व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २०

निराश होऊ नका, प्रचार करत राहा

निराश होऊ नका, प्रचार करत राहा

“सकाळीच बी पेर आणि संध्याकाळपर्यंत आपल्या हाताला विश्रांती देऊ नकोस.”—उप. ११:६.

गीत ४४ कापणीत आंनदाने सहभागी व्हा!

सारांश *

येशू स्वर्गात गेला त्यानंतर त्याच्या शिष्यांनी येरुशलेममध्ये आणि इतर अनेक ठिकाणी खूप आवेशाने प्रचार केला (परिच्छेद १ पाहा)

१. येशूने आपल्या शिष्यांसमोर कोणतं उदाहरण मांडलं, आणि शिष्यांनी काय केलं? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

पृथ्वीवर असताना येशूने प्रचार करायचं कधीच थांबवलं नाही. कधी ना कधी लोक आपलं ऐकतील या आशेने तो प्रचार करत राहिला. आणि आपल्या शिष्यांनीही तेच करावं अशी त्याची इच्छा होती. (योहा. ४:३५, ३६) येशू सोबत होता तोपर्यंत शिष्यांनी खूप आवेशाने प्रचार केला. (लूक १०:१, ५-११, १७) पण येशूला अटक करून ठार मारण्यात आलं, तेव्हा मात्र त्यांचा आवेश काही काळासाठी कमी झाला. (योहा. १६:३२) त्यामुळे पुनरुत्थान झाल्यावर येशूने त्यांना प्रचारकार्याकडे आपलं लक्ष लावायचं प्रोत्साहन दिलं. याचा परिणाम असा झाला, की येशू स्वर्गात गेल्यानंतर शिष्य इतक्या आवेशाने प्रचार करू लागले, की त्यांच्या शत्रूंनी असं म्हटलं: “तुम्ही तर संपूर्ण यरुशलेम शहरात तुमच्या शिकवणी पसरवल्या आहेत.”—प्रे. कार्यं ५:२८.

२. यहोवाने प्रचारकार्यावर कसा आशीर्वाद दिला?

पहिल्या शतकात ख्रिश्‍चनांनी केलेल्या प्रचारकार्याचं येशूने मार्गदर्शन केलं आणि यहोवाने त्यांच्या कामावर आशीर्वाद दिला. याचं एक उदाहरण म्हणजे, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जवळजवळ ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्यं २:४१) पुढेही शिष्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. (प्रे. कार्यं ६:७) पण शेवटल्या दिवसांत याहून मोठ्या प्रमाणात लोक आपला संदेश ऐकतील असं येशूने आधीच सांगितलं होतं.—योहा. १४:१२; प्रे. कार्यं १:८.

३-४. काही ठिकाणी प्रचार करणं कठीण का असू शकतं, आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आपण सगळेच जण आंनदाने प्रचार करण्याचा प्रयत्न करत असतो. काही देशांमध्ये हे करणं सोपं आहे. कारण तिथे इतक्या लोकांना बायबलचा अभ्यास करायचा असतो, की त्यांचा अभ्यास घेण्यासाठी साक्षीदार कमी असतात. पण इतर काही देशांमध्ये प्रचार करणं तितकं सोपं नसतं. कारण तिथे फार कमी लोक घरी भेटतात आणि जे भेटतात तेही फारसं ऐकत नाहीत.

अशा ठिकाणी तुम्ही राहत असाल तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. कारण या लेखात आपण पाहणार आहोत, की जास्तीत जास्त लोकांना भेटण्यासाठी काही प्रचारकांनी काय केलं आहे. तसंच, लोक आपला संदेश ऐकोत किंवा न ऐकोत आपण आनंदाने प्रचार कसा करत राहू शकतो, हेही आपण या लेखात पाहणार आहोत.

लोक घरी भेटत नसले तरी प्रचार करायचं सोडू नका

५. काही ठिकाणी साक्षीदारांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?

आजकाल लोकांना घरी भेटणं खूप कठीण झालं आहे. कारण बरेच लोक अशा ठिकाणी किंवा अशा बिल्डींगमध्ये राहतात जिथे आपल्याला जायची परवानगी नसते; तर काही ठिकाणी घरोघर जाऊन साक्षकार्य करणं शक्य असतं, पण फार कमी लोक घरी भेटतात. आणि अशीही काही गावं आहेत जिथे खूप कमी लोक राहतात. एका घरापासून दुसऱ्‍या घरापर्यंत जाण्यासाठी प्रचारकांना खूप प्रवास करावा लागतो. आणि इतका प्रवास करून गेल्यावरही घरमालक घरी भेटेलच याची काही शाश्‍वती नसते. अशा समस्या आपल्यासमोर असतील तर आपण निराश होऊन प्रचार करायचं सोडून देऊ नये. मग या समस्यांवर मात करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना प्रचार करण्यासाठी आपण काय करू शकतो?

६. येशूने प्रचाराच्या कामाची तुलना कशासोबत केली?

येशूने म्हटलं, की प्रचाराचं काम हे मासेमारीच्या कामासारखं आहे. (मार्क १:१७) कधीकधी मासेमारी करणाऱ्‍यांना कितीतरी दिवस मासेच मिळत नाहीत. पण म्हणून काय ते आपलं काम सोडून देत नाहीत. ते आपल्या कामात बरेच बदल करतात. ते वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी मासेमारी करतात. तसंच, मासेमारी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही ते वापरतात. आपल्या सेवाकार्याच्या बाबतीतही आपण असेच बदल करू शकतो. आपल्याला हे बदल कसे करता येतील ते आपण पुढे पाहू या.

जे लोक घरी भेटत नाहीत अशांना साक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करायचा प्रयत्न करा. तसंच, प्रचार करायच्या वेगवेगळ्या पद्धती वापरा (परिच्छेद ७-१० पाहा) *

७. वेगवेगळ्या वेळी प्रचार केल्यामुळे कोणते चांगले परिणाम मिळू शकतात?

वेगवेगळ्या वेळी लोकांना भेटायचा प्रयत्न करा.  लोक सहसा घरी असतात अशा वेळी जर आपण प्रचारकार्य केलं, तर आपल्याला जास्तीत जास्त लोक भेटू शकतात. कारण लोक कितीही वेळ बाहेर असले तरी शेवटी ते घरी येतातच! त्यामुळे बरेच भाऊबहीण दुपारी किंवा संध्याकाळी प्रचारकार्य करतात. कारण त्या वेळी बरेच लोक घरी असतात. शिवाय, त्या वेळी लोक सहसा निवांत असतात आणि बोलायला तयार असतात. डेव्हिड नावाचे वडील जे करतात तेच आपणही करू शकतो. काही वेळ प्रचारकार्य केल्यानंतर ते आणि त्यांचा जोडीदार पुन्हा त्याच घरांना भेटी देतात जिथे आधी त्यांना कुणीही भेटलं नव्हतं. डेव्हिड म्हणतात: “आम्ही पुन्हा जातो तेव्हा आम्हाला अनेक जण घरी भेटतात.” *

जे लोक घरी भेटत नाहीत अशांना साक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या वेळी प्रचार करायचा प्रयत्न करा (परिच्छेद ७-८ पाहा)

८. उपदेशक ११:६ हे वचन आपण आपल्या सेवाकार्याच्या बाबतीत कसं लागू करू शकतो?

या लेखाचं मुख्य वचन आपल्याला याची आठवण करून देतं, की लोकांना घरी भेटण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. (उपदेशक ११:६ वाचा.) डेव्हिडनेसुद्धा हेच केलं. एका घरात कितीतरी वेळा भेटी दिल्यानंतर शेवटी त्यांना तो घरमालक भेटला. त्या घरमालकाने खूप चांगलं ऐकून घेतलं आणि बायबलवर चर्चा करायलाही तो तयार झाला. तो डेव्हिडला म्हणाला: “मी आठ वर्षांपासून इथे राहतोय, पण एकाही साक्षीदाराला मी भेटलो नाही.” डेव्हिड म्हणतात: “खूपदा प्रयत्न करून शेवटी लोक घरी भेटतात तेव्हा ते सहसा आपला संदेश ऐकतात.”

जे लोक घरी भेटत नाहीत अशांना साक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करायचा प्रयत्न करा (परिच्छेद ९ पाहा)

९. घरी न भेटणाऱ्‍या लोकांना साक्ष देण्यासाठी काही प्रचारक काय करतात?

वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करा.  जे लोक घरी भेटत नाहीत अशा लोकांना भेटण्यासाठी काही प्रचारक वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करतात. जसं की, ज्या बिल्डींगमध्ये जायची परवानगी नसते अशा लोकांना भेटण्यासाठी प्रचारक ट्रॉली लावून किंवा रस्त्यावरचं साक्षकार्य करतात. त्यामुळे ज्यांना ते घरी भेटू शकत नाहीत अशांशी ते समोरासमोर बोलू शकतात. तसंच, अनेक प्रचारकांना हेही दिसून आलं आहे, की लोक सहसा बागेत, बाजारात आणि व्यापारी क्षेत्रात आपल्याशी बोलायला आणि आपली प्रकाशनं घ्यायला तयार असतात. बोलिव्हिया देशात सेवा करणारे फ्लोरान नावाचे विभागीय पर्यवेक्षक म्हणतात, “आम्ही सहसा दुपारी एक ते तीनच्या मधे बाजारात आणि व्यापारी क्षेत्रात प्रचार करतो. त्या वेळी गिऱ्‍हाईक कमी असल्यामुळे आम्ही दुकानदारांशी चांगल्या प्रकारे बोलू शकतो, आणि काहींनी तर बायबल अभ्यासही सुरू केला आहे.”

जे लोक घरी भेटत नाहीत अशांना साक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरा (परिच्छेद १० पाहा)

१०. प्रचार करण्यासाठी आणखी कोणत्या पद्धती तुम्ही वापरू शकता?

१० वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहा.  समजा तुम्ही एखाद्याला भेटण्याचा खूपदा प्रयत्न केला; त्याला भेटण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेळी त्याच्या घरी गेलात, पण तरीसुद्धा तो भेटला नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? याबद्दल कॅट्रिना नावाची एक बहीण म्हणते: “जे लोक कधीच घरी भेटत नाहीत अशांना मी पत्र लिहिते. मी समोरासमोर जसं त्यांच्याशी बोलले असते तसंच मी पत्रात लिहिते.” तर सांगायचा मुद्दा हा आहे, की कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना साक्ष देण्याचा प्रयत्न करा.

लोक आपलं ऐकत नसले तरी प्रचार करायचं सोडू नका

११. काही लोक आपला संदेश का ऐकत नाहीत?

११ काही लोक आपला संदेश का ऐकत नाहीत याची अनेक कारणं असू शकतात. जसं की, जगातलं दु:ख पाहून त्यांचा देवावरचा विश्‍वास उडालेला असतो. तर काहींना पाळकांचा ढोंगीपणा पाहिल्यामुळे बायबलबद्दल जाणून घेण्यात काहीच रस नसतो. पाळक म्हणतात, की ‘आम्ही बायबलप्रमाणे वागतो.’ पण मुळात ते चुकीची कामं करत असतात. आणि असेही काही जण आहेत जे आपल्या कामात, कुटुंबात आणि स्वत:च्या समस्यांमध्ये इतके गुरफटलेले असतात की बायबल आपल्याला मदत करू शकतं असं त्यांना वाटत नाही. लोकांना आपला संदेश महत्त्वाचा वाटत नसला, तरी आपण प्रचारकार्यातला आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो?

१२. फिलिप्पैकर २:४ यात दिलेला सल्ला आपण आपल्या सेवाकार्यात कसा लागू करू शकतो?

१२ लोकांबद्दल काळजी आहे हे दाखवा.  असे बरेच जण आहेत ज्यांनी सुरुवातीला आपला संदेश ऐकला नाही. पण नंतर ऐकला, कारण आपल्याला त्यांची किती काळजी आहे हे त्यांना जाणवलं. (फिलिप्पैकर २:४ वाचा.) डेव्हिड नावाच्या ज्या वडिलांबद्दल आपण पाहिलं होतं ते म्हणतात: “जेव्हा कुणी आम्हाला असं म्हणतं की ‘आम्हाला नाही ऐकायचंय,’ तेव्हा आम्ही आमचं बायबल आणि प्रकाशनं बाजूला ठेवतो आणि त्यांना आपला संदेश का ऐकायचा नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.” अशा प्रकारे लोकांचं म्हणणं ऐकून आपण त्यांच्याबद्दल काळजी दाखवतो तेव्हा ते लगेच त्यांच्या लक्षात येतं. आपण काय बोललो हे कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही. पण आपण त्यांच्याशी किती प्रेमाने आणि आपुलकीने वागलो हे कायम त्यांच्या लक्षात राहील. एखाद्या घरमालकाने आपल्याला बोलू दिलं नाही, तरी आपल्या वागण्यातून आणि चेहऱ्‍यावरच्या हावभावांवरून आपण दाखवू शकतो, की आपल्याला त्यांची खूप काळजी आहे.

१३. लोकांनी आपला संदेश ऐकावा म्हणून आपण काय करू शकतो?

१३ घरमालकांच्या गरजा आणि त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आपण जर त्यांच्याशी बोललो तर त्यावरून दिसून येईल, की आपल्याला त्यांची काळजी आहे. उदाहरणार्थ, एखाद्या घरात अशा काही गोष्टी तुम्हाला दिसतात का ज्यांवरून तुम्हाला समजतं की इथे लहान मुलं आहेत? जसं की, खेळणी वगैरे? तर मग मुलांना कसं वाढवायचं आणि कुटुंब आणखी आनंदी कसं राहू शकतं याबद्दल बायबलमधले व्यावहारिक सल्ले तुम्ही त्या घरमालकाला सांगू शकता. किंवा मग, एखाद्या घराला अनेक लॉक्स किंवा कुलपं लावलेली तुम्हाला दिसली तर अशा वेळी तुम्ही घरमालकाशी वाढत्या गुन्हेगारीबद्दल आणि सुरक्षेबद्दल बोलू शकता. त्यानंतर कशा प्रकारे गुन्हेगारीचा कायमचा अंत होईल याबद्दल तुम्ही त्याला सांगू शकता. अशा प्रकारे बायबलचा सल्ला किती उपयोगी आहे हे जेव्हा आपण लोकांना सांगू, तेव्हा ते आपलं नक्कीच ऐकतील. आधी उल्लेख केलेली कॅट्रिना म्हणते, “बायबलमुळे मला किती फायदा झाला याची मी नेहमी स्वत:ला आठवण करून देते.” यामुळे कॅट्रिना लोकांशी आत्मविश्‍वासाने बोलू शकते आणि हे पाहून लोकसुद्धा तिचं ऐकतात.

१४. नीतिवचनं २७:१७ या वचनानुसार प्रचार करत असताना आपण ऐकमेकांना कशी मदत करू शकतो?

१४ इतरांची मदत घ्या.  पहिल्या शतकात पौलने तीमथ्यला प्रचार कसा करायचा आणि इतरांना कसं शिकवायचं हे सांगितलं. आणि तीमथ्यने या पद्धती इतरांना शिकवाव्यात असं प्रोत्साहन पौलने त्याला दिलं. (१ करिंथ. ४:१७) तीमथ्यप्रमाणे आपणसुद्धा मंडळीतल्या इतर अनुभवी प्रचारकांकडून शिकू शकतो. (नीतिवचनं २७:१७ वाचा.) शॉन नावाच्या भावाचं उदाहरण लक्षात घ्या. काही काळासाठी तो अशा एका खेडेगावात पायनियरिंग करत होता जिथल्या लोकांना इतर धर्मांशी काहीच घेणंदेणं नव्हतं. ते स्वत:च्याच धर्मात समाधानी होते. त्यामुळे त्याचा संदेश ऐकण्यात त्यांना काहीच रस नव्हता. मग शॉनने आपल्या सेवेतला आनंद कसा टिकवून ठेवला? शॉन म्हणतो, “एका घरापासून दुसऱ्‍या घरापर्यंत जाताना माझ्यासोबत जो कुणी असायचा त्याच्यासोबत मी प्रचाराचं कौशल्य कसं वाढवायचं याबद्दल बोलायचो. जसं की, एखाद्या घरात बोलल्यानंतर घरमालक काय बोलला आणि आम्ही त्याला कसं उत्तर दिलं याबद्दल आम्ही बोलायचो. आणि मग असाच घरमालक पुन्हा भेटला तर त्याच्याशी आणखी चांगल्या प्रकारे कसं बोलता येईल, याबद्दल चर्चा करायचो.”

१५. प्रचाराला जाण्याआधी प्रार्थना करणं का महत्त्वाचं आहे?

१५ मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा.  आपण जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा आपण मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. कारण त्याच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीशिवाय आपण काहीच साध्य करू शकत नाही. (स्तो. १२७:१; लूक ११:१३) तुम्हाला नेमकी कशाबद्दल मदत हवी आहे हे यहोवाला स्पष्टपणे सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही त्याला अशी प्रार्थना करू शकता, की ‘ज्या व्यक्‍तीला तुझ्याबद्दल जाणून घ्यायची आणि शिकायची इच्छा आहे अशी व्यक्‍ती मला प्रचारात भेटू दे.’ आणि मग प्रार्थना केल्याप्रमाणे अशा व्यक्‍तीला शोधण्यासाठी मेहनत घ्या. त्यासाठी प्रचारात जी कुणी व्यक्‍ती भेटेल तिच्याशी बोलायचा प्रयत्न करा.

१६. वैयक्‍तिक अभ्यासामुळे प्रचारात कशी मदत होते?

१६ वैयक्‍तिक अभ्यासासाठी वेळ काढा.  बायबल म्हणतं, “देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे,” याची आपण स्वत:ला खातरी पटवून दिली पाहिजे. (रोम. १२:२) वैयक्‍तिक अभ्यासामुळे आपण देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्यामुळे प्रचारात आपण पूर्ण आत्मविश्‍वासाने त्याच्याबद्दल लोकांना सांगू शकतो. याबद्दल आधी उल्लेख केलेली कॅट्रिना म्हणते, “मला जाणवलं, की बायबलच्या काही मूलभूत शिकवणींवर असलेला माझा विश्‍वास मला मजबूत करायची गरज आहे. त्यामुळे अशा काही पुराव्यांचा मी काळजीपूर्वक अभ्यास केला जे दाखवून देतात, की एक सृष्टिकर्ता आहे, बायबल हे देवाचं वचन आहे आणि आज एका संघटनेद्वारे तो लोकांचं मार्गदर्शन करत आहे.” कॅट्रिना पुढे सांगते, की अशा प्रकारे वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे तिचा विश्‍वास मजबूत झाला आणि सेवाकार्यातला तिचा आनंद आणखी वाढला.

निराश न होता प्रचार करत राहणं का गरजेचं?

१७. येशू का प्रचार करत राहिला?

१७ काही लोकांनी येशूचा संदेश ऐकला नाही. पण म्हणून तो निराश झाला नाही. तो प्रचार करत राहिला. कारण लोकांनी सत्य जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगायचं होतं. तसंच, सुरुवातीला काही जण आपला संदेश ऐकणार नाहीत, पण नंतर हेच लोक ऐकतील हेही त्याला माहीत होतं. त्याच्या स्वत:च्या कुटुंबाचाच विचार करा. येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान त्याचा एकही भाऊ त्याचा शिष्य बनला नाही. (योहा. ७:५) पण त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या भावांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आणि ते ख्रिस्ती बनले.—प्रे. कार्यं १:१४.

१८. आपण का प्रचार करत राहिलं पाहिजे?

१८ शेवटी कोण सत्य स्वीकारेल आणि यहोवाचा सेवक बनेल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण प्रचार करत राहिलं पाहिजे. काही जण आपला संदेश ऐकून लगेच सत्य शिकायला सुरुवात करतात; पण काही वेळ लावतात. आणि असेही काही लोक आहेत जे सुरुवातीला आपला संदेश ऐकत नाहीत, पण आपलं चांगलं वागणं पाहून ते सत्य शिकू लागतात आणि शेवटी ‘देवाचा गौरव करतात.’—१ पेत्र २:१२.

१९. १ करिंथकर ३:६, ७ या वचनांनुसार कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे?

१९ आपण लोकांच्या मनात सत्याचं बी पेरतो आणि पाणी घालतो. पण वाढवणारा देव आहे ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. (१ करिंथकर ३:६, ७ वाचा.) इथियोपियामध्ये राहणारा एक भाऊ म्हणतो, “मी माझ्या गावात २० वर्षांपासून एकटाच साक्षीदार होतो. पण आता इथे १४ प्रचारक आहेत. त्यांच्यापैकी १३ जणांनी बाप्तिस्मा घेतला आहे. त्यांत माझी बायको आणि ३ मुलंसुद्धा आहेत. आणि आता आमच्या सभेत जवळपास ३२ लोक असतात.” आज हा भाऊ खूप खूश आहे. कारण यहोवा प्रामाणिक मनाच्या लोकांना आपल्या संघटनेकडे आकर्षित करेपर्यंत तो धीराने प्रचार करत राहिला.​—योहा. ६:४४.

२०. प्रचाराचं काम बचाव दलाच्या कामासारखं कसं आहे?

२० यहोवासाठी प्रत्येक व्यक्‍तीचा जीव मोलाचा आहे. म्हणूनच अंत येण्याआधी सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना गोळा करण्यासाठी, यहोवा त्याच्या मुलासोबत काम करण्याची संधी आपल्याला देतो. (हाग्ग. २:७) आपलं प्रचाराचं काम जीव वाचवणाऱ्‍या बचाव दलाच्या कामासारखं आहे. समजा, खाणीत काम करणारे कामगार जमिनीखाली अडकले आहेत. आणि त्यांना वाचवण्यासाठी बचाव दल येतो. पण दलातल्या फक्‍त काही जणांनाच काही कामगार जिवंत सापडतात. असं असलं, तरी संपूर्ण दलाने केलेलं काम खूप महत्त्वाचं असतं. हीच गोष्ट आपल्या प्रचारकार्याच्या बाबतीतही खरी आहे. सैतानाच्या जगापासून किती लोकांना वाचवलं जाईल हे आपल्याला माहीत नाही. पण त्यांना वाचवण्यासाठी यहोवा आपल्यापैकी कुणाचाही उपयोग करू शकतो. याबद्दल बोलिव्हियामध्ये राहणारा अँड्रियास म्हणतो, “मला असं वाटतं, एका व्यक्‍तीला सत्यात आणण्यासाठी फक्‍त एका प्रचारकाचा नाही, तर मंडळीतल्या प्रत्येकाचा हातभार लागतो.” तर आपणही या भावासारखाच विचार करू या आणि प्रचार करत राहू या. असं केल्यामुळे यहोवा आपल्या मेहनतीवर आशीर्वाद देईल आणि आपण आनंदाने प्रचार करत राहू.

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

^ परि. 5 आपल्या क्षेत्रातले लोक घरी भेटत नाहीत किंवा आपला संदेश ऐकत नाहीत, तेव्हासुद्धा आपण आंनदाने प्रचार कसा करत राहू शकतो? याचं उत्तर या लेखात आपल्याला मिळेल.

^ परि. 7 प्रचारकाने देशाचा माहिती सुरक्षा कायदा लक्षात ठेवून या लेखात सुचवलेल्या सेवाकार्याच्या पद्धती वापरल्या पाहिजेत.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: (वरून खाली): एक जोडपं अशा ठिकाणी प्रचार करत आहे, जिथे लोक सहसा घरी भेटत नाहीत. पहिल्या घरातला माणूस कामावर गेला आहे. दुसऱ्‍या घरातली स्त्री डॉक्टरकडे गेली आहे, आणि तिसऱ्‍या घरातली स्त्री सामानाची खरेदी करायला गेली आहे. ते जोडपं पहिल्या घरातल्या माणसाला त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन भेटतं. हॉस्पिटलजवळ ट्रॉली लावून साक्षकार्य करताना त्यांना दुसऱ्‍या घरातली स्त्री भेटते. तिसऱ्‍या घरातल्या स्त्रीला ते फोन करून साक्ष देतात.