच आपल्याला त्याच्या सेवेत चांगले परिणाम मिळतात.

१२. स्तोत्र १३९:२३, २४ या वचनांनुसार आपण काय करण्यासाठी प्रार्थना करू शकतो?

१२ देवाच्या पवित्र आत्म्याबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण आणखी एका मार्गाने दाखवू शकतो. तो म्हणजे, आपल्या मनात एखादा चुकीचा विचार किंवा इच्छा आहे का, हे ओळखण्यासाठी देवाकडे मदत मागणं. (स्तोत्र १३९:२३, २४ वाचा.) जर आपण अशी विनंती केली तर यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला चुकीचा विचार किंवा इच्छा ओळखण्यासाठी मदत करेल. आणि तसं आढळल्यास त्यांचा प्रतिकार करण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याने आपल्याला ताकद द्यावी अशी आपण प्रार्थना केली पाहिजे. असं करून आपण दाखवून देऊ की आपल्याला असं काहीही करण्याची इच्छा नाही, ज्यामुळे यहोवा त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देणार नाही.—इफिस. ४:३०.

१३. आपण पवित्र आत्म्याबद्दल कदर कशी वाढवू शकतो?

१३ आज देवाचा पवित्र आत्मा कोणत्या गोष्टी साध्य करत आहे त्यावर विचार केल्यानेही आपली त्याच्याबद्दल कदर वाढू शकते. स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही . . . पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत माझ्याविषयी साक्ष द्याल.” (प्रे. कार्ये १:८) आणि आज हीच गोष्ट पूर्ण होत आहे. पवित्र आत्म्याच्या मदतीमुळे आज जगभरात जवळपास ८५ लाख लोक यहोवाचे उपासक बनले आहेत. तसंच, यामुळे आज देवाच्या लोकांमध्ये शांती आणि एकता आहे. कारण देवाचा पवित्र आत्मा आपल्याला चांगले गुण विकसित करायला मदत करतो. ते गुण म्हणजे “प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता आणि आत्मसंयम.” हे गुण म्हणजे पवित्र “आत्म्याचे फळ.” (गलती. ५:२२, २३) खरंच, पवित्र आत्मा ही एक मौल्यवान संपत्ती आहे.

यहोवा, येशू आणि स्वर्गदूत यांच्यासोबत काम करणं

१४. सेवाकार्य करत असताना कोणती न दिसणारी मदत आपल्यासाठी उपलब्ध आहे?

१४ आणखी एक न दिसणारी मौल्यवान देणगी म्हणजे यहोवा, येशू आणि स्वर्गदूत यांच्यासोबत काम करण्याची मिळालेली संधी. (२ करिंथ. ६:१) आपण सेवाकार्य करण्याद्वारे त्यांच्यासोबत काम करत असतो. पौलने स्वतःबद्दल आणि जे या कामात भाग घेतात त्यांच्याबद्दल म्हटलं: “आपण देवाचे सहकारी आहोत.” (१ करिंथ. ३:९) सेवाकार्यात भाग घेतल्याने आपण येशूचेही सहकारी बनतो. असं आपण का म्हणू शकतो? कारण येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना आज्ञा दिली, की “सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा” तेव्हा त्याने हेही म्हटलं होतं की “मी नेहमी तुमच्यासोबत असेन.” (मत्त. २८:१९, २०) स्वर्गदूतांबद्दल काय? तेही आपल्यासोबत काम करत आहेत का? आपण जेव्हा “पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना . . . सर्वकाळाचा आनंदाचा संदेश” सांगतो तेव्हा स्वर्गदूत आपलं मार्गदर्शन करत असतात. (प्रकटी. १४:६) आणि यासाठी आपण खरंच खूप आभारी आहोत!

१५. यहोवा सेवाकार्यात आपल्याला मदत करत आहे याचं एक उदाहरण द्या.

१५ या मदतीमुळे आपल्याला काय करणं शक्य झालं आहे? प्रचारकार्यामुळे राज्याचं बी काही चांगल्या मनाच्या लोकांमध्ये रुजत आहे आणि ते वाढत आहे. (मत्त. १३:१८, २३) सत्याचं बी कोणामुळे वाढत आहे आणि फलदायी बनत आहे? येशूने म्हटलं की “पित्याने आकर्षित केल्याशिवाय” कोणीही त्याचा शिष्य बनू शकत नाही. (योहा. ६:४४) बायबलमध्ये याचं एक उदाहरण दिलं आहे. पौल फिलिप्पै शहराबाहेर काही स्त्रियांना आनंदाचा संदेश सांगत होता. त्यांच्यापैकी लुदिया नावाच्या एका स्त्रीबद्दल बायबल म्हणतं, “पौल सांगत असलेल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी यहोवाने तिचे अंतःकरण पूर्णपणे उघडले.” (प्रे. कार्ये १६:१३-१५) यहोवा आज लुदियाप्रमाणे लाखो लोकांना त्याच्याकडे आकर्षित करत आहे.

१६. सेवाकार्यात मिळालेल्या यशाचं श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे?

१६ सेवाकार्यात मिळालेल्या यशाचं श्रेय आपण खरंतर कोणाला दिलं पाहिजे? पौलने करिंथच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात या प्रश्‍नाचं उत्तर मिळतं. त्यात त्याने म्हटलं, “मी लावले, अपुल्लोने पाणी घातले, पण देव वाढवत राहिला, त्यामुळे, लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देवच सर्वकाही आहे.” (१ करिंथ. ३:६, ७) पौलप्रमाणे आपणसुद्धा सेवाकार्यात मिळालेल्या यशाचं श्रेय यहोवालाच दिलं पाहिजे.

१७. देव, येशू आणि स्वर्गदूत यांच्यासोबत काम करण्याच्या संधीबद्दल आपल्याला कदर असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

१७ देव, ख्रिस्त आणि स्वर्गदूत ‘यांच्यासोबत’ काम करण्याच्या संधीबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? प्रत्येक संधीचा वापर करून आवेशाने इतरांना आनंदाचा संदेश सांगण्याद्वारे आपण असं करू शकतो. आणि असं करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसं की, “जाहीरपणे व घरोघरी” प्रचार करणं. (प्रे. कार्ये २०:२०) अनेक जण अनौपचारिक साक्षकार्यसुद्धा करतात. ते जेव्हा अनोळखी व्यक्‍तीला भेटतात तेव्हा ते तिच्याशी मैत्रीपूर्वक बोलून चर्चेची सुरुवात करतात. जर ती व्यक्‍ती ऐकायला तयार असेल तर ते कुशलतेने चर्चा आनंदाच्या संदेशाकडे वळवतात.

(परिच्छेद १८ पाहा) *

१८-१९. (क) आपण सत्याच्या बीला पाणी कसं घालतो? (ख) यहोवा बायबल विद्यार्थ्याला कसं मदत करतो याचं एक उदाहरण द्या.

१८ “देवाचे सहकारी” या नात्याने आपण फक्‍त बी पेरणार नाही तर त्याला पाणीही घालू. जेव्हा एखादी व्यक्‍ती संदेशात आवड दाखवते, तेव्हा आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत की बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने आपण किंवा दुसऱ्‍या एखाद्या प्रचारकाने तिची भेट घ्यावी. बायबल अभ्यास सुरू झाल्यावर यहोवा तिला आपल्या विचारांत बदल करायला मदत करत आहे हे पाहून आपल्याला खूप आनंद होईल.

१९ दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्‍या रफा-ललानी नावाच्या एका मांत्रिकाचं उदाहरण आपण पाहू या. त्यांनी बायबल अभ्यास सुरू केला. ते जे काही शिकत होते ते त्यांना आवडत होतं. पण मेलेल्या पूर्वजांशी बोलण्याबद्दल देवाचं वचन जे शिकवतं ते स्वीकारणं त्यांना कठीण जात होतं. (अनु. १८:१०-१२) मग हळूहळू त्यांना देवाचे विचार पटू लागले आणि त्यांनी स्वतःमध्ये बदल केले. खरंतर या कामामुळे त्यांचं घर चालायचं पण तरी ते काम त्यांनी सोडून दिलं. रफा-ललानी आता ६० वर्षांचे आहेत. ते म्हणतात: “यहोवाच्या साक्षीदारांनी मला बऱ्‍याच मार्गांनी मदत केली आणि याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. त्यांनी मला नोकरी शोधायलासुद्धा मदत केली. पण सर्वात जास्त मी यहोवाचा आभारी आहे कारण त्याच्यामुळेच मी माझ्या जीवनात बदल करू शकलो. आता मी एक यहोवाचा साक्षीदार आहे आणि आनंदाने सेवाकार्य करतो.”

२०. तुम्ही काय करण्याचा पक्का निर्धार केला आहे?

२० या लेखात आपण चार न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल चर्चा केली. यांपैकी सर्वात मौल्यवान म्हणजे यहोवाचा जवळचा मित्र असण्याची संधी. यामुळे आपण इतर न दिसणाऱ्‍या संपत्तीचा फायदा उचलू शकतो. त्या म्हणजे, प्रार्थनेत यहोवाशी बोलणं, पवित्र आत्म्याद्वारे मदत मिळवणं आणि यहोवासोबत, येशूसोबत व स्वर्गदूतांसोबत सेवाकार्यात मिळून काम करणं. तेव्हा या न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल आपण कदर वाढवण्याचा पक्का निर्धार करू या. तसंच, यहोवा आपला सर्वात चांगला मित्र आहे याबद्दल आपण नेहमी त्याचे आभार मानत राहू या.

गीत १९ नंदनवन—देवाचे अभिवचन

^ परि. 5 आधीच्या लेखात आपण अशा काही देणग्यांबद्दल चर्चा केली ज्या आपण पाहू शकतो. या लेखात आपण न दिसणाऱ्‍या देणग्यांबद्दल किंवा संपत्तीबद्दल चर्चा करणार आहोत. तसंच, त्यांबद्दल आपण कदर कशी बाळगू शकतो हेही पाहणार आहोत. शिवाय, या देणग्या देणाऱ्‍या यहोवा देवाबद्दल कदर वाढवायलाही आपल्याला या लेखामुळे मदत मिळेल.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: (१) यहोवाने बनवलेल्या सृष्टीकडे पाहताना एक बहीण यहोवासोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल विचार करत आहे.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: (२) प्रचार करताना धैर्य मिळावं म्हणून ती बहीण यहोवाकडे मदत मागत आहे.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: (३) पवित्र आत्म्याच्या मदतीने ती बहीण धैर्याने अनौपचारिक साक्षकार्य करत आहे.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: (४) अनौपचारिक साक्षकार्य करताना भेटलेल्या स्त्रीसोबत ती बायबल अभ्यास करत आहे. स्वर्गदूतांच्या मदतीने ती बहीण प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम करत आहे.