व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

“इतरांकडून मी खरंच खूप काही शिकलो!”

“इतरांकडून मी खरंच खूप काही शिकलो!”

मी फ्रान्सच्या सैन्यात भरती झालो, तेव्हा मी फक्‍त वीसएक वर्षांचा होतो. त्या वेळी आमच्या सैन्याच्या तुकडीने अल्जिरियाच्या डोंगराळ भागात तळ दिला होता. फ्रान्स आणि अल्जिरियामध्ये भयंकर युद्ध सुरू होतं. त्या काळ्याकुट्ट रात्री, हातात मशीनगन घेऊन मी वाळूच्या पोत्यांच्या ढिगामागे उभा होतो आणि एकटाच पहारा देत होतो. अचानक जवळ येणाऱ्‍या पावलांचा आवाज ऐकून मी खूप घाबरलो. मला कुणालाही मारायचं नव्हतं आणि मरायचंही नव्हतं. म्हणून मी मोठ्याने ओरडलो, “देवा वाचव!”

त्या भयानक घटनेमुळे माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं. कारण तेव्हापासूनच मी देवाविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागलो. त्या रात्री नेमकं काय झालं हे सांगण्याआधी मी तुम्हाला माझ्या लहानपणीचे काही किस्से सांगतो. आणि मला देवाबद्दल जाणून घ्यावंसं का वाटलं तेसुद्धा सांगतो.

लहानपणी बाबांकडून शिकलेले काही धडे

१९३७ मध्ये गेनन या ठिकाणी माझा जन्म झाला. फ्रान्सच्या उत्तरेला असलेल्या या छोट्याशा शहरात, कोळशाच्या अनेक खाणी होत्या. त्यांतल्याच एका खाणीत माझे बाबा काम करायचे. त्यांच्याकडूनच मी मेहनत करायला आणि अन्यायाविरुद्ध लढा द्यायला शिकलो. कुणावरही अन्याय झालेला त्यांना पाहावत नव्हता. म्हणूनच अन्याय सहन करणाऱ्‍या आणि धोकादायक परिस्थितीत खाणीत काम करणाऱ्‍या लोकांसाठी ते लढायचे. त्यांच्या हक्कासाठी ते युनियनमध्ये भाग घ्यायचे आणि संपही करायचे. इतकंच नाही, तर चर्चमधल्या पाळकांचा ढोंगीपणा पाहूनही त्यांना खूप राग यायचा. त्यांच्यापैकी बरेच जण ऐशआरामात जगत होते. पण तरीसुद्धा खाणीत कष्ट करणाऱ्‍या गरीब कामगारांकडून ते खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पैसे घ्यायचे. त्यामुळे बांबानी मला कधीच धर्माबद्दल शिकवलं नाही, आणि देवाबद्दल तर नाहीच नाही.

मलाही बाबांसारखंच कुणावरही अन्याय झालेला पाहावत नव्हता. फ्रान्समधल्या बहुतेक लोकांना इतर देशांतून आलेले लोक मुळीच आवडत नव्हते. पण त्यांचं हे वागणं मला पटत नव्हतं. उलट दुसऱ्‍या देशांतून आलेल्या मुलांसोबत मी फुटबॉल खेळायचो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायचो. शिवाय माझी आईसुद्धा फ्रान्सची नव्हती. ती पोलंडची होती. सगळ्या जातीच्या लोकांनी एकमेकांना चांगली वागणूक द्यावी आणि शांतीने राहावं असं मला वाटत होतं.

मी जीवनाबद्दल खोलवर विचार करू लागलो

मी सैन्यात होतो तेव्हा

१९५७ मध्ये सरकारच्या आदेशावरून मी सैन्यात भरती झालो. मी सुरुवातीला सांगितलेली घटना त्याच वेळी घडली. मी जेव्हा मोठ्याने म्हणालो, “देवा वाचव!” तेव्हा माझ्यासमोर कुणी शत्रू नाही, तर एक रानगाढव आला होता. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. त्या घटनेमुळे आणि युद्धामुळेसुद्धा मी जीवनाचा खोलवर विचार करू लागलो. आपण या जगात का आहोत? देवाला आपली काळजी आहे का? कधीही युद्ध होणार नाही, सगळीकडे शांती असेल अशी वेळ कधी येईल का? अशा प्रश्‍नांचा मी विचार करू लागलो.

मी सुट्टीसाठी घरी गेलो होतो तेव्हा माझी भेट एका यहोवाच्या साक्षीदारासोबत झाली. त्याने मला फ्रेंच भाषेतलं एक बायबल दिलं. अल्जिरियाला परत गेल्यावर मी ते वाचू लागलो. प्रकटीकरण २१:३, ४ या वचनांनी माझं लक्ष खास वेधून घेतलं. तिथे म्हटलंय, “देवाचा तंबू माणसांजवळ आहे, . . . तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दु:ख राहणार नाही.” असं काही मी पहिल्यांदाच वाचत होतो. मी विचार केला, ‘असं खरंच घडेल का?’ त्या वेळी मला देवाबद्दल आणि बायबलबद्दल काहीच माहीत नव्हतं.

१९५९ मध्ये सैन्यातली माझी सेवा संपल्यानंतर फ्रान्सवा नावाच्या साक्षीदाराशी माझी भेट झाली. त्याने मला बायबलमधून कितीतरी गोष्टी शिकवल्या. जसं की, देवाचं नाव यहोवा आहे हे त्याने मला बायबलमधून दाखवलं. (स्तो. ८३:१८) त्याने मला हेही सांगितलं, की यहोवा लवकरच संपूर्ण पृथ्वीवरून अन्याय काढून टाकणार आहे, पृथ्वीला नंदनवन बनवणार आहे आणि प्रकटीकरण २१:३, ४ मधले शब्द पूर्ण करणार आहे.

त्या गोष्टी मला लगेच पटल्या आणि आवडल्यासुद्धा. पण त्याच वेळी मला पाळकांचा रागही येऊ लागला. कारण ते लोकांना अशा गोष्टी शिकवत होते ज्या बायबलमध्ये नाहीएत. अन्यायाबद्दल मला अजूनही बाबांसारखंच वाटत होतं. मला मुळीच राहावत नव्हतं. हे सगळं थांबवण्यासाठी मला लगेच काहीतरी करायचं होतं.

पण फ्रान्सवा आणि इतर साक्षीदार मित्रांनी मला शांत व्हायला मदत केली. त्यांनी मला समजावून सांगितलं, की आपलं काम लोकांचा न्याय करायचं नाही, तर त्यांना देवाच्या राज्याचा प्रचार करायचं आहे. हेच काम येशूने केलं आणि आपल्या शिष्यांनाही करायला सांगितलं. (मत्त. २४:१४; लूक ४:४३) तसंच, लोकांशी प्रेमाने आणि विचार करून बोलायलाही मी शिकलो; मग त्यांचे विश्‍वास वेगळे असले तरीसुद्धा. कारण बायबल म्हणतं, की “प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो संगळ्यांशी सौम्यतेने वागणारा . . . असावा.”—२ तीम. २:२४.

मी स्वत:मध्ये बदल केले आणि १९५९ च्या विभागीय संमेलनात माझा बाप्तिस्मा झाला. तिथे मला ॲन्जेल नावाची एक बहीण भेटली. ती मला खूप आवडली. ती ज्या मंडळीत होती तिथे मी सभांना जाऊ लागलो. आणि १९६० मध्ये आमचं लग्न झालं. तिची प्रशंसा करावी तितकी कमीच. खरंच, ती यहोवाकडून मिळालेली एक भेट आहे!—नीति. १९:१४.

आमच्या लग्नाच्या दिवशी

अनुभवी भावांकडून मी बरंच काही शिकलो

आजपर्यंत अनुभवी भावांकडून मला अनेक मोलाचे धडे शिकायला मिळाले. सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे, कुठलीही कठीण जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडायची असेल, तर आपण नम्र असलं पाहिजे. आणि नीतिवचनं १५:२२ मध्ये दिलेला सल्ला लागू केला पाहिजे. तिथे म्हटलंय, “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.”

१९६५ साली फ्रान्समध्ये विभागीय कार्यात असताना

हे शब्द किती खरे आहेत याची मला जाणीव होऊ लागली. १९६४ मध्ये मी विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करू लागलो. भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि यहोवावरचा त्यांचा विश्‍वास वाढवण्यासाठी मी मंडळ्यांना भेटी देऊ लागलो. तेव्हा मी फक्‍त २७ वर्षांचा होतो आणि माझ्याकडे फारसा अनुभवही नव्हता. त्यामुळे माझ्याकडून बऱ्‍याच चुका झाल्या. पण त्या चुकांमधून मी शिकत गेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अनुभवी भावांनी दिलेल्या सल्ल्यांतून मला बरेच मोलाचे धडे शिकायला मिळाले.

मी नवीनच विभागीय पर्यवेक्षक बनलो होतो तेव्हाची एक गोष्ट मला आठवते. पॅरिसमधल्या एका मंडळीला भेट दिल्यानंतर तिथल्या एका प्रौढ आणि अनुभवी भावाने मला म्हटलं, “तुझ्याशी दोन मिनिटं बोललो तर चालेल का?” मी म्हटलं, “हो हो, का नाही.”

ते म्हणाले, “लूई, एक डॉक्टर जेव्हा घरी येतो तेव्हा तो कुणाला पाहायला येतो?”

मी म्हणालो, “घरात जो आजारी असेल त्याला.”

तेव्हा ते म्हणाले, “बरोबर. पण मी पाहिलं, की मंडळीत जे आध्यात्मिक रितीने चांगले आहेत त्यांच्यासोबतच तू जास्त वेळ घालवलास. जसं की, मंडळीचे पर्यवेक्षक. पण या मंडळीत असे कितीतरी भाऊबहीण आहेत जे निराश आहेत, नवीन आहेत आणि लाजाळू स्वभावाचे आहेत. त्यांच्यासोबत जर तू वेळ घालवलास किंवा त्यांच्या घरी जेवायला गेलास तर त्यांना किती बरं वाटेल!”

त्या भावाने प्रेमळपणे दिलेला तो सल्ला खूप योग्य आणि मोलाचा होता. यहोवाच्या लोकांबद्दल त्यांना किती प्रेम आहे हे मी पाहिलं, आणि ही गोष्ट माझ्या मनाला भिडली. स्वत:ची चूक मान्य करणं जरा कठीण होतं. पण मी त्यांचा सल्ला ऐकला आणि लगेच त्याप्रमाणे काम करू लागलो. असे अनुभवी प्रौढ भाऊ यहोवाच्या संघटनेत आहेत, त्यासाठी मी नेहमीच त्याचे आभार मानतो.

१९६९ आणि १९७३ मध्ये पॅरिसच्या कोलंब शहरात दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशनं झाली होती. तिथे जेवणाच्या व्यवस्थेचं काम मला पाहायचं होतं. १९७३ च्या अधिवेशनात पाच दिवसांसाठी जवळजवळ ६० हजार लोकांच्या जेवणाची सोय करायची होती. त्यामुळे माझ्या मनावर किती दडपण आलं असेल याचा तुम्ही विचार करू शकता. पण पुन्हा नीतिवचनं १५:२२ या वचनाने मला मदत केली. त्यात म्हटलंय, की आपण इतरांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि तेच मी केलं. जे भाऊ आचाऱ्‍याचं, कसाईचं, शेतीचं आणि खरेदीचं काम करतात अशा अनुभवी भावांचा मी सल्ला घेतला. संगळ्यांच्या मदतीमुळे, डोंगरासारखी वाटणारी ही जबाबदारी आम्ही सहज पूर्ण करू शकलो.

१९७३ मध्ये मला आणि माझ्या पत्नीला फ्रान्समधल्या बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं. तिथे सुरुवातीला मला जे काम देण्यात आलं होतं तेसुद्धा खूप कठीण होतं. आफ्रिकेच्या कॅमरून देशातल्या भाऊबहिणींना प्रकाशनं कोणत्या मार्गांनी पोचवता येतील हे मला पाहायचं होतं. कारण १९७० आणि १९९३ या काळादरम्यान तिथे आपल्या कामावर बंदी होती. पुन्हा एकदा माझ्या मनावर खूप दडपण आलं. फ्रान्समध्ये या कामाची देखरेख करणाऱ्‍या भावाने हे ओळखलं आणि ते मला म्हणाले, “कॅमरूनमधल्या आपल्या भाऊबहिणींना आध्यात्मिक अन्‍नाची खूप गरज आहे. आपण ती पूर्ण केली पाहिजे.” आणि आम्ही तेच केलं.

१९७३ साली नायजिरियामध्ये एक खास सभा होती. त्या वेळी कॅमरूनमधून आलेल्या भाऊबहिणींसोबत

कॅमरूनमधल्या वडिलांना भेटण्यासाठी तिथल्या आजूबाजूच्या देशांना मी अनेकदा भेटी दिल्या. ते वडील खरंच खूप धाडसी आणि विचारशील होते. कॅमरूनमध्ये आपली प्रकाशनं नियमितपणे कशी पोचवता येतील याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी मला मदत केली. आमच्या या प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद होता असं म्हणता येईल. कारण २० वर्षांच्या त्या काळात असं कधीच झालं नाही की तिथल्या भाऊबहिणींना टेहळणी बुरूज  मासिक आणि आपली राज्य सेवा  कधी मिळाली नाही.

१९७७ साली कॅमरूनमधून आलेल्या विभागीय पर्यवेक्षकांसोबत आणि त्यांच्या पत्नींसोबत मी आणि ॲन्जेल

मी माझ्या प्रिय पत्नीकडून खूप काही शिकलो

लग्नाआधी एकमेकांना ओळखण्यासाठी आम्ही भेटायचो तेव्हाच मला जाणवलं, की ॲन्जेलचं यहोवावर खूप प्रेम आहे. आणि लग्नानंतर तर ही गोष्ट आणखीनच चांगल्या प्रकारे जाणवली. एकत्र मिळून होताहोईल तितकी यहोवाची सेवा करायची आमची दोघांची इच्छा होती. आणि आमची ही इच्छा तिने लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री प्रार्थनेत मला बोलायला सांगितली. आमची ती प्रार्थना यहोवाने ऐकली.

ॲन्जेलने मला यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवायलाही मदत केली. मी असं का बोलतो त्याचा एक अनुभव तुम्हाला सांगतो. १९७३ मध्ये आम्हाला बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं, तेव्हा मी जरा कचरतच होतो. कारण मला माझं विभागीय काम खूप आवडायचं. पण ॲन्जेलने मला याची आठवण करून दिली, की ‘आपण आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे. मग संघटना आपल्याला जसं सांगते तसं आपण करायला नको का?’ (इब्री १३:१७) मला तिचं म्हणणं पटलं आणि आम्ही बेथेलला गेलो. खरंच माझी पत्नी खूप समजूतदार आहे आणि यहोवावर तिचं खूप प्रेम आहे. तिच्या या चांगल्या गुणांमुळे आमचं नातं मजबूत झालंय आणि आजपर्यंत आम्हाला चांगले निर्णय घेता आले.

फ्रान्स बेथेलच्या बागेत, ॲन्जेलसोबत

आता आमचं वय झालंय. पण आतासुद्धा ॲन्जेल मला खूप चांगली साथ देते. जसं, संघटनेने आयोजित केलेल्या प्रशालेला जाण्यासाठी आम्हा दोघांना इंग्लिश भाषा शिकावी लागली. कारण बऱ्‍याचशा प्रशाला इंग्लिशमध्ये असतात. त्यासाठी आम्हाला इंग्लिश भाषेच्या मंडळीत जावं लागलं. त्या वेळी आमचं वय जवळपास ७५ होतं. शिवाय, फ्रान्सच्या शाखा समितीचा सदस्य असल्यामुळे माझ्यावर अनेक जबाबदाऱ्‍या होत्या. त्यामुळे नवीन भाषा शिकण्यासाठी मला पुरेसा वेळ देता येत नव्हता. पण ती भाषा शिकून घेण्यासाठी आम्ही दोघांनी एकमेकांना मदत केली. आता मी वयाची ऐंशी ओलांडली आहे. पण तरीसुद्धा आम्ही इंग्लिश आणि फ्रेंच या दोन्ही भाषांमध्ये सभांची तयारी करतो. तसंच, मंडळीच्या सभांमध्ये आणि प्रचारकार्यात आम्ही होताहोईल तितका सहभाग घ्यायचा प्रयत्न करतो. इंग्लिश शिकण्यासाठी आम्ही जी काही मेहनत घेत आहोत त्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे.

असाच एक आशीर्वाद २०१७ मध्ये आम्हाला मिळाला. शाखा समितीच्या सदस्यांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहण्याचा बहुमान मला आणि ॲन्जेलला मिळाला. ही प्रशाला पॅटरसन, न्यूयॉर्क इथल्या वॉचटॉवर शिक्षण केंद्रामध्ये होती.

यहोवा खरंच एक महान शिक्षक आहे. (यश. ३०:२०) त्यामुळे त्याच्या सगळ्याच सेवकांना सर्वात चांगलं शिक्षण मिळतं; मग ते तरुण असोत किंवा वयस्कर. (अनु. ४:५-८) मी पाहिलंय, जे तरुण यहोवाचं आणि अनुभवी भाऊबहिणींचं ऐकतात ते आयुष्यात चांगले निर्णय घेतात आणि यहोवाचे विश्‍वासू सेवक बनतात. आणि नीतिवचनं ९:९ आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतं. ते म्हणतं, “बुद्धिमान माणसाला ज्ञान दे, म्हणजे तो आणखी बुद्धिमान होईल. नीतिमानाला शिकव, म्हणजे तो आपलं ज्ञान वाढवेल.”

साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळ्याकुट्ट भीतिदायक रात्रीचा मी कधीकधी विचार करतो. पण माझं आयुष्य इतकं सुंदर असेल याची मला त्या वेळी कल्पना नव्हती. इतरांकडून मी खरंच खूप काही शिकलो. यहोवाने मला आणि ॲन्जेलला खूप चांगलं जीवन दिलं. त्यामुळे आम्ही ठरवलंय, की यहोवाकडून आणि अनुभवी भाऊबहिणींकडून नेहमी शिकत राहायचं.