व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १९

जो यहोवावर प्रेम करतो तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळत नाही

जो यहोवावर प्रेम करतो तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळत नाही

“तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्‍यांना खूप शांती मिळते; ते कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाहीत.”—स्तो. ११९:१६५.

गीत ३२ निर्भयी व निश्‍चयी राहा!

सारांश *

१-२. एका लेखकाने काय म्हटलं, आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आज लाखो लोक म्हणतात, की ते येशूला मानतात. पण त्याने जे शिकवलं त्याप्रमाणे ते चालत नाहीत. (२ तीम. ४:३, ४) एका लेखकाने तर असंही लिहिलं: ‘जर येशूसारखाच एखादा माणूस आज आपल्यामध्ये असता आणि येशूने शिकवल्या त्याच गोष्टी त्याने शिकवल्या असत्या, तर दोन हजार वर्षांपूर्वी जसं लोकांनी येशूला नाकारलं तसंच या माणसालाही आपण नाकारलं असतं.’

पहिल्या शतकात अनेकांनी येशूच्या शिकवणी ऐकल्या होत्या आणि स्वतःच्या डोळ्यांनी त्याला चमत्कार करताना पाहिलं होतं. पण तरीसुद्धा त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. याची चार कारणं आधीच्या लेखात आपण पाहिली होती. या लेखात आणखी चार कारणं आपण पाहणार आहोत. तसंच, लोक आपला संदेश का ऐकत नाहीत, आणि आपण अडखळू नये म्हणून आपण काय करू शकतो हेसुद्धा आपण या लेखात पाहू या.

(१) येशूने लोकांमध्ये भेदभाव केला नाही

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण लोक ज्यांना तुच्छ लेखायचे त्यांच्यासोबत त्याने वेळ घालवला. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद ३ पाहा) *

३. काही लोकांनी येशूला का नाकारलं?

पृथ्वीवर असताना येशूने सगळ्या प्रकारच्या लोकांसोबत वेळ घालवला. त्याने श्रीमंत आणि अधिकारपदावर असलेल्या लोकांसोबत बसून जेवण केलं. पण त्याच वेळी त्याने गरीब आणि लाचार लोकांसोबतही भरपूर वेळ घालवला. इतकंच नाही, तर लोक ज्यांना “पापी” समजत होते त्यांच्याशी तो खूप दयाळूपणे वागला. पण काही घमेंडी लोकांना येशूचं हे वागणं आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याला नाकारलं. त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारलं, की “तुम्ही जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत का खातापिता?” त्यावर येशू त्यांना म्हणाला: “जे निरोगी असतात त्यांना वैद्याची गरज नसते, तर आजाऱ्‍यांना असते. मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलोय.”—लूक ५:२९-३२.

४. यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे यहुद्यांना मसीहाबद्दल काय माहीत असायला हवं होतं?

शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  मसीहा येण्याच्या खूप आधीच यशया संदेष्ट्याने सांगितलं होतं, की जगातले लोक त्याला स्वीकारणार नाहीत. त्याच्याबद्दल त्याने अशी भविष्यवाणी केली: “त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि लोकांनी त्याला टाळलं, . . . त्याचा चेहरा जसा काय आमच्यापासून लपलेला होता. त्याला तुच्छ समजण्यात आलं, आणि आम्ही त्याची काहीच किंमत केली नाही.” (यश. ५३:३) तर लोक मसीहाला टाळतील असं आधीच सांगितलं होतं. त्यामुळे लोक येशूला नाकारतील हे पहिल्या शतकातल्या यहुद्यांना माहीत असायला हवं होतं.

५. आज अनेक जण यहोवाच्या लोकांबद्दल कसा विचार करतात?

आजही हेच पाहायला मिळत का?  हो. आज पाळक अशा लोकांना खूप मानसन्मान देतात जे श्रीमंत आहेत, ज्यांचं समाजात मोठं नाव आहे आणि जगाच्या दृष्टीने जे खूप बुद्धिमान आहेत. या लोकांचे नैतिक स्तर अगदी खालच्या दर्जाचे असले तरीसुद्धा. पण तेच पाळक शुद्ध नैतिक जीवन जगणाऱ्‍या यहोवाच्या लोकांना तुच्छ लेखतात. कारण बऱ्‍याच जणांना असं वाटतं, की यहोवाच्या लोकांना जगात कोणतंही मोठं स्थान किंवा नाव नाही आहे. पौलने म्हटल्याप्रमाणे देवाने जरी “तुच्छ लेखल्या जाणाऱ्‍या” लोकांना निवडलं असलं, तरी त्याच्यासाठी त्याचे सगळे विश्‍वासू सेवक खूप महत्त्वाचे आहेत.—१ करिंथ. १:२६-२९.

६. मत्तय ११:२५, २६ या वचनांत येशूने काय म्हटलं, आणि त्याचं आपण कसं अनुकरण करू शकतो?

आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो?  (मत्तय ११:२५, २६ वाचा.) देवाच्या लोकांबद्दल जग कसा विचार करतं याकडे लक्ष देऊ नका. त्याऐवजी यहोवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नम्र लोकांचाच उपयोग करतो ही गोष्ट ओळखा. (स्तो. १३८:६) अशा लोकांना जग जरी तुच्छ लेखत असलं, तरीही त्यांच्याकडूनच यहोवाने किती मोठमोठी कामं साध्य केली आहेत याचा विचार करा.

(२) येशूने खोट्या शिकवणींचा पर्दाफाश केला

७. येशूने परूश्‍यांचा विरोध का केला?

येशूने त्याच्या काळातल्या परूश्‍यांचा उघडपणे विरोध केला. कारण यहोवाची योग्यपणे उपासना कशी करायची हे ते लोकांना शिकवत नव्हते. जसं की, आईवडिलांची काळजी कशी घ्यायची यापेक्षा आपले हात कसे धुवायचे यावर ते जास्त भर द्यायचे. म्हणून येशूने त्यांचा हा ढोंगीपणा उघड केला. (मत्त. १५:१-११) येशूने परूश्‍यांना जे म्हटलं ते ऐकून शिष्यांनाही फार आश्‍चर्य वाटलं असेल. त्यामुळे ते येशूला म्हणाले: “परूशी तुझ्या बोलण्याने अडखळले हे तुला कळलं का?” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “माझ्या पित्याने लावलं नाही असं प्रत्येक झाड उपटून टाकलं जाईल. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्‍या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.” (मत्त. १५:१२-१४, तळटीप) येशूचं हे बोलणं परूश्‍यांना मुळीच पटलं नाही आणि ते त्याच्यावर खूप रागावले. पण म्हणून सत्याबद्दल बोलायचं येशूने थांबवलं नाही.

८. सगळ्याच धार्मिक शिकवणी देवाला मान्य नाहीत हे येशूने कसं स्पष्ट केलं?

येशूने खोट्या धार्मिक शिकवणींचाही पर्दाफाश केला. सगळ्याच धार्मिक शिकवणी देवाला मान्य आहेत असं त्याने कधीच म्हटलं नाही. उलट त्याने म्हटलं, की नाशाकडे जाणाऱ्‍या पसरट रस्त्यावर अनेक जण असतील; तर जीवनाकडे जाणाऱ्‍या छोट्या रस्त्यावर खूप कमी लोक असतील. (मत्त. ७:१३, १४) पुढे त्याने हेही स्पष्ट केलं, की काही जण असं म्हणतील की ते देवाची उपासना करत आहेत; पण मुळात ते त्याची उपासना करणारे नसतील. अशा लोकांबद्दल तो म्हणाला: “खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा. कारण ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात, पण आतून ते क्रूर लांडगे आहेत. तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”—मत्त. ७:१५-२०.

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण त्याने खोट्या शिकवणींचा आणि चालीरितींचा पर्दाफाश केला. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद ९ पाहा) *

९. येशूने कोणत्या खोट्या धार्मिक शिकवणींचा पर्दाफाश केला?

शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  भविष्यवाणीत असं सांगितलं होतं, की यहोवाच्या मंदिरासाठी असलेला आवेश मसीहाला झपाटून टाकेल. (स्तो. ६९:९; योहा. २:१४-१७) त्या आवेशामुळेच येशूने खोट्या धार्मिक शिकवणींचा आणि चालीरितींचा पर्दाफाश केला. जसं की, परूशी लोक असं मानायचे, की माणसामध्ये आत्मा असतो, जो मेल्यानंतरही जिवंत राहतो. पण येशूने असं शिकवलं, की एक व्यक्‍ती मरते तेव्हा तिला कसलीही शुद्ध नसते. ती जसं काय झोपलेली असते. (योहा. ११:११) तसंच, मेलेली व्यक्‍ती जिवंत होऊ शकते यावर सदूकी लोक विश्‍वास ठेवत नव्हते. पण येशूने आपल्या मित्राला, लाजरला मेलेल्यातून जिवंत केलं. (योहा. ११:४३, ४४; प्रे. कार्यं २३:८) परूशी लोक असंही मानायचे, की आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं किंवा देव जे ठरवतो, तेच आपण करत असतो. पण येशूने शिकवलं, की देवाची सेवा करायची की नाही हे एक व्यक्‍ती स्वतः ठरवू शकते.—मत्त. ११:२८.

१०. आज अनेक जण आपला संदेश का ऐकत नाहीत?

१० आजही हेच पाहायला मिळतं का?  हो. आज अनेक जण आपला संदेश ऐकत नाहीत. कारण आपण बायबलमधून त्यांना दाखवून देतो, की त्यांच्या काही धार्मिक शिकवणी खोट्या आहेत. जसं की, धर्मगुरू आपल्या भक्‍तांना असं शिकवतात, की देव वाईट लोकांना नरकात शिक्षा देतो. अशा खोट्या गोष्टी शिकवून ते लोकांना आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतात. पण यहोवाची उपासना करणारे, लोकांना हे समजायला मदत करतात, की ही शिकवण साफ खोटी आहे. कारण देव मुळात खूप प्रेमळ आहे. याशिवाय, धर्मगुरू लोकांना अमर आत्म्याचीही शिकवण देतात. पण मेल्यानंतर एखाद्याचं अस्तित्व राहिलं असतं तर कोणालाही पुनरुत्थानाची गरज नसती. त्यामुळे बायबलमधून आपण त्यांना हे दाखवून देतो, की अमर आत्म्याची ही शिकवण खोटी आहे. तसंच, अनेक धर्मांमध्ये असं शिकवलं जातं, की आपण जे काही करतो ते देवाने किंवा एका अदृश्‍य शक्‍तीने आधीच ठरवलेलं असतं. पण आपण लोकांना शिकवतो, की माणसाला आयुष्यात निवड करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. आणि देवाची सेवा करायची की नाही हे तो स्वतः ठरवू शकतो. अशा प्रकारे आपण खोट्या शिकवणींचा पर्दाफाश करतो, तेव्हा धर्मगुरूंना आपला खूप राग येतो.

११. योहान ८:४५-४७ या वचनांप्रमाणे देवाच्या आपल्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत?

११ आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो?  सत्यावर आपलं प्रेम असेल तर देव जे काही शिकवतो त्याप्रमाणे आपण चालू. (योहान ८:४५-४७ वाचा.) सैतानासारखं आपण सत्य सोडून देणार नाही. आपण असं काहीच करणार नाही जे बायबलच्या विरोधात आहे. (योहा. ८:४४) उलट, येशूप्रमाणे आपण ‘वाइटाचा द्वेष करू’ आणि ‘चांगल्याला धरून राहू.’ आणि हीच देवाची त्याच्या लोकांकडून अपेक्षा आहे.—रोम. १२:९; इब्री १:९.

(३) येशूचा छळ करण्यात आला

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण त्याला वधस्तंभावर मारण्यात आलं. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद १२ पाहा) *

१२. येशू हा मसीहा आहे हे स्वीकारणं अनेक यहुद्यांना कठीण का गेलं?

१२ यहुद्यांनी आणखी एका कारणामुळे येशूला नाकारलं. त्याबद्दल पौल म्हणतो: “आपण तर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या ख्रिस्ताबद्दल घोषणा करतो. तो यहुद्यांसाठी अडखळण्याचं कारण” आहे. (१ करिंथ. १:२३) येशूला एका अपराध्यासारखं वधस्तभांवर मारण्यात आलं होतं. त्यामुळे तो एक मसीहा आहे ही गोष्ट स्वीकारणं अनेक यहुद्यांना कठीण गेलं.—अनु. २१:२२, २३.

१३. ज्यांनी येशूला नाकारलं त्यांनी कोणती गोष्ट समजून घेतली नाही?

१३ ज्या यहुदी लोकांनी येशूला नाकारलं त्यांनी ही गोष्ट समजून घेतली नाही, की तो निर्दोष आहे, त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत आणि त्याच्यावर अन्याय करण्यात आला आहे. येशूवर खटला चालवणाऱ्‍या लोकांनी कोणतेही कायदे-कानून पाळले नाही. त्यांनी घाईघाईने न्यायसभा भरवली. (लूक २२:५४; योहा. १८:२४) त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि त्याच्या विरोधात दिलेले पुरावे कितपत खरे आहेत, हे त्या न्यायाधीशांनी तपासून पाहण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याऐवजी येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून ते स्वतःच “त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत” होते. त्यांना तो सापडला नाही, तेव्हा महायाजकाने त्याला प्रश्‍न विचारून शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं कायद्याच्या विरोधात होतं. (मत्त. २६:५९; मार्क १४:५५-६४) आणि जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं तेव्हा याच न्यायाधीशांनी येशूच्या कबरेवर पहारा देणाऱ्‍या रोमी सैनिकांना “भरपूर चांदीची नाणी दिली.” आणि कबर का रिकामी आहे याबद्दल अफवा पसरवायला सांगितली.—मत्त. २८:११-१५.

१४. मसीहाच्या मृत्यूबद्दल भविष्यवाणीत काय सांगितलं होतं?

१४ शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  मसीहाला मरावं लागेल याची अनेक यहुद्यांनी अपेक्षा केली नव्हती. पण भविष्यवाणीत त्याच्याबद्दल काय सांगितलं होतं त्याकडे लक्ष द्या. त्यात म्हटलं होतं: “त्याने आपलं जीवन दिलं, आणि त्याला अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं; त्याने अनेकांच्या पापांचं ओझं वाहिलं, आणि अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली.” (यश. ५३:१२) त्यामुळे येशूला जेव्हा एक पापी म्हणून मृत्युदंड देण्यात आला तेव्हा यहुद्यांनी त्याला नाकारायला नको होतं.

१५. आज काही लोक यहोवाच्या साक्षीदारांचा संदेश का ऐकत नाहीत?

१५ आजही हेच पाहायला मिळतं का?  हो. येशूसारखंच आज यहोवाच्या साक्षीदारांवरही खोटे आरोप लावून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. याची काही उदाहरणं आपण पाहू. १९३० आणि १९४० च्या काळात अमेरिकेत आपल्या उपासनेवर बंदी घालण्यात आली, तेव्हा साक्षीदारांना कोर्टात अनेक खटले लढावे लागले. काही न्यायाधीशांनी सरळ-सरळ आपल्यासोबत पक्षपात केला आणि आपल्या विरोधात निर्णय दिले. कॅनडाच्या क्विबेक शहरात चर्च आणि सरकारने एकत्र मिळून आपल्या कामावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. आणि देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगत असल्यामुळे अनेक प्रचारकांना जेलमध्ये टाकलं. जर्मनीमध्ये नात्झी सरकारने आपल्या अनेक तरुण भावांना मृत्युदंड दिला. अलीकडच्या काळात तर रशियामध्ये आपल्या अनेक भावांना, प्रचाराचं काम करत असल्यामुळे दोषी ठरवून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. कारण हे काम ‘देशासाठी धोकादायक’ आहे असं तिथल्या अधिकाऱ्‍यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर अधिकाऱ्‍यांनी रशियन भाषेतल्या आपल्या नवे जग भाषांतर बायबलवरसुद्धा बंदी घातली, आणि हे पुस्तक ‘देशासाठी धोकादायक’ आहे असं घोषित केलं. कारण त्यात देवाचं नाव यहोवा दिलं आहे.

१६. १ योहान ४:१ यात सांगितल्याप्रमाणे यहोवाच्या लोकांबद्दल पसरवलेल्या खोट्या गोष्टींकडे आपण लक्ष का देऊ नये?

१६ आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो?  त्यासाठी खरं काय आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. डोंगरावरचं प्रवचन देताना येशूने लोकांना सांगितलं होतं, की काही लोक त्यांच्यावर “सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतील.” (मत्त. ५:११) यामागे खरंतर सैतानाचाच हात आहे. तोच विरोधकांना देवाच्या लोकांविषयी खोट्या गोष्टी पसरवायला लावतो. (प्रकटी. १२:९, १०) म्हणून अशा खोट्या गोष्टींकडे आपण मुळीच लक्ष देऊ नये. त्यांमुळे आपण घाबरून जाऊ नये किंवा आपला विश्‍वास कमजोर होऊ देऊ नये.—१ योहान ४:१ वाचा.

(४) येशूचा विश्‍वासघात करण्यात आला आणि त्याला एकटं सोडण्यात आलं

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण यहूदाने त्याचा विश्‍वासघात केला. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद १७-१८ पाहा) *

१७. येशूच्या मृत्यूच्या आधी कोणत्या घटना घडल्या, आणि त्यांमुळे काहींनी कसा विचार केला असेल?

१७ येशूच्या मृत्यूच्या काही वेळाआधी त्याच्या १२ प्रेषितांपैकी एकाने त्याचा विश्‍वासघात केला. एकाने तर तीन वेळा त्याला नाकारलं. आणि बाकीचे सगळे प्रेषित त्याला सोडून पळून गेले. (मत्त. २६:१४-१६, ४७, ५६, ७५) पण येशूला याचं मुळीच आश्‍चर्य वाटलं नाही. कारण त्याच्यासोबत असं होईल हे आधीच सांगण्यात आलं होतं. (योहा. ६:६४; १३:२१, २६, ३८; १६:३२) हे सगळं पाहून काहींनी कदाचित असा विचार केला असेल, की ‘येशूचे प्रेषित जर असे असतील, तर मला नाही बनायचं त्याचा शिष्य.’

१८. येशूच्या मृत्यूच्या आधी घडलेल्या घटनांमुळे कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या?

१८ शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  येशू पृथ्वीवर यायच्या कितीतरी शतकांआधी यहोवाने आपल्या वचनात सांगितलं होतं, की चांदीच्या ३० तुकड्यांसाठी मसीहाचा विश्‍वासघात केला जाईल. (जख. ११:१२, १३) तसंच, त्याच्या जवळच्या मित्रांपैकीच एक जण त्याचा विश्‍वासघात करेल असंही सांगितलं होतं. (स्तो. ४१:९) जखऱ्‍या संदेष्ट्यानेसुद्धा असं म्हटलं होतं: “मेंढपाळाला मार, आणि मेंढरांची पांगापांग होऊ दे.” (जख. १३:७) भविष्यवाण्यांमध्ये सांगितलेल्या या सगळ्या घटना येशूच्या बाबतीत पूर्ण होताना पाहून प्रामाणिक मनाच्या लोकांनी त्याला नक्कीच नाकारलं नसेल. उलट त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत झाला असेल.

१९. प्रामाणिक मनाच्या लोकांना काय माहीत आहे?

१९ आजही हेच पाहायला मिळतं का?  हो. आज आपल्या काळात असे काही लोक सत्य सोडून गेले आहेत ज्यांना बरेच लोक ओळखायचे. ते धर्मत्यागी बनले आणि इतरांनीही यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं म्हणून ते प्रयत्न करत आहेत. वृत्तपत्रं, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांवरून ते यहोवाच्या साक्षीदारांबद्दल चुकीची, नकारात्मक आणि खोटी माहिती पसरवतात. पण जे प्रामाणिक मनाचे असतात ते अशा माहितीवर विश्‍वास ठेवत नाहीत. कारण या गोष्टी घडतील असं बायबलमध्ये आधीच सांगितलं आहे हे त्यांना माहीत आहे.—मत्त. २४:२४; २ पेत्र २:१८-२२.

२०. सत्य सोडून गेलेल्या लोकांमुळे अडखळू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? (२ तीमथ्य ४:४, ५)

२० आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो?  बायबलचा नियमितपणे अभ्यास करून, प्रार्थना करून आणि यहोवाने दिलेल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवून आपण आपला विश्‍वास मजबूत केला पाहिजे. (२ तीमथ्य ४:४, ५ वाचा.) आपला विश्‍वास जर मजबूत असेल, तर यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सांगितलेल्या नकारात्मक गोष्टी ऐकून आपण घाबरून जाणार नाही. (यश. २८:१६) तसंच, यहोवावर, बायबलवर आणि आपल्या भाऊबहिणींवर जर आपलं प्रेम असेल, तर सत्य सोडून गेलेल्या लोकांमुळे आपण अडखळणार नाही.

२१. आज अनेक जण आपला संदेश ऐकत नसले, तरी आपण कोणती खातरी बाळगू शकतो?

२१ पहिल्या शतकात अनेक जण येशूमुळे अडखळले आणि त्यांनी त्याला नाकारलं. पण असेही अनेक जण होते ज्यांनी त्याला स्वीकारलं. जसं की, यहुदी न्यायसभेचा एक सदस्य आणि ‘याजकांपैकी बरेच जण.’ (प्रे. कार्यं ६:७; मत्त. २७:५७-६०; मार्क १५:४३) तसंच, आजसुद्धा लाखो लोक येशूचे शिष्य बनले आहेत. कारण शास्त्रवचनांत दिलेली सत्यं त्यांना माहीत आहेत आणि त्यांवर त्यांचं प्रेम आहे. आणि बायबलमध्ये म्हटलं आहे: “तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्‍यांना खूप शांती मिळते; ते कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाहीत.”—स्तो. ११९:१६५.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

^ परि. 5 लोकांनी येशूला का नाकारलं होतं आणि आज लोक आपला संदेश का ऐकत नाहीत याची चार कारणं आपण मागच्या लेखात पाहिली होती. याची आणखी चार कारणं या लेखात आपण पाहणार आहोत. तसंच, जे यहोवावर मनापासून प्रेम करतात ते कोणत्याही गोष्टीमुळे का अडखळत नाहीत तेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: मत्तय आणि इतर जकातदारांबरोबर बसून येशू जेवत आहे.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: येशू व्यापाऱ्‍यांना मदिरांतून हाकलून देत आहे.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: येशू आपला वधस्तंभ उचलून नेत आहे.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: यहूदा येशूचं चुंबन घेतो आणि त्याचा विश्‍वासघात करतो.