व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २३

आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा

आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा

“तू आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.”​—मत्त. २२:३७.

गीत ४१ तारुण्यात यहोवाची सेवा करा

सारांश *

१-२. आपली परिस्थिती बदलते तेव्हा बायबलची काही तत्त्वं आपल्यासाठी जास्त महत्त्वाची कशी बनतात हे स्पष्ट करा.

 कल्पना करा, एका जोडप्याच्या लग्नाचा दिवस आहे. नवरा-नवरी दोघंही खूप देखणे दिसत आहेत. या प्रसंगी बायबलच्या आधारावर दिलं जात असलेलं भाषण ते लक्ष देऊन ऐकत आहेत. भाषणात सांगितलेली तत्त्वं खरंतर त्यांच्यासाठी नवीन नाहीत. पण आजपासून ही तत्त्वं त्यांच्यासाठी आणखी जास्त महत्त्वाची आहेत. का? कारण आजपासून एक विवाहित जोडपं म्हणून ते स्वतः या तत्त्वांचा जीवनात उपयोग करणार आहेत.

यहोवाची सेवा करणारं एखादं जोडपं आईवडील बनतं तेव्हाही हीच गोष्ट पाहायला मिळते. पूर्वी त्यांनी मुलांचं संगोपन कसं करावं या विषयावर बरीच भाषणं ऐकलेली असतात. पण आता तीच तत्त्वं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाची असतात. कारण आता आपल्या स्वतःच्या मुलाला लहानाचं मोठं करायची जबाबदारी त्यांच्यावर आलेली असते. ही खरंच किती मोठी जबाबदारी आहे! आपली परिस्थिती बदलते तेव्हा बायबलमधल्या काही विशिष्ट तत्त्वांबद्दल आपला दृष्टिकोनही बदलतो. म्हणूनच, जे यहोवाची उपासना करतात ते बायबल वाचतात आणि इस्राएलच्या राजांना सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे “आयुष्यभर”  त्याच्यावर मनन करतात.​—अनु. १७:१९.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आईवडिलांनो, आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याचा एक खूप मोठा बहुमान तुम्हाला मिळाला आहे. पण ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मुलांना देवाबद्दल फक्‍त माहिती देणं पुरेसं नाही. तर त्याच्यावर मनापासून प्रेम करायला मुलांना शिकवणंही गरजेचं आहे. मग यहोवाबद्दल असं प्रेम तुमच्या मुलांच्या मनात उत्पन्‍न करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? या लेखात आपण बायबलमधली अशी चार तत्त्वं पाहू, जी तुम्हाला याबाबतीत खूप मदत करतील. (२ तीम. ३:१६) तसंच, बायबलमधल्या सल्ल्याचा उपयोग केल्यामुळे काही ख्रिस्ती आईवडिलांना कसा फायदा झाला आहे हेसुद्धा आपण पाहू.

आईवडिलांना मदत करतील अशी चार तत्त्वं

तुम्ही नेहमी यहोवाचं मार्गदर्शन मिळवायचा आणि मुलांसमोर चांगलं उदाहरण ठेवायचा प्रयत्न केला, तर यामुळे कोणता चांगला परिणाम होईल? (परिच्छेद ४, ८ पाहा)

४. आईवडिलांना मदत करणारं सगळ्यात पहिलं तत्त्व कोणतं आहे? (याकोब १:५)

पहिलं तत्त्व: यहोवाचं मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करा.  तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करता यावी म्हणून यहोवाकडे बुद्धी मागा. (याकोब १:५ वाचा.) कारण यहोवाच आपल्याला सगळ्यात चांगलं मार्गदर्शन देऊ शकतो. असं का म्हणता येईल? याची बरीच कारणं आहेत. पण त्यांपैकी दोन कारणांचा विचार करा. पहिलं म्हणजे, पालक म्हणून यहोवाच सगळ्यात अनुभवी आहे. (स्तो. ३६:९) आणि दुसरं म्हणजे त्याने दिलेल्या सल्ल्यामुळे आपला नेहमी फायदाच होतो.​—यश. ४८:१७.

५. (क) आईवडिलांना मदत करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने कोणतं मार्गदर्शन पुरवलं आहे? (ख) व्हिडिओमध्ये ब्रदर आणि सिस्टर अमोरीम यांनी आपल्या मुलांना ज्या प्रकारे वाढवलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

यहोवा आज त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे, बायबलवर आधारित असलेलं मार्गदर्शन भरपूर प्रमाणात पुरवत आहे. तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवण्यासाठी तुम्ही या माहितीचा उपयोग करू शकता. (मत्त. २४:४५) उदाहरणार्थ आजपर्यंत आपल्या प्रकाशनांमध्ये कुटुंबासाठी उपयोगी असलेली बरीच माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यापैकी बरेच लेख आता आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसंच, आपल्या वेबसाईटवर मुलाखती आणि नाट्यरूपांतर असलेले बरेच व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मुलांना वाढवण्यासाठी हे व्हिडिओ आईवडिलांना खूप उपयोगी ठरू शकतात. *​—नीति. २:४-६.

६. यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाबद्दल एका बांधवाने काय म्हटलं?

यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे पुरवलेल्या मार्गदर्शनाबद्दल बऱ्‍याच आईवडिलांनी आभार व्यक्‍त केले आहेत. ज्यो नावाचे एक बांधव म्हणतात: “तीन मुलांना सत्यात वाढवणं ही सोपी गोष्ट नाही. मी आणि माझी पत्नी नेहमी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करतो. आणि आम्हाला बऱ्‍याच वेळा असा अनुभव आलाय, की एखाद्या समस्येचा सामना करत असताना अगदी योग्य वेळी आम्हाला मदत करू शकेल असा एखादा लेख किंवा व्हिडिओ आला. खरंच, यहोवाच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही आमच्या मुलांना सत्यात वाढवू शकलो नसतो.” संघटनेने पुरवलेल्या मार्गदर्शनामुळे मुलांना यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला किती मदत होते, हे ज्यो आणि त्यांच्या पत्नीने स्वतः अनुभवलं आहे.

७. आईवडिलांनी मुलांसमोर एक चांगलं उदाहरण ठेवायचा प्रयत्न का केला पाहिजे? (रोमकर २:२१)

दुसरं तत्वं: स्वतःच्या उदाहरणातून शिकवा.  आईवडिलांच्या वागण्या-बोलण्याकडे मुलांचं बारीक लक्ष असतं. आणि ते त्यांचं अनुकरण करतात. अर्थात, आईवडीलसुद्धा अपरिपूर्ण आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हातूनही चुका होतात. (रोम. ३:२३) पण असं असलं, तरी आईवडिलांनी आपल्या मुलांसमोर चांगलं उदाहरण ठेवायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. (रोमकर २:२१ वाचा.) मुलांबद्दल एका वडिलाने असं म्हटलं: “स्पंज जसं सगळं काही शोषून घेतो तशीच मुलंही असतात. आम्ही मुलांना जे शिकवतो त्याप्रमाणे जर वागलो नाही, तर मुलं ही गोष्ट लगेच आमच्या लक्षात आणून देतात. म्हणूनच, जर मुलांनी यहोवावर प्रेम करावं अशी आपली इच्छा असेल, तर आपण स्वतः त्याच्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि हे आपल्या वागण्यातून दिसून आलं पाहिजे.”

८-९. अँड्रू आणि एम्माने जे म्हटलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

आईवडिलांनो ही गोष्ट कधीही विसरू नका, की यहोवावर असलेल्या तुमच्या प्रेमाचा तुमच्या मुलांवर जबरदस्त प्रभाव पडतो. तुम्ही आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला बऱ्‍याच मार्गांनी शिकवू शकता. १७ वर्षांचा अँड्रू काय म्हणतो ते पाहा: “प्रार्थना करणं किती महत्त्वाचंय हे माझ्या आईवडिलांनी मला लहानपणापासून शिकवलंय. दररोज रात्री झोपण्याआधी माझी स्वतःची प्रार्थना झाली असली, तरी पप्पा माझ्यासोबत येऊन प्रार्थना करायचे. मम्मी-पप्पा आम्हाला नेहमी सांगायचे, ‘तुम्ही कितीही वेळा प्रार्थना केली तरी यहोवा ऐकेल.’ आज मी अगदी सहजपणे यहोवाशी प्रार्थनेत बोलतो. आणि तो माझा पिता आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करतो ही गोष्ट मला जाणवते. माझ्या आईवडिलांनी मला प्रार्थनेचं महत्त्व शिकवल्यामुळेच हे शक्य झालं.”

एम्माचंही उदाहरण पाहा. एम्मा लहान होती तेव्हा तिचे वडील कुटुंबाला सोडून गेले. त्यांनी खूप कर्ज करून ठेवलं होतं. आणि तिच्या आईला ते फेडावं लागलं. एम्मा म्हणते: “कर्ज फेडणं आणि घर चालवणं ही मम्मीसाठी तारेवरची कसरतच होती. पण तरी ती आम्हाला नेहमी सांगायची की यहोवा त्याच्या लोकांची काळजी घेतो आणि त्यांच्या सगळ्या गरजा भागवतो. आणि या गोष्टीवर तिचा पूर्ण भरवसा आहे हे मला अगदी स्पष्टपणे दिसायचं. खरंच, मम्मी आम्हाला जे शिकवायची त्याप्रमाणे ती स्वतः वागायची.” एम्माने जे म्हटलं, त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच, की कठीण परिस्थितीतसुद्धा आईवडील आपल्या उदाहरणातून आपल्या मुलांना बरंच काही शिकवू शकतात.​—गलती. ६:९.

१०. इस्राएलमध्ये आईवडिलांना आपल्या मुलांशी बोलायची संधी केव्हा मिळायची? (अनुवाद ६:६, ७)

१० तिसरं तत्वं: आपल्या मुलांशी नेहमी बोलत जा.  यहोवाने इस्राएली लोकांना आज्ञा दिली होती की त्यांनी आपल्या मुलांना नेहमी यहोवाबद्दल शिकवावं. (अनुवाद ६:६, ७ वाचा.) त्या काळात आईवडिलांजवळ मुलांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या मनात यहोवाचं प्रेम रुजवण्यासाठी दिवसभरात बऱ्‍याच संधी असायच्या. उदाहरणार्थ, शेतात पेरणी करण्यासाठी किंवा कापणी करण्यासाठी मुलं बरेच तास आपल्या वडिलांसोबत मिळून काम करायची. तसंच, मुलीसुद्धा बराच वेळ आपल्या आईसोबत मिळून विणकाम, शिवणकाम आणि घरातली इतर कामं करायच्या. आईवडील आणि मुलं सोबत मिळून काम करायची तेव्हा त्यांना बऱ्‍याच महत्त्वाच्या विषयांवर एकमेकांसोबत बोलायची संधी मिळायची. जसं की, यहोवाच्या चांगुलपणाबद्दल, दयाळूपणाबद्दल आणि तो आपल्या कुटुंबाला कशी मदत करतो याबद्दल ते एकमेकांशी बोलायचे.

११. आईवडिलांना आपल्या मुलांशी बोलण्याची एक चांगली संधी केव्हा असते?

११ आज परिस्थिती बदलली आहे. बऱ्‍याच देशांमध्ये आईवडिलांना आणि मुलांना दिवसभरात एकमेकांसोबत वेळ घालवणं शक्य होत नाही. कारण आईवडील कामाला तर मुलं शाळेला जातात. म्हणूनच आईवडिलांनी आपल्या मुलांशी बोलण्यासाठी संधी शोधणं खूप गरजेचं आहे. (इफिस. ५:१५, १६; फिलिप्पै. १:१०) कौटुंबिक उपासना ही मुलांशी बोलण्यासाठी एक चांगली संधी असते. ॲलेक्झॅन्डर म्हणतो: “माझे पप्पा एकही आठवडा कौटुंबिक उपासना चुकवत नाहीत. दुसऱ्‍या कोणत्याही कामाला ते त्याच्या आड येऊ देत नाहीत. कौटुंबिक उपासना झाल्यावरही आम्ही बराच वेळ एकमेकांशी बोलत बसतो.”

१२. कौटुंबिक उपासनेच्या वेळी कुटुंबप्रमुखाने काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१२ जर तुम्ही कुटुंबप्रमुख असाल, तर कौटुंबिक उपासनेतून मुलांना आनंद मिळावा म्हणून तुम्ही काय करू शकता? कायम जीवनाचा आनंद घ्या!  या आपल्या नवीन प्रकाशनातून मुलांसोबत अभ्यास करण्याचा तुम्ही विचार केला आहे का? या पुस्तकातून अभ्यास करताना तुम्हाला मुलांसोबत मनमोकळेपणाने बोलता येईल. तुमच्या मुलांनी तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करावं असं तुम्हाला वाटतं का? तर मग, कौटुंबिक उपासनेच्या वेळेस त्यांना रागवायचा किंवा भाषण द्यायचा कधीही प्रयत्न करू नका. तसंच, मुलांनी एखाद्या वेळेस बायबलच्या विरोधात असलेलं एखादं मत व्यक्‍त केलं तरी लगेच त्यांच्याशी चिडून बोलू नका. उलट, त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्‍त केल्या याबद्दल त्यांची प्रशंसा करा, आणि पुढेही त्यांनी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलावं असं प्रोत्साहन त्यांना द्या. कारण तुमच्या मुलांच्या मनात नेमकं काय आहे, हे तुम्हाला कळलं तरच तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकाल.

आईवडील आपल्या मुलांना यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींवरून त्याच्या गुणांबद्दल कसं शिकवू शकतात? (परिच्छेद १३ पाहा))

१३. यहोवाला जवळून ओळखायला मुलांना मदत करण्यासाठी आईवडिलांकडे आणखी कोणत्या संधी असतात?

१३ आईवडिलांनो, मुलांना देवाच्या प्रेमाबद्दल शिकवण्यासाठी कौटुंबिक अभ्यासाची वाट पाहू नका. यहोवाला आणखी जवळून ओळखण्यासाठी आपल्या मुलांना मदत करता यावी म्हणून दिवसभरात इतर संधींचाही फायदा घ्या. याबद्दल लिसा नवाच्या एका बहिणीने असं म्हटलं: “यहोवाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींवरून आम्ही मुलांना त्याच्याबद्दल शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करायचो. कधीकधी आमच्या कुत्र्याच्या मजेशीर हालचाली पाहून आम्हाला खूप हसू यायचं. त्यावरून आम्ही मुलांना हे शिकवायचो, की आपला निर्माणकर्ता एक आनंदी देव आहे. आपण जीवनात मजेशीर गोष्टींचा आनंद घ्यावा आणि नेहमी खूश राहावं अशीच त्याची इच्छा आहे.”

आईवडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांच्या मित्रमैत्रिणींना ओळखता का? (परिच्छेद १४ पाहा) *

१४. मुलांना चांगले मित्र निवडायला मदत करणं का महत्त्वाचं आहे? (नीतिवचनं १३:२०)

१४ चौथं तत्त्व: आपल्या मुलांना चांगले मित्र बनवायला मदत करा.  बायबलमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आहे, की आपण ज्यांच्याशी मैत्री करतो, त्यांचा आपल्यावर एकतर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. (नीतिवचनं १३:२० वाचा.) आईवडिलांनो तुमच्या मुलांची कोणाशी मैत्री आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटून त्यांच्यासोबत वेळ घालवला आहे का? ज्यांचं यहोवावर प्रेम आहे, असे चांगले मित्र बनवायला तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता? (१ करिंथ. १५:३३) यासाठी, मंडळीत चांगली प्रगती करत असलेल्या भाऊबहिणींनी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवावा म्हणून तुम्ही त्यांना आपल्या घरी बोलवू शकता.​—स्तो. ११९:६३.

१५. आईवडील आपल्या मुलांना चांगले मित्र बनवायला कशी मदत करू शकतात?

१५ टोनी नावाच्या एका भावाचा अनुभव पाहू या. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांना चांगले मित्र निवडायला कशी मदत केली याबद्दल ते सांगतात: “बऱ्‍याच वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या तरुण आणि वयस्कर भाऊबहिणींना आमच्या घरी जेवायला बोलवतो. आणि मग आम्ही सगळे मिळून कौटुंबिक उपासनासुद्धा करतो. यामुळे आम्हाला यहोवावर प्रेम करणाऱ्‍या आणि आनंदाने त्याची सेवा करणाऱ्‍या वेगवेगळ्या भाऊबहिणींशी ओळख वाढवायची संधी मिळते. आजपर्यंत कितीतरी सर्किट ओव्हरसिअर आणि मिशनरी भाऊबहीणी आमच्या घरी राहून गेले आहेत. खरंच हा आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यांचा अनुभव, त्यांचा आवेश आणि स्वार्थत्यागी वृत्ती पाहून आमच्या मुलांवर खूप जबरदस्त प्रभाव पडला आहे. आणि त्यांनाही यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत झाली आहे.” आईवडिलांनो आपल्या मुलांना चांगले मित्र बनवायला मदत करण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करा.

कधीही आशा सोडू नका

१६. तुमच्या मुलाने जर यहोवाला सोडून द्यायचा निर्णय घेतला तर तुम्ही कोणती गोष्ट लक्षात ठेवू शकता?

१६ तुम्ही इतकी मेहनत घेऊनही जर तुमच्या एखाद्या मुलाने यहोवाला सोडून द्यायचं निवडलं तर काय? असं झालं तरी मुलांचं संगोपन करण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात असा विचार करू नका. यहोवाने आपल्या सगळ्यांनाच, तुमच्या मुलालाही, इच्छास्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे यहोवाची सेवा करायची की नाही, हे आपण प्रत्येक जण ठरवू शकतो. जर तुमच्या मुलाने यहोवाला सोडून द्यायचा निर्णय घेतला असेल तर एक-ना-एक दिवशी तो नक्की परत येईल, ही आशा कधीही सोडू नका. येशूने दिलेलं हरवलेल्या मुलाचं उदाहरण आठवा. (लूक १५:११-१९, २२-२४) त्या मुलाने बऱ्‍याच चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. पण शेवटी तो परत आला. काही जण कदाचित म्हणतील, की ‘ते तर फक्‍त एक उदाहरण होतं. खरोखरच्या जीवनात असं होऊ शकतं का?’ हो नक्कीच होऊ शकतं. ईली नावाच्या एका तरुणाच्या बाबतीत अगदी असंच घडलं.

१७. ईलीच्या अनुभवात तुम्हाला कोणती गोष्ट आवडली?

१७ ईली आपल्या आईवडिलांबद्दल म्हणतो: “त्यांनी माझ्या मनात यहोवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल म्हणजेच बायबलबद्दल प्रेम निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण १४-१५ वर्षांचा झाल्यावर मी त्यांच्या विरोधात वागू लागलो.” ईलीने आपल्या आईवडिलांपासून लपवून वाईट गोष्टी करायला सुरुवात केली. त्याच्या आईवडिलांनी त्याला मदत करायचा खूप प्रयत्न केला. पण त्याने त्यांचं ऐकलं नाही. तो घर सोडून निघून गेला आणि वाईट कामं करत राहिला. पण असं असलं तरी त्याच्या एका मित्रासोबत तो अधूनमधून बायबलबद्दल चर्चा करायचा. ईली सांगतो: “मी जेव्हा-जेव्हा माझ्या मित्राशी यहोवाबद्दल बोलायचो तेव्हा-तेव्हा मी यहोवाबद्दल विचार करायचो. माझ्या आईवडिलांनी खूप मेहनतीने सत्याचं जे बी माझ्या मनात पेरलं होतं, ते अजूनही जिवंत होतं. आणि आता ते हळूहळू पुन्हा वाढू लागलं.” काही काळानंतर ईली सत्यात परत आला. * ईलीच्या आईवडिलांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. त्याला अगदी लहान वयापासूनच यहोवावर प्रेम करायला शिकवल्यामुळेच हे होऊ शकलं.​—२ तीम. ३:१४, १५.

१८. आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवण्यासाठी मेहनत घेणाऱ्‍या आईवडिलांबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

१८ आईवडिलांनो, आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवल्यामुळे त्याच्या उपासकांची एक नवीन पिढी तयार करण्याचा मोठा बहुमान तुम्हाला मिळाला आहे. (स्तो. ७८:४-६) आणि ही काही साधी गोष्ट नाही. तुम्ही आपल्या मुलांना मदत करण्यासाठी रात्रंदिवस जी मेहनत घेत आहात, त्याबद्दल आम्ही मनापासून तुमचं कौतुक करतो. तुम्ही पुढेही आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याच्या आज्ञा पाळायला शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहिला, तर स्वर्गातल्या आपल्या प्रेमळ पित्याला खूप आनंद होईल याची तुम्ही खातरी बाळगू शकता.​—इफिस. ६:४.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

^ परि. 5 आईवडिलांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं. ख्रिस्ती आईवडिलांच्या बाबतीतही हेच खरंय. आपल्या मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते खूप मेहनत घेतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ते आपल्या मुलांना यहोवावर मनापासून प्रेम करायला शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. याबाबतीत आईवडिलांना मदत करतील अशा बायबलमधल्या चार तत्त्वांवर या लेखात चर्चा केली जाईल.

^ परि. 17 १ एप्रिल २०१२ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “बायबलने बदलले जीवन” हा लेख पाहा.

^ परि. 57 चित्राचं वर्णन: आपल्या मुलाच्या मित्रांशी ओळख करून घेण्यासाठी एक वडील आपल्या मुलासोबत आणि त्याच्या एका मित्रासोबत बास्केटबॉल खेळत आहेत.