व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सौम्यता—या गुणाचा आपल्याला कसा फायदा होतो?

सौम्यता—या गुणाचा आपल्याला कसा फायदा होतो?

सारा * नावाची स्त्री म्हणते: “मी स्वभावाने लाजाळू आहे आणि माझ्यात आत्मविश्‍वासाचीसुद्धा कमतरता आहे. म्हणून आत्मविश्‍वासाने बोलणाऱ्‍या, तापट स्वभावाच्या लोकांमध्ये जेव्हा मी असते तेव्हा मला अस्वस्थ वाटतं. पण मी नम्र आणि सौम्य स्वभावाच्या लोकांसोबत असते तेव्हा मला बरं वाटतं. अशा एखाद्या व्यक्‍तीसोबत असताना मी मनमोकळेपणाने माझ्या भावना आणि समस्या सांगू शकते. माझे जवळचे मित्र अशाच स्वभावाचे आहेत.”

साराने म्हटलेल्या शब्दांवरून समजतं की आपला स्वभाव जर सौम्य असला, तर लोकांना आपल्याशी मैत्री करावीशी वाटेल. सौम्यता हा गुण यहोवालासुद्धा आवडतो. त्याचं वचन आपल्याला प्रोत्साहन देतं: “सौम्यता . . . परिधान करा.” (कलस्सै. ३:१२) पण सौम्यता म्हणजे काय? येशूने हा गुण कसा दाखवला? आणि या गुणामुळे आपण आनंदी कसं होऊ शकतो?

सौम्यता म्हणजे काय?

एक व्यक्‍ती शांतिप्रिय असते तेव्हा ती सौम्यता दाखवू शकते. एक सौम्य व्यक्‍ती इतरांशी प्रेमळपणे आणि दयाळूपणे वागते. चीड आणणाऱ्‍या परिस्थितीतही ती शांत राहते.

काही लोकांना वाटतं, की सौम्य व्यक्‍ती कमजोर असते. पण हे खरं नाही. बायबलमध्ये सौम्यता या शब्दासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा वापर, एका अशा जंगली घोड्याच्या बाबतीत केला आहे ज्याला पाळीव बनवण्यात येतं. त्याला जरी पाळीव बनवण्यात आलेलं असलं तरी तो कमजोर झालेला नसतो. त्याच्यात आधीसारखीच ताकद असते. त्याचप्रमाणे सौम्य व्यक्‍ती कमजोर नसते; उलट ती मजबूत असते. आपण असं का म्हणू शकतो? कारण ती तिची अपरिपूर्ण वृत्ती नियंत्रणात ठेवून इतरांशी शांती टिकवून ठेवू शकते.

तुम्ही कदाचित विचार कराल: ‘मी तर स्वभावाने सौम्य नाहीए.’ आज आपण अशा जगात राहत आहोत जिथे जास्तीत जास्त लोक तापट आणि अधीर स्वभावाचे आहेत. त्यामुळे आपल्याला सौम्यता हा गुण दाखवणं कठीण जाऊ शकतं. (रोम. ७:१९) हे खरं आहे की हा गुण विकसित करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. पण यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण सौम्य बनू शकतो. (गलती. ५:२२, २३) हा गुण विकसित करण्यासाठी आपण मेहनत का घेतली पाहिजे?

सौम्यता हा गुण लोकांना आवडतो. वर उल्लेख केलेल्या सारासारखं आपल्यालासुद्धा सौम्य वृत्तीच्या लोकांसोबत राहायला आवडतं. येशूचं याबाबतीत उत्तम उदाहरण आहे. तो स्वभावाने नम्र आणि दयाळू होता. (२ करिंथ. १०:१) लहान मुलं सहसा अनोळखी लोकांच्या जवळ जात नाहीत. पण येशू स्वभावाने नम्र असल्यामुळे लहान मुलं त्याला ओळखत नसली, तरी ती त्याच्या जवळ गेली.—मार्क १०:१३-१६.

सौम्यता या गुणामुळे आपला आणि इतरांचा फायदा होतो. जर आपण सौम्य असू तर आपण इतरांवर चिडणार नाही किंवा रागावणार नाही. (नीति. १६:३२) आपण इतरांना, खासकरून ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्यांना दुखावणार नाही आणि यामुळे आपल्यात दोषीपणाची भावना येणार नाही. तसंच आपण जर आपल्या भावनांवर, वागण्या-बोलण्यावर ताबा ठेवला तर इतर जण दुखावले जाणार नाही.

सौम्यतेचं उत्तम उदाहरण

येशूवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या होत्या आणि तो खूप व्यस्त असायचा तरी तो सर्वांशी सौम्यतेने वागला. त्याच्या काळातल्या बऱ्‍याचशा लोकांना कष्ट करावे लागत होते. जणू ते ओझ्यांनी दबलेले होते आणि त्यांना विश्रांतीची गरज होती. येशूने म्हटलं: “माझ्याकडे या . . . कारण मी सौम्य मनाचा आणि नम्र आहे.” कल्पना करा हे ऐकून त्यांना किती दिलासा मिळाला असेल.—मत्त. ११:२८, २९.

येशूप्रमाणे आपण सौम्यता हा गुण कसा विकसित करू शकतो? येशू लोकांशी कसा बोलला, कठीण परिस्थिती त्याने कशी हाताळली हे आपण बायबलमधून जाणून घेतलं पाहिजे. मग अशीच एखादी परिस्थिती आपल्यावर येते तेव्हा आपण येशूचं अनुकरण केलं पाहिजे. (१ पेत्र २:२१) येशू कोणत्या तीन कारणांमुळे सौम्यता दाखवू शकला यावर आता आपण चर्चा करू या.

येशू नम्र होता. येशूने म्हटलं की तो “सौम्य मनाचा आणि नम्र आहे.” (मत्त. ११:२९) बायबल या दोन गुणांचा एकत्र उल्लेख करतं, कारण सौम्यता आणि नम्रता यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. (इफिस. ४:१-३) आपण असं का म्हणू शकतो?

कारण नम्रता या गुणामुळे आपण स्वतःला जास्त महत्त्व देणार नाही किंवा एखादी गोष्ट पटकन मनाला लावून घेणार नाही. लोकांनी जेव्हा येशूची टीका केली व त्याला “खादाड” आणि “दारुडा” असं म्हटलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? त्याने सौम्यतेने उत्तर दिलं की “बुद्धी ही कार्यांद्वारे सिद्ध होते.”—मत्त. ११:१९.

जर एखादी व्यक्‍ती अविचारीपणे तुमचा वंश, लिंग किंवा पार्श्‍वभूमी यांबद्दल बोलते, तेव्हा तुम्ही सौम्यतेने उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता का? दक्षिण अमेरिकेतले पीटर नावाचे मंडळीतले वडील म्हणतात: “एखाद्याच्या बोलण्यामुळे मला जेव्हा चीड येते तेव्हा मी स्वतःला विचारतो, ‘येशू जर माझ्या जागी असता तर त्याने काय केलं असतं?’” ते पुढे म्हणतात: “मी ठरवलं आहे की मी स्वतःला खूप जास्त महत्त्व देणार नाही.”

मानव अपरिपूर्ण आहेत हे येशूला माहीत होतं. योग्य ते करण्याची येशूच्या शिष्यांची इच्छा होती. पण अपरिपूर्णतेमुळे ते नेहमीच तसं करू शकत नव्हते. उदाहरणार्थ, येशूच्या मृत्यूच्या आधी त्याने पेत्र, याकोब आणि योहान या त्याच्या शिष्यांकडून भावनिक आधाराची अपेक्षा केली होती, पण ते तिघं यात कमी पडले. त्यांना झोप का येत आहे हे येशूने समजून घेतलं. त्याबद्दल त्याने म्हटलं: “आत्मा तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.” (मत्त. २६:४०, ४१) प्रेषित अपरिपूर्ण आहेत ही गोष्ट त्याने समजून घेतली आणि त्यामुळे तो त्यांच्यावर चिडला नाही.

मँडी नावाची एक बहीण आधी इतरांची खूप टीका करायची. पण आता ती येशूच्या सौम्यतेच्या गुणाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते: “आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत हे मी नेहमी लक्षात ठेवते आणि यहोवाप्रमाणे इतरांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते.” येशू आपल्या शिष्यांची अपरिपूर्णता लक्षात ठेवून त्यांच्याशी सौम्यतेने वागला. आपणही येशूचं अनुकरण केलं पाहिजे.

येशूचा देवावर विश्‍वास होता. येशू पृथ्वीवर असताना त्याला अन्याय सहन करावा लागला. लोकांना त्याच्याबद्दल गैरसमज झाला आणि त्यांनी त्याचा द्वेष केला. तसंच, त्याचा छळही करण्यात आला. तरी तो सौम्यतेने वागला आणि “त्याने नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती स्वतःला सोपवून दिले.” (१ पेत्र २:२३) येशूला माहीत होतं की त्याच्या स्वर्गीय पित्याला त्याची काळजी आहे आणि त्याच्यावर अन्याय करणाऱ्‍यांना तो योग्य वेळी शिक्षा देईल. आपल्याला जर कोणी चुकीची वागणूक दिली आणि अशा वेळी आपल्याला राग आला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. म्हणून बायबल आपल्याला आठवण करून देतं: “रागाच्या आहारी जाणारा मनुष्य देवाच्या नीतिमत्त्वानुसार कार्य करू शकत नाही.” (याको. १:२०) जरी आपण योग्य कारणामुळे रागावलो असलो तरी आपल्या अपरिपूर्ण वृत्तीमुळे आपण चुकीची प्रतिक्रिया देऊ.

जर्मनीत राहणारी कॅथी नावाची बहीण विचार करायची: ‘तुम्ही जर स्वतःची बाजू मांडली नाही तर तुमच्या बाजूने कोणीच उभं राहणार नाही.’ पण यहोवावर विश्‍वास ठेवायला सुरुवात केल्यापासून तिने तिच्या मनोवृत्तीत बदल केला. ती पुढे म्हणते: “आता मी प्रत्येक वेळी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत नाही. त्याऐवजी सौम्यतेने वागण्याचा प्रयत्न करते. कारण मला माहीत आहे की यहोवा जगातल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी योग्य वेळी ठीक करेल.” जर तुमच्यावर कधी अन्याय झाला असेल तर येशूच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने देवावर भरवसा ठेवला. असं केल्यामुळे आपल्यालाही सौम्य राहायला मदत होईल.

“जे सौम्य वृत्तीचे ते सुखी आहेत”

सौम्यता या गुणामुळे कठीण परिस्थितींचा सामना करण्यासाठी आपल्याला कशी मदत होऊ शकते?

येशूने म्हटलं होतं की आपल्याला जर आनंदी व्हायचं असेल तर आपण सौम्य वृत्तीचे असायला हवे. बायबल म्हणतं: “जे सौम्य वृत्तीचे ते सुखी आहेत.” (मत्त. ५:५) सौम्यता हा गुण आपल्याला पुढे दिलेल्या परिस्थितींमध्ये कशी मदत करू शकतो हे आता आपण पाहू या.

सौम्यतेमुळे पती-पत्नीमधला ताण कमी होतो. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे रॉबर्ट नावाचे बांधव म्हणतात, “मी माझ्या पत्नीला खूप वाईट-साईट बोललो. मला खरंतर तसं बोलायचं नव्हतं. पण एकदा तुमच्या तोंडून वाईट शब्द निघाले तर ते परत घेता येत नाहीत. माझ्या शब्दांमुळे ती खूप दुखावली गेली आहे हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं.”

आपण सर्वच बोलण्यात “अनेकदा चुकतो” आणि आपण अविचारीपणे बोलल्यामुळे कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकतात. (याको. ३:२) पण अशा परिस्थितीत सौम्यतेमुळे आपल्याला शांत राहायला आणि आपल्या शब्दांवर ताबा ठेवायला मदत होते.—नीति. १७:२७.

रॉबर्ट यांनी शांत राहण्यासाठी आणि आत्मसंयम विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली. याचा काय परिणाम झाला? ते म्हणतात: “आता आमच्यात मतभेद होतात तेव्हा मी तिचं लक्षपूर्वक ऐकण्याचा, तिच्याशी सौम्यतेने बोलण्याचा आणि वाईट वाटून न घेण्याचा प्रयत्न करतो. आधी आमच्या नात्यात खूप ताण होता, पण आता मात्र ते खूप चांगलं झालंय.”

सौम्यतेमुळे आपण इतरांसोबत चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतो. ज्या लोकांना पटकन वाईट वाटतं त्यांचे फार कमी मित्र असतात. पण सौम्यता या गुणामुळे एकता टिकून राहते. (इफिस. ४:२, ३) आधी उल्लेख केलेली कॅथी म्हणते, “सौम्यता या गुणामुळे मला इतरांसोबत मैत्री करायला मदत होते. ज्यांच्यासोबत जुळवून घेणं सोपं नाही अशांसोबतही मला जुळवून घेणं सोपं जातं.”

सौम्यतेमुळे मन शांत राहतं. बायबल म्हणतं ‘वरून येणाऱ्‍या बुद्धीचा’ संबंध सौम्यता आणि शांतीशी आहे. (याको. ३:१३, १७) सौम्य व्यक्‍तीचं ‘मन शांत’ असतं. (नीति. १४:३०) मार्टिन नावाच्या बांधवाने सौम्यता हा गुण विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली. ते म्हणतात, “प्रत्येक वेळी माझ्याच पद्धतीने गोष्टी व्हाव्यात असा मी आता विचार करत नाही. आता मला मनाची शांती मिळाली आहे आणि मी खूप खूश आहे.”

हे खरं आहे की सौम्यता हा गुण विकसित करण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागेल. त्याबद्दल एक बांधव म्हणतो, “काही प्रसंगी अजूनही मला राग येतो.” पण सौम्यता हा गुण विकसित करण्याचं प्रोत्साहन देणारा, यहोवा देव आपल्याला यावर मात करायलाही मदत करेल. (यश. ४१:१०; १ तीम. ६:११) तो आपलं “प्रशिक्षण पूर्ण” करू शकतो आणि आपल्याला दृढही करू शकतो. (१ पेत्र ५:१०) मग आपण प्रेषित पौलप्रमाणे ख्रिस्ताच्या सौम्यतेचे आणि कृपेचे अनुकरण करू शकू. —२ करिंथ. १०:१.

^ परि. 2 काही नावं बदलण्यात आली आहेत.