व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

बायबलच्या काळात लव्हाळ्यांपासून बोटी तयार केल्या जायच्या का?

लव्हाळ्याची वनस्पती

प्राचीन काळात इजिप्तचे लोक लव्हाळ्यांपासून * किंवा पपायरसपासून बनवलेल्या कागदावर लिहायचे हे आपल्याला माहीत आहे. ग्रीक आणि रोमी लोकसुद्धा लिहिण्यासाठी याचाच वापर करायचे. पण लव्हाळ्यांचा उपयोग बोटी बनवण्यासाठीसुद्धा केला जायचा हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

इजिप्तच्या एका कबरेत सापडलेल्या लव्हाळ्यांच्या दोन बोटींचे नमुने

जवळपास २,७०० वर्षांपूर्वी यशया संदेष्ट्याने असं लिहिलं होतं, की ‘इथियोपियाच्या नद्यांजवळ असलेल्या’ लोकांनी ‘समुद्रमार्गाने लव्हाळ्यांच्या नावांतून राजदूत पाठवले.’ पुढे यिर्मया संदेष्ट्याने अशी भविष्यवाणी केली होती, की मेद आणि पर्शियाचे लोक बाबेल शहरावर हल्ला करतील. आणि बाबेलच्या लोकांनी पळून जाऊ नये म्हणून ते त्यांच्या “लव्हाळ्याच्या नावा” जाळून टाकतील.—यश. १८:१, २; यिर्म. ५१:३२.

बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पुरात्त्वशास्त्रज्ञ जेव्हा हे सांगतात, की बायबलच्या काळात बोटी तयार करण्यासाठी लव्हाळ्यांचा वापर केला जायचा तेव्हा बायबल विद्यार्थ्यांना नवल वाटत नाही. (२ तीम. ३:१६) पुरात्त्वशास्त्रज्ञांना असं काय सापडलं आहे? प्राचीन इजिप्तमध्ये लव्हाळ्यांच्या बोटी तयार केल्या जायच्या याचे भरपूर पुरावे त्यांना सापडले आहेत.

लव्हाळ्यांपासून बोटी कशा तयार केल्या जायच्या?

इजिप्तच्या कबरींमध्ये असलेल्या चित्रांवरून आणि कोरीवकामांवरून दिसून येतं, की इजिप्तचे लोक लव्हाळ्यांच्या बोटी कशा तयार करायचे. ते लव्हाळ्यांचे खोड कापून त्यांचे छोटेछोटे गठ्ठे बनवायचे. आणि मग हे सगळे गठ्ठे एकत्र घट्ट बांधायचे. लव्हाळ्यांचे खोड त्रिकोणी असतात. त्यामुळे जेव्हा ते गठ्ठे एकत्र गच्च बांधले जातात तेव्हा ते खूप मजबूत होतात. इजिप्तच्या इतिहासाची माहिती देणाऱ्‍या एका पुस्तकात असं म्हटलं आहे, की लव्हाळ्यांपासून बनवलेल्या बोटी जवळजवळ ५५ फूट लांब असायच्या. आणि त्या चालवण्यासाठी बोटीच्या प्रत्येक बाजूला १०-१२ वल्हेकरी लागायचे.

इजिप्तच्या भिंतींवर केलेलं कोरीवकाम; त्यावरून दिसून येतं, की लव्हाळ्यांपासून बोटी कशा तयार केल्या जायच्या

बोटी बनवण्यासाठी लोक लव्हाळ्यांचा उपयोग का करायचे?

इजिप्तच्या ज्या खोऱ्‍यातून नाईल नदी वाहायची, तिथे लव्हाळ्यांची भरपूर वनस्पती उगायची. शिवाय, त्यांच्यापासून बोटी बनवणं खूप सोपं होतं. मोठमोठी जहाजं बनवण्यासाठी लकडांचा उपयोग होऊ लागला अगदी तेव्हासुद्धा मासेमारी आणि शिकार करणारे लोक लव्हाळ्यांपासून बनवलेल्या छोट्या बोटी वापरायचे.

प्रेषितांच्या काळात राहणाऱ्‍या प्लुटार्क नावाच्या एका ग्रीक लेखकाने असं म्हटलं, की त्याच्या काळातसुद्धा काही लोक लव्हाळ्यांपासून बनवलेल्या बोटी वापरायचे. यावरून कळतं, की पुढे बऱ्‍याच काळापर्यंत लोकांनी लव्हाळ्यांच्या बोटी वापरल्या.

^ परि. 3 ही वनस्पती सहसा दलदलीच्या ठिकाणी आणि पाण्याचा प्रवाह कमी असलेल्या नद्यांजवळ वाढते. ती जवळजवळ १६ फूट उंच वाढते. आणि तिचं खोड तळाशी जवळजवळ ६ इंच रूंद असतं.