व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २२

देवाकडून मिळणारी बुद्धी जीवनात योग्य मार्ग दाखवते

देवाकडून मिळणारी बुद्धी जीवनात योग्य मार्ग दाखवते

“यहोवा स्वतः बुद्धी देतो.”​—नीति. २:६.

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

सारांश *

१. आपल्या सर्वांना देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीची गरज का आहे? (नीतिवचनं ४:७)

 तुम्हाला कधी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे का? तो निर्णय घेताना तुम्ही नक्कीच यहोवाला बुद्धीसाठी प्रार्थना केली असेल. आणि हे योग्यच आहे. (याको. १:५) शलमोन राजाने म्हटलं होतं: “बुद्धीच सर्वात महत्त्वाची आहे.” (नीतिवचनं ४:७ वाचा.) पण शलमोन इथे सर्वसाधारण बुद्धीबद्दल बोलत नव्हता. तर तो यहोवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीबद्दल बोलत होता. (नीति. २:६) पण देवाकडून मिळणारी ही बुद्धी आपल्याला रोजच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांचा सामना करायला खरंच मदत करू शकते का? हो नक्कीच करू शकते. आणि या लेखात आपण तेच पाहणार आहोत.

२. खऱ्‍या अर्थाने बुद्धिमान व्हायचा एक मार्ग कोणता?

खऱ्‍या अर्थाने बुद्धिमान व्हायचा एक मार्ग म्हणजे, शलमोन आणि येशूने दिलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे वागणं. ते दोघंही खूप बुद्धिमान होते. बायबल सांगतं, की “देवाने शलमोनला अमर्याद बुद्धी आणि समजशक्‍ती दिली.” (१ राजे ४:२९) येशूबद्दल बोलायचं झालं, तर तो आजपर्यंत होऊन गेलेला सगळ्यात बुद्धिमान माणूस होता. (मत्त. १२:४२) त्याच्याबद्दल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती, “यहोवाची पवित्र शक्‍ती त्याच्यावर राहील. त्यामुळे तो बुद्धिमान आणि समंजस असेल.”​—यश. ११:२.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

देवाकडून मिळालेल्या बुद्धीमुळेच शलमोन आणि येशूने जीवनातल्या काही महत्त्वाच्या विषयांवर उपयोगी पडतील असे व्यावहारिक सल्ले दिले. या लेखात आपण त्यांपैकी तीन विषयांवर म्हणजे पैशाबद्दल, नोकरी-व्यवसायाबद्दल आणि स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवणं किती महत्त्वाचं आहे यावर चर्चा करणार आहोत.

पैशाच्या बाबतीत योग्य दृष्टिकोन

४. शलमोन आणि येशूची परिस्थिती कशा प्रकारे वेगळी होती?

शलमोनकडे अमाप संपत्ती होती आणि तो ऐशआरामात राहायचा. (१ राजे १०:७, १४, १५) याउलट येशूकडे फारसं काही नव्हतं. त्याच्याकडे स्वतःचं घरसुद्धा नव्हतं. (मत्त. ८:२०) या दोघांची परिस्थिती वेगवेगळी जरी असली, तरी त्या दोघांचा धनसंपत्तीबद्दल किंवा पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन होता. कारण त्या दोघांकडेही यहोवाकडून मिळणारी बुद्धी होती.

५. पैशाबद्दल शलमोनचा योग्य दृष्टिकोन होता, असं का म्हणता येईल?

पैशामुळे “संरक्षण” मिळतं ही गोष्ट शलमोनने मान्य केली. (उप. ७:१२) आपल्याजवळ पैसे असले, तर आपण जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी आणि त्यांसोबतच काही चैनीच्या वस्तूही घेऊ शकतो. शलमोनला कशाचीच कमी नव्हती. पण त्याला याची जाणीव होती, की पैसाच सर्वकाही नाही. म्हणूनच त्याने लिहिलं, “भरपूर धनसंपत्तीपेक्षा चांगलं नाव [किंवा, “नावलौकिक,” तळटीप] मिळवणं बरं.” (नीति. २२:१) तसंच ज्यांना धनसंपत्तीची हाव असते त्यांच्याकडे सर्वकाही असूनही ते सुखी नसतात, ही गोष्टही शलमोनने ओळखली होती. (उप. ५:१०, १२) म्हणूनच त्याने सल्ला दिला, की आपण जीवनात पैशाला आवश्‍यकतेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही.​—नीति. २३:४, ५.

पैसा किंवा धनसंपत्तीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यामुळे यहोवाच्या सेवेकडे आपलं दुर्लक्ष होत आहे का? (परिच्छेद ६-७ पाहा) *

६. येशूचा पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन होता असं का म्हणता येईल? (मत्तय ६:३१-३३)

येशूचाही धनसंपत्तीबद्दल किंवा पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन होता. त्याला खाण्यापिण्याची आवड होती. (लूक १९:२, ६, ७) त्याच्या पहिल्या चमत्कारात त्याने अतिशय चांगल्या दर्जाचा द्राक्षारस तयार केला. (योहा. २:१०, ११) आणि त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याने खूप महागाचा झगा घातला होता. (योहा. १९:२३, २४) पण असं असलं, तरी येशूने पैशाला किंवा धनसंपत्तीला आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान कधीच दिलं नाही. त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं, “कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” (मत्त. ६:२४) येशूने सांगितलं की जर आपण देवाच्या राज्याला जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं, तर यहोवा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करेल.​—मत्तय ६:३१-३३ वाचा.

७. पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे एका भावाला कोणते आशीर्वाद मिळाले?

पैशाच्या बाबतीत देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागल्यामुळे आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींना खूप फायदा झाला आहे. डॅनीएल नावाच्या एका अविवाहित भावाच्या उदाहरणाचा विचार करा. तो म्हणतो: “तरुणपणीच मी ठरवलं होतं, की मी माझ्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देईन.” डॅनीएलने त्याचं जीवन साधं ठेवल्यामुळे त्याला विपत्ती मदतकार्यात तसंच बेथेलमध्ये आपल्या वेळेचा आणि कौशल्यांचा उपयोग करणं शक्य झालं आहे. तो म्हणतो: “मी असा निर्णय घेतल्याचा मला कधीच पस्तावा झाला नाही. मी पैसा कमवायचं ठरवलं असतं तर आज मी खूप श्रीमंत असतो. पण विचार करा, मला जे मित्र मिळालेत ते मला मिळाले असते का? यहोवाच्या राज्याला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिल्यामुळे आज माझ्या मनात एक प्रकारचं समाधान आहे. पण हे समाधान पैशाने विकत घेता आलं असतं का? खरंच, यहोवाने मला जे आशीर्वाद दिलेत, ते पैशात मोजले जाऊ शकत नाहीत.” डॅनीएलच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की आपण पैशाऐवजी आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व देतो, तेव्हा आपला फायदाच होतो.

नोकरी-व्यवसायाबद्दल योग्य दृष्टिकोन

८. कामाबद्दल शलमोनचा योग्य दृष्टिकोन होता हे आपल्याला कसं कळतं? (उपदेशक ५:१८, १९)

मेहनतीने केलेल्या कामातून आपल्याला आनंद मिळतो. शलमोनने म्हटलं “ही देवाची देणगी आहे.” (उपदेशक ५:१८, १९ वाचा.) त्याने असंही म्हटलं: “मेहनत केल्याने नेहमीच फायदा होतो.” (नीति. १४:२३) शलमोन स्वतःच्या अनुभवातून हे बोलत होता. कारण त्याने स्वतःसुद्धा बरीच मेहनत घेतली होती. त्याने द्राक्षमळे लावले, तसंच घरं, उद्यानं आणि तलाव बनवले. शिवाय, त्याने कित्येक शहरंही बांधली. (१ राजे ९:१९; उप. २:४-६) या सगळ्यांसाठी त्याला नक्कीच खूप परिश्रम घ्यावे लागले असतील. त्यातून त्याला समाधानही मिळालं असेल यात काहीच शंका नाही. पण शलमोनने फक्‍त या गोष्टींत आनंद शोधला नाही, तर त्याने यहोवासाठी बरंच काही केलं. उदाहरणार्थ, यहोवाच्या उपासनेसाठी त्याने एक भव्य मंदिर बांधायचं काम हातात घेतलं. या प्रकल्पाला सात वर्षं लागली! (१ राजे ६:३८; ९:१) अशा प्रकारे आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची कामं केल्यानंतर शलमोनला हे जाणवलं, की इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवाची सेवा करणं हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्याने लिहिलं: “सर्वकाही ऐकून झाल्यावर, सर्व गोष्टींचा सारांश हा आहे: खऱ्‍या देवाचं भय मान आणि त्याच्या आज्ञा पाळ.”​—उप. १२:१३.

९. येशूने कामालाच सगळ्यात जास्त महत्त्व दिलं नाही हे कशावरून दिसून येतं?

येशूसुद्धा खूप मेहनती होता. तरुण वयापासूनच तो सुतारकाम करू लागला. (मार्क ६:३) येशू एका मोठ्या कुटुंबात वाढला. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तो जी काही मेहनत करत होता, त्याबद्दल त्याच्या आईवडिलांना नक्कीच खूप कौतुक वाटत असेल. येशू परिपूर्ण होता, त्यामुळे त्याचं कामसुद्धा खूप चांगल्या दर्जाचं असेल यात काहीच शंका नाही. आणि साहजिकच त्याने बनवलेल्या सामानाला भरपूर मागणी असेल. येशूलासुद्धा या कामातून खूप समाधान मिळत असेल. असं असलं, तरी येशूने आपला सगळा वेळ अशा कामांतच घालवला नाही तर त्याने आध्यात्मिक गोष्टींसाठीसुद्धा वेळ काढला. (योहा. ७:१५) नंतर, जेव्हा तो पूर्णवेळ प्रचाराचं काम करू लागला, तेव्हा त्याने असा सल्ला दिला: “नाश होणाऱ्‍या अन्‍नासाठी खटपट करू नका. तर अशा अन्‍नासाठी खटपट करा, जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं.” (योहा. ६:२७) आणि डोंगरावरच्या उपदेशात येशू म्हणाला: “स्वर्गात संपत्ती साठवा.”​—मत्त. ६:२०.

नोकरी-व्यवसाय आणि आध्यात्मिक कार्यं, या दोन्ही गोष्टींबद्दल आपण योग्य दृष्टिकोन कसा ठेवू शकतो? (परिच्छेद १०-११ पाहा) *

१०. कामाच्या ठिकाणी कशामुळे समस्या निर्माण होऊ शकते?

१० देवाकडून मिळालेली बुद्धी आपल्यालासुद्धा नोकरी-व्यवसायाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला मदत करेल. बायबल आपल्याला असा सल्ला देतं, की आपण “मेहनत करावी . . . प्रामाणिकपणे काम करावं.” (इफिस. ४:२८) आपण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतो तेव्हा आपले मालक किंवा बॉस आपली प्रशंसा करतात. अशा वेळी, कदाचित आपल्याला आणखी जास्त तास काम करावसं वाटेल. कदाचित आपण असा विचार करू, की यामुळे आपले मालक किंवा बॉस यहोवाच्या साक्षीदारांबद्दल चांगला विचार करतील. आपला हेतू जरी चांगला असला, तरी लवकरच आपल्या लक्षात येईल, की आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या आध्यात्मिक जबाबदाऱ्‍यांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. जर तुमच्या बाबतीत असं घडलं, तर तुम्ही काही बदल केले पाहिजेत, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देता येईल.

११. नोकरी-व्यवसायाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्याच्या बाबतीत एका भावाला काय शिकायला मिळालं?

११ नोकरी-व्यवसायाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्याच्या बाबतीत विल्यम नावाच्या एका तरुण भावाला दुसऱ्‍या एका भावाच्या उदाहरणावरून बरंच काही शिकायला मिळालं. विल्यम पूर्वी वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या एका भावाकडे नोकरी करायचा. विल्यम सांगतो: “कामाला जीवनात योग्य स्थानी कसं ठेवायचं, हे मी त्यांच्याकडून शिकलो. ते खूप मेहनतीएत, त्यांचं कामही खूप चांगलंय. त्यामुळे त्यांचे गिऱ्‍हाईकही त्यांच्यावर खूश असतात. पण एकदा का कामाची वेळ संपली, की ते आपलं काम तिथेच थांबवतात आणि आपल्या कुटुंबासाठी आणि यहोवासाठी वेळ देतात. आणि खरं सांगायचं, तर त्यांच्याइतका आनंदी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाहीए.” *

स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन

१२. शलमोनचा स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन होता, हे त्याने कसं दाखवलं, पण नंतर तो कसा बदलला?

१२ शलमोन यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत होता तोपर्यंत त्याचा स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन होता. तरुणपणी त्याने नम्रपणे आपल्या मर्यादा ओळखल्या आणि यहोवाच्या मार्गदर्शनासाठी विनंती केली. (१ राजे ३:७-९) शलमोनने राज्य करायला सुरुवात केली तेव्हा गर्विष्ठपणा किती धोकादायक असू शकतो, हे त्याला माहीत होतं. त्याने लिहिलं: “गर्व झाला की नाश ठरलेला; घमेंडी वृत्ती आली, की माणूस अडखळतो.” (नीति. १६:१८) दुःखाची गोष्ट म्हणजे नंतर शलमोन स्वतः या सल्ल्याच्या विरोधात वागला. काही वर्षं राज्य केल्यानंतर तो गर्विष्ठपणे देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करू लागला. उदाहरणार्थ, नियमशास्त्रात असं सांगण्यात आलं होतं, की राजाने “पुष्कळ बायका करू नयेत, नाहीतर त्याचं मन भरकटेल.” (अनु. १७:१७) पण शलमोनने या नियमाच्या विरोधात जाऊन ७०० बायका आणि ३०० उपपत्नी केल्या! यांपैकी बऱ्‍याच स्त्रिया खोट्या देवांची उपासना करत होत्या. (१ राजे ११:१-३) कदाचित शलमोनला असं वाटलं असेल, की मी हा नियम मोडला तरी माझं काही नुकसान होणार नाही. पण यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे शलमोनला नंतर वाईट परिणाम भोगावे लागले.​—१ राजे ११:९-१३.

१३. येशूच्या नम्रतेवर विचार केल्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळतं?

१३ येशूने नेहमीच स्वतःबद्दल योग्य आणि नम्र दृष्टिकोन ठेवला. पृथ्वीवर येण्याआधी त्याने यहोवाच्या सेवेत बरीच अद्‌भुत कार्यं केली. त्याच्याद्वारेच, “स्वर्गात आणि पृथ्वीवर, इतर सगळ्या . . . गोष्टी निर्माण करण्यात आल्या.” (कलस्सै. १:१६) त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी कदाचित त्याला आपल्या पित्यासोबत मिळून केलेल्या त्या सगळ्या गोष्टी आठवल्या असतील. (मत्त. ३:१६; योहा. १७:५) पण यामुळे येशू गर्विष्ठ बनला नाही. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं त्याने कधीच दाखवलं नाही. उलट, त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं, की तो पृथ्वीवर “सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आणि बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.” (मत्त. २०:२८) तसंच, त्याने नम्रपणे कबूल केलं, की तो स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही. (योहा. ५:१९) खरंच, येशू किती नम्र होता! त्याने आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे.

१४. आपण स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्याच्या बाबतीत येशूच्या शब्दांवरून काय शिकू शकतो?

१४ येशूने आपल्या शिष्यांना स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला शिकवलं. एकदा तो त्यांना म्हणाला: “तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत.” (मत्त. १०:३०) आपण जर स्वतःबद्दल नेहमी नकारात्मक विचार करत असू, तर येशूचे हे शब्द आपल्याला नक्कीच दिलासा देतील. कारण यावरून कळतं, की आपल्या स्वर्गातल्या पित्याला आपली खूप काळजी आहे आणि आपण त्याच्या नजरेत खूप मौल्यवान आहोत. कदाचित आपल्याला वाटत असेल, की आपण यहोवाची उपासना करायच्या आणि नवीन जगात कायमचं जीवन जगायच्या लायकीचे नाही. पण जर यहोवा आपल्याला त्याच्या लायक समजत असेल, तर मग यावर शंका घेणारे आपण कोण? हे यहोवाने चुकीचा न्याय केला आहे असं म्हणण्यासारखं ठरेल.

स्वतःला खूप जास्त महत्त्व दिल्यामुळे आपण कोणत्या चांगल्या संधी आणि आशीर्वाद गमावून बसू? (परिच्छेद १५ पाहा) *

१५. (क) स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्याच्या बाबतीत टेहळणी बुरूज  मासिकामध्ये कोणता सल्ला देण्यात आला आहे? (ख) पान २४ वर दिलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण जर स्वतःला जास्त महत्त्व देत राहिलो, तर कोणते आशीर्वाद गमावून बसू?

१५ स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्याच्या बाबतीत १५ वर्षांपूर्वी टेहळणी बुरूज  मासिकात खूप चांगली माहिती देण्यात आली होती. त्यात असं म्हटलं होतं, की “आपण स्वतःला इतकं श्रेष्ठ समजू नये, की आपल्यामध्ये गर्विष्ठपणा निर्माण होईल. आणि दुसरीकडे आपण असाही विचार करू नये, की आपण कसल्याच लायकीचे नाही. याउलट, आपण स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणजे आपल्याला स्वतःच्या क्षमता माहीत असल्या पाहिजेत. आणि त्याच वेळेस आपल्याला स्वतःच्या मर्यादांचीही जाणीव असली पाहिजे. याबद्दल आपली एक बहीण म्हणते: ‘मी स्वतःला खूप वाईट व्यक्‍तीही समजत नाही, आणि मी एक संत आहे असंही नाही. इतरांप्रमाणे माझ्यामध्येही काही चांगले गुण आहेत आणि काही वाईट गुणही आहेत.’” * खरंच, स्वतःबद्दल असा योग्य दृष्टिकोन ठेवणं किती महत्त्वाचं आहे!

१६. यहोवा आपल्याला त्याची बुद्धी आणि मार्गदर्शन का देतो?

१६ यहोवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला बुद्धी आणि मार्गदर्शन देतो. त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण आनंदी असावं असं त्याला वाटतं. (यश. ४८:१७, १८) आपण जर देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीचं मार्गदर्शन स्वीकारलं आणि त्याच्या सेवेलाच आपल्या जीवनात पहिलं स्थान दिलं, तर आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ. आणि हाच जीवन जगण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. कारण यामुळे पैशाला, नोकरी-व्यवसायाला आणि स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यामुळे येणाऱ्‍या समस्या आपल्याला टाळता येतात. तर मग, आपण सर्व जण देवाकडून येणाऱ्‍या बुद्धीचं मार्गदर्शन स्वीकारू या आणि त्याचं मन आनंदित करू या!​—नीति. २३:१५.

गीत ३७ देवप्रेरित शास्त्रवचने

^ परि. 5 शलमोन आणि येशू दोघंही खूप बुद्धिमान होते. आणि त्या दोघांना ही बुद्धी यहोवाकडून मिळाली होती. शलमोन आणि येशू यांनी देवाच्या प्रेरणेने जो सल्ला दिला त्याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. हा सल्ला आपल्याला पैसा, नोकरी-व्यवसाय आणि स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला मदत करेल. तसंच या तिन्ही बाबतींत बायबलमधला सल्ला लागू केल्यामुळे आपल्या काही भाऊबहिणींना कसा फायदा झाला आहे, तेही आपण पाहणार आहोत.

^ परि. 11 १ फेब्रुवारी २०१५ च्या टेहळणी बुरूज  (इंग्रजी) अंकातला “हाऊ टू इन्जॉय हार्ड वर्क” हा लेख पाहा.

^ परि. 15 १ ऑगस्ट २००५ च्या टेहळणी बुरूज  (हिंदी) अंकातला “खुशी पाने में बाइबल आपकी मदद कर सकती है” हा लेख पाहा.

^ परि. 52 चित्रांचं वर्णन: जॉन आणि जेम्स हे दोन तरुण भाऊ एकाच मंडळीत आहेत. जॉन आपला बराच वेळ आपल्या कारची देखभाल करण्यात घालवतो. तर जेम्स इतरांना प्रचारकार्यात आणि सभेला घेऊन जायला आपल्या कारचा उपयोग करतो.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: जॉन ओव्हरटाईम करत आहे. त्याला आपल्या बॉसला नाराज करायचं नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा त्याचा बॉस त्याला ओव्हरटाईम करायला सांगतो तेव्हा तो नाही म्हणत नाही. त्याच दिवशी संध्याकाळी, सहायक सेवक असलेला जेम्स मंडळीतल्या एका वडिलांसोबत मेंढपाळ भेट करत आहे. त्याने आधीच आपल्या बॉसला असं सांगितलं आहे, की आठवड्यातल्या काही दिवशी संध्याकाळी तो काम करू शकणार नाही. कारण त्याला आपल्या उपासनेशी संबंधित गोष्टींसाठी वेळ द्यायचा असतो.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: जॉन स्वतःलाच जास्त महत्त्व देत आहे. याउलट, जेम्स स्वतःच्या इच्छांपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व देत आहे. एका संमेलन गृहाच्या बांधकाम प्रकल्पावर काम करत असताना त्याला बरेच नवीन मित्र मिळाले आहेत.