व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २१

यहोवा तुम्हाला ताकद देईल

यहोवा तुम्हाला ताकद देईल

“मी दुर्बळ असतो, तेव्हाच मी ताकदवान होतो.”—२ करिंथ. १२:१०.

गीत ३३ वैऱ्‍यांना भिऊ नको!

सारांश *

१-२. अनेक साक्षीदारांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?

प्रेषित पौलने तीमथ्यला आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचं प्रोत्साहन दिलं. (२ तीम. ४:५) पौलने तीमथ्यला दिलेला हा सल्ला आज आपल्यालाही लागू होतो. आणि तो पाळायचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो. पण काही वेळा हे करणं कठीण असतं. कारण आपल्या अनेक भाऊबहिणींना प्रचारकार्य करण्यासाठी खूप धैर्य दाखवावं लागतं. (२ तीम. ४:२) जसं की, ज्या देशांमध्ये आपल्या कामावर काही प्रमाणात किंवा पूर्णपणे बंदी आहे तिथल्या भाऊबहिणींना खूप धैर्य दाखवावं लागतं. पण तरीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून ते प्रचार करत राहतात.

आज आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे आपण निराश होऊ शकतो. जसं की, आपल्यापैकी अनेकांना कुटुंबाच्या फक्‍त रोजच्या गरजा भागवण्यासाठीही खूप कष्ट करावे लागतात. सेवाकार्यात त्यांना खूप काही करायचं असतं, पण आठवड्याच्या शेवटी ते इतके थकून जातात, की त्यासाठी त्यांच्यात ताकदच उरत नाही. असे काही जण आहेत जे आजारामुळे, वाढत्या वयामुळे किंवा घराबाहेर पडू शकत नसल्यामुळे सेवाकार्यात फारसं काही करू शकत नाहीत. तर असेही काही जण आहेत ज्यांना सतत असं वाटतं, की यहोवाच्या नजरेत आपल्याला काहीच किंमत नाही. मेरी * नावाची एक बहीण म्हणते, “माझ्या मनातल्या निराशेच्या भावना काढून टाकण्यासाठी मला इतका प्रयत्न करावा लागतो, की प्रचारकार्य करण्यासाठी माझ्यामध्ये ताकदच उरत नाही. आणि या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं.”

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आपल्यासमोर कोणत्याही समस्या असोत, यहोवा आपल्याला त्यांचा सामना करण्यासाठी आणि आपल्याच्याने होईल तितकी त्याची सेवा करण्यासाठी ताकद देईल. पण यहोवा आपल्याला कशी मदत करतो हे पाहण्याआधी आपण हे पाहू, की यहोवाने पौल आणि तीमथ्यला त्यांची सेवा पूर्ण करायला कशी मदत केली.

प्रचार करत राहण्यासाठी यहोवा ताकद देतो

४. पौलला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

पौलला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याला मारहाण करण्यात आली, दगडमार करण्यात आला आणि तुरुंगात टाकण्यात आलं. अशा वेळी खासकरून त्याला ताकदीची फार गरज होती. (२ करिंथ. ११:२३-२५) तसंच, कधीकधी निराशेचा सामना करण्यासाठीही त्याला खूप प्रयत्न करावे लागले. (रोम. ७:१८, १९, २४) याशिवाय, त्याला आरोग्याचीही समस्या होती. ती समस्या त्याच्या शरीरात रुतवण्यात आलेल्या एका काट्यासारखी होती. तो काढून टाकण्यासाठी त्याने अनेकदा देवाला विनंती केली.—२ करिंथ. १२:७, ८.

पौलला आपलं सेवाकार्य पूर्ण करायला कशामुळे मदत झाली? (परिच्छेद ५-६ पाहा) *

५. पौलसमोर अनेक समस्या होत्या, पण तरी यहोवाच्या सेवेत तो कायकाय करू शकला?

पौलला जरी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, तरी यहोवाने त्याला त्याची सेवा पूर्ण करण्यासाठी ताकद दिली. त्यामुळे पौल कायकाय करू शकला त्याचा विचार करा. त्याला जेव्हा रोममध्ये एका घरात कैद करण्यात आलं होतं, तेव्हा त्याने यहुदी धर्मगुरूंना, आणि कदाचित रोमी अधिकाऱ्‍यांनाही प्रचार केला. (प्रे. कार्यं २८:१७; फिलिप्पै. ४:२१, २२) तसंच, त्याने सम्राटाच्या अंगरक्षक दलातल्या अनेकांना आणि त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांनाही प्रचार केला. (प्रे. कार्यं २८:३०, ३१; फिलिप्पै. १:१३) आणि त्याच काळात, पौलने देवाच्या प्रेरणेने अनेक पत्रं लिहिली ज्यांचा आजपर्यंत खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खूप फायदा होतो. पौलच्या या चांगल्या उदाहरणामुळे रोममधल्या मंडळीला इतकं प्रोत्साहन मिळालं, की तिथले भाऊबहीण “आणखीनच धैर्याने आणि निर्भयपणे देवाचं वचन” सांगू लागले. (फिलिप्पै. १:१४) काही वेळा पौल परिस्थितीमुळे हवं तितकं करू शकत नव्हता. पण त्यातही त्याने जे काही केलं त्यामुळे खरंतर आनंदाच्या संदेशाच्या वाढीला हातभारच लागला.फिलिप्पै. १:१२.

६. २ करिंथकर १२:९, १० या वचनांप्रमाणे पौलला आपलं सेवाकार्य पूर्ण करायला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली?

पौलला याची जाणीव होती, की त्याने यहोवाच्या सेवेत जे काही केलं ते स्वत:च्या नाही, तर देवाच्या ताकदीमुळेच केलं. म्हणून तो असं म्हणू शकला, “दूर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.” (२ करिंथकर १२:९, १० वाचा.) पौलला छळाचा, तुरुंगवासाचा आणि इतर समस्यांचा सामना करावा लागला, तरी त्याने आपलं सेवाकार्य पूर्ण केलं. हे तो देवाच्या पवित्र शक्‍तीमुळेच करू शकला.

तीमथ्यला आपलं सेवाकार्य पूर्ण करायला कशामुळे मदत झाली? (परिच्छेद ७ पाहा) *

७. आपलं सेवाकार्य पूर्ण करताना तीमथ्यला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

पौलसोबत सेवा करणारा तीमथ्य तरुण होता. त्यालासुद्धा देवाच्या ताकदीवर विसंबून राहावं लागलं. कारण पौल जेव्हा दूरदूरच्या मिशनरी दौऱ्‍यांवर जायचा तेव्हा तीमथ्यसुद्धा त्याच्यासोबत असायचा. याशिवाय, पौल तीमथ्यला मंडळ्यांना प्रोत्साहन द्यायलाही पाठवायचा. (१ करिंथ. ४:१७) पण आपण ही जबाबदारी सांभाळू शकणार नाही असं कदाचित तीमथ्यला वाटलं असेल. आणि म्हणून कदाचित पौल त्याला म्हणाला, “तुझ्या तरुण वयामुळे तुला कोणीही तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे.” (१ तीम. ४:१२) तसंच, या काळात तीमथ्य सारखा आजारी पडायचा. म्हणजे एका अर्थाने त्याच्याही शरीरात एक काटा होता. (१ तीम. ५:२३) पण तीमथ्यला माहीत होतं, की यहोवा त्याला प्रचार करण्यासाठी आणि आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी त्याची पवित्र शक्‍ती देईल.२ तीम. १:७.

समस्या असतानाही विश्‍वासू राहायला यहोवा ताकद देतो

८. आज यहोवा कशा प्रकारे आपल्या सेवकांना ताकद देतो?

आज यहोवा त्याच्या सेवकांना विश्‍वासूपणे सेवा करत राहण्यासाठी “असाधारण सामर्थ्य” देतो. (२ करिंथ. ४:७) पुढे दिलेल्या चार मार्गांनी तो हे सामर्थ्य किंवा ताकद देतो: प्रार्थना, बायबल, आपले भाऊबहीण आणि आपलं सेवाकार्य.

यहोवा प्रार्थनेद्वारे आज आपल्याला बळ देतो (परिच्छेद ९ पाहा)

९. प्रार्थना आपल्याला कशी मदत करू शकते?

प्रार्थना.  इफिसकर ६:१८ यात पौल आपल्याला “प्रत्येक प्रसंगी” देवाला प्रार्थना करायचं प्रोत्साहन देतो. आपण असं केलं, तर यहोवा नक्कीच आपल्या प्रार्थना ऐकेल आणि आपल्याला ताकद देईल. बोलिव्हियामध्ये राहणाऱ्‍या जॉनीला एकापाठोपाठ एक अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्या वेळी यहोवाने त्याला कशी मदत केली हे त्याने अनुभवलं. त्याची पत्नी आणि त्याचे आईवडील तिघंही एकाच वेळी खूप आजारी पडले. त्यामुळे त्या तिघांची काळजी घेणं त्याला फार कठीण गेलं. त्या आजारात त्याची आई वारली. आणि त्याच्या पत्नीला आणि वडिलांना आजारातून बरं व्हायला खूप वेळ लागला. त्या कठीण काळाबद्दल जॉनी म्हणतो, “मी सतत चिंतेत असायचो. पण मला नेमकं कसं वाटतं हे मी प्रार्थनेत यहोवाला सांगायचो. आणि त्यामुळे मला खूप बरं वाटायचं.” अशा प्रकारे यहोवाने जॉनीला आपल्या समस्येचा सामना करायला ताकद दिली. बोलिव्हियामधल्याच आणखी एका अनुभवाकडे लक्ष द्या. रॉनअल्ड नावाच्या एका वडिलांना हे समजलं, की त्यांच्या आईला कॅन्सर झाला आहे. आणि एका महिन्यानंतर ती वारली. या दु:खाचा सामना करायला रॉनअल्डला प्रार्थनेमुळे मदत झाली. ते म्हणतात, “मी यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा त्याच्याजवळ माझं मन मोकळं करतो. आणि मला नेमकं कसं वाटतं हे त्याला सांगतो. मला माहितीय, यहोवा मला जितकं समजतो तितकं कुणीही मला समजू शकत नाही. मी स्वत:सुद्धा नाही.” कधीकधी आपण चिंतेत इतके बुडून जातो, की प्रार्थनेत नेमकं काय म्हणायचं हेच आपल्याला सुचत नाही. पण अशा वेळीही आपण प्रार्थना करावी अशी यहोवाची इच्छा आहे.—रोम. ८:२६, २७.

यहोवा बायबलद्वारे आज आपल्याला बळ देतो (परिच्छेद १० पाहा)

१०. इब्री लोकांना ४:१२ या वचनाप्रमाणे बायबल वाचणं आणि त्यावर मनन करणं महत्त्वाचं का आहे?

१० बायबल.  ताकद आणि सांत्वन मिळण्यासाठी पौल नेहमी शास्त्रवचनं वाचायचा. आज आपणही तेच केलं पाहिजे. (रोम. १५:४) आपण बायबल वाचतो आणि त्यावर मनन करतो तेव्हा यहोवा आपल्याला हे समजायला मदत करतो, की बायबलचा सल्ला आपल्याला कसा उपयोगी पडू शकतो. (इब्री लोकांना ४:१२ वाचा.) आधी उल्लेख केलेले रॉनअल्ड म्हणतात, “मी रोज रात्री झोपायच्या आधी बायबल वाचतो, आणि यहोवाच्या गुणांवर आणि तो कशा प्रकारे आपल्या लोकांची काळजी घेतो यावर मनन करतो. यामुळे मला खूप ताकद मिळते. मी स्वतःला रोज बायबल वाचायची सवय लावली हे किती बरं झालं!”

११. दु:खात बुडालेल्या एका बहिणीला बायबलमुळे कशी मदत झाली?

११ बायबलवर मनन केल्यामुळे आपल्या समस्यांबद्दल योग्य प्रकारे विचार करायला आपल्याला मदत होते. पतीच्या मृत्यूमुळे दु:खात बुडालेल्या एका बहिणीला बायबलमुळे कशी मदत झाली याचा विचार करा. एका वडिलाने तिला बायबलमधलं ईयोबचं पुस्तक वाचायला आणि त्यातून काय शिकायला मिळतं यावर विचार करायला सांगितलं. वाचता-वाचता तिच्या लक्षात आलं, की ईयोब किती चुकीचा विचार करत आहे. ती मनातल्या मनात त्याला म्हणाली, “ईयोब, स्वत:च्याच समस्यांचा विचार करू नकोस.” पण मग तिच्या लक्षात आलं, की ती स्वतःसुद्धा ईयोबसारखाच विचार करत आहे. अशा प्रकारे बायबलवर मनन केल्यामुळे ती स्वत:च्याच समस्यांचा विचार करत राहिली नाही. त्याऐवजी ती यहोवाचा आणि त्याने दिलेल्या आशेचा विचार करू लागली. यामुळे तिला आपल्या दु:खाचा सामना करायला ताकद मिळाली.

यहोवा भाऊबहिणींद्वारे आज आपल्याला बळ देतो (परिच्छेद १२ पाहा)

१२. यहोवा भाऊबहिणींद्वारे आपल्याला ताकद कशी देतो?

१२ आपले भाऊबहीण.  आज यहोवा आपल्या भाऊबहिणींद्वारे आपल्याला ताकद देतो. पौलने म्हटलं, की त्याला आपल्या भाऊबहिणींना भेटायची आणि “एकमेकांना प्रोत्साहन” द्यायची खूप इच्छा होती. (रोम. १:११, १२) आधी उल्लेख केलेल्या मेरीला भाऊबहिणींसोबत वेळ घालवायला फार आवडतं. ती म्हणते, “यहोवाने मला भाऊबहिणींद्वारे खूप मदत केली. त्यांना माझ्या समस्यांबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण तरीसुद्धा ते मला कार्ड पाठवायचे किंवा असं काहीतरी बोलायचे ज्यामुळे मला खूप बरं वाटायचं, आणि याचीच तर मला गरज होती! मला अशा बहिणींशी बोलल्यामुळेही मदत होते, ज्या माझ्यासारख्याच समस्यांमधून गेल्या आहेत. तसंच, मंडळीतले वडीलसुद्धा मला नेहमी याची जाणीव करून देतात, की मीपण मंडळीतला एक महत्त्वाचा भाग आहे.”

१३. सभांमध्ये आपण एकमेकांना कसं प्रोत्साहन देऊ शकतो?

१३ एकमेकांना प्रोत्साहन देण्याची सगळ्यात चांगली संधी, सभांमध्ये आपल्याला मिळते. त्यामुळे तुम्ही सभांना जाता तेव्हा स्वत:हून इतरांशी बोला. तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे आणि ते जे काही करतात त्याची तुम्हाला किती कदर आहे हे त्यांना सांगा. यामुळे त्यांना नक्कीच खूप बळ मिळेल. एकदा पिटर नावाचे एक वडील सभेआधी अशा एका बहिणीशी बोलले जिचा पती सत्यात नव्हता. ते तिला म्हणाले: “सिस्टर, तुम्हाला पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. कारण तुम्ही नेहमी तुमच्या सहाही मुलांना चांगलं तयार करून आणता आणि सभेत ती उत्तरंही देतात.” हे ऐकून तिचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली: “आज या प्रोत्साहनाची मला खरंच खूप गरज होती.”

यहोवा सेवाकार्याद्वारे आज आपल्याला बळ देतो (परिच्छेद १४ पाहा)

१४. प्रचारकार्य केल्यामुळे आपल्याला कशी मदत होते?

१४ आपलं सेवाकार्य.  लोक आपलं ऐकोत किंवा ना ऐकोत आपण इतरांना प्रचार करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. (नीति. ११:२५) प्रचार केल्यामुळे कशा प्रकारे ताकत मिळते हे स्टेसी नावाच्या बहिणीने अनुभवलं. तिच्या कुटुंबातल्या एका सदस्याला बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा ती खूप निराश झाली, आणि सतत स्वत:ला विचारत राहिली: ‘त्याला मदत करण्यात मी कुठे कमी पडले का?’ या समस्येचा सामना करण्यासाठी तिला कशामुळे मदत मिळाली? सेवाकार्यामुळे. प्रचार केल्यामुळे ती तिच्या क्षेत्रातल्या अशा लोकांबद्दल विचार करू लागली, ज्यांना तिच्या मदतीची गरज होती. ती म्हणते: “त्या काळात यहोवाच्या मदतीमुळे मी अशा एका व्यक्‍तीसोबत बायबलचा अभ्यास करू लागले जिने भरभर प्रगती केली. ते पाहून मला खूप प्रोत्साहन मिळालं. खरंच, प्रचारामुळेच मला सगळ्यात जास्त मदत झाली.”

१५. मेरीने जे म्हटलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं?

१५ परिस्थितीमुळे आपण सेवाकार्यात हवं तितकं करू शकत नाही, असं कदाचित काहींना वाटू शकतं. तुम्हालाही जर असं वाटत असेल तर निराश होऊ नका. कारण तुम्ही जे काही करता ते किती मनापासून करता हे पाहून यहोवा खूश होतो. आधी उल्लेख केलेल्या मेरीचाच विचार करा. ती अशा एका ठिकाणी प्रचार करायला गेली जिथली भाषा तिच्यासाठी नवीन होती. आपण इथे जास्त काही करू शकत नाही असं तिला वाटलं. ती म्हणते: “काही दिवसांपर्यंत तर मी फक्‍त एक छोटंसं उत्तर देत होते, बायबलचं एखादं वचन वाचत होते किंवा सेवेत एखादी पत्रिका देत होते.” त्यामुळे ज्यांना ही भाषा चांगल्या प्रकारे बोलता येते त्यांच्या तुलनेत आपण काहीच करत नाही असं तिला वाटलं. पण मग ती ज्या प्रकारे विचार करत होती त्यात तिने बदल केला. त्यामुळे तिच्या लक्षात येऊ लागलं, की आपल्याला जरी ही भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नसली, तरी यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करू शकतो. ती म्हणते: “मुळात बायबलची सत्यंच इतकी सरळ आणि सोपी आहेत, की त्यांमुळे लोकांचं जीवन बदलू शकतं. त्यासाठी एखादी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येणं गरजेचं नाही.”

१६. जे घराबाहेर पडू शकत नाहीत अशांना यहोवा कशा प्रकारे मदत करतो?

१६ आपल्यापैकी काहींना प्रचार करायची खूप इच्छा आहे. पण ते घराबाहेर जाऊ शकत नाहीत हे यहोवाला माहीत आहे. अशा वेळी जे त्यांची काळजी घ्यायला येतात त्यांना, किंवा मग डॉक्टर आणि नर्सला प्रचार करण्यासाठी यहोवा त्यांना मदत करतो. पूर्वी आपण यहोवाची जितकी सेवा करत होतो तितकी आता करू शकत नाही असा जर आपण विचार केला, तर आपण निराश होऊ शकतो. पण आतासुद्धा यहोवा आपल्याला कशा प्रकारे मदत करतो याचा जर आपण विचार केला, तर कोणत्याही समस्येचा धीराने सामना करायची ताकद आपल्याला मिळेल.

१७. चांगले परिणाम लगेच दिसून आले नाही, तरी उपदेशक ११:६ या वचनाप्रमाणे आपण प्रचार का करत राहिलं पाहिजे?

१७ आपण सत्याचं बी पेरतो, पण त्यापैकी कोणतं वाढेल आणि मूळ धरेल हे आपण सांगू शकत नाही. (उपदेशक ११:६ वाचा.) बार्बरा नावाच्या एका बहिणीचंच उदाहरण लक्षात घ्या. तिचं वय ८० पेक्षा जास्त आहे. पण ती नियमितपणे फोन करून आणि पत्र लिहून साक्षकार्य करते. एकदा तिने एका पत्रासोबत १ मार्च २०१४ चं टेहळणी बुरूज  मासिकसुद्धा पाठवलं. त्याचा विषय होता, “यहोवाने तुमच्यासाठी खूप काही केलंय. * तिच्या नकळत तिने हे पत्र बहिष्कृत करण्यात आलेल्या एका जोडप्याला पाठवलं. त्यांनी ते मासिक पुन्हापुन्हा वाचलं. त्या पतीला असं वाटलं, की यहोवा स्वत: त्याच्याशी बोलत आहे. ते दोघं सभांना येऊ लागले आणि जवळजवळ २७ वर्षांनंतर ते पुन्हा यहोवाची आवेशाने सेवा करू लागले. आपण लिहिलेल्या एका पत्रामुळे किती चांगले परिणाम घडून आले हे पाहून बार्बराला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल.

(१) प्रार्थना, (२) बायबल, (३) आपले भाऊबहीण आणि (४) आपलं सेवाकार्य, या चार मार्गांनी यहोवा आज आपल्याला बळ देतो (परिच्छेद ९-१०, १२, १४ पाहा)

१८. यहोवाकडून ताकद मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१८ आज यहोवा आपल्याला अनेक मार्गांनी ताकद देतो. जसं की प्रार्थना, बायबल, आपले भाऊबहीण आणि प्रचारकार्य. या चार गोष्टींमधून आपण बळ मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण दाखवतो, की यहोवावर आपला पूर्ण भरवसा आहे. आणि आपल्याला मदत करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल आपल्याला जराही शंका नाही. बायबल म्हणतं: “ज्यांचं मन पूर्णपणे यहोवाकडे लागलेलं असतं, त्यांच्यासाठी आपली शक्‍ती प्रकट” करायची त्याची इच्छा असते. (२ इति. १६:९) त्यामुळे ताकद मिळवण्यासाठी आपण नेहमी यहोवावर विसंबून राहू या.

गीत १७ साक्षीदारांनो, पुढे चला!

^ परि. 5 आज आपण कठीण काळात जगत आहोत. पण त्याचा सामना करण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करतो. पौल आणि तीमथ्यलासुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण यहोवाने त्यांना आपली सेवा करत राहण्यासाठी कशी मदत केली ते आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आज आपण यहोवाची सेवा करत राहावी म्हणून तो कोणत्या चार मार्गांनी आपल्याला मदत करतो, तेही आपण या लेखात पाहू या.

^ परि. 2 नाव बदलण्यात आलं आहे.

^ परि. 17 हा अंक इंग्रजीत उपलब्ध आहे.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: रोममध्ये एका घरात कैद असताना पौल मंडळ्यांना पत्र लिहित आहे आणि त्याला भेटायला येणाऱ्‍यांना प्रचार करत आहे.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: मंडळ्यांना भेटी देताना तीमथ्य तिथल्या भावांना प्रोत्साहन देत आहे.