व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १८

तुम्ही येशूमुळे अडखळाल का?

तुम्ही येशूमुळे अडखळाल का?

“ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही तो माणूस सुखी!”—मत्त. ११:६.

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश *

१. बायबलमधून शिकलेल्या गोष्टी तुम्ही इतरांना सांगू लागलात तेव्हा कदाचित काय झालं असेल?

तुम्हाला सत्य सापडल्याची पहिल्यांदा जाणीव झाली तो क्षण तुम्हाला आठवतो का? तुम्ही बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी किती स्पष्ट आणि सरळ होत्या! आणि तुम्हाला वाटलं, की तुमच्यासारखंच इतरांनाही या गोष्टी शिकायला खूप आवडेल. कारण बायबलच्या या शिकवणींमुळे त्यांना आत्ता एक आनंदी जीवन आणि भविष्यासाठी एक सुंदर आशा मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं. (स्तो. ११९:१०५) आणि म्हणून बायबलमधून शिकलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाइकांना खूप उत्साहाने सांगू लागलात. पण मग काय झालं? तुम्हाला वाटलं होतं तसं मुळीच झालं नाही. तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत.

२-३. येशूबद्दल आणि तो शिकवत असलेल्या गोष्टींबद्दल अनेकांना कसं वाटायचं?

आपण सांगत असलेला संदेश लोक ऐकत नाहीत तेव्हा आपल्याला मुळीच आश्‍चर्य वाटायला नको. कारण येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याचंसुद्धा अनेकांनी ऐकलं नाही. आपल्याला देवाचा पाठिंबा आहे हे सिद्ध करणारे कितीतरी चमत्कार त्याने केले होते. पण तरीसुद्धा लोकांनी त्याला नाकारलं. जसं की, त्याने लाजरला जिवंत केलं ही गोष्ट त्याचा विरोध करणारे यहुदी धर्मगुरूसुद्धा नाकारू शकले नाहीत. पण तरीही तो मसीहा असल्याचं त्यांनी मान्य केलं नाही. त्यांनी तर येशला आणि लाजरला मारून टाकायचाही प्रयत्न केला.—योहा. ११:४७, ४८, ५३; १२:९-११.

आपण मसीहा आहोत हे अनेक जण मान्य करणार नाहीत हे येशूला माहीत होतं. (योहा. ५:३९-४४) म्हणूनच बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या काही शिष्यांना तो म्हणाला: “ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही तो माणूस सुखी!” (मत्त. ११:२, ३, ६) पण प्रश्‍न आहे, की अनेकांनी येशूला का नाकारलं?

४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पहिल्या शतकात अनेकांनी येशूवर विश्‍वास का ठेवला नाही याची काही कारणं आपण या आणि पुढच्या लेखात पाहणार आहोत. तसंच, आज अनेक जण आपला संदेश का ऐकत नाहीत हेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, येशूमुळे अडखळू नये म्हणून आपण आपला विश्‍वास मजबूत कसा करू शकतो याची चर्चा या लेखात आपण करणार आहोत?

(१) येशूचं कुटुंब आणि गाव

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण तो एका गरीब कुटुंबातला आणि छोट्याशा शहरातला होता. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद ५ पाहा) *

५. येशू हा मसीहा नाही असं काही लोकांना का वाटलं असेल?

येशू खूप चांगला शिक्षक आहे आणि त्याने अनेक चमत्कार केले हे लोकांना माहीत होतं. पण तरीसुद्धा अनेकांनी त्याला नाकारलं. का बरं? कारण त्यांच्यासाठी तो फक्‍त एका गरीब सुताराचा मुलगा होता. शिवाय, येशू नासरेथचा राहणारा होता. आणि लोकांच्या मते ते एक छोटंसंच शहर होतं. येशूचा शिष्य नथनेल हासुद्धा सुरुवातीला या शहराबद्दल म्हणाला होता, की “नासरेथमधून कधी काही चांगलं येऊ शकतं का?” (योहा. १:४६) कदाचित त्याच्यासाठी ते इतकं काही खास शहर नसावं. किंवा मग, त्याच्या मनात मीखा ५:२ मधली भविष्यवाणी असावी ज्यात सांगितलं होतं, की मसीहाचा जन्म बेथलेहेमध्ये होईल, नासरेथमध्ये नाही.

६. येशू हाच मसीहा आहे हे ओळखण्यासाठी लोकांना कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली असती?

शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  यशया संदेष्ट्याने सांगितलं होतं, की “[मसीहा] कोण आहे, कुठला आहे?” हे येशूचे शत्रू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. (यश. ५३:८) मसीहाबद्दल अशा बऱ्‍याच गोष्टी आधीच सांगितल्या होत्या. त्या माहीत करून घेण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला असता तर येशूचा जन्म बेथलेहेमध्ये झाला आहे आणि तो दावीद राजाचा वंशज आहे हे त्यांना समजलं असतं. (लूक २:४-७) खरंतर, मीखा ५:२ मध्ये सांगितलं होतं, त्याप्रमाणे येशूचा जन्म बेथलेहेमध्येच झाला होता. मग तरीसुद्धा लोकांनी त्याला का नाकारलं? कारण खरं काय आहे हे जाणून न घेताच त्यांनी त्याच्याबद्दल आपलं मत बनवलं होतं. आणि त्यामुळे मसीहा म्हणून त्यांनी त्याला नाकारलं.

७. आज अनेक जण यहोवाच्या साक्षीदारांचा संदेश का ऐकत नाहीत?

आजही हेच पाहायला मिळतं का?  हो. कारण तसं पाहिलं तर आज यहोवाचे बहुतेक लोक खूप साधे आहेत. ते फार श्रीमंत नाहीत. आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं, की “ते अशिक्षित आणि सर्वसाधारण आहेत.” (प्रे. कार्यं ४:१३) काहींना असं वाटतं, की यहोवाचे लोक बायबल शिकवू शकत नाहीत. कारण त्यांनी नामवंत धार्मिक प्रशालांमधून शिक्षण घेतलेलं नाही. तर इतर काहींना असं वाटतं, की यहोवाच्या साक्षीदारांचा धर्म हा “अमेरिकेचा धर्म” आहे. पण खरं पाहिलं, तर अमेरिकेत फक्‍त १४ टक्के साक्षीदार आहेत. आणि असेही काही लोक आहेत जे म्हणतात, की ‘यहोवाचे साक्षीदार येशूला मानत नाहीत.’ इतकंच नाही, तर ते “साम्यवादी आहेत,” “अमेरिकेसाठी हेरगिरी करणारे आहेत” किंवा “देशासाठी धोकादायक आहेत” असंही त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवणारे लोक खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, आणि त्यामुळे ते आपला संदेश ऐकत नाहीत.

८. प्रेषितांची कार्यं १७:११ या वचनाप्रमाणे यहोवाच्या लोकांना ओळखण्यासाठी एका व्यक्‍तीने काय केलं पाहिजे?

अडखळू नये म्हणून एका व्यक्‍तीने काय करावं?  त्यासाठी खरं काय आहे हे तिने जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शुभवर्तमानाचं पुस्तक लिहिणाऱ्‍या लूकनेसुद्धा हेच केलं. त्याने ‘सगळ्या गोष्टींचा सुरुवातीपासून अचूकपणे शोध केला.’ कारण आपल्या वाचकांनी येशूबद्दल जे काही ऐकलं होतं, त्याची त्यांना “पूर्णपणे खातरी पटावी” असं त्याला वाटत होतं. (लूक १:१-४) बिरुयामध्ये राहणारे यहुदी लोकही लूकसारखेच होते. त्यांनी पहिल्यांदा येशूबद्दलचा संदेश ऐकला तेव्हा तो खरा आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी इब्री शास्त्रवचनांचं बारकाईने परीक्षण केलं. (प्रेषितांची कार्यं १७:११ वाचा.) त्यांच्यासारखंच खरं काय आहे ते एका व्यक्‍तीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यहोवाचे लोक जे शिकवतात ते खरं आहे की नाही, हे पाहण्यासाठी तिनेसुद्धा शास्त्रवचनांचं बारकाईने परीक्षण केलं पाहिजे. त्यासोबतच, यहोवाच्या साक्षीदारांचा अलीकडचा इतिहासही तिने जाणून घेतला पाहिजे. तिने जर हे केलं, तर साक्षीदारांबद्दल सांगितल्या जाणाऱ्‍या खोट्या गोष्टींवर ती लगेच विश्‍वास ठेवणार नाही.

(२) येशूने दिखावा करण्यासाठी चमत्कार केले नाहीत

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण त्याने दिखावा करण्यासाठी चमत्कार केले नाहीत. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद ९-१० पाहा) *

९. येशूने स्वर्गातून कोणतंही चिन्ह दाखवलं नाही तेव्हा काय झालं?

येशूच्या दिवसांत काही लोक त्याच्या नुसत्या शिकवणींमुळे समाधानी नव्हते; तर तो मसीहा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने “स्वर्गातून एखादं चिन्ह” दाखवावं असं ते म्हणाले. (मत्त. १६:१) कदाचित दानीएल ७:१३, १४ या वचनांच्या आधारावर ते असं म्हणाले असतील. पण ती भविष्यवाणी पूर्ण होण्याची यहोवाची वेळ अजून आली नव्हती. येशू जे काही शिकवत होता, त्यावरूनच त्यांना याची खातरी पटायला हवी होती, की तोच मसीहा आहे. म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येशूने जेव्हा त्यांना चिन्ह दाखवलं नाही, तेव्हा त्यांनी त्याला नाकारलं.—मत्त. १६:४.

१०. यशयाने मसीहाबद्दल जे सांगितलं होतं ते येशूने कसं पूर्ण केलं?

१० शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  मसीहाबद्दल यशया संदेष्ट्याने असं लिहिलं होतं: “तो आरडाओरडा करणार नाही किंवा मोठ्या आवाजात बोलणार नाही, तो रस्त्यांवर गाजावाजा करणार नाही.” (यश. ४२:१, २) येशूने इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून न घेता अगदी शांतपणे आपलं कार्य केलं. त्याने मोठमोठी मंदिरं बांधली नाहीत, धर्मगुरूंसारखे वेगळे कपडे घातले नाहीत किंवा आपल्या नावापुढे लोकांनी मानाच्या पदव्या लावाव्यात अशीही त्याने अपेक्षा केली नाही. इतकंच नाही, तर त्याची न्यायचौकशी होत होती, तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा हेरोद राजाला खूश करण्यासाठी त्याने कोणताही चमत्कार केला नाही. (लूक २३:८-११) येशूने पृथ्वीवर असताना काही चमत्कार केले, नाही असं नाही. पण प्रचारकार्याला त्याने सगळ्यात जास्त महत्त्वं दिलं. आणि म्हणूनच तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “यासाठीच मी आलोय.”—मार्क १:३८.

११. आज काही लोकांच्या कोणत्या चुकीच्या अपेक्षा आहेत?

११ आजही हेच पाहायला मिळतं का?  हो. आज अनेक लोक भव्यदिव्य मंदिरांमुळे, मानाच्या पदव्या असलेल्या धर्मगुरूंमुळे आणि अशा विधींमुळे प्रभावित होतात ज्या बायबलवर आधारित नाहीत. पण तिथे जाणाऱ्‍या लोकांना देवाबद्दल आणि त्याच्या उदेशांबद्दल कितपत शिकायला मिळत असेल? आपल्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणाऱ्‍या लोकांना मात्र खूप काही शिकायला मिळतं. यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे कसं जगू शकतो हे त्यांना शिकायला मिळतं. आपली राज्य सभागृहं भव्यदिव्य नसली तरी ती खूप स्वच्छ आणि नीटनेटकी असतात. तिथे नेतृत्व करणारे इतरांपेक्षा वेगळे कपडे घालत नाहीत किंवा आपल्या नावापुढे कोणत्याही मानाच्या पदव्या लावत नाहीत. आणि तिथे जे काही शिकवलं जातं ते पूर्णपणे बायबलवर आधारित असतं. पण असं असूनही अनेक जण आपला संदेश ऐकत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं, की आपली उपासना करण्याची पद्धत खूपच साधी आहे आणि त्यांना जे ऐकायला आवडतं ते आपण शिकवत नाही.

१२. इब्री लोकांना ११:१, ६ या वचनांप्रमाणे आपण आपला विश्‍वास कसा वाढवू शकतो?

१२ आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो?  रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलने असं म्हटलं: “वचन ऐकल्यावरच विश्‍वास ठेवला जातो; आणि ख्रिस्ताबद्दल प्रचार केल्यावरच वचन ऐकलं जातं.” (रोम. १०:१७) तर विश्‍वास वाढवण्यासाठी आपण शास्त्रवचनांचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला बायबलवर आधारित नसलेल्या धार्मिक विधी पाळायची गरज नाही; मग त्या कितीही आकर्षक वाटत असल्या तरीही. म्हणूनच बायबलचं अचूक ज्ञान घेऊन आपण आपला विश्‍वास मजबूत केला पाहिजे. कारण “विश्‍वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे.” (इब्री लोकांना ११:१,  वाचा.) आपण जे काही शिकत आहोत तेच सत्य आहे याची खातरी पटण्यासाठी आपल्याला स्वर्गातून कोणत्याही चिन्हाची गरज नाही; त्यासाठी बायबलच्या शिकवणींचा काळजीपूर्वक अभ्यास करणं पुरेसं आहे. अशा अभ्यासामुळे सत्याबद्दल असलेल्या आपल्या कोणत्याही शंका दूर होतील.

(३) येशूने यहुदी परंपरा पाळल्या नाहीत

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण त्याने यहुदी रूढी-परंपरा पाळल्या नाहीत. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद १३ पाहा) *

१३. अनेकांनी येशूला का नाकारलं?

१३ येशूचे शिष्य उपास करत नाहीत हे पाहून बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या शिष्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. त्या वेळी येशूने त्यांना समजावून सांगितलं, की तो जिवंत आहे तोपर्यंत त्यांना उपास करायची गरज नाही. (मत्त. ९:१४-१७) पण तरीसुद्धा परूशी लोकांनी त्याला नाकारलं. कारण तो त्यांच्या रूढी-परंपरा पाळत नव्हता. त्याने शब्बाथाच्या दिवशी आजारी लोकांना बरं केलं तेव्हा त्यांना खूप राग आला. (मार्क ३:१-६; योहा. ९:१६) एकीकडे ते शब्बाथ पाळायच्या मोठमोठ्या गोष्टी करत होते; पण दुसरीकडे मंदिरात व्यापार करणाऱ्‍या लोकांबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं. त्याबद्दल येशूने त्यांना फटकारलं तेव्हा ते खूप भडकले. (मत्त. २१:१२, १३, १५) आणि नासरेथच्या सभास्थानात येशू प्रचार करत होता तेव्हा तिथले लोक तर आणखीनच भडकले. कारण जुन्या काळातली उदाहरणं देऊन त्याने त्यांना दाखवून दिलं, की ते किती स्वार्थी आहेत आणि त्यांच्यात विश्‍वासाची किती कमी आहे. (लूक ४:१६, २५-३०) लोकांच्या अपेक्षेप्रमाणे येशू वागला नाही त्यामुळे अनेकांनी त्याला नाकारलं.

१४. येशूने मानवी परंपरांचा विरोध का केला?

१४ शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे असं म्हटलं होतं: “हे लोक तोंडाने माझा आदर करतात, ओठांनी माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे; ते माणसांच्या आज्ञा पाळतात, पण आपण देवाचं भय बाळगतोय असं त्यांना वाटतं.” (यश. २९:१३) शास्त्रवचनांवर आधारित नसलेल्या आणि माणसांनी बनवलेल्या रूढी-परंपरांचा विरोध करून येशूने बरोबरच केलं. कारण मानवांनी बनवलेल्या नियमांना आणि रूढी-परंपरांना शास्त्रवचनांपेक्षा जास्त महत्त्व देणाऱ्‍या लोकांनी यहोवाला आणि त्याने पाठवलेल्या मसीहाला नाकारलं होतं.

१५. अनेकांना यहोवाच्या साक्षीदारांच्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत?

१५ आजही हेच पाहायला मिळतं का?  हो. यहोवाचे साक्षीदार वाढदिवस, न्यू-ईयर किंवा नाताळ यांसारखे सणवार आणि परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे अनेकांना त्यांचा खूप राग येतो. तर इतर काही जण यहोवाच्या साक्षीदारांवर यामुळे रागवतात कारण ते देशभक्‍तीच्या कार्यक्रमांमध्ये आणि बायबलवर आधारित नसलेल्या अंत्यविधीच्या प्रथांमध्ये भाग घेत नाहीत. साक्षीदारांबद्दल राग बाळगणाऱ्‍या या लोकांना मनापासून असं वाटत असेल की ते ज्या प्रकारे देवाची उपासना करतात ती त्याला मान्य आहे. पण बायबलमध्ये स्पष्टपणे दिलेल्या शिकवणी पाळण्याऐवजी त्यांनी जर मानवी परंपरा पाळल्या, तर ते देवाला कधीच खूश करू शकणार नाहीत.—मार्क ७:७-९.

१६. स्तोत्र ११९:९७, ११३, १६३-१६५ या वचनांप्रमाणे आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे?

१६ आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो?  आपण यहोवावर, त्याने दिलेल्या नीति-नियमांवर आणि तत्त्वांवर असलेलं आपलं प्रेम वाढवू शकतो. (स्तोत्र ११९:९७, ११३, १६३-१६५ वाचा.) यामुळे यहोवाला न आवडणाऱ्‍या रूढी-परंपरा आपण पाळणार नाही. खरंतर, यहोवापेक्षा जास्त कुठल्याच गोष्टीवर आपण प्रेम करणार नाही.

(४) येशूने राजकीय बदल घडवून आणला नाही

अनेकांनी येशूला नाकारलं, कारण त्याने राजकारणात भाग घेतला नाही. आज अशाच कारणामुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत (परिच्छेद १७ पाहा) *

१७. येशूच्या दिवसांत मसीहाकडून अनेकांच्या काय अपेक्षा होत्या?

१७ येशूने लगेच राजकीय बदल घडवून आणावा असं काहींना वाटत होतं. कारण मसीहा जुलमी रोमी सरकारपासून आपली सुटका करेल अशी अपेक्षा ते करत होते. म्हणून त्यांनी येशूला राजा बनवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्यासाठी नकार दिला. (योहा. ६:१४, १५) याजकांना आणि इतर लोकांना मात्र असं वाटत होतं, की येशूने रोमी सरकार बदलू नये. कारण असं जर झालं तर रोमी लोक भडकतील आणि त्यांनी आपल्याला दिलेले सगळे अधिकार आपल्या हातून जातील अशी त्यांना भीती होती. या कारणांमुळे अनेक यहुदी लोकांनी येशूला नाकारलं.

१८. मसीहाबद्दल बायबलमध्ये दिलेल्या कोणत्या भविष्यवाण्यांकडे अनेक जण दुर्लक्ष करायचे?

१८ शास्त्रवचनांत काय सांगितलं होतं?  अनेक भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं होतं की मसीहा शेवटी विजय मिळवून राजा बनेल. पण त्याआधी त्याला मानवांच्या पापासाठी मरावं लागेल असंही इतर भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं होतं. (यश ५३:९, १२) मग असं असूनही अनेकांनी त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा का ठेवल्या? कारण त्यांना आपल्या समस्यांवर लगेच तोडगा हवा होता. आणि ज्या भविष्यवाण्यांमध्ये त्यांना तो मिळत नव्हता त्या भविष्यवाण्यांकडे ते साफ दुर्लक्ष करायचे.—योहा. ६:२६, २७.

१९. कोणत्या चुकीच्या अपेक्षांमुळे लोक आपला संदेश ऐकत नाहीत?

१९ आजही हेच पाहायला मिळतं का?  हो. आपण राजकारणात भाग घेत नाही त्यामुळे अनेक जण आपला विरोध करतात. आपण मतदान करावं असं त्यांना वाटतं. पण आपल्याला माहीत आहे, की आपण जर एखाद्या मानवी नेत्याला निवडलं, तर आपण यहोवाला नाकारू. (१ शमु. ८:४-७) लोकांना असंही वाटत असेल की आपण शाळा, हॉस्पिटल बांधावेत किंवा दानधर्म करावं. पण जगाच्या समस्या सोडवण्याऐवजी आपण आपलं पूर्ण लक्ष प्रचारकार्यावर लावतो म्हणून लोक आपला संदेश ऐकत नाहीत.

२०. मत्तय ७:२१-२३ यात सांगितल्याप्रमाणे आपण आपलं सगळं लक्ष कशावर लावलं पाहिजे?

२० आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो?  (मत्तय ७:२१-२३ वाचा.) आपण आपलं पूर्ण लक्ष येशूने दिलेलं काम पूर्ण करण्यावर लावलं पाहिजे. (मत्त. २८:१९, २०) जगाच्या राजकीय आणि सामाजिक समस्या सोडवण्याच्या मागे आपण लागू नये. आपलं लोकांवर प्रेम नाही किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी नाही, असं नाही. पण आपल्याला माहीत आहे की लोकांना मदत करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे, त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवणं आणि यहोवासोबत जवळची मैत्री करायला मदत करणं.

२१. आपण काय करायचा निश्‍चय केला पाहिजे?

२१ या लेखात आपण अशी चार कारणं पाहिली ज्यांमुळे पहिल्या शतकातल्या लोकांनी येशूला नाकारलं. आणि आज त्याच कारणांमुळे लोक कशा प्रकारे आपल्याला नाकारतात तेसुद्धा आपण पाहिलं. पण आपण निश्‍चय करू या, की कोणत्याही गोष्टीमुळे आपण अडखळणार नाही. उलट आपण आपला विश्‍वास आणखी मजबूत करत राहू. लोकांनी येशूला का नाकारलं याची आणखी चार कारणं आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ३४ आपल्या नावाला जागू या!

^ परि. 5 येशू हा पृथ्वीवर होऊन गेलेला सगळ्यात महान शिक्षक होता. पण तरीसुद्धा अनेकांनी त्याला नाकारलं. का? याची चार कारणं या लेखात आपण पाहणार आहोत. आज अनेक जण आपला संदेश का ऐकत नाहीत हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, येशूमुळे अडखळू नये म्हणून आपण आपला विश्‍वास मजबूत कसा करू शकतो याची चर्चा या लेखात आपण करणार आहोत?

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: फिलिप्प नथनेलला, येशूला भेटायला सांगत आहे.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: येशू लोकांना प्रचार करत आहे.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: येशू वाळलेल्या हाताच्या एका माणसाला आपल्या विरोधकांसमोर बरं करत आहे.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: एकांत मिळावा म्हणून येशू एकटाच एका डोंगराकडे चालला आहे.